
१२ फेब्रुवारी, दिवस ४३ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ४ था, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ५०५ ते ५१६
“१२ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 12 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक १२ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
126-4
आता अवधारी सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक । तयाते यज्ञेचि यज्ञु देख । उपासिजे ॥126॥
दुसरा प्रकार आता तुला सांगतो, ऐक. जे ब्राम्हरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत, ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. (स्वकर्माने ईश्वराची आराधना करतात
श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन् विषयानन्य । इंद्रियाग्निषु जुह्वति ॥4. 26॥
भावार्थ :-
काही योगी श्रोत्र आदि करून ज्ञानेंद्रियांचा संयमरूप अग्निमध्ये होम करतात, म्हणजे ज्ञानेंद्रियांचा निरोध करतात. काही योगी शब्दादी पंचविषयांचे हवन इंद्रियरूपी अग्नीत करतात.
127-4
एथ संयमाग्निहोत्री । जे युक्तित्रयांच्या मंत्री । यजन करिती पवित्री । इंद्रियद्रव्यी ॥127॥
धारणा, ध्यान, समाधीरूप संयम हे अग्निहोत्र, त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक तीन बंधरुपी मंत्राच्या द्वारे इंद्रिरूपी पवित्र अशा द्रव्यांनी यज्ञ करतात.
128-4
एका वैराग्यरवि विवळे । तव संयती विहार केले । तेथ अपावृत्त जाहले । इंद्रियानळ ॥128॥
दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्यावर संयमरुपी कुंडाची रचना करतात. मग त्या कुंडामध्ये इंद्रिरूपी अग्नी प्रकट होतो.
129-4
तिही विरक्तीची ज्वाळा घेतली । तव विकारांची इंधने पळिपली । तेथ आशाधूमे सांडिली । पांचही कुंडे ॥129॥
त्या इंद्रिय- अग्नीने विरक्तीच्या ज्वाला जेंव्हा वाढतात, त्यावेळी कामक्रोधाधी लाकडे पेटू लागतात. त्या वेळी कामक्रोधाधी लाकडे पेटू लागतात. त्या इंद्रिय – अग्नीच्या पाच कुंडातून आशारूपी धूर निघून गेलेला असतो.
130-4
मग वाक्यविधीचिया निरवडी । विषयआहुति उदंडी । हवन केले कुंडी । इंद्रियाग्नीचा ॥130॥
मग वेदात सांगितलेल्या विधीच्या पद्धतीने इंद्रियरुप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप आहुती देऊन ते यज्ञ करतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥4. 27॥
भावार्थ :-
दुसरे कोणी ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या मनोनिग्रहरूपी अग्निमध्ये सर्व इंद्रियांची आणि प्राणांची कर्मे हवन करतात म्हणजे इश्वराशिवाय कशाचेही चिंतन करत नाहीत.
131-4
एकी ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा । आणिकी हृदयारणी मंथा । विवेकु केला ॥131॥
हे अर्जुना ! अनेक साधकांनी विविध प्रकारचे यज्ञ करून आपल्या चित्तातील दोष नाहीसे केले आहेत. दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात.
132-4
तो उपशमे निहटिला । धैर्ये वरी दाटिला । गुरुवाक्ये काढिला । बळकटपणे ॥132॥
तो धैर्यरूपी भाराने दाबून शांतिरुप रज्जूने घसळून गुरुवाक्यरूपी मंत्राने त्याचे मंथन करतात.
133-4
ऐसे समरसे मंथन केले । तेथ झडकरी काजा आले । जे उज्जीवन जहाले । ज्ञानाग्नीचे ॥133॥
समरसतेने मंथन केले असता त्याचा त्वरित उपयोग होतो आणि ज्ञानाग्नि प्रकट होतो.
134-4
पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु । मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ॥134॥
त्यावेळी रिद्धी- सिद्धीचा मोह हाच उत्पन्न झालेला धूर नाहीसा होऊन जातो. मग सूक्ष्म अशी अग्नीची ठिणगी उत्पन्न होते.
135-4
मन तयाचे मोकळे । तेचि पेटवण घातले । जे यमदमी हळुवारले । आइते होते ॥135॥
यम नियमांच्या अभ्यासाने वाळून हलके असे झालेले मन, हे त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवन घालतात.
136-4
तेणे सादुकपणे ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा । स्नेहेसी नानाविधा । जाळिलिया ॥136॥
त्याच्या आधारे ज्वाला प्रज्वलित होतात. मग त्यामध्ये विविध प्रकारच्या वासनारूप समिधा मोहरूपी तुपासह जळतात.
137-4
तेथ सोहंमंत्रे दीक्षिती । इंद्रियकर्माचिया आहुती । तिये ज्ञानानळी प्रदीप्ती । दिधलिया ॥137॥
यज्ञ करणारा पुरुष मी ब्रम्हरूप आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रियकर्माच्या आहुती देतो.
138-4
पाठी प्राणक्रिचेनि स्रुवेनिशी । पूर्णाहुती पडली हुताशी । तेथ अवभृत समरसी । सहजे जाहले ॥138॥
प्राणाच्या श्वासादी क्रियारूपी स्रुवापात्रासह ज्ञानाग्नित पूर्णाहुती पडली असता सहजपणे निर्बीज अशा समाधीच्या ऐक्यामध्ये त्या यज्ञकर्त्या पुरुषाचे अवभूत स्नान झालेले असते.
139-4
मग आत्मबोधीचे सुख । जे संयमाग्नीचे हुतशेष । तोचि पुरोडाशु देख । घेतला तिही ॥139॥
संयम अग्निमध्ये होमद्रव्याचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख, तोच पुरोडाश मग ते सेवन करतात.
140-4
एक ऐशिया इही यजनी । मुक्त ते जाहले त्रिभुवनी । या यज्ञक्रिया तरी आनानी । परि प्राप्य ते एक ॥140॥
अशा प्रकारचा यज्ञ करून अनेक लोक या त्रिभुवनात मुक्त झाले आहेत. या पुरुषांच्या यज्ञक्रिया जरी भिन्न-भिन्न असल्या; तरीपण त्या सर्वाचे प्राप्तव्य एकच आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥4. 28॥
भावार्थ :-
त्याचप्रमाणे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योग्यज्ञ, वाग्ययज्ञ, व ज्ञानयज्ञ असे पाच प्रकारचे यज्ञ आहेत. तीक्ष्ण व्रते आचरण करणारे यतीच हे यज्ञ करतात.
141-4
एक द्रव्ययज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रिया निपजती । एक योगयागुही आहाती । जे सांगितले ॥141॥
त्यापैकी एकाला द्रव्ययज्ञ, एकाला तापोयज्ञ तर अष्टांग साधनेने साधलेल्या यज्ञाला योगयज्ञ असे म्हणतात.
142-4
एकी शब्दी शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे । ज्ञाने ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥142॥
ज्यामध्ये शब्दाने शब्दांचा होम केला जातो, अर्थात विधीप्रमाणे वेदांचे अध्ययन केले जाते, त्याला वाग्यज्ञ म्हणतात आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रम्हाशी एकरूपता प्राप्त होते, त्याला ज्ञानयज्ञ असे म्हणतात.
143-4
हे अर्जुना सकळ कुवाडे । जे अनुष्ठिता अतिसांकडे । परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशे ॥143॥
हे अर्जुना ! हे सर्व यज्ञ करणे अतिशय कठीण आहे; कारण यांचे अनुष्ठान करणे अतिशय अवघड आहे. परंतु ज्यांनी आपली इंद्रिय जिंकली आहेत, त्यांना मात्र ते करण्याची योग्यता प्राप्त होते आणि त्याचे आचरण घडते.
144-4
ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धी आथिले । म्हणोनि आपणपा तिही केले । आत्महवन ॥144॥
ते यज्ञंकर्मामध्ये प्रवीण असतात आणि साधनसमृद्धीने संपन्न असतात; म्हणून त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याच्या ठिकाणी हवन केलेले असते.
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपाऽनं तथापरे ।
प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥4. 29॥
भावार्थ :-
कोणी अपानवायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात, यास पूरक म्हणतात. कोणी प्राणवायूच्या ठिकाणी अपानवायूचे हवन करतात, यास रेचक म्हणतात. काही प्राणायामामध्ये तत्पर असणारे प्राणवायू आणि अपानवायू या दोन्हीचा विरोध करतात, म्हणजे कुंभक करतात.
145-4
मग अपाग्नीचा मुखी । प्राणद्रव्ये देखी । हवन केले एकी । अभ्यासयोगे ॥145॥
कित्येक योगी अभ्यासाने अपानवायुरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात, म्हणजे पूरक नावाचा प्राणायाम करतात.
146-4
एकु अपानु प्राणी अर्पिती । एक दोहीतेही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ॥146॥
हे अर्जुना ! काही साधक प्राणवायूच्या ठिकाणी शरीरात असलेल्या अपानवायूला बाहेर सोडून हवन करतात. याला रेचक म्हणतात. कित्येक योगी प्राण आणि अपान या दोघाच्याही गतीचा निरोध करतात. त्यांना प्राणायामी म्हणतात.
अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति ।
सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥4. 30॥
भावार्थ :-
दुसरे काही योगी आहाराचे नियमन करतात आणि प्राणाचा प्राणवायूत होम करतात. हे सर्वही यज्ञ जाणणारे योगी यज्ञाने पापाचा नाश करून टाकतात.
147-4
एक वज्रयोगक्रमे । सर्वाहारसंयमे । प्राणी प्राणु संभ्रमे । हवन करिती ॥147॥
कित्येक योगी वज्रसनाच्या मुळंबंधाच्या पद्धतीचे सर्व आहाराचे संयमन करून, प्रयत्नाने प्राणांचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात.
148-4
ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ । ही यज्ञद्वारा मनोमळ । क्षाळण केले ॥148॥
याप्रमाणे हे सर्व यज्ञ करणारे मोक्षाची इच्छा करतात. यज्ञ करणे, हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी यज्ञाच्या आधारे मनातील सर्व प्रकारचे दोष घालविले असतात.
149-4
जया अविद्याजात जाळिता । जे उरले निजस्वभावता । जेथ अग्नि आणि होता । उरेचिना ॥149॥
त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे स्वाभाविकपणेच मूळचे शुद्ध स्वरूप शिल्लक राहते तेथे अग्नी व यज्ञकर्ता हा कोणत्याही प्रकारचा द्वैतभाव शिल्लक राहत नाही.
150-4
जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचे विधान सरे । मागुते जेथूनि वोसरे । क्रियाजात ॥150॥
ज्या ठिकाणी यज्ञ करांनाऱ्याची इच्छा पूर्ण होते आणि यज्ञाक्रिया संपून जातात आणि जेथून क्रिया या मागे परतून ओसरून (नाहीशा होतात) जातात,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ४३ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ४०५ ते ५१६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 505
काय ते विरक्ती न कळेचि आम्हा । जाणो एका नामा विठोबाच्या ॥१॥
नाचेन मी सुखे वैष्णवाचे मेळी । दिंडी टाळघोळी आनंदे या ॥धृपद॥
शांति क्षमा दया ते मी काय जाणे । विठ्ठल कीर्तने वाचूनिया ॥२॥
कासया एकात सेवू तया वना । आनंदे या जनामाजी असो ॥३॥
कासया उदास होऊ देहावरी । अमृतसागरी बुडोनिया ॥४॥
तुका म्हणे मज असे हा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥५॥
अर्थ
विरक्तीचे स्वरूप कसे असते ते आम्ही जाणत नाहि, फक्त विठोबाचे एकमात्र नाम आम्ही जाणतो. वैष्णवांच्या मेळाव्यात मी सुखाने नाचत असतो. टाळाच्या गजरात गळ्यात विणा घालून आम्ही आनंदाने रंगून जात असतो. दया, क्षमा, शांतीचे स्वरूप मुद्दाम जाणण्याचा प्रयत्न करत नाही. पांडुरंगाच्या, गोविंदाच्या कीर्तनात हे सर्व काही येते. म्हणून त्याच्या नामसंकीर्तनावाचून आम्ही दुसरे काही जाणत नाही. वनात जाऊन मुद्दाम एकाकांतात राहण्याची गरज नाही, जना मध्ये राहून आनंदामध्ये विठ्ठलाचे नाम गात राहू. आनंदाच्या सागरात मी तरंगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल हा आमच्या बरोबर चालत असतो, असा आमचा दृढ विश्वास आहे, म्हणून आम्हाला कसलीही भीती राहिली नाही.
अभंग क्र. 506
जेथे वैष्णवाचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥
दोष नाही ओखदासी । दूत सांगे यमापाशी ॥धृपद॥
गरुडटकयांच्या भारे । भूमि गर्जे जयजयकारे ॥२॥
सहज तया जना छंद । वाचे गोविंद गोविंद ॥३॥
तुळसीवने रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥४॥
तुका म्हणे भेणे । काळ नये तेणे राने ॥५॥
अर्थ
जेथे वैष्णवाचा वास असतो, ती भूमी व तो देश पुण्यवान आहे. त्या ठिकाणी थोडे सुद्धा दोष नाहीत, असे यमाचे दूत यमास सांगत आहे. गरुडाचे चिन्ह असलेल्या पताकांच्या भाराने आणि प्रभूनामाच्या जयजयकाराने हि भूमी दुमदुमून जात असते. तेथील लोकांना गोविंदाच्या नामस्मरणाचा सहजच छंद लागलेला असतो. खरोखरी तुळशी वृन्दावने रांगोळ्या हा सुखसोहळा म्हणजे एक सर्वप्रकारे वैकुंठाचा सोहळाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात भीतीने काळ देखील याबजूस फिरकत नाही.
अभंग क्र. 507
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरू ॥१॥
पडिये देहभावे पुरवी वासना । अती ते आपणापाशी न्यावे ॥धृपद॥
मागे पुढे उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योगक्षेम त्याचे जाणे जडभारी । वाट दावी करी धरूनिया ॥३॥
तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी । पाहावे पुराणी विचारूनी ॥४॥
अर्थ
माझ्या विठोबाचा प्रेम भाव कसा आहे म्हणून सागू ? तो देव रूपाने कृपा करतो व गुरुच देव आहे. भक्तांसाठी देह धरण करून त्यांची इच्छा पुरवतो आणि शेवटी आपणा जवळ घेऊन जातो. तो भक्तांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो भक्तांच्या संकटाचे निवारण करतो. भक्तांचे संकट जाणून त्यांचे योग क्षेम निवारण करतो आणि भक्तांच्या हाताला धरून भक्ती मार्गाची वाट हि दाखवितो. तुकाराम महाराज म्हणतात या वाचनावर ज्यांचा विश्वास नाही, त्यांनी पुराणातील अनेक उदाहरणे पहावीत.
अभंग क्र. 508
सकळ धर्म मज विठोबाचे नाम । आणीक ते वर्म नेणे काही ॥१॥
काय जाणो संता निरविले देवे । करिती या भावे कृपा मज ॥२॥
तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळो यावा ॥३॥
अर्थ
विठोबाचे नाम घेतले की, यामध्ये सर्व धर्म घडतात. देवाच्या निस्वार्थ प्रेम शिवाय मी दुसरे कोणतेही गूढ वर्म जाणत नाही. देवाने मला संतांच्या स्वाधीन केलेले दिसते, कारण तेही माझ्या वर कृपा करतात. तुकाराम महाराज म्हणतात माझा कोणता अधिकर आहे की, संतांनी त्यांचे प्रेम मला देऊन मला त्यांनी मला भक्तीचा मार्ग समजून सांगावा.
अभंग क्र. 509
उदंड शाहाणे होती तर्कवंत । परि नेणवेचि अंत विठोबाचा ॥१॥
उदंडा अक्षरा करोत भरोवरी । परि नेणेवेची थोरी विठोबाची ॥२॥
तुका म्हणे नाही भोळेपणाविण । जाणीव ते सिण रिते माप ॥३॥
अर्थ
नाना प्रकारचे तर्क करणारे बुद्धिवंत, शहाणे लोक अनेक आहेत, परंतु विठ्ठलच्या स्वरूपाचा त्यांना अंत लागत नाही. परमार्थातील अक्षरे घोकून पाठ कारणारे आणि अभ्यासाचा त्रास घेणारे लोक अनेक आहेत, त्यांनाही विठ्ठलाची खरी थोरवी समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानाचे माप किती थोर असले, तरी रितेच असते. यासाठी निस्वार्थ अशी भोळी भाबडी भक्ती करून परमार्थ साधावा.
अभंग क्र. 510
आधारावाचुनी । काय सांगसील काहाणी ॥१॥
ठावा नाही पंढरीराव । तोवरी अवघेचि वाव ॥धृपद॥
मानिताहे कोण । तुझे कोरडे ब्रम्हज्ञान ॥२॥
तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥३॥
अर्थ
आधाराशिवाय म्हणजे अनुभूती शिवाय कोणत्याही गप्पागोष्टी कश्या काय सागतो ? जो पर्यंत पंढरीरायाचे खरे स्वरूप समजले नाही, तोपर्यंत नुसते ज्ञान संपादन करून काय उपयोग ? भक्ती शिवाय कोरडे ज्ञान काय उपयोगाचे ? ते कोण बरे ऐकणार ? तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला विठ्ठलाचे विशाल स्वरूप जाणून घ्यायचे असेल. तर ज्ञानाचा अहंकार दूर ठेवा.
अभंग क्र. 511
अनाथांची तुम्हा दया । पंढरीराया येतसे ॥१॥
ऐसी ऐकोनिया कीर्ती । बहु विश्रांति पावलो ॥धृपद॥
अनाथांच्या धावा घरा । नामे करा कुडावा ॥२॥
तुका म्हणे सवघड हित । ठेवू चित्त पायापे ॥३॥
अर्थ
पंढरीराया, जे भक्त अनाथ असतात, त्यांची दया तुम्हाला येत असते. अशी तुमची कीर्ती ऐकून मी फार समाधानी झालो. जे अनाथ तुमच्या नावाचा धावा करतात, त्यांच्यासाठी तुम्ही धावत जाता. त्यांचे रक्षण करता. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला, आमचे चित्त तुमच्या चरणावर स्थिर करू त्यातच आमचे हित सामावलेले आहे.
अभंग क्र. 512
येथे नाही उरो आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥
विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे भंग ॥धृपद॥
वाहोनिया भार कुंथसील ओझे । नव्हे तेचि माझे थीता त्याग ॥२॥
तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज । संती केशीराज साधियेला ॥३॥
अर्थ
देवाने घेतलेले मत्स्य कुर्मादी अवतार राहिले नाही, तर मग इतर विषया भोगणाऱ्या जीवाची काय कथा आहे ? तुम्ही विषयांमध्ये फार आसक्त होऊ नका. तुम्ही जर विषयांच्या चक्रामध्ये सापडलात, तर त्याचा शेवट काय होईल, हे काहीच सांगता येत नाही ? या भवसागराचा भार तुम्ही वाहून जो त्रास करून घेता, तो विनाकारणच होईल हे. त्यामुळे तुमच्या स्वता:च्या हिताचा तुमच्या हातून भंग होईल. तुकाराम महाराज म्हणतात संतानी ईश्वरची प्राप्ती करून घेतली आहे. पण तुम्हाला याचे काहीच का बरे वाटत नाही ?
अभंग क्र. 513
हीच त्याची पंचभूते । जीवन भाते प्रेमाचे ॥१॥
कळवळा धरिला संती । ते निगुती कैवाड ॥धृपद॥
हाच काळ वर्तमान । समाधान ही संपत्ती ॥२॥
तुका म्हणे दिवसराती । हेचि खाती अन्न ते ॥३॥
अर्थ
ईश्वराविषयीचे प्रेम हेच या भक्तांचे जीवनदायी अन्न आणि पंचमहाभूतात्मक शरीर असते. संतानी हरी विषयीचा कळवळ चित्तामध्ये धारण केला आहे आणि तसाच निर्धार करून त्याचा स्वीकार केला आहे. नेहमी समाधान रुपी संपत्ती जवळ बाळगणे हा त्यांचा वर्तमान काळ असतो. त्यांच्या हृदयात अखंड समाधान नांदत असते. त्यामुळे त्यांना सर्व काळ सारखाच वाटत असतो. तुकाराम महाराज म्हणतात हरी भक्त हे रात्रंदिवस प्रभूप्रेमच्या ब्रम्ह रसाचे भोजन करत असतात.
अभंग क्र. 514
दीप न देखे अंधारा । आता जतन हेचि करा ॥१॥
नारायण नारायण । गाठी धन बळकट ॥धृपद॥
चिंतामणीपाशी चिंता । तत्वता ही न येल ॥२॥
तुका म्हणे उभयलोकी । हेचि निकी सामग्री ॥३॥
अर्थ
दिवा जसा अंधारला कधी पाहू शकत नाही, त्या प्रमाणे नारायणरुपी प्रेमाचादिवा हाती घेतला तर संसारातील दुःख दिसू शकणार नाहि. यासाठी भक्ती प्रेमाचे धन जतन करून ठेवा. नारायणरुपी नामाचे अनमोल धन आपल्या गाठींशी बांधून ठेवा. चिंतामणी आपल्या जवळ असेल, तर कोणत्याही चिंता शिल्लक राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात उभय लोकात हरीचे प्रेम हीच एक सर्व श्रेष्ठ सामग्री आहे.
अभंग क्र. 515
धन्य काळ संत भेटी । पायी मिठी पडिली तो ॥१॥
संदेहाची सुटली गाठी । झालो पोटी शीतळ ॥धृपद॥
भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादे ॥२॥
तुका म्हणे मंगळ आता । कोण दाता याहुनि ॥३॥
अर्थ
संतांच्या चरणांशी मिठी पडते तो काळ फारच धन्य होय. त्यांच्या भेटीमुळे संशयाच्या सर्व गाठी सुटून जातात. त्यामुळे मन शांत आणि प्रसन्न होते. संतांच्या कृपाप्रसादाने भवनदीच नाव (नौका) बनते आणि पैलीतीरी किनाऱ्यावर उतरविते. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्याही पेक्षा अधिक मंगलकारक असा कोण बरे दाता आहे ?
अभंग क्र. 516
दिन रजनी हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥
संकल्पिला देह देवा । सकळ हेवा ते ठायी ॥धृपद॥
नाही अवसान घडी । सकळ जोडी इंद्रिया ॥२॥
कीर्ती मुखे गर्जे तुका । करी लोका सावध ॥३॥
अर्थ
दिवस रात्र आम्ही एकच काम करतो, ते म्हणजे भगवंताच्या लीला विलासाचे गुणगान करणे. आम्ही हा देह देवाला समर्पण केला असून आमचे सर्व संकल्प देवाविषयीचे आहेत. सर्व इंद्रियांच्या वृत्ती देवाकडे वळविल्या असून या शिवाय दुसरी भावना क्षण भर देखील निर्माण होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवाची कीर्ती आम्ही गर्जना करून सांगत आहोत आणि सर्व लोकांना सावध करीत आहोत.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















