४ जुलै, दिवस १८५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ५०१ ते ५२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २२०९ ते २२२०

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“४ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 4 July
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ४ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २२०९ ते २२२० चे पारायण आपण करणार आहोत.
४ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ५०१ ते ५२५,

501-13
हे स्थैर्य निधडे । जेथ आंगे जीवे जोडे । ते ज्ञानाचे उघडे । निधान साचे ॥501॥
हे न ढळणारे स्थैर्य ज्या पुरुषात शरीराच्या व मनाच्या ठिकाणी प्राप्त झाले आहे, तो पुरुष ज्ञानाचा खरा उघडा ठेवा आहे.
502-13
आणि इसाळु जैसा घरा । का दंदिया हतियेरा । न विसंबे भांडारा । बद्धकु जैसा ॥502॥
9) आत्मविनिग्रह
आणि ब्रह्मराक्षस अथवा अस्सल सर्प जसा (आपले धन असलेल्या) घराला विसरत नाही किंवा योद्धा जसा हत्याराला विसरत नाही अथवा लोभी पुरुष जसा आपल्या खजिन्याला विसरत नाही.
503-13
का एकलौतिया बाळका- । वरि पडौनि ठाके अंबिका । मधुविषी मधुमक्षिका । लोभिणी जैसी ॥503॥
एकुलत्या एका मुलावर जशी आई पडून रहाते (म्हणजे त्याला कधी विसंबत नाही) अथवा जशी मधमाशी मधाला लोभी असते.
504-13
अर्जुना जो यापरी । अंतःकरण जतन करी । नेदी उभे ठाको द्वारी । इंद्रियांच्या ॥504॥
अर्जुना, याप्रमाणे जो आपल्या अंत:करणाला जपतो व इंद्रियांच्या द्वारात अंत:करणाला उभे राहू देत नाही.
505-13
म्हणे काम बागुल ऐकेल । हे आशा सियारी देखैल । तरि जीवा टेकैल । म्हणौनि बिहे ॥505॥
तो म्हणतो की माझे अंत:करण जर इंद्रियाच्या द्वारात गेल्याचे, त्या इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या कामाने ऐकले, तर तो कामरूपी बागुलबुवा त्या अंत:करणाला झपाटील व मग त्या कामाच्या तडाख्यातून सुटणे कठीण. तसेच इंद्रियांच्या ठिकाणी असणारी आशारूपी डाकीण, ही अंत:करणाला इंद्रियांच्या द्वारी पाहिल्याबरोबर त्याला झपाटील. मग जीवावरच येऊन बेतेल, म्हणून तो पुरुष भितो.


506-13
बाहेरी धीट जैसी । दाटुगा पति कळासी । करी टेहणी तैसी । प्रवृत्तीसी ॥506॥
ज्याप्रमाणे घराबाहेर ढालगजपणाने वागणार्‍या स्त्रीला तिचा दांडगा नवरा (ती बिघडण्याचा संभव असतो म्हणून) बाहेर फिरकू न देता तिला घरात कोंडून ठेवतो, त्याप्रमाणे आपली मनोवृत्ती बाहेर इंद्रियांकडे जाऊ नये म्हणून तिच्यावर जो पहारा करतो.
507-13
सचेतनी वाणेपणे । देहासकट आटणे । संयमावरी करणे । बुझूनि घाली ॥507॥
चित्ताचा संकोच होण्याकरता देहसुद्धा झिजतो. व इंद्रियांची समजूत घालून त्यांना चुचकारून निग्रहावर आणून ठेवतो.
508-13
मनाच्या महाद्वारी । प्रत्याहाराचिया ठाणांतरी । जो यम दम शरीरी । जागवी उभे ॥508॥
या शरीरात मनरूपी महाद्वारात, अंतर्मुखतेच्या पहार्‍याच्या जागेत जो यम व दम यास उभे जागे ठेवतो.
509-13
आधारी नाभी कंठी । बंधत्रयाची घरटी । चंद्रसूर्य संपुटी । सुये चित्त ॥509॥
गुद व मेढ्र यांच्या मध्यभागी आधारचक्राचे ठिकाणी मूळबंधाची व नाभीमधे मणिपूर चक्राचे ठिकाणी ओडियाणा बंधाची व कंठामधे विशुद्ध चक्राचे ठिकाणी जालंदर बंधाची याप्रमाणे तीन बंधांची गस्त घालतो (अथवा घर करतो). आणि इडा व पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषुम्नेत चित्त घालतो.
510-13
समाधीचे शेजेपासी । बांधोनि घाली ध्यानासी । चित्त चैतन्य समरसी । आंतु रते ॥510॥
समाधिरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो (म्हणजे समाधी लागेपर्यंत ध्यान दृढ करतो) व चित्त आणि चैतन्य यांचे समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


511-13
अगा अंतःकरणनिग्रहो जो । तो हा हे जाणिजो । हा आथी तेथ विजयो । ज्ञानाचा पै ॥511॥
अर्जुना अंत:करण-निग्रह जो म्हणतात तो हा, हे समज. व जेथे हा (अंत:करण-निग्रह) आहे तेथेच ज्ञानाचा विजय आहे.
512-13
जयाची आज्ञा आपण । शिरी वाहे अंतःकरण । मनुष्याकारे जाण । ज्ञानचि तो ॥512॥
ज्याची आज्ञा अंत:करणाला शिरसावंद्य असते, तो मनुष्यरूपाने साक्षात ज्ञानच आहे असे समज.

इंद्रियार्थेषु वैराग्यमनहङ्कार एव च ।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥13-8॥
अर्थ इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य, (कर्माचे विषयी) अहंकाराचा अभाव, जन्म-मृत्यू -जरा, व्याधी यांच्या ठिकाणी दु:खाचे व दोषाचे अनिदर्शन
513-13
आणि विषयाविखी । वैराग्याची निकी । पुरवणी मानसी की । जिती आथी ॥513॥
इंद्रियांच्या ठिकाणी वैराग्य आणि विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो,
514-13
वमिलेया अन्ना । लाळ न घोटी जेवी रसना । का आंग न सूये आलिंगना । प्रेताचिया ॥514॥
ओकलेल्या अन्नाला पाहून ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटत नाही अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरता कोणीही अंग पुढे करत नाही.
515-13
विष खाणे नागवे । जळत घरी न रिगवे । व्याघ्रविवरा न वचवे । वस्ती जेवी ॥515॥
जसे (कोणालाही) विष खाववत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या दरीमधे वस्ती करण्यास जाववत नाही.


516-13
धडाडीत लोहरसी । उडी न घालवे जैसी । न करवे उशी । अजगराची ॥516॥
रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामधे जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही,
517-13
अर्जुना तेणे पाडे । जयासी विषयवार्ता नावडे । नेदी इंद्रियांचेनि तोंडे । काहीच जावो ॥517॥
अर्जुना तितक्या मानाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही व जो इंद्रियांच्या द्वाराने (मनाकडे) कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही.
518-13
जयाचे मनी आलस्य । देही अतिकार्श्य । शमदमी सौरस्य । जयासि गा ॥518॥
ज्याच्या मनात विषयवासनेचा कंटाळा असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो व यमदमाच्या ठिकाणी जो समरस झालेला असतो (म्हणजे ते करण्यात ज्याला आनंद वाटतो).
519-13
तपोव्रतांचा मेळावा । जयाच्या ठायी पांडवा । युगांत जया गावा- । आंतु येता ॥519॥
अर्जुना, ज्याच्या ठिकाणी तपांची व व्रतांची गर्दी असते व ज्याला गावात येताना प्रलयकालाप्रमाणे संकट वाटते.
520-13
बहु योगाभ्यासी हाव । विजनाकडे धाव । न साहे जो नांव । संघाताचे ॥520॥
योगाभ्यासाविषयी ज्याची अती उत्कट इच्छा असते व एकांतात रहाण्यासंबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते, व जनसमुदायाचे ज्याला नावही सहन होत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


521-13
नाराचांची आंथुरणे । पूयपंकी लोळणे । तैसे लेखी भोगणे । ऐहिकीचे ॥521॥
बाणांच्या शय्येवर जसे निजणे अथवा पुवाच्या चिखलात जसे लोळणे तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो.
522-13
आणि स्वर्गाते मानसे । ऐकोनि मानी ऐसे । कुहिले पिशित जैसे । श्वानाचे का ॥522॥
स्वर्गाचे भोग ऐकून मनाने असे मानतो की ते जसे कुत्र्याचे मांस आहेत.
523-13
ते हे विषयवैराग्य । जे आत्मलाभाचे सभाग्य । येणे ब्रह्मानंदा योग्य । जीव होती ॥523॥
वर सांगितलेले विषयांविषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे. याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतात.
524-13
ऐसा उभयभोगी त्रासु । देखसी जेथ बहुवसु । तेथ जाण रहिवासु । ज्ञानाचा तू ॥524॥
जेथे असा ऐहिक व पारत्रिक भोगासंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे समज.
525-13
आणि सचाडाचिये परी । इष्टापूर्ते करी । परी केलेपण शरीरी । वसो नेदी ॥525॥
11) अनहंकार
आणि सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापूर्त कर्मे करतो, परंतु ती केल्याचा फुंज शरीरात राहू देत नाही.

दिवस १८५ वा. ४, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २२०९ ते २२२०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २२०९
माहार मातेची पणी भरे । न कळे खरे पुढील ॥१॥
वोंगळ अधमाचे गुण । जाता घडी न लगे चि ॥धृपद॥
श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येता उत्तर ॥२॥
तुका म्हणे गुमान का । सांगो लोका अधमासी ॥३॥
अर्थ
एखादा मूर्ख मनुष्य अशी शपथ वहातो की मी महाराच्या आईच्या पोटचा आहे परंतु असे केल्याने त्याचे परिणाम पुढे किती वाईट होणार आहेत हे त्याला समजत नाही. आधम जातीच्या लोकांमध्ये असे वाईट म्हणजे उग्रगुणच असतात त्यांना अधोगती ला जाण्यासाठी एक घडीदेखील लागत नाही. एखादे कुत्रे आपल्या स्वामीच्या सत्तेमुळे एखाद्या दरिद्री माणसाच्या झोळीचा वास घेते परंतु त्याला रागाने त्या दरिद्री माणसाने हाकलून दिले तर ते तेथून लगेच जाते. तुकाराम महाराज म्हणतात यामुळेच मी लोकांना सांगत आहे की अधम जातीच्या लोकांना केव्हाही चांगला उपदेश करू नये केवळ आपण शांत राहावे.

अभंग क्र. २२१०
डोळ्यामध्ये जैसे कणु । अणु तेहि न समाये ॥१॥
तैसे शुद्ध करा हित । नका चित्त बाटवू ॥धृपद॥
आपल्याचा कळवळा । आणिका बाळावरी न ये ॥२॥
तुका म्हणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥३॥
अर्थ
डोळ्यामध्ये धुळेचा एक बारीक कण देखील सहन होत नाही. त्याप्रमाणे आपले हीत होण्यासाठी आपले चित्त शुद्ध करा आणि पापाच्या थोड्या देखील विटाळाने आपले चित्त बाटवू नका. आपला जसा आपल्या बालकांवर प्रीतीचा पान्हा असतो तसा इतर बालकांवर नसतो, म्हणजेच असेही आपण करू नये. तुकाराम महाराज म्हणतात शेतकरी जसा पुढे आपल्याला चांगले पीक मिळावे यासाठी बीज सुरक्षित जपून ठेवतो त्याप्रमाणे पुढे आपले अनहित होऊ नये म्हणून आपले चित्त शुद्ध ठेवावे.

अभंग क्र. २२११
मुखी नाम हाती मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥१॥
वैष्णवाचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥धृपद॥
भस्म दंड न लगे काठी । तीर्था आटी भ्रमण ॥२॥
तुका म्हणे आडकाठी । नाही भेटी देवाचे ॥३॥
अर्थ
मुखाने नाम श्रद्धा आणि प्रेम युक्त भावनेने घेतले तर हातात मोक्ष लगेच प्राप्त होतो अशी साक्ष यापूर्वीच्या खूप संतांची आहे. वैष्णवाचा हरिनाम रुपी माल हा खरा आहे आणि तो घेण्यासाठी अनेक भक्तगण त्वरा करत असतात. मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी हातात दंड अंगाला भस्म किंवा हातात काठी घेऊन तीर्थयात्रा भ्रमण करण्याची गरज लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाची भेट होण्यासाठी केवळ एक हरिनाम घेणेच चांगले त्याने कोणतीही आडकाठी मध्ये येत नाही.

अभंग क्र. २२१२
आगी लागो तया सुखा । जेणे हरी नये मुखा ॥१॥
मज होत का विपित्त । पांडुरंग राहो चित्ती ॥धृपद॥
जळो ते समूळ । धन संपित्त उत्तम कुळ ॥२॥
तुका म्हणे देवा । जेणे घडे तुझी सेवा ॥३॥
अर्थ
अशा सुखाला आग लागो की ज्या सुखा मुळे हरिनाम मुखात येत नाही. माझ्यावर कितीही विपत्ती आली तरी चालेल पण माझ्या चित्तात पांडुरंग रहावे. संपत्ती धन आणि उत्तम कुळ जळून जावो जर हरिनामच मुखात येत नसेल तर. तुकाराम महाराज म्हणतात देवा जेणेकरून मला तुझी सेवा घडेल अशीच स्थिती मला प्राप्त होवो.

अभंग क्र. २२१३
आता न म्हणे मी माझे । नेघें भार काही ओझे ॥१॥
तू चि तारिता मारिता । कळो आलासी निरुता ॥धृपद॥
अवघा तू चि जनार्दन । संत बोलती वचन ॥२॥
तुका म्हणे काही । माझे तिळभरी नाही ॥३॥
अर्थ
देवा यापुढे मी माझ्या देहाला मी आणि देहासंबंधी कोणालाही माझे म्हणणार नाही आणि असे म्हणून नसते कोणतेच भार मी माथ्यावर घेणार नाही. कारण देवा तूच मला तारणारा आहेस व तूच मला मारणारा आहेस हे मला चांगले समजले आहे. तूच जनार्धन आहेस असे संत त्यांच्या वचनाने बोलत असतात. तुकाराम महाराज म्हणतात या जगतामध्ये माझे तीळ भर ही काहीच नाही असेच मी म्हणणार आहे.

अभंग क्र. २२१४
समुद्रवळयांकित पृथ्वीचे दान । करिता समान न ये नामा ॥१॥
म्हणऊनि कोणी न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥धृपद॥
सकळ ही शास्त्रे पठण करता वेद । सरी नये गोविंदनाम एके ॥२॥
सकळ ही तीर्थे प्रयागादी काशी । करिता नामाशी तुळेति ना ॥३॥
कर्वती कर्मरी देहासी दंडण । करिता समान नये नामा ॥४॥
तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हे चि सार विठोबाचे ॥५॥
अर्थ
एखाद्याने समुद्राला वलायांकित करून पृथ्वीचे दान जरी केले तरी त्याची तुलना नामाशी होऊ शकत नाही. म्हणून कोणीही आळस न करता रात्रंदिवस राम राम या नामाचा जप करत राहावे. सर्व वेदशास्त्र पठण केले तरीदेखील त्याला गोविंदाच्या एका नामाची सर येत नाही. सर्वतीर्थ प्रयाग काशी इत्यादी केले तरी त्याची तुलना नामाशी करता येत नाही. कर्माने देहाला दंड जरी दिला तरी त्याची तुलना नामाशी होऊ शकत नाही. सर्व साराचे हे सार म्हणजे विठोबाचे नाम आहे असे वेदपठण करणाऱ्या श्रेष्ठांचा आचार आहे त्यामुळे सर्व साधनाचे सार हे विठोबाचे नामच आहे हे सिद्ध होते.

अभंग क्र. २२१५
अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळी न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा ॥१॥
भक्तीपंथ बहु सोपा पुण्य नागवेया पापा । येणे जाणे खेपा येणे चि एके खंडती॥धृपद॥
उभारोनि बाहे । विठो पालवीत आहे । दासा मी चि साहे मुखे बोले आपुल्या ॥२॥
भाविक विश्वासी पार उतरिले त्यासी । तुका म्हणे नासी कुतऱ्याचे कपाळी ॥३॥
अर्थ
कलियुगामध्ये परमार्थ करण्यासाठी सर्व वाटा क्षीण झाल्या असून कोणत्याही साधनाने परमार्थ घडत नाही. उचित विधिविधान हे कळत नाही आणि कोणत्याही प्रकारे घडत नाही. केवळ एक भक्ती पंथ परमार्थ करण्यासाठी खूप सोपा आहे ते पुण्याला प्रोत्साहन देऊन पापाची निवृत्ती करीत असते. आणि केवळ याच भक्ती पंथाने आपल्या जन्ममरणाच्या खेपा खंडित होतात. विठोबा आपले दोन्ही हात वर करून भक्तांना आपल्याजवळ बोलवत आहे. आणि माझ्या शरण आलेल्या दासांचे सर्वकाही मी सहन करतो असे तो स्वतः च्या मुखाने बोलत आहे. तुकाराम महाराज म्हणतात जे भाविक हरी वर विश्वास ठेवतात त्या भाविकांना हरीने या भवसागरातून पार उतरविले आहेत. परंतु कुर्तक्याच्या नशिबामध्ये नाशच आहे.

अभंग क्र. २२१६
आह्मी नामाचे धारक नेणो प्रकार आणीक । सर्व भावे एक विठ्ठल चि प्रमाण ॥१॥
न लगे जाणावे नेणावे गावे आनंदे नाचावे । प्रेमसुख घ्यावे वैष्णवाचे संगती ॥धृपद॥
भावबळे घालू कास लज्जा चिंता दवडू आस । पायी निजध्यास म्हणो दास विष्णूचे ॥२॥
भय नाही जन्म घेता मोक्षसुखा हाणो लाता । तुका म्हणे सत्ता धरू निकट सेवेची ॥३॥
अर्थ
आम्ही नामाचे धारक आहोत नामा वाचून इतर कोणताही प्रकार आम्हाला माहीत नाहीत. आणि एक विठ्ठलच आम्हाला सर्व भावे प्रमाण होत आहे. या देवाला जाणण्याची नेणण्याची काहीच गरज पडत नाही केवळ त्याच्या छंदामध्ये आनंदात नाचावे व त्याचे गुणगात राहावे. फक्त वैष्णवांच्या संगतीमध्ये प्रेम सुख घेत राहावे. हरी विषयी भक्तिभावाची बळकट कास घालू आणि लाज चिंता इच्छा याला आम्ही तोडून टाकु. या हरीचे चरण आम्ही नित्य स्मरणात ठेऊ आणि स्वतःला विष्णुचे दास म्हणून घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात जन्म घेण्या विषय आम्हाला भय किंचितही वाटत नाही याउलट आणि मोक्षाला सुखाने लाथा मारू. आणि आम्ही आमच्या सत्तेने हरिच्या निकट आम्ही राहून त्याची सेवा करत राहू.

अभंग क्र. २२१७
आम्ही हरीचे सवंगडे जुने ठायीचे वेडे बागडे । हाती धरुनी कडे पाठीसवे वागविलो ॥१॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही । नाही जालो कही । एका एक वेगळे ॥धृपद॥
निद्रा करिता होतो पायी । सवे चि लंका घेतली तई । वान्नरे गोवळ गाई । सवे चारित फिरतसो ॥२॥
आम्हा नामाचे चिंतन । राम कृष्ण नारायण । तुका म्हणे क्षण खाता जेविता न विसंबो ॥३॥
अर्थ
आम्ही हरीचे वेडेबागळे अगदी जवळचे जुने सवंगडी आहोत. आम्ही एकमेकांना कधी हाताला धरून कधी कडेवर तर कधी पाठीवर वागविले आहे. म्हणूनच देव आणि आम्ही वेगवेगळे नाही तर आम्ही एकच आहोत एवढेच नाही तर आम्ही देहाने देखील एकच आहोत. आम्ही केव्हाही वेगवेगळे झालोच नाहीत. क्षीरसागरामध्ये हा हरी निद्रा करत असताना आम्ही त्याच्या पायाजवळ शेष आणि गरुड रुपाने होतो आणि राम रुपात असताना भगवान रामाबरोबरच राहून आम्ही लंका ही ताब्यात घेतली होती. त्यावेळी आम्ही वानार रूपात होतो आणि गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण बरोबर आम्ही गोपाळ रूपाने भगवंता बरोबर गाई चारत फिरत होतो. तुकाराम महाराज म्हणतात यामुळेच आम्ही राम कृष्ण नारायण या नामाचे चिंतन करत असतो. त्यामुळेच आम्ही हरीला खाताना जेवताना एक क्षण भर देखील विसरत नाहीत.

अभंग क्र. २२१८
मागे बहुता जन्मी हेचि करित आलो आम्ही । भवतापश्रमी दुःखे पीडिली निववू त्या ॥१॥
गर्जो हरीचे पवाडे मिळो वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये ॥धृपद॥
भाव शुद्ध नामावळी हर्षे नाचो पिटू टाळी । घालू पाया तळी । कळीकाळ त्याबळे ॥२॥
कामक्रोध बंदीखाणी तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचे धणी आम्ही जालो गोसावी ॥३॥
अर्थ
आम्ही मागे खूप जन्म घेतले आणि त्याच्या तही, जे या भवसागराच्या तापाने तप्त दुःखी-कष्टी श्रमी झालेत त्यांना आम्ही सुखी केले व पुढे हेच करत आलो आहोत. भोळे भाबडे वैष्णव गोळा करून हरी नामाचे पवाडे गर्जून सांगण्यचे काम केले. आणि जे पाशन हृदयाचे माणसे असतील त्यांच्या देखील हृदयातून आम्ही भक्तीचा पाजर काढू. शुद्ध भक्तिभाव याच्या जोरावर हरीचे नामावळी गाऊ त्या छंदात नाचू आणि टाळी वाजू. याच बळावर आम्ही त्या कळीकाळाला आमच्या पायाच्या तळाला घालू. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काम क्रोधाला बंदिखान्यात टाकले आहे. आणि आम्ही इंद्रियाचे धनी (गोसावी) झालो आहोत.

अभंग क्र. २२१९
अमर तू खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥१॥
चाल जाऊ संतांपुढे । वाद सांगेन निवाडे ॥धृपद॥
तुज नांव जरी नाही । तरी माझे दाव काई ॥२॥
तुज रूप जरी नाही । तरी माझे दाव काई ॥३॥
खेळसी तू लीळा । तेथे मी काय वेगळा ॥४॥
साच तू लटिका । तैसा मी ही म्हणे तुका ॥५॥
अर्थ
हे दातारा तु अमर आहे ही गोष्ट तर खरीच आहे परंतु मी ही तुझ्याप्रमाणे अमर कसा नाही ते मला सांग ? मीहि तुझ्या साराखच अमर आहे. मी अमर नाही असे जर तुझे म्हणणे असेल तर चल आपण दोघेही संता पुढे जाऊ आणि त्यांच्यापुढे आपला वाद मांडू मग ते आपल्या वादाचा निवाडा करतील. तुला जर नांव नाही तर मला तरी कुठे आहे ते दाखव ? जर तुला रुप नाही तर माझे खरे स्वरूप कोणते आहे ते मला दाखव ? देवा अरे तु अनेक अवतार घेतलेस अनेक अवतारा मध्ये वेगवेगळ्या लीला केल्यास त्यावेळी तुझ्याबरोबर मी ही होतो बरे, वानर, गोपाळ, सेवक या रूपाने मी ही तुझ्या बरोबरच होतो मग तेथे तु आणि मी वेगळा आहोत काय ? तुकाराम महाराज म्हणतात देवा तु जर खरा व खोटा दोन्ही आहेस तर मी ही तुझ्याप्रमाणेच आहे.

अभंग क्र. २२२०
मंत्र चळ पिसे लागते सत्वर । अबद्ध ते फार तरले नामे ॥१॥
आशौच तो बाधी आणिका अक्षरा । नाम निदसुरा घेता तरे ॥धृपद॥
रागज्ञानघात चुकता होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक ॥२॥
आणिका भजना बोलिला निषेध । नाम ते अभेद सकळा मुखी ॥३॥
तुका म्हणे तपे घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामे ॥४॥
अर्थ
वेदाचे मंत्र उच्चारतांना चुकले तर वेड लागते परंतु नाम कसेही घेतले ते चुकले तरीही माणसे तरतात यामागे अनेक पापी तरलेहि आहेत. अशुद्ध स्थितीत वेदमंत्र उच्चारता येत नाही त्यांना बाधा असते परंतु नाम हे झोपेत असताना देखील उच्चारले, घेतले तरी घेणारा तरतो. गायना मध्ये रागाचे ज्ञान नसेल किंवा गायन करताना चुकले तर वेळप्रसंगी त्याचा घात ही होतो परंतु नाम केव्हाही घेतले तरी ते सर्वकाळ शुभदायकच असते. भक्तीमध्ये अनेक प्रकार आहेत व अनेक प्रकारांमध्ये वेगवेगळे प्रकारचे नियम विधिनिषेधने घातलेले आहेत परंतु नाम घेताना कोणत्याही प्रकारचा नियम नाही ते कधीही, कोणीही, केव्हाही घेतले तरी पुण्यच होते. तुकाराम महाराज म्हणतात तप अनुष्ठान इत्यादी कर्म करताना चूक झाली तर घात ही होण्याची दाट शक्यता असते परंतु नाम घेताना कोणत्याही प्रकारची अडचण नसते नाम घेतल्यावर वैशा देखील तरुण जातात यामागे गणिका नावाची वैशा केवळ अंतकाळी राघोबा असे नांव घेतल्याने तरुन गेली आहे.

जुलै नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 895

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading