
६ फेब्रुवारी, दिवस ३७, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ३ रा, ओवी २५१ ते २७६ सार्थ तुकाराम गाथा अभंग ४३३ ते ४४४
“६ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 6 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक ६ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
251-3
साध्वी शांती नागवली । मग माया मांगी शृंगारिली । तियेकरवी विटाळविली । साधुवृंदे ॥251॥
या काम क्रोधाने पतिव्रता असलेल्या शांती हिला वस्त्रहीन केले; आणि मायारूपी स्त्रीला वस्त्रे अलंकारांनी सजविले. मग अशा या मायेने साधूंचा समुदाय काम क्रोधाच्या लहरीनी भ्रष्ट करून टाकला.
252-3
इही विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाली काढिली । जितया मान मोडिली । उपशमाची ॥252॥
यांनी विवेकाचे बळ नाहीसे केले, वैराग्याचा विचार नाहीसा केला; आणि शम-दमांची मान जिवंतपणीच मुरगळून टाकली.
253-3
इही संतोषवन खांडिले । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिले । उपडूनिया ॥253॥
यांनी मनातील संतोषरूपी वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ले जमीनदोस्त केले व आनंदरूपी कोवळी रोपे उपटून टाकली.
254-3
इही बोधाची रोपे लुंचिली । सुखाची लिपी पुसली । जिव्हारी आगी सूदली । तापत्रयाची ॥254॥
यांनी ज्ञानाची (बोधरूपी) रोपे खुडून टाकली, सुखाची सर्व अक्षरेच पुसून टाकली; आणि माणसाच्या हृदयात विविध तापांचे निखारे प्रज्वलित केले.
255-3
हे आंगा तव घडले । जीवीचि आथी जडले । परी नातुडती गिंवसले । ब्रह्मादिका ॥255॥
काम क्रोध हे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत. ते जिवाबरोबरच (चिकटून) जडलेले आहेत. या काम क्रोधाचा आतमध्ये (अंतःकरनात) शोध केला, तर ब्रह्मदिकांना देखील ते सापडत नाहीत.
256-3
हे चैतन्याचे शेजारी । वसती ज्ञानाचा एका हारी । म्हणोनि प्रवर्तले महामारी । सावरती ना ॥256॥
हे काम क्रोध जिवात्म्याच्या जवळ असतात. ज्ञानाच्या पंक्तीला ते राहत असतात. याच्या लहरी हल्ला करायला उसळल्या, की त्या कोणालाही सावरता येत नाहीत.
257-3
हे जळेवीण बुडविती । आगीविण जाळिती । न बोलता कवळिती । प्राणियाते ॥257॥
हे जलाशिवाय माणसाला बुडवून टाकतात, अग्नीशिवाय हे जाळून टाकतात आणि मानवाला काही समजू न देता ग्रासून टाकतात.
258-3
हे शस्त्रेविण साधिती । दोरेविण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेऊनि ॥258॥
कोणत्याही शस्त्रावाचून ठार करतात. दोरावाचून बांधतात आणि स्वतःला ज्ञानी म्हणणाऱ्या व्यक्तीला तर पैजेचा विडा उचलून ते ठार करतात
259-3
चिखलेवीण रोविती । पाशिकंवीण गोविती । हे कवणाजोगे न होती । आंतौटेपणे ॥259॥
हे चिखलाशिवाय माणसाला पुरून टाकतात. कोणत्याही जाळ्यावाचून अडकवून टाकतात. हे शरीरात सूक्ष्मरूपाने राहत असल्यामुळे सर्वसाधारणपणे कोणाच्या अधीन होत नाहीत. (आटोक्यात येत नाहीत)
धूमेनाऽव्रियते वन्हिर्यथादर्शो मलेन च ।
येथोल्बेनावृत्तो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥3. 38॥
भावार्थ :-
ज्याप्रमाणे धुराने अग्नी आच्छादित होतो किंवा मळाने आरसा झाकून जातो अथवा वारेने गर्भ वेष्टित असतो, त्याप्रमाणे कामाने हे ज्ञान आच्छदिलेले आहे.
260-3
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेपे व्याळी । ना तरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥260॥
जसे चंदनाच्या मुळीला सर्प वेढे घालून बसलेले असतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनाची गवसणी असते. (काम क्रोध जिवात्म्याला ग्रासलेले असतात. )
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-3
का प्रभावीण भानु । धूमेवीण हुताशनु । जैसा दर्पण मळहीनु । कहीच नसे ॥261॥
जसा सूर्य कधी प्रकाशवाचून नसतो, धुरावाचून अग्नी असत नाही किंवा मळाशिवाय आरसा असू शकत नाही. (धुळीच्या कणांवाचून),
262-3
तैसे इहीविण एकले । आम्ही ज्ञान नाही देखिले । जैसे कोंडेनि पा गुंतले । बीज निपजे ॥262॥
ज्याप्रमाणे बी कोंड्याने आच्छादलेले असते (बी कोंड्यासकट उत्पन्न होते), त्याप्रमाणे कामक्रोधाशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेस आले नाही.
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणतलेन च ॥3. 39॥
भावार्थ :-
अर्जुना ! ज्ञानी पुरुषांचा नित्य वैरी, ज्याची पूर्तता होणे कठीण आहे, असा जो कामरूपी अग्नी त्याने ज्ञान आच्छादिले आहे.
263-3
तैसे ज्ञान तरी शुद्ध । परी इही असे प्ररुद्ध । म्हणोनि ते अगाध । होऊनि ठेले ॥263॥
वस्तुतः ज्ञान हे शुद्धच आहे; परंतु या काम-क्रोधाने हे झाकले गेले आहे. म्हणून ते प्राप्त होण्यास कठीण झाले आहे.
264-3
आधी याते जिणावे । मग ते ज्ञान पावावे । तव पराभवो न संभवे । रागद्वेषा ॥264॥
प्रारंभी साधनेने काम-क्रोधाना जिंकावे, म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती होते. परंतु सामान्य माणसाकडून या काम क्रोधाचा पराभव होऊ शकत नाही
265-3.
याते साधावयालागी । जे बळ जाणिजे अंगी । ते इंधन जैसे आगी । सावावो होय ॥265॥
काम-क्रोधाना जिकण्यासाठी अंगामध्ये बळ (सामर्थ्य) आणावे, तर अग्नीला इंधन पुरवावे, तसे अग्नी अधिकच प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे अंगातील बळ काम क्रोधाना उलट साहाय्य करणारे होते.
इंद्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैरविमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥3. 40॥
भावार्थ :-
इंद्रिये, मन व बुद्धी ही (काम, क्रोध) यांचे निवासस्थान आहे असे म्हणतात. आणि मन, बुद्धी, इंद्रिये यांचे द्वारा हा काम ज्ञाना आच्छादित करतो आणि जिवात्म्याला मोहात गुंतवितो.
266-3
तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे । म्हणोनि हटियाते जिणिजे । इहीचि जगी ॥266॥
अशा रीतीने जे जे उपाय करावेत, ते सर्व उपाय ह्या काम – क्रोधांनाच साहाय्य करीत असतात; म्हणून या जगामध्ये ते हठयोग्याना सुद्धा जिंकतात.
267-3
ऐसियाही सांकडा बोला । एक उपायो आहे आहे भला । तो करिता जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥267॥
असे हे काम-क्रोध जिंकण्याला कठीण जरी असले/म्हंटले, असे बोलले जरी जात असले, तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय आहे; तो उपाय तुझ्याकडून होणार असेल, तर तुला सांगतो.
तस्मात् त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रहि ह्येनं ज्ञान्विज्ञाननाशनम् ॥3. 41॥
भावार्थ :-
हे भरतश्रेष्ठ अर्जुना ! तू प्रारंभी इंद्रियांचे नियमन करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या पापरूपी कामाचा त्याग कर.
268-3
यांचा पहिला कुरुठा इंद्रिये । एथूनि प्रवृत्ति कर्माते विये । आधी निर्दळूनि घाली तिये । सर्वथैव ॥268॥
या काम क्रोधांचे वास्तव्य इंद्रियांच्या ठिकाणी आहे इंद्रियापासून कर्माची प्रवृत्ती होते; म्हणून प्रारंभी या इंद्रियांवर विजय मिळवं.
इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धियोर् बुद्धेः परतस्तु सः ॥3. 42॥
भावार्थ :-
स्थूल देहापेक्षा इंद्रिये सूक्ष्म व श्रेष्ठ आहेत. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे. मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. बुद्धीच्याही पलीकडे तो परमात्मा आहे, असे ज्ञानी म्हणतात.
269-3
मग मनाची धाव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेनि थारा मोडेल । या पापियांचा ॥269॥
असे झाले असता, मनाची विषयांकडे धावण्याची क्रिया बंद पडेल आणि बुद्धितील सर्व प्रकारचे भ्रम नाहीसे होतील. (बुद्धी मोकळी होईल). यामुळे या पाप्यांचा आश्रय नाहीसा होईल.
एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥3. 43॥
भावार्थ :-
अशा प्रकारे बुद्धीतून श्रेष्ठ स्वयंप्रकाशमान परमेश्वराला जाणून, बुद्धीच्या द्वारा मनाला वश करून हे महाबाहो ! दुर्जन अशा कामरूपी शत्रूचा तू नाश कर.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥3॥
270-3
हे अंतरीहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले । जैसे रश्मीवीण उरले । मृगजळ नाही ॥270॥
हे काम क्रोध अंतःकरणातून नष्ट झाले, तर निःसंशय गेले असे जण. ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ राहत नाही;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-3
तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले । मग तो भोगी सुख आपुले । आपणचि ॥271॥
हे काम क्रोध जर नाहीसे झाले, तर ब्रम्हरूपी स्वराज्याची प्राप्ती होते आणि तो पुरुष आपल्या शुद्ध अंतःकरणामुळे सुखाच्या राशींचा अनुभव स्वतःच घेऊ शकतो.
272-3
जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गाठी । तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणे काळी ॥272॥
हीच सद्गुरू आणि शिष्यांची गुह्य अशी गोष्ट आहे, हे जीव – ब्रम्हचे ऐक्य आहे. त्या ठिकाणी स्थिर राहून तेथून तो कधीही ढळत नाही.
273-3
ऐसे सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । राया ऐक देवदेवो । बोलता जाहला ॥273॥
संजय म्हणाला, ” हे धृतराष्ट्रा राजा ! ऐक. असे सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती, देवांचा देव जो श्रीकृष्ण तो याप्रमाणे म्हणाला.
274-3
आता पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगेल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥274॥
आता भगवान श्रीकृष्ण एक पुरातन कथा सांगतील. ती कथा ऐकून अर्जुन काही प्रश्न विचारील.
275-3
तया बोलाचा हन पाडु । का रसवृत्तीचा निवाडु । येणे श्रोतया होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥275॥
या अनमोल बोलण्याची योग्यता, (भगवंताच्या बोलण्यातून स्पष्ट अनुभवास येणारे शांतादि रस) त्यातील रसवृत्ती या सर्व कारणांनी श्रोत्यांना श्रवनसुखाची समृद्धी होईल.
276-3
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा । मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोग बापा ॥276॥
निवृत्ती महाराजांचे शिष्य श्रीज्ञानेश्वर महाराज श्रोत्याना म्हणतात, शुद्ध बुद्धीने प्रतिभेचा चंद्र प्रकाशित करून श्रीकृष्ण-अर्जुनाचा हा सुखसंवाद श्रवण करा.
॥ इति श्री ज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां –
कर्मयोगोनाम् तृतीयोऽध्यायः ॥3॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 43॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 276॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३७ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४३३ ते ४४४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 433
पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥१॥
त्यासी चिंतिलिया मनी । चित्ता करी गंवसणी ॥धृपद॥
पावावया फळ । अंगी असावे हे बळ ॥२॥
तुका म्हणे तई । सिद्धी वोळंगती पायी ॥३॥
अर्थ
पांडुरंगाचे चिंतन केले असता आपल्याला जे ठिकाण पाहिजे आहे जे पद पाहिजे आहे त्या ठिकाणी आपल्याला तो पोहोचवतो. मना मध्ये त्याचे चिंतन केले म्हणजे तो चित्ताला आपल्या स्वरूपाने वेढून टाकतो. इच्छिलेले फळ प्राप्त होण्यास आपल्या अंगी भागवत चिंतनाचे बळ पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात असे असेल तर रीध्दी सिद्धी भक्ताची चरण सेवा करतात.
अभंग क्र. 434
धन्य भावशीळ । ज्याचे हृदय निर्मळ ॥१॥
पूजी प्रतिमेचे देव । संत म्हणती तेथे भाव ॥धृपद॥
विधिनिषेध नेणती । एक निष्ठा धरुनी चित्ती ॥२॥
तुका म्हणे तैसे देवा । होणे लागे त्यांच्या भावा ॥३॥
अर्थ
ज्या भाविकाचे हृदय निर्मळ आहे शुद्ध आहे तो भक्त धन्य आहे. जो देवाची प्रतीमा करून मोठ्या प्रेमाने तिचे पूजन करतो, त्याच प्रतिमेच्या ठिकाणी त्याचा खरा भाव असतो, असे संत म्हणतात. ज्यांच्या चित्तात विधिनिषेध यांचा काहीही विचार नसतो, केवळ भगवंता वरच एकनिष्ठा असते, तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या भक्तीभावा सारखे स्वरूप देवाला धरण करावे लागते.
अभंग क्र. 435
आधीच आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥१॥
मग त्या कैची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥धृपद॥
नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥२॥
तुका म्हणे ते गाढव । घेती मनासवे धाव ॥३॥
अर्थ
जगामध्ये असे काही मनुष्य आहेत की जे अगोदरच आळशी असतात आणि त्याला गुरूदेखील असे मिळतात की त्या गुरूचा उपदेश देखील त्याला आळशी बनवण्यासाठी आणखी मदत करतात. मग त्याला विधिनिषेध याचे पालन करण्यासाठी कसली आडकाठी येणार तो विधिनिषेध करणार नाही त्यामुळे त्याची आणि विधिनेनिषेधाची भेट कशी होणार ? त्यामुळे त्याला नेहमीच असे वाटते की धर्माचरण करू नये आणि विधिनिषेधाचे कर्म देखील करू नये. तुकाराम महाराज म्हणतात असे मनुष्य मनुष्य देहाला येऊन देखील गाढवाच असतात कारण त्यांची वर्तणूक गाढवा प्रमाणेच असते कारण ते त्यांच्या मनानुसार हवे तसे मन मानेल तसे धाव घेतात.
अभंग क्र. 436
नाचे टाळी पिटी । प्रेमे अंग धरणी लोटी ॥१॥
माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरीजन ॥धृपद॥
न धरिती लाज । नाही जनासवे काज ॥२॥
तुका म्हणे दाटे । कंठ नेत्री जळ लोटे ॥३॥
अर्थ
खरे भोळे भाविक भक्त हे नाचतात हरीनाम घेताना टाळी वाजवतात धरणीवर अंग टाकून लोळण घेतात हरीछंदात मग्न असतात, असे जे भोळे भाविक माझे मित्र ते अतिशय सज्जन आहेत ते मला फार आवडतात. ते मनात मुळीच लाज धरत नाहीत कारण त्यांना लोकांशी काही कर्तव्य नसते. तुकाराम महाराज म्हणतात हरीच्या प्रेमाने त्यांचा कंठ सद्गतीत होऊन त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू येत असतात, असे भक्त मला फार आवडतात.
अभंग क्र. 437
कथा करुनिया दावी प्रेमकळा । अंतरी जिव्हाळा कुकर्माचा ॥१॥
तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥धृ॥
टिळे टोपी माळा देवाचे गवाळे । वागवी ओंगळ पोटासाठी ॥२॥
गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी । तयाचे अंतरी काम लोभ ॥३॥
कीर्तनाचे वेळी रडे पडे लोळे । प्रेमेवीण डोळे गळताती ॥४॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ॥५॥
अर्थ
काही लोक असे आहेत ते हरिकथा तर करतात पण हरिकथा करताना हरी विषयी प्रेम आहे असे दाखवतात परंतु त्यांच्या अंतरंग मध्ये कुकर्मा विषयी एक विशेष जिव्हाळा असतो. तो स्वतः नीच असून बारा टिळे लावतो डोक्यात टोपी घालतो, गळ्यात माळा घालतो. व आपले पोट भरण्या करता देवाची सांभाळ जवळ बाळगतो. असा मनुष्य गोसाव्याचे रूप धारण करतो परंतु त्याच्या अंतरंगात परनारी विषयी विषय वासना जागृत असते पाप दृष्टीने तो परनारी कडे पाहत असतो त्याच्या अंतरंगात काम क्रोध यांचा विकार माजलेला असतो, तो पडतो, लोळतो, त्याचे डोळ्यातून प्रेम शिवाय पाणी गाळत असते. तुकाराम महाराज म्हणतात असले मायेचे मैंद ढोंगी लबाड असतात त्यांच्या जवळ गोविंद नाहिच असे महाराज दोन वेळा सांगतात.
अभंग क्र. 438
पाखांडयांनी पाठी पुरविला दुमाला । तेथे मी विठ्ठला काय बोलो ॥१॥
कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुले भिकारी अर्थ नेणे ॥धृपद॥
न कळे ते मज पुसती छळूनी । लागता चरणी न सोडिती ॥२॥
तुझ्या पायाविण दुजे नेणे काही । तूचि सर्वाठायी एक मज ॥३॥
तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलो भांडा वादकासी ॥४॥
अर्थ
देवा पाखंडयांनी माझी पूर्णपणे पाठ पुरवली म्हणजे पाटला केलेला आहे आता यांच्याविषयी मी काय बोलू ? नुसतेच कांदे खाणाऱ्याला कस्तुरीचा वास काय समजणार आहे स्वतः भिकारी असताना कस्तुरी प्राप्तीची इच्छा असून काय उपयोग आहे ? जी गोष्ट मला कळत नाही तीच गोष्ठ मला छळुन विचारतात आणि माझे पाय घट्ट धरून सोडत नाही. देवा तुमच्या चरणा वाचून मी दुसरे काहीच जाणत नाही सर्व ठिकाणी तुम्हीच माझ्यासाठी सर्वकाही आहात. तुकाराम महाराज म्हणतात या नास्तिक लोकांची वाचेलाखिळ पडो अश्या भांडखोर लोकांशी मी किती बोलू ?
अभंग क्र. 439
कलियुगी कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥१॥
द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडी । मुखे बडबडी कोरडेचि ॥धृपद॥
दंभ करी सोंग मानावया जग । मुखे बोले त्याग मनी नाही ॥२॥
वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥३॥
तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसे ॥४॥
अर्थ
अहो कलियुगामध्ये असे पाखंडी लोक झाले आहेत कि जे खूप चांगल्या प्रकारे कवित्वही करतात व भांडणही करतात. चित्तामध्ये द्रव्य, पत्नी, पुत्र, घरदार मान-सन्मान याची आवडतात धरतात आणि मुखाने केवळ वैराग्याच्या कोरड्या गप्पा हाणतात. लोकांनी आपल्याला मान सन्मान द्यावा यासाठी साधूत्वाचे दांभिक सोंग हे पाखंडी लोक घेतात मुखाने वैराग्याच्या त्यागाच्या गोष्टी बोलतात परंतु मनामध्ये त्याचा लवलेशही नसतो. वेदाने ज्या आज्ञा दिल्या आहेत तसेच आपले स्वहित ज्यामध्ये आहे त्या गोष्टी करत नाहीत आणि देहावरून आलीप्त तर होतच नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात वाचेने जे बोलाल तसे जर केले नाही तर तो पुढे यमाचे दंड सहन करेल.
अभंग क्र. 440
विषयाचे सुख एथे वाटे गोड । पुढे अवघड यमदंड ॥१॥
मारिती तोडिती झोडिती निष्ठुर । यमाचे किंकर बहुसाल ॥धृपद॥
असिपत्री तरुवरखैराचे इंगळ । निघतील ज्वाळ तैलपाकी ॥२॥
तप्तभूमीवरी चालविती पायी । अग्नीस्तंभ बाही कवळविती ॥३॥
म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे यातायाती गर्भवास ॥४॥
अर्थ
विषय सुख तिथे म्हणजे इहलोकांमध्ये भोगताना खूप गोड वाटते पण पुढे यमदंड भोगावा लागेल त्यावेळी अवघड होईल. यमलोकात यमदूत तलवारीच्या पात्याप्रमाणे धारदार पाने असलेल्या वृक्षांना आलिंगन द्याण्यास सांगतात. खैराच्या निखाऱ्यातून चालवितात आणि उकळत्या तेलात बुडवितात. अतिशय तापलेल्या भूमीवर अनवाणी चालवतात. तापून लाल झालेल्या खांबाला मिठी मारावयास लावतात. तुकाराम महाराज म्हणतात पुढे असे हाल होणार आहे, म्हणुन अशा विषयासक्त लोकांना मी कळवळ्याने सांगतो कि आता पुन्हा गर्भवास भोगायला लावणाऱ्या उद्योगात पडू नका.
अभंग क्र. 441
अल्प माझी मती । म्हणोन येतो काकुलती ॥१॥
आता दाखवा दाखवा । तुमची पाउले केशवा ॥धृपद॥
धीर माझ्या मना । नाही नाही नारायणा ॥२॥
तुका म्हणे दया । मज करा अभागिया ॥३॥
अर्थ
देवा माझी बुद्धी अल्प आहे म्हणून तर मी तुम्हाला काकुळतीला येत आहे. अहो पांडुरंगा दाखवा हो दाखवा मला तुमचे चरण दाखवा. नारायण माझ्या मनाला मुळीच धीर नाही हो नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही माझ्या सारख्या का भाग्यावर दया कराल, तरच माझा उद्धार होईल.
अभंग क्र. 442
वाटुली पाहाता सिणले डोळुले । दाविसी पाउले कइ वो डोळा ॥१॥
तू माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वाट तुझी ॥२॥
का बा मोकलिले कोणा निरविले । कठिण कैसे झाले हृदय तुजे ॥३॥
तुका म्हणे माझ्या असांवल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥४॥
अर्थ
देवा तुमची वाट पाहून पाहून माझे डोळे शिणले आहे मजे त्रासले आहेत तुम्ही केव्हा माझ्या डोळ्यांना तुमचे रूप दाखवणार आहात ? हे विठाबाई, तू कृपेची सावली देणारी माय माउली आहेस. मी तुझी वाट पाहत आहे. तुम्ही मला का सोडून दिलेत ? कुणाच्या हाती सोपविलेत ? तुझे हृदय असे कठीण कसे झाले ? तुकाराम महाराज म्हणतात अहो देवा माझ्या बहु तुम्हाला क्षेमालिंगन देण्यास फार आसुसलेले आहेत.
अभंग क्र. 443
देह हा सादर पाहावा निश्चिंत । सर्व सुख एथे नाम आहे ॥१॥
ब्रम्ह जे देखणे द्वैत जेव्हा गेले । शरीर ते झाले ब्रम्हरूप ॥धृपद॥
यजन याजन तप व्रते करिती । विकल्पे नागवती शुद्ध पुण्या ॥२॥
तुका म्हणे सर्व सुख एथे आहे । भ्रांति दूर पाहे टाकुनिया ॥३॥
अर्थ
देहाविषयी विवेकाने विचार केला, तर असे दिसून येते कि हरीचे नाम या असूनही सुख प्राप्त करण्यास आधार आहे. ज्या वेळी द्वैत बुद्धी निरास होतो, त्या वेळी बेम्हचा साक्षात्कार होतो व शरीर ब्रम्हरूप होते. कित्येक लोक यद्न्य करतात किंवा करवितात. तप करतात, व्रते धरतात. पण त्यांच्या मनात फलाचा हेतू असतो आणि देहाचे त्याच्या शी ममत्व जडलेले असल्यामुळे ते शुध्द पुण्याईळा अंतरतात. एका हरीच्या नामामध्ये सर्व सुख आहे, पण देहादी सर्व वस्तू आपल्याला सुख देतील हि भ्रांती टाकून जर तुम्ही पाहाल, तरच हे तुम्हाला कळून येईल.
अभंग क्र. 444
तुझे वर्णु गुण ऐसी नाही मती । राहिल्या त्या श्रुती मौनपणे ॥१॥
मौनपणे वाचा थोटावल्या चारी । ऐसे तुझे हरी रूप आहे ॥धृपद॥
रूप तुझे ऐसे डोळा न देखवे । जेथे हे झकवे ब्रह्मादिक ॥२॥
ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । म्हणोनि आटाटी फार त्यासी ॥३॥
तुका म्हणे तुझे गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणू काई ॥४॥
अर्थ
हे देवा विठोबा राया तुमचे गुणगाण वर्णन करणे मला जमणार नाही माझी तेवढी बुद्धी ही नाही अहो तुमचे वर्णन करण्याकरता वेद श्रुती देखील मौन झाल्या. चारही वेद तुझे वर्णन करताना स्तब्ध झाले हे हरि असे तुझे स्वरूप आहे. तुझे रूप पाहण्याचे सामर्थ्य माझ्या डोळ्यांना नाही, जेथे ब्रम्हादिक फसले तेथे माझी काय कथा ? ब्रम्हादिक देवांना सृष्ठी निर्माण करण्याची मोठी कटकट मागे लागलेली आहे. त्यामुळे तुझी कृपा संपादन करण्यासाठी त्यांना फारच त्रास पडतो. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा, तुझे गुण, तुझे रूप तुझे नाम या गोष्टी असंख्य आहेत. त्यांचे वर्णन मी काय करणार ?
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















