40. भगिनी निवेदिता भाग ३, (११ ते १५)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

भगिनी निवेदिता बद्दल संपूर्णपणे जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या जीवनावर व कार्यावर आजवर लिहिलेल्या पुस्तकांपैकी सर्वोत्तम पुस्तक म्हणजे, श्री शंकर प्रसाद बसूनी बंगाली भाषेत लिहिलेले………………………

==================== भाग – ११ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – ११.
निवेदिताच्या परखड स्पष्टीकरणाचा एक प्रसंग…
निवेदितांच्या शेजारी बंगालचे थोर साहित्यिक दिनेशचंद्र सेन राहत होते. दोघांमध्ये चांगला स्नेह निर्माण झाला होता. निवेदिता क्रांतिवादी होत्या, तर दिनेश बाबू काहीसे भित्रे होते. परंतु त्यांची साहित्यिक गुणवत्ता आणि स्वभावामुळे निवेदिता त्यांना मानत होत्या. मात्र त्यांची भित्रेपणाची वागणूक त्यांना आवडत नसे. याबाबत त्या कधीकधी त्यांना रागवतही असत. ते मुकाट्याने ऐकून घेत.
एकदा निवेदिता, दिनेश बाबू व ब्रह्मचारी गणेश महाराज बागबाजारच्या रस्त्यावरून गंगातीरी चालले होते. दिनेश बाबू बाबू पुढे नंतर निवेदिता आणि शेवटी गणेश महाराज होते. एकदम एक बिथरलेला बैल त्यांच्याकडे धावत आला. दिनेश बाबू जीवाच्या भीतीने बाजूला पळाल्यामुळे, निवेदिता बैलाच्या समोर आल्या. ब्रम्हचारी गणेश महाराजांनी चपाळी करून पुढे आले. बैलाला हाकलून लावलं. नंतर पुन्हा तिघे एकत्र आल्यावर, निवेदिता उपरोधिकपणे म्हणाल्या, दिनेशबाबू, तुम्ही आज तर पुरुषार्थाची कमालच केली. तुमची आजची कृती “संस्मरणीय शौर्य कृत्य” म्हणून गणायला हवी. मग रागवून म्हणाल्या, दिनेशबाबू! तुम्हाला तुमच्या कृत्याची जराही लाज वाटली नाही? खरोखरीच त्यांचे वागणे पुरुषाला शोधण्यासारखे असल्यामुळे मुकाट्याने सारी बोलणी ऐकून घेतली.
तरी सुद्धा निवेदिता त्यांच्याबद्दल आदर बाळगून होत्या. कारण त्यांच्यात खरी देशभक्ती होती. दिनेशबाबूंनी लिहिलेले ” बंगालचा इतिहास ” या विषयावरील पुस्तक प्रकाशित व्हावे म्हणून निवेदितांनी संपूर्ण वर्षभर त्यांना खूप सहाय्य केले. दोघेही या पुस्तकाच्या कामासाठी सकाळपासून रात्री दहा दहा वाजेपर्यंत बसत असत. निवेदितांनी जगदीश चंद्र बसूंनाही त्यांच्या वैज्ञानिक लेख संदर्भात अशाच प्रकारे मदत केली होती.
यावरून निवेदिताने एखादे काम अंगावर घेतले तर त्यात त्या स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची प्रवृत्ती दिसून येते.
निवेदितांनी स्वामी विवेकानंदाच्या देशभक्ती संबंधी लिहिले की…
” स्वामीजींचे भारतावर उत्कट प्रेम होते. भारत त्यांच्या हृदयात, नसानसात स्पंदत होता. भारत त्यांच्या मनोराज्यांची देवता होती. भारत हाच त्यांचा चिंता चिंतनाचा विषय असे!”
हीच देशभक्ती स्वामींच्या शिष्य निवेदितांच्या व्यक्तिमत्त्वातून अभिव्यक्त होत असे. एखाद्या पवित्र मंत्राचा जप करावा तसा त्यांचा “भारतवर्ष”… भारतवर्षाचा जप प्रत्येक क्षणी चालू असे. त्यांनी भारतातील प्रत्येक गोष्ट पवित्र पूजनीय वाटे. त्या कोणत्याही पवित्र ठिकाणी गेल्या की, त्यांचे हात आपोआप जोडल्या जात.
एके दिवशी शिरीष कुमार घोषांनी निवेदिता व ख्रिस्तीनला अमृतबझार पत्रिकेच्या ऑफिसमध्ये बोलावले होते. त्यावेळी तिथे काही भारतीय महिलाही उपस्थित होत्या. शिरीष बाबूंनी या सर्वांची एकमेकांशी ओळख करून दिली. आणि निवेदिता लगेच त्यांच्यात इतक्या मिसळल्या की जणूं त्यांची व त्या महिलांची फार दिवसांची ओळख होती. त्या खोलीत काशाच्या ठेवणीवर एक मातीचा दिवा तेवत असलेला पाहून ख्रिस्तीन आणि निवेदिता दोघींनी हात जोडले. ते पाहून त्या महिला विस्मयचकित झाल्या. त्या महिला अशा वस्तू लहानपणापासूनच पाहत होत्या. पण त्यांना आज तो मातीचा दिवा व काशाची ठेवण केवढ्या पवित्र आहेत हे प्रथमच जाणवले.
बाल विधवा गिरिबाला घोष निवेदितांच्या शाळेतील विद्यार्थिनी होत्या. त्यांना एक मुलगी होती. त्या माहेरी काकांकडे राहत होत्या. त्या एक वर्षापासून विद्यालयात शिकत होत्या. त्यांच्या मुलीचे लग्न झाले. दुसऱ्या दिवशी निवेदिता नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यास गेल्या. त्या वधू-वरांकडे पाहत असताना भावावस्थेत गेल्या. आणि शिवदुर्ग… शिवदुर्ग… असा जप करू लागल्या. त्या स्थितीत काही वेळ राहिल्या. नंतर त्या तिथून निघून गेल्या.
आपल्या विद्यालयातील विद्यार्थीनीवर निवेदिता राष्ट्रीयत्वाचे विचार बिंबवण्याचा नेहमीच प्रयत्नशील असत. त्यामुळे मुलींना प्रत्येक क्रियेतून राष्ट्रीयत्वाचे धडे देत. त्यांनी विद्यालयातील रोजच्या गीत गायनामध्ये वंदे मातरम् या राष्ट्रगीताचा समावेश केला. कोणतीही राष्ट्रीय वस्तू मग ती कितीही शुल्लक असली तरी निवेदिताच्या मनी प्रेमादराची भावना असे. हीच भावना त्या विद्यार्थ्यांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करायच्या.
एकदा ब्रिटिश सरकारने अंदमानातील काही राजकीय बंदीवानांची मुक्तता केली. हा आनंद साजरा करण्यासाठी निवेदकांनी विद्यालयाला सुट्टीत जाहीर केली. सर्व परिसरभर स्वास्तिक चिन्हांचे मंगल घट ठेवले. प्रवेशदार केळीच्या खांबाने सुशोभित केले.
एके दिवशी आचार्य जगदीशचंद्र बसूंची पत्नी त्यांच्या विद्यालयात आल्या. निवेदितांना खूप आनंद झाला. त्यांच्या स्वागता पित्यर्थ आपल्या विद्यार्थिनींना “वंग आमार जननी आमार ” (माझा बंगाल माझी जननी) हे गीत गायला लावले.
निवेदिता विदेशी असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या हातचे अन्न घेत नसत. पण त्यांनी कधी मनात आकस ठेवला नाही. उलट त्या आपल्या सामाजिक नियमांशी चिटकून राहतात हा त्यांच्या दृढपणाचा आदर करीत.लोकांच्या भावना दुखावणे, भारतीयांच्या परंपरागत चालीरीती, सनातनी विधी नियम यांच्याविरुद्ध त्या कधीही वागत नसत.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.

==================== भाग – १२ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग-१२.
एकदा निवेदिता विद्यार्थिनींना वस्तू संग्रह दाखवायला घेऊन गेल्या. तिथे बराच वेळ फिरल्यामुळे सर्वचजण थकून गेले. मुलींना तहान लागली होती. निवेदितांनी आपल्या बॅगमधून पेला काढला. नळावर स्वच्छ धुतला. आणि पाण्याने भरलेला पेला एका मुलीसमोर धरला. वास्तविक ती मुलगी तहानेने कासाविस झाली होती. पण एका विदेशी स्त्रीचे हातचे पाणी पिणे तिने स्वीकार केले नाही. दुसऱ्या मुलीने मात्र त्यांना वाईट वाटू नये म्हणून झटकन त्यांच्या हातातला पेला घेतला आणि त्या पेल्याने पाणी प्यायली. निवेदितांना मात्र त्या मुलीने त्यांचे हातची पाणी प्यायली नाही म्हणून चिडल्या नाही की, तिच्या नकाराने दुःखी झाल्या नाही. उलट आपल्या धर्मावर त्या मुलीचा असलेला विश्वास पाहून त्या आनंदित झाल्या.
एकदा निवेदिता बोटीने विद्यार्थीनींना दक्षिणेश्वराच्या मंदिरात दर्शनाला घेऊन गेल्या. बोटीतून उतरल्यावर त्या प्रथम रामकृष्णाच्या खोलीत गेल्या. इतरांबरोबर तिथे त्यांनी बऱ्याच वेळ ध्यानधारणा केली. नंतर मुलींना घेऊन भवतारिणी कालीमातेच्या दर्शनाला गेल्या. सर्व मुली मंदिरात जाऊन कालीमातेचे दर्शन घेतले. परंतु निवेदितांना मंदिरात प्रवेश निषिध्द होता. मग त्या गंगानदीकाठी असलेल्या नाट मंदिराच्या शेवटच्या भागापर्यंत गेल्या. तिथे उभे राहून त्यांनी कालीमातेचे दर्शन घेतले. निवेदितांना दूरून दर्शन घ्यावे लागल्याने सर्व मुलींना खूप वाईट वाटले. परंतु निवेदिता जराही विचलित झाल्या नाही की, त्यांना वाईट वाटले नाही. दुरुन का होई ना कालीमातेचे दर्शन झाल्याने त्यांचे अंतःकरण भरून आले.
निवेदितांच्या विद्यालयात सरस्वती देवीची पूजन पहिल्यांदा झाले, तेव्हा मुलींच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून, शिजवलेल्या अन्नाच्या नैवेद्य न दाखवता फळांचा दाखवला. मात्र दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांनीनी स्वतः पुढाकार घेऊन देवीच्या समोरच तळमजल्यावर स्वयंपाक करून शिजवल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला. त्यांचा स्वयंपाक चालू असताना, निवेदिता व ख्रिस्तीन दोघीही खाली आल्या नाही. पूजा अर्चा, नैवेद्य झाल्यावर विद्यार्थिनी वर जाऊन त्यांना आग्रहाने खाली आणले. आणि सर्वांनी एकत्र बसून प्रसाद ग्रहण केला.
ब्रिटिशांचे अंधानुकरण चालू असतांना स्त्रियांना शिक्षित करण्याचा कार्यक्रम एक इंग्लिश स्री चालवते हा केवढा विरोधाभास होता. विद्यालय चालवताना निवेदितांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक अडथळे, शारीरिक कष्ट, पैशाचा अभाव अशा परिस्थितीत विद्यालय चालवणे मुळीच सोपे नव्हते.
निवेदिता दुसऱ्याच्या दुःख कष्टामध्ये जितक्या सहजतेने धावून जात मदत करील, तितक्याच सहजतेने आपल्या यातना, दैनिक गरजांकडे दुर्लक्ष करीत. कित्येकदा कधी अर्धपोटी कधी उपाशी सुद्धा राहत होत्या. सुरुवातीला त्या विदेशी म्हणून कोणतीही हिंदू बाई त्यांच्याकडे काम करायला तयार नसे. एखादी बाई तयार झालीच, तर स्वयंपाकाची भांडीकुंडी वगैरे यांना हातही लावत नसत. त्यामुळे सगळी कामे त्यांना स्वतःच करावी लागत. कित्येक वेळा अन्य शिजवण्यात अडचणी येत असल्यामुळे, फळे दुधावरच भागवून घेत असे.
पण पुढे पुढे त्यांच्या प्रेमळ व सौजन्यशील वर्तनामुळे बागबाजार मोहल्लातील स्त्रियांनी त्यांना आपली म्हणून स्वीकारले. इतकेच नव्हे, तर निरक्षर कामवाल्या बायांचा ताठरपणाही निवेदितांच्या आपुलकीच्या वागण्याने लोप पावला.
कोलकत्यातील १६ बोसपाडा मोहल्ल्यात निवेदितांचे विद्यालय आणि घर होते. हे घर त्यांच्या आरोग्यास जराही हितकारक नव्हते. त्यांचे आतापर्यंतचे संपूर्ण जीवन थंड देशात गेल्यामुळे, त्यांना इथल्या उन्हाळ्याचा अतिशय अतिशय त्रास होत होता. त्यांच्या खोलीचे छत कमी उंचीचे होते. त्यामुळे उन्हाळ्यात तिथे अतिशय जीवघेणा उकाडा होत असे. त्याकाळी विजेची सोयही नव्हती. निवेदितांकडे केवळ एक छोटासा हातपंखा होता. अशा भयंकर उकाड्याच्या खोलीत बसून एकाग्रतेने पुस्तकाचे वाचन व लेखन करीत असत. की हातपंखा वापरण्याचेही भान राहत नसे. लेखन संपल्यावर त्या खोली बाहेर आल्या की, त्यांचा चेहरा उष्णतेमुळे लाल लाल झालेला दिसे. त्यांना एकदम मस्तकशुळ उठत असे. थोड्या वेळाने पुन्हा खोलीत जाऊन लेखनात गढून जात. अशा वातावरणात रहावे लागत असल्यामुळे, त्या वारंवार आजारी पडत. कित्येकदा त्यांना मलेरियाचा त्रास होई. खरं तर तो संपूर्ण मोहल्लाच आरोग्याच्या दृष्टीने योग्य नव्हता.
त्यांच्याबद्दल आस्था बाळगणारे त्यांना शहरात राहायला चालल्याबद्दल आग्रह करीत. परंतु त्या म्हणत, ज्या घराने मला प्रथम आश्रय दिला. त्या घराचा कितीही त्रास असला तरी ते घर मी सोडणार नाही. म्हणायच्या, या घराने मला कुशीत घेतले. ते सोडून कुठेही जाणार नाही.
या सर्वावर कळस म्हणजे, आर्थिक चणचण. त्यांच्या उत्पन्नाचे साधन म्हणजे, त्यांनी लिहिलेले पुस्तकांचे अल्प असे मानधन आणि श्रीमती ओली बुल कडून थोडेफार मिळणारे अर्थ सहाय्य. एवढ्या कमी पैशात त्यांना विद्यालय चालवणे व स्वतःचा खर्च भागवावा लागत असे. इतकी काटकसरूनही पैशाची अडचण भेडसावातच असे. मग त्या स्वतःच्या खर्चात आणखी कपात करीत.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.

==================== भाग – १३ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – १३
निवेदिता आपल्या अल्पशा मिळकतीतला फार मोठा भाग गोरगरिबांचे दैन्य दूर करण्यात, उपाशी लोकांना अन्न देण्यात जात होता. त्या स्वतःच्या मूलभूत गरजांचा सुद्धा त्याग करीत असत. लेडी अबला बसू (जगदीश चंद्र बसूंची पत्नी) यांनी निवेदितांचे जीवन अगदी जवळून पाहिले होते. त्या म्हणतात, निवेदिता विद्यालयाचा जो खर्च करीत होत्या तो देणगीतून किंवा शिल्लक रकमेतून चालवल्या जात नव्हता, तर त्यांच्या स्वतःच्या अन्न त्यागातून होत होता. आणि हेच सत्य होते.
गिरीबाला घोष नावाची २२ वर्षे वयाची विधवा आपल्या मुलीला घेऊन माहेरी काकांकडे राहत होती. तिला शिक्षणाची तीव्र आवड असल्यामुळे तिने निवेदिताच्या शाळेत नाव घातले. परंतु लोकांच्या टीकेमुळे शिक्षण सोडावे लागले. एके दिवशी तिची आजी विद्यालया जवळून जाताना शाळेतील मुलींचे संस्कृत श्र्लोकांचे पठण ऐकले. ते तिला इतके आवडले की, गिरिबालाला पुन्हा विद्यालयात जाण्यासाठी अनुमती दिली. तरीही काही शुल्लक कारणावरून तिचे शाळेत जाणे बंद पडले.
निवेदितांनी तिच्या काकाशी चर्चा करून गिरिबालेला शाळेत पाठवण्यास राजी केले.
निवेदिता खऱ्या अर्थाने विद्यालयातील विद्यार्थिनींच्या माता बनल्या होत्या. हिंदू विधवांना अनेक निषेध पाळावी लागत असल्यामुळे त्या कित्येक वेळा उपाशीच येत असत. उपाशी आलेल्या मुलींकडे नुसती दृष्टी टाकल्याबरोबर निवेदितांच्या लक्षात येई. मग त्या मुलींना काही खायला देत. त्यांच्याकडे प्रफुल्लादेवी नावाची एक विधवा होती. तिच्या घरून एकादशीला काहीच खायला देत नसे. ती निवेदितांच्या शेजारीच राहत असल्यामुळे त्यांना माहीत होतं. त्या तिला आपला स्पर्श होणार नाही याची काळजी घेऊन समोर बसवून मिठाई व सरबत देत.
एकदा एकादशीच्या दिवशी काही तातडीच्या कामाने त्यांना जगदीशचंद्र बसून कडे जावे लागले. तिथे गेल्यावर त्यांना एकदम आठवले की, आज प्रफुल्लदेवीला काही खाऊ घातले नाही. त्या लगेच घरी आल्या. प्रफुल्लाला बोलावून दिलगिरी व्यक्त केली. व तिला खाऊ घातले.
निवेदिता नियम आणि स्वच्छतेच्या बाबतीत फार काटेकोर होत्या. विद्यार्थीनी आपापली कर्तव्य नीट पार पाडतात की नाही यावर त्यांचे बारीक लक्ष असायचे. पण तशीच गरज पडली तर त्या नियम मोडतही असत.
महामाया नावाची एक विद्यार्थिनी बऱ्याच दिवसापासून आजारी होती. तरी ती विद्यालयात येतच असे. एके दिवशी तिची शाळेत खूप तब्येत बिघडली. रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. निवेदितांना कळल्यावर हातातले कामे टाकून तिला हातावर घेऊन घरी पोहोचवले. तिला क्षय झाल्याचे कळताच निवेदिता आणि ख्रिस्तीनने वैद्यकीय मदत करून बरे करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. पुरीला राहण्याची तिची व्यवस्था करून दिली. निवेदिता व ख्रिस्तीन तिच्याबरोबर राहून तिची शुश्रूषा केली. परंतु ती वाचू शकली नाही.
निवेदिता मुलींबद्दल जेवढ्या प्रेमळ होत्या, तेवढ्याच एखाद्या विद्यार्थ्यांनी कडून काही चुकले तर त्या विद्यार्थिनीकडे त्या अशा काही नजरेने बघत की, मुलीला त्या नजरेपेक्षा शिक्षा केलेली बरी असे वाटावे.
निवेदिता म्हणजे मूर्तिमंत प्रेम आणि करुणाची मूर्ती होत्या. ज्यांना कोणताच आश्रय नसेल अशांना त्या आधार देत.
निवेदिता भारताच्या प्रथम प्रवासाच्या वेळी बोटीवर त्यांना एक तरुण भेटला. तो अतिशय असभ्य दुराचारी असल्यामुळे त्याच्यापासून सुटका व्हावी या दृष्टीने त्याच्या पालकांनी त्याला भारतात रवाना केले होते. बोटीच्या प्रवाशांना त्याच्यापासून उपद्रव होऊ लागला. ते पाहून निवेदितांनी त्याला सुधारण्याचे ठरवले. त्याला निवांत जागी बोलावून त्याच्याशी संवाद साधला. निवेदितांनी त्यांच्या आईने भेट दिलेली अत्यंत प्रिय सोनारी घड्याळ त्या मुलाला विश्वासाने भेट दिली. आणि उपदेश करून पुढील जीवन चांगल्या प्रकारे सुरू करावे अशी इच्छा व्यक्त केली. ते घड्याळ म्हणजे त्यांची अमूल्य ठेव होती. पण त्या तरुणावरच्या विश्वासाची खूण त्याला दिली. त्याने नंतर खरोखरच नवीन चांगले जीवन सुरू केले. नंतर तो दक्षिण आफ्रिकेत गेला. तिथे आजारी पडला. आपल्या मृत्यू समयी निवेदितांची मोठ्या कृतज्ञतेने आठवण काढल्याचे त्याच्या आईने पाठवलेल्या पत्रावरून कळले.
जुलै १९०६ च्या मध्यास पूर्व बंगालमध्ये अतिशय दुष्काळ पडला होता. बेलूर मठातील काही सन्यासी व ब्रह्मचारी दुष्काळ निवारण कार्यासाठी गेले. बातमी कोलकत्त्यालाही पोहोचली. त्यावेळी मेंदूच्या आजारातून निवेदिता नुकत्याच उठल्या होत्या. अनेकांची विनंती नाकारुन त्या दुष्काळ भागात गेल्या. आणि तेथील स्वयंसेवक सोबत दुष्काळ कार्यात सहभागी झाल्या. त्यांनी लोकांची सेवा केली. तेथील स्थानिक लोकांशी विशेषतः स्त्रियांशी एकरूप झाल्यात. त्या स्रीया आपले मन निवेदितांसमोर उघड करू लागल्या.
निवेदिता घराघरात जाऊन त्यांच्या गरजांची चौकशी केल्यामुळे या लोकांवर केवढी मोठी आपत्ती कोसळली याची त्यांना सर्वांगीण माहिती मिळू लागली. काम आटोपल्या वर त्या परतीच्या प्रवासाला निघाल्या तेव्हा तेथील लोक व स्रीयांनी अतिशय दुःखी अंतःकरणाने त्यांना निरोप दिला.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.

==================== भाग – १४ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – १४.
त्या दुष्काळाच्या अति भयानक रूपाने निवेदितांच्या मनावर फार परिणाम झाला. त्यांनी दुष्काळाचे वर्णन आपल्या “फॅमिन ॲण्ड फ्लड ” या पुस्तकात केले. दुष्काळ निवारण कार्यावरून परत आल्यावर त्या अतिशय आजारी झाल्या. त्यांना दीर्घकाळ मलेरियाचा त्रास सोसावा लागला. त्यांची प्रकृती फारच बिघडली.
एके दिवशी निवेदितांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, भारताची राणी कोण? त्यावेळी भारत इंग्लंडच्या सत्तेखाली असल्यामुळे, मुलींनी उत्तर दिले, “राणी क्वीन विक्टरिया” हे ऐकून त्यांना अतिशय वाईट वाटले. व रागही आला. चिडून म्हणाल्या, इंग्लंडची राणी क्वीन व्हिक्टोरिया ही भारताची राणी कधीच होऊ शकणार नाही. तुमची राणी आहे सीता. स्वामीजींनी निवेदितांना उपदेश करताना म्हटले होते, स्त्री शिक्षणाच्या बाबतीत कोणताही त्याग आणि सेवा या परंपरागत अध्यात्मिक आदर्शापासून ढळता कामा नये. भारतीय स्त्रियांना शिक्षण देताना त्यांना त्याग आणि सेवा या अध्यात्मिक आदर्शाना इतर बाबींच्या तुलनेत सर्वोच्च स्थान द्यायला हवे. स्वामीजींच्या या शिकवणीचे अनुसरून निवेदितांनी अगदी तंतोतंत प्रामाणिकपणे अंतःकरणापासून केले.
एके दिवशी निवेदितांनी आणखी एक प्रश्न विचारला. महाभारतातील सर्व स्रीरेखांपैकी सर्वाधिक शौर्यशाली स्त्रीरेखा कोणती? मुलींनी आपल्या समजूतीप्रमाणे, कोणी द्रौपदीचे नाव घेतले. कोणी कुंती, कोणी सुभद्र म्हणाल्या. त्यांचे समाधान झाले नाही. शेवटी त्यांनी स्पष्टीकरण केले. म्हणाल्या, सर्वात शौर्यशाली स्त्री होती गांधारी. राजा धृतराष्ट्राची पत्नी, सहकारणी. तिची पतिनिष्ठा अतुलनीय होती. पती अंध असल्यामुळे तिने स्वेच्छेने आयुष्यभर स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली. ती पतीव्रता असली, तरी धतराष्ट्राच्या अन्यायी कृत्यांचे कधीही समर्थन केले नाही. मान्यता दिली नाही. तिचा आपल्या पुत्रांवर प्रगाढ प्रेम होते. तरीपण जेव्हा दुर्योधन युध्दापूर्वी तिचा आशीर्वाद घेण्यास आला तेव्हा तिने “विजयीभव” असा आशीर्वाद न देता “सत्याचा विजय होवो!” म्हणाली. तिला निश्चित कळले की, आपल्या प्रिय पुत्राचा वध नक्की होणार तेव्हा सुद्धा तिने असत्याचा पक्ष घेतला नव्हता.
निवेदितांच्या काळात कला विद्यालयातील विद्यार्थी प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बसू आणि त्याच विद्यालयाचे होतकर विद्यार्थी सुरेंद्रनाथ गंगोपाध्याय हे दोघे त्यांना भेटायला त्यांच्या बोसपाडा मोहल्लयातील निवासस्थानी आले. तेथील दिवाणखान्यातील सोफ्यावर बसले. निवेदितांनी त्यांना जमिनीवर अंथरलेल्या सतरंगीवर त्यांना बसायला सांगितले. त्यांना हा आपला मोठा अपमान वाटला. एका युरोपियन स्रीने आपला अपमान केला असे वाटून त्यांच्या चेहऱ्यावर दुखावल्याचे भाव उमटले. पाहून निवेदिता म्हणाल्या, तुम्ही बुद्धाच्या भूमीतले आहात. तुम्ही सोफ्यावर बसलेले पाहून मला बरे वाटले नाही. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली. नंतर मोकळ्या मनाने रेखाचित्रे, व्यक्तिचित्रे इत्यादी बद्दल चर्चा केली.
निवेदिता बोधगयेवरुन निघाल्या त्यावेळी त्यांच्यासोबत जगदीशचंद्र बसू, त्यांची पत्नी, इतर काही लोक होते. गयेहून बसू कोलकोत्त्याला व निवेदिता दुसरीकडे जाणार होत्या. बसूंची गाडी अगोदर आली. गाडीत खूप गर्दी होती. त्यांनी बराच प्रयत्न केला. पण कुठे जागा न मिळाल्याने बसू प्रथम श्रेणीच्या डब्यात घुसण्याचा प्रयत्न करू लागले. त्या डब्यात दोन इंग्रज गृहस्थ प्रवास करत होते. बसू भारतीय असल्यामुळे ते इंग्रज त्यांना आत येऊ देत नव्हते. स्टेशन मास्तरकडे तक्रार केली. पण त्यांनीही आपली असमर्थता दाखवली. निराश होऊन बसू परतले, तेव्हा निवेदिता त्या दोन इंग्रजांवर आग पाखडीत होत्या. शेवटी त्या इंग्रजांना दार उघडण्यास भाग पाडले. बसूंची गाडी निघून गेली, तरी त्या शांत झाल्या नव्हत्या.
तेवढ्यात त्यांची गाडी स्टेशनवर आली. या गाडीला प्रथम श्रेणीचे दोनच डबे होते. एकात एक इंग्रज स्त्री होती. दुसऱ्यात एक भारतीय सद्गृहस्थ होते. निवेदितांचे लोक त्यांची सोय इंग्लिश स्त्रीच्या कंपार्टमेंट मध्ये करू पाहत होते. पण निवेदिताने त्यांना प्रतिकार केला. आणि त्या भारतीय प्रवासी असलेल्या कंपार्टमेंट मध्ये चढल्या. निवेदिता आणि त्यांच्याबरोबरचे लोकही आत शिरले. त्या भारतीय गृहस्थांनी त्या सर्वांचे आपुलकीने स्वागत केले. आपले पसरलेले सामान आवरून निवेदितांना जागा करून दिली. गाडी सुटताना निवेदिता आपल्या सहकार्‍यांना म्हणाल्या, रानटी इंग्रज आणि सुसंस्कृत भारतीयांमधला फरक तुम्हाला कळला ना?
निवेदितांना वाटायचे की, भारतीय प्रबोधन केवळ राजकारण व धर्म या क्षेत्रापुरतेच मर्यादित न राहता, हे प्रबोधनक्षेत्र विज्ञान, शिक्षण, साहित्य, इतिहास, ललितकला क्षेत्रातही अग्रगण्य असावे. यासाठी निवेदितांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. कलेचे पुनर्जीवन ही राष्ट्रीय जागरणासाठी आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. त्याच दृष्टीने त्यांनी आपल्या विद्यार्थिनींमध्ये कलागुण रुजवले जावेत म्हणून व्यवस्था केली.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.

==================== भाग – १५ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – १५.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी बंगाली चित्रकलेने चळवळीचे स्वरूप धारण केले होते. ही चळवळ हॅवेल, अवनींद्रनाथ आणि कुमारस्वामी या कलाकारांनी सुरू केली होती. या कलाविषयक चळवळीचे परंपरेचे एकनिष्ठ असणारे केंद्र म्हणून निवेदिता कार्य करू लागल्या. स्वामी विवेकानंदांनी भारतीय चित्रकलेचे आंतरिक गुंतागुंतीचे रूपविशेष निवेदितांना शिकवले होते. भारतीय कलावंत आणि कला समीक्षांना रुपविषयांची फारशी माहिती नव्हती.
निवेदितांनी आपल्या गुरूंपासून प्राप्त झालेल्या चित्रकलेचे सौंदर्यशास्त्र व तत्वज्ञान संबंधीची आपली कलादृष्टी हॅवेल अवनींद्रनाथ आणि कुमार स्वामींना शिकवली. त्या एवढेच करून थांबल्या नाही, तर कोलकाता स्कूल मधील प्रतिभा संपन्न प्रज्ञावन विद्यार्थ्यांना भारतीय कलाक्षेत्रात विस्तारलेल्या वाटेने जायला प्रोत्साहित केले. मार्गदर्शनही केले. त्या विद्यार्थ्यांमध्ये होते नावाजलेले कलाकार नंदलाल बसू, असितकुमार हालदार आणि सुरेंद्रनाथ गंगोपाध्याय!
अजिंठा लेण्यातील भीतीचित्राच्या प्रतिकृती तयार करून घेण्यासाठी श्रीमती हॅरिंगहॅम ह्या महिला चित्रकार भारतात आल्या होत्या. या कामासाठी त्यांना भारतीय कलावंत हवे होते. निवेदितांनी नंदलाल बसू असितकुमार हालदार हे दोन चित्रकार त्यांना मदतीला दिले. या दोघांच्या राहण्या जेवणाचा आणि प्रवास खर्च निवेदितांनी स्वतः सोसला. हे दोन्ही कलाकार अजिंठाला काम करत असताना, बसू कुटुंबासह निवेदिता तिथे जाऊन पोहोचल्या. त्या तिथे आल्यामुळे या कलाकारांचा उत्साह वाढला.
या दोघांना नंतरच्या आयुष्यात व त्यांच्या व्यवसायिक जीवनात या अजिंठाच्या अनुभवाचा भरपूर लाभ झाला. अजिंठा अनुभवामुळे त्यांना भारतीय राष्ट्रीय कलेचे खरेखरे रुपविशेष आणि घटक यांची पूर्ण माहिती मिळाली.
निवेदितांची प्रचंड शक्ती त्यांच्या लेखणीत सामावली होती. त्यांनी केवळ कलाकारांना प्रोत्साहनच दिले नाही, तर अनेक नियतकालिकांमधून या कलावंतांवर आणि त्यांच्या कलाकृतीवर लेख लिहिले. ” दि मॉडर्न रिव्ह्यू ” चे संपादक श्री रामानंद चटोपाध्याय हे भारतीय परंपरेला अनुसरून विकसित झालेल्या कलाविषयक चळवळीचे मुख्य प्रवर्तक बनले. त्यांच्या मनात चित्रकले संबंधी प्रथम आदर निर्माण केला तो निवेदितांनीच. श्री चट्टोपध्यायांनी स्वतः ही गोष्ट मान्य केली.
निवेदितांनी राष्ट्रीय चित्रकलेच्या चळवळीच्या पुनरुत्थनाला फार मोठे महत्त्व दिले होते. त्यांनी श्रीमती ओली बुलला लिहिल्या पत्रात म्हटले होते की, राष्ट्रीय कला आणि कलाकृतीचे पुनरुत्थान करण्याचे आपले आवडते स्वप्न आहे. त्यांना वाटायची की, प्राचीन कला आणि कलाकुसरचे जेव्हा पुनरुत्थान होईल तेव्हाच एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून भारताचा उदय होईल.
श्री यदुनाथ सरकार निवेदितांच्या आठवणी सांगतात…..
निवेदिता ह्या भारतीय कलेच्या फार मोठ्या कैवारी होत्या. त्या कोणत्याही भारतीय कलावंताच्या कल्पक निर्मितीची नेहमीच प्रशंसा करीत. प्रोत्साहन देत. तरुण कलावंताच्या कलाकृतींची समीक्षा करीत. आणि काही दोष असल्यास विचार करण्यास प्रवृत्त करीत. त्यांनी एक गुणग्राहक, मुरब्बी कला समीक्षक म्हणून पाश्चिमात्य कलांचा सखोल अभ्यास केलेला होता. बंगाली कलाकारांना निवेदितांचा सल्लामसलतीचा मोठा लाभ मिळाला होता. अजिंठ्यांची भित्तीचित्र पाहून त्या अगदी भारावून जात. अजिंठाच्या भित्ति चित्रांमध्ये खऱ्याखुऱ्या भारतीय चित्रकलेचा सर्वात सुंदर अभिव्यक्तींचे आणि एलिफंटा गुफेमध्ये कोरलेल्या त्रिमूर्तीमध्ये भारतीय धर्माच्या समन्वयाच्या तत्त्वज्ञानाचे दर्शन होते. असे त्यांनी उद्गार काढले होते.
सुप्रसिद्ध तामिळ कवी श्री सुब्रह्यण्यम भारतींची आणि निवेदितांची फक्त एकच वेळ भेट झाली होती. ते कोलकत्याला काँग्रेस सभेला उपस्थित राहण्यास आले तेव्हा निवेदितांचे भेटीस गेले होते. त्या पहिल्या भेटीतच भारतींना जाणवले की, निवेदिता हे एक प्रचंड मोठी शक्तीकेंद्र आहे. त्यांनी भारतीना विचारले, तुम्ही पत्नीला का नाही आणले? भारती म्हणाले, आमच्या समाजात पत्नीला बैठक सभांना नेण्याचा रिवाज नाही. ऐकताच निवेदिता भडकून म्हणाल्या, आपली पत्नी ही एखाद्या गुलामापेक्षा श्रेष्ठ नाही असा विचार करणारा आणखी एक भारतीय बघून मला फार दुःख झाले. म्हणाल्या, तुम्ही जर पत्नीला स्वतःच्या पातळीवर आणू शकत नाही, तर तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग? देशाचा एक भाग जर दुसऱ्या भागाला गुलामगिरीतच दाबून ठेवणार असेल तर तो पहिला भाग स्वातंत्र्य तरी कसे प्राप्त करणार? यापुढे तुम्ही स्वतःला पत्नीपासून भिन्न समजू नका. तिची पण उन्नती करा. तिच्यावर प्रेम करा. ऐकून भारतींनी गदगद झाले. आणि दिलगिरी व्यक्त करत म्हणाले, तुम्ही केलेल्या या उपदेशातील प्रत्येक शब्दाचे अक्षरशः पालन करीन असे अभिवाचन दिले. एकाच आणि पहिल्याच भेटीच्या भेटीचा भारतींच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. त्यांच्या हृदयात खऱ्या देशभक्तीची ज्योत चेतवल्या गेली.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.

भगिनी निवेदिता संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

Dhananjay Maharaj More
Dhananjay Maharaj More

9422938199

Articles: 902

Leave a Reply