कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
!!भगवान श्रीकृष्ण चरित्र !!
!!! श्रीकृष्ण !!! भाग – २६.
कालयवन भस्म झाल्यावर श्रीकृष्ण समोर आला.मुचुकुंद हा इक्ष्वाकु वंशातील मांद्यातांचा पुत्र, असुरांविरुध्द खास लढण्यासाठी देवांनी त्याल मदती साठी बोलावले होते.शेकडोंवर्षे युध्द चालुन शेवटी मुचुकुंदाने असुरांचा पराभव केल्यावर,देवांनी संतुष्ट होऊन दीर्घ काळ निद्रा यावी हा वर मागीतल्यानुसार ते त्रेता युगापासुन निद्रिस्त होते.सध्या व्दापारयुगाचा शेवट असुन लवकरच कलीयुगाचा आरंभ होईल,श्रीकृष्ण स्वतः चा परिचय देत म्हणाला,सोमवंशीय नहुषाचा पुत्र ययातीचा जेष्ठ पुत्र यदु व चार धाकटे पुत्र होते.यदुवंशात उत्पन्न झालेल्या वसुदेवाचा पुत्र मी वासुदेव आहे कालयवनाशी शेकडो वर्षे युध्द केले असते तरी,त्याला शंकराचा वर मिळाला असल्यामुळे तो अवध्य होता.आपण त्याला दग्ध केल्यामुळे येणारे अरिष्ट टळले.वासुदेवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो.आतां हिमालयात जाऊन तपश्चर्या करीतच हा देह ठेवणार.तथास्तु!म्हणुन कालयवनाच्या सर्व संपत्तीसह मथुरेला येऊन उग्रसेनला सगळी हकीकत सांगुन,सैन्य व मिळालेले द्रव्य घेऊन द्वारकेला परतला.
आतां तो निश्चिंत,निर्भय झाल्याने शनिवारी मंदवारी रोहिणी नक्षत्राच्या मूहुर्तावर द्विजश्रेष्ठांकडुन पुण्याहवाचन व स्वास्तिवाचन करवुन भुईकोट किल्ल्याच्या पायाचा दगड बसविण्याचा समारंभ सर्व यादवांसमक्ष वसुदेवांकडुन करविला.
समारंभ थाटात झाल्यावर श्रीकृष्ण याद वांना म्हणाला,मी निर्माण करीत असले ली ही नगरी व किल्ला,इंद्राच्या अमरावती सारखी,चौक,राजमार्ग, अंतःपुर सारे इथेही होणार आहे.कृष्णाने देशोदेशींच्या शिल्पकारांना बोलावुन त्यांना योग्य सुचना देऊन सर्वोत्कृष्ट देवा लय,प्रासाद,बांधण्यास सांगीतल्याप्रमाणे अतिशय सुंदर देवालये निर्माण करुन शास्रीय क्रमाने ब्रम्हदेव,प्रभुती,गृहबलिता वरुण,अग्नीसुरेंद्र यांची स्थाने निश्चित केली.किल्ल्याला चार वेशी-शुध्दाक्ष,ऐंद्र, भल्लात आणि पुष्पदंत अशा चार वेशी केल्यात.
विश्वकर्माच्या तोडीचे विस्तिर्ण अंतःपुर व भव्य प्रासाद कृष्णासाठी बांधण्याकरितां वीस योजने समुद्र मागे हटवला.त्याच बरोबर बलराम,सात्यकी, अक्रुर व अनेक प्रमुख सरदारांसाठी मोठे
टोलेजंग आणि रमणीय वाडे तयार झाले.थोड्याच अवधीत इंद्रांच्या अमरावती प्रमाणे समुद्र किनार्यावर अतिसुंदर विस्तिर्ण नगरीचे निर्माण झाले. सर्व शहराभोवती मजबुत दगडांचा कोट बांधुन रात्रंदिवस लखलखत राहावा या साठी सोन्याचा रत्नांनी सुशोभित पत्रा लावला.कोटाच्या बाहेर पाण्याने भरलेला रुंद खंदक व त्यात मगरी व लोखंडाचे तिक्ष्ण काटे ठेवले,मात्र पृष्ठभागावर नाना रंगी बेरंगी नित्य फुललेली कमळे लावली दरवाज्याच्या आंत डंका,उडती सुंदर कारंजी लावली.मोठमोठ्या बाजारपेठा वसवल्यात.हजारो विहिरी,हिरव्यागार बागबगिचे शिवाय भाजीपाल्यांच्या मळ्यांची योजना केली.
श्रीकृष्णाच्या उदार व समभावा मुळे प्रत्येकाचे घर अगणित द्रव्ये भरुन असल्यामुळे लहान थोर तृप्त व संतुष्ट होते.सगळी व्यवस्था पुर्ण झाल्यावर, श्रीकृष्णाने पिता वसुदेवांचा राज्याभिषेक करवला.दहा अनुभवी यादवांचे मंत्री मंडळ बलराम युवराज,विक्रदू मुख्य प्रधान,अनावृष्टी सेनापती व सात्यकीला नायक सेनापती केले.गुरु सांदीपनींना उज्जयिनिहुन बोलावुन त्यांना राजपुरोहित पद दिले.याप्रमाणे निःस्वार्थी अतुल पराक्रमी कृष्णाने स्वतःकडे एकही पद न घेता राज्याची उत्तम व्यवस्था लागली.इंद्र कुबेरालाही विस्मयचकित करणारी नगरी श्रीकृष्णाने स्वसामर्थ्यावर समुद्रकिनारी निर्माण करुन द्वारावतीचे “द्वारका” हे सुटसुटीत नामकरण केले.
२५ वर्षाचा झालेल्या श्रीकृष्णा साठी सुंदर वाडा बांधला पण त्यात गृहिणीचाच अभाव होता.बलरामाचा विवाह आधीच आनर्त देशाच्या रेवत राजाची कन्या रेवतीशी झाला होता. या संबंधामुळेच यादवांनी आनर्त देशा जवळच समुद्रकिनारी आपले नगर वसविले.
श्रीकृष्णाला सर्वतोपरी योग्य भार्या विदर्भ देशाच्या भीष्मक राजाची सुंदर, बुध्दीमान चतुर व पराक्रमी कन्या रुख्मिणीच आहे असे मातापिता व प्रमुख जेष्ठ श्रेष्ठ यादवांना वाटत होते.पण तिची प्राप्ती सोपी नव्हती.कारण दोन वर्षापुर्वी तिचे मांडलेले स्वयंवर कृष्णामुळे मोडले होते.कृष्णद्वेष्टा रुख्मी आपली बहिण कृष्णाला देण्याची शक्यताच नव्हती. शेवटचा क्षत्रियांचा मार्ग कन्याहरण!
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – २७.
दोन वर्षापुर्वी रुख्मिणी स्वयंवराहुन आल्यापासुन तिच्यावर जडलेले मन सैरभैर झाले होते.आता हरण करणेचा एकच मार्ग उरला होता. हा बेत तडीस कसा न्यावा या विचारांत मग्न असतांनाच दूताने वार्ता आणली की,विदर्भपती भीष्मकान जरासंधाच्या आग्रहाने रुख्मिणीचा विवाह चेदिपती दमघोषाचा पुत्र शिशुपालाशी निश्चित झाल्याने सर्व राजे कौंडण्यपुरला त्यांच्यासाठी उभारले ल्या शिबिरात वास्तव्यास आले आहेत. तेवढ्यातच वसुदेव व अन्य मुख्य यादवां ना दमघोषाकडुन रितसर आग्रहाची कुंकुम पत्रिका आली.कारण वसुदेवाची बहिण दमघोषाला दिली होती.हे वृत्त ऐकुन श्रीकृष्ण विस्मयित झाला.इकडे रुख्मिणीही आपल्याला न विचारतां आपल्या बंधुने शिशुपालशी विवाह निश्चित करुन सगळीकडे निमंत्रण पत्रिका पाठवल्याने ती स्तंभीत झाली.
मोठी हिम्मत करुन तिने आपले मनोगत मातापित्यासमोर उघड करीत म्हणाली,मी मनोमन श्रीकृष्णालाच वरले असल्यामुळे,अन्य कुणाची भार्या होणार नाही.भीष्मकचा कल जरी कृष्णाकडे असला तरी,पुत्र रुख्मिपुढे हतबबल होता रुख्मी तिथेच होता.चिडुन म्हणाला,मुलीं ना एवढे स्वातंत्र्य दिले कुणी?श्रीकृष्ण आमचा कट्टर शत्रु असतांना आमची मुलगी त्याला द्यावी हे केवळ अशक्यच!
मातापित्याची अगतिक अवस्था, जेष्ठ बंधु विरोधात,मदत तरी कुणाची घ्यावी?आणि तिला एक विचार सुचला. आपली व्यथा व मनोगत व्यक्त करणारे अतिशय करुणामय पत्र कृष्णाला लिहुन विश्वासु सुदेव ब्राम्हणाजवळ देऊन अत्यंत गुप्तपणे त्याला कृष्णाकडे पाठविले.सुदेव ब्राम्हण द्वारकेतील राज वाड्यात पोहोचल्यावर त्याचे यथोचित आदरसत्कार,खाणेपिणे आटोपल्यावर येण्याचे प्रयोजन विचारल्यावर रुख्मिणि चे स्वहस्तांकित मुद्रेचे पत्र श्रीकृष्णाच्या हाती दिले.तिच्या पत्राला ऊत्तर देत श्रीकृष्णाने लिहिले की,प्रथेनुसार लग्ना पुर्वी कुलदेवतेच्या दर्शनासाठी गांवाबाहेर अंबिकेच्या देवळात आलीस की,मी रथ घेऊन जवळच असेन, तू दर्शन घेऊन परतत असतांना दरवाज्यातुनच तुझे हरण करुन राक्षसविवाह करुन तुझा स्विकार करीन.लग्नमुहुर्त कधीचा आहे हे विचारु न घेतले व तात्काळ दारुकला रथ जोडा यची आज्ञा दिली.दारुकाने शैल्य,सुग्रीव, मेघपुष्प, व बलाहक हे चार पांढरेशुभ्र घोडे जुंपुन रथ कृष्णमहालाच्या दाराशी आणल्याबरोबर सुदेव ब्राम्हणासह रथारुढ झाला.आनर्त देशाहुन(द्वारकेहुन) वायुवेगाने दूर असलेल्या विदर्भदेशाकडे मार्गस्थ होऊन एका रात्रीत इष्ट स्थळी पोहोचला.
भीष्मक आतुन नाराज होते,पण देशोदेशीचे राजेरजवाडे पाहुणे मंडळी जमा असल्यामुळे मन मारुन वरवर आनंद व्यक्त करीत सर्व विधी पार पाडीत होते.कांही वेळातच वरपक्षाकडील शाल्व,जरासंध,दंतवक्र,विदुरथ,पौंड्रीक इत्यादी राजे ससैन्य आपपाल्या शिबिरात दाखल झालेत.शिबिरांभोवती सैन्यांचा खडा पहारा ठेवण्यांत आला.
फक्त एकच रात्र ऊरलेली, रुख्मिणीच्या जिवाची घालमेल होत होती.तर्कवितर्क करीत श्रीकृष्णाच्या ठायी तिची तंद्री लागली.मन त्याचा धावा जप करुं लागले.तेवढ्यात सुदेव ब्राम्हणाचा चिरपरिचित आवाज कानावर पडला. त्याचा प्रसन्न चेहरा पाहुन श्रीकृष्णाचे आगमन झाल्याचे ती उमजली.इतक्या गुप्त रितीने काम केल्याबद्दल कृतज्ञ होऊन अत्यंत आदराने त्याच्या पायावर मस्तक ठेवले.अशिर्वाद देऊन ब्राम्हण निघुन गेला. आणि भिष्मकाने प्रवेश करुन श्रीकृष्ण आल्याचे वर्तमान तिच्या कानी घातल्यावर,तीने अश्चर्य व्यक्त झाल्याचे दाखवले.ते म्हणाले,संघर्ष नको म्हणुन मनात नसतांनाही रुख्मिच्या मना प्रमाणे वागणे भाग आहे.पण आता श्रीकृष्ण आल्याने निश्चिंत झालोय. त्याच्याच स्वागतासाठी निघालोय!
भीष्मक,मधुपर्क,वस्रे,आभुषणे घेऊन श्रीकृष्णाच्या स्वागतास जाऊन त्याची यथायोग्य पुजन करुन,तयार असलेल्या वाड्यात उतरवुन घेतले. रुख्मिणी हरणासाठी श्रीकृष्ण एकटाच गेल्याचे वृत्त बलरामाला समजताच,जरी कृष्ण समर्थ असला तरी लढाई जुंपली तर,आपल्या पक्षाचा कमीपणा दिसु नये म्हणुन बलाढ्य यादवसेना घेऊन,कृष्णाचे पाठोपाठ त्वरेने निघुन वेळेवर पोहचला. भीष्मकने श्रीकृष्णासाठी श्रृंगारलेल्या वाड्यात त्याचेही उत्कृष्ट स्वागत केले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !! भाग – २८.
रुख्मिणिच्या विवाहास यादवसेने सह श्रीकृष्ण बलराम आला ही बातमी नगरात सगळीकडे हां हां म्हणता पसरली श्रीकृष्णाचे बालपणापासुनचे सगळे पराक्रम व त्याच्या सौंदर्याची ख्याती नगर वासीयांना कळल्यामुळे त्याला पहाण्या साठी स्री पुरुषांचे थवेच्या थवे तो उतरला होता त्या वाड्यासमोर जमा होऊ लागले. ऐवढ्या अगनित राजांमधे श्रीकृष्णा सारखा तेजस्वी एकही पुरुष नाही अशी चर्चा जमलेल्या लोकांमधे होऊ लागली.
लग्न घटिका भरत आली. कुळा च्या प्रथेप्रमाणे अंबिकामातेच्या देवळात जाण्यासाठी श्रीकृष्णाचे ध्यान करत ताशे सनई,मृदुंगाच्या जयघोषात व नंग्या तलवारीच्या पहार्यात मैत्रीणी व सुवासिनीं सह नवरी पायी निघाली.अशी ही मिरवणुक देवळाच्या दरवाज्यासमोर पोहोचल्या वर सुवासिनींनी तीच्यावरुन लिंबलोन उतरवुन देवीजवळ नेले.कुलाचाराप्रमाणे आदिमाता अंबा आणि त्रैलोक्यनाथला मनोभावे भक्तीपुर्वक आळवित आपली इच्छापुर्तिची प्रार्थना करुन व ओटी भरुन कृष्णाचा जप करीत हलकेच बाहेर पडली.सालंकृत रुख्मिणीला पाहुन जमलेले लोकं व राजे तिच्या दर्शनाने वेडावुन गेलेत.अधिर मनाने चौफेर दृष्टी टाकल्या वर,एका बाजुला पांढरेशुभ्र घोडे जोडले ले,गरुड ध्वजांकित रथात चतुर्भुज श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती दिसतांच दोघांची दृष्टादृष्ट झाली.परमांनंदाचे तिला भरते आले.ती हलकेच एक एक पायरी उतरत असतांना निमिषार्धात श्रीकृष्णाचा रथ पायर्या जवळ येऊन ऊभा राहिला.श्रीकृष्णाने तीचा मृदु हात धरुन अलगद रथात घेतले.आणि काय घडल हे लोकांच्या लक्षात येण्यापुर्वीच रथ भरवेगाने गर्दीतुन बाहेर पडला.क्षणभर सारे आवाक झाले.
शस्रास्रांनी सज्ज मानुन आमच्या नजरेसमोर आमच्या हातावर तुरी देऊन व नाकावर टिच्चुन निःशस्र असुनही तिला सहज घेऊन गेला. ह्या भयंकर अपमानाने जरासंधाधिकांना,आपला पराक्रम धुळीला मिळाला असे वाटुन अतिशय जळफळाट झाला.रुख्मी तर क्रोधाने व अपमानाने उभा पेटला.त्याने
ओरडुन शस्रसज्ज होण्याची व पाठलाग करण्याची आज्ञा दिली.पण
कृष्णाने दरवेळी केलेला पराभव आठव ला,शिवाय यादव सैन्याचा आपण प्रतिकार करुं शकणार नाही या विचाराने जरासंध शिशुपालला समजावत म्हणाला,योग्य व अनुकुल वेळ आल्यावर आपण त्याचा नक्कीच मुकाबला करुं! सध्या अविचाराने सैन्याचा नाश करणे योग्य नाही.अशीच सर्वांची समजुत घातल्याने आलेले सर्व राजे निघुन गेलेत. रुख्मीचीही समजुत घालण्याचा जरासंधा ने प्रयत्न केला,पण क्रोधाने भडकलेला रुख्मीला पटणे शक्यच नव्हते.संतापाने म्हणाला,सर्व गेलात तरी मी कृष्णाला ठार करुन रुख्मिणीला वापस आणल्या शिवाय परत फिरणार नाही.कौंडण्यपुर मोकळे झाले.
शस्रसज्ज व रथावर आरुढ होऊन अफाट सैन्यासह यादवांचा पाठलाग केला.अखेर कृष्णाला गाठुन द्विरथ युध्द सुरु झाले.श्रीकृष्णाने बाण सोडुन रुख्मि चे धनुष्य, रथाचे घोडे,सारथी, रथध्वज छेदुन टाकले.श्रीकृष्ण आवरत नाहीस पाहुन क्रोधाविष्ट होऊन मरेन किंवा मारीन या निश्चयाने ढाल तलवार हाती घेऊन रथातुन उडी मारुन कृष्णावर चाल केली.कौंडण्यपुर सोडतांना कृष्णाच्या तावडीतुन रुख्मिणीला परत आणल्या शिवाय तोंड दाखवणार नाही अशी प्रतिज्ञा केली असल्यामुळे तो जीवावर उदार झाला होता.आतापर्यंत कृष्णाने सर्व प्रकार लिलया घेतला होता,पण आतामात्र त्याचा राग अनावर झाला. कृष्णाचा क्रुध्द चेहरा बघताच रुख्मिणी घाबरली.आपला भाऊ अंतरणार या भितीने रडत भावाला जीवदान देण्याची विनंती केल्यावर,तिच्या इच्छेप्रमाणे एक बाण मारुन मुर्च्छित केले.व हातपाय बांधुन टाकुन, आपल्या राथारुढ होऊन द्वारकेकडे प्रयाण केले.
रुख्मिला शोधत,त्याचे सैन्य आले असतां,नर्मदाकिनारी मैदानात तो बेशुध्दा वस्थेत आढळल्यावर त्याला शुध्दीवर आणण्यांत आले.श्रीकृष्णाने आपल्याला बांधुन टाकलेले पाहुन त्याचे लज्जेने मुख काळे पडले.द्वेषाग्नि ह्रदयात भडकला.प्रतिज्ञेप्रमाणे श्रीकृष्णाला ठार करुन रुख्मिणीला परत आणल्याशिवाय कौंडण्यपुरात पाऊल टाकणार नाही. त्याने त्याच भूमीवर भोजकर नावाची नवी नगरी उभारुन “भोजकटचे” राज्यपद प्राप्त करुन घेतले,तो मत्सरी जरी असला तरी विलक्षण पराक्रमी होता.रुख्मीला जीवंत सोडलेले पाहुन सर्वजण अगदी भारावुन गेलेत.
अत्यंत लावण्यवती,शालीन,चतुर रुख्मिणिला श्रीकृष्ण द्वारकेस येत असल्याचे वृत्त कळल्याबरोबर संपुर्ण नगरी सजवुन त्यांच्या विवाहाची तयारी सुरु झाली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !! भाग – २९.
श्रीकृष्ण-रुख्मिणी विवाहानिमि त्य निरनिराळ्या देशींचे राजे परिवारासह आवर्जुन आलेत.सृंजय,केकय,विदर्भ इत्यादी देशांचे राजे स्वतः पुढाकार घेऊन लग्नसमारंभातील कामे अगदी बिनबोभाट पार पाडीत होते.अश्या तर्हेने त्यांचा विवाह थाटामाटात पार पडला.दोघांचे एकमेकांवर निःस्सिम प्रेम होते.रुख्मिणी श्रीकृष्णाची पट्टराणी झाली.गृहस्थाश्रम उत्कृष्ट रितीने सुरु झाला.थोड्याच दिवसांत त्यांच्या संसारवेलीवल प्रद्युम्न नावाचा पुत्र झाला.प्रद्युम्न म्हणजे शंकराने भस्म केलेल्या मदनाचा अवतारच!त्याच्या पाठोपाठ रुख्मिणीला चारुदेष्ण,सुदेष्ण, चारुगुप्त,चारुविद,चारु,सुचास,भद्रचास असे सुंदर नऊ पुत्र आणि चारुमती नांवाची अतिसुंदर कन्या झाली.
त्यावेळच्या क्षत्रिय प्रथेनुसार श्रीकृष्णाने आणखी सात विवाह केले.या आठ राण्यांमधे रुख्मिणी सर्वात जेष्ठ व पट्टराणी असल्याने,ती सर्व जबाबदारी मोठ्या कुशलतेने व समर्थपणे,निःपक्ष पणे सांभाळत होती.अर्थात सवतीमत्सर हा स्री चा स्थायीभाव नैसर्गिकच आहे, पण! उत्कृष्ट आदर्श घालुन देणारा अष्ट नायिकांचा पतीही तितकाच चतुर व कुशल होता.तो प्रत्येकीशी अशा तर्हेने वागत असे की,प्रत्येकीला वाटायचे, आपल्या पतीचे प्रेम फक्त आपल्यावरच आहे.
प्रत्येकीचा वाडा,दासदासी वेगवेगळ्या होत्या.श्रीकृष्णाच्या प्रमुख सात भार्याः-
ससत्रजित राजाची कन्या सत्यभामा, हिचा मान रुख्मिणीच्या खालोखाल,पण पट्टराणीचा मान न मिळाल्यामुळे कधी कधी तीला विषाद वाटे.तशी ती मनाने चांगली होती,पण थोडी मत्सरी होती.२)नग्नजित राजाची कन्या ‘नाग्नजिती’ सत्या,३)सुंदता,४)मद्रराजाची कन्या,लक्ष्मणा,५)ऋशराज जांबवानची कन्या जांबवती,६)मित्रविंदा,७) कालिंदी.या सातही राण्यांना श्रीकृष्ण सारख्याच प्रेमाणे वागवित असे.त्या सर्वांना अनेक पुत्र व कन्या झाल्यात. सत्यभामेचा विवाह जगभर विख्यात असलेल्या “स्यमंतक” मण्याचा मनोरंज क इतिहास आहे.सत्रजित नावाचा प्रमुख सरदार इतर यादवांबरोबर मथुरेहुन कृष्णाबरोबर द्वारकेत आला होता.त्याने अहोरात्र सूर्यउपासना केल्याने प्रसन्न झालेल्या सूर्यदेवाने त्याला अत्यंत दैदिप्यमान स्यमंतक मणी दिला.या मण्याची स्थापना त्याने देवघरांत केली होती.हा मणी स्वयंप्रकाशितच नव्हता तर,रोज आठ भार सोने देत असे,सत्रजित तसे अतिशय सधन होते.वास्तविक त्यांना अधिक धनाची आवश्यकता नव्हती. यादव मथुरा सोडुन द्वारकेत आल्यानंतर मथुरेची परिस्थिती खालावली होती. शिवाय जरासंध व शत्रु राजांच्या मथुरेवर होणार्या वारंवार स्वार्यांमुळेही मथुरा डबघाईला आली होती.उग्रसेनबद्दल कृष्णाच्या मनात आदर,व जन्मभूमी असल्याने ती सुखी व सपन्न व्हावी या उद्देशाने रोज सुवर्ण देणारा स्यमंतक मणी जर उग्रसेनला मिळाला तर मथुरेची अडचण दूर होईल,केवळ याच हेतूने सात्रजितकडे स्यमंतक मण्याची मागणी केली पण त्याने नकार दिला.कृष्णाने ही गोष्ट मनातुन काढुन सुध्दा टाकली.
एके दिवशी सत्रजितचा जुळा भाऊ प्रसेनने तो तेजस्वी मणी गळ्यात घालुन अश्वारुढ होऊन मृगयासाठी दूरच्या जंगलात निघुन गेला.त्या घनदाट एका सिंहाने अरण्यात त्याच्यावर व घोड्यावर हल्ला करुन ठार केले व तो मणी तोंडात धरुन पलायन केले.इतक्यात जांबवान नावाच्या प्रचंड अस्वलाने सिंहाच्या तोंडातल्या मण्याचा प्रकाश पाहुन त्याचा पाठलाग केला व सिंहाला ठार करुन तो मणी आपल्या पोराला खेळायला खेळणे म्हणुन दिले.इकडे बरेच दिवसांपासुन मृगयेला गेलेला भाऊ न आल्यामुळे श्रीकृष्णानेच त्याला ठार करुन स्यमंतक मणी हस्तगत केला अशी बदनाणी सर्वत्र पसरवली.
नाहक आपल्यावर आलेला चोरीचा आळ नाहीसा करण्याच्या उद्देशाने गावा तील प्रमुख लोकांना बरोबर घेऊन ज्या अरण्यात प्रसेन शिकारीला गेला होता तिथे गेल्यावर प्रसेन व घोडा सिंहाकडुन ठार झालेला असुन अस्वलाकडुन सिंहही ठार झाल्याचे आढळले.तिथे पडलेल्या वस्तू आणि अन्य खाणाखुणांवरुन माग घेत एका गुहेच्या तोंडापाशी पोहोचला. बाकीच्यांना बाहेर थांबवुन श्रीकृष्ण एकटाच गुहेत शिरला.तिथे एका कोपर्यात लख्ख प्रकाश दिसल्याने जवळ जाताच तो स्यमंतक मणी दिसला.तो उचलणारच तेवढ्यात जांबवान आला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्रीकृष्ण !!! भाग – ३०.
जांबवानाने प्रथम कृष्णाला ओळखले नसल्यामुळे त्यांचे युध्द झाले. श्रीकृष्णाचा अतुल पराक्रम बघुन कृष्णाला त्याने ओळखले.त्याने आपली कन्या जांबवंतीचा स्विकार करण्याची विनंती केल्यावर तिच्याशी गंधर्व विवाह केला.जांबवानने स्यमंतक मणी आंदन म्हणुन दिला.जाबवंती व मणी घेऊन श्रीकृष्ण द्वारकेत पोहचला.यादव सभेत सर्वांसमोर घडलेली हकिकत सांगुन मणी सत्यजितला परत केल्यावर,आपण श्रीकृष्णावर व्यर्थ आरोप केल्याचा पश्चाताप झाला.दोषाचे परिमार्जन म्हणुन कृष्णाला आपली लाडकी सौंदर्यवती कन्या सत्यभामा दिली.आंदन म्हणुन स्यमंतक मणीही दिला,उदार,क्षमाशील श्रीकृष्णाने सत्यभामेचा स्विकार केला पण आग्रह होऊनही मण्याचा स्विकार केला नाही.
स्यमंतक मण्याचा इतिहास इथेच संपला नाही.श्रीकृष्णाचा विवाह सत्यभामेशी झाल्याचे शतधन्वा सरदारा ला कळल्यावर त्याला फार अपमानीत वाटले,कारण यापुर्वी त्याने सत्यभामाला मागणी घातली होती. सत्रजितने त्याची मागणी अव्हेरली होती.म्हणुन सूड घेण्याचे ठरविल्यावर या कामात अक्रुर व कृतवर्माला सामील करुन घेतले.पण श्रीकृष्ण इथे असेपर्यत हा बेत सिध्दीस जाणे अशक्य होते.त्यांच्या सुदैवाने त्यांना लवकरच संधी मिळाली.श्रीकृष्णाचे हेर चौफेर फिरत असत.एक दिवस दूताने वार्ता आणली.की, द्रोणाचार्यांनी घेतलेल्या अस्र-शस्र विद्येच्या परिक्षेत कौरव पांडव उत्तम रितीने उत्तीर्ण झाले.अर्जुनाने तर विशेष केलेल्या पराक्रमाने सर्व प्रेक्षागार विस्मयीत झाले असतांनाच कर्णाने प्रवेश करुन अर्जुनाला आव्हान केले.त्यानेही अर्जुना प्रमाणेच सर्व कला करुन दाखवल्या,पण तो सूतपुत्र असल्यामुळे तो स्पर्धेत भाग घेऊं शकत नाही असे कृपाचार्यांनी म्हटल्यावर,तिथल्या तिथे दुर्योधनाने कर्णाचा अभिषेक करुन अंगदेशाचा राजा घोषित केले.आणि तिथुनच कौरव पांडवांत द्वेषा ची ठीणगी पडली.दुर्योधनाला कर्णाची साथ मिळाल्याने चुलतबंधुंमधली तेढ वाढतच गेली.भांडणे विकोपास जाऊं नये हे कारण पुढे करुन धृतराष्र्टाने कुंती सह पांच पांडवांना वारणावतास तिथे होणार्या उत्सवाला कांही दिवसांसाठी पाठविले.आणि एक वर्षानंतर वार्ता आली की,एका मध्यरात्री कुंतीसह पांच पुत्र जळुन खाक झालेत.क्षणभर श्रीकृष्ण स्तब्ध झाला.पण ते जिवंत आहे हे त्याने अंतःर्यामी जाणले.या वृत्तामुळे सगळे दुःखी झाले.श्रीकृष्णानेही आपल्यालाही दुःख झाले हे दाखविण्यासाठी धृतराष्र्टाच्या सांत्वनासाठी बलरामासह हस्तिनापुरला गेले.तिथे गेल्यावर श्रीकृष्णाने भीष्म,विदूर,गांधारी,द्रोणाचार्य ,कृपाचार्य यांच्या भेटी घेऊन आपल्याला भयंकर दुःख झाल्याचे दर्शविले.
बलराम-श्रीकृष्ण द्वारकेत नाही ही संधी साधुन राक्षसीवृत्तीच्या शतधन्वाने सत्रजितला झोपेतच ठार करुन त्याच्या जवळचा स्यमंतक मणी घेऊन निघुन गेला.त्यावेळी सत्यभामा माहेरी आलेली होती.आपल्या क्षत्रियवीर पित्याला असे अकल्पित निर्दयतेने मरण आल्यामुळे त्या स्रीला अतोनात दुःख तर झालेच,पण या निंद्य कृत्याचा सूड घेण्याचा निर्धार केला.पित्याच्या प्रेताचे दहन न करतां,प्रेत तेलाच्या डोणीत बुडवुन ठेवले.आणि हस्तीनापुरला दूत पाठवुन श्रीकृष्णाला ताबडतोब बोलावुन घेतले.बलराम कृष्ण परत आल्याचे कळल्यावर शतधन्वाची घाबरगुंडी उडाली.त्याने मणी अक्रुरा जवळ देऊन जीव वाचवण्यासाठी रोज १०० योजने पळणार्या अति चपळ घोड्यावर बसुन पलायन केले.
आपल्या गरुडध्वजांकित रथात बसुन श्रीकृष्णाने पाठलाग करुन काशी जवळ शेवटी शतधन्वाला गाठुन त्याचा शिरच्छेद करुन देहांत प्रायश्चित दिले.पण स्यमंतक मणी त्याच्या जवळ न सांपडल्याने व्दारकेतच कुणाजवळ तरी लपवुन ठेवला असेल हे जाणुन श्रीकृष्ण द्वारकेला पोहोचला.बलराम मिथिलेला असल्याचे कळल्यावर गदायुध्द विद्या संपादन करण्याची संधी दुर्योधनाने तिथे जाऊन घेतली.
इकडे अक्रुराजवळ असलेल्या स्यमंतक मण्यापासुन रोज मिळत असलेल्या सुवर्णाचा विनियोग,भरपुर दानधर्म, यज्ञयाग करुं लागल्याने स्यमंतक मणी अक्रुराजवळच आहे हे श्रीकृष्णाने ओळखले.तसे यादव सभेतही बोलुन दाखवले. श्रीकृष्ण आपल्याला शिक्षा करेल या भितीने काशिला मामाकडे पळून गेला. जिथे हा मणी असेल तिथे दुष्काळ,रोग राई, अकाली मृत्यु उद्भवणार नाही असा ‘वर’ सूर्यदेवताने मणी देतांनाच सत्रजितला दिला असल्यामुळे काशीतला दुष्काळ नाहीसा झाला व द्वारकेत पर्जण्य कमी होऊन दुष्काळी चिन्हे दिसु लागली.

