
२९ जुलै, दिवस २१० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ११२६ ते ११५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २५०९ ते २५२०
“२९ जुलै” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan २९ July
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २९ जुलै असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २५०९ ते २५२० चे पारायण आपण करणार आहोत.
२९ जुलै, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ११२६ ते ११५०,
1126-13
अपाडु नभा आभाळा । रवि आणि मृगजळा । तैसाचि हाही डोळा । देखावा पै ॥1126॥
आकाश व ढग यात जो भेद आहे, अथवा सूर्य व मृगजळ यात जो भेद आहे, तितकाच हाही (देह व आत्मा यातील) भेद जर तू विवेकाच्या डोळ्याने पहाशील.
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः ।
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥13. 33॥
श्लोकार्थ -::- हे अर्जुना, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व ब्रम्हांडाला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे एकटा आत्मा सर्व क्षेत्रांना (देहांना) एकटा क्षेत्रज्ञ प्रकाशित करतो.
1127-13
हे आघवेचि असो एकु । गगनौनि जैसा अर्कु । प्रगटवी लोकु । नांवे नांवे ॥1127॥
ह्या सर्व उपमा राहू दे. आता मी एक गोष्ट सांगतो. ती अशी की आकाशातून जसा एकटाच सूर्य वेळोवेळी (दररोज) सर्व त्रैलोक्य प्रकाशमय करतो.
1128-13
एथ क्षेत्रज्ञु तो ऐसा । प्रकाशकु क्षेत्राभासा । यावरुते हे न पुसा । शंका नेघा ॥1128॥
त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला (प्रतीतीला) प्रकाशक आहे. यानंतर आत्मा व देह या संबंधाने काही विचारू नका व शंका घेऊ नका.
क्षेत्रक्षेत्रज्त्रयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा ।
भूतप्रकृतिमोक्षं च विदुर्यान्ति ते परम् ॥13. 34॥
श्लोकार्थ -: :- याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे अंतर आणि भूतांच्या रूपाने असणार्या प्रकृतीचा मोक्ष (म्हणजे तिचे मिथ्यात्व अथवा अनात्मत्व) जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते महात्मे परब्रम्ह परमात्म्याला प्राप्त होतात.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नाम त्रयोदशोऽध्यायः ॥13॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा हा तेरावा अध्याय समाप्त झाला. ॥13॥
1129-13
शब्दतत्त्वसारज्ञा । पै देखणे तेचि प्रज्ञा । जे क्षेत्रक्षेत्रज्ञा । अपाडु देखे ॥1129॥
हे शब्दांच्या खर्या खर्या स्वरूपाचे मर्म जाणणार्या अर्जुना, तीच बुद्धी डोळस, की जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील अंतर जाणते.
1130-13
इया दोहीचे अंतर । देखावया चतुर । ज्ञानियांचे द्वार । आराधिती ॥1130॥
क्षेञ व क्षेञज्ञ या दोन्हीतील अंतर समजण्याकरता चतुर मुमुक्षू पुरुष ज्ञानी पुरुषांची द्वारी जाऊन त्यांची सेवा करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1131-13
याचिलागी सुमती । जोडिती शांतिसंपत्ती । शास्त्रांची दुभती । पोषिती घरी ॥1131॥
हे समजण्याकरता ते शांतीरुप संपत्ति स्वाधीन करुन घेऊन शास्ञाच्या दुभत्या गायी घरी पोसन्याचे काम करतात. म्हणजेच शास्राचे मनन, चिंतन आणि अध्ययन करतात.
1132-13
योगाचिया आकाशा । वळघिजे येवढा धिंवसा । याचियाचि आशा । पुरुषासि गा ॥1132॥
जे साधक हे समजन्याकरिताच अष्टांग योगरुप आकाश चढुन जाण्याची इच्छा मनात धरतात.
1133-13
शरीरादि समस्त । मनिताति तृणवत । जीवे संतांचे होत । वाहणधरु ॥1133॥
शरीरादि सर्व गोष्टी गवताप्रमाने तुच्छ मानतात व जीवाभावापासून संतांचे जोडे आपल्या मस्तकावर धारण करतात.
1134-13
ऐसैसिया परी । ज्ञानाचिया भरोवरी । करूनिया अंतरी । निरुते होती ॥1134॥
अशा प्रकारच्या ज्ञान आत्मसात करण्याकरता वेगवेगळे प्रयत्न करुन ते ज्ञान मिळवतात. आणि त्यायोगे अंतःकरणात निश्चिंत होतात.
1135-13
मग क्षेत्रक्षेत्रज्ञाचे । जे अंतर देखती साचे । ज्ञाने उन्मेख तयांचे । वोवाळू आम्ही ॥1135॥
देह आणि आत्मा यामधिल अंतर जे खरोखर पाहतात. त्यांच्या ज्ञानावरुन आम्ही आमचे ज्ञान ओवाळुन टाकु.
1136-13
आणि महाभूतादिकी । प्रभेदली अनेकी । पसरलीसे लटिकी । प्रकृति जे हे ॥1136॥
पंचमहाभूतादि अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही मिथ्याप्रकृती पसरली आहे.
1136-13
जे शुकनळिकान्याये । न लगती लागली आहे । हे जैसे तैसे होये । ठाउवे जया ॥1137॥
ज्याप्रमाने एखादा पोपट नळीवर येऊन बसतो तेव्हा त्या नळीच्या संयोगाने वास्तविक पाहता बद्ध न होता. तो आपल्या कल्पनेनेच बद्ध होतो, त्याप्रमाने ही प्रकृतीक्षेञज्ञ पुरुषाला न चिकटताच चिकटलेली आहे असे जानवते.
1138-13
जैसी माळा ते माळा । ऐसीचि देखिजे डोळा । सर्पबुद्धि टवाळा । उखी होउनी ॥1138॥
ज्याप्रमाणे (माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पासंबंधी) मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पहातो.
1139-13
का शुक्ति ते शुक्ती । हे साच होय प्रतीती । रुपयाची भ्रांती । जाऊनिया ॥1139॥
प्रखर अशा उजेडात दुरवर पडलेले शिंपले आणि त्यावर मिथ्या रुपयाचे ज्ञान होते. पण बारीक विचाराने रुप्याची भ्रांती जाऊन शिंपले हे शिंपलेच आहे असे खरे ज्ञान प्राप्त होते.
1140-13
तैसी वेगळी वेगळेपणे । प्रकृति जे अंतःकरणे । देखती ते मी म्हणे । ब्रह्म होती ॥1140॥
त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती तिला वेगळेपणाने अंत:करणाने जे पहातात ते ब्रम्हरुप होतात, असे श्रीकृष्ण स्वःता म्हणतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1141-13
जे आकाशाहूनि वाड । जे अव्यक्ताची पैल कड । जे भेटलिया अपाडा पाड । पडो नेदी ॥1141॥
जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे, जे ब्रह्म प्रकृतीरूप नदीच्या पलीकडला काठ आहे व जे ब्रह्म प्राप्त झाले असता साम्यासाम्य उरू देत नाही.
1142-13
आकारु जेथ सरे । जीवत्व जेथे विरे । द्वैत जेथ नुरे । अद्वय जे ॥1142॥
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही असे जे एकाकी आहे,
1143-13
ते परम तत्त्व पार्था । होती ते सर्वथा । जे आत्मानात्मव्यवस्था- ! राजहंसु ॥1143॥
अर्जुना असे जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष अनात्मा व आत्मा यास विचाराने वेगळे जाणण्यात राजहंस असतात ते पूर्णपणे होतात.
1144-13
ऐसा हा जी आघवा । श्रीकृष्णे तया पांडवा । उगाणा दिधला जीवा । जीवाचिया ॥1144॥
श्रीकृष्ण व अर्जुन
(संजय धृतराष्ट्रास म्हणतो) महाराज, श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्यास हा असा प्रकृती-पुरुष-विचाराचा सर्व हिशोब दिला.
1145-13
येर कलशीचे येरी । रिचविजे जयापरी । आपणपे तया श्रीहरी । दिधले तैसे ॥1145॥
ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसर्या घागरीत ओतावे, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी आपल्या स्वत:ला (आपल्या बोधाला) त्या अर्जुनाला दिले. (आपल्या आत असणारा सर्व बोध अर्जुनाच्या आत ओतला).
1146-13
आणि कोणा देता कोण । तो नर तैसा नारायण । वरी अर्जुनाते श्रीकृष्ण । हा मी म्हणे ॥1146॥
आणि कोण कोणाला देणारा आहे ? कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूचेच अंश होत. याशिवाय अर्जुनाला हा (अर्जुन) मी (श्रीकृष्ण) आहे असे, श्रीकृष्ण म्हणालेही.
1147-13
परी असो ते नाथिले । न पुसता का मी बोले । किंबहुना दिधले । सर्वस्व देवे ॥1147॥
परंतु संबंध नसलेले बोलणे राहू द्या. कोणी विचारले नसता मी का बोलत आहे ? फार काय सांगावे ? श्रीकृष्णांनी आपले सर्वस्व अर्जुनाला दिले.
1148-13
की तो पार्थु जी मनी । अझुनी तृप्ती न मनी । अधिकाधिक उतान्ही । वाढवीतु असे ॥1148॥
(अर्जुनाचे श्रवण) तथापि तो अर्जुन मनामधे अजून तृप्ती मानीत नव्हता, तर उलट अधिकाधिकच ज्ञानश्रवणाची इच्छा वाढवीत होता.
1149-13
स्नेहाचिया भरोवरी । आंबुथिला दीपु घे थोरी । चाड अर्जुना अंतरी । परिसता तैसी ॥1149॥
भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी अधिक वाढलेली इच्छा झाली.
1150-13
तेथ सुगरिणी आणि उदारे । रसज्ञ आणि जेवणारे । मिळती मग अवतरे । हातु जैसा ॥1150॥
जेथे उत्तम स्वयंपाकीण असून तीच उदार वाढणारीही आहे व रसमर्मज्ञ असे जेवणारे भोक्तेही मिळाले आहेत तेथे मग जेवण्यास व वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २१० वा. २९, जुलै
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २५०९ ते २५२०
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २५०९
पुंडलीक भक्तराज । तेणे साधियेले काज । वैकुंठीचे निज । परब्रम्ह आणिले ॥१॥
पांडुरंग बाळमूर्ती । गाईगोपाळा सांगती । येऊनिया प्रीति । उभे समचि राहिले ॥धृपद॥
एका आगळे अक्षर । वैकुंठचि दुसरे । म्हणविती येरे । परि ती ऐसी नव्हेती ॥२॥
पाप पंचक्रोशीमधी । येऊ न सकेचिना आधी । कैची तेथे विधि । निषेधाची वसति ॥३॥
पुराणे वदती ऐसे । चतुर्भुज ती मानसे । सुदर्शनावरी वसे । न बुडे हे कल्पांती ॥४॥
अनुपम्य इची थोरी । महाक्षेत्र महीवरी । धन्य धन्य वारकरी । तुका म्हणे तेथीचे ॥५॥
अर्थ
पुंडलिक हा भक्तांचा राजा असून त्यांने फार मोठे कार्य साध्य केले आहे. ते म्हणजे असे की वैकुंठात राहणारे परब्रम्ह पंढरीत त्याने आणले आहेत. पांडुरंग बाळमूर्तीत गायी गोपाळांबरोबर होता, तेच परब्रम्ह पुंडलिकाच्या प्रेमा करता आपले दोन्ही चरण विटेवर सारखे ठेवून उभे राहिले आहे. हे पंढरी क्षेत्र म्हणजे वैकुंठा पेक्षा एका अक्षराने अधिक असून भूवैकुंठच आहे. इतरही अनेक स्थाने आहेत की ज्यांना तीर्थक्षेत्र असे म्हटले जाते परंतु पंढरी सारखे तीर्थक्षेत्र दुसरे नाहीच. पंढरी क्षेत्राच्या पंचक्रोशीत देखील पाप कधीच येऊ शकत नाही. मग तेथे विधिनिषेधाची वस्ती कशी असेल ? पुराण असे सांगते की पंढरीतील माणसे चतुर्भुज आहेत. पंढरी हे क्षेत्र भगवान विष्णूच्या सुदर्शनावर वसलेले क्षेत्र आहे त्यामुळे कल्पाच्या अंती देखील ते कधीच बुडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात ही पंढरी पृथ्वीवरील महाक्षेत्र आहे तिची थोरवी अनुपम्य आहे. मग तेथे जाणारी जे वारकरी आहेत ते धन्य धन्य आहेत.
अभंग क्र. २५१०
देह मृत्याचे भातुके । कळो आले कवतुके ॥१॥
काय मानियेले सार । हेचि वाटते आश्चर्य ॥धृपद॥
नानाभोगांची संचिते । करूनि ठेविले आइते ॥२॥
तुका म्हणे कोडी । उगवून न सकती बापुडी ॥३॥
अर्थ
देह मृत्यूचे खाद्य आहे हे आता कळून चुकले आहे. तरीदेखील संसाराला सर्वकाही आणि संसारच सत्य आहे हे अज्ञानी लोक मानतात याचे मला आश्चर्य वाटत आहे. शरीराला विविध प्रकारचे संचित कर्माचे भोग भोगण्याचे आयते साधना करून ठेवलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात परंतु हे भाबडे लोक असल्या प्रकारचे कोडे उलगडूच शकत नाही.
अभंग क्र. २५११
त्यागे भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करू ॥१॥
आता असो तुझे पायी हे मोटळे । इंद्रिये सकळे काया मन ॥धृपद॥
सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळता भाव जाइल वाया ॥२॥
तुका म्हणे आता नको उजगरा । लपवी दातारा अंगी मज ॥३॥
अर्थ
मी जर विषयांचा त्याग केला तर कालांतराने ते वैषयीक सुख पुन्हा माझ्या अंतःकरणात येईल त्यावेळी हे दातारा मी काय करू ? त्यापेक्षा हे दातारा आता माझे सगळे इंद्रिय काया-वाचा-मन याचे गाठोडे तुझ्या पायाजवळ असू द्यावे. काय घ्यावे, काय नाही घ्यावे, विधिनिषेध कशाला म्हणतात हे जर समजून नाही घेतले तर माझा भक्ती भाव वायाला जाईल. तुकाराम महाराज म्हणतात हे दातारा आता मला लौकिकाची हाव राहिली नाही कुणी मला मान सन्मान द्यावा याची हाव राहिली नाही याविषयी माझी इच्छा राहिली नाही त्यामुळे तु मला आता तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लपून टाक.
अभंग क्र. २५१२
दावूनिया मांड । पुरे न करीती भांड ॥१॥
जळो जळो तैसे जिणे । फटमरे लाजिरवाणे ॥धृपद॥
घेतले ते सोंग । बरवे संपादावे सांग ॥२॥
तुका म्हणे धीरे । देव नुपेक्षील खरे ॥३॥
अर्थ
अनेक भांडखोर लोक आहे की, जे सुरुवातीला परमार्थाचे खूप उत्तम सोंग दाखवितात परंतु ते परमार्थ पूर्ण करीत नाहीत. त्यांच्या जगण्याला आग लागो त्यांचे जगणे म्हणजे फटंगर लाजिरवाणे आहे. जे सोंग आपण घेतले ते सोंग यथा सांग पूर्ण व चांगले संपादन करावे. तुकाराम महाराज म्हणतात जो परमार्थामध्ये खरे धैर्य टिकून राहतो त्याची उपेक्षा देव खऱ्या अर्थाने कधीही करत नाही.
अभंग क्र. २५१३
न पालटे जाती जीवाचिये साठी । वाहे तेचि पोटी दावी वरी ॥१॥
अंतरी सबाही सारिखाचि रंग । वीट आणि भंग नाही रसा ॥धृपद॥
घणाचिया घाये पोटी शिरे हिरा । सांडू नेणे धीरा आपुलिया ॥२॥
तुका म्हणे कढे करावी शीतळ । ऐसे जातिबळ चंदनाचे ॥३॥
अर्थ
जे खरे जातिवंत लोक असतात चांगल्या गुणानी युक्त जे असतात ते कधीही आपल्या शब्दावर पलटत नाहीत जे त्यांच्या अंतकरणात असते तेच ते वरही दाखवीत असतात. अशा माणसांच्या आत आणि बाहेर एकच रंग असतो त्यांचा तो चांगला रंग कधीही विटत नाही आणि भंगतही नाही. हिरा कितीही घणाचा घाव बसला तरी एक वेळेस ऐरणेत शिरतो परंतु आपला जो रंग आहे गुण आहे म्हणजे न भंगण्याचा तो कधीही सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात कितीही कढलेले उकळलेले तेल असो परंतु चंदन ही जात अशी असते की ते उकळलेल्या तेलाला देखील शीतळ करते असे बळ चंदना मध्ये असते.
अभंग क्र. २५१४
दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आले त्यासी जतन जीवे ॥१॥
समर्थासी असे विचाराची आण । भली पापपुण्य विचारावे ॥धृपद॥
काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडिले अंतर न पाहिजे ॥२॥
तुका म्हणे यश कीर्ती आणि मान । करिता जतन देव जोडे ॥३॥
अर्थ
शरण आलेल्या शत्रूने मान जरी कापण्यास दिले तरी राजाने ती कापू नये कारण शरण आलेल्या जीवाचे रक्षण आपल्या जीवावर उदार होऊन देखील करावे लागते. कारण समर्थ राजाला कोणतेही कार्य करताना विचार करण्याची शपथ घ्यावी लागते आणि चांगल्या माणसांना कोणतेही कार्य करताना पाप-पुण्याचा विचार करावा लागतो. कोणी पापी माणूस आपल्याला काकुळतीला जरी आला तरी त्याच्यासाठी सत्याचा विसर पडू देऊ नये योग्य तो निर्णय घ्यावा आणि तो आपल्याला शरण आला आहे त्याला देखील योग्य तो न्याय मिळावा यात देखील अंतर पडू देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात योग्य रीतीनेच कीर्ती आणि मान मिळावे संपादन करावे व त्याचे रक्षण करावे त्या योगानेच त्या समर्थ व्यक्तीला देवाची प्राप्ती होते.
अभंग क्र. २५१५
विचारिले आधी आपुल्या मानसी । वांचो येथे कैसी कोण्या द्वारे ॥१॥
तव जाला साह्य हृदयनिवासी । बुद्धी दिली ऐसी नास नाही ॥धृपद॥
उद्वेगाचे होतो पडिलो समुद्री । कोण रीती तीरी पाविजेल ॥२॥
तुका म्हणे दुःखे आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥३॥
अर्थ
या संसारांमधून तरून जाण्यासाठी कोणत्या उपायाने कोणता उपाय करावा लागेल याचा विचार आम्ही प्रथमच आमच्या मनात केला आहे. त्यावेळी आम्हाला आमच्या हृदही निवासी असलेला देव साह्य झाला आणि त्याने आम्हाला अविनाशी अशी आत्मबुध्दी दिली. आम्ही इतके दिवस संसार समुद्राच्या दुखात पडलो होतो हा संसार समुद्र कसा तरुन जावा या विषयी आम्ही विचार करीत होतो तुकाराम महाराज म्हणतात माझे आता पर्यंतचे आयुष्य संसार दुःखाने खूप दुःखी झाले होते त्यामुळे माझा जीव कासावीस झाला होता.
अभंग क्र. २५१६
आपुले वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे तो हा जीव हीनबुद्धी ॥१॥
विषयांच्या संगे आयुष्याचा नास । पडियेले ओस स्वहितांचे ॥धृपद॥
भुलल्यांचे अंग आपणा पारिखे । छंदाच सारिखे वर्ततसे ॥२॥
तुका म्हणे दुःख उमटे परिणामी । लंपटासी कामी रतलिया ॥३॥
अर्थ
मूर्ख मनुष्य आपला वेळ आणि पैसा खर्च करून दुःखाच्या खोड्यात आपला पाय घालतो असा हा हिन बुद्धीचा जीव आहे. विषयाच्या संगतीत राहून आयुष्याचा नाश करून घेतो आणि स्वहिताच्या बाबतीत तो ओस राहिलेला असतो. विषयामध्ये भुललेले शरीर हे त्या विषया सारखेच वर्तन करत असते त्याला देहाची देखील शुद्ध राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात विषय लंपट असलेल्या मनुष्याला आणि कामवासनेत रत झालेल्या मनुष्याला परिणामी दुःखच भोगावे लागते.
अभंग क्र. २५१७
केले शकुने प्रयाण । आता मागे फिरे कोण ॥१॥
होय तैसे हो आता । देह बळी काय चिंता ॥धृपद॥
पडिले पालवी । त्याचा धाक वाहे जीवी ॥२॥
तुका म्हणे जीणे । देवा काय हीनपणे ॥३॥
अर्थ
आम्ही देवाकडे शुभ शकून पाहूनच पलायण केले आहे त्यामुळे आता मागे कोण फिरतो आहे ? देवाला देहचं बळी दिला आहे त्यामुळे जसे होईल तसे होवो त्याची काय चिंता करायची ? आपल्याजवळ जर काही धन असले तरी त्याच्या विषय भिती जीवाला असते. तुकाराम महाराज म्हणतात देवाशिवाय हिन पणाने जगणे म्हणजे काय जगणे आहे काय ?
अभंग क्र. २५१८
आळणी ऐसे कळो आले । त्यासी भले मौनचि ॥१॥
नये काही वेचू वाणी । वेडे घाणी सांगाते ॥धृपद॥
वेगळे ते देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥२॥
तुका म्हणे कवतुक केले । किंवा भले दवडिता ॥३॥
अर्थ
आपल्याला वाढलेल्या पदार्थांमध्ये मीठ नाही ते आळणी झाले आहे असे आपल्याला समजले तर काही न बोलता मौन धारण करणे हे चांगले आहे. त्या स्वयंपाक करणाऱ्या वेड्या माणसाशी काही बोलून आपली वाणी खर्च करू नये. ज्यांना देहभावच राहिलेला नाही त्यांना कोणताही पदार्थ समोर आला तरी त्याची चव कळत नाही आणि ज्यांचा देहाभिमान जागृत असतो त्यांना हा पदार्थ चविष्ट नाही बेचव आहे असा भ्रम निर्माण होतो व तोच त्यांना माजीर पणा आणतो. तुकाराम महाराज म्हणतात स्वयंपाक कसाही असो तो जो कोणी करेल त्याचे कौतुक तरी करावे, जर स्वयंपाक आपल्याला आवडला नाही तर त्याला बाहेर तरी घालून द्यावे परंतु त्याला एकही शब्दांनी बोलू नये व आपली वाणी व्यर्थ खर्च करू नये.
अभंग क्र. २५१९
चित्ताचा चाळक । त्याचे उभय सूत्र एक ॥१॥
नाचवितो नानाछंदे । सुखे आपुल्या विनोदे ॥धृपद॥
चंद्र कमळणी । नाही धाडीत सांगोनि ॥२॥
तुका म्हणे उठी । लोह चुंबकाचे दृष्टी ॥३॥
अर्थ
चित्ताचा व जीवाचा चालक एक ईश्वर आहे व या दोन्हीचेही सूत्र त्याच्याच हातात आहे. तो आपल्या विनोदाने जीवन विविध प्रकारच्या छंदात सुखाने नाचवतो व जीवही त्या छंदात नाचत असतात. चंद्र विकसित कमले यांना चंद्र मी उगवतो आहे तुम्ही उमलण्यासाठी तयार राहा सज्ज राहा असे सांगत नाही किंवा असा निरोप देत नाही तर चंद्रोदय झाल्याझाल्या ते कमळ उमलते. तुकाराम महाराज म्हणतात चुंबक दृष्टीस पडल्या बरोबर लोखंड उभे राहते त्याप्रमाणेच ईश्वराच्या अधीन जीव आहेत व त्यांचे व्यवहारही आहेत.
अभंग क्र. २५२०
करिता ताडातोडी । वत्सा माते सोई ओढी ॥१॥
करित्याचा आग्रह उरे । एक एकासाठी झुरे ॥धृपद॥
भुके इच्छी अन्न । ते ही त्यासाठी निर्माण ॥२॥
तुका म्हणे जाती । एक एकाचिये चित्ती ॥३॥
अर्थ
जर गाय आणि वासरू यांची ताडातोड केली तर वासरू आपल्या मातेकडे ओढ घेते. अशावेळी ताटातूट करणाऱ्याचा आग्रह म्हणजे हट्ट तेवढा उरतो कारण गाय आणि वासरू एकमेकांसाठीच झुरत असतात. भुकेल्या मनुष्याला अन्नाची इच्छा उत्पन्न होते आणि अन्नही त्या भुकेलेल्या व्यक्तीसाठीच निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणतात गाय व वासरू भूक व अन्न हे दोघेही एकमेकांच्या चित्तात राहतात.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















