12. संत मुक्ताबाई संपूर्ण भाग १, (१ ते ३)

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️



“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!संत मुक्ताबाई !!

!!!  प्रस्तावना  !!

      नमस्कार!!

            आतांपर्यंत रामायण,महाभारता तील व्यक्तीरेखा,संत चरित्र्ये,ऐतिहासिक चरित्र्ये आणि इतरही जसे- सम्राट अशोक,स्वामी विवेकानंद इत्यादी चरित्र्ये आपल्यापुढे प्रस्तुत केले व आपणही भरभरुन प्रतिसाद दिला आणि आपण सर्वांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहानेच मला लिहिण्याची उर्जा मिळत गेली नी मी लिहित गेले.आतांही प्रस्तुत करीत असलेल्या चरीत्र्याला नेहमीप्रमाणे प्रतिसाद देऊन माझा उत्साह वाढवावा ही नम्र विनंती.आपल्या क्रीया प्रतिक्रीया अपेक्षित!

         आजवर “ज्ञानेश्वर भगिनी” म्हणुनच मुक्ताबाई कडे

बघीतल्या जात होते.म्हणुनच मुक्ताबाई च्या जीवनचरित्राचा,कार्यकर्तृत्वाचा, स्वतंत्र अस्तित्वाचा विचार करुन,माझ्या अल्पबुध्दीनुसार लिहिण्याचे धाडस करत आहे.

 “तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात.परंतु ज्ञानेश्वरांचे व्यक्तीमत्व जनमानसावर इतक्या प्रभावी पणे ठसले आहे की,त्यामुळे ही तीन भावंडे कांही अंशी अलक्षित वाटतात.

            मुक्ताबाईंचा जन्म,त्यांचे जीवन, त्यांची समाधी ह्या सार्‍या गोष्टी स्वयंभू चमत्कारच आहे.सन्याशाची मुलं म्हणुन निंदेस व शास्राच्या दृष्टीने व्रतबंधनाला अपात्र ठरलीत.

         मातापित्यांनी देहत्याग केला तेव्हा मुक्ताबाई केवळ चार वर्षाच्या होत्या. आई वडीलांविना पोरकी झालेली ही भावंडे, मुक्ता सर्वात लहान असुनही तीन्ही भावंडावर मायेची पाखर घालत, बालपण न अनुभवतां एकदमच पोक्त झाल्या.

         स्वतःच्या साधनेच्या आधारावर निर्गुणाचा स्तर अल्पावधीतच गाठणारी ही ज्ञानेश्वरांची बहिण,चांगदेवाला वठणी वर आणणारी,सौंदर्यवती,आदीमाया अशा विविध रुपात असणार्‍या मुक्ताबाई आपल्या समोर साकार करण्याचा अल्पसा प्रयत्न!  

                  मिनाक्षी देशमुख.
                      दि. २७-३-२०२१.

भाग – १.

मुळचे आपेगाव निवासी असलेले विठ्ठलपंत जवळपास संपूर्ण भारतभ्रमण करुन भगवद्चिंतनात आळंदीला सिध्देश्वराच्या देवळांत पोहचले. सन्यस्तवृत्ती, तपसाधनेकडे ओढ, संसाराबद्दलची निरासक्ती, वेद विधानांचा दांडगा अभ्यास यामुळे अल्प काळातच ते शास्रवेत्ते झाले. असे तेजस्वी रुप, त्याच आळंदीत राहणार्‍या नित्याप्रमाणे देवदर्शनास आलेल्या सिध्दोपंतास दिसतांच ते प्रभावित होऊन आपली उपवर कन्या रखुमाईकरितां योग्य वर आहे, हा हेतू मनांत गृहित धरुन त्यांनी विठ्ठलपंतांना भोजनासाठी आग्रहाने आपल्या घरी आमंत्रीत केले. जेवणे आटोपल्यावर गप्पा गोष्टी करीत असतांना सिध्दोपंत म्हणाले, तुम्ही देवळांत साधना करीत असतांना, येणार्‍या जाणार्‍या भक्तांमुळे तुमच्या साधनेत व्यत्यय येतो, म्हणुन इथेच वरच्या माडीवर, जिथुन सिध्देश्वर स्पष्ट दिसतो, शिवाय तुम्हाला हव्या असलेल्या ग्रंथांची पण व्यवस्था केल्या जाऊ शकेल तेव्हा वास्तव्यास यावे असा सिध्दोपंतानी आग्रह केल्यावर, विठ्ठलपंत त्यांच्या घरी राहण्यास तयार झाले.

दुसर्‍या दिवशी इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी झाल्यावर,सिध्दोपंत म्हणाले, मला रात्री तुमचा व माझी कन्या रखुमाईचा विवाह झाल्याचा दृष्टांत झाला पण मला असा कांही दृष्टांत किंवा स्वप्न दिसले नाही. जर असे कांही दिसलेच तर विचार केल्या जाईल. आणि त्याच रात्री पहाटेस विठ्ठलपंताच्या स्वप्नात श्रीहरी येऊन म्हणाले, तू भक्तीचा पुतळा, ज्ञान, भक्ती, वैराग्य पुरतेपणी तुझ्या अंगी भिनले आहे. हे सर्व गुण आकारास येण्यासाठी रुख्मीनीशी विवाह होणे गरजेचे आहे. तिच्या उदरी सगळं विश्व मंत्रमुग्ध होईल असं ब्रम्हा, विष्णु, महेश आणि आदीशक्ती जन्माला येईल.

दुसर्‍या दिवशी पडलेलं स्वप्न सिध्दोपंताना सांगीतल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. लवकरच दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात लावुन दिला. पण विठ्ठलपंतांचे मन संसारात रमले नाही. त्यांना वैराग्य प्राप्त होऊन ऐके दिवशी घर सोडुन काशीस निघुन आले. तिथे एक फार मोठे आध्यात्मिक अधिकारी असलेले श्रीपाद स्वामींकडुन संन्यास दिक्षा घेतली. आणि चेतनस्वामी नांव धारण केले. पुढे असे कांही प्रसंग घडले की, त्याच थोर ब्रम्हनिष्ठ यतीच्या आदेशावरुन संन्याश्रम सोडुन परत गृहस्थाश्रमात यावे लागले. बारा वर्षाचे गृहस्थजीवन आचारीत असतां, त्यांच्या निरिच्छ कृतीतुनच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई म्हणजेच ब्रम्हा, विष्णु, महेश आणि आदीशक्तींचा जन्म झाला.

विठ्ठलपंतांचे सारे जीवनच दुःख व संकटात व्यतीत झाले. त्यांच्या मनाच्या त्याही अवस्थेत त्याचेकडुन कोणाही श्रेष्ठ ज्ञानी विद्वानांचा अवमान घडला नाही. इतकेच नव्हे तर विद्वत सभेत त्यांना देहान्त प्रायश्चिताची आज्ञा झाल्यावर, त्यांनी आपल्या गोजीरवाण्या लहान चार मुलांचा विचारही न करतां, समाजाने संन्यासाची पोरं म्हणुन बहिष्कृत केलेल्या अवस्थेत मुलांना टाकुन पत्नी रुख्मिणीसह त्रिवेणीत आत्मोत्सर्ग केला.

आदीशक्तीरुप असणार्‍या मुक्ताबाईचा जन्म अश्विन शुध्द प्रतिपदेला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाला. आई वडीलांनी देहत्याग केला त्यावेळी केवळ चार वर्षाची असलेल्या मुक्ताबाईंनी आपले बालपण विसरुन, आईवडीलांविना पोरक्या झालेल्या आपल्या भावंडावर मायेची पाखर घातली. बिकट परिस्थितीमुळे मुक्ताई भौतिकदृष्ट्या एकदम पोक्त झाल्या. तशातच निवृत्तीनाथांनी नाथसंप्रदायांची दीक्षा दिल्यामुळे त्या लौकिकदृष्ट्याही प्रौढ झाल्यात. ज्ञानेश्वरांनाही निवृत्तीनाथांनी दीक्षा दिल्यामुळे, लौकिकदृष्ट्या ज्ञानेश्वर व मुक्ताबाई नुसते बहीण भाऊच राहिले नाही तर, गुरुबंधुभगिनी बनले होते आणि म्हणुनच कौटुंबिक नात्यापेक्षा विशेष असा अनुबंध निर्माण होत गेला. निवृततीनाथांनी दिलेल्या साधन मार्गा वरुन दोघेही सहप्रवास करीत होते. मुक्ता बाईंना आलेल्या शंकांचे समाधान व मार्गदर्शन ज्ञानेश्वर करीत मुक्ताची वाटचाल सुरु होती.

मुक्ताबाई गूढ, गहन, गंभीर प्रश्न ज्ञानेश्वरांना नेहमीच विचारीत असत, आणि त्यांची जिज्ञासा बघुन ज्ञानेश्वरही भरभरुन बोध देत असत. अशी स्वतःची उन्नती करुन घेत असतांनाच एक दिवस मुक्ताबाईंना आलेल्या विलक्षण अनुभवाबद्दल सांगु लागल्या….

“सहज समाधी लागली निर्गुणी।खुंटलीसे वाणी न चले पुढे।। खुंटला हा शब्द राहिला व्यवहार। झाला साक्षात्कार सदोदित।। गळाली इंद्रिये राहिलेसे मन। झाले महाशून्य एकाएकी।।

मुक्ताबाईंना उच्चकोटीची दशा प्राप्त झाल्याने ज्ञानेश्वरांना अत्यंत समाधान झाले. ज्या सद्गुरुमुळे (निवृत्तीनाथ) निश्चित अशी उच्च दशा प्राप्त झाली, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता प्रत्येक लहान सहान कृतितुन व्यक्त होत होती. त्यांचा कोणताही शब्द त्या खाली पडु देत नव्हत्या.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! मुक्ताबाई !!!

भाग – २.

एक दिवस निवृत्तीनाथांनी मांडे खायची इच्छा व्यक्त केली. मुक्ताबाईंनी मांडे तयार करायची पूर्व तयारी करुन मातीचे परळ (तवा) आणण्यासाठी कुंभार वाड्यात गेल्या. परळ घेऊन परतत असलेल्या मुक्ताबाईंना वाटेत विसोबा चाटी, जो गांवातील मोठे प्रस्थ होते, त्याने मुक्ताईच्या हातातील परळ हिसकावुन फोडले. वरुन कुंभारवाड्यात सर्वांना कोणीही परळ न देण्याबद्दल ताकीद दिली. अडीअडचणींना विसोबा त्यांना पैशाची मदत करीत असल्यामुळे, उगीच त्याचा रोष नको म्हणुन सर्वांना त्याची आज्ञा पाळणे भाग होते.

मुक्ताबाई निराश होऊन घरी परतल्यावर, आपण आपल्या सद्गुरुची एवढीशी इच्छाही पूर्ण करुं शकत नाही म्हणुन दुःखी होऊन बसली असतां, ज्ञानेश्वरांनी कारण विचारले असतां, मुक्ताईने घडलेली घटना कथन केली. त्यांनी मुक्ताबाईचे सांत्वन करुन मांडे तयार करायला सांगीतले व योगप्रक्रीयेने स्वतःचा जठराग्नी प्रज्वलीत करुन पाठीवर मांडे भाजण्यास सांगीतले. या भावंडाची कशी फजिती होते हे बघण्यासाठी विसोबा चाटी लपुन बघत असतांना त्याला असं अघटीत घडत असलेलं पाहुन आश्चर्याचा धक्काच बसला आणि या भावंडांच्या असामान्यतेची कल्पना आल्याने आपल्या वागण्याचा त्याला पश्चाताप झाला. घरांत येऊन त्यांचे उष्टे अन्न खाऊ लागला. हे बघुन ज्ञानेश्वर त्याला “परता सर” असे म्हटले. “परता सर हे शब्द ऐकताच हाच गुरुपोदेश प्रमाण मानुन, विसोबा परेच्याही परते जाऊन ते आतां विसोबा खेचर म्हणुन ओळखले जाऊ लागले. छोट्याश्या निमित्यातुन केवढा महान परिणाम साधला गेला.

आळंदीकर ब्राम्हणांचे पत्र घेऊन चारही भावंडे शुध्दीपत्र मिळण्यासाठी पैठणला आली. ब्रम्हसभेपुढे आपली ओळख देत नांवे सांगीतल्यावर,

“निवृत्ती नाम आणि प्रवृत्ती बांधला।सोपान अवघडला प्रत्यवाई। मुक्ताबाई आणि मुक्ताची सुराणी। ज्ञानदेवो आणि पतित्य भोगी।।” अशा हेटाळणीला त्यांना तोंड द्यावे लागले. स्वाभिमानी मुक्ताईला ही अवहेलना जिव्हारी लागली, पण प्रसंगानुसार त्यांनी स्वतःचे मुळ रुप उघड केले नाही.

ज्ञाना नांवाच्या रेड्यामुखे वेद म्हणवुन दाखवण्याचा आव्हानात्मक प्रसंग ज्ञानेश्वरांसमोर उभा ठाकल्यावर, निवृत्तीनाथांच्या आज्ञेने व मुक्ताई सोपान यांच्या प्रोत्साहानाने त्यांनी हे आव्हान लिलया स्विकारुन पशुमुखातुन स्पष्टपणे वेद ऐकवल्यावर सारी सभा व जनता आवाक, आश्चर्यचकीत झाली. या भावडांची हेटाळणी करणार्‍या व शुद्र लेखणारे सारे पैठणकर व ब्राम्हणवृंदांनी “हे तिन्ही अवतार तीन देवाचे।आदिमाता मुक्ताई मुक्तपणे अवतरली अशी प्रतिक्रीया व्यक्त केली. “ज्ञानेशो भगवान विष्णुः निवृत्ती भगवान हरः।सोपान भगवान ब्रम्हा मुक्ताख्या ब्रम्हचित्कला।। असा त्यांचा गौरवही केला.

ज्ञानदेव पुराण, हरिकीर्तन करत असल्यामुळे त्यांनी लोकांची मने जिंकुन घेतली. मुक्ताबाई मात्र केव्हाही तुर्यावस्थेत असायच्या. “तुर्यावस्थाता सुतां मुक्ता” स्वतःच्या शब्दपांडित्य व ज्ञानी म्हणवुन घेणारी विद्वत मंडळींच्या कोरड्या, पोकळ भाषणाला भुलुन भजनी लागणारी व चमत्काराने भारावुन जाणार्‍या सामान्य जनतेचे व्यापक स्वरुप पाहुन, शब्दशस्राने विलक्षण क्लेश सोसलेले चिंतामग्न ज्ञानेश्वरांमधे होत असलेला बदल मुक्ताबाईंना दिसत होता. ज्ञानेश्वर? ज्ञानाची कवाडे मिटुन घेत दिवसेंदिवस जास्तच आत्ममग्न होत असल्याने त्यांतील गांभीर्य मुक्ताबाईंच्या लक्षात आले. नात्यातील लडिवाळपणाचा आधार घेऊन मुक्ता त्यांना समजावत, विनवत, “योगी पावन मनाचा। साही अपराध जनाचा।विश्वराग वन्ही।संते सुखे व्हावे पाणी। लडिवाळ मुक्ताबाई। जीव मुदल ठायीचे ठायी।तुम्ही तरुनि विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।

मुक्ताबाईंच्या विनवणीचा अचुक परिणाम ज्ञानेश्वरांवर झाला. स्वतःभोवती आत्मक्लेषाचा परिघ ओलांडुन, ब्रम्हविद्येचा सुकाळ करण्यास प्रवृत्त नेवासेला “भावार्थदीपिके” च्या निर्मितीला सुरुवात केली. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) पूर्ण झाल्यावरही चारही भावंडे आपल्या गांवाकडे परत निघाली. पुर्वी ज्या आळंदीकरांनी या भावडांवर अन्याय, अत्याचार करुन छळले होते, त्याच आळंदीकरांची निषेधात्मक प्रतिक्रीया जाऊन, शुध्दीपत्र मिळवुन आलेल्या या भावंडांची जागा आतां आदराने घेतली होती.

पैठणमधे ज्ञानेश्वरांनी दाखवलेल्या चमत्काराचे वृत्त, चांगदेवांच्या, जे स्वतःला महान विद्वान, ज्ञानी समजत होते, त्यांच्या कानी गेल्यामुळे ज्ञानदेवांदी भावडांना भेटण्यास ते उत्सुक झाले, पण तत्पुर्वी ज्ञानदेवांना पत्र पाठवावे या हेतुने ते पत्र लिहिण्यास बसले असतां, मायन्यात ज्ञानदेवांना काय संबोधन द्यावे? वयाने लहान, ज्ञानाने मोठे… अशा संभ्रमात शेवटी त्यांना कोरेच पत्र पाठवले. त्या पत्राचे उत्तर,निवृत्तीनाथांच्या आज्ञेने, ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्यांचे पत्र लिहुृन चांगदेवांना पाठविले.पत्रातला मजकुर न समजल्याने चांगदेवांनी समक्षच भेट घेण्याचे ठरविले

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

!!! मुक्ताबाई !!!

भाग – ३.

चांगदेव ज्ञानदेवादी भावंडांना भेटण्यासाठी वाघावर बसुन व हाती सापाचा चाबुक घेऊन निघाले. चांगदेवांची योग्यता जाणत असलेल्या निवृत्तीनाथांनी त्यांना सामोरे जाण्याची ज्ञानदेवांना आज्ञा केली. स्वतःच्या सिध्दीसामर्थ्याचे प्रदर्शन करत येणार्‍या चांगदेवांना पाहुन मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना म्हणाल्या…

“विरक्त म्हणावी आणि इच्छेचा पाईककु। तयाचा विवेक जाळी परता । षट्शास्र वक्ता आणि वितंडवादकु ।तयाचा विवेक जाळी परता । योगिया म्हणवी आणि इंद्रीयांचा रंकु। तयाचा विवेक जाळी परता मुक्ताई म्हणे जयाचा परमार्थ माइकु। तयाचा विवेक जाळी परता।।”

चांगदेवांचा अहंकार समुळ नष्ट व्हावा या दृष्टीने, आधीच भिंतीवर बसली असलेली चारही भावंडे, अचेतन भिंतीवर बसुन त्यांना सामोरे गेली. अचेतन भिंत चालवत येत असलेल्या भावंडांना पाहुन चांगदेवांचा अहंकार पार नष्ट होऊन ते शरण येऊन ज्ञानदेवांना मस्तकी वरदहस्त ठेवण्याची त्यांनी विनंती केल्यावर, त्यांना मुक्ताबाईंकडे सोपवले. “यासी करा प्रतीत आत्मज्ञानी।” असे निवृत्ती नाथांनी मुक्ताबाईस सांगीतले.

मुक्ताबाईच्या चरणी लागलेल्या चांगदेवांना निजबोध केल्यावर हा राजयोगी मुक्ताईकृपेने जीवनमुक्त झाला. इथेच मुक्ताबाईंंनी त्यांना चांगदेवपासष्टीचा अर्थ समजावुन सांगीतला आणि चांगदेव मुक्ताईचे परमशिष्य बनले. ते म्हणतात… “चांगदेव म्हणे आजिची जन्मलो।गुरुपुत्र झालो मुक्ताईचा। मागील चौदाशे झाली जन्मांतरे। आजी जन्म खरे सार्थकाचे।।” गुरु झालेल्या मुक्ताबाईची कृतकृत्यता व्यक्त करण्याच्या हेतूने, चांगदेवांनी वेदपठण, मंगलवाद्यांच्या गजरांत मुक्ताबाईची व इतर भावंडांची पुजा करुन नगरवासीयांना दानदक्षिणा व भोजन दिले.

पंढरपूरी असलेल्या नामदेवांच्या कानी ज्ञानेश्वरादी भावंडांची किर्तीकथा एव्हाना पोहोचली होतीच. भक्तीच्या बळावर वश करुन घेतलेला थोर भक्त म्हणुन नामदेवांचीही ख्याती सर्वत्र पसरली होती त्यांची जेव्हा समोरासमोर भेट घडली तेव्हा, प्रत्यक्ष देवाशी बोलणारा, जेऊखाऊ घालणारा महान संत म्हणुन निवृत्तीनाथांनी वंदन केले तर, स्वतः परब्रम्ह आपल्याजवळ असतो, बोलतो, तेव्हा यांनी केलेले वंदन उचितच आहे असा समज नामदेवांनी स्वतःचा करुन घेतला. ज्ञानेश्वर माऊलीनेही वंदन केल्यावर, आपल्यापेक्षा लहान असल्यामुळे योग्यच आहे. सोपानदेवांनी तर जणुं आपले मायबापच भेटल्याच्या भावनेने नामदेवांना वंदन केले. निवृत्ती, ज्ञानदेव सोपानांनी केलेला नमस्कार व नामदेवांची झालेली प्रतिक्रीया याचे सूक्ष्म अवलोकन दूर उभी राहुन मुक्ताबाई करीत होत्या. नामदेवांतील अहंकार चाणाक्ष नजरेने हेरल्यावर, नामदेवांचे दर्शन घेण्याचे नाकारुन आपले त्यांचे विषयीचे झालेले मत स्पष्ट शब्दांत व्यक्त केले….

“अखंड जयाला देवाचा शेजार। का रे अंहकार नाही गेला। मान अपमान वाढविसी हेवा। दिवस असतां दिवा हाती घेसी। परब्रम्हासंगे नित्य तुझा खेळ। आंधळ्या डोळे डोहाळे का बा झाले। कल्पतरु तळवटी इच्छिलीते गोष्टी। अद्यापी नरोटी राहिली का ।।” असा रोकडा सवाल त्यांनी नामदेवांना केल्यावर, नामदेव म्हणाले, भक्तीपेक्षा श्रेष्ठ दुसरे कांहीच नाही. जरी तुम्ही हरिभक्तीस श्रेष्ठ म्हणवत असलात तरी गुरुविना मोक्ष नाही हे सत्य मुक्ताबाईंनी नामदेवास ऐकवले. निवृत्तीनाथांनी नानाप्रकारे मुक्ताईस समजावले की, नामदेवांच्या प्रेमापुढे, भक्तीपुढे विठ्ठलसुध्दा वेडा झाला अशा या महान भक्ताशी असे फटकुन वागणे योग्य नाही, परंतु त्या आपल्या मतावर ठाम होत्या. जरी त्यांचे वागणे आढ्यतेचे वाटत असले तरी या त्यांच्या कृतीमागे नामदेवांबद्दल अपार करुणाच भरलेली आढळते.

निवृतीनाथांना मुक्ताई म्हणतात,

“कुलालाचे कुंभ भाजल्याविण माती। काय साहे संगती पाणियाची। मेणाची पुतळी घेति करी बरी। अग्निच्या शेजारी राहे कैसा।।” नामदेवांसारखा महान भक्त वाया जाऊ नये म्हणुन पांंडुरंगानेच त्यांचा उध्दार होण्यासाठी या संतमेळ्यात पाठवलेले आहे, तेव्हा त्यांना पावन करुन घेण्याबद्दल त्या कळकळीची विनवणी करतात. त्यात ना अहंकार, ना आढ्यता !

नामदेवांसारख्या श्रेष्ठ भक्ताला कांही सांगण्याची आपली योग्यता आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाल्यावर, मुक्ताबाईंनी सुचवले! “धाडा बोलावणे गोरोबाला। म्हणे मुक्ताई भाजले की कोरे। काकाचे उत्तर सत्य मानु।। सर्वांची परीक्षा झाल्यावर गोरोबा जो निर्णय देतील तो सर्वांनी मान्य करावा असे एक मताने निश्चित झाले.

मुक्ताबाईंनी अनेक प्रकारे समजावुनही नामदेवांचा अहंकार कमी होत नाहीसे पाहुन, थोड्या कठोर शब्दात कान उघाडणी केली. अहंतेचा खुंट वाढला संताची संगती सहन होत नाही, अहंकाराच्या सर्पाने पूर्णपणे वेढले असे मुक्ताईचे बोलणे ऐकुन निवृत्तीनाथ म्हणाले, “आपले स्वहित करावे आपण। संताच्या सन्माना चुको नये”।। नामदेवांना गुरुमार्गात आणण्याची आपली तळमळ, प्रयत्न व्यर्थ जातसे पाहुन, कांहीतरी युक्ती योजावी असे त्यांनी मनी ठरविले. या सर्वातुन नामदेवांचे हित कसे साधल्या जाईल हेच त्या बघत होत्या.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

                         

मुक्ताबाई संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading