
८ जानेवारी, दिवस ८, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी १७६ ते २०० सार्थ तुकाराम गाथा अभंग ८५ ते 96
“८ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 8 January
राम कृष्ण हरी आज दिनांक 8 जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
176-1
तेथ स्थिर करूनिया रथु । अर्जुन असे पाहातु । तो दळभार समस्तु । संभ्रमेसी ॥176॥
त्या ठिकाणी रथ थांबवून, अर्जुन तो सर्व सैन्यसमुदाय उत्सुकतेने पाहू लागला. ॥76॥
177-1
मग देवा म्हणे देख देख । हे गुरुगोत्र अशेख । तव कृष्णमनी नावेक । विस्मो जाहला ॥177॥
अर्जुन म्हणाला, हे देवा ! पाहा पाहा. हे सगळे रणांगणावर जमलेले आमचेच गोत्रज, भाहुबंध व गुरू आहेत. हे ऐकून श्रीकृष्णाच्या मनात क्षणभर अचंबा वाटला. ॥77॥
178-1
तो आपणया आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे । हे मनी धरले येणे । परि काही आश्चर्य असे ॥178॥
(श्रीकृष्ण ) विचार करू लागले, अर्जुनाच्या मनात काय आले, कोण जाणे; हे काहीतरी विलक्षणच असावे, ॥78॥
179-1
ऐसी पुढील से घेतु । तो सहजे जाणे हृदयस्थु । परि उगा असे निवांतु । तिये वेळी ॥179॥
(श्रीकृष्ण) ते सर्वाच्या हृदयामध्ये विराजमान असल्यामुळे त्यांनी ते सहज जाणले; परंतु त्यावेळी ते (काही न बोलता) स्तब्ध राहिले. ॥79॥
180-1
तव तेथ पार्थु सकळ । पितृ पितामह केवळ । गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ॥180॥
त्यावेळी अर्जुनाने रणांगणावर आपले चुलते, , आजोबा, गुरू, बंधू, मामा यांना पहिले. ॥180॥
181-1
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
इष्ट मित्र आपुले । कुमरजन देखिले । हे सकळ असती आले । तयांमाजी ॥181॥
आपले इष्टमित्र, मुलेबाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत, असे त्याने पहिले. ॥181॥
182-1
सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे । कुमर पौत्र धर्नुर्धरे । देखिले तेथ ॥182॥
आपले जिवलग मित्र, सासरे, नातेवाईक आणि नातूदेखील त्या रणांगणात आलेले अर्जुनाने पहिले. ॥82॥
183-1
जया उपकार होते केले । की आपदी जे रक्षिले । हे असो वडील धाकुले । आदिकरूनि ॥183॥
ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते आणि संकटकाळात ज्याचे रक्षण केले होते, त्या लहान मोठ्या सर्वानाच अर्जुनाने पहिले. ॥83॥
184-1
ऐसे गोत्रचि दोही दळी । उदित जाले असे कळी । हे अर्जुने तिये वेळी । अवलोकिले ॥184॥
असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे, त्यावेळी अर्जुनाने पहिले. ॥84॥
185-1
कृपया परयाऽऽविष्टो विषीदन्नमब्रवीत
त्या सर्वाना पाहून तो करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि दुःखी-कष्टी होऊन तो असे बोलू लागला.
तेथ मनी गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली । तेणे अपमाने निघाली । वीरवृत्ति ॥185॥
त्या प्रसंगी (अर्जुनाच्या) मनात गडबड उडाली आणि (त्यामुळे त्याच्या मनात) सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. ॥85॥
186-1
जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी । तिया आणिकीते न साहती । सुतेजपणे ॥186॥
ज्या (स्त्रिया) उत्तम कुळातील असतात आणि गुणाने व रुपाने संपन्न असतात, त्यांना आपल्या स्वाभिमानामुळे दुसऱ्या कोणत्याही स्त्रियांचे वर्चस्व सहन होत नाही; ॥86॥
187-1
नविये आवडीचेनि भरे । कामुक निजवनिता विसरे । मग पाडेंवीण अनुसरे । भ्रमला जैसा ॥187॥
ज्या प्रमाणे कामाने आसक्त झालेला पुरुष आपल्या स्व-पत्नीला विसरून दुसऱ्या स्त्रीची योग्यता न पाहता वेडा होऊन तिच्या नादी लागतो, ॥87॥
188-1
की तपोबळे ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी । मग तया विरक्तता सिद्धी । आठवेना ॥188॥
किंवा तपोबलाने रिद्धी म्हणजेच (ऐश्वर्य) प्राप्त झाले असता (वैराग्यशाली पुरुषाची) बुद्धी भ्रम पावते; आणि मग त्याला वैराग्य (मोक्ष) सिद्धीची आठवणही राहत नाही. ॥88॥
189-1
तैसे अर्जुना तेथ जाहले । असते पुरुषत्व गेले । जे अंतःकरण दिधले । कारुण्यासी ॥189॥
त्याप्रमाणे अर्जुनाची त्या वेळी स्थिती झाली व त्याच्या हृदयात करुणा निर्माण झाली आणि त्याची वीरवृत्ती गेली. ॥89॥
190-1
देखा मंत्रज्ञु बरळु जाय । मग तेथ का जैसा संचारु होय । तैसा तो धनुर्धर महामोहे । आकळिला ॥190॥
ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक मंत्राचा उच्चार करताना चुकला म्हणजे तो जसा भ्रमिष्ट होतो, त्याप्रमाणे अर्जुन अतिमोहामुळे व्याकुळ झाला. ॥190॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-1
म्हणौनि असता धीरु गेला । हृदया द्रावो आला । जैसा चंद्रकळी शिवतला । सोमकांतु ॥191॥
म्हणून अर्जुनाच्या अंगी असलेले धैर्य खचले आणि त्यांचे हृदय करुणेने पाझरले. ज्याप्रमाणे चांद्रकिरणांचे शिंपण झाल्याने चांद्रकांतमाणि पाझरू लागतो, ॥191॥
192-1
तयापरी पार्थु । अतिस्नेहे मोहितु । मग सखेद असे बोलतु । श्रीअच्युतेसी ॥192॥
त्याप्रमाणे पार्थ महाकरूणेने मोहून गेला आणि मग खेदयुक्त होऊन श्रीकृष्णाबरोबर बोलू लागला. ॥192॥
अर्जुन उवाच ।
दृष्ट्वेमम् स्वजनं कृष्ण युयुत्सुम् समुपस्थितम् ॥1. 28॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥1. 29॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥1. 30॥
भावार्थ :-
अर्जुन म्हणाला, ” हे श्रीकृष्णा ! युद्ध करण्यासाठी एकत्र जमलेल्या या स्वजनांना पाहून ॥28॥
माझी सर्व गात्रे शिथिल पडू लागली आहेत. तसेच, तोंडाला कोरड पडू लागली आहे. माझ्या शरीराला कंप सुटून शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. ॥29॥
माझ्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडत आहे. माझ्या शरीराचा दाह होत आहे. माझे मन भ्रमित झाले आहे. त्यामुळे मी येथे उभा राहण्यासदेखील समर्थ नाही. ॥30॥
193-1
तो म्हणे अवधारी देवा । म्या पाहिला हा मेळावा । तव गोत्र वर्गु आघवा । देखिला एथ ॥193॥
अर्जुन म्हणाला, हे देवा ! माझे ऐका. मी हा सर्व समुदाय पहिला येथे मला माझे सर्व गोत्रज दिसत आहेत. ॥193॥
194-1
हे संग्रामी उदित । जहाले असती कीर समस्त । पण आपणपेया उचित । केवी होय ॥194॥
हे सर्व जण लढाईला उत्सुक झाले आहेत, हे खरे; पण ते (यांच्याशी लढणे) आपल्याला कसे योग्य होईल ? ॥194॥
195-1
येणे नांवेचि नेणो कायी । मज आपणपे सर्वथा नाही । मन बुद्धि ठायी । स्थिर नोहे ॥195॥
यांच्याशी युद्ध करण्याच्या विचाराने मला काही सुचत नाही. काय होते आहे, हे कळत नाही. माझे मलाच भान नाही. माझे मन आणि बुद्धी स्थिर नाही. ॥95॥
196-1
देखे देह कांपत । तोंड असे कोरडे होत । विकळता उपजत । गात्रांसीही ॥196॥
पाहा, माझा देह कापत आहे. तोंडाला कोरड पडली आहे आणि सगळ्या गात्रांना शिथिलता आलेली आहे. ॥96॥
197-1
सर्वागा काटाळा आला । अति संतापु उपनला । तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ॥197॥
माझ्या सर्वागावर रोमांच (काटा) उभा राहिला आहे, माझ्या मनाला अतिशय यातना होत आहेत आणि गांडीव धनुष्य धरवयाचा हात लुळा होऊन गेला आहे. ॥97॥
198-1
ते न धरतचि निष्टले । परि नेणेचि हातोनि पडिले । ऐसे हृदय असे व्यापिले । मोहे येणे ॥198॥
हे धनुष्य हाती न धरल्याने गळून पडले; परंतु हातातून केंव्हा गळून पडून गेले, हेदेखील मला कळाले नाही, या मोहाने माझे हृदय असे घेरले आहे. ॥98॥
199-1
जे वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण । तयाहून असाधारण । हे स्नेह नवल ॥199॥
खरोखर माझे अंतःकरण वज्रापेक्षा कठीण आहे, कोणाला दाद न देणारे अतिखंबीर असे आहे; परंतु काय आश्चर्य, त्यापेक्षाही या आप्तेष्टांचा मोह आश्चर्यकारक आहे. ॥199॥
200-1
जेणे संग्रामी हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । तो अर्जुन मोहे कवळिला । क्षणामाजी ॥200॥
ज्याने युद्धामध्ये शंकरांनाही जिंकले आणि निवातकवच नावाच्या राक्षसांचा ठावठिकानाही नाहीस केला, तो अर्जुन आप्तेष्ठांना पाहून एका क्षणामध्ये मोहाने ग्रासला गेला. ॥200॥
दिवस ८ वा, ८ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ८५ ते ९६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ८५
थोडे आहे थोडे आहे । चित्त साह्य जालिया ॥१॥
हर्षामर्ष पाही अंगी । पांडुरंगी सरले ते ॥धृपद॥
अवघ्या साधनांचे सार । न लगे फार शोधावे ॥२॥
तुका म्हणे लटिके पाहे । सांडी देह अभिमान ॥३॥
अर्थ
भक्तिमार्गाची वाटचाल करतांना मनाची परमेश्वराला एकरूपता साधली पाहिजे. हर्ष आणि खेद हे दोन्ही ज्यांना सामान भासतात, तेच भक्तीचे अधिकारी होतात. सर्व भक्तीमार्गाचे सार एकच आहे, ते फारसे शोधवे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच खोटा आहे, हे ओळखून अहंकार, देहसक्तीचा त्याग म्हणजेच परमार्थ होय.
अभंग क्र. ८६
आता उघडी डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासी ॥१॥
मनुष्यदेहा ऐसा निध । साधिली ते साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥धृपद॥
नांव चंद्रभागे तीरी । उभी पुंडलीकाचे द्वारी । कट धरूनिया करी । उभाउभी पालवी ॥२॥
तुका म्हणे फुकासाठी । पायी घातली या मिठी । होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥३॥
अर्थ
मायामोहाने भ्रमीष्ट झालेल्या जीवा, आता तरी तू डोळे उघड, मातेच्या उदारतुन तू जन्म घेऊन तु फक्त दगड आहेस. हा मनुष्य देह तुला मिळालेला आहे त्याचे तू सार्थक करून घे, संतांनी जसा भक्तिचा मार्ग धरला आणि ते भवसागरातून तरले, तसा तू भक्तिमार्ग धरुण नारादेहाचे सार्थक करुन घे. हा भवसागर तरुन जाणारी नांव चंद्रभागेतीरि, पुंडलिकाच्या द्वारी कमरेवर हात ठेऊन उभी आहे, उभ्या उभ्या ती सर्वाना बोलविते आहे. तुकाराम महाराज म्हणतात या नावेला कुठालेही मोल द्यावे लागत नाही, अनन्य भावाने त्याला शरण जाणे, हा एकच उपाय या भवसागरातून तरुण जाण्यासाठी आहे.
अभंग क्र. ८७
न करी रे संग राहे रे निश्चळ । लागो नेदी मळ ममतेचा ॥१॥
या नावे अद्वैत खरे ब्रम्हज्ञान । अनुभवावाचून बडबड ते ॥धृपद॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥२॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरी या थारा आनंदाचा ॥३॥
अर्थ
तू कोणाचाही संग करू नको, नीश्चिल रहा, मनाला माया- मोहाचा मळ लागू देऊ नको. अशी मनाची निसं:ग अवस्थालाच अव्दैत स्थिती म्हणतात व खरे आत्मज्ञान, ब्रम्हज्ञान हेच होय, बाकी सर्व अनुभवावाचुन केलेले निष्फल बडबड आहे. इंद्रियांचे दमन करूण त्यांच्यावर विजय मिळविने, वासना, कामना, नाहीशी करणे, कोणत्याही प्रकारचा संकल्प मना मध्ये येऊ देऊ नको. तुकाराम महाराज म्हणतात, अश्या व्यक्तीच्याअंतकरणा मधुन अहंकार नाहिसा होतो आणि आनंदि आनंद निर्माण होतो.
अभंग क्र. ८८
पंढरीचा महिमा । देता आणीक उपमा ॥१॥
ऐसा ठाव नाही कोठे । देव उभाउभी भेटे ॥धृपद॥
आहेति सकळ । तीर्थे काळे देती फळ ॥२॥
तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥
अर्थ
पंढरी या तीर्थक्षेत्राचा महिमा किती वर्णन करावा तेवढा थोडाच आहे. या सारखे ठिकाण दुसरे कोठेही नाही करण येथे भक्तांना भेटण्यासाठी देव आतुर होऊन उभा राहिला आहे. इतर क्षेत्र बर्याच कालानंतर फळ देणारी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरी ही साक्षात भक्तीची बाजार पेठ व भुमीवरिल वैकुंठच आहे
अभंग क्र. ८९
तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ॥१॥
मिळालिया संतसंग । समर्पिता भले अंग ॥धृपद॥
तिर्थी भाव फळे । येथे आनाड ते वळे ॥२॥
तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ॥३॥
अर्थ
सर्व तीर्थक्षेत्रांवर दगाडाचा देव व तीर्थाचे पाणी दिसते; पण तुकाराम महाराजांना संतसज्जनांमधे देव दिसतो. अश्या संतांचा सहवास मिळाला तर तिथे देहहि अर्पण करावा. तीर्थस्नानाने पापक्षालन होत नाही जर मनामधे भक्ति भावना असेल तरच तीर्थक्षेत्री त्याचे फळ मिळते, म्हणून संतसज्जन नास्तिक लोकांना आपल्या संगतित बदलून टाकतात. तुकाराम महाराज म्हणतात, संतसज्जनांमधे राहून कि एकदा पाप गेले मग जीवनातील त्रिविध ताप नाहिसे ज़ाले हे माहित होते.
अभंग क्र. ९०
घेऊनिया चक्र गदा । हाचि धंदा करीतो ॥१॥
भक्ता राखे पायापासी । दुर्जनासी संहारी ॥धृपद॥
अव्यक्त ते आकारले । रूपा आले गुणवंत ॥२॥
तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥३॥
अर्थ
हातामधे चक्र, गदा घेऊन देव सतत भक्ताचे रक्षण करण्याचा धंदा करत असतो. भक्तांचे रक्षण करुण त्यांना आपल्या पायजवर स्थान देतो; पण दुष्टांचा मात्र नाश करतो. भक्तांसाठी तो अव्यक्त रूपातुन व्यक्त रुपात येतो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांच्या सर्व इच्छा तो पूर्ण करतो.
अभंग क्र. ९१
देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥
प्रेम खरे दिसे जना । भिन्न अंतरी भावना ॥धृपद॥
आवरीता नावरे । खुर आठवी नेवरे ॥२॥
बोलो नये मुखावाटा । म्हणे होता ब्यांचा तोटा ॥३॥
दोन्ही सिंगे चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥४॥
मना आणिता बोकड । मेला त्याची चरफड ॥५॥
होता भाव पोटी । मुखा आलासे शेवटी ॥६॥
तुका म्हणे कुडे । कळो येते ते रोकडे ॥७॥
अर्थ
एका मंदिरात पुराणिकाचे पुराण ऐकतांना एक धनगर स्फुंदुन स्फुंदुन रडत असे. लोकांना वाटे, तो पुराणीकांवरील श्रद्धेमुळे राडतो आहे, पण त्याला पुराणीकांची दाढ़ी पाहुन आपल्या बोकडयाची आठवण येत असे. त्याला बोकडयाचे खुर, पाय आठवत असत. इतर सर्व शेळ्यान मधे हा एकच बोकड होता. पुराणीकांने माया आणि ब्रम्ह अशी दोन बोटे वर केली की त्याला वाटे, बोकडाचि दोन शिंगे, चार वेदांसाठी त्यांनी चार बोटे वर केली की त्याला वाटे, बोकडयाचे चार पाय; या साठी या खुना आहेत. धनगराला मेलेल्या बोकडयाची आठवण येत असे. पुराणीकांना पाहुन धनगराला मेलेला बोकड आठवला, हा त्याच्या मनातील भाव शेवटी बाहर पडला. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचिक मनुष्याच्या अंत:करणात काही लपुन राहत नाही, सत्य बाहर पडते.
अभंग क्र. ९२
दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनिया दुरी व्हावे तया ॥१॥
अइका हो तुम्ही मात हे सज्जन । करू संघष्टन नये बोलो ॥धृपद॥
दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥२॥
दुर्जनाचे भय धरावे त्यापरी । पिसाळलेवरी धावे श्वान ॥३॥
दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देश त्याचा ॥४॥
तुका म्हणे किती सांगावे पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचे ॥५॥
अर्थ
दुर्जनंचा सहवास हा विष्टेप्रमाने दुर्गंधीयुक्त असतो तेव्हा सज्जनाने त्या पासून दूर राहावे. हे सज्जन हो, तुम्ही माझे एवढे ऐका, अश्या दुर्जनंचि संगत तुम्ही करू नका. दुर्जनांचे अंग अखंड विटाळलेले असते व त्याची वाणी विटाळशी स्त्रीच्या स्रवलेल्या द्रव्या प्रमाणे आहे. हे दुर्जन लोक एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखे असतात ज्या प्रमाणे पिसाळलेल्या कुत्र्या चे भय बाळगुन आपण त्या पासुन दुर पळतो त्या प्रमाणे दुर्जना पासुन दुर पळावे. दुर्जनंचि संगती करू नये, त्यांचा त्याग करावा; एवढेच नव्हे तर त्यांच्या देशाचाहि त्याग करावा, असे श्यास्त्र सांगते. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला किती सांगु हे दुर्जन लोक म्हणजे साक्षात कुंभीपाक नरकाचे उदाहरण आहेत.
अभंग क्र. ९३
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥१॥
वेद श्रुति नाही ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचे वचन न मानी जो ॥धृपद॥
तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवो नये ॥२॥
अर्थ
प्रपंच्यामधे कारणाशिवाय वादविवाद करणारा हा शुद्ध बिजाचा नाही तो अत्यंज आहे असे संत सांगतात, तो विद्वान ब्रम्हण असला तरी त्याला अंत्यज पुराण समजावे. वेद, श्रुती यांना जो प्रमाण मानत नाहीत नाही, श्रेष्ठांनचे वचन जो मानित नाही. तुकाराम महाराज म्हणतात अश्या मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मिष्टान्न सेवन करू नये, त्याला स्पर्शही करू नये.
अभंग क्र. ९४
शब्दा नाही धीर । ज्याची बुद्धि नाही स्थिर ॥१॥
त्याचे न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥धृपद॥
संतासी जो निंदी । अधम लोभासाठी वंदी ॥२॥
तुका म्हणे पोटी । भाव अणीक जया ओठी ॥३॥
अर्थ
ज्याच्या शब्दात धर्य नाही, ज्याची बुद्धि अस्थीर आहे. आशा पापी व्यक्तीचे चुकुनहि दर्शन घेऊ नये, त्याच्या पंगतिला भोजनाचे लाभ घेऊ नये. तो दुर्जन संतांची निंदा करतो व द्रव्यालाभासाठी अधम श्रीमंतांच्या पाया पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, अश्या व्यक्तींच्या पोटातील (हृदयातील) व ओठातील (वाणीतील) भाव वेगवेगळा असतो.
अभंग क्र. ९५
चोरे चोराते करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥१॥
शिंदळीच्या मागे वेचिता पाउले । होईल आपुले तिच्या ऐसे ॥धृपद॥
तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥२॥
अर्थ
एक चोर दुसऱ्या चोराला चोरिच्या, घरफोडीच्या युक्त्या शिकवितो. जसा त्याचा आभ्यास असेल तसाच उपदेश करतो. एखाद्या वेश्येच्या सहवासात एखादी घरंदाज स्त्री आली तर तीही कालांतराने वाममार्गी बनते. वाईट व्यक्तींच्या संगतिला राहून संगतीत राहणारा देखिल वाईट होते. तुकाराम महाराज म्हणतात, वाईट लोकांच्या संगती मला नको. कारण मला पुढील भविष्यकाळात त्यामुळे होणाऱ्या दुषपरीणामांचे भय वाटते.
अभंग क्र. ९६
मांडवाच्या दारा पुढे । आणिला म्हातारा ॥१॥
म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवर्याचे तोंड ॥धृपद॥
समय न कळे । काय उपयोगी ये वेळे ॥२॥
तुका म्हणे खरा । येथूनिया दूर करा ॥३॥
अर्थ
एका विवाहा प्रसंगी नवरा-नवरी वेळेवर आले नाहीत म्हणून एक तारतम्य नसलेला म्हातारा मधे बोलू लागला. नवरी वेळेवर येत नाही हे पाहुन तो म्हातारा त्या रांड नवरीला आणा आणि त्या ‘नावर्याचे तोड पेटून दया ” अशी अशुभ वार्ता करू लागला. कोणत्या वेळी काय बोलावे हे त्या म्हातार्याला कळत नाही मग त्याचा काय उपयोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आशा मुर्ख म्हतार्याला मंडवातून प्रथम दूर करा.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















