
१६ फेब्रुवारी, दिवस ४७ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा, ओवी १ ते २५ सार्थ तुकाराम गाथा अभंग ५५३ ते ५६४
“१६ फेब्रुवारी” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 16 feburvari
राम कृष्ण हरी आज दिनांक १६ फेब्रुवारी असून आजचे पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरी च्या 25 ओव्या आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील अभंग १ ते ७० असे एकूण 70 अभंगाचे पारायण आपण करणार आहोत.
सार्थ ज्ञानेश् ॥
ॐ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॐ॥
॥ अथ पञ्चमोऽध्यायः– अध्याय पाचवा ॥ संन्यासयोगः
अध्याय पाचवा
अर्जुन उवाचः
संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यत् श्रेयं एतयोरेके तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥5. 1॥
भावार्थ :-
अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुनः कर्माचे अनुष्ठान करावे असेंहि तूच सांगतोस. या दोन्हीपैकी (तुझ्या मताने) जे खरोखर श्रेयस्कर असेल ते एक मला निश्चित सांग.
1-5
मग पार्थु श्रीकृष्णाते म्हणे । हा हो हे कैसे तुमचे बोलणे । एक होय तरी अंतःकरणे । विचारू ये ॥1॥
मग अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, ” अहो ! हे असे कसे तुमचे बोलणे ? तुम्ही एकच मार्ग सांगाल, तर त्यासंबंधी मनाने काही विचार करता येईल.
2-5
मागा सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हीचि निरोपिला होता बहुवसु । तरी कर्मयोगी केवी अतिरसु । पोखीतसा पुढती ॥2॥
यापूर्वी तुम्ही कर्माचा त्याग करावा, हे विविध प्रकारे सांगितले होते; परंतु आता कर्मयोग आचरणासाठी अधिक उत्तेजन का देता ?
3-5
ऐसे द्व्यर्थ हे बोलता । आम्हा नेणतयांचिया चित्ता । आपुलिये चाडे अनंता । उमजू नोहे ॥3॥
हे श्रीअनंता ! आपले असे दोन्ही मार्गाचे बोलणे ऐकून आम्हा अज्ञानी लोंकांच्या मनाला काही उलगडा होत नाही.
4-5
एके एकसाराते बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हे आणिकी काय सांगिजे । तुम्हाप्रति ॥4॥
ऐका. एका (सारभूत) तत्वाचा बोध करायचा असेल, तर ते एकच निश्चितपणे सांगितले पाहिजे. हे तुम्हाला दुसऱ्याने दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय ?
5-5
तरी याचिलागी तुमते । म्या राऊळासी विनविले होते । जे हा परमार्थु ध्वनिते । न बोलावा ॥5॥
याकरताच आपल्यासारख्या श्रेष्ठयाना मी विनंती केली होती की, परमार्थ हा गूढ अर्थाने सांगू नका.
6-5
परी मागील असो देवा । आता प्रस्तुती उकलु देखावा । सांगे दोहींमाजि बरवा । मार्गु कवण ॥6॥
पण देवा ! मागील गोष्ट राहू दे. आता प्रस्तुत दोन्ही मार्गांपैकी कोणता मार्ग चांगला आहे, हे स्पष्ट करून सांगावे.
7-5
जो परिणामीचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा । आणि अनुष्ठिता प्रांजळा । सावियाचि ॥7॥
जो मार्ग परिणामी अमृतमधुर आहे, ज्याचे फळ अचूक प्राप्त होते आणि जो आचरण करण्यास सहजच सरळ आहे,
8-5
जैसे निद्रेचे सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे । तैसे सोकासना सांगडे । सोहपे होय ॥8॥
निद्रेचे सुख मध्येच भंग न पावता रस्ता तर पार करता आला पाहिजे, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा असेल, तो मार्ग मला सांगावा.
9-5
येणे अर्जुनाचेनि बोले । देवो मनी रिझले । मग होईल ऐके म्हणितले । संतोषोनिया ॥9॥
असे अर्जुनाचे बोलणे ऐकून देवाच्या मनात प्रसन्नता तरारली आणि परम संतोषाने ते अर्जुनास म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल.
10-5
देखा कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये । तो चंद्रुहि परी लाहे खेळावया ॥10॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाहा, ज्या दैववानाला (सुदैवाने ज्याला) कामधेनुसारखी आई लाभली आहे, त्याला आकाशातील चंद्रदेखील खेळायला मिळतो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
11-5
पाहे पा शंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता । काय क्षीराब्धि दूधभाता । देईजेचिना ॥11॥
असे पाहा की, शंकरांनी प्रसन्न होऊन उपमन्यूला त्याच्या इच्छेप्रमाणे दूधभात खाण्यासाठी दुधाचा सागर दिला.
12-5
तैसा औदार्याचा कुरुठा । कृष्ण आपु जाहलिया सुभटा । का सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा ॥12॥
त्याप्रमाणे औदार्याचे घर असणारा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या अधीन झाल्यावर अर्जुन सर्वसुखाचे वसतिस्थान का बरे होणार नाही ?
13-5
एथ चमत्कारु कायसा । गोसावी लक्ष्मीकांताऐसा । आता आपुलिया सवेसा । मागावा की ॥13॥
यामध्ये आश्चर्य ते काय आहे ? लक्ष्मीकांतसारखा मालक लाभल्यावर आता आपल्या इच्छेप्रमाणे मागितले पाहिजे.
14-5
म्हणोनि अर्जुने म्हणितले । ते हासोनि येरे दिधले । तेचि सांगेन बोलिले । काय कृष्णे ॥14॥
म्हणून अर्जुनाने जे मागितले, ते श्रीकृष्णांनी त्याला प्रसन्न चित्ताने दिले. श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात, श्रोतेहो, श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोलले, तेच मी तुम्हाला आता सांगत आहे.
श्रीभगवानुवाचः
संन्यासं कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात् कर्मयोगो विशिष्यते ॥5. 2॥
भावार्थ :-
भगवान म्हणाले, कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याणकारी आहेत; परंतु त्या दोन्हीपैकी (कर्माचा त्याग व कर्माचे अनुष्ठान हे दोन्ही मोक्षाला कारणीभूत आहेत) कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग हा सर्वाना सुगम असल्याने श्रेष्ठ आहे.
15-5
तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारिता । मोक्षकर तत्वता । दोनीहि होती ॥15॥
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! तात्विक दृष्टीने विचार केला, तर कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही मोक्षाची प्राप्ती करून देणारे आहेत.
16-5
तरी जाणा नेणा सकळा । हा कर्मयोगु कीर प्रांजळा । जैसी नाव स्त्रिया बाळा । तोयतरणी ॥16॥
ज्याप्रमाणे नाव पुरुषांप्रमाणेच, स्त्रियांना आणि बालकांनाही पाण्यातून तरुण जाण्यास सोपे साधन आहे, त्याप्रमाणे जाणत्यांना, नेणत्यांना (हा संसाररुपी) भवसागर तरुण जाण्यासाठी हा निष्काम कर्मयोग सुलभ आहे.
17-5
तैसे सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणे संन्यासफळ लाहिजे । अनायासे ॥17॥
सारासार विचार करून पहिले असता, निष्काम कर्मयोग फार सोपा आहे, त्याच्या आचरणाने कर्मसंन्यासाचे फळ अनायासे प्राप्त होते.
18-5
आता याचिलागी सांगेन । तुज संन्यासियाचे चिन्ह । मग सहजे हे अभिन्न । जाणसी तू ॥18॥
याकरिता तुला कर्मसंन्यासाचे लक्षण सांगतो, मग हे दोन्ही मार्ग एकच आहेत, असे तू जाणशील.
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङक्षति ।
निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात् प्रमुच्यते ॥5. 3॥
भावार्थ :-
हे अर्जुना ! जो मनुष्य कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणत्याही विषयाची इच्छा करत नाही, तो निष्काम कर्मयोगी सदा संन्यासीच समजणे योग्य आहे. कारण रागद्वेषादीपासून सुटलेला मनुष्य सुखपूर्वक संसारबंधनातून मुक्त होतो.
19-5
तरी गेलियाचि से न करी । न पवता चाड न धरी । जो सुनिश्चळु अंतरी । मेरु जैसा ॥19॥
जो होऊन गेलेल्या गोष्टीची आठवण काढत नाही, एखादी वस्तू प्राप्त झाली, तरी त्याचा आनंद मानत नाही, जो मेरुपर्वताप्रमाणे अंतर्यामी स्थिर असतो,
20-5
आणि मी माझे ऐसी आठवण । विसरले जयाचे अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥20॥
आणि हे पार्था ! ज्याच्या अंतःकरणात मी आणि माझे याचे स्मरणदेखील राहिलेले नसते, तो सदोदित संन्यासी आहे, असे जाणावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
21-5
जो मने ऐसा जाहला । संगी तोचि सांडिला । म्हणोनि सुखे सुख पावला । अखंडित ॥21॥
ज्याच्या मनाची अशी अवस्था झाली, त्याला विषयांची इच्छा सोडून जाते; म्हणून त्याला सहजसुखाने अखंड मोक्ष प्राप्त होतो.
22-5
आता गृहादिक आघवे । ते काही नलगे त्यजावे । जे घेते जाहले स्वभावे । निःसंगु म्हणऊनि ॥22॥
अशी स्थिती असलेल्या माणसाला घर, प्रपंच वगैरे काही त्यागावे लागत नाही; कारण मी पणाच्या अभिमानाने प्रपंचाचा स्वीकार करणारे त्याचे मन अंतः करणापासून स्वभावतःच निःसंग झालेले असते.
23-5
देखे अग्नि विझोनि जाये । मग जे रांखोंडी केवळु होये । तै ते कापुसे गिंवसू ये । जियापरी ॥23॥
प्रज्वलित अग्नी विजून गेला, की त्याची राखच शिल्लक राहते. ती राख कापसानेदेखील धरून ठेवता येते.
24-5
तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे जो कर्मबंधीं । जयाचीचे बुद्धी । संकल्पु नाही ॥24॥
त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प निर्माण होत नाही, तो प्रपंचाच्या उपाधित असूनसुद्धा कर्मबंधात सापडत नाही.
25-5
म्हणोनि कल्पना जै सांडे । तैचि गा संन्यासु घडे । या कारणे दोनी सांगडे । संन्यासयोगु ॥25॥
ज्यावेळी मनातील कल्पनेचा त्याग होतो, त्यावेळी संन्यास घडतो आणि म्हणूनच कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही फलतः सारखेच आहेत.
सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥5. 4॥
भावार्थ :-
अज्ञानी लोक सांख्ययोग आणि कर्मयोग यांना वेगवेगळे फल देणारे म्हणतात. परंतु ज्ञानी लोक तसे म्हणत नाहीत; कारण या दोन्हीपैकी एका साधनेचे शास्त्रशुद्ध अनुष्ठान केले, तर दोन्हीचे फलरूप मोक्ष म्हणजे परमात्माप्राप्ती होते.
दिवस ४७ वा
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ५५३ ते ५६४
सार्थ तुकाराम गाथा
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. 553
संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे । काय म्या गव्हारे जाणावे हे ॥१॥
विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथे मज बोध काय कळे ॥धृपद॥
करितो कवित्व बोबडा उत्तरी । झणी मजवरी कोप धरा ॥२॥
काय माझी याति नेणा हा विचार । काय मी ते फार बोलो नेणे ॥३॥
तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥४॥
अर्थ
मी माझ्या अभंगातून जे काही बोललो, ते पूर्वी झालेल्या महान संतानी सांगितले आहे मी जे काही बोलतोय ते संतांचे उच्छिष्ट बोल आहे. नाहीतर माझ्या सारख्या गावंढळ माणसाने काय बरे सांगावे. विठ्ठलाचे नाम मला निट घेता येत नाही. अशा स्तीतीत मला आत्मज्ञान कसे होणार ? मी कौतुकाने, प्रेमाने बोलत आहे. हे माझे बोबडे बोल आहेत. तरी माझ्यावर कोणी रागावू नका. मो कोण आहे हे तुम्हाला माहित आहे ना मग या विषयी मी अधिक बोलणे योग्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या मुखातून देवच बोलत आहे त्याचा गूढ अर्थ तोच जाणत आहे.
अभंग क्र. 554
चंदनाच्या वासे धरितील नाक । नावडे कनक न घडे हे ॥१॥
साकरेची गोडी सारिखी सकळा । थोरा मोठ्या बाळा धाकुटिया ॥२॥
तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते । तरि का निंदित जन मज ॥३॥
अर्थ
चंदनाचा सुगंध आला तर कोणी नाक धरून बसेल काय ? कनक (सोने) कोणाला आवडणार नाही, असे होईल काय ? साखरेची गोडी लहान अथवा मध्यम किंवा थोर वयाच्या लोकांना सारखीच असते. तुकाराम महाराज म्हणतात माझे चित्त जर शुध्द असते तर लोकांनी माझी निंदा कधीच केली नसती.
अभंग क्र. 555
तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ॥१॥
शुद्ध हीन काही न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देही ॥२॥
भावे हे कदान्न खासी त्याचे घरी । अभक्ताच्या परी नावडती ॥३॥
नवजासी जेथे दुरी दवडिता । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥४॥
तुका म्हणे ऐसी ब्रीदे तुझी खरी । बोलतील चारी वेद मुखे ॥५॥
अर्थ
हे प्रभू तुझ्या सारखा उदार दाता या जगात कोण बरे आहे ? तू दातृव्ताची एक मूर्ती आहेस. तू आपल्याला स्वतःचे स्थान आपल्या दासांना देत असतोस. तू आपल्या भक्तांचे कुळ शुध्द आहे की, अशुद्ध आहे, हे काही न पाहता त्याच्या निर्मळ देहात वास करत असतो. त्यांच्या घरातले साधे सुधे अन्न तू मोठ्या प्रेमाने खातोस परंतु जे अभक्त आहेत त्यांच्या घरचे मिष्टांन्न देखील तू खात नाहीस. ते तुला आवडत नाहि. प्रेमळ वैष्णवांच्या घरातून तू काही केले तरी जात नाहीस. पण अहंकाराने योग साधना करणाऱ्या साधकांकडे काही केले तरी तू येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरी तू भक्तावर कृपा करणारा आहेस. अशीजी ब्रीदे आहेत ती खरी आहेत. त्याचे वर्णन चारी वेद स्वमुखाने सांगतात.
अभंग क्र. 556
तरि का नेणते होते मागे ॠषी । तीही या जनासी दुराविले ॥१॥
वोळती जया अष्टमहा सिद्धी । ते या जनबुद्धी नातळती ॥२॥
कंदमूळे पाला धातूच्या पोषणा । खाती वास रानातरी केला ॥३॥
लावुनिया नेत्र उगेचि बैसले । न बोलत ठेले मौन्यरुप ॥४॥
तुका म्हणे ऐसे करी माझ्या चित्ता । दुरावी अनंता जन दुरी ॥५॥
अर्थ
प्रपंचाच्या भोवऱ्यात रमणाऱ्या लोका पासून पूर्वीचे ऋषी मुनी दूर राहिले, का बरे त्यांना समजत नव्हते की काय ? अष्टमाहा सिद्धी ज्यांच्या चरणांजवळ होत्या ते ऋषी मुनी लोकांच्या प्रमाणे अजिबात वागत नव्हते. ते ऋषी मुनी कंद मुळे पाला खाऊन त्यांनी राना वनात निवास केला. डोळे झाकून बंद करून एका जागेवर स्थिर बसले. काहीच न बोलता त्यांनी मौन व्रत धारण केले. तुकाराम महाराज म्हणतात हे अनंता माझ्या चित्ताला तू अगदी तसेच करावे प्रभू या लोकापासून मला दूर ठेवावे.
अभंग क्र. 557
कोणाच्या आधारे करू मी विचार । कोण देईल धीर माझ्या जीवा ॥१॥
शास्त्रज्ञ पंडित नव्हे मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाही ॥२॥
कलियुगी बहु कुशळ हे जन । छळितील गुण तुझे गाता ॥३॥
मज हा संदेह झाला दोही सवा । भजन करू देवा किंवा नको ॥४॥
तुका म्हणे आता दुराविता जन । किंवा हे मरण भले दोन्ही ॥५॥
अर्थ
मी आता कोणाच्या आधारे परमार्थाचा विचार करू ? कोण बरे माझ्या आता जीवाला धीर देईल ? मी कुठला शाश्रज्ञ पंडित नाही अथवा मोठा वाचक नाही. मी याती हीन असून मला दुसरीकडे कोणाचा आधार नाही. या कलियुगात लोक अतिशय चतुर आहेत शुध्द भावनेने तुझे भजना द्वारे तुझे गुणगान करीत असलो, तरी ते मला छळत आहेत. लोकांच्या या छळन्या मुळे मी आता भजन करू का नको, असा संभ्रम (संदेह) मला निर्माण झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता या लोकाचा संग करू की, मी मरून जाऊ ?
अभंग क्र. 558
काय उणे जाले तुज समर्थासी । ऐसा मजपाशी कोण दोष ॥१॥
जो तू माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधी ॥२॥
तुजविण रत आणिकाचे ठायी । ऐसे कोण ग्वाही दावी मज ॥३॥
तुका म्हणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥४॥
अर्थ
हे देवा तू सर्व समर्थ, त्रिभुवनाचा स्वामी आहेस. माझ्या अंगी तरी कोणता मोठा दोष आहे ? तू जर माझा स्वीकार केला नाहिस, तर संतांमध्ये मी हे स्पष्ट पणे सांगेन. देवा अरे तुझ्या शिवाय मी इतर दैवताच्या ठिकाणी रममाण झालो आहे, अशी साक्ष कोणी तुला देते का पहा. तुकाराम महाराज म्हणतात आता उगाच काय गुमान बसला आहेस ? मला सर्व गोष्टी तूच समजून सांग.
अभंग क्र. 559
काय करू आन दैवते । एकाविण पंढरीनाथे ॥१॥
सरिता मिळाली सागरी । आणिका नावा कैची उरी ॥धृपद॥
अनेक दीपिका प्रकाश । सूर्य उगवता नाश ॥२॥
तुका म्हणे नेणे दुजे । एकाविण पंढरीराजे ॥३॥
अर्थ
एका पंढरीनाथा शिवाय मला तरी इतर देवतांचा काय उपयोग ? नदी सागराला मिळाली, की ती त्याच्याशी एकरूप होते. मग ती वेगळ्या नावाने कशी उरेल ? सूर्योदय झाला की, अनेक दिव्याचा नाश पावतो. तुकाराम महाराज म्हणतात या विश्वात पंढरीराजाशिवाय आणिक दुसरे दैवत मी कधीच जाणत नाही.
अभंग क्र. 560
काय करू कर्माकर्म । बरे सापडले वर्म ॥१॥
होसी नामाच सारिखा । समजाविली नाही लेखा ॥धृपद॥
नाही वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥२॥
तुका म्हणे माझे । काय होईल तुम्हा ओझे ॥३॥
अर्थ
कर्माकर्म करून तरी काय करू ? मला विठ्ठल नामाचे वर्म सापडले आहे. देवा तूतुझ्या नावाप्रमाणेच कृती करतोस. तू अगदी प्रेमळ आहेस. तू अनेक भक्तांचे उद्धार केले आहेस याचे तुला देखील मोजमाप करता येणार नाही ? तू आंनदरूप आहेस, कमी होत नाही, ज्यादाही होत नाहीस, तू आहे तसा आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझा अंगीकार केला तर तुला ओझे होईल का ?
अभंग क्र. 561
एकी केली हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥१॥
आम्ही देवा शिक्तहीने । भाकु तेणे करुणा ॥धृपद॥
पावटणी केला काळ । जया बळ होते ते ॥२॥
तुका म्हणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥३॥
अर्थ
प्रेमाने बलवान असणाऱ्या संताने टाळी वाजवून ईश्वराची प्राप्ती करून घेतली, पण देवा मी शक्ती हीन आहे. म्हणून आम्ही तुमची करूणा भाकत आहोत. ज्यांच्या अंगामध्ये वैराग्याचे बळ होते, त्यांनी काळाला जिंकले. तुकाराम महाराज म्हणतात संत म्हणजे शुरांपेक्षाही शूर आहेत धैर्याचे महासागर आहेत.
अभंग क्र. 562
पुढिलाचे इच्छी फळ । नाही बळ ते अंगी ॥१॥
संत गेले तया ठाया । देवराया पाववी ॥धृपद॥
ज्येष्ठांची का आम्हा जोडी । परवडी न लभो ॥२॥
तुका म्हणे करी कोड । पुरवी लाड आमुचा ॥३॥
अर्थ
साधुं संतांनी जे काही आनंदरुपी फळ प्राप्त केले त्या आनंदाची मी इच्छा करत आहे. पण माझ्या अंगी अजून बळ नाही. संत ज्या सर्वश्रेष्ठ स्थानाला जाऊन पोहचले, हे देवराया तेथे तुम्हीच मला नेऊन पोहचवा. संतांना जे काही प्राप्त झाले ते मला कबरे प्राप्त होऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आमचे कोड करा व आमचे लाड पूरवा.
अभंग क्र. 563
कैवल्याच्या तुम्हा घरी । राशी हरी उदंडा ॥१॥
मजसाठी का जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥धृपद॥
सर्वा गुणी सपुरता । ऐसा पिता असोनी ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । जालो सांगा सन्मुख ॥३॥
अर्थ
हरी, तुमच्या घरी मोक्षाच्या पुष्कळ राशी आहेत. मग माझ्या साठी त्या गोष्टीची उणीव का बरे आहे ? मला आनंदाचा वर का बरे मिळत नाहि ? तू सर्वगुण संपन्न पिता असून माझ्या बाबतीत अशी उणीव का ? तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुमच्या समोर माझे हृदय प्रकट केले आहे आता मला सर्व काही सांगा.
अभंग क्र. 564
आपुलाल्या तुम्ही रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥१॥
हे तो नव्हे देहबुद्धीचे कारण । होईल नारायणे दान केले ॥धृपद॥
अब्रूचिया बाणे वर्मासि स्पर्शावे । हे तो नाही ठावे मोकलित्या ॥२॥
तुका म्हणे बहु मुख या वचना । सत्याविण जाणा चाली नाही ॥३॥
अर्थ
आपले रूप कसे आहे, हे तुम्ही समजून घ्या. आरश्यावर रागवून काय उपयोग आहे ? मी तर “देह” असा विचार केलातर सोंदर्य प्राप्त होत नाही तर, देवाने नारायणाने कृपा केली तर सोंदर्य प्राप्त होईल. एखाद्याने दुष्ट वचने बोलली त्याचे तर दुसऱ्याला दुख होते हे त्याला कळत नाही, बाण सोडणाऱ्याला ज्याला बाण लागला तो किती दुःखी झाला, हे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात खरे बोलण्यात सुख सामावलेले आहे. परमार्थ हा सत्यावर आधारित आहे. हे जाणावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















