
३ जानेवारी, दिवस ३, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी ५१ ते ७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २५ ते ३६
” दिवस ३ रा, ३ जानेवारी”
सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
वार्षिक नित्य पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 3 January
राम कृष्ण हरी
आज दिनांक 3 जानेवारी असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १ ते १२ चे पारायण आपण करणार आहोत.
3 जानेवारी, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला, ओवी ५१ ते ७५,
51-1
ना तरी शब्दब्रह्माब्धि । मथियेला व्यासबुद्धि । निवडिले निरवधि । नवनीत हे ॥1. 51॥
महर्षी व्यासांनी आपल्या प्रखर बुध्दीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून महाभारतरूपी अनुपमेय नवनीत काढले ॥1-51॥
52-1
मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलेंनि विवेके । पद आले परिपाके । आमोदासी ॥1. 52॥
मग ते नवनीत ज्ञानरुप अग्नीच्या संबंधाने विवेकपूर्वक घडविले; आणि त्याचा उत्तम परिपाक होऊन त्या लोण्याचे सुगंधी साजूक तूप झाले, ते म्हणजे गीता होय. ॥1-52
53-1
जे अपेक्षिजे विरक्ती । सदा अनुभविजे संती । सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ ॥1. 53॥
वैराग्यवान देखील या गीतेची इच्छा करतात. संतदेखील नेहमी या गीतेचा अनुभव घेतात. ‘तो परमात्मा मी आहे’ अशा अभेद भावात असणारे ब्रम्हनिष्टदेखील या गीतेत रममाण होतात. ॥1-53
54-1
जे आकर्णिजे भक्ती । जे आदिवंद्य त्रिजगती । ते भीष्मपर्वी संगती । म्हणितली कथा ॥1. 54॥
भक्त जिचे परम श्रद्धेने श्रवण करतात, जी त्रैलोक्यात प्रथम वंदनीय आहे, जी भीष्मपर्वात प्रसंगाच्या अनुरोधाने सांगितली आहे. ॥1-54
55-1
जे भगवद्गीता म्हणिजे । जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे । जे सनकादिकी सेविजे । आदरेसी ॥1. 55॥
ती ” भगवतगीता ” होय. ब्रम्हदेव आणि महादेव तिची स्तुती करतात, सनकादिक परम श्रद्धेने तिचे श्रवण, मनन, पठण करतात. ॥1-55
56-1
जैसे शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोवळे । ते वेचिती मने मवाळे । चकोरतलगे ॥1. 56॥
शरद ऋतूतील चंद्रकलेत असलेले कोवळे अमृतकण चकोर पक्षांची पिल्ले जसे अतिशय मृदू मनाने वेचतात. ॥1-56
57-1
तियापरी श्रोता । अनुभवावी हे कथा । अतिहळुवारपण चित्ता । आणूनिया ॥1. 57॥
त्या प्रमाणे श्रोत्यांने चित्त शुद्ध करून एकाग्रतेने, अत्यन्त हळुवार पणे भगवदगीतेचा अनुभव घ्यावा. ॥1-57
58-1
हे शब्देवीण संवादिजे । इंद्रिया नेणता भोगिजे । बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥1. 58॥
शब्दांशिवाय या गीतेच्या अर्थाची मनातल्या मनात चर्चा करावी. इंद्रियांना नकळत याच्या अर्थाचा अनुभव घ्यावा. वक्ताच्या मुखातून शब्द प्रकट होण्यापूर्वीच त्यातील सिद्धांताशी एकरूप होऊन राहावे. ॥1-58
59-1
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ॥1. 59॥
ज्या प्रमाणे भ्रमर कमलदलाला समजू न देता त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे. ॥1-59
60-1
का आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटता । हा अनुरागु भोगिता । कुमुदिनी जाणे ॥1. 60॥
नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. ॥1-60
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-1
ऐसेनि गंभीरपणे । स्थिरावलोनि अंतःकरणे । आथिला तोचि जाणे । मानू इये ॥1-61
त्या प्रमाणे शुद्ध, सात्विक आणि स्थिर चित्ताने जो संपन्न आहे, तोच गीतेतील अर्थ जाणू शकतो. असे आम्ही समजतो. ॥1-61
62-1
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिही कृपा करूनि संती । अवधान द्यावे ॥1. 62॥
श्रोतेहो ! अर्जुनाच्या पंक्तीला बसून गीतेचा अर्थ श्रवण करण्यास जे योग्य आहेत, त्या संतांनी कृपा करून इकडे पूर्ण लक्ष द्यावे. ॥1-62
63-1
हे सलगी म्या म्हणितले । चरणा लागोनि विनविले । प्रभू सखोल हृदय आपुले । म्हणौनिया ॥1. 63॥
महाराज ! आपले हृदय सखोल आहे; म्हणून मी लडिवाळपणे आपणास लक्ष द्या, अस म्हंटल. खरोखर ही माझी आज्ञा नाही; आपल्या चरणांना स्पर्श करून विनंती केली आहे. ॥1-63॥
64-1
जैसा स्वभावो मायबापाचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥1. 64॥
ज्याप्रमाणे आपले मुल बोबडे बोलले, तरी त्याचा स्वभावतः अधिक संतोष आईवडिलांना होत असतो. ॥1-64॥
65-1
तैसा तुम्ही मी अंगिकारिला । सज्जनी आपुला म्हणितला । तरी उणे सहजे उपसाहला । प्रार्थू कायी ॥1. 65॥
त्याप्रमाणे तुम्ही सज्जनांनी माझा अंगीकार करून मला आपले म्हंटले आहे. त्यामुळे माझ्यातील उणीवा सहन कराल. त्यासाठी मी स्वतंत्र प्रार्थना करावयास पाहिजे, असे नाही. ॥1-65॥
66-1
परी अपराधु तो आणिक आहे । जे मी गीतार्थु कवळु पाहे । ते अवधारा विनवू लाहे । म्हणौनिया ॥1. 66॥
परंतु माझ्याकडून एक अपराध घडत आहे. मी गीतेचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे; म्हणून सांगितलेला अर्थ बरोबर आहे की नाही, याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती केली. ॥1-66॥
67-1
हे अनावर न विचारिता । वायाचि धिंवसा उपनला चित्ता । येर्हवी भानुतेजी काय खद्योता । शोभा आथी ॥1. 67॥
गीतेचा अर्थ सांगणे फार कठीण कार्य आहे. याचा विचार न करता तो अर्थ स्पष्ट करण्यासाठी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले; परंतु सूर्याच्या प्रकाशात काजव्याची शोभा असते काय ? ॥1-67॥
68-1
की टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरी । मी नेणतु त्यापरी । प्रवर्ते येथ ॥1-68॥
एखाद्या टिटवीने समुद्राची अथांग खोली मोजण्याकरता चोच बुडेपर्यंत त्यात माप घालावे, त्याप्रमाणे मी जाणकार नसताना गीतेचा अर्थ प्रकट करण्यास प्रवृत्त झालो आहे. ॥1-68॥
69-1
आइका आकाश गिवसावे । तरी आणीक त्याहूनि थोर होआवे । म्हणौनि अपाडू हे आघवे । निर्धारिता ॥1-69॥
आकाशाला कवटाळायचे असेल, तर त्यापेक्षा विशाल व्हावे लागते. गीतेवर भाष्य करण्यासाठी प्रकांड पांडित्य हवे; म्हणून मी तर गीतेवर भाष्य करण्यास योग्य नाही, असे दिसते. ॥1-69॥
70-1
या गीतार्थाची थोरी । स्वये शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारौनि ॥1-70॥
(गीतेची थोरवी) एकदा भगवान शंकरांनी गीतेची थोरवी सांगितली. ते शब्द ऐकून पार्वतीला आश्चर्य वाटले व ती म्हणाली, आपण गीतेची विस्तारपूर्वक सांगा. ॥1-70॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-1
तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसे का स्वरूप तुझे । तैसे हे नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ॥1. 71॥
भगवान शंकर म्हणाले, गीतेचे महत्व मी पूर्णपणे जाणू शकत नाही. पार्वती ! तुझे स्वरूप जसे नित्यनूतन आहे, तसे गीतार्थ हा नित्यनूतन आहे. ॥1-71॥
72-1
हा वेदार्थ सागरु । जया निद्रिताचा घोरु । तो स्वये सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥1-72॥
ज्या सर्वेश्वराच्या योगनिद्रेतील घोरण्यापासून समुद्राप्रमाणे अगाध वेद निर्माण झाले, त्या जगदीश्वर श्रीकृष्णाने स्वतः जागृतीत गीतेच्या रुपाने वेदार्थाचे सार सांगितले. ॥1-72॥
73-1
ऐसे जे अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्प मी मतिमंद । काई होये ॥1. 73॥
असे हे गीताशास्त्र अगाध, गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होऊन जाते. मी तर लहान आहे, माझी बुद्धी अल्प आहे मी तरी कसे सांगणार ? ॥1-73॥
74-1
हे अपार कैसेनि कवळावे । महातेज कवणे धवळावे । गगन मुठी सुवावे । मशके केवी ? ॥1. 74॥
हे अमर्याद गीताशास्त्र मला कसे बरे आकलन होणार ? महातेजाला कशाने बरे उजळावे ? छोट्याश्या चिलटाने आकाश आपल्या मुठीत कसे बरे ठेवावे ? ॥1-74॥
75-1
परी एथ असे एकु आधारु । तेणेचि बोले मी सधरु । जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥1. 75॥
परंतु मला सद्गुरु निवृत्तीनाथांचा मोठा आधार आहे. ते मला अनुकूल आहेत; म्हणून मी हे धैर्य करत आहे, असे ज्ञानदेव म्हणतात. ॥1-75॥
दिवस ३ रा, ३ जानेवारी
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २५ ते ३६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. २५
हिरा ठेविता ऐरणी । वाचे मारिता जो घणी ॥१॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥धृपद॥
मोहरा तोचि अंगे । सूत न जळे ज्याचे संगे ॥२॥
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥३॥
अर्थ
खरा हीरा ऐरणीवर ठेऊन वरुण घन मारला तरी फुटत नाही. त्याच हिर्याला खरे मूल्य असते चुरा होतो तो कृत्रिम होय. ज्याच्या संगतित सूत जळत नाही, तोच खरा मोहरा होय. तुकाराम महाराज म्हणतात, संत ही तसेच असते, जे जगाचे आघात सहन करत असतात.
अभंग क्र. २६
आलिंगने घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥१॥
ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥धृपद॥
तीर्थे पर्वकाळ । अवघी पायापे सकळ ॥२॥
तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥३॥
अर्थ
संतांच्या अलिंगनाने, सहवासाने सायुज्य मोक्षाची प्राप्ति होते. अश्या संतसहवासाचा महिमा शब्दातून वर्णन करतांना शब्द अपुरे पडतात. संतांच्या पायाशी सर्व तीर्थ व पर्वकाळ एकवटलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच संतचरणांची सेवा करावी.
अभंग क्र. २७
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥
भोगी त्यागी पांडुरंग । त्याने वसविले अंग ॥धृपद॥
टाळिले निमित्त । फार थोडे घात हित ॥२॥
यावे कामावरी । तुका म्हणे नाही उरी ॥३॥
अर्थ
संत-सज्जनांमुळे मझ्यातील “मी पण” लयास गेले आहे. कारण प्रपंच्यातील विषयभोग आम्ही भोगत नसून, आमच्या हृदयतील परमेश्वर भोगत असतो. घात हित होण्याचे जे काही निमित्त आहे तेच मी टाळले आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्या मुळे जीवनातील कर्म-कुकर्मचि चिंता उरलीच नाही.
अभंग क्र. २८
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार समूळ आशा ॥
निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥१॥
मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासी अवघी जने ॥
तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक । मोक्ष तेणे दर्शने ॥धृपद॥
मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥
हरिच्या गुणे गर्जताती सदा । आनंद तया मानसी ॥२॥
तन मन धन दिले पुरुषोत्तमा । आशा नाही कवणाची ॥
तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णू त्याची ॥३॥
अर्थ
त्यांचेच शरीर चिंतामणी आहे ज्यांच्या शरीरातून अहंकार, आशा हे समूळ नाहीसे झाले आहेत. ज्यांच्या शरीरातुन निंदा, हिंसा, कपट, देहबुद्धी नाहीशी झाली तो अगदीच स्फटिका प्रमाणे निर्मळ आहे जसा स्फटिक मनी असतो अगदी त्याप्रमाणे तो मनुष्य आहे. मोक्षाची प्राप्ती करुन देणारे काशी या तीर्थक्षेत्री सुद्धा त्याला जाण्याची गरज नाही सर्व काही त्याच्याजवळ आपोआप येते, कारण तो स्वतःच तीर्थक्षेत्र झालेला असतो आणि त्याच्या दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो. अहो ज्याचे मन शुद्ध झाले आहे त्याला माळ मुद्राचे बाह्य भूषण काय करायचे आहे कारण त्याचे अंतरंगाच शुद्ध झाले असते त्यामुळे तो त्याच भूषणने मंडित झालेला असतो. हरीचे गुण गर्जुन वर्णन करतात इतरांना सांगतात ते स्वतःच्या मनाने आनंदित असतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्याने आपले तन मन आणि धन हे सर्व पुरुषोत्तमाला दिले व ज्याला कशाचीही अपेक्षा नाही, तो मनुष्य परीसा होऊनही वेगळा आहे त्याचा महिमा कसा वर्णन करावा ?
अभंग क्र. २९
आहे ते सकळ कृष्णासी अर्पण । न कळता मन दुजे भावी ॥१॥
म्हणउनी पाठी लागतील भूते । येती गवसीत पाचजणे ॥धृपद॥
ज्याचे त्या वंचले आठव न होता । दंड हा निमित्ताकारणे हा ॥२॥
तुका म्हणे काळे चेपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥३॥
अर्थ
आपण जे काही कर्म करतो ते सर्व कृष्णाच्या कृपेनेच करतो त्यामुळे ते सर्व कृष्णाला अर्पण करावीत अशी भावना ठेवावी परंतु अज्ञानी जीव तसे न करता सर्व कर्मे मीच करत आहे असेच भावना मनात ठेवतात. त्यामुळेच पंचमहाभूते जीवाला त्याच्या अहंकारामुळे व भ्रमा मुळे शोधत शोधत येतात व त्याला पुन्हा पुन्हा देहाची पुन्हा पुन्हा प्राप्ती करून देतात. आपण जे काही कर्म करतो ते सर्व श्रीकृष्णाचे आहे याची जाणीव राहत नाही त्यामुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त होण्याचा दंड प्राप्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात काळाने आपला गळा दाबलेला आहे तरी देखील हा जीव “मी मी” असे करतच आहे तेही वेळोवेळा.
अभंग क्र. ३०
महारासी शिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥
तया प्रायश्चित्त काही । देहत्याग करिता नाही ॥धृपद॥
नातळे चांडाळ । त्याचा अंतरी विटाळ ॥२॥
ज्याचा संग चित्ती । तुका म्हणे तो त्या याती ॥३॥
अर्थ
ज्याने अजुन क्रोधचा त्याग केला नाही तो जातीने ब्राम्हण असला तरी त्याला ब्राम्हण म्हणू नये. त्याने देहान्त प्रयाचित्त जरी घेतले तरी त्याची शुद्धि होत नाही. आशा मनुष्याचा चांडाळास देखिल विटाळ होतो कारण त्याचे मन रागामुळे विटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, आशा व्यक्तीला स्पर्श करणारा, त्याच्या सानिध्यात राहणार्या व्यक्तीचे चित्त सुद्धा तसेच होते आणि तो देखिल त्याच जातीचा होतो त्याला त्याची वृत्ती प्राप्त होते.
अभंग क्र. ३१
तेलनीशी रुसला वेडा । रागे कोरडे खातो भिडा ॥१॥
आपुले हित आपण पाही । संकोच तो न धरी काही ॥धृपद॥
नाडिले लोका टाकिला गोहो । बोडिले डोके सांडिला मोहो ॥२॥
शेजारणीच्या गेली रागे । कुत्र्यांनी घर भरिले मागे ॥३॥
पिसारागे भाजिले घर । नागविले ते नेणे फार ॥४॥
तुका म्हणे वाच्या रागे । फेडिले सावले देखिले जगे ॥५॥
अर्थ
क्रोधाने वेडा झालेला मनुष्य तेलनिवर रुसून तेल आनावयास गेला नाही व रुक्ष अन्न खात बसला. ज्याला आपले हित समजत नाही, हरी भक्ति करत नाही त्याचे अंति अहितच होते. एक स्री समाजाने त्रास दिला म्हणून नवरा, मुलबालांविषयी प्रेम न बाळगता त्यांचा त्याग करते, डोक्यावरील केस कापून टाकते. एक स्रि शेजारनिवर रुसून घर सोडून गेली, तेव्हा तिच्या घरात कुत्रे शिरले. एकान घरात पिसवा झाल्या म्हणून क्रोधान स्वता:चेच घर जाळले त्यात स्वता:चे नुकसान स्वता:नेच केले. एका स्रि ने उवा झाल्या म्हणून लुगडे सोडले, तर नागवेपणने तिचिच फजीति झाली, तुकाराम महाराज क्रोधच्या आहारी गेलेल्या व्यक्ति स्वता:चे नुकसान स्वता:च कश्या प्रकारे करुण घेतात याची उदाहरणे देतात. त्या मुळे आपल्याला आपली हित हे कळाले पाहिजे, आपला क्रोध आपल्याला आवरता आला पाहिजे, प्रपंच नुस्ताच पैश्याने नही चलात आणि नुस्ताच चगल्या माणसाने नाही चालत तर त्याला पर्मार्थाची जोड असायला हवि तेव्हा आपल्याला आपले हित अहित कळते.
अभंग क्र. ३२
मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥१॥
मग होत कल्पवरी । सुखे गर्भवास हरी ॥धृपद॥
नीचवृत्तिकाम । परी मुखी तुझे नाम ॥२॥
तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥
अर्थ
मला संत सज्जनांचा दासांचा दास कर भगवंता. त्यासाठी कल्पांत होई पर्यंत मला गर्भवासाला घ्यायला आवडेल. निच काम मी करने पण मी माझ्या मुखाने सतत तुझे हरिनाम उच्यारीन. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी सेवाभक्ति हाच माझ्या जीवनाचा संकल्प असावा.
अभंग क्र. ३३
सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥
त्याचे दर्शन न व्हावे । शव असता तो जिवे ॥धृपद॥
कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥
नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥
अर्थ
ज्याच्या चित्तामधे प्रपंच्याची सतत हळहळ, तळमळ चालु असते, त्याचे मला दर्शनहि होउ नये, तो जिवंत असुनही मेल्यासारखा आहे. ज्याच्या मुखी नेहमी कुशब्द, अश्लील शब्द असतात, ती अमंगल वाणी माझ्या कानी पडू नये. तुकाराम महाराज म्हणतात जो दुसर्याशी कधीच चांगले बोलत नाही, जो कोणावरहि परउपकार करत नाही, अश्या मनुष्याचे दर्शन घेण्याची माझी इच्छा नाही.
अभंग क्र. ३४
जया नाही नेम एकादशीव्रत । जाणावे ते प्रेत सर्व लोकी ॥१॥
त्याचे वय नित्य काळ लेखीताहे । रागे दात खाय कराकरा ॥धृपद॥
जयाचिये द्वारी तुळसीवृंदावन । नाही ते स्मशान गृह जाणा ॥२॥
जये कुळी नाही एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥३॥
विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड । प्रत्यक्ष ते कुंड चर्मकांचे ॥४॥
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥५॥
अर्थ
जो नेमधर्म एकादशी व्रत पाळीत नाही, तो प्रेतासमान समजला जावा. काळही त्याच्यावर रागाउन करकरा दात खात असतो. ज्याच्या दारामधे तुळशीवृंदावन नाही, ते घर स्मशाणा प्रमाणे आहे. ज्याच्या कुळा मध्ये एकही वैष्णव नाही त्याचे संपूर्ण कुळच भवनदि च्या त्रिविध तापात बुडते. ज्या मुखामधे विठ्ठलाचे नावच येत नाही, ते चर्मकाराचे कुंड समजावे. तुकाराम महाराज म्हणतात जो हरी कीर्तनाला जात नाही, त्याचे हात पाय लकडा प्रमाणे असतात, असे मानावे.
अभंग क्र. ३५
आम्ही सदैव सुडके । जवळी येता चोर धाके । जाऊ पुढी भिके । कुतरी घर राखती ॥१॥
नांदणूक ऐसी सांगा । नाही तरी वाया भागा । थोरपण अंगा । तरी ऐसे आणावे ॥धृपद॥
अक्षय साचार । केले सायासांनी घर । एरंडसी हार । दुजा भार न साहती ॥२॥
धन कण घरोघरी । पोट भरे भिकेवरी । जतन ती करी । कोण गुरे वासरे ॥३॥
जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती । झुळझुळीत भिंती । वृंदावने तुळसीची ॥४॥
तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा । कुटुंबाची सेवा । तोचि करी आमुच्या ॥५॥
अर्थ
आम्ही सदैव गरीब आहोत, दरिद्री आहोत; त्यामुळे चोरांना देखील आमच्या जवळ येण्यास भय वाटते. आम्ही घर सोडून भिक्ष्या मागण्यास जातो तेव्हा कुत्री आमच्या घराच राखन करतात. अशी हरी भक्तिचि ख्याति आहे, हरी भक्तिमुळे आम्हाला थोरपंण लाभल आहे. आम्ही हरिभक्तीचे जे घर तयार केले आहे त्याला नाजुक लाकडे वापरली आहेत ते घर अक्षय आहे, एरांडा व शेराची लाकडे आम्ही घराला वापरली आहेत ते दुसऱ्या कुणाची भार सहन करत नाही. आमच्या घरी धनधान्य भरपूर आहे आम्ही केवळ आमच्या पोटापुरते भीक्षा मागतो, गुरेढोरे त्यांचा गोठा याचे कोण रक्षण करत बसेल ? आम्ही सर्व बाबतीत निश्चिंत झालो आहोत आमचे भाडंवल म्हणजे शेण, माती आहे आमच्या घराच्या भिंतीला शेणाने आम्ही चांगले सारवून घेतो व त्यानेच आमचे तुळशीवृदावंन लखलखित झालेले दिसते. तुकाराम महाराज म्हणतात देवने आमचा सर्व हेवा पूर्ण केला व आमच्या कुटुंबाचा भार विठ्ठलावर आहे आमच्या कुटुंबाची सेवा विठ्ठलच करत आहे, असे आम्ही नशीबवान आहोत.
अभंग क्र. ३६
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥१॥
न करिता परनिंदा द्रव्य अभिळास । काय तुमचे यास वेचे सांगा ॥धृपद॥
बैसलिये ठायी म्हणता रामराम । काय होय श्रम ऐसे सांगा ॥२॥
संताचे वचनी मानिता विश्वास । काय तुमचे यास वेचे सांगा ॥३॥
खरे बोलता कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसे सांगा ॥४॥
तुका म्हणे देव जोडे याचसाठी । आणीक ते आटी न लगे काही ॥५॥
अर्थ
वारकरी संप्रदायाच्या वचनाप्रमाने परस्त्रीला मातेसमान मानल्याने कोणतेही नुकसान होत काय ? परनिंदा, परद्रव्य अभिलाषा न धरल्यानेही नुकसान होते काय ? एका जागी बसून हरिनाम स्मरण केल्यानेही कोणत्याही प्रकारचे श्रम होते ते काय सांगा ? संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यानेही लाभच होतो; त्यात तुमचे नुकसान मात्र काही होते काय ? सत्य बोलन्यासाठी सुद्धा काहीच कष्ट पडत नाही तुमचे नुकसान मात्र काही होते काय ? तुकाराम महाराज म्हणतात अशा शुद्ध आचरनाने देह-बुद्धि परमेश्वराशी जोडलि जाते, त्याला इतर कर्माचि आवशकता भासत नाही.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















