41. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके भाग २, (६ ते १०)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

पनवेल पासून आठ किलोमीटर वर शिरढोण गाव आहे. शिरढोणचा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार अनंत रामचंद्र फडके होते. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त झाला. आणि इंग्रजांची वक्रदृष्टी कर्नाळा किल्ल्याकडे वळली. हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता.
कर्नल प्रोथेरने आपल्या सैन्यसह किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्यावर निरोप………………………….

भाग 6
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!

भाग – ६.
वासुदेवराव काही दिवस भटगुरूच्या वाड्यात राहिले. नंतर त्यांनी आपले बिर्‍हाड सदाशिव पेठ नरसिंह मंदिराजवळ हलवले. त्यावेळी त्या भागाला कारकोळपुरा म्हणत. नरसिंह मंदिराच्या बाजूला असलेल्या दोन खोल्यात वासुदेवांनी आपले बिर्‍हाड थाटले. इथेच एक तप म्हणजे बारा वर्षे राहिले.
वासुदेवराव पुण्यात आल्यावर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु मुलगा दोन महिन्यातच मृत्यू पावला. वासुदेवरावांचे स्वतःचे ज्वराचे दुखणे आणि पहिल्या मुलाच्या मृत्यूचा धक्का यामुळे ते अध्यात्माकडे वळले. मंदिरात येणाऱ्या विनायक भट वझे यांचे कडून सौर, रुद्र, पवमान, पुरुषसूक्त यांची संथा घेऊन मुखोद्गत केले. ते दत्ताला फार मानत असत. त्यांनी दत्तांचा जप सुरू केला. रोज पाच सहस्त्र जप आणि गुरुचरित्राचा एक अध्याय वाचल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसे. त्यांना एकमुखी दत्ताचे रुद्ररुप प्रिय होते. तसे चित्र त्यांनी फार प्रयत्न करून काढून घेतले. ते कितीतरी वेळ मंदिरात ध्यान लावून बसत. लोक त्यांना भ्रमिष्ट समजत.एका गणपती मंदिरातही ते नेमाने जात असे.
त्यांचे एवढे सर्व सुरू असले, तरी नोकरी मात्र व्यवस्थित सुरू होती. त्यांच्या सुंदर हस्ताक्षरामुळे ते वरिष्ठांमध्ये प्रिय होते. त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांचा वरिष्ठा बरोबर संवाद साधत असे.
१६६८ मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले. नाव “मथू ” ठेवले. मथू मोठी गोड मुलगी होती. कोणालाही तिचा लाड करावासा वाटायचा. तिच्या बाळ लीलांमध्ये दोघेही पती-पत्नी रंगून गेले. मथू कलेकलेने वाढत होती. संध्याकाळ झाली की मथू आपल्या पित्याची वाट पाहू लागली. बोबड्या बोलांनी घरात नवचैत्यन्य निर्माण झाले.
असेच आनंदात दिवस चालले होते. पण नियतीला त्यांचा हा आनंद पहावला नाही. आई अत्यवस्था असलेल्याचे बळवंतरावांचे पत्र आले.
वासुदेवरावांवर सध्या महत्त्वाचे काम सोपवले असल्यामुळे त्यांना रजा मिळणे कठीण होते. परंतु आई पुढे नोकरीचे महत्त्व काय या विचाराने त्यांची अर्ज केला. नामंजूर झाली. ते वरिष्ठांकडे गेले. त्यांना विनंती करत म्हणाले, सर, माझी आई अत्यवस्थ आहे तिला भेटायला जाणे अगदी आवश्यक आहे. ते म्हणाले, फडके, तुम्ही अर्ज करा. रजा मंजूर झाली तर जा.
त्यांनी रितसर केला. आई आजारी असल्याचे नमूद केले. रोज चौकशी करणे चालूच होते. चार दिवसांनी त्यांची रजा ना मंजूर करण्यात आली. वासुदेवरावांचा भयंकर संताप झाला त्याभरातच आईला बघयला मी शिरढोणला जात असल्याची चिठ्ठी लिहून अधिकाऱ्याकडे पाठवली. आणि कर्जाची गाडी धरली. शिरढोणला पोहोचेपर्यंत त्यांचे चित्त थार्‍यावर नव्हते.
” मन चिंती ते वैरी न चिंती”
अशा मनःस्थितीतच ते शिरढोणला पोहचले. घाईने घराकडे निघाले. दुरुनच घरी लोकांची गर्दी दिसली. अशुभची पाल मनात चुकचुली. पायाला वेग आला. शंका खाली ठरली. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली त्या माऊलीने अखेर आपले प्राण सोडले. अखेरची भेट झालीच नाही.
बळवंतराव गदगदल्या आवाजत म्हणाले, वासुदेवा, फार उशीर केलास रेऽ!
दादाऽऽ! आई मला सोडून गेली होऽऽ! मला न भेटताच ती कशी गेली? मी आई कोणाला म्हणू? मला न भेटताच का निघून गेलीस गंऽ? वासुदेव आपल्या वडिलांच्या कुशीत शिरुन विलाप करू लागले.
बळवंतराव म्हणाले, बेटा, शांत हो! तू तिला खूप वाट पाहायला लावलीस रेऽ! अरे शेवटपर्यंत तिच्या मुखी तुझेच नाव होते. जणूं तुझ्यासाठीच तिने प्राण अडवून ठेवले होते. अखेर वाट पाहून पाहून ती गेली.
दादा नौकरीमुळे हात बांधले होते होऽऽ! रजेसाठी अर्ज केला तो आज सकाळीच ना मंजूर झाला,
आणि तरीही तू आलास?
दादा नोकरी पेक्षा मला आई जास्त महत्त्वाची वाटली. पण तरीही उशीर झालाच. अखेर तुझी भेट झाली नाही ती नाहीच.
आईचे और्ध्वदेहिक उरकवून वासुदेव पुण्यात आले. नोकरी वर गेले. सर्व घटना सविस्तर लिहून वरिष्ठांविरुद्ध मुंबई सरकारकडे तक्रार अर्ज पाठवला. त्यांना वासुदेवरावांची बाजू न्याय्य वाटत असली तरी आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध काही ॲक्शन घेतली नाही. त्यांच्या अर्जावर काहीच विचार केला गेला नाही.
या सर्व मनःस्तापाचा परिणाम शेवटी विषमज्वरात झाला. ते तीन महिने अंथरुणावर खिळून होते.
मातृवियोगाच्या दुःखातूनच इंग्रज अधिकाऱ्यांचा सूड घेण्याचे विचार जन्म घेत होते.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.


भाग 7
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!

भाग – ७.
वासुदेवरावांचा विषमज्वर दिवसें दिवस बळावतच चालला होता. त्यातच त्यांची बडबड वाढली. ग्लानीत ओरडत म्हणाले, सरस्वतीऽऽ, तूं मला न भेटताच कां गेलीस? याचा मी या इंग्रजांचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. सईबाईने पतीच्या वाढत्या तापाबद्दल शिरढोणला कळवले. सुनबाईच्या मदतीला बळवंतराव धावून आले. डॉक्टरी इलाज व पत्नीच्या सेवेमुळे वासुदेवरावांचा ताप कमी झाला. प्रकृती सुधारल्यावर तीन महिन्यानंतर ते ऑफिसमध्ये जाऊ लागले.
दोन-तीन महिन्यांनी आईचे वर्षश्रद्धा आले. याही वेळी त्यांची रजा नामंजूर करण्यात आली. आता मात्र वासुदेवराव अत्यंत प्रक्षुब्ध झालेत. तक्रार अर्जाचे काहीच उत्तर न देता, वरून आईच्या श्रद्धाला जाण्याची रजा नाकारली. यामुळे त्यांचा संताप शिगेला पोहोचला. याचा प्रतिशोध घ्यायलाच हवा. सूड…सूड…सूड…
त्यांनी आपण काय करावे हा प्रश्न आपल्या इष्ट देवते समोर ठेवला. एकदा ध्यानात असताना त्यांना प्रत्यक्ष दृष्टांत झाला….
सध्या तुझ्या मनात जे करायचे आहे त्यासाठी सध्याचा काळ अनुकूल नाही. काळ अत्यंत विपरीत आहे. सध्या तू काहीच करू नकोस. इच्छित फळ मिळणार नाही. असे दत्त महाराजांनी सांगितल्यावर त्यांचे मन स्थिर नव्हते.
ते अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला गेले. स्नान करून आले. तलवार स्वामींपुढे ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांना वाटले, स्वामी महाराज तलवार स्वतः देतील. परंतु स्वामींनी तलवारीला स्पर्शही न करता तलवारीला झाडावर ठेवण्याची व्यवस्था केली. बराच वेळ वाट पाहून वासुदेवरावांनी तलवार स्वतः काढून घेतली. स्वामींची कृपा नाही. आता निघावं. असं म्हणून नमस्कार करून घरी पुण्यात आले.
मन फार अस्थिर होते. अनेक विचार मनात येत होते. अशाच अस्वस्थ मनस्थितीत ते गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला गेले. तिथेही त्यांची निराशाच झाली. गोंदवलेकर महाराज म्हणाले, वासुदेव, सध्याचा समय तुमच्या कार्याला अनुकूल नाही. गुरु महाराजांची उपासना करून काही मार्ग मिळतो का ते पहा.
महाराजांच्या शब्दामुळे वासुदेवरावांचे मन जबरदस्त जखमी झाले. रागाने बेभान झाले. ओरडून म्हणाले, तुमच्यासारख्या साधूनचा मला उपदेश नकोय.
एवढ्या काळ्याकुट्ट अंधारातरात्रीच परतीच्या प्रवासाला निघाले. मनात विचारांचे थैमान माजले होते. एक एक योजना मनात आकार घेत होती. हळूहळू मन शांत झाले. पुण्याला घरीपरत आले.
इंग्रजांचा सूड घेण्याची तीव्र इच्छा मनात उसळू लागली. त्यांच्या समोर आई सरस्वती ऐवजी गुलामगिरीच्या श्रृंखलेत जखडलेली राष्ट्रमाता दिसू लागली. रात्रंदिवस तिचे आर्त स्वर कानात घुमू लागले….
वासुदेवाऽऽ! मला या गुलामगिरीच्या शृंखलेतून मुक्त कर… मुक्त कर…
वासुदेवराव नोकरी करत होते पण आता त्यांना काहीच रस नव्हता. ऑफिस वेळात होईल तेवढेच काम करून ते निघून जात. आजही असेच ऑफिसची वेळ संपल्यावर ते बाहेर पडले. घरी न जाता मित्राकडे गेले. मित्राने विचारले, माधवराव रानडेंचे व्याख्यान ऐकायला येणार का?
अरे अशी पर्वणी कोण सोडेल? जोशी मित्र व वासुदेवराव सभा स्थानी आले. माधवराव रानडे बोलू लागले….
माधवराव रानडेंचे स्वदेशीवरचे जोषपूर्ण भाषण ऐकून भारावलेले वासुदेवराव उभे होऊन म्हणाले…
” आत्ता या क्षणापासून मी विदेशी वस्त्र व वस्तू वापरणार नाही! “
रानड्यांना त्यांच्या शब्दातील तळमळ प्रकर्षाने जाणवली. त्यांनी विचारले,
नाव काय?
वासुदेव बळवंत फडके!
माधवराव म्हणाले तुमच्या प्रतिज्ञेतील दृढता बघून समाधान वाटले. आणि ते तिथून निघून गेले.
वासुदेवराव मित्राला म्हणाले, जोशी, असं वाटते नोकरी सोडून स्वातंत्र्या साठी काहीतरी करावे. मित्र म्हणाला, आणि परिवाराचं काय? उदरनिर्माण होणेही आवश्यक आहे.
सगळेजण आपल्या घराकडे निघाले. आज वासुदेवराव वेगळ्याच धुंदीत घरी आले. त्यांना काय माहिती की नियतीने त्यांच्यासाठी काय वाढून ठेवले आहे?
त्यांनी घरात प्रवेश केला. सर्वीकडे अंधार होता. असं कधी होत नाही. दिवाबत्ती करून पत्नी सई त्यांची वाट बघत असे. आतल्या खोलीत सईबाई झोपलेल्या दिसल्या. मथू शेजारी गेली होती. अशा अवेळी झोपलेल्या पत्नीला विचारले, काय झाले? यावेळी अंथरुणावर?
मोठ्या कष्टाने तापाने जडावलेले डोळे उघडत सईबाई म्हणाल्या, आज सकाळपासूनच ताप आहे. अगदीच उठवेना म्हणून झोपले.
मी वैद्याकडे जाऊन येतो. त्या म्हणाल्या, या काळोखात कुठेही जाऊ नका. सकाळपर्यंत ताप उतरेल. पण… नको…
बाहेर निघालेले वासुदेवराव आत आले. शेजारून मथुला घेऊन आले.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.


भाग 8
!!! क्रांतिवीर वसुदेव बळवंत फडके !!!

भाग – ८.
दुसऱ्या दिवशी सई बाईचा ताप कमी झाला तर नाहीच. उलट वाढलाच. छातीत दुखू लागले. पाठीत ठणका आणि पोटात आगडोंब उसळला. तहानेने सई बाईचा घसा सुकू लागला. वासुदेवराव घाबरले. त्यांनी पित्याला तातडीने निरोप पाठवून बोलावून घेतले. वैद्यकीय इलाज सुरू झाले. पण सही बाईचे दुखणे वाढतच होते. मथू केविलवाणी होऊन करूण नजरेने आईकडे पाहत होती. सईबाई लेकीकडे बघून त्यांचे हृदय विदिर्ण झाले. त्या पतीला म्हणाल्या…..
मी एक दोन दिवसाची सोबत…. मथूचे हाल…. होऊ… देऊ…. नकाऽऽ… ते म्हणाले, तिला मी जिवापाड जपेन. पण तू वेडेवाकडे अभद्र बोलू नकोस.
अहोऽ, खरंच बोलते. मी आता फार थोड्या वेळाची सोबती आहे.
पत्नीचा चेहरा बघून वासुदेवरावांना परिस्थितीची जाणीव झाली. पुढील संकटाची कल्पना आली. त्यांनी वडिलांना आत बोलावले. दोघेही रात्रभर सईबाईच्या समोर जवळ बसले होते. भल्या पहाटे मोठ्या कष्टाने सईबाईने डोळे उघडले. झोपलेल्या मथू कडे दृष्टी गेली. आणि जीवाची घालमेल झाली. ते पाहून सासरे बळवंत जवळ जाऊन म्हणाले, सुनबाई, मथूची चिंता करू नकोस. तिला मी असेपर्यंत जीवापाड जपेन. सासऱ्याचे शब्द ऐकताच सईबाईच्या चेहऱ्यावर समाधान पसरते. तिची अंतिम वेळ आल्याचे त्यांना जाणवले.
त्यांच्या सूचनेनुसार वासुदेवरावांनी पत्नीचे मस्तक मांडीवर घेतले. मुखात तुळशी पत्र व गंगाजळ घातले.
संसाराचा अर्धा डाव टाकून पत्नी सई निघून गेली. दादा मथुला घेऊन शिरढोणला गेले. त्या रिकाम्या घरात वासुदेवरावांना राहणे नकोसे वाटू लागली. ते आपला बराच वेळ बाहेर घालू लागले. देशासाठी काहीतरी करायची धडपड चालू होती.
एक दिवस वासुदेवराव घरी असताना एक गृहस्थ त्यांच्याकडे आले. त्यांना बसायला आसन व पाणी दिले. विचारले, आधी आपला परिचय द्या. व माझ्याकडे काय प्रयोजनार्थ आलात ते सांगावे. एक गृहस्थ म्हणाले…..
मी वधू पित्ता आहे. काशिनाथ शास्त्री कुंटे. अहोऽ, पण मला विवाह कर्तव्य नाही. ते गृहस्थ समजावत म्हणाले, तरुण वयात पत्निशिवाय दिवस काढणं फार कठीण असते.
पण मी एकटा नाही. मला एक मुलगी आहे.
ते गृहस्थ म्हणाले, मी सर्व चौकशी करूनच आलोय. माझी मुलगी तुमच्या कन्येचा योग्य सांभाळ करेल ही मी खात्री देतो, तसे वचन देतो.
वासुदेवराव काहीच बोलले नाही. त्यांना स्तब्ध बघून कुंटे म्हणाले, मी शिरढोणला तुमच्या घरी जाऊन आलो. आता फक्त तुमचीच मंजुरी हवी आहे.
वासुदेवराव म्हणाले, वडिलांना विचारून कळवण्याची व्यवस्था करतो.
लवकरच एका शुभ मुहूर्तावर काशिनाथ शास्त्रींची गोदु गोपिकाबाई फडके बनून पतीबरोबर पुण्याला आपल्या बिर्‍हाडी आल्या. वासुदेवरावांचे दोन्ही भाऊ पांडुरंग व गंगाधर शिक्षणासाठी त्यांच्याकडेच होते. मथुला घेऊन बळवंतरावही आले. घरात सर्व वर्दळ होती. वासुदेव मात्र पूजा, स्तोत्र, वाचन, लेखन यात रमू लागले.
एक दिवस मथू आठ-दहा पेन्सिल घेऊन खेळत होती. तिचे दोन्ही काका पण तिच्याबरोबर खेळू लागले. पेन्सिल मागु लागले. मुलांचा आरडाओरडा ऐकून वासुदेवरावांनी विचारले, कशाचा ओरडा चालू आहे? गाल फुगवून मथू बोबड्या शब्दात म्हणाली, काका चिडवत आहेत. त्यांनी विचारले या पेन्सिल तुला कोणी दिल्या? पतीचा कठोर आवाज ऐकून धास्तावलेल्या गोपिकाबाई म्हणाल्या जुन्नरला गेले होते तेव्हा मामांनी दिल्या.
या विलायती आहेत. आपल्या घरात विदेशी वस्तूंना स्थान नाही. तीक्ष्ण आवाजात वासुदेवराव म्हणाले, गोपिका, यापुढे विदेशी वस्तू घरात दिसणार नाही याची काळजी घ्या.
रात्रीची जेवण वगैरे आटोपल्यावर पाडुरंग व गंगाधर अभ्यास करीत होते. वासुदेवराव ही ” दत्तालहरी ” वाचत होते. तेवढ्यात मथुरा त्यांना येऊन बिलगली. तिला घ्यायला गोपिकाबाई आल्यावर वासुदेवराव त्यांना म्हणाले, तुम्हीही या मुलांबरोबर अभ्यास करावा.
इश्य! मी? या वयात?
शिकायला वयाची अट नसते. इच्छा असली तर
कोणीही कोणत्याही वयात शिकू शकतो.
शुभष्य शिघ्रम! आणा बघू पाटी. आणि त्या क्षणापासून गोपिका बाईचे शिक्षण सुरू झाले. थोड्याच अवधीत गोपिका बाईंनी खूप प्रगती केली. त्यांनी केलेले अमरकोशाचे पाठांतर पाहून वासुदेवरावांना फार कौतुक वाटले. मथुराही आईबरोबर विष्णुसहस्त्रनाम म्हणू लागली. दोघेही दिर वहिनी सोबत रस घेऊ लागले.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.


भाग 9
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!

भाग – ९.
गोपिका बाईंची शिक्षणात एवढी प्रगती झाली की त्या वर्तमानपत्र वाचून पतीबरोबर राजकारणासंबंधी चर्चा करू लागल्या. वर्तमानपत्र वाचून दाखवण्याचे काम त्यांनी गोपिकाबाईवर सोपवले.
नुसती भाषणे ऐकून आणि स्वदेशी वस्तूचा प्रचार करून लोकांच्या मनात स्वदेश प्रेम उत्पन्न होत नाही. त्यासाठी बालपणापासूनच तसे संस्कार होणे आवश्यक आहे. हा विचार वासुदेवरावांना अस्वस्थ करीत होता. यासाठी एखादी शिक्षण संस्था काढण्याचे त्यांनी ठरवले. १८७४ मध्ये “पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट ” ची स्थापना झाली. या बिन सरकारी संस्थेचे पहिले कार्यवाह आणि कोषाध्यक्ष होते वासुदेवळा बळवंत फडके! त्यांनीच प्रथम राष्ट्रीय शिक्षणाचा पाया घातला. पुढे टिळक आणि आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. वासुदेवरावांच्या या शाळेतूनच पुढे पुण्याची सुप्रसिद्ध “भावे स्कूल ” ची निर्मिती झाली.
इतिहासाचार्य राजवाडे हे वासुदेवरावांच्या शाळेतील प्रथम विद्यार्थी होते. यावेळ पर्यंत पुण्यातील लोकांना वासुदेवरावांचे स्वदेशी प्रेम आणि राष्ट्राभिमान माहीत झाला होता. काही लोक या शाळेकडे संशयाने पाहू लागले. काही लोक मुलांना शाळेत पाठवू नका असा प्रचार करीत होते. त्यामुळे वासुदेवरावांनी एक जाहिरात “ज्ञानचक्षु” च्या नोव्हेंबर १८७४ च्या अंकात प्रसिद्ध केली.
जाहिरात अशा प्रकारे होती…
संस्कृत, लॅटिन, पार्शियन आणि मराठी यापैकी एक व दुसरी इंग्रजी मॅट्रिक्युलेशनच्या परीक्षेपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता या शाळेत अनुभवी शिक्षक असून बहुत काळपर्यंत सुरक्षित चालावी व ज्या शाळेचे तिमाही रिपोर्ट वरून लोकांची खात्री व्हावी व मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष आहे की नाही? आई-वडिलांच्या सल्ल्याशिवाय मुले विनाकारण घरी राहतात का? धडा करतात की नाही? वगैरेची तजवीज या शाळेत चांगल्या प्रकारे ठेवल्या जाते. सध्या ही शाळा जुन्या तपकीर गल्ली कीबेंच्या वाड्यात आहे. या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंतच मुलांना प्रवेश मिळेल. काही शिक्षक लोक मुलांनी या शाळेत जाऊ नये म्हणून खोटा प्रचार सांगून त्यांना फितवत आहे परंतु हे त्यांचे करणे बरोबर नाही.
तारीख २७ ऑक्टोबर १८७४.
वासुदेव बळवंत फडके,
सेक्रेटरी आणि ट्रेझर,
पुना नेटिव्ह इन्स्टिट्यीशन!
वासुदेवरावांनी यशस्वीपणे शिक्षणक्षेत्रात पदार्पन केल्यावर त्यांना सार्वजनिक सभेच्या नेत्यांची भाषणे गुळगुळीत वाटू लागली. केवळ स्वदेशीचाच वापर नव्हे तर संपूर्ण स्वराज्य मिळावे असे त्यांना तीव्रपणे वाटू लागले. लोकांना खरमरीत भाषणे देऊन जागे करावेसे वाटू लागले. त्यांनी स्वतःच व्याख्याने देण्याचे ठरवले. यापूर्वी त्यांना व्याख्यान देण्याचा बिलकुल अनुभव नव्हता. परंतु स्वतः एखादी गोष्ट करायचे ठरवले की, ते जीव तोडून कामाला लागत.
व्याख्यान्याची तयारी करीत असताना ते सोबतच “दत्तमहात्मा” चे लेखन करत होते. दहा सहस्त्र ओव्याचा हा संकल्पित ग्रंथ पाच रुपयात विकायचा त्यांचा मानस होता. अत्यंत वळणदार अक्षरात त्यांचे लेखन चालू होते. देवभक्ती सोबतच देशभक्तीही चालू होती. त्यांनी आपल्या व्याख्यानाची जाहिरात स्वतःच करायचे ठरविले. त्यासाठी ते थाळी व एक लाकडी दंडूक घेऊन चौका चौकात उभे रहात. तिथे थाळी वाजून मोठ्याने गर्जना करीत…
लोकहोऽऽ! आज संध्याकाळी मी वासुदेव बळवंत फडके शनिवार वाड्यासमोर व्याख्यान देणार आहे. या देशातून इंग्रजांना हाकलायचे आहे होऽऽऽ
थाळीचा आवाज ऐकून काही उघडलेले दारं खिडक्या इंग्रजांचे नाव घेतल्यावर पटकन लावून घेत. काही पळून जात. त्याकाळी उघडपणे अशी घोषणा करणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्युलाच आमंत्रण देण्यासारखे होते.
भाषण ऐकण्यासाठी लोक जमत. परंतु विखरुन असत. अनेकांचे लक्ष पोलिसांच्या आगमनाकडे असे. कित्येक जण आपण सहज फिरायला आलो असे दाखवत. मात्र भाषण ऐकत. शनिवार वाडा परिसरातील लोक आपल्या दारं खिडक्या उघडी ठेवत. पण बाहेर येत नसत. सगळेच लोक इंग्रज राजवटीला घाबरून होते. या सर्वापासून बेफिकीर असलेले वासुदेवराव मात्र शनिवार वाड्यासमोर जीव तोडून बोलत असत. इंग्रज लोकांच्या दुटप्पी वागण्याचे वाभाडे काढत. गरीब, दीन, दुबळ्या, अडाणी जनतेला भुलवून धर्मांतर करायला कसे भाग पाडतात हे परखडपणे सांगत. त्यांच्या अधिकाऱ्यांना भरमसाठ पगार व एखाद्या हिंदुस्तानी अधिकाऱ्याला वरच्या पदावर नेमणूक दिली की लगेच त्याची जोरदार जाहिरात करत. वगैरे गोष्टी उघड करून शेवटी वासुदेवराव म्हणत,
लोकहोऽऽ! अशा परिस्थितीत तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राण पणाला लावले आहे. सांगा तुमच्यापैकी कोण कोण माझ्याबरोबर येणार? बोला… मी अशा वीरांचे स्वागत करतो. त्यांच्या भाषणाला टाळ्या वाजवून लोक भरभर पांगत. टाळ्या भरपूर, पण मनुष्यबळ काहीच नाही अशी गत होती.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.


भाग 10
!!! क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके !!!

भाग – १०.
ब्रिटिश राजवटीत अशा प्रकारचे इंग्रजां विरुद्ध उघडपणे स्फोटक भाषणे करणे म्हणजे मोठा गुन्हा होता. वासुदेवराव मात्र जराही न भीता, बेधडकपणे बिनधास्तपणे बोलत होते.
दर रविवारी पुण्याच्या आसपासच्या खेड्यात जाऊन वासुदेवराव व्याख्याने देऊ लागले. इंग्रजांनी निर्माण केलेल्या परिस्थितीचे वर्णन करून सांगू लागले त्यांची व्याख्यान ऐकून लोक त्यांना नरसोबाची वाडी, तासगाव, पळसगाव, पनवेल इत्यादी गावातून बोलावू लागले. इंग्रजांविरुध्द लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्याकरता ते अनेक पुरावे गोळा करून लोकांसमोर ठेवू लागले.
कडक उन्हात, भर पावसात लोक त्यांची व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित राहू लागले. वासुदेव बोलू लागले, तोच श्रोत्यांमधून एक आवाज आला….
भयंकर दुष्काळाची चिन्हे दिसत आहे. तुम्ही गरिबांसाठी काय करणार ते सांगा. आम्हाला पोकळ शब्द नको. वासुदेवराव स्थिर नजरेने श्रोत्यांकडे पाहत आवेशान म्हणाले,
मित्रहोऽऽ! या शनिवार वाड्याच्या पवित्र वास्तू समोर प्रतिज्ञा करतो की, दुष्काळग्रस्तांनी खाल्ल्याशिवाय माझ्या तोंडात घास जाणार नाही.
त्यांची ही प्रतिज्ञा खेडोपाडी पोहोचली. हळूहळू दुष्काळाने उग्र रुप धारण केले. मिळेल ते अन्न, दिसेल ते पाणी पिऊन जनावरांबरोबर माणसही जगू लागले. अशातच काॅलरा आला. त्यातच देवीच्या साथीने कहर केला. लोक पटापट मरू लागले. या आपत्तीने वासुदेवराव अतिशय बेचैन झाले. काय करावे काही सुचत नव्हते.
त्यांचा धाकटा भाऊ पांडुरंग म्हणाला, भाऊ या दुष्काळाचा फायदा घेऊन अनेक गरजू आणि गरीब लोकांना धर्मांतर करण्याचा प्रचार फादर करीत आहे. वासुदेवराव म्हणाले, यावेळी लोकांना धर्म परिवर्तनापासून परावृत्त करण्यातच खरे चातुर्य आहे.
गंगाधर अडखळलेला बघून ते म्हणाले, हे काम मीच करणार आहे. गंगाधर म्हणाला, भाऊ ते काम फार कठीण आहे. त्यात तुमच्यावर इंग्रजांचा राग आहे. आज जे लोक तुमच्या पाठीशी आहेत असे दाखवतात त्यांचाही भरोसा नाही.
वासुदेवराव म्हणाले, पांडुरंगा, बाहेर जेवढी भीषण परिस्थिती उद्भवली आहे, माणसं, जनावर भुकेने तडफडून मरत आहेत, लोक अन्नासाठी निजाम राज्यात जात आहेत. सर्वत्र लुटालूट सुरु आहे. अशा परिस्थितीत शांत राहणे कठीण आहे. मी या वडवानलात उडी टाकणार हे निश्चित. त्यांचे असे बोलणे चालू असतानाच घरमालक येऊन म्हणाले, म्हणूनच तुम्ही आमची जागा तात्काळ खाली करा. दोन दिवसात जागा खाली करा. अहोऽ पण! मला काही ऐकायचे नाही. तुम्हाला मागेही ताकीद दिली होती. परंतु तुम्ही दुर्लक्ष केले. आता आणखी नाही.
आहे ठीक आहे. तुमची मर्जी!
दुसऱ्या दिवशीपासून जागा पाहण्यासाठी पायपीट सुरू झाली. दोन-तीन दिवसांनी शुक्रवारातल्या थट्टीवाल्याच्या वाड्यात जागा मिळाली. हे घर पुण्याच्या मध्यभागी असल्यामुळे त्यांना कार्य करणे सोपे झाले. एक प्रकारे कार्याला गती मिळाली.
वासुदेवरावांनी पगारातील काही पैसे खर्च साठी ठेवून, बाकी रक्कम दुष्काळग्रस्त लोकांसाठी खर्च केली. इकडे गोपिका बाई ते काही घरी सामान आणतील म्हणून उत्सुकतेने वाट पाहत होत्या. वासुदेवराव रिकाम्या हाताने घरी आले. गोपिका बाईच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून वासुदेवराव म्हणाले, अगऽ! दुष्काळग्रस्त अन्ना वाचून तडफडत आहे. त्यांना पगारातून मदत केली. काही न बोलता फोडणीची भाकरी आणि पाणी त्यांच्यापुढे ठेवले.
ते पाहून वासुदेवराव म्हणाले, शिरढोणला पत्र पाठवून तांदूळ आणि नाचणी मागवू. अहोऽ पण, कंपित स्वरात गोपिकाबाई म्हणाल्या, ते येईपर्यंत काय करायचं? घरात फक्त उद्या सकाळ पुरते धान्य आहे. चिंता करू नका. करतो काहीतरी व्यवस्था. पुढ्यातील खाऊन वासुदेवराव उठले आणि गोपीकाबाईंनी पाणी पिऊन आपली भूक शमवली. हसत मुखाने बाहेर येऊन, वाचून दाखवण्यासाठी वर्तमानपत्र हाती घेतले.
दुसऱ्या दिवशी वासुदेवरावांनी एक रुपयाचे पाच शेर तांदूळ घेऊन घराकडे वळले. रस्त्यात गंगाधर भेटला. त्याने पिशवी हाती घेतली. आवर्षणामुळे भकास झालेली जमीन, धडावर नुसती चामडी शिल्लक असलेले जनावरे, मरतुकडे कुत्रे, पाण्यासाठी वणवण हिंडणाऱ्या स्त्रिया पाहून दोघांचीही मन फार उदास झाले. घरी आले पिशवी गोपिका बाईच्या हाती दिली. कितिला पडले? रुपयाला पाच शेर. बाईऽऽ गंऽऽ! बाई, उरलेल्या पाच रुपयात महिना कसा निघणार? गोपिकाऽऽ
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 896

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading