
२५ जुलै, दिवस २०६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १०२६ ते १०५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २४६१ ते २४७२
“२५ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २५ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २५ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २४६१ ते २४७२ चे पारायण आपण करणार आहोत.
२५ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १०२६ ते १०५०,
1026-13
अनंते काळे किरीटी । जिया मिळती इया सृष्टी । तिया रिगती ययाच्या पोटी । कल्पांतसमयी ॥1026॥
अर्जुना, अनंतकालापासून ज्या ह्या सृष्ट्या उत्पन्न होतात, त्या कल्पांताच्या वेळेस ह्याच्या पोटात प्रवेश करतात.
1027-13
हा महद्ब्रह्मगोसावी । ब्रह्मगोळ लाघवी । अपारपणे मवी । प्रपंचाते ॥1027॥
हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे, हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो, (म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो).
1028-13
पै या देहामाझारी । परमात्मा ऐसी जे परी । बोलिजे ते अवधारी । ययातेचि ॥1028॥
आणि या देहामधे परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज.
1029-13
अगा प्रकृतिपरौता । एकु आथी पंडुसुता । ऐसा प्रवादु तो तत्त्वता । पुरुषु हा पै ॥1029॥
अरे अर्जुना, प्रकृतीपलीकडे कोणी एक आहे, अशी जी वदंता आहे (असे जे लोक म्हणतात) तो वस्तुत: हाच पुरुष आहे.
य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ॥13. 23॥
भावार्थ :-
पुरुष आणि प्रकृती, यांना जो जो (या त्यांच्या) गुणांसह याप्रमाणे (म्हणजे पुरुष हा प्रकृती व तत्कार्य गुण याहून भिन्न आहे असे) जाणतो, तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही.
1030-13
जो निखळपणे येणे । पुरुषते यया जाणे । आणि गुणांचे करणे । प्रकृतीचे ते ॥1030॥
अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1031-13
हे रूप हे छाया । पैल जळ हे माया । ऐसा निवाडु धनंजया । जेवी कीजे ॥13-1031॥
हा देह व ही त्याची छाया, पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसत आहे ते खोटे (मृगजल) आहे, अर्जुना, याप्रमाणे जशी निवड करावी.
1032-13
तेणे पाडे अर्जुना । प्रकृतिपुरुषविवंचना । जयाचिया मना गोचर जाहली ॥1032॥
त्याप्रमाणे अर्जुना, प्रकृती व पुरुष यांच्या स्वरुपाचा यथार्थ विचार ज्याच्या मनाला कळला आहे. ।
1033-13
तो शरीराचेनि मेळे । करू का कर्मे सकळे । परी आकाश धुई न मैळे । तैसा असे ॥1033॥
तो शरीराच्या संगतीने सर्व कर्मे करीना का ? परंतु आकाश जसे धुराने मळत नाही तसा तो आहे. सर्व कर्मे करीत असताना तो त्या कर्मांकडून लिप्त होत नाही.
1034-13
आथिलेनि देहे । जो न घेपे देहमोहे । देह गेलिया नोहे पुनरपि तो ॥1034॥
देह असताना जो त्या देहाच्या मोहाने भुलला जात नाही, तो देह पडल्यावर पुन: जन्म पावत नाही.
1035-13
ऐसा तया एकु । प्रकृतिपुरुषविवेकु । उपकारु अलौकिकु । करी पै गा ॥1035॥
हा प्रकृतीपुरुषविचार, त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो
1036-13
परी हाचि अंतरी । विवेक भानूचिया परी । उदैजे ते अवधारी । उपाय बहुत ॥1036॥
परंतु हाच विचार अंत:करणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत ते ऐक.
ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना ।
अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे ॥13. 24॥
श्लोक भावार्थ :-
कित्येक आपल्या ठिकाणी आत्मानात्म्याच्या सरभेसळीत, आपणास आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास, आत्मध्यानाच्या योगाने आत्मानात्मविचाराने निवडून पहातात. दुसरे कोणी सांख्ययोगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात.
आत्मस्वरूपाला जाणण्याचे मार्ग
1037-13
कोणी एकु सुभटा । विचाराचा आगिटा । आत्मानात्मकिटा । पुटे देउनी ॥1037॥
हे चांगल्या योद्ध्या, अर्जुना, कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मानात्ममिश्रणरूपी हिणकस सोन्यास पुटे देऊन,
1038-13
छत्तीसही वानी भेद । तोडोनिया निर्विवाद । निवडिती शुद्ध । आपणपे ॥1038॥
छत्तीसही अनात्मरूप प्रकारचे भेद नि:संशय जाळून म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात.
1039-13
तया आपणपयाच्या पोटी । आत्मध्यानाचिया दिठी । देखती गा किरीटी । पापियाचा आपणपेचि ॥1039॥
आत्मभावाच्या पोटात स्वरूपात आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना, ते आपण आपल्यालाच पहातात.
1040-13
आणिक पै दैवबगे । चित्त देती सांख्ययोगे । एक ते अंगलगे । कर्माचेनी ॥1040॥
आणि कित्येक लोक दैववशात सांख्ययोगाच्या द्वारे (आत्म्याकडे) चित्त देतात, आणखी कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून (आत्म्यास) पहातात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अन्ये त्वेवमजानंन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते ।
तेऽपि चातितरंत्येव मृत्युं श्रुतिपरायणाः ॥13. 25॥
भावार्थ :-
दुसरे कोणी याप्रमाणे (आत्म्याला) न जाणणारे दुसर्यांपासून (म्हणजे आचार्यादिकांपासून) श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यूला तरून जातात. म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्त होतो. ॥13-25॥
(पुढे आपण आत्मस्वरुप जानुन घेऊ)
1041-13
येणे येणे प्रकारे । निस्तरती साचोकारे । हे भव भेउरे । आघवेचि ॥1041॥
याहून कित्येक दुसरे – स्वत: आत्म्याला न जाणणारे – या प्रकारांनीच सर्व संसारभय खरोखर निस्तरतात. (चांगल्या तर्हेने तरून जातात).
1042-13
परी ते करिती ऐसे । अभिमानु दवडूनि देशे । एकाचिया विश्वासे । टेकती बोला ॥1042॥
परंतु ते असे करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या (गुरूच्या) उपदेशावर विश्वासाने अवलंबून रहातात.
1043-13
जे हिताहित देखती । हानि कणवा घेपती । पुसोनि शिणु हरिती । देती सुख ॥1043॥
जे गुरू हिताहित पहातात, जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दु:ख कशाने होते हे विचारून त्याचे दु:ख हरण करतात आणि सुख देतात,
1044-13
तयांचेनि मुखे जे निघे । तेतुले आदरे चांगे । ऐकोनिया आंगे । मने होती ॥1044॥
त्यांच्या (गुरूंच्या) मुखातून जेवढे निघेल, तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात.
1045-13
तया ऐकणेयाचि नांवे । ठेविती गा आघवे । तया अक्षरांसी जीवे । लोण करिती ॥1045॥
आपल्या सर्व कर्तव्यास, ऐकण्याचेच नाव ठेवतात. ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात. आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात.
1046-13
तेही अंती कपिध्वजा । इया मरणार्णवसमाजा- । पासूनि निघती वोजा । गोमटिया ॥1046॥
हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून (जन्ममरणपरंपरेपासून) चांगल्या रीतीने बाहेर पडतात.
1047-13
ऐसेसे हे उपाये । बहुवस एथे पाहे । जाणावया होये । एकी वस्तु ॥1047॥
एक परमात्मा जाणावयाला येथे असे हे पुष्कळ उपाय आहेत, पहा.
1048-13
आता पुरे हे बहुत । पै सर्वार्थाचे मथित । सिद्धांतनवनीत । देऊ तुज ॥1048॥
आता याविषयी बोलणे पुरे. आतापर्यंत सांगितलेले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांतरूप लोणी तुला देतो. आतापर्यंत सांगितलेल्या सर्व अर्थाचे तात्पर्य सांगतो.
1049-13
येतुलेनि पंडुसुता । अनुभव लाहाणा आयिता । येर तव तुज होता । सायास नाही ॥1049॥
अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे. मग इतर (म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांती वगैरे) होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत.
1050-13
म्हणौनि ते बुद्धि रचू । मतवाद हे खांचू । सोलीव निर्वचू । फलितार्थुची ॥1050॥
म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू व इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २०६ वा. २५, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २४६१ ते २४७२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २४६१
न करि त्याचे गांढेपण । नारायण सिद्ध उभा ॥१॥
भवसिंधूचा थडवा केला । बोलाविला पाहिजे ॥धृपद॥
याचे सोई पाउल वेचे । मग कैचे अडथळे ॥२॥
तुका म्हणे खरे खोटे । न म्हणे मोटे लहान ॥३॥
अर्थ
जो नारायणाची भक्ती करत नाही तो तर मूर्ख आहे परंतु असे असले तरी देखील नारायण सर्वाना तारण्याकरता नेहमी सज्य उभा आहे. हा भव सिंधू अफाट असा आहे परंतु नारायणाने भक्तांना तरुण जाण्याकरता भवसमुद्र केवळ छोटा केला आहे अगदी तळ्याप्रमाणे आता तो तरुन जाण्याकरता भक्ताने नारायणाला बोलविले पाहिजे. नारायणाच्या सोयीप्रमाणे जर पावले टाकले तर अडथळे तरी कसे येणार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात नारायण शरण आलेल्या भक्तांना हा खरा आहे की खोटा लहान आहे की मोठा असे कधीही म्हणत नाही.
4:31 Sdm:
अभंग क्र. २४६२
रिकामे तू नको मना । राहो क्षणक्षणा ही ॥१॥
वेळोवेळा पारायण । नारायण हे करी ॥धृपद॥
भ्रमणांच्या मोडी वाटा । न भरे फाटा आडराने ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवे । हे चि घ्यावे धणीवरी ॥३॥
अर्थ
हे मना तु क्षणभरदेखील रिकामा राहू नको. वेळोवेळी तु नारायणाचेच पारायण म्हणजे चिंतन करत राहा. भ्रमाच्या वाटा तु मोडून टाक आणि इतर निषिद्ध कर्माच्या आडरानात जाण्यासाठी मनात संकल्पना भरू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात आता हयाच सर्व गोष्टी मी माझ्या मनाला समजावल्या आहेत व नारायणाचे चिंतन तृप्त होईपर्यंत मी घेत आहे.
4:31 Sdm:
अभंग क्र. २४६३
पंचभूताचिये सापडलो संदी । घातलोंसे बंदी अहंकारे ॥१॥
आपल्या आपण बांधविला गळा । नेणे चि निराळा असता ही ॥धृपद॥
कासया हा सत्य लेखिला संसार । का हे केले चार माझे माझे ॥२॥
का नाही शरण गेलो नारायणा । का नाही वासना आवरीली ॥३॥
किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणे बहु नास केला पुढे ॥४॥
तुका म्हणे आता देह देऊ बळी । करुनि सांडू होळी संचिताची ॥५॥
अर्थ
मी पंचभूताच्या अडचणीत सापडलो आहे आणि त्या विषयीच्या मिथ्या अहंकाराच्या बंदि मध्ये मी घातलो गेलो आहे. आपण देहाच्या स्वरूपामध्ये आपला गळा बांधून टाकतो आहे त्यामुळे आपण देहापेक्षा निराळे आहोत हेच समजत नाही. कशासाठी मी हा संसार सत्य मानला असेल आणि संसारातील सर्व काही माझे माझे असे मी का म्हणलो असेल. मी आज पर्यंत नारायणाला शरण का बरे नसेलं गेलो का मी माझी वासना आज पर्यंत आवरली नाही ? तुकाराम महाराज म्हणतात आता आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेऊन देहाचा बळी देऊ आणि संचित कर्माची होळी करून टाकून देऊ.
4:32 Sdm:
अभंग क्र. २४६४
देव झाले अवघे जन । गुण दोष हारपले ॥१॥
बरवे झाले बरवे झाले । चित्त धाले महालाभे ॥धृपद॥
दर्पणीचे दुसरे भासे । परि ते असे एक ते ॥२॥
तुका म्हणे सिंधुभेटी । उदका तुटी वोहोळासी ॥३॥
अर्थ
सर्व लोकंच मला आता देव स्वरूप झाले आहेत त्यामुळे आता त्यांच्यातील गुणदोषच हरपले असून मला त्यांच्यात काहीच दोष दिसत नाही. सर्वत्र मला देवच दिसत आहे त्यामुळे मला हा फार मोठा लाभ झाला आहे आणि त्यामुळे माझे चित्त तृप्त झाले आहे हे खूप चांगले झाले खूपच चांगले झाले. दर्पणात आपला चेहरा दिसला आपले मुख दिसते तरी ते वेगळे आहे असे भासते परंतु ते तसे वेगळे नसून एकच असते त्याप्रमाणे जगातील सर्व लोक आपल्याला वेगवेगळे दिसत असले तरी सर्वामध्ये एकच देव आहे. तुकाराम महाराज म्हणतात ओढ्याची आणि समुद्राची एकदा भेट झाली की मग ओढा समुद्रा पेक्षा वेगळा रहात नाही त्याप्रमाणे सर्वत्र देवच आपण पाहिला तर आपणही देव रूपच व्हायला वेळ लागणार नाही.
4:33 Sdm:
अभंग क्र. २४६५
बहुत प्रकार गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी ॥१॥
सरले परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥धृपद॥
घेतले घ्यावे वेळोवेळा । माय बाळा न विसंबे ॥२॥
तुका म्हणे रस राहिला वचनी । पडताळूनि तोचि सेवी ॥३॥
अर्थ
गव्हाचा एकच प्रकार आहे परंतु त्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार होतात आणि त्या पदार्थाच्या अवडीनेच आपला जीव हा नाचत असते. त्या पदार्थाची चव एकदा घेतली की पुन्हा ते पदार्थ खावेसे वाटतात जसे समुद्राची एक तरंग संपली की समुद्र पुन्हा आपले दुसरे तरंग दाखवतो त्याप्रमाणे. आईने आपल्या बाळाला एकदा घेतले की पुन्हा पुन्हा तिला त्याला घ्यावेसे वाटते ती कधीही आपल्या मुलाला विसरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात लहान मुल बोबडे बोलते आणि त्याचं बोबडे बोलण्याची आठवण काढून पुन्हा पुन्हा त्या मुलाचे बोलण्याचे रस सेवन करीत असते.
4:34 Sdm:
अभंग क्र. २४६६
आम्हा सोइरे हरीजन । जनी भाग्य निकींचन ॥१॥
ज्याच्या धैर्या नाही भंग । भाव एकविध रंग ॥धृपद॥
भुक तहान चित्ती । सदा देव आठविती ॥२॥
तुका म्हणे धन । ज्याचे वित्त नारायण ॥३॥
अर्थ
आमचे सोयरे हरिजन आहेत हरिभक्त आहेत की जे निकिंचन म्हणजे दरिद्री आहेत व दरिद्री असणे हेच ज्यांचे भाग्य आहे. ज्यांचे धैर्य कधी भंगत नाही आणि ज्याचा एकविध भक्ति भाव हरी विषयी असतो आणि त्याच्याच रंगात जे रंगलेले असतात. भूक तहान चिंता हे सर्व विसरून जे नेहमी देवालाच आठवत असतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचे धन निजस्वरूप नारायणच आहे.
4:34 Sdm:
अभंग क्र. २४६७
म्हणवितो दास न करिता सेवा । लंडपणे देवा पोट भरी ॥१॥
खोटे कोठे सरे तुझे पायापाशी । अंतर जाणसी पांडुरंगा॥धृपद॥
आचरण खोटे आपणासी ठावे । लटिके बोलावे दुसरे ते ॥२॥
तुका म्हणे ऐसा आहे अपराधी । असो कृपानिधी तुम्हा ठावा ॥३॥
अर्थ
देवा मी स्वतःला तुझा दास म्हणून घेतो परंतु तुझी सेवा काहीच करत नाही आणि तुझ्या नावावर मी माझे पोट भरवतो. हे पांडुरंगा तुझ्या पायापाशी खोटे कसे चालेल तु तर सर्वाचे अंतकरण जाणतोस. माझे आचरण खोटे आहे हे मला माहीतच आहे परंतु तरीही मी दुसऱ्यांना सांगतो की माझे आचरण शुद्ध आहे हे दुसरे खोटे मी बोलतो. तुकाराम महाराज म्हणतात हे कृपानिधी मी तर अपराधी आहे हे तुम्हाला माहीतच आहे.
4:35 Sdm:
अभंग क्र. २४६८
जळो ते बाह्य सोंग । पडिलिया अंतर व्यंग ॥१॥
कारण ते अंतरले । म्हणविता वाईट भले ॥धृपद॥
तांतडीने नासी । तांतडींनेचि संतोषी ॥२॥
तुका म्हणे धीर नाही । बुद्धी एकी स्थिर ॥३॥
अर्थ
अंतकरणात खरी भक्ती नसेल आणि वरवर नुसतेच भक्तीचे सोंग केले तर त्या बाह्य सोंगाला आग लागो. वाईट कर्माला जर चांगले आहे असे म्हटले तर चांगले कार्य देखील आपोआप दुरावले जातात. काही कार्य असे आहे की जे तातडीने करू नयेत आणि तातडीने केले तर त्या कार्याचा नाश होतो आणि काही कार्य असे आहेत की त्या विषयी तातडीच करावी लागते तरच मनुष्याला त्या गोष्टीचा लाभ होतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या अंगी धीर नाही आणि ज्याची बुद्धी स्थिर नाही त्याचे कार्य वाया जाते.
4:35 Sdm:
अभंग क्र. २४६९
चित्ताचे बांधले जवळी ते वसे । प्रकाशी प्रकाशे सर्वकाळ ॥१॥
अंतरी वसावी उत्तम ते भेटी । होऊ काही तुटी न सके चि ॥धृपद॥
ब्रम्हांड कवळे आठवणेसाठी । धरावा तो पोटी वाव बरा ॥२॥
तुका म्हणे लाभ घरिचिया घरी । प्रेमतंतु दोरी न तुटता ॥३॥
अर्थ
ज्या गोष्टी आपल्या चित्तामध्ये बांधलेल्या असतात त्या जरी दूर असल्या तरी आपल्या जवळच वसतात आठवण रुपी प्रकाशाने ते सर्व काळ प्रकाशितच रहात असतात. अंतरंगामध्ये एखाद्या गोष्टीची भेट होणेच उत्तम आहे कारण अंतरंगात झालेली भेट याविषयी वियोग कधीही होणे शक्य नाही. ब्रम्हांडाची आठवण जर केली तर ते ब्रह्मांड देखील आपल्या पोटात साठवले जाते परंतु त्याविषयी आपल्या चित्ता मध्ये वाव देणे गरजेचे आहे तरच ते ब्रह्मांड आपल्या पोटात साठवले जाते. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या गोष्टीविषयी प्रेम तंतू दोरी जर तुटू दिले नाही तर आपल्याला त्या गोष्टीचा लाभ घरी बसल्या बसल्या होतो त्याप्रमाणे देवा विषयी आपण प्रेम तंतू दोरी टिकून ठेवली तर देवाचा लाभ आपल्याला घरी बसल्या बसल्या होतो.
4:36 Sdm:
अभंग क्र. २४७०
दुखवले चित्त आजिच्या प्रसंगे । बहु पीडा जगे केली देवा ॥१॥
कधी हा संबंध तोडिसी ते नेणे । आठवूनि मने पाय असे ॥धृपद॥
आणिकाची येती अंतरा अंतरे । सुखदुःख बरेंवाईट ती ॥२॥
तुका म्हणे घडे एकाताचा वास । तरिच या नास संबंधाचा ॥३॥
अर्थ
देवा आजच्या प्रसंगी जगातील दुष्ट लोकांनी मला फार पीडा दिली आहे त्यामुळे माझे चित्त फार दुखावले गेले आहे. देवा दृष्ट जगाशी माझा संबंध तरी तु केव्हा तोडणार आहे ते काही मला कळत नाही मी तुझे पाय माझ्या मनात आठवून जीवन जगत आहेत. या जगाशी संबंध आला की अनेकांच्या अंतकरणाचे आणि माझी अंतकरण मिळून त्यांचे सुख दुखः बरेवाईटपणा माझ्या अंतःकरणात येते. तुकाराम महाराज म्हणतात जर एकातवास घडला तरच जगाशी संबंध होणार नाही.
4:36 Sdm:
अभंग क्र. २४७१
धनवंत एक बहिर अंधळे । शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगी ॥१॥
प्रारब्धाचि गति न कळे विचित्र । आहे हाती सूत्र विठोबाचे॥धृपद॥
आणीक रोगांची नावे सांगो किती । अखंड असती जडोनिया ॥२॥
अर्थ
तुका म्हणे नष्ट संचिताचे दान खाता पावे सुख नेंदी ॥३॥
4:37 Sdm:
अभंग क्र. २४७२
भेदाभेद ताळा न घडे घालिता । आठवा रे आता नारायण ॥१॥
येणे एक केले अवघे होय सांग । अच्युताच्या योगे नामे छंदे ॥धृपद॥
भोंवरे खळाळ चोर वाटा घेती । पावल मारिती सिवेपाशी ॥२॥
तुका म्हणे येथे भावेविण पार । न पविजे सार हे चि आहे ॥३॥
अर्थ
भेद आणि अभेदाचा ताळा बसणे हे सहज शक्य नाही ते आपल्याला कळणारही नाही त्यामुळे साधकाहो तुम्ही आता नारायणाला आठवा. जर नामाचा छंद लावून घेतला तर त्याचे सर्व कार्य यथा संग पूर्ण होतात आणि अच्युताशी भेट होण्यास योग येत असतो. ज्याप्रमाणे नदीत पोहणाऱ्याला भवऱ्यापासून धोकाच असतो तो भवरा त्याला बुडवू शकतो त्याप्रमाणेच अगदी गावाच्या शिवेपर्यंत आलेल्या त्या वाटसरुला चोर पुरते लुबाडतात त्याप्रमाणे साधकाने शेवटपर्यंत आपली स्थिती स्थिर ठेवावी त्याला मोक्ष प्राप्त होईपर्यंत धोकाच असतो. तुकाराम महाराज म्हणतात कोणताही भाविक भक्त असो, साधक असो, जिज्ञासू असो, मुमुक्षु असो तो भक्तिभावे वाचून भव नदीच्या पार जाऊ शकत नाही हेच परमार्थातील मुख्य सार आहे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















