
९ जुलै, दिवस १९० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ६२६ ते ६५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २२६९ ते २२८०
“९ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ९ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ९ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २२६९ ते २२८० चे पारायण आपण करणार आहोत.
९ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ६२६ ते ६५०,
626-13
एऱ्हवी बोधा आलेनि ज्ञाने । जरी ज्ञेय न दिसेचि मने । तरी ज्ञानलाभुही न मने । जाहला सांता ॥626॥
वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही.
627-13
आंधळेनि हाती दिवा । घेऊनि काय करावा ? । तैसा ज्ञाननिश्चयो आघवा । वायाचि जाय ॥627॥
आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेऊन त्याचा काय उपयोग करावा ? त्याप्रमाणे आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही, तर ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो, त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो.
628-13
जरि ज्ञानाचेनि प्रकाशे । परतत्त्वी दिठी न पैसे । ते स्फूर्तीचि असे । अंध होऊनी ॥628॥
जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याचे ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे, असे म्हणावयास हरकत नाही.
629-13
म्हणौनि ज्ञान जेतुले दावी । तेतुली वस्तुचि आघवी । ते देखे ऐशी व्हावी । बुद्धि चोख ॥629॥
म्हणून ज्ञान जेवढे दाखवील तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तू पाहील अशी बुद्धी शुद्ध पाहिजे.
630-13
यालागी ज्ञाने निर्दोखे । दाविले ज्ञेय देखे । तैसेनि उन्मेखे । आथिला जो ॥630॥
याकरता निर्मळ ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पहाते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
631-13
जेवढी ज्ञानाची वृद्धी । तेवढीच जयाची बुद्धी । तो ज्ञान हे शब्दी । करणे न लगे ॥631॥
जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे, तो ज्ञानाचे रूप आहे, हे शब्दाने सांगावयास नको.
632-13
पै ज्ञानाचिये प्रभेसवे । जयाची मती ज्ञेयी पावे । तो हातधरणिया शिवे । परतत्त्वाते ॥632॥
एवढेच काय परंतु ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो.
633-13
तोचि ज्ञान हे बोलता । विस्मो कवण पंडुसुता ? । काय सवितयाते सविता । म्हणावे असे ? ॥633॥
अर्जुना तोच ज्ञान आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे ? सूर्याला सूर्य म्हणावयाला पाहिजे काय ?
634-13
तव श्रोते म्हणती असो । संगतियेचा अतिसो । ग्रंथोक्ती तेथ आडसो । घालितोसी का ॥634॥
श्रोत्यांची प्रतिक्रिया
तेव्हा श्रोते म्हणाले, ‘ते राहू दे, त्या पुरुषाचे अतिशय वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोस ?
635-13
तुझा हाचि आम्हा थोरु । वक्तृत्वाचा पाहुणेरु । जे ज्ञानविषो फारु । निरोपिला ॥635॥
आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास, हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला.
636-13
रसु होआवा अतिमात्रु । हा घेतासि कविमंत्रु । तरी अवंतूनि शत्रु । करितोसि का गा ? ॥636॥
आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पाल्हाळ अतिशय रसभरित करावे ही जी सामान्य कवींची क्लृप्ती, तिचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास.
637-13
ठायी बैसतिये वेळे । जे रससोय घेऊनि पळे । तियेचा येरु वोडव मिळे । कोणा अर्था ? ॥637॥
भोजन करण्याच्या पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते, तिच्या इतर आदरसत्काराचा काय उपयोग ?
638-13
आघवाचि विषयी भादी । परी सांजवणी टेको नेदी । ते खुरतोडी नुसधी । पोषी कवण ? ॥638॥
इतर सर्व गोष्टीत चांगली, परंतु दूध काढण्याच्यावेळी जी कासेखाली बसू देत नाही (खाली बसल्याबरोबर लाथेचा फटकारा मारते), तर अशी ती नुसती लाथाडी गाय कोण पोशील ?
639-13
तैसी ज्ञानी मती न फाके । येर जल्पती नेणो केतुके । परि ते असो निके । केले तुवा ॥639॥
त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धिविस्तार न पावताना (इतर कवी) ज्ञानावाचून इतर गोष्टींचे किती पाल्हाळ लावतात, ते कळत नाही. परंतु त्यांची गोष्ट राहू दे. तू चांगले केलेस.
640-13
जया ज्ञानलेशोद्देशे । कीजती योगादि सायासे । ते धणीचे आथी तुझिया ऐसे । निरूपण ॥640॥
ज्या ब्रह्मज्ञानाच्या अंशाच्या हेतूने लोक योगादिक कष्ट करतात, त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
641-13
अमृताची सातवांकुडी । लागो का अनुघडी । सुखाच्या दिवसकोडी । गणिजतु का ॥641॥
अमृताची झड एकसारखी सात दिवस लागेना का तिचा कंटाळा यावयाचा नाही. दु:खाचे दिवस जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जाता जात नाही, इतका मोठा वाटतो तसे सुखाचे दिवस कोट्यवधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का ?
642-13
पूर्णचंद्रेंसी राती । युग एक असोनि पहाती । तरी काय पाहात आहाती । चकोर ते ? ॥642॥
पूर्ण चंद्रासह रात्र, एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली, तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटेल काय ?
643-13
तैसे ज्ञानाचे बोलणे । आणि येणे रसाळपणे । आता पुरे कोण म्हणे ? । आकर्णिता ॥643॥
त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले आता ते व्याख्यान ऐकताना कोण पुरे म्हणेल ?
644-13
आणि सभाग्यु पाहुणा ये । सुभगाचि वाढती होये । तै सरो नेणे रससोये । ऐसे आथी ॥644॥
आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशालीच स्त्री वाढणारी असली तर त्या वेळेला स्वयंपाकाला संपायचे माहीत नसते असे असते. म्हणजे स्वयंपाक इतका भरपूर केलेला असतो अन्न संपेल अशी कल्पना त्या पाहुण्याच्या आणि त्या वाढणारणीचे मनात येतच नाही अशी स्थिती असते.
645-13
तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानी आम्हासि लागु । आणि तुजही अनुरागु । आथि तेथ ॥645॥
तसा हा प्रसंग झाला, कारण की आम्हाला ज्ञानाची प्रीती आहे आणि तुलाही येथे (ज्ञानाचे ठिकाणी) प्रीती आहे.
646-13
म्हणौनि यया वाखाणा- । पासी से आली चौगुणा । ना म्हणो नयेसि देखणा ? । होसी ज्ञानी ॥646॥
म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ति आली. तू ज्ञानामधे डोळस आहेस, हे नाही म्हणता येत नाही,
647-13
तरी आता ययावरी । प्रज्ञेच्या माजघरी । पदे साच करी । निरूपणी ॥647॥
तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर.
648-13
या संतवाक्यासरिसे । म्हणितले निवृत्तिदासे । माझेही जी ऐसे । मनोगत ॥648॥
ज्ञानेशांचे उत्तर
या संतांच्या आज्ञेबरोबर ‘महाराज, माझाही हेतू असाच आहे ” असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले.
649-13
यावरी आता तुम्ही । आज्ञापिला स्वामी । तरी वाया वाग् मी । वाढो नेदी ॥649॥
माझाही मूळ हेतू असाच होता यावर महाराज मला तुमचाही तसाच हुकूम झाला, तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही.
650-13
एवं इये अवधारा । ज्ञानलक्षणे अठरा । श्रीकृष्णे धनुर्धरा । निरूपिली ॥650॥
याप्रमाणे ज्ञानाची ही अठरा लक्षणे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितली, ऐका.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १९० वा. ९, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २२६९ ते २२८०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २२६९
विठ्ठलनामाचा नाही ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्ये ॥१॥
तयासी बोलता होईल विटाळ । नव जाये तो जळस्नान करिता ॥धृपद॥
विठ्ठलनामाची नाही ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥२॥
तुका म्हणे मज विठोबाची आण । जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥३॥
अर्थ
ज्याला विठ्ठल नामावरच विश्वास नाही तो उदास होऊन नरकामध्ये वास करतो. त्याच्या बरोबर बोलले तरी विटाळ होईल आणि तो विटाळा कितीही शुद्ध जलाने स्नान केले तरी जाणार नाही. ज्याला विठ्ठल नामाची आवड नाही त्याच्या आयुष्याची घडी स्वतः काळ मोजत आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा अधम व्यक्तीला मी जर प्रतिवचन करेल तर मला विठोबाची शपत आहे.
अभंग क्र. २२७०
तया घडले सकळ नेम । मुखी विठोबाचे नाम ॥१॥
काही न लगे सिणावे । आणिक वेगळाल्या भावे । वाचे उच्चारावे । रामकृष्णगोविंदा ॥धृपद॥
फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहळा ॥२॥
तुका म्हणे त्याच्या नावे । तोचि होइजे स्वभावे ॥३॥
अर्थ
ज्याच्या मुखात विठोबाचे नाम सतत राहिल त्याला सर्व प्रकारचे व्रतवैकल्य केल्या सारखेच होईल. यावाचून दुसरे कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कोणत्याही प्रकारची साधना करण्याची गरज लागत नाही. केवळ आपल्या वाचेने रामकृष्ण गोविंद या नावाचा उच्चार करावा. असे केल्याने तुम्हाला अलौकिक फळ ते म्हणजे वैकुंठ सोहळा भोगण्यास मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या मुखाने हरीचे नाम घेईल तो देखील हरिरूप होईल.
अभंग क्र. २२७१
पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारकमहिमा ॥१॥
मागे जाळी महा दोष । पुढे नाही गर्भवास ॥धृपद॥
जे निंदिले शास्त्रे । वंद्य जाले नाममात्रे ॥२॥
तुका म्हणे ऐसा । त्रिभुवनी नामठसा ॥३॥
अर्थ
नाम हे अनेक महा दोषी महा पापी लोकांना तारते असा नामाचा महिमा आहे आणि त्यांचे वर्णन पुराणात करण्याची सीमा झाली. नाम मागील सर्व महादोष जाळून टाकते आणि पुढे होणार्या जन्ममरणाचा गर्भवास चुकून टाकते. ज्यांना शास्त्राने निंद्य ठरवले आहे ते देखील नामाने वंदय झाले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात त्रिभूनामध्ये नामाचा ठसा असा उमटलेला आहे.
अभंग क्र. २२७२
नाम घेता न लगे मोल । नाममंत्र नाही खोल ॥१॥
दोंचि अक्षरांचे काम । उच्चारावे राम राम ॥धृपद॥
नाही वर्णाधमयाती । नामी अवघी चि सरती ॥२॥
तुका म्हणे नाम । चैतन्य निजधाम ॥३॥
अर्थ
नाम घेण्याकरता कोणत्याही प्रकारचे मोल द्यावे लागत नाही आणि ते फार अवघड ही नाही. नाम घेण्याकरता केवळ दोनच अक्षराचे काम आहे ते म्हणजे राम राम. नाम घेण्याकरता कोणत्याही प्रकारचा वर्ण धर्म किंवा जात लागत नाही आणि नाम घेतल्याने सर्वच तरतात. तुकाराम महाराज म्हणतात नाम हे चैतन्याचे निजधामच आहे.
अभंग क्र. २२७३
नाम घेता वाया गेलां । ऐसा कोणे आइकिला ॥१॥
सांगा विनवितो तुम्हासी । संत महंत सिद्ध ॠषी ॥धृपद॥
नामे तरला नाही कोण । ऐसा द्यावा निवडून ॥२॥
सलगीच्या उत्तरा । तुका म्हणे क्षमा करा ॥३॥
अर्थ
नाम घेतले म्हणून कोणी वाया गेले असे कोणी ऐकले आहे काय ? हे संत, महंत, सिद्ध, ऋषींनो कृपया मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावे अशी विनंती करतो. नामाने एखादा तरी तरला नाही असा निवडून मला दाखवावा. तुकाराम महाराज म्हणतात हे संत-महंत, सिद्ध, ऋषी, मुनीहो मी तुमच्याशी जे काही बोललो ते प्रेमाने बोललो आहे तरी माझ्याकडून काही चुकले असेल तर मला क्षमा करा.
अभंग क्र. २२७४
फुकाचे ते लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥१॥
नाही गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषाचे ॥धृपद॥
उदंड भावे उदंड घ्यावे । नाम गावे आवडी ॥२॥
तुका म्हणे घरिच्या घरी । देशा उरी न सीणीजे ॥३॥
अर्थ
फुकटचे आणि सर्व साधनांचे ही सार असे नाम तुम्ही तुम्हाला हवे तेवढे लुटा आणि सदैव हरी सारखे अमर व्हा. त्यामुळे तुम्हाला पुढे गर्भवास होणार नाही आणि सर्व दोषाचे डोंगर जळून जातील. भरपूर भक्तिभावाने भरपूर हरीचे नाम घ्यावे आणि जमेल तर हरीचे नाम आवडीने गावे. तुकाराम महाराज म्हणतात नाम घेतल्याने सर्व लाभ आपोआप घरच्या घरी चालत येतात त्याकरता देशभर फिरण्याची गरज नाही त्रास करून घेऊ नये.
अभंग क्र. २२७५
इतुले करी देवा ऐके हे वचन । समूळ अभिमान जाळी माझा ॥१॥
इतुले करी देवा ऐके हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखे ॥धृपद॥
इतुले करी देवा विनवितो तुज । संत चरणरज वंदी माथा ॥२॥
इतुले करी देवा ऐके हे मात । हृदयी पंढरीनाथा दिवसरात्री ॥३॥
भलतिया भावे तारी पंढरीनाथा । तुका म्हणे आता शरण आलो ॥४॥
अर्थ
देवा मी काय म्हणतो ते आईक आणि तेवढे मात्र कर माझा अभिमान समूळ जाळून टाक. देवा मी तुला एक गोष्ट सांगतो तेवढी तु कर मला सर्वत्र समदृष्टी देऊन मी तुला सर्वत्र पाहीन असे कर. देवा मी तुला एक विनंती करत आहे तेवढी तु पूर्ण कर ती म्हणजे संतचरणरज माझ्या माथ्याला लावून मी त्याला वंदन करावे. हे देवा तु एवढे कर माझे एवढे बोलणे तु ऐक ते म्हणजे तु स्वतः पंढरीनाथ माझ्या हृदयात रात्रंदिवस राहावे. तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरीनाथा तु मला आता कोणत्याही पद्धतीने या भवसागरातून तार.
अभंग क्र. २२७६
तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करी माझा ॥१॥
अनाथाचा नाथ पतितपावन । हे आता जतन करी नाम ॥धृपद॥
माझे गुण दोष पाहाता न लगे अंत । ऐसे माझे चित्त मज ग्वाही ॥२॥
नेणे तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तू देवा अंतरीचे ॥३॥
तुका म्हणे तू या कृपेचा सिंधु । तोडी भवबंधु माझा देवा ॥४॥
अर्थ
देवा माझी जगात तुझा दास म्हणून कीर्ती झाली आहे म्हणूनच तुझी लोकलज्जा राखण्याकरता माझा सांभाळ कर. देवा जगामध्ये तुझी ख्याती आहे तुला ब्रीद आहे की तु अनाथांचा नाथ आहेस पतितपावन आहेस आता तुझी ब्रीदे तूच जतन कर. देवा तु जर माझे गुणदोष पाहू लागलास तर त्याला अंत नाही याविषयी माझे चित्तच मला ग्वाही देते आहे. देवा तुझी सेवा कशी करावी हे मला कळत नाही परंतु तु सर्वाच्या अंतकरणातील जाणतो हे मला माहित आहे त्यामुळे मी कसा आहे हे तुला वेगळ्या प्रकारे सांगण्याची गरजच नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु कृपेचा समुद्रच आहेस तु कृपासिंधू आहेस त्यामुळे तु माझा भावबंधन तोडून टाक.
अभंग क्र. २२७७
जाणावे ते काय नेणावे ते काय । ध्यावे तुझे पाय हेचि सार ॥१॥
करावे ते काय न करावे ते काय । ध्यावे तुझे पाय हे चि सार ॥धृपद॥
बोलावे ते काय न बोलावे ते काय । ध्यावे तुझे पाय हे चि सार ॥२॥
जावे ते कोठे न वजावे आता । बरवे आठविता नाम तुझे ॥३॥
तुका म्हणे तू करिसी ते सोपे । पुण्ये होती पापे आमुच्या मते ॥४॥
अर्थ
देवा काय जाणावे किंवा काय नाही जाणावे हे जाणून घेण्यापेक्षा सर्व साधनांचे सार म्हणजे तुझे पाय आहे व तेच चित्तात धरून त्याचेच ध्यान करावे. काय करावे किंवा काय नाही करावे हे जाणून घेण्यापेक्षा सर्व साधनाचे सार म्हणजे तुझे पाय त्याचेच चिंतन चित्तात करावे. देवा काय बोलावे किंवा काय नाही बोलावे हे जाणून घेण्यापेक्षा तुझ्या पायाचे चिंतन करावे हे सर्व साधनांचे सार आहे. कोठे जावे आणि कोठे जाऊ नये हे मला काही आता समजत नाही तुझ्या नामाचे चिंतन करावे एवढेच मला बरे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु जे काही करतो ते सर्व सोपे होते आहे येर्हवी आम्ही आमच्या मतांनी काही करायला गेलो तर आमच्या कडून पापाच होते.
अभंग क्र. २२७८
नको ब्रम्हज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥
दावी रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥धृपद॥
पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवे निंबलोण उतरीन ॥२॥
पुसता सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥३॥
तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझे अभ्यंतर जाणोनिया ॥४॥
अर्थ
देवा मला ब्रम्हज्ञान किंवा आत्मस्थिती भाव जर झाला तर त्यामुळे माझ्या ठिकाणी अहंकार निर्माण होऊन तुझ्यात व माझ्यात अंतर पडले त्यामुळे मला तो आत्मस्थिती भाव व ब्रम्हज्ञान हे दोन्हीही नको केवळ तु देव आणि मी भक्त हेच नाते आपल्या मध्ये राहील असे तु कर. हे गोपीका रमना गोपिकांची रास करणाऱ्या देवा तु मला तुझे रूप दाखव मग मी तुझ्या चरणावर माझा माथा ठेवील. एकदा की तु मला देवा तुझे सगुण रूप दाखवले की मी तुझे श्रीमुख माझी तृप्त होईपर्यंत पाहिन तुला आनंदाने आलिंगन देईल आणि तुझ्यावरून माझा जीव उतरून टाकेन. देवा तु जर मला माझ्या हीत गुजा विषयी काही विचारले तर मी तुला ते सर्व सांगेन आणि आपण दोघेही एकातात बसून सुखाच्या गोष्टी करू. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे सगुण स्वरूप मला दाखवण्या विषय तु आता उशीर लावू नकोस माझ्या अंतकरणातील तळमळ तु जाणून घ्यावीस.
अभंग क्र. २२७९
मागे शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥१॥
पाहिले अपराध नाही याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥धृपद॥
अढळपदी बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥२॥
गजेंद्रपशु नाडिये जळचरे । भवसिंधुपार उतरिला ॥३॥
प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचे अमृत तुझ्या नामे ॥४॥
पांडवा संकट पडता जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥५॥
तुका म्हणे तू या अनाथाचा नाथ । ऐकोनिया मात शरण आलो ॥६॥
अर्थ
देवा तुला मागे पुष्कळ भक्त शरण आलेत आणि तु त्यांना तारलेलेही आहे त्यामुळेच तुला दिनानाथ असे म्हणतात. देवा तु शरण आलेल्या भक्तांचा अपराध जातकुळ हे काहीच पाहिले नाही म्हणूनच तर तु महादोषी अजामिळ गणिकावैश्या आणि भिल्ल शबरीचा उद्धार केलास. देवा तु धृव बाळाला अढळपदावर बसविले आणि दुधाचा समुद्रच उपमण्यूला दिलास. गजेंद्र नावाचा हत्ती याला ज्या वेळी जळचरात नकराने धरले त्यावेळीही तु त्याची मदत करून त्याला या भवसागरातून पार उतरवले. तु प्रल्हादाचे रक्षण अग्नीत पाण्यात सर्व ठिकाणी केले त्याच्या पित्या हिरण्यकश्यपूने त्याला ज्या वेळी विष दिले तेव्हा त्याने तुझे नाम घेतले तर त्या विषाचे देखील अमृत झाले. हे नारायणा ज्यावेळी पांडव घोर संकटात सापडले त्यावेळी तूच त्यांचा कैवारी झालास. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु सर्वाचा, अनाथांचा नाथ आहे ही तुझी कीर्ती ऐकूनच मी तुला शरण आलो आहे.
अभंग क्र. २२८०
तुझा शरणागत झालो मी अंकित । करी माझे हित पांडुरंगा ॥१॥
पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आता सांभाळी मायबापा ॥धृपद॥
अनाथाचा नाथ बोलतील संत ऐकोनिया मात विश्वासलो ॥२॥
न करावी निरास न धरावे उदास । देई याचकास कृपादान ॥३॥
तुका म्हणे मी तो पातकांची रासी । देई पायापासी ठाव देवा ॥४॥
अर्थ
हे पांडुरंगा मी तुला शरण आलो असून तुझा अंकित झालो आहे त्यामुळे तु माझे हीत कर. हे मायबापा तु पतितपावन आहेस अशी तुझी ब्रिदावळी जगविख्यात आहे त्यामुळे त्यांचा आता सांभाळ करावा. हे देवा संत तुला अनाथांचा नाथ असे म्हणतात त्यामुळे त्यांच्या या वचनावर मी विश्वास ठेवला आहे. देवा तु मला निराश करू नकोस आणि माझ्याविषयी तु उदास होऊ नकोस हेच कृपादान तु मला याचकाला द्यावे. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तर पतकाची राशीच आहे तरीही तु माझ्यावर कृपा करावी आणि मला तुझ्या पायापाशी आश्रय द्यावा.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















