२६ जानेवारी, दिवस २६, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा, ओवी ३५१ ते ३७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३०१ ते ३१२

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“२६ जानेवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 26 January

राम कृष्ण हरी आज दिनांक २६ जानेवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.

351-2
म्हणोनि आपुली आपणपेया । जरी ये इंद्रिये येती आया । तरी अधिक काही धनंजया । सार्थक असे ॥351॥
म्हणून हे धनंजया ! आपली ही इंद्रिये आपल्याच स्वाधीन झाली, (इंद्रियावर विजय प्राप्त केला, ) तर यापेक्षा जीवनाचे अधिक सार्थक ते काय आहे ? (याहुन मोठे मिळवावयाचे आहे काय ? )
352-2
देखे कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी । ना तरी इच्छावशे आवरी । पापियाचा आपणपेचि ॥352॥
असे पाहा की, ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले (हातपाय इत्यादी) अवयव पसरते किंवा मनात आले, तर अवयव आवरून घेत असते. (स्वइच्छेने)
353-2
तैसी इंद्रिये आपैती होती । जयाचे म्हणितले करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥353॥
त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिये ताब्यात असतात (स्वाधीन), व तो म्हणेल त्या आज्ञेनुसार वागतात, त्यांची बुद्धी स्थिरत्वास पावली आहे, असे समज.
354-2
आता आणिक एक गहन । पूर्णाचे चिन्ह । अर्जुना तुज सांगेन । परिस पा ॥354॥
अर्जुना ! आता स्थिरबुद्धी प्राप्त झालेल्या (पूर्णावस्थेस प्राप्त झालेल्या) पुरुषाला ओळखण्याची आणखी एक सूक्ष्म गूढ (सहसा लक्षात न येणारी) लक्षण तुला सांगतो. ऐक हो.

या निशा सर्वभूतानां तस्या जागर्ति संयमी ।
यस्या जाग्रति भूतानां सा निशा पश्यतो मुनेः ॥2. 69॥


भावार्थ :-
सर्व भूतमात्रांची जी रात्र आहे, अशा वेळी संयमी पुरुष जागरूक असतो व ज्याठिकाणी प्राणिमात्र जागृत असतात त्यावेळी ज्ञानवान मुनि निद्रेत असतो. (म्हणजेच क्षणभंगूर अशा सांसारिक सुखामध्ये सर्व भूतमात्र जगतात, ती ज्ञानी मुनींची रात्र असते. )

355-2
देखे भूतजात निदेले । तेथेचि जया पाहले । आणि जीव जेथ चेइले । तेथ निद्रित तो ॥355॥
सर्व प्राणीमात्र ज्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी निजलेले (अज्ञानी) असतात. (स्थिरबुद्धि पुरूषांना) त्याठिकाणी ज्याला (आत्मस्वरूपाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्याला) उजाडलेले असते; आणि जीव ज्या (व्यवहारिक, देहादि विषयसुखाच्या) प्रपंचाच्या प्राप्ती साठी (प्राणीमात्र) जागे असतात, त्या विषयसुखाचे ठिकाणी जो (स्थिरबुद्धी पुरुष) निजलेला असतो. (विषयसुखात रस नसलेला)]


356-2
तैसा तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि । तोचि जाणे निरवधि । मुनीश्वर ॥356॥
हे अर्जुना ! तोच खरा उपाधिरहित (आत्मज्ञानी पुरुषाला कोणत्याही प्रकारची उपाधी नसते) होय. त्याचीच बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तोच मुनी विश्वचैतन्याशी एकरूप झालेला असतो. (तोच मुनींश्वर आहे) असे समज.

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं
समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे
स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥2. 70॥


भावार्थ :-
ज्याप्रमाणे समुद्रात, सर्व बाजुंनी किंवा समुद्र चोहो बाजुंनी भरत असतानाही जो आपली मर्यादा सोडत नाही, तो स्थिर असतो. त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये सर्व भोग कसल्याच प्रकारचा विकार उत्पन्न न करता प्रवेश करतात, तोच पुरुष परम शांती प्राप्त करतो. भोगांची (विषयांची) इच्छा करणारा मात्र अशांत असतो.
357-2
पार्था आणिकही परी । तो जाणो येईल अवधारी । जैसी अक्षोभता सागरी । अखंडित ॥357॥
पार्था ! स्थिरप्रज्ञ मनुष्य ओळखता येईल अशी अजूनही एक खूण आहे ती ऐक, समुद्राचे ठिकाणी जशी (चोहो बाजुंनी भरत असताना सुद्धा) अखंड शांतता असते, (तशी शांतता या पुरूषाचे ठायी असते)
358-2
जरी सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत । तरी अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥358॥
जरी समुद्रात अनेक नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून मिळतात, तरी त्यामुळे तो किंचित ही मोठा होत नाही व आपल्या मर्यादेचे उल्लंघन करीत
359-2
नाही;
ना तरी ग्रीष्मकाळी सरिता । शोषूनि जाति समस्ता । परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ॥359॥
किंवा उन्हाळ्यात सर्व नद्यांचे प्रवाह आटले, तरी पण हे अर्जुन, तो सागर जसा मुळीच कमी होत नाही.
360-2
तैसा प्राप्ती ऋद्धिसिद्धी । तयासि क्षोभु नाही बुद्धी । आणि न पवता न बाधी । अधृति तयाते ॥360॥
त्याप्रमाणे ऋद्धिसिद्धि प्राप्त झाल्या असतानाही त्या पुरूषाचे बुद्धीला हर्ष होत नाही, आणि त्या प्राप्त (रिद्धी- सिद्धी) नाही झाल्या तरी त्याला (असंतुष्टता) विषाद होत नाही आणि त्याचे धैर्य कमी होत नाही.


361-2
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
सांगे सूर्याचा घरी । प्रकाशु काय वातीवेरी । की न लविजे तरी अंधारी । कोंडेल तो ॥361॥
सांग बरे, सूर्याच्या घरी दिवा लावला तर प्रकाश असतो आणि दिवा नाही लावला, तर तो सूर्य अंधारात कोंडला जातो काय ? ?
362-2
देखे ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी । तो विगुंतला असे अंतरी । महासुखी ॥362॥
त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरूषाचे घरी ऋद्धिसिद्धि आल्या काय नी गेल्या काय, त्याचे त्याला भानही नसते; कारण तो अंतःकरणाने महासुखात (परमात्मसुखात किंवा स्वस्वरूपात) निमग्न (रमून गेलेला असतो) झालेला असतो.
363-2
जो आपुलेनि नागरपणे । इंद्रभुवनाते पाबळे म्हणे । तो केवि रंजे पालविणे । भिल्लांचेनि ॥363॥
जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनालाही तुच्छ मानतो, तो भिल्लाच्या पालांच्या झोपडीत कसा रमेल ?
364-2
जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥364॥
जो अमृताला नांवे ठेवतो, तो ज्याप्रमाणे भातावरची पेज पीत नाही, त्याप्रमाणे आत्मानंदाचा अनुभव घेणारा, क्षुल्लक ऋद्धिसिद्धिच्या ऐहिक ऐश्वर्याचा उपभोग घेत नाही.
365-2
पार्था नवल हे पाही । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही । तेथ ऋद्धिसिद्धि कायी । प्राकृता होती ॥365॥
अर्जुना ! काय आश्चर्य आहे पाहा, ज्या पुरुषांना स्वर्गसुखाची परवा नाही, तेथे त्याला क्षुल्लक (सामान्य) ऋद्धिसिद्धिची काय किंमत असणार ?



366-2
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निस्पृहः ।
निर्ममो निरहंकरः स शान्तिमधिगच्छति ॥2. 71॥
भावार्थ :-

जो पुरुष सर्व विषय वासना सोडून निरिच्छ, ममत्वशून्य आणि अभिमान सोडून कर्तव्यकर्म करीत राहतो, त्याला शांती (स्थितप्रज्ञेला) प्राप्त होते.

ऐसा आत्मबोधे तोषला । जो परमानंदे पोखला । तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तू ॥366॥
असा जो आत्मज्ञानाने संतोष पावलेला आणि परमानंदाने पुष्ट (पोसलेला) झालेला आहे. तोच खरा (स्थिरबुद्धी) स्थितप्रज्ञ झाला आहे, असे तू जाण.
367-2
तो अहंकाराते दंडुनी । सकळ काम सांडोनि । विचरे विश्व होऊनि । विश्वाचिमाजी ॥367॥
तो स्थितप्रज्ञ दृढपणाने अहंकाराला दूर करून (आपले ठिकाणी असलेला मी पणा घालवुन), व मनातील सर्व कामनांचा त्याग करून (विषय वासना टाकून), (सर्वजग ब्रम्हरूप समजून) विश्वचैतन्याशी एकरूप होऊन विश्वात वावरतो. (जगात संचार करतो).
368-2
एष ब्राह्मो स्थितिः पार्थ नैना प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥2. 72॥
भावार्थ :-

हे अर्जुना ! हि ब्राम्हविषयक आस्था आहे. ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही. अंतकाळीदेखील या अवस्थेत स्थिर होऊन तो ब्रह्मांनदाप्रत पोचतो.
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो
नाम द्वितीयोऽध्यायः ॥2॥

हे ब्रह्मस्थिती निःसीम । जे अनुभविता निष्काम । पातले परब्रह्म । अनायासे ॥368॥
अशा प्रकारची ब्रम्हस्थिती आहे. जे निष्काम पुरूष या अमर्याद ब्रम्हस्थितीचा अनुभव घेतात ते अनायासेच परब्रम्हाशी एकरूप होतात. (परब्रम्हाला प्राप्त होतात)
369-2
जे चिद्रूपी मिळता । देहातीची व्याकुळता । आड ठाको न शकेचित्ता । प्राज्ञा जया ॥369॥
कारण की, चिद्रुपता प्राप्त होत असताना (ज्ञानस्वरूपी) देहांताच्या वेळी होणारी व्याकुळता (चित्ताची तळमळ) ज्या ब्रम्हस्थितीमुळे ज्ञानाच्या चित्तात लुडबुड करीत नाही, (स्थितप्रज्ञाच्या चिताच्या आड येऊ शकत नाही),
370-2
तेचि हे स्थिति । स्वमुखे श्रीपति । सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥370॥
तीच ही ब्राम्हस्वरूपाशी एकरूप होण्याची स्थिती, असे श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनाला सांगितली, हे संजय धृतराष्ट्रास म्हणाला.


371-2
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
ऐसे कृष्णवाक्य ऐकिले । तेथ अर्जुने मनी म्हणितले । आता आमुचियाचि काजा आले । उपपत्ति इया ॥371॥
असे श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून अर्जुन मनात म्हणाला, आता देवाच्या ह्या विचारसरणीने आमचेच आयते कार्य झाले. (कोणते कार्य तर युद्ध न करण्याविषयीचे जे मत अर्जुनाने मांडले त्याला आधारच मिळाला असा त्याचा समज झाला)
372-2
जे कर्मजात आघवे । एथ निराकारिले देवे । तरी पारुषले म्या झुंजावे । म्हणूनिया ॥372॥
कारण, आत्मस्वरूपाचे वर्णन करताना श्रीकृष्णांनी सर्वच्या सर्व कर्माचा (आता पर्यंतच्या निरूपणात) निषेध केला आहे. आणि त्या निषेधामुळे माझे युद्ध करणे (हे कर्म) सहजच थांबले आहे.
(असा समज अर्जुनाने करून घेतला आहे. एकीकडे श्रीकृष्ण म्हणतात आत्मस्वरूप प्राप्त पुरूषांना कर्मात अडकण्याची गरज नाही. पण मला मात्र म्हणतात की, ” तू युद्ध कर. ” या द्विधा मनस्थितीत अर्जुन आला आहे. )
373-2
ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्ती धनुर्धरु उवायिला । आता प्रश्नु करील भला । आशंकोनिया ॥373॥
ह्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून अर्जुन अंतर मनात फारच आनंदित झाला. आता त्याची शंका तो उत्तम प्रश्नाच्या द्वारे प्रगट करील.
274-2
तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु । की विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥374॥
(पुढं येणारा) तो प्रसंग फारच सुदंर असा आहे, जणू काही सर्व धर्माचे उत्पत्तीस्थान अथवा विचाररूपी अमृताचा अमर्याद असा सागरच आहे.
375-2
जो आपणपे सर्वज्ञनाथु । निरुपिता होईल श्रीअनंतु । ते ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तीदासु ॥375॥
त्या सुखसंवादाचे निरूपण सर्वज्ञांनाचा शिरोमणी सर्वश्रेष्ठ राजा श्रीअनंत ‘श्रीकृष्ण’ स्वतः करतील. ती ज्ञानकथा (ती हकीकत) निवृत्तीनाथांचा शिष्य (निवृत्तीदास) ‘ज्ञानदेव’ सांगेल.
॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां – सांख्ययोगोनाम् द्वितीयोऽध्यायः ॥2॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 72॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 375॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस २६ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३०१ ते ३१२
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा

अभंग क्र. 301
वसवावे घर । देवे बरे निरंतर ॥१॥
संग आसनी शयनी । घडे भोजनी गमनी ॥धृपद॥.
संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥२॥
तुका म्हणे काळ । अवघा गोविंदे सुकाळ ॥३॥
अर्थ

हरीने माझ्या देहात निरंतर घर करून रहावे. म्हणजे कायमस्वरूपी माझ्यासंगे जेवताना झोपताना भोजन करताना माझ्याबरोबर देवाने राहावे. त्यामुळे माझ्या मनातील संकल्प-विकल्प हे जळून जाऊन पापपुण्य ही माझ्या मध्ये येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात असे झाले म्हणजे माझा सर्वकाळ चांगला व या गोविंदा सोबत जाईल.
अभंग क्र. 302
येथील हा ठसा । गेला पडोनिया ऐसा ॥१॥
घरी देवाचा अबोला । त्यासि तेचि सवे त्याला ॥ध्रु॥.
नाही पाहावे लागत । एका एकीच ते रिते ॥२॥
तुका म्हणे जन । तयामध्ये येवढे भिन्न ॥३॥
अर्थ

या भू लोकांमध्ये अशी एक प्रथा पडून गेलेली आहे, कि लोक देवाशी अबोलाधरतात देवाचे नांव घेत नाही त्यामुळे देवही त्याच्याशी अबोला धरून जो जसे वागेल तसेच तो वागतो. हे पाहण्याची गरज नाही की देव लोकाला आठवत नाही कारण लोक देवाला आठवीत नाही त्यामुळे दोघाचे एकमेकांविषयी हृदय मोकळे आहे. तुकाराम महाराज म्हणतात याच कारणामुळे देवात आणि लोकात मोठे अंतर पडले आहे.
अभंग क्र. 303
करिता देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥
देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥धृपद॥
शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥
तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥
अर्थ

देवपूजा करताना अचानक घरी संत साधू आले तर, देवपूजा बाजूला सारून संत पूजा प्रथम करावी. जशी शाळीग्रामाची विष्णू मूर्ती असते तसेच संतही कोणत्या जातीचे असो त्यांचे पूजन केले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव घरी येणे म्हणजे देवपूजा करण्यापेक्षाही अधिक भाग्य आहे त्यामुळे अशी संधी आली तर कोणीही ती संधी न दवडता त्या संधीचा फायदा करून घ्यावा.
अभंग क्र. 304
ज्यांची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥१॥
करिता स्वामीसवे वाद । अधिक अधिक आनंद ॥धृपद॥.
असावा तो धर्म । मग साहो जाते वर्म ॥२॥
वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥३॥
अर्थ

ज्याची खरी सेवा आहे निष्काम सेवा आहे त्याच्या जीवाला मग कसले भय राहणार आहे ? त्याने प्रत्यक्ष हरीशी म्हणजे आपल्या स्वामीबरोबर वाद-विवाद जरी केला तरी तो त्याला अधिकाधिक आनंद वाटतो. आपले आचरण शुद्ध धर्माला धरून असावे मग दुसऱ्या कोणाचीही दोष जरी त्यांनी दाखविले तरी ते सहन करतात. तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी जे काही बोलते त्याला प्रत्यक्ष विठ्ठल प्रमाणात मानत आहेत.
अभंग क्र. 305
देवे जीव धाला । संसार तो कडू झाला ॥१॥
तेचि येताती ढेकर । आनंदाचे हरीहर ॥धृपद॥
वेधी आणिकास । ऐसा जया अंगी कस ॥२॥
तुका म्हणे भुक । येणे न लगे आणीक ॥३॥
अर्थ

देवाची प्राप्ती झाल्यामुळे माझा जीव गोड झाला आणि आता संसार कडू वाटत आहे. या हरीची प्राप्ती झाल्यामुळे मला आनंदाची ढेकरे येत आहेत. हे देवा तुमच्या मध्ये दुसऱ्याला आकर्षित करण्याची ताकत आहे सामर्थ्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात या कारणामुळे मला आनंदात तहान भूक लागत नाही.
अभंग क्र. 306
नाम साराचे ही सार । शरणागत यमकिंकर ॥१॥
उत्तमा उत्तम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥धृपद॥
नाम जपता चंद्रमौळी । नामे तरला वाल्हा कोळी ॥२॥
तुका म्हणे वर्णु काय । तारक विठोबाचे पाय ॥३॥
अर्थ

हरीचे नाम सर्व साराचे हि सार आहे त्यामुळे यमाचे किंकर नाम घेतल्याने साधकांना शरण येतात. या जगामध्ये सर्वात उत्तमात उत्तम असे हरीचे नाम आहे म्हणून पुरुषोत्तमाचे नाम घ्या. नामजपाने साक्षात शंकराचा कंठ दाह शांत झाला आणि वाल्या कोळी याचाही उद्धार झाला. तुकाराम महाराज म्हणतात मी आता आणखी काय वर्णन करू ? या विठोबाचे चरण हे भवसागरातून तारणारे आहेत.
अभंग क्र. 307
गातो भाव नाही अंगी । भूषण करावया जगी ॥१॥
परि तू पतितपावन । करी साच हे वचन ॥धृपद॥
मुखे म्हणवितो दास । चित्ती माया लोभ आस ॥२॥
तुका म्हणे दावी वेश । तैसा अंतरी नाही लेश ॥३॥
अर्थ

मी हरीचे गीत गात आहे पण माझ्या अंतःकरणात भक्तीभावनाही या संसारात माझी प्रतिष्ठा वाढावी म्हणून मी प्रयत्न करीत आहे. पण हे देवा तू पतितपावना आहेस असे तुझे ब्रीद आहे म्हणून माझा उद्धार कर. मी मोठ्या हुशारीने तुझा भक्त आहे असे म्हणतो आणि माझ्या चित्तात लोभ मोह आस हे विकार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात मी बाहेरून भक्तीचा वेश दाखवतो पण माझ्या चित्तात त्याचा लेशही नाही.
अभंग क्र. 308
द्रव्य असता धर्म न करी । नागविला राजद्वारी ॥१॥
माय त्यासि व्याली जेव्हा । रांड सटवी नव्हती तेव्हा ॥धृपद॥
कथाकाळी निद्रा लागे । कामी श्वानापरी जागे ॥२॥
भोग स्त्रियेसि देता लाजे । वस्त्र दासीचे घेउनि निजे ॥३॥
तुका म्हणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥४॥
अर्थ

आपल्याजवळ ज्यावेळी पैसे असतात त्यावेळी जो कोणत्याही प्रकारचे दानधर्म करीत नाही त्या मनुष्यास नंतर न्यायालयात राजदरबारात उभे केल्यास दंडास पात्र करून त्याला दंड केला जातो. त्याच्या आईने त्याला जेव्हा जन्म दिला त्यावेळेस सटवी तेथे नव्हती काय ? बहुतेक त्यामुळेच तो जगला असावा. हरिकथा चालू असताना त्याला झोप लागते पण स्त्रीसंग करताना जसा कुत्रा कुत्रीचा मागे रात्रभर लागतो तसा त्या वेळी रात्री तो कामातुर होऊन, त्याला झोप येत नाही. या अशा मनुष्याने आपल्या धर्मपत्नीला एखादे लुगडे जरी घेऊन द्यायचे म्हटले तरी तो घ्यायचा नाही पण दासीचे वस्त्र उराशी घेऊन झोपतो. तुकाराम महाराज म्हणतात असे मनुष्य गाढवा पेक्षाही नीच आहेत असे समजावे.
अभंग क्र. 309
मुखे बोले ब्रम्हज्ञान । मनी धन आणि मान ॥१॥
ऐशियाची करीता सेवा । काय सुख होय जीवा ॥धृपद॥.
पोटासाठी संत । झाले कलीत बहुत ॥२॥
विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥३॥
अर्थ

मुखाने ब्रम्‍हज्ञान सांगतो आणि मनामध्ये धन आणि मान याची अपेक्षा करतो. अशा माणसाची सेवा केली तर काय सुख प्राप्त होणार आहे या जिवाला ? या कलियुगामध्ये पोट भरण्यासाठी अनेक लोक संत झालेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये जर यापेक्षा कोणीही विरळा संत आहे तरच त्याच्या चरणी मी लोटांगण घेतो.
अभंग क्र. 310
एक वेळ प्रायिश्चत्त । केले चित्त मुंडण ॥१॥
अहंकारा नावे दोष । त्याचे ओस पाडिले ॥धृपद॥
अनुतापे स्नानविधि । यज्ञ सिद्धी देहहोम ॥२॥
जीवशिवा होता चुका । तेथे तुका विनटला ॥३॥
अर्थ
माझ्या मनामध्ये अनेकप्रकारचे विकार घर करून होते त्याचे आता मी एकदमच मुंडण करून टाकले आहे हेच माझे प्रायचित्त आहे. मुख्य म्हणजे अहंकार नावाचा जो दोष आहे त्याला मी ओस पाडले आहे. विषयांमुळे मला जो अनुताप झाला त्यामध्ये मी स्नान केले व आत्मज्ञान रुपी अग्नीमध्ये देहाचे हवन केले. तुकाराम महाराज म्हणतात अज्ञान यामुळे जीव व शिव यांचा विरोध होत होता आता त्याचा म्हणजे अज्ञानाचा त्याग करून मूळ स्वरूप जे ब्रम्‍ह आहे ते मीच झालो आहे.
अभंग क्र. 311
त्रैलोक्य पिळता उबगला नाही । आमचे त्या काई असे ओझे ॥१॥
पाषाणाचे पोटी बैसला दुर्दुर । तया मुखी चारा कोण घाली ॥धृपद॥
पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥२॥
तुका म्हणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥३॥
अर्थ

या देवाला त्रैलोक्याचे पालन करताना कंटाळा येत नाही आमचे कसले ओझे आहे. पाषाणाच्या पोटात बेडूक बसलेला असतो मग त्याच्या पोटात कोण अन्न घालते. काही पक्षी, अजगर हे कधीही अन्न शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत पण तरीही तो त्यांचे पोट भरतो. तुकाराम महाराज म्हणतात या पांडुरंगावर सर्व भार घातला तर तो दयाघन कधीही कोणाची उपेक्षा करीत नाही.
अभंग क्र. 312
करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥१॥
वृत्ति राखा पायांपाशी । वस्ती धरूनि मानसी ॥धृपद॥
पाळोनिया लळा । आता पाववावे फळा ॥२॥
तुका म्हणे दीन । त्यांचा हरतिया सीण ॥३॥
अर्थ

हे नारायणा माझ्या दुःखाचे तुम्ही खंडण करा. माझी वृत्ती तुमच्या चरणांजवळ राहू द्या आणि तुम्ही माझ्या मनात तुम्ही वस्ती करा माझ्या चित्ता रहा. मला हे फळ मिळवून द्या आणि एवढा माझा लाड तुम्ही पुर्ण करा. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही दिन लोकांचे दुःख दूर करा.

जानेवारी नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading