Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी :- अध्याय १० वा विभूतियोग:

सार्थ ज्ञानेश्वरी अक्षर, शब्द शोध Adhyay 10 Word Search Sartha Dnyaneshwari 96 Kuli Maratha Warkari Rojnishi

सार्थ ज्ञानेश्वरी अक्षर, शब्द शोध Adhyay 10 Word Search Sartha Dnyaneshwari 96 Kuli Maratha Warkari Rojnishi

शब्द शोध ज्ञानेश्वरी :- ज्ञानेश्वरीतील कोणताही शब्द शोधा, Word Search Dnyaneshwari :- Search any word in Dnyaneshwari.
Sarth Dnyaneshwari:- Chapter 10 VIBHUTIYOG:
Sartha Dnyaneshwari Adhyay 10 VIBHUTIYOG:
Sampoorna Sarth Dnyaneshwari – All Chapters
संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी – सर्व अध्याय
॥ सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ दशमोऽध्यायः अध्याय दहावा ॥ विभूतियोग ॥
विभूतियोगोनाम दशमोऽध्यायः ॥10॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 72 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 335 ॥

सूची :- शब्द शोध सार्थ ज्ञानेश्वरी

॥ सार्थ श्रीज्ञानेश्वरी: :: ॥ अथ दशमोऽध्यायः अध्याय दहावा ॥ विभूतियोग ॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
अध्याय दहावा
1-10
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥1॥
स्पष्ट ब्रह्मबोध करून देण्यात निपुण असणारे, ब्रह्मविद्यारूपी कमलाला विकसित करणारे, पराविद्येचे प्रमेय जे परब्रह्म- तीच कोणी स्री- तिच्याशी विलास करणारे, अशा तुम्हाला, हे श्रीगुरो ! माझा नमस्कार असो.
2-10
नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या । तरुणतरतूर्या । लालनलीला ॥2॥
जे अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश करणारे सूर्य आहेत, उपमा देता येणार नाही असे जे अगाध सामर्थ्यवान आहेत, तरूण म्हणजे उत्पत्तिनाशरहित व तरुणतर म्हणजे प्रयत्नावाचून अखंड कायम राहणार्‍या अशा तूर्यांवस्थेचे जे पालन करण्याची लीला करणारे आहेत, अशा श्रीगुरो ! तुम्हाला नमस्कार असो.
3-10
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥3॥
जे संपूर्ण जगाचे पालन करणारे आहेत, जे संपूर्ण कल्याणरूपी रत्नांचा सांठा आहेत किंवा सर्व कल्याणात श्रेष्ठ असे जे आत्मकल्याणाचा सांठा आहेत, जे सज्जनरूपी वनास चंदनासारखे सुगंधित करून सोडणारे आहेत, ब्रह्मादिकांना सेव्य हेच ज्यांचे चिन्ह आहे, हे श्रीगुरो ! अशा तुम्हाला माझा नमस्कार असो.
4-10
नमो चतुरचित्तचकोर चंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिसार समुद्रा । मन्मथमन्मथा ॥4॥
जे चतुरांच्या चित्तरूपी चकोराला चंद्राप्रमाणे आल्हादकारक आहेत, जे आत्मानुभवाचे राजे आहेत, श्रृतीचे सार जे ब्रह्मज्ञान, त्याचा जे समुद्र आहेत व जे कामालाहि मोहून घेणारे किंवा जिंकणारे आहेत, अशा श्रीगुरुराया ! तुम्हाला माझा नमस्कार असो.
5-10
नमोसुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना । विश्वोद्‍भवभुवना । श्रीगुरुराया ॥5॥
जे निष्काम प्रेमाने भजन करण्यास योग्य आहेत, जे संसाररूपी हत्तीचे गंडस्थल फोडणारे आहेत, जे सर्व जगताच्या उत्पत्तीला किंवा भासाला अधिष्ठानभूत आहेत, अशा श्रीगुरुनाथा ! तुम्हाला नमस्कार असो.
6-10
तुमचा अनुग्रहो गणेशु । जै दे आपुला सौरसु । तै सारस्वती प्रवेशु । बाळकाही आथी ॥6॥
श्रीगुरुनाथा ! तुमची कृपा हीच गणेश देवता होय. तिने आपला प्रसाद केला असता, अज्ञ नेणता बालक देखील सर्वविद्यापारंगत होतो.
7-10
जी दैविकी उदार वाचा । जै उद्देशु दे नाभिकाराचा । तै नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ॥7॥
अहो जी गुरुनाथा ! तुम्हा देवाच्या थोर औदर्याने संपन्न असलेल्या वाणीकडून ” भिऊ नकोस ” असे अभय वचन मिळाले असता, श्रृंगारादि नवरसरूपी अमृताच्या समुद्राचाही थांग घेता येतो.
8-10
जी आपुलिया स्‍नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयाते अंगिकारी । तो वाचस्पतीशी करी । प्रबंधुहोडा ॥8॥
श्रीगुरुनाथा ! आपले प्रेम हीच कोणी सरस्वती होय. हिने जर मुक्याचा अंगीकार केला, तर तो बृहस्पतीशी देखील ग्रंथरचनेत पैज लावू शकेल.
9-10
हे असो दिठी जयावरी झळके । की हा पद्मकरु माथा पारुखे । तो जीवचि परि तुके । महेशेसी ॥9॥
हे असो, श्रीगुरुराया ! तुमची कृपादृष्टी ज्याच्यावर आपला ज्ञानप्रकाश पाडील किंवा तुमचे हस्तकमल ज्याच्या डोक्यावरा जाईल, तो जीव जरी असला, तरी तो शंकरासमान होतो.
10-10
एवढे जिये महिमेचे करणे । ते वाचाबळे वानू मी कवणे । का सूर्याचिया आंगा उटणे । लागत असे ? ॥10॥
श्रीगुरुच्या महिम्याचे असे अगाध सामर्थ्य मी कोणत्या वाणीच्या बळाने वर्णन करू ! सूर्याच्या अंगाला उटणे लावून स्वच्छ करावे लागते काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

11-10
केउता कल्पतरुवरी फुलौरा ? । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ? । कवणे वासी कापुरा । सुवासु देवो ? ॥11॥
कामनापूर्तीकरिता नमरसाचा फुलवरा (नवसाप्रीत्यर्थ देवतेवर पात्या, करंज्या लावून फुलवरा बांधतात तो प्रकार) बांधायला पाहिजे काय ? क्षीरसागराला कशाचा पाहुणचार करता येईल ? कापराला कोणत्या सुवासाने सुवासित करता येईल ?
12-10
चंदनाते कायसेनि चर्चावे । अमृताते केउते रांधावे । गगनावरी उभवावे । घडे केवी ? ॥12॥
चंदनाला कशाची उटी लावावी ? अमृताला शिजविण्याचे काय प्रयोजन आहे ? आकाशापेक्षा उंच होणे कसे घडणार ?
13-10
तैसे श्रीगुरूचे महिमान । आकळिते के असे साधन ? । हे जाणोनि मिया नमन । निवांत केले ॥13॥
त्याप्रमाणे श्रीगुरुचे महात्म्य आकलन करता येण्याजोगे कोणते साधन आहे ? (कोणतेच नाही. ) हे जाणून मी मुकाट्याने तुमच्या पायावर डोके ठेविले आहे.
14-10
जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणे । श्रीगुरूसामर्थ्या रूप करू म्हणे । तरि ते मोतिया भिंग देणे । तैसे होईल ॥14॥
जर बुध्दिच्या व्युत्पत्त्यादि सामर्थ्याने श्रीगुरुच्या सामर्थ्याचे वर्णन करीन, असे कोणी म्हणेल, तर ते त्याचे करणे, पाणीदार मोत्याला अभ्रकाचे पुट लावण्यासारखे होईल.
15-10
का साडेपंधरया रजतवणी । तैशी स्तुतींची बोलणी । उगियाचि माथा ठेविजे चरणी । हेचि भले ॥15॥
किंवा श्रीगुरुची शब्दाने स्तुती करणे, हे शुध्द सोन्याला रूप्याचे पाणी देण्यासारखे होणार आहे, म्हणून मुकाट्याने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणे हेच मी उत्तम समजतो.
16-10
मग म्हणितले जी स्वामी । भलेनि ममत्वे देखिले तुम्ही । म्हणौनि कृष्णार्जुनसंगमी । प्रयागवटु जाहलो ॥16॥
नंतर श्रीज्ञानेश्वर महाराज श्रीगुरुनिवृत्तिनाथांना म्हणतात, अहो जी गुरुनाथा ! माझ्यावर तुम्ही अत्यंत ममता करीत आहा, म्हणूनच श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादरूपी संगमाच्या ठिकाणी मी, प्रयागातील (त्रिवेणी संगमावरील) वटवृक्षाप्रमाणे झालो.
17-10
मागा दूध दे म्हणतलियासाठी । आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी । उपमन्यूपुढे धूर्जटी । ठेविली जैसी ॥17॥
मागे उपमन्युने दुध मागितले असता क्षीरसागराचीच वाटी करून ज्याप्रमाणे शंकराने त्याच्या पुढे ठेवली,
18-10
ना तरी वैकुंठपीठनायके । रुसला ध्रुव कवतिके । बुझाविला देऊनि भातुके । ध्रुवपदाचे ॥18॥
किंवा वैकुंठलोकाचा स्वामी जो भगवान विष्णू, त्याने रूसलेल्या ध्रुवाला ध्रुवपदाचे भातुके देऊन त्याचे सहज सांत्वन केले,
19-10
तैसी जे ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो । ते भगवद्‍गीता वोविये गावो । ऐसे केले ॥19॥
त्याप्रमाणे ब्रह्मविद्येचा राजा आणि सर्व शास्रांचे विश्रांतिस्थान अशी जी भगवद्गीता, ती माझ्याकडून ओवीरूप छंदात गाववून दाखविली.
20-10
जे बोलणियाचे रानी हिंडता । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता । परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥20॥
येथे वाणीने बोलल्या जाणार्‍या शब्दांच्या जंगलात हिंडत असता, आत्मज्ञानरूप अर्थफळाने फळणार्‍या अक्षराची वार्ता देखील ऐकायला येत नाही, पण आपण माझी वाणी विवेक- ज्ञानरूप अर्थफळाने फळणारी कल्पलताच केली.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


21-10
होती देहबुद्धी एकसरी । ते आनंद भांडारा केली वोवरी । मन गीतार्थ सागरी । जळशयन जाले ॥21॥
माझ्या ठिकाणी एकसारखी जी देहबुध्दी – म्हणजे मी देह आहे, अशी बुध्दी – होती, ती आपण आज ब्रम्हानंदाची भंडार साठविलेली खोली केली आणि म्हणूनच निरनिराळ्या पदार्थांचा संकल्प विकल्प करणार्‍या मनाचे – गीतेचा अर्थ जो ब्रह्मानंद, हाच कोणी सागर – त्या सागराच्या जलामध्ये निजणे झाले म्हणजे ते निमग्न झाले.
22-10
ऐसे एकेक देवाचे करणे । ते अपार बोलो केवी मी जाणे । तऱ्ही अनुवादलो धीटपणे । ते उपसाहिजो जी ॥22॥
ही आपली एक एक कृती अगाध सामर्थ्याने भरलेली आहे, ती मी शब्दाने कशी वर्णन करू ? असे असूनही धीट होऊन, मी तिचा अनुवाद केला, तो माझा अपराध सहन करा.
23-10
आता आपुलेनि कृपाप्रसादे । मिया भगवद्‍गीता वोवीप्रबंधे । पूर्वखंड विनोदे । वाखाणिले ॥23॥
आता आपल्या कृपाप्रसादाने मी ओवीबध्द छंदात गीतेच्या पूर्वखंडाचे सहज स्पष्टीकरण केले आहे.
24-10
प्रथमी अर्जुनाचा विषादु । दुजी बोलिला योगु विशदु । परि सांख्यबुद्धीसि भेदु । दाऊनिया ॥24॥
पहिल्या आध्यायात अर्जुनाला झालेल्या विषादाचे वर्णन असून, दुसर्‍या अध्यायात सांख्य बुध्दी व योगबुध्दी यात काय भेद आहे हे बाखवून कर्मयोगाचे स्वरूप स्पष्ट केले आहे.
25-10
तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले । तेचि चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले । पंचमी गव्हरिले । योगतत्त्व ॥25॥
तिसर्‍या अध्यायात केवळ कर्ममार्गाचेच वर्णन केलेले असून, चौथ्या अध्यायात तेच कर्म ज्ञानपूर्वक कसे करावे हे सांगितले. पाचव्या अध्यायात योगतत्वाचे (म्हणजे परमेश्वराचे ठिकाणी स्थिर बुध्दी करण्याचे जे तत्व त्याचे) गूढपणाने निरूपण केले.
26-10
तेचि षष्ठामाजी प्रगट । आसनालागोनि स्पष्ट । जीवात्मभाव एकवट । होती जेणे ॥26॥
ज्या योगाने जीवात्मभावाचे ऐक्य होते, तेच योगतत्व सहाव्या अध्यायात आसनादि अंगासह स्पष्ट करून सांगितले.
27-10
तैसी जे योगस्थिती । आणि योगभ्रष्टा जे गती । ते आघवीचि उपपत्ती । सांगितली षष्ठी ॥27॥
त्याचप्रमाणे योग्यांना प्राप्त होणारी स्थिती व योगभ्रष्टांना प्राप्त होणारी गती, हे संपूर्ण वर्णन सहाव्या अध्यायात सांगितले आहे.
28-10
तयावरी सप्तमी । प्रकृतिपरिहार उपक्रमी । करूनि भजती जे पुरुषोत्तमी । ते बोलिले चाऱ्ही ॥28॥
त्यानंतर सातव्या अध्यायात प्रकृतिनाश कसा करावयाचा, याचा उपक्रम करताना, भगवंताच्या भजन करणार्‍या चार भक्तांचे वर्णन केले.
29-10
पाठी सप्तमींची प्रश्नसिद्धी । बोलोनि प्रयाणसमयसिद्धी । एवं ते सकळवाक्यअवधि । अष्टमाध्यायीं ॥29॥
नंतर सात प्रश्नांची उत्तरे देऊन, मरणकाळी जी काळशुध्दी पाहिजे, तिचे वर्णन केले. याप्रमाणे आठव्या अध्यायातील भगवद्वाक्याची समाप्ती झाली.
30-10
मग शब्दब्रह्मी असंख्याके । जेतुला काही अभिप्राय पिके । तेतुला महाभारते एके । लक्षे जोडे ॥30॥
जेवढे असंख्यात शब्दब्रह्म म्हणजे वैदिक वाङ्गमय आहे, त्यातून जो काही निष्कर्ष निघतो, तितका सर्व एक लक्ष श्लोकसंख्या असलेल्या महाभारतातून मांडलेला आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


31-10
तिये आघवाचि जे महाभारती । ते लाभे कृष्णार्जुनवाचोक्ती । आणि जो अभिप्रावो सातेशती । तो एकलाचि नवमी ॥31॥
आणि संपूर्ण महाभारतात जे सांगितले आहे, ते सर्व कृष्णार्जुन संवादभूत गीतेत सांगितले असून, या सातशें श्लोकरूपी गीतेचा जो मथितार्थ आहे, तो एकट्या नवव्या अध्यायात आहे.
32-10
म्हणौनि नवमीचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । बिहाला मग मी वाया । गर्व का करू ? ॥32॥
म्हणून नवव्या अध्यायातील अभिप्रायावर एकदम मत देण्याचे वेदाला देखील भय वाटते, तेथे मी व्यर्थच कशाला अभिमान वागवूं.
33-10
अहो गूळासाखरे मालयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे । परि स्वाद गोडियेचे । आनआन जैसे ॥33॥
गुळ, साखर, राब हे एका उसाच्या रसाचेच घनीभूत प्रकार असले तरी त्यांच्या गोडीची रुची जशी निरनिराळी असते (त्याप्रमाणे येथील अध्याय एका ब्रह्माचेच प्रतिपादन करीत असले तरी त्यांच्या प्रतिपादनाची गोडी निरनिराळी आहे. )
34-10
एक जाणोनिया बोलती । एक ठाये ठावो जाणविती । एक जाणो जाता हारपती । जाणते गुणेशी ॥34॥
काही अध्याय ब्रह्म जाणून त्याविषयी बोलतात, तर काही अध्याय तेथल्या तेथे दुसर्‍याला परब्रह्मवस्तूची जाणीव करून देतात. काही अध्याय परब्रह्माला जाणण्याकरिता गेले असता जाणिवेसह लय पावतात.
35-10
हे ऐसे अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्यपण नवमाचे । तो अनुवादलो हे तुमचे । सामर्थ्य प्रभू ॥35॥
असे गीतेचे अध्याय आहेत. पण हा नववा अनिर्वाच्य आहे. त्याचे वर्णन करवत नाही, पण त्याचा अनुवाद केला गेला हे, महाराज श्रीगुरुनाथा ! तुमचेच सामर्थ्य होय.
36-10
अहो एकाचि शाटी तपिन्नली । एकी सृष्टीवरी सृष्टी केली । एकी पाषाणी वाऊनि उतरली । समुद्री कटके ॥36॥
अहो श्रीगुरुराया ! एकाच्या (वसिष्ठाच्या) छाटीने प्रकाश देण्याची कामगिरी केली. एकाने (विश्वामित्राने) सृष्टिसारखी प्रतिसृष्टि उत्पन्न करून दाखविली. एकाने (नीलवानराने) समुद्रात दगड तरवून त्यावरून सैन्य उतरविले.
37-10
एकी आकाशी सूर्याते धरिले । एकी चुळीचि सागराते भरिले । तैसे मज मुकयाकरवी बोलविले । अनिर्वाच्य तुम्ही ॥37॥
एकाने (मारूतीने) आकाशांतील सूर्याला धरले. एकाने (अगस्ति ऋषीने) संपूर्ण समुद्र एकाच चुळीने पोटांत सांठविला, त्याप्रमाणे मज मुक्याकडून तुम्ही या अनिर्वाच्य अशा नवव्या अध्यायातील विषय प्रगट करविला.
38-10
परि हे असो एथ ऐसे । राम रावण झुंजिन्नले कैसे । राम रावण जैसे । मीनले समरी ॥38॥
पण हे असो, ज्याप्रमाणे श्रीराम व रावण युध्द कसे झाले असे विचारल्यास श्रीराम रावणासारखे झाले असे म्हणावे लागते (त्याला त्याचाच दृष्टांत द्यावा लागतो. दुसरा दृष्टांतच नाही असा भाव. )
39-10
तैसे नवमी कृष्णाचे बोलणे । ते नवमीचियाचि ऐसे मी म्हणे । या निवाडा तत्त्वज्ञु जाणे । जया गीतार्थु हातीं ॥39॥
त्याप्रमाणे येथे नवव्या अध्यायातील भगवान श्रीकृष्णाचे बोलणे नवव्या अध्यायातील बोलण्यासारखेच आहे. त्याला दुसर्‍या अध्यायाचा दृष्टांत देता येत नाही, असे मी म्हणतो. व हा माझा निर्णय बरोबर आहे किंवा नाही हे, ज्याच्या दृष्टीसमोर गीतार्थ आहे ते तत्वज्ञ पुरुष जाणतात.
40-10
एवं नवही अध्याय पहिले । मिया मतीसारिखे वाखाणिले । आता उत्तरखंड उवाइले । ग्रंथाचे ऐका ॥40॥
याप्रमाणे पहिल्या नऊ अध्यायांचे यथामति व्याख्यान मी केले आहे. येथून ग्रंथाच्या उत्तरखंडाचे क्रमप्राप्त अख्यान श्रवण करा.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


41-10
जेथ विभूति प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । ते विदग्धा रसवृत्ती । म्हणिपैल कथा ॥41॥
जेंथे या अध्यायात भगवान अर्जुनाला आपल्या प्रधान व गौण विभूती आता सांगणार आहेत, ती कथा अत्यंत रसभरीत शब्दाने मी तुम्हाला निरूपण करणार आहे.
42-10
देशियेचेनि नागरपणे । शांतु शृंगाराते जिणे । तरि ओंविया होती लेणे । साहित्यासि ॥42॥
(ज्या देशी मराठी भाषेत मी, ती कथा निरूपण करणार आहे. ) त्या मराठी भाषेच्या सौंदर्यामुळे त्यात प्रतिपादिलेला शांतरस, श्रृंगाररसाला देखील फिका पाडील, तेव्हा माझ्या ओव्या साहित्यालाहि अलंकाराप्रमाणे सुशोभित करतील.
43-10
मूळ ग्रंथीचिया संस्कृता । वरि मऱ्हाठी नीट पढता । अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हे न चोजवे ॥43॥
गीता ग्रंथाच्या मूळच्या संस्कृत भाषेवर माझी केलेली मराठी भाषेतील टीका नीट पडताळून पाहता, मी काढलेला अभिप्राय योग्य आहे असे मान्य झाल्यास, मूळ कोणते हे निवडता येणार नाही.
44-10
जैसे अंगाचेनि सुंदरपणे । लेणिया आंगचि होय लेणे । तेथ अळंकारिले कवण कवणे । हे निर्वचेना ॥44॥
ज्याप्रमाणे अत्यंत सुंदर शरीरावर घातलेल्या अलंकाराला ते शरीरच लेणे होते म्हणजे शोभा आणते, मग कोणी कोणाला शोभा आणली हे सांगता येत नाही.
45-10
तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाच्या सोकासनी । शोभती आयणी । चोखट आइका ॥45॥
त्याप्रमाणे मूळ गीता ग्रंथाची संस्कृत भाषा व माझ्या टीकेची मराठी भाषा ह्या दोन्ही एक भावार्थरूप पालखींत बसून कशा चातुर्याने शोभतात, हे लक्ष देऊन ऐका.
46-10
उठावलिया भावा रूप । करिता रसवृत्तीचे लागे वडप । चातुर्य म्हणे पडप । जोडले आम्हा ॥46॥
चित्तात स्फुरलेल्या भावार्थाचे स्पष्टीकरण करतांना किंवा तो व्यक्त करतांना, त्याला रसभरित भाषेचा पाऊस लागेल व त्यामुळे आजच्या जगात या अशा भाषेने आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली असे चातुर्य म्हणेल.
47-10
तैसे देशियेचे लावण्य । हिरोनि आणिले तारुण्य । मग रचिले अगण्य । गीतातत्त्व ॥47॥
तसे मराठी भाषेचे सर्व सौंदर्य एकत्र करून रसाला तारूण्य आणले व मग त्या योगाने अमर्याद अशा गीता तत्वाची मराठी भाषेत रचना केली.
48-10
जो चराचर परमगुरु । चतुर चित्तचमत्कारु । तो ऐका यादवेश्वरु । बोलता जाहला ॥48॥
जो चराचर ब्रह्मांडाचा आद्यगुरु, थोर जाणत्याच्याहि चित्ताला आश्चर्यचकित करून सोडणारा, असा तो यादवांचा राजा भगवान श्रीकृष्ण पुढे बोलू लागला.
49-10
ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । ऐसे बोलिले श्रीहरी तेणे । अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणे । धडौता आहासि ॥49॥
श्रीनिवृत्तिनाथांचे ज्ञानदेव म्हणतात, त्या श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले, की अर्जुना ! सर्वच गोष्टी ऐकतांना तू अंतःकरणाने योग्य असतोस म्हणजे एकाग्र चित्ताने ऐकतोस.

श्रीभगवानुवाचः
भूय एव महाबाहो श्रृणु मे परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया ॥10. 1॥

50-10
आम्ही मागील जे निरूपण केले । ते तुझे अवधानचि पाहिले । तव टाचे नव्हे भले । पुरते आहे ॥50॥
अर्जुना ! मी मागे जे निरूपण केले, ते तुझे चित्त एकाग्र आहे किंवा नाही हे पाहण्याकरिताच होते, पण ते अर्धवट नसून पूर्ण एकाग्र होते, हे कळून आले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
51-10
घटी थोडेसे उदक घालिजे । तेणे न गळे तरी वरिता भरिजे । ऐसा परिसौनि पाहिलासि तव परिसविजे । ऐसेचि होतसे ॥51॥
घागरीत थोडेसे पाणी भरावे व तेवढे पाणी तसेच राहिले. गळ्यापर्यंत भरले नाही, तर ती आणखी भरावी त्याप्रमाणे मी थोडे निरूपण केरून तुला श्रवण करवून पाहले, तेव्हा आणखी श्रवण करवावे असेच दिसून आले.
52-10
अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । मग चोख तरी तोचि भांडारी कीजे । तैसा किरीटी तू आता माझे । निजधाम की ॥52॥
एखादे वेळी येणार्‍या माणसांवर प्रथम घरातील सर्व सोपवून पाहावे व त्याची सचोटी दिसून आली तर मग त्यास खजिनदार करावे. त्याप्रमाणे, अर्जुना ! माझे अखंड राहण्याचे ठिकाण जे परब्रह्म ते तू झाला.
53-10
ऐसे अर्जुना येउते सर्वेश्वरे । पाहोनि बोलिले अत्यादरे । गिरी देखोनि सुभरे । मेघु जैसा ॥53॥
अर्जुनाला अत्यंत एकाग्रतेने ऐकतांना पाहून, सर्व देवाचे देव भगवान श्रीकृष्ण, वर सांगितल्याप्रमाणे अत्यात आदराने बोलले आणि ज्याप्रमाणे पर्वताला पाहून पाण्याने भरलेले मेघ पर्वतावर वळून येतात,
54-10
तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइके गा महाबाहो । सांगितलाचि अभिप्रावो । सांगेन पुढती ॥54॥
त्याप्रमाणे कृपाळुंचा राजा भगवान श्रीकृष्ण म्हणतात’ ” महाबाहो अर्जुना ! सांगितलेला भावार्थच पुढे पुनः सांगणार आहे. ऐक.
55-10
पै प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिकाची जव जव वाढी देखिजे । यालागी नुबगिजे । वाहो करिता ॥55॥
कारण दरवर्षी शेत पेरावे व जसजशी पिकांची वाढ होत असलेली पाहावी, तसतशी त्या शेताची मशागत करण्याचा त्रास मानू नये.
56-10
पुढतपुढती पुटे देता । जोडे वानियेची अधिकता । म्हणौनि सोने पंडुसुता । शोधूचि आवडे ॥56॥
वारंवार पुटे दिली असता सोन्याचा कस वाढतो, म्हणून वारंवार सोने शोधावेसेंच वाटते.
57-10
तैसे एथ पार्था । तुज आभार नाही सर्वथा । आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलो पुढती ॥57॥
त्याचप्रमाणे अर्जुना ! तुला वारंवार सांगण्यात तुझ्यावर उपकार करतो असे नसून, मी आपल्या स्वार्थाकरिता पुनः बोलत आहे.
58-10
जैसे बाळका लेवविजे लेणे । तया शृंगारा बाळ काइ जाणे ? । परि ते सुखाचे सोहळे भोगणे । माउलिये दिठी ॥58॥
ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाच्या अंगावर अलंकार घालते, पण त्या अलंकार घालण्याचा जो आनंद, तो बालक काय जाणत असतो ? पण ते सुखाचे सोहळे, आईच आपल्या दृष्टीने भोगत असते.
59-10
तैसे तुझे हित आघवे । जव जव का तुज फावे । तव तव आमुचे सुख दुणावे । ऐसे आहे ॥59॥
त्याप्रमाणे अर्जुना ! आमचे निरूपण ऐकून ब्रह्मबोध ठसल्यामुळे जसे जसे तुला आत्मसुख प्राप्त होईल, तसे तसे आमचेहि सुख दुप्पट वाढत जाते.
60-10
आता अर्जुना असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी । म्हणौनि तृप्तीची सवडी । बोलता न पडे ॥60॥
आता अर्जुना ! हे अलंकारिक भाषण असो. मला तुझे अत्यंत प्रेम असल्यामुळेच तुझ्याशी बोलत असतांना तृप्तीचा अवसर लाभत नाही.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
61-10
आम्हा येतुलियाचि कारणे । तेचि ते तुजशी बोलणे । परि असो हे अंतःकरणे । अवधान देई ॥61॥
म्हणूनच आम्हाला तीच ती गोष्ट तुझ्याशी बोलावी लागते; तर आमच्या बोलण्याकडे अंतःकरणपूर्वक लक्ष दे.
62-10
तरी ऐके गा सुवर्म । वाक्य माझे परम । जे अक्षरे लेऊनी परब्रह्म । तुज खेंवासि आले ॥62॥
हे मार्मिक अर्जुना, अत्युत्तम असे जे वाक्य, ते ऐक ते वाक्य नसून अक्षर रूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच तुला अलिंगन देण्यास आले आहे,
63-10
परी किरीटी तू माते । नेणसी ना निरुते । तरि तो गा जो मी एथे । ते विश्वचि हे ॥63॥
परंतू हे किरीटी, तू खरोखर मला जाणत नाहीस ना ? तर जो मी तुला इथे दिसतो आहे, तोच हे सर्व विश्व आहे.

न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवाना महर्षीणा च सर्वशः ॥10. 2॥

64-10
एथ वेद मुके जाहाले । मन पवन पांगुळले । रातीविण मावळले । रविशशी जेथ ॥64॥
हे माझे स्वरूप जाणण्या विषयी वेदांची वाणी कुंटीत झाली, मन व प्राण यांची गति थांबली व माझ्या तेजापुढे राञ झाल्या शिवाय सूर्य आणि चंद्र मावळले.
65-10
अगा उदरीचा गर्भु जैसा । न देखे आपुलिये मातेची वयसा । मी आघवेया देवा तैसा । नेणवे काही ॥65॥
अरे, ज्याप्रमाणे उदरातील गर्भ आपल्या मातेचे वय जाणण्यास असमर्थ असतो; त्याप्रमाणे माझ्या पासून उत्पन्न झालेले देव ही मला जाणण्यास समर्थ नाहीत,
66-10
आणि जळचरा उदधीचे मान । मशका नोलांडवेचि गगन । तेवी महर्षींचे ज्ञान । न देखेचि माते ॥66॥
आणि समुद्रांतील प्राण्यांना समुद्राचा विस्तार कळत नाही किंवा मशकाला आकाश ओलांडून जाणे शक्य नाही, त्याप्रमाणेच महर्षींचे ज्ञान देखील या माझ्या शक्तिस्वरूपाचा ठाव घेऊ शकत नाही.
67-10
मी कवण पा केतुला । कवणाचा कै जाहला । या निरुती करिता बोला । कल्प गेले ॥67॥
मी कोण आहे, केवढा आहे, कोणाचा आहे, केव्हा झालो इत्यादि गोष्टिंचा सत्य विचार करता करता कितीतरी कल्प लोटले.
68-10
का जे महर्षी आणि या देवा । येरा भूतजाता सर्वा । मी आदि म्हणौनि पांडवा । अवघड जाणता ॥68॥
अर्जुना ! महर्षि असोत किंवा देव असोत, त्याचप्रमाणे सर्वभूतप्राणी असोत, या सर्वाचे कारण मीच असल्यामुळे किंवा सर्व पदार्थाची उत्पत्ति माझ्यापासून असल्यामुळे, त्यांना आपल्या बुध्दीने जाणणे दुरापास्त आहे.
69-10
उतरले उदक पर्वत वळघे । जरी झाड वाढत मुळी लागे । तरी मिया जालेनि जगे । जाणिजे माते ॥69॥
पर्वतावरून खाली उतरत पायथ्याशी येणारे पाणी जर पुनः पर्वतावर चढेल, वर वाढत असलेले झाड जर मुळाकडे वाढत जाईल, तरच माझ्यापासून उत्पन्न झालेल्या जगाला मला जाणता येणे शक्य आहे.
70-10
का गाभेवने वटु गिंवसवे । जरी तरंगी सागरू साठवे । का परमाणूमाजी सामावे । भूगोलु हा ॥70॥
किंवा वटबीजाला अंकुर फुटल्यावर जर त्यात संपूर्ण वटवृक्ष दृष्टुस पडेल, समुद्राच्या एका तरंगात जर संपूर्ण समुद्र साठविला जाईल किंवा एका परमाणुमध्ये ही संपूर्ण भूमी सांठविली जाईल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
71-10
तरी मिया जालिया जीवा । महर्षी अथवा देवा । माते जाणावया होआवा । अवकाशु गा ॥71॥
तरच माझ्यापासून झालेले महर्षि, देव, इत्यादि जीवांना मला जाणण्याला जागा राहील
72-10.
ऐसाही जरी विपाये । सांडूनि पुढीले पाये । सर्वेद्रियासि होये । पाठिमोरा जो ॥72॥
असे जरी आहे तरी कदाचित् बाह्य विषयांकडील धाव निःशेष सोडून देऊन जो इंद्रियांच्या प्रवृत्तीला पाठमोरा होतो.
73-10
प्रवर्तलाही वेगी बहुडे । देह सांडूनि मागलीकडे । महाभूताचिया चढे । माथयावरी ॥73॥
इंद्रियांबरोबर विषयाकडे प्रवृत्त झाला तरी एकदम जो मागे फिरतो व देहावरील अहंता सोडून जो मन अंतर्मुख करता करता महाभूतांच्या माथ्यावर किंवा डोक्यावर चढतो — म्हणजे ज्या आत्मस्वरूपापासून भूतांची उत्पत्ति भासली त्या कारणरूप आत्मसवरूपाचे ठिकाणी जो जातो.

यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् ।
असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥10. 3॥

74-10
तैसा राहोनि ठायठिके । स्वप्रकाशे चोखे । अजत्व माझे देखे । आपुलिया डोळा ॥74॥
महाभूतांच्या पलीकडे असणारे जे माझे स्वयंप्रकाशित स्वरूप, त्या ठिकाणी स्थिर राहून आपल्या स्वयंप्रकाशरूपाने तो आपल्या डोळ्याने माझे अजत्व पाहतो.
75-10
मी आदीसि परु । सकळलोकमहेश्वरु । ऐसिया माते जो नरु । यापरी जाणे ॥75॥
मी आदिसी पर म्हणजे उत्पत्तिरहित आहे, म्हणून मी सर्व ब्रह्मांडाचा नियंता आहे. असा मी असे जो मनुष्य मला जाणतो.
76-10
तो पाषाणांमाजी परिसु । रसांमाजी सिद्धरसु । तैसा मनुष्याकृति अंशु । तो माझाचि जाण ॥76॥
जसा पाषाणात परिस श्रेष्ठ आहे किंवा रसांत सिध्दरस म्हणजे अमृत श्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे तो सर्व मनुष्यात माझा अंश होय, हे जाण.
77-10
तो चालते ज्ञानाचे बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ । परि माणुसपणाची भांब । लोकाचि भागु ॥77॥
असा मनुष्य, अर्जुना ! ज्ञानाचे चालते बोलते बिंब होय, त्याचे जे अवयव दिसतात ते ब्रह्मसुखाला निघालेले कोंभ होत असे समज, बाकी वर वर जो मनुष्यपणाचा भाग दिसतो तो केवळ अज्ञानभ्रमाने दिसतो.
78-10
अगा अवचिता कापुरा । माजी सांपडला हिरा । वरी पडिलिया नीरा । न निगे केवी ॥78॥
बा अर्जुना ! कापुरामध्ये अकस्मात् हिरा मिसळला, तरी त्यावर पाणी पडले असता त्या पाण्याने जसा त्याचा हिरेपणा जात नाही.
79-10
तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । तऱ्ही प्रकृतिदोषाची मातु । नेणिजे तेथ ॥79॥
त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाला जाणणारा पुरूष, जरी या मनुष्यलोकात सामान्य प्राकृतिक माणसासारखा दिसत असला, तरी त्याच्या ठिकाणी प्रकृतिरूप दोषांचा स्पर्शहि नसतो.
80-10
तो आपसयेचि सांडिजे पापी । जैसा जळत चंदनु सर्पी । तैसा माते जाणे तो संकल्पी । वर्जूनि घालिजे ॥80॥
भीतीने आपण होऊनच पापे त्यांच्यापाशी येत नाहीत. ज्याप्रमाणे सर्प जळत असलेल्या चंदनाच्या झाडाला सोडून देतात त्याप्रमाणे माझ्या श्रीकृष्णस्वरूपाचे पूर्णब्रह्मत्व जो जाणतो त्याचा सर्व संकल्प संबंध सोडतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
81-10
तेचि माते कैसे जाणिजे । ऐसे कल्पी जरी चित्त तुझे । तरी मी ऐसा हे माझे । भाव ऐके ॥81॥
तेच माझे जगात व्यापून असणे कसे जाणावे असे जर तुझ्या चित्तांत वाटत असेल, तर जगात मी असा आहे व हे माझे विकार आहेत, ते सांगतो ऐक.
82-10
जे वेगळाला भूती । सारिखे होऊनि प्रकृती । विखुरले आहेती त्रिजगती । आघविये ॥82॥
हे विकार, निरनिराळ्या प्राण्यामध्ये, त्यांच्या प्रकृतीसारखे होऊन संपूर्ण ब्रह्मांडांत पसरलेले आहेत.

बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥10. 4॥
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥10. 5॥

83-10
ते प्रथम जाण बुद्धी । मग ज्ञान जे निरवधी । असंमोह सहनसिद्धी । क्षमा सत्य ॥83॥
प्रथम भाव बुध्दि होय, हे लक्षात ठेव. त्यानंतर जे अमर्याद ज्ञान हा दुसरा भाव होय. मोह नसणे, सर्व सहन करणे, क्षमा म्हणजे कोणी उपकार केल्यास त्याला प्रत्यपकार न करण्याची बुध्दि, सत्य म्हणजे जसे ऐकिले किंवा पाहिले असेल तसेंच सांगणें.
84-10
मग शम दम दोन्ही । सुख दुःख वर्तत जनी । अर्जुना भावाभाव मानी । भावाचिमाजी ॥84॥
दम म्हणजे इंद्रियनिग्रह किंवा इंद्रियांचे शास्रानूसार नियमन, शम म्हणजे मनोनिग्रह किंवा मनातील विषयवासना क्षीण होणे हे दोन भाव, सुख म्हणजे मनाच्या अनुकुल असणे दुःख म्हणजे मनाच्या विरूध्द असणे हे जे जगात दिसून येते, त्याचप्रमाणे भावाभाव म्हणजे असणे व नसणे, हे दोन्ही भाव, भावामध्ये भावरूपच आहेत असे समज.
85-10
आता भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । हे मम रुपची पंडुसुता । ओळख तू ॥85॥
आणखी अर्जुना ! भय व निर्भयता, अहिंसा म्हणजे कायावाचा मनाने कोणत्याहि प्राण्याला दुःख न देता सुखच देण्याची प्रवृत्ति आणि समता म्हणजे सर्व प्राणिमात्रांना एकसारखे पाहणे, तुष्टि म्हणजे संतोष, तपादिक हे माझे रूप आहे असे जाण.
86-10
दान यश अपकीर्ती । ते जे भाव सर्वत्र वसती । ते मजचि पासूनि होती । भूतांचा ठायी ॥86॥
बा अर्जुना ! दान, यश, अपकीर्ति, हे जे सर्व भाव जगात दिसून येतात, ते सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझ्यापासूनच प्रगट झाले आहेत.
87-10
जैसी भूते आहाति सिनानी । तैसेचि हेही वेगळाले मानी । एक उपजती माझा ज्ञानी । एक नेणती माते ॥87॥
ज्याप्रमाणे निरनिराळे प्राणी आहेत, त्याप्रमाणेच हे निरनिराळे भाव आहेत असे जाण. काही भाव माझ्या स्वरूपाचे ज्ञान करून देणारे आहेत व काही माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करणारे आहेत.
88-10
अगा प्रकाश आणि कडवसे । हे सूर्याचिस्तव जैसे । प्रकाश उदयी दिसे । तम अस्तुसी ॥88॥
प्रकाश व अंधार हे दोन्ही सूर्यामुळेंच होत असतात. सूर्योदय झाला असता प्रकाश होतो व सूर्यास्त झाला असता अंधार होतो.
89-10
आणि माझे जे जाणणे नेणणे । ते तव भूताचिया दैवाचे करणे । म्हणौनि भूती भावाचे होणे । विषम पडे ॥89॥
आणि मला जाणणे किंवा न जाणणे हे जीवांच्या पूर्वजन्मांतील पापपुण्यरूप कर्माप्रमाणे होत असते, म्हणून भूतांचे ठिकाणी माझे हे कार्यरूपभावाने प्रगट होणे विषम म्हणजे माझ्या ज्ञानाला कोठें अनुकूल व कोठें प्रतिकूल असे झाले आहे.
90-10
यापरी माझा भावी । हे जीवसृष्टि आहे आघवी । गुंतली असे जाणावी । पंडुकुमरा ॥90॥
याप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या कार्यरूप भावाचे ठिकाणी सर्व जीव गुंतून पडले आहेत, असे अर्जुना ! जाण.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
91-10
आता इये सृष्टीचे पालक । तया आधीन वर्तती लोक । ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ॥91॥
आता या सृष्टीचे पालक म्हणून परमेश्वराने नेमलेले व ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व लोक वागतात, ते अकरा भाव आणखी तुला सांगतो.

महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥10. 6॥

92-10
तरी आघवाचि गुणी वृद्ध । जे महर्षींमाजी प्रबुद्ध । कश्यपादि प्रसिद्ध । सप्त ऋषी ॥92॥
तरी ज्ञानतपादी सर्व गुणांनी श्रेष्ठ व सर्व महर्षींमध्ये ज्ञाते असे जे कश्यपादी प्रसिध्द सप्तर्षी आहेत.
93-10
आणिकही सांगिजतील । जे चौदा आतील । स्वायंभू मुख्य मुद्दल । चारी मनु ॥93॥
आणखी सांगतो, ऐक. मुळात असलेल्या चौदा मनूंमध्ये पहिले स्वायंभुव वैगेरे जे चार मुख्य मनू आहेत.
94-10
ऐसे हे अकरा । माझा मनी जाहाले धनुर्धरा । सृष्टीचिया व्यापारा- । लागोनियां ॥94॥
अर्जुना ! असे हे अकराजण पुढील सृष्टीचा उत्पद्यादी व्यापार करण्याकरिता माझ्या मनापासून उत्पन्न झाले.
95-10
जै लोकांची व्यवस्था न पडे । जै या त्रिभुवनाचे काही न मांडे । तै महाभूतांचे दळवाडे । अचुंबित असे ॥95॥
जेव्हा त्रिभुवनाची मांडणी व लोकांची उत्पत्ती होत नाही आणि पंचभूतांचा समुदाय क्रियारहित असतो,
96-10
तैचि हे जाहाले । इही लोकपाळ केले । अध्यक्ष रचूनि ठेविले । इही जन ॥96॥
जेव्हा हे अकरा जण उत्पन्न झाले व त्यांनी मग हे स्वर्गादि लोक निर्माण केले व तेथे पूर्वपुण्यानुसार अधिकार प्राप्त झालेले अध्यक्ष नेमले व त्यांनी पुढे प्रजा निर्माण केली.
97-10
म्हणौनि अकरा हे राजा । मग येर लोक यांचिया प्रजा । ऐसा हा विस्तारु माझा । ओळख तू ॥97॥
म्हणून या अकराजनांचा समुदाय, राजा असून बाकींचे जग त्यांची प्रजा होय, याप्रमाणे हा संपूर्ण विश्वाचा विस्तार माझाच आहे, असे समज.
98-10
पाहे पा आरंभी बीज एकले । मग तेचि विरूढलिया बूड जाहाले । बुडी कोंभ निघाले । खांदियांचे ॥98॥
हे पहा, अर्जुना ! पहिले एक बीजच असते, मग तेच वाढले की बूड होते, पुढे त्या बुडाला कोंभ निघतात.
99-10
खांदियांपासूनि अनेका । पसरलिया शाखोपशाखा । शाखांस्तव देखा । पल्लवपाने ॥99॥
त्या फांद्यापासून अनेक शाखा फुटतात व त्या शाखांना कोवळी कोरडी पाने येतात.
100-10
पल्लवी फूल फळ । एवं वृक्षत्व जाहाले सकळ । ते निर्धारिता केवळ । बीजचि ते ॥100॥
पाना नंतर फुले, फळे येतात. याप्रमाणे संपूर्ण झाडाचा विस्तार होतो. या सर्वाचा विचार केला असता, ते सर्व एक बीजच होय.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
101-10
ऐसे मी एकचि पहिले । मग मी ते मनाते व्याले । तेथ सप्तऋषि जाहाले । आणि चारी मनु ॥101॥
याप्रमाणे सृष्टीच्या पूर्वी मीच एक असतो. मग त्या माझ्यापासून मनाची उत्पत्ती होते व त्या मनापासून सप्तर्षी व चार मनु उत्पन्न होतात.
102-10
इही लोकपाळ केले । लोकपाळी विविध लोक सृजिले । लोकांपासूनि निपजले । प्रजाजात ॥102॥
मग लोकपालांना उत्पन्न करतात लोकपाल तेथील जनांना उत्पन्न करतात. अशा प्रकारे लोकांपासून अनेक प्रकारची प्रजा निर्माण होते.
103-10
ऐसेनि हे विश्व येथे । मीचि प्रसवला ना निरुते । परी भावाचेनि हाते । माने जया ॥103॥
याप्रमाणे येथे हे जग म्हणजे मीच खरोखर विस्तारलो आहे, पण हैं, माझ्या वचनावर दृढ विश्वास असल्यामुळे ज्याला पटेल, त्यालाच कळेल.

एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥10. 7॥

104-10
यालागी सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती । आणि यांचिया व्याप्ती । व्यापिले विश्व ॥104॥
म्हणून सुभद्रापते अर्जुना ! हे सर्व अस्तित्वात आलेले कार्यपदार्थ माझ्या विभूती आहेत व त्यांच्या योगानेच सर्व जग व्यापिले आहे.
105-10
म्हणोनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावरी । मीवाचूनि दुसरी । गोठी नाही ॥105॥
म्हणून बा अर्जुना ! याप्रमाणे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत माझ्यावाचून दुसर्‍या वस्तूची गोष्ट देखील नाही.
106-10
ऐसे जाणे जो साचे । तया चेइरे जाहाले ज्ञानाचे । म्हणोनि उत्तम मध्यम भेदाचे । दुःस्वप्न तया ॥106॥
जड-विनाशीभाव जाऊन ज्याला सर्व सच्चिदानंदस्वरूप दिसते त्याला शुध्द ब्रह्मज्ञान झाले असे समज, म्हणून तो उत्तम, मध्यम, कनिष्ठ या भावाचे स्वप्न पाहत नाही.
107-10
मी माझिया विभूती । विभूती अधिष्ठिलिया व्यक्ती । हे आघवे योगप्रतीती । एकचि मानी ॥107॥
मी, माझ्या विभूती व त्या विभूतीला अधिष्ठानभूत व्यक्ति ह्या सर्वाचे माझ्याशी ऐक्य आहे, या अनुभवाने तो सर्व मद्रूपच मानतो.
108-10
म्हणोनि निःशंके येणे महायोगे । मज मीनला मनाचेनि आंगे । एथ संशय करणे न लगे । तो त्रिशुद्धी जाहला ॥108॥
म्हणून अशा या अद्वैतदृष्टिरूप श्रेष्ठ योगाने जो माझ्याशी मनाने ऐक्य पावला तो मद्रूप होतो, हे मी त्रिवार प्रतिज्ञा करून सांगतों. येथे संशय घेण्याचे कारणच नाही.
109-10
का जे ऐसे किरीटी । माते भजे जो अभेदा दिठी । तयाचिये भजनाचिये नाटी । सूती मज ॥109॥
कारण अर्जुना ! जो अभेददृष्टीने माझे याप्रमाणे भजन करतो, तो त्याच्या भजनाचे व्यवहारात एक मलाच घेतलेंले असते.
110-10
म्हणऊनि अभेदे जो भक्तियोगु । तेथ शंका नाही नये खंगु । करिता ठेला तरी चांगु । ते सांगितले षष्ठी ॥110॥
म्हणून अभेदाने होणारा जो भक्तियोग, त्यात पूर्णब्रह्मस्थिती प्राप्त होईल किंवा नाही, ही शंका घेण्याचे कारणच राहत नाही व तो खंडितही होत नाही आणि खंड पडला तरी ते कल्याणाचे असते, कारण तो भगवंताच्या कृपेने पुनः सुरू होतो, हे सहाव्या अध्यायात सांगितलेंच आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
111-10
तोचि अभेदु कैसा । हे जाणावया मानसा । साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ॥111॥
ज्या अभेदाने भक्ति केली जाते म्हणून मी सांगितले, तो अभेद कसा आहे हे जाणावे असा जर तुझ्या मनात ध्वनि उमटला असेल, तर सांगतो, ऐक.

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥10. 8॥

112-10
तरि मीचि एक सर्वा । या जगा जन्म पांडवा । आणि मजचिपासूनि आघवा । निर्वाहो यांचा ॥112॥
तरी या सर्व जगाला अर्जुना ! मीच एक जन्म देणारा आहे आणि या सर्व जगाची स्थितिहि मज पासूनच होते.
113-10
कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळीचि पै गा । आणि तया जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ ॥113॥
लाटांच्या माळा म्हणजे लाटापाठी लाटा, अशा अनेक लाटा असल्या, तरी त्या सर्वाचा जन्म एका पाण्यापासूनच होतो. ते पाणीच त्यांना आधार असते व त्यातही केवळ पाणीच असते.
114-10
ऐसे आघवाचि ठायी । तया जळचि जेवि पाही । तैसा मीवाचूनि नाही । विश्वी इये ॥114॥
ज्याप्रमाणे त्या लाटांच्या सर्व ठिकाणी पाणीच असते, दुसरे काहीच नसते, त्याप्रमाणे या जगात माझ्यावाचून दुसरे लवमात्र काही नाही. संपूर्ण मीच आहे.
115-10
ऐसिया व्यापका माते । मानूनि जे भजती भलतेथे । परि साचोकारे उदिते । प्रेमभावे ॥115॥
एकदेशीय सगुण साकार स्वरूपाने मी दिसत असलो तरी आता सांगितल्याप्रमाणे मीच व्यापकहि आहे असे जाणून जे प्रगट झालेल्या निष्कपट प्रेमाने माझे कोठेहि भजन करतात.
116-10
देशकाळवर्तमान । आघवे मजसी करूनि अभिन्न । जैसा वायु होऊन गगन । गगनीचि विचरे ॥116॥
ज्याप्रमाणे वायु आकाशाशी एकरूप होऊन आकाशांतच संचार करतो, त्याप्रमाणे देश, काळ व वर्तमान हे सर्व माझ्याशी अभिन्न करून म्हणजे भगवत्स्वरूपच आहेत असे समजून.
117-10
ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखे त्रिभुवनी । जगद्रूपा मनी । सांठऊनि माते ॥117॥
त्याप्रमाणे आत्मस्वरूपालाहि जाणून व जगद्रूप असा जो मी. त्या मला अंतःकरणात सांठवून जे आनंदाने त्रिभुवनांत भक्तिप्रेमलीला करतात.
118-10
जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥118॥
जो जो प्राणी समोर येईल तो तो प्राणी साक्षात् भगवंत आहे, असे मानणे हाच, अर्जुना ! माझा भक्तियोग होय असे निश्चित जाण.

मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥10. 9॥

119-10
चित्ते मीचि जाहाले । मियाचि प्राणे धाले । जीवो मरो विसरले । बोधाचिया भुली ॥119॥
जे चित्ताने मद्रूप झाले, जे मलाच आपला प्राण समजून तृप्त असतात, जे माझे सगुणस्वरूपहि पूर्ण ब्रह्म आहे या ज्ञानात तल्लीन राहत असल्यामुळे जन्ममरणाचाहि त्यांना विसर पडतो.
120-10
मग तया बोधाचेनि माजे । नाचती संवादसुखाची भोजे । आता एकमेका घेपे दीजे । बोधचि वरी ॥120॥
मग माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाने उन्मत्त होऊन संवादाने उत्पन्न होणार्‍या सुखाच्या मूर्ती होऊन नाचतात आणि परस्पर एकमेकास माझ्या स्वरूपाचाच बोध घेतात व देतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
121-10
जैशी जवळिकेची सरोवरे । उचंबळलिया कालवती परस्परे । मग तरंगासि धवळारे । तरंगचि होती ॥121॥
ज्याप्रमाणे अत्यंत जवळ असलेल्या दोन सरोवरांतील पाणी उचंबळून आले असता दोन्ही सरोवरे परस्परात मिसळतांत व तरंगच तरंगाची घरे होतात.
122-10
तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी । तेथ बोध बोधाची लेणी । बोधेचि मिरवी ॥122॥
त्याप्रमाणे ज्ञानीभक्त, परस्पराना भेटले असता ब्रह्मानंदाचे कल्लोळ उठून त्यांची वेणीच गुंतली जाते आणि तेथे बोधबोधांचे अलंकार बोधांनीच घातले जातात.
123-10
जैसे सूर्ये सूर्याते वोवाळिले । की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधले । ना तरी सरिसेनि पाडे मीनले । दोनी वोघ ॥123॥
ज्याप्रमाणे एका सूर्याने दुसर्‍या सूर्याला ओवाळावे किंवा एका चंद्राने दुसर्‍या चंद्राला अलिंगन द्यावे. अथवा दोन ओघ सारखे एकमेकांत मिसळावे.
124-10
तैसे प्रयाग होत सामरस्याचे । वरी वोसाण तरत सात्त्विकाचे । ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहले ॥124॥
त्याप्रमाणे दोन भक्तांच्या प्रेमसंवादांत दोन प्रेमळ भक्तांचे प्रेम व परमेश्वररूप भगवान या तिघांच्या प्रेमाचा संगम होऊन ते एक समरस प्रेमाचे प्रयाग झाले व त्या प्रेमाच्या संगमावर अष्टसात्विकभावरूपी जाणीवेचा केरकचरा वर तरंगत राहून, भक्त त्या संवादरूपी चव्हाट्यावर गणेश होऊन राहतात.
125-10
तेव्हा तया महासुखाचेनि भरे । धावोनि देहाचिये गावाबाहेरे । मिया धाले तेणे उद्गारे । लागती गाजो ॥125॥
तेव्हा त्या भगवत्प्रेमाच्या अत्यंत सुखामुळे ते देहगावाच्या बाहेर धावतात आणि माझ्या प्रेमाने आकंठ तृप्त होऊन तृप्तीमुळे येणार्‍या ढेंकराने गाजू लागतात.
126-10
पै गुरुशिष्यांचा एकांती । जे अक्षरा एकाची वदंती । ते मेघाचियापरी त्रिजगती । गर्जती सैंघ ॥126॥
तसेच गुरुशिष्याच्या एकांतात, ज्या एका अविनाशी वस्तुविषयींच्या रहस्याची चर्चा होते, ती चर्चा ते भक्त मेघगर्जनेप्रमाणे त्रैलोक्यात गर्जून सांगतात.
127-10
जैसी कमळकळिका जालेपणे । हृदयीचिया मकरंदाते राखो नेणे । दे राया रंका पारणे । आमोदाचे ॥127॥
ज्याप्रमाणे कमळाची कळी उमलून विकसित झाली असता, आपल्या ठिकाणचा सुवास ती गुप्त ठेउ शकत नाही आणि राजापासून रंकापर्यंत ती आपल्या सुवासाचे भोजन घालते.
128-10
तैसेचि माते विश्वी कथित । कथितेनि तोषे कथू विसरत । मग तया विसरामाजी विरत । आंगे जीवे ॥128॥
त्याप्रमाणेच ते ज्ञानीभक्त, सर्व विश्वांत मोकळ्या मनाने, माझ्या गुणादि वर्णनाचे द्वारा, माझ्या सगुण स्वरूपाचे जगात निरूपण करतात. निरूपण करता करता प्रेम दाटून येऊन, ते निरूपण करणेहि विसरतात व त्यात जीवभाव व शरीरभावही विसरतात.
129-10
ऐसे प्रेमाचेनि बहुवसपणे । नाही राती दिवो जाणणे । केले माझे सुख अव्यंगवाणे । आपणपेया जिही ॥129॥
अशा निःसीम प्रेमामुळे त्यांना रात्र व दिवस यांचाही विसर पडतो व असे ते आपणच आपले ठिकाणी संपूर्ण सुखरूप होऊन राहतात.

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥10. 10॥

130-10
तया मग जे आम्ही काही । द्यावे अर्जुना पाही । ते ठायीचीच तिही । घेतली सेल ॥130॥
मग जी काही स्थिती, अर्जुना ! आम्ही त्यांना प्राप्त करून द्यायची, ती मुळात असलेली निःसीम स्थिती त्यांनीच प्राप्त करून घेतली असते, पहा.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
131-10
का जे ते जिया वाटा । निगाले गा सुभटा । ते सोय पाहोनि अव्हांटा । स्वर्गापवर्ग ॥131॥
कारण थोर योध्द्या अर्जुना ! ते ज्या मार्गाने जायला निघाले, त्या मार्गाची सुखरूपता पाहिली असता स्वर्ग व मोक्ष ह्या आडवाटा ठरतात.
132-10
म्हणोनि तिही जे प्रेम धरिले । तेचि आमुचे देणे उपाइले । परि आम्ही देयावे हेहि केले । तिहीची म्हणिये ॥132॥
म्हणून भक्तांनी जे प्रेम धरले, ते आमचे देणे होय असे प्रसिध्द झाले, पण प्रेम आम्ही द्यायचे असते, हेहि त्यांनीच रूढ केले, असे म्हणावे लागतें.
133-10
आता यावरी येतुले घडे । जे तेचि सुख आगळे वाढे । आणि काळाची दिठी न पडे । हे आम्हा करणे ॥133॥
आता यानंतर एवढे व्हावे की, ज्यांचे माझे ठिकाणी असलेले प्रेम निःसीम वाढेल आणि कालांतरानेहि ते प्रेम क्षीण होणार नाही, इतकेच आम्हाला करायचे असते.
134-10
लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्‍नेहाचिया दिठी । जैसी खेळता पाठोपाठी । माउली धावे ॥134॥
अर्जुना ! अत्यंत लाडक्या मुलाला, आई आपल्या प्रेमळ दृष्टीची खोळ करून, मूल खेळत असता जशी ती त्याच्या पाठीमागे धावत असते,
135-10
ते जो जो खेळ दावी । तो तो पुढे सोनयाचा करूनि ठेवी । तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जाये ॥135॥
व ते लाडके मूल जो जो खेळ बोटाने दाखवून मागेल, तो तो खेळ ती तान्हुल्याच्या स्वाधीन ज्याप्रमाणे करते, त्याप्रमाणे मीहि आपल्या भक्ताच्या भक्तिप्रेमाच्या निःसीम भूमीकेचे संरक्षण करीत असतो.
136-10
जिये पदवीचेनि पोषके । ते माते पावती यथासुखे । हे पाळती मज विशेखे । आवडे करू ॥136॥
ज्याप्रेमस्थितीचे पोषण केले असता ते मला सुखाने प्राप्त होतील, अशा रितीने तिचे पालन पोषण करणे हेच मला विशेषतः आवडतें.
137-10
पै गा भक्तासि माझे कोड । मज तयाचे अनन्यगतीची चाड । का जे प्रेमळाचे सांकड । आमुते घरी ॥137॥
असो पण बा अर्जुना ! भक्ताला माझे अत्यंत प्रेम असते व मलाहि त्याचा अनन्यतेची गोडी असते. कारण आमच्या घरी, म्हणजे माझ्या सगुण स्वरूपाचे ठिकाणी निःसीम प्रेम करणार्‍या प्रेमळ भक्तांचाच दुष्काळ आहे.
138-10
पाहे पा स्वर्ग मोक्ष उपायिले । दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले । आम्ही आंगही शेखी वेचिले । लक्ष्मियेसी ॥138॥
हे पहा अर्जुना ! स्वर्ग व मोक्ष हे दोन मार्ग मी प्रगट केले असून, ते दोन्ही मार्ग त्यांच्या— म्हणजे माझी सकाम व निष्काम उपासना करणार्‍यांच्या — आचरणांच्या प्रवाहांत ठेविले. आणखी लक्ष्मीसह त्यांच्या कामना पूर्ण करण्याकरिता शरीरहि झिजविलें.
139-10
परि आपणपेवीण जे एक । ते तैसेचि सुख साजुक । सप्रेमळालागी देख । ठेविले जतन ॥139॥
पण मीपणाचे जाणीवेवाचून असणारे व न विटणारे असे जे केवळ प्रेमसुख आहे, ते तसेच आपल्या प्रेमळ भक्ताला देण्याकरिता जपून ठेविलेले असते.
140-10
हा ठायवरी किरीटी । आम्ही प्रेमळु घेवो आपणपयासाठी । या बोली बोलिजत गोष्टी । तैसिया नव्हती गा ॥140॥
अर्जुना ! आम्ही आपल्या प्रेमळ भक्तावर आपल्यासाठीच इतके प्रेम करतो, पण ह्या, शब्दाने सांगण्यासारख्या गोष्टी नव्हेत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥10. 11॥

141-10
म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिही जियावया केला ठावो । एक मीवाचूनि वावो । येर मानिले जिही ॥141॥
अर्जुना ! मज सगुणस्वरूप झालेल्या आत्माचे प्रेम, हेच ज्यांनी आपल्या जीवंत राहण्याचे ठिकाण केले आणि माझ्यावाचून जेवढे काही आहे असे वाटते, ते सर्व खोटे मानलें.
142-10
तया तत्त्वज्ञा चोखटा । दिवी पोतासाची सुभटा । मग मीचि होऊनि दिवटा । पुढा पुढा चाले ॥142॥
हे उत्तम योध्द्या अर्जुना ! या त्याच्या यथार्थ विवेक ज्ञानरूप कापराच्या अल्पज्योतीचा, मग मीच मोठा टेंभा होऊन पुढे पुढे चालतो.
143-10
अज्ञानाचिये राती- । माजी तमाचि मिळणी दाटती । ते नाशूनि घाली परौती । करी नित्योदयो ॥143॥
आत्मविस्मृतिरूप अज्ञानाचे रात्रीमध्ये नानाप्रकारच्या अज्ञानरूप अंधःकाराच्या मिळणीची दाटी होत असते, ती निःशेष नाहीशी करून, मी भक्ताचे ठिकाणी नित्य अशा ज्ञानरूप प्रकाशाचा उदय करून देतों.
144-10
ऐसे प्रेमळाचेनि प्रियोत्तमे । बोलिले जेथ पुरुषोत्तमे । तेथ अर्जुन मनोधर्मे । निवालो म्हणतसे ॥144॥
याप्रमाणे सर्व प्रेमळ भक्तांचा प्रियतम जो परमात्मा श्रीकृष्ण, त्याने अर्जुनाला असे म्हटले असता अर्जुन म्हणतो, देवा ! माझे मन अत्यंत समाधान पावले आहे.
145-10
अहो जी अवधारा । भला केरु फेडिला संसारा । जाहलो जननीजठरजोहरा- । वेगळा प्रभू ॥145॥
अहो जी भगवंता ! ऐका. माझ्या अंतःकरणात जो संसाररूपी केरकचरा साचला होता, तो तुम्ही झाडून नाहीसा केला, म्हणून मी आईच्या जठररूपी लाक्षागृहांतून मुक्त झालो म्हणजे जन्ममरणापासून मुक्त झालो.
146-10
जी जन्मलेपण आपुले । हे आजि मिया डोळा देखिले । जीवित हाता चढले । आवडतसे ॥146॥
हे श्रीकृष्ण प्रभो ! आज मी आपल्या डोळ्यांनी आपला जन्म दिवस पाहिला आणि वाटेल तसे आयुष्य माझ्या हाती आले — म्हणजे मी जन्ममरणरहित अविनाशीस्वरूप झालो.
147-10
आजि आयुष्या उजवण जाहली । माझिया दैवा दशा उदयली । जे वाक्यकृपा लाधली । दैविकेनि मुखे ॥147॥
देवाच्या मुखाने माझ्यावर बोधामृतरूपी वचनाची कृपा झाली, म्हणून ते वचन ऐकून आज माझ्या आयुष्याची सफलता झाली व माझ्या दैवाच्या भाग्यदशेस प्रारंभ झाला.
148-10
आता येणे वचन तेजाकारे । फिटले आतील बाहेरील आंधारे । म्हणोनि देखतसे साचोकारे । स्वरूप तुझे ॥148॥
आता तुझ्या या वचनाच्या अर्थरूप ज्ञानप्रकाशाने आतील व बाहेरील अज्ञान- अंधःकार नाहीसा झाला, म्हणून आता तुझे खरे स्वरूप मी पाहात आहे.

अर्जुन उवाच ।
परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥10. 12॥
149-10
तरी होसी गा तू परब्रह्म । जे या महाभूता विसंवते धाम । पवित्र तू परम । जगन्नाथा ॥149॥
ज्या ठिकाणी संपूर्ण महाभूते विश्राम पावतात ते परब्रह्म तूंच आहेस. हे जगन्नाथा ! तू अत्यंत पवित्र आहेस.
150-10
तू परम दैव त तिही देवा । तू पुरुष जी पंचविसावा । दिव्य तू प्रकृतिभावा- । पैलीकडील ॥150॥
ब्रह्मा, विष्णु, महेश्वर या तिन्ही देवाचे श्रेष्ठ दैवत तूंच आहेस. सांख्यांचा पंचविसावा असंग पुरुष तूंच आहेस आणि प्रकृतीच्या पलीकडे जी दिव्य तेजोमय वस्तु सांगितली आहे, तीहि तूच आहेस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
151-10
अनादिसिद्ध तू स्वामी । जो नाकळिजसी जन्मधर्मी । तो तू हे आम्ही । जाणितले आता ॥151॥
प्रभो श्रीकृष्णा ! तू अनादि व स्वतःसिध्द ब्रह्मांडाचा स्वामी आहेस. तू जन्मादिधर्मात सांपडत नाहीस— म्हणजे तुला जन्मादिक नाहीत असा तू आहेस, हे आज मी जाणलें.
152-10
तू या कालयंत्रासि सूत्री । तू जीवकळेची अधिष्ठात्री । तू ब्रह्मकटाहधात्री । हे कळले फुडे ॥152॥
तू कालरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस. तू या जीवरूपी चैतन्यांशाला अधिष्ठान आहेस. तूंच या सर्व ब्रम्हांडाला धारण करणारा आहेस हे मला स्पष्ट कळून आले.

आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिनारदस्तथा ।
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥10. 13॥
153-10
पै आणिकही एक परी । इये प्रतीतीची येतसे थोरी । जे मागे ऐसेचि ऋषीश्वरी । सांगितले तूते ॥153॥
तुझ्या वाक्याने जो अनुभव आला त्याची आणखीहि एका दृष्टीने थोरवी माझ्या अनुभवास आली कारण मागे मोठमोठ्या ऋषींनी असेच तुझ्याविषयी सांगितले होतें.
154-10
परि तया सांगितलियाचे साचपण । हे आता माझे देखतसे अंतःकरण । जे कृपा केली आपण । म्हणोनि देवा ॥154॥
पण त्या सांगितलेल्याची सत्यता, आज माझ्या अंतःकरणाला पटली, याचे कारण देवा ! आपण माझ्यावर कृपा केली हे होय.
155-10
एऱ्हवी नारदु अखंड जवळा ये । तोही ऐसेचि वचनी गाये । परि अर्थ न बुजोनि ठाये । गीतसुखचि ऐको ॥155॥
नाही तरी नारदमुनि नेहमी आमचेकडे येत असत. तेहि अशारीतीने तुझे वर्णन करीत असत, पण त्यावेळी त्यांच्या वचनांचा अर्थ न समजता तुझ्या गायनाचे सुखच आम्हाला प्राप्त होत असे.
156-10
जी आंधळेयांचा गावी । आपणपे प्रगटले रवी । तरी तिही वोतपलीचि घ्यावी । वाचूनि प्रकाशु कैचा ? ॥156॥
अहो जी भगवंता ! आंधळ्यंच्या गावात जर सूर्य आपण होऊन प्रकाशित झाला तर त्या आंधळ्यांना सूर्याची कोवळी ऊनच घेता येईल. त्याशिवाय प्रकाश मिळणे कसे शक्य आहे ?
157-10
येरवी देवर्षि अध्यात्म गाता । आहाच रागांगेंसी जे मधुरता । तेचि फावे येर चित्ता । नलगेचि काही ॥157॥
त्याप्रमाणेच देवर्षि नारदमुनि देखील तुझ्या आध्यात्मस्वरूपाचेच वर्णन करीत असत, पण त्या वर्णनाला रागरागिणीमुळे जी वरवर गोडी येत होती, तिचाच आमच्या चित्ताला लाभ होत होता, दुसरा कोणताहि लाभ होत नव्हता.
158-10
पै असिता देवलाचेनिहि मुखे । मी एवंविधा तूते आइके । परी तै बुद्धि विषयविखे । घारिली होती ॥158॥
तसेंच असित, देवल, या ऋषीच्या मुखाने असेच तुझे वर्णन आम्ही ऐकत असूं, पण त्यावेळी आमचे अंतःकरण विषयरूपी विषाने व्यापिले होतें.
159-10
विषयविषाचा पडिपाडू । गोड परमार्थु लागे कडू । कडू विषय तो गोडू । जीवासी जाहला ॥159॥
विषयरूपी विषाचा एवढा प्रताप आहे की जीवाला, परमार्थ गोड असून कडू वाटतो व विषय कडू असूनहि गोड वाटतात.
160-10
आणि हे आणिकांचे काय सांगावे । राउळा आपणचि येऊनि व्यासदेवे । तुझे स्वरूप आघवे । सर्वदा सांगिजे ॥160॥
भगवंता! दुसर्‍याचे कशाला सांगू ! पुष्कळदां स्वतः भगवान व्यासांनी आमच्या राजवाड्यात येऊन तुझ्या स्वरूपाचे सदा संपूर्ण वर्णन करीत असावे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
161-10
परि तो अंधारी चिंतामणि देखिला । जेवी नव्हे या बुद्धी उपेक्षिला । पाठी दिनोदयी वोळखिला । होय म्हणौनि ॥161॥
पण ज्याप्रमाणे आंधारांत चिंतामणि पडला असता तो चिंतामणि नव्हे या बुध्दीने उपेक्षा होते. नंतर उजाडल्यावर, तो चिंतामणिच होय ओळखला जातो.
162-10
तैसी व्यासादिकांची बोलणी । तिया मजपाशी चिद्रत्‍नांचिया खाणी । परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी । तुजवीण कृष्णा ॥162॥
त्याप्रमाणे व्यासादिकांची बोलणी म्हणजे मला प्राप्त झालेल्या चैतन्यरूपी रत्नांच्या खाणीच होत्या, पण हे श्रीकृष्णा ! तुझ्या सूर्यप्रकिशाच्या अभावी त्यांची उपेक्षाच होत होती.

सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव ।
न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥10. 14॥
163-10
ते आता वाक्यसूर्यकर तुझे फाकले । आणि ऋषी मार्ग होते जे कथिले । तया आघवियांचेचि फिटले । अनोळखपण ॥163॥
तेच आता तुझे वाक्यरूपी सूर्यकिरण माझ्या अंतःकरणात फांकल्यामुळे पूर्वी ऋषींनी जे मार्ग सांगून ठेविले आहेत त्या सर्वाची आज ओळख पटली — म्हणजे त्यांनी जे तुझ्या स्वरूपाचे पूर्ण ब्रह्मत्वाने वर्णन केले होते ते सर्व यथार्थ होते, याचा आज मला अनुभव आला.
164-10
जी ज्ञानाचे बीज तयांचे बोल । माजी हृदयभूमिके पडिले सखोल । वरि इये कृपेची जाहाली वोल । म्हणोनि संवादफळेशी उठले ॥164॥
देवा ! त्या ऋषींचे बोलणे हे आत्मज्ञानाचे बीज होय. ते माझ्या ह्रदयरूपी भूमीत खोल पडले व त्यावर तुझ्या कृपेचा ओलावा मिळाल्यामुळे ते बीज अंकुरित होऊन ते सर्व संवादरूपी यथार्थबोधाने फलद्रूप झाले.
165-10
अहो नारदादिका संता । त्यांचिया उक्तिरूप सरिता । मी महोदधी जाला अनंता । संवादसुखाचा ॥165॥
देवा ! नारदादि संतांच्या वचनरूप नद्यांना मी एकवाक्यतारूप संवादसुखाचा समुद्र झालो.
166-10
प्रभु आघवेनि येणे जन्मे । जिये पुण्ये केली मिया उत्तमे । तयांची न ठकतीचि अंगी कामे । सद्‍गुरु तुवा ॥166॥
देवा ! या आणि मागील सर्व जन्मात जेवढे काही निष्काम पुण्य केले असेल त्याचे, सद्गुरुप्राप्ती हे जे फळ, ते कधी होत नाही असे नाही. म्हणूनच तू मला सद्गुरू प्राप्त झालास.
167-10
एऱ्हवी वडिलवडिलांचेनि मुखे । मी सदा तूते कानी आइके । परि कृपा न कीजेचि तुवा एके । तव नेणवेचि काही ॥167॥
वस्तुतः वाडवडिलांच्या मुखाने मी तुझ्या स्वरूपाचा महिमा सदा कानाने ऐकत होतो, पण जोपर्यंत तुझी कृपा झाली नव्हती, तोपर्यंत मला तुझा महिमा कळू शकला नाही.
168-10
म्हणोनि भाग्य जै सानुकूळ । जालिया केले उद्यम सदा सफळ । तैसे श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच ॥168॥
म्हणून ज्याप्रमाणे आपले दैव जेव्हा अनुकूल होते, तेव्हा केलेले सर्व प्रयत्न सफळ होतात, त्याप्रमाणे श्रीगुरुकृपेनेच संपूर्ण श्रवण व पठण केलेल्या वचनांचा यथार्थ बोध होतो.
169-10
जी बनकरु झाडे सिंपी जीवेसाटी । पाडूनि जन्मे काढी आटी । परि फळेसी तैचि भेटी । जै वसंतु पावे ॥169॥
देवा ! माळ्याने आपल्या जिवाच्या मोबदल्याने— म्हणजे झाडाचे जगणे तेच आपले जगणे असे समजून— झाडाना पाणी घातले आणि जन्मापाठी जन्म घेऊन असेच कष्ट केले, तरीपण एवढ्या कष्टानेही झाडाना फळे येतातच असे नाही, ते वसंतऋतूच्या स्वाधीन आहे.
170-10
अहो विषमा जै वोहट पडे । तै मधुर ते मधुर आवडे । पै रसायने तै गोडे । जै आरोग्य देही ॥170॥
त्याचप्रमाणे देवा ! त्रिदोषाची विषमता कमी झाली असता, मधुररस मधुर लागतो, आणि देहाच्या ठिकाणी आरोग्य असले तरच रसायन परिणामकारक होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
171-10
का इंद्रिये वाचा प्राण । या जालियांचे तैचि सार्थकपण । जै चैतन्य येऊनि आपण । संचरे माजी ॥171॥
चैतन्य शरीरांत प्रवेश करीते तेव्हाच इंद्रिये, वाणी, प्राण यांचे असण्याचे सार्थक होते.
172-10
तैसे शब्दजात आलोडिले । अथवा योगादिक जे अभ्यासिले । ते तैचि म्हणो ये आपुले । जै सानुकूल गुरु ॥172॥
त्याप्रमाणे मनुष्य जेवढे काही शास्रावलोकन करतो किंवा योगादिक मार्गाचा अभ्यास करतो, तेवढे सर्व श्रीगुरुची कृपा झाली तरच खरोखर स्वाधीन होते.
173-10
ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजे । अर्जुन निश्चयाचि नाचतुसे भोजे । तेवीचि म्हणे देवा तुझे । वाक्य मज मानले 173॥
(श्रीगुरुकृपेनेच शब्द यथार्थ समजू शकतात. ) या आलेल्या अनुभवाने अर्जुन मत्त होऊन, दृढ निश्चयाची मूर्ती होऊन, नाचूं लागला व तसेंच, ‘देवा ! तुझे म्हणणे मला पटले’ असे म्हणू लागला.
174-10
तरि साचचि हे कैवल्यपती । मज त्रिशुद्धी आली प्रतीती । जे तू देवदानवांचिये मती- । जोगा नव्हसी ॥174॥
हे कैवल्याचे स्वामी भगवंता ! तरी तू खरोखरच देवदानवांच्या बुध्दीस आकलन होण्यासारखा नाहीस, हे त्रिवार सत्य आहे, असा मला अनुभव आला.
175-10
तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा । जो आपुलिया जाणे जाणिवा । तो कहीचि नोहे हे स‍द्भावा । भरवसेनि आले ॥175॥
तुझ्या कृपेने जोपर्यंत तुझ्या वचनाचा यथार्थ स्पष्ट बोध होत नाही, तोपर्यंत आपल्या बुध्दीनेच जाणण्याचा एखाद्याने कितीहि प्रयत्न केला, तरी त्याला त्यांचा यथार्थ बोध होणे कधीहि शक्य नाही, हे मला निश्चित कळून आले.

स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥10. 15॥
176-10
एथ आपुले वाडपण जैसे । आपणचि जाणिजे आकाशे । का मी येतुली घनवट ऐसे । पृथ्वीचि जाणे ॥176॥
ज्याप्रमाणे आकाशाचे मोठेपण आकाशालाच समजते, किंवा पृथ्वीचे वजन पृथ्वीलाच समजते,
177-10
तैसा आपुलिये सर्वशक्ती । तुज तूचि जाणू लक्ष्मीपती । येर वेदादिक मती । मिरवती वाया ॥177॥
त्याप्रमाणे हे लक्ष्मीपती, तुमची सर्व शक्ती तुम्हीच जाणतां. एरव्ही तुमची आम्हाला कळली, असा वेदादिक व्यर्थ गर्व वाहतात.
178-10
हा गा मनाते मागा सांडावे । पवनाते वावी मवावे । आदिशून्य उतरोनि जावे । केउते बाही ॥178॥
अहो, मनाच्या गतीला कसे मागे टाकावे ? वार्‍याला कवेत कसे धरावे ? आणि बाहुंनी माया कशी तरून जावी ?
179-10
तैसे हे तुझे जाणणे आहे । म्हणोनि कोणाही ठाकते नोहे । आता तुझे ज्ञान होये । तुजचिजोगे ॥179॥
त्याप्रमाणे, तुमचे ज्ञान होणे फार दुस्तर आहे, म्हणून ते कोणाला होत नाही, तर तुमचे तुम्हालाच समजते.
180-10
जी आपणपयाते तूचि जाणसी । आणिकाते सांगावयाही तू समर्थ होसी । तरी आता एक वेळ घाम पुसी । आर्तीचिये निडळीचा ॥180॥
तुमचे ज्ञान तुम्हालाच आहे, व ते आपण दुसर्‍यांनाही समजून देण्यास समर्थ आहात, तर एकदा आमच्या हौसेच्या कपाळाचा घाम पुसून टाका बरे !
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
181-10
हे आइकिले की भूत भावना । त्रिभुवनगजपंचाना । सकळदेवदेवतार्चना । जगन्नायका ॥181॥
हे प्राणिमात्राला उत्पन्न करणार्‍या ! हे संसाररूपी हत्तींचा नाश करणार्‍या ! हे सकळ देवांना पूज्य असणार्‍या ! हे जगताचे स्वामी असणार्‍या ! माझे हे बोलणे ऐकलेंस काय ?
182-10
जरी थोरी तुझी पाहात आहो । तरी पासी उभे ठाकावयाही योग्य नोहो । या शोच्यता जरी विनवू बिहो । तरी आन उपायो नाही ॥182॥
अनुभविलेल्या तुझ्या थोरवीकडे लक्ष दिले असता, तुझ्यापाशी उभे राहण्यापुरती देखील आमची योग्यता नाही. या अपात्रतेचे वाईट वाटून जरी तुम्हाला विनंति करायला भ्यालो तरीपण त्यांवाचून दुसरा उपायहि नाही.
183-10
भरले समुद्र सरिता चहूकडे । परि ते बापियासि कोरडे । का जै मेघौनि थेंबुटा पडे । तै पाणी की तया ॥183॥
चहूकडे समुद्र, नद्या, इत्यादि जलाशय जरी भरले, तरी त्या बापड्या चातकाच्या दृष्टीने मात्र ते सर्व कोरडेच होत, कारण जेव्हा मेघांतून पाण्याचा थेंब पडतो, तेव्हाच तो ते पाणी पीत असतो.
184-10
तैसे गुरु जी सर्वत्र आथी । परि कृष्णा आम्हा तूचि गती । हे असो मजप्रती । विभूती सांगे ॥184॥
त्या प्रमाणे उपदेश करणारे श्रीगुरु सर्वत्र असले तरी श्रीकृष्णा ! आम्हाला मात्र शरण जाऊन विचारण्याला तूंच एक गति आहेस. हे असो. मला आता आपल्या विभूति सांग.
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः । याभिर्विभूतिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥10. 16॥
185-10
जी तुझिया विभूती आघविया । परि व्यापिती शक्ति दिव्या जिया । तिया आपुलिया दावाविया । आपण मज ॥185॥
देवा ! दिव्यशक्तीने व्यापून असलेल्या ज्या तुझ्या संपूर्ण विभूती आहेत, त्या आपल्या आपण मला दाखवाव्यात.
186-10
जिही विभूती यया समस्ता । लोकाते व्यापूनि आहाती अनंता । तिया प्रधाना नामांकिता । प्रगटा करी ॥186॥
हे अनंथा, ज्या तुझ्या विभूती तिन्ही लोकांना व्यापून आहेत. त्यातील मुख्य मुख्य नावाजलेल्या असतील त्या सांगा.

कथं विद्यामहं योगिंस्त्वा सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥10. 17॥
187-10
जी कैसे मिया तूते जाणावे । काय जाणोनि सदा चिंतावे । जरी तूचि म्हणो आघवे । तरि चिंतनचि न घडे ॥187॥
महाराज, मी तुम्हाला कसे जाणावे ? जर सर्व तुम्हिच आहात असे म्हणावे तर माझ्या हातून तुमचे चिंतन होणार नाही.
188-10
म्हणोनि मागा भाव जैसे । आपुले सांगितले तुवा उद्देशे । आता विस्तारोनि तैसे । एक वेळ बोले ॥188॥
म्हणून पूर्वी (4/5/6 श्र्लोकात) ज्या संक्षेपाने आपल्या विभूती सांगितल्या त्यांचा विस्तार करून एक वेळ पुन्हा एकदा सांगा
189-10
जया जया भावाचा ठायी । तूते चिंतिता मज सायासु नाही । तो विवळ करूनि देई । योगु आपुला ॥189॥
ज्या ज्या विभूतीच्या ठिकाणी तुम्ही आहात असे समजून चिंतन केले असता, मला श्रम पडणार नाहीत, असा तुमच्या प्राप्तीचा तो उपाय स्पष्ट करून सांगा.

विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥10. 18॥
190-10
आणि पुसलिया जिया विभूती । त्याही बोलाविया भूतपती । येथ म्हणसी जरी पुढती । काय सांगो ॥190॥
हे भूपती, मी ज्या विभूती बद्दल विचारले आहे त्या सांगा, त्याच त्या पुन्हा पुन्हा काय सांगावयाचे आहेत असे जर कदाचित म्हणाल, तर
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
191-10
तरी हा भाव मना । झणे जाय हो जनार्दना । पै प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवे जी ॥191॥
देवा जनार्दना ! अशी तुझ्या मनात कदाचित् कल्पना येईल, पण प्रकृतिजन्यहि अमृत प्यायला मिळाले असता जसे कोणाच्याने नको म्हणवत नाही.
192-10
जे काळकूटाचे सहोदर । जे मृत्यूभेणे प्याले अमर । तरि दिहाचे पुरंदर । चौदा जाती ॥192॥
जे अमृत काळकूटाचा भाऊ होय, मृत्यु येऊ नये म्हणून ते इंद्रादि प्याले, तरी ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र होतात.
193-10
ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु । जया वायाचि अमृतपणाचा आभासु । तयाचाही मीठांशु । जे पुरे म्हणो नेदी ॥193॥
असा कोणी एक क्षीरसमुद्रांतून निघालेला जो रस, त्याचे ठिकाणी व्यर्थच अमरपणाचा भास आहे, पण त्याचीहि गोडी, ‘पुरे’ असे म्हणू देत नाही.
194-10
तया पाबळेयाही येतुलेवरी । गोडियेचि आथि थोरी । मग हे तव अवधारी । परमामृत साचे ॥194॥
अशा त्या क्षुद्र पदार्थाच्या गोडीची एवढी थोरवी आहे. मग पहा, हे तर खरोखर परमामृतच आहे.
195-10
जे मंदराचळु न ढाळिता । क्षीरसागरु न डहुळिता । अनादि स्वभावता । आइते आहे ॥195॥
या परमामृताकरिता मंदाराचलाला फिरवावे लागले नाही, क्षीरसागराला डहुळावे लागले नाही, हे अनादि, स्वाभाविक व सिध्द आहे.
196-10
जे द्रव ना नव्हे बद्ध । जेथ नेणिजती रस गंध । जे भलतयांही सिद्ध । आठवलेचि फावे ॥196॥
जे पातळ नाही, घट्ट नाही, ज्याचे ठिकाणी रसगंधादि गुणहि नाहीत व जे स्मरण झाल्याबरोबर आपल्या ठिकाणी मूळचेच आहे असा कोणालाहि अनुभव येतो.
197-10
जयाची गोठीचि ऐकतखेंवो । आघवा संसारु होय वावो । बळिया नित्यता लागे येवो । आपणपेया ॥197॥
या परमामृताचे नुसते वर्णन ऐकताच सर्व संसार खोटा ठरतो व आपला विनाशीपणा जाऊन, बळेच आपल्याठिकाणी नित्यता धर्म येतो.
198-10
जन्ममृत्यूची भाख । हारपोनि जाय निःशेख । आत बाहेरी महासुख । वाढोचि लागे ॥198॥
जन्ममरणाची भाषा निःशेष निहीशी होते व आंतबाहेर परमसुख वाढू लागतें.
199-10
मग दैवगत्या जरी सेविजे । तरी ते आपणचि होऊनि ठाकिजे । ते तुज देता चित्त माझे । पुरे म्हणो न शके ॥199॥
सुदैवाने या परमामृताचे सेवन झाले असता, ते आपणच होऊन राहते, असे हे परमामृत तू मला पाजीत असतांना माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही.
200-10
तव तुझे नामचि आम्हा आवडे । वरि भेटी होय आणि जवळिक जोडे । पाठी गोठी सांगसी सुरवाडे । आनंदाचेनी ॥200॥
भगवंता ! तुझे नांवच तर आम्हाला अत्यंत प्रिय वाटतें. त्यातहि पुनः तुझे दर्शन होऊन नित्य सान्निध्य आहे. त्यात पुनः प्रेमाने गोड गोड गोष्टी सांगतोस.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
201-10
आता हे सुख कायिसयासारिखे । काही निर्वचेना मज परितोखे । तरि येतुले जाणे जे येणे मुखे । पुनरुक्तही हो ॥201॥
आता हे होणारे सुख कशासारखे आहे, हे मला झालेल्या आनंदामुळे शब्दाने काही सांगता येत नाही. पण एवढे मात्र मला सांगता येते की तुमच्या मुखाने तेच सांगितले गेले, तरी ते गोडच लागतें.
202-10
हा गा सूर्य काय शिळा ? । अग्नि म्हणो येत आहे वोंविळा । का नित्य वाहातया गंगाजळा । पारसेपण असे ॥202॥
भगवंता ! सूर्य शिळा होतो काय ? अग्नीला ओवळा म्हणता येते काय ? नित्य वाहणार्‍या गंगाजळाला पारोसेपण असते काय ?
203-10
तुवा स्वमुखे जे बोलिले । हे आम्ही नादासि रूप देखिले । आजि चंदनतरूची फुले । तुरंबीत आहो मा ॥203॥
तुम्ही जे स्वमुखाने सांगितले, ते ऐकून आम्ही मूर्तीमंत नादब्रह्मच पाहिला किंवा आज सुवासिक अशा चंदनाच्या झाडाच्या फुलांचा सुवास घेत आहो असे वाटलें.
204-10
या पार्थाचिया बोला । सर्वांगे कृष्ण डोलला । म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा ॥204॥
असे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्ण सर्वागाने डोलू लागले व खरोखर, अर्जुन हा भक्तिज्ञानाचे कोठार झाला, असे मनात म्हणाले.
205-10
ऐसा पतिकराचिया तोषा आंतु । प्रेमाचा वेगु उचंबळतु । सायासे सांवरूनि अनंतु । काय बोले ॥205॥
याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी भक्तिज्ञानाचा अविष्कार पाहून, भगवंताला झालेल्या संतोषाने, भगवंताच्या अंतःकरणात प्रेम उचंबळून लागले. पण मोठ्या प्रयत्नाने तो प्रेमाचा अवेग आवरून देव पुढे बोलू लागले.
श्रीभगवानुवाच
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥10. 19॥
206-10
मी पितामहाचा पिता । हे आठवितांही नाठवे चित्ता । की म्हणतसे बा पंडुसुता । भले केले ॥206॥
मी ब्रह्मदेवाचाहि पिता आहे याची आठवणं करताहि भगवंताला आठवण होऊ शकत नव्हती, म्हणून भगवंतांनी अर्जुनाला, ” बापा अर्जुना! ” बरे केलेंस असे म्हटलें.
207-10
अर्जुनाते बा म्हणे एथ काही । आम्हा विस्मो करावया कारण नाही । आंगे तो लेकरू काई । नव्हेचि नंदाचे ॥207॥
येथे भगवंतांनी अर्जुनाला ” बापा अर्जुना ” म्हटले याचे आपणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भगवान स्वतः नंदाचे लेकरू झाले नाही काय ?
208-10
परि प्रस्तुत ऐसे असो । हे करवी आवडीचा अतिसो । मग म्हणे आइके सांगतसो । धनुर्धरा ॥208॥
पण सध्या हे बाजूला ठेवू. मनात असलेले अतिशय प्रेमच असा प्रकार करवित असते. मग भगवान म्हणतात, धनुर्धरा ! सांगतो ते ऐक.
209-10
तरी तुवा पुसलिया विभूती । तयांचे अपारपण सुभद्रापती । ज्या माझियाचि परि माझिये मती । आकळती ना ॥209॥
तू माझ्या विभूति विचारल्यास, पण अर्जुना ! त्यांना मर्यादाच नाही. कारण मलाच माझ्या विभूतींची संख्या करवत नाही.
210-10
आंगीचिया रोमा किती । जयाचिया तयासि न गणवती । तैसिया माझिया विभूती । असंख्य मज ॥210॥
अंगावर रोम किती आहेत, हे ज्याचे त्यालाच मोजून सांगता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विभूती मलाच मोजता येण्याजोग्या नाहीत.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
211-10
एऱ्हवी तरी मी कैसा केवढा । म्हणोनि आपणपयांही नव्हेचि फुडा । यालागी प्रधाना जिया रूढा । तिया विभूती आइके ॥211॥
एरवी मी कसा व केवढा आहे, हे मलाच स्पष्ट कळत नाही, म्हणून मुख्य मुख्य विभूती ज्या प्रसिध्द आहेत त्या सांगतो, ऐक.
212-10
जिया जाणतलियासाठी । आघवीया जाणितलिया होती किरीटी । जैसे बीज आलिया मुठी । तरूचि आला होय ॥212॥
ज्याप्रमाणे बीज हाती आले असता वृक्षच हातात आल्यासारखा होतो, त्याप्रमाणे ज्या माझ्या मुख्य मुख्य विभूती जाणल्या असता, संपूर्ण विभूती जाणल्या जातील.
213-10
का उद्यान हाता चढिले । तरी आपैसी सांपडली फळे फुले । तेवी देखिलिया जिया देखवले । विश्व सकळ ॥213॥
किंवा बगीचा हातात आला असता, त्यातील फुले, फळेहि अनायासे हातात येतात, याप्रमाणे ज्या विभूती समजल्याबरोबर सर्व विश्वच विभूतीमय दिसू लागेल.
214-10
एऱ्हवी साचचि गा धनुर्धरा । नाही शेवटु माझिया विस्तारा । पै गगना ऐशिया अपारा । मजमाजी लपणे ॥214॥
वस्तुतः धनुर्धरा ! माझ्या विस्ताराला खरोखर अंत नाही, कारण ज्याला आपण अमर्याद म्हणतो असे आकाशहि माझ्या ठिकाणीच असते.

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
अहमादिश्च मध्यं च भूतानांमन्त एव च ॥10. 20॥
215-10
आइके कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका । मी आत्मा असे एकैका । भूतमात्राचा ठायी ॥215॥
काळे कुरळे केस मस्तकावर धारण करणार्‍या, धनुर्विद्येत दुसरा शंकर असलेल्या अशा अर्जुना! ऐक, मी प्रत्येक भूताचे ठिकाणी आत्मरूपाने आहे.
216-10
आंतुलीकडे मीचि यांचा अंतःकरणी । भूतांबाहेरी माझीच गंवसणी । आदि मी निर्वाणी । मध्यही मीचि ॥216॥
या भूतांच्या आत अंतःकरणात – मीच असून, बाहेरून सर्व भूतांना माझीच खोळ घातलेली आहे व भूतांच्या आदी, अंती व मध्येहि मीच आहे.
217-10
जैसे मेघा या तळी वरी । एक आकाशचि आत बाहेरी । आणि आकाशीचि जाले अवधारी । असणेही आकाशी ॥217॥
ज्याप्रमाणे मेघाला खाली-वर, आत -बाहेर एक आकाशच असते. आकाशांतच मेघ उत्पन्न होतात व आकाशांतच राहतात.
218-10
पाठी लया जे वेळी जाती । ते वेळी आकाशचि होऊनि ठाती । तेवी आदि स्थिती अंतगती । भूतांसि मी ॥218॥
शेवटी जेव्हा ते नाहीसे होतात, तेव्हा आकाशरूपच होऊन जातात, त्याप्रमाणे सर्व भूतांचे उत्पत्ति, स्थिति, लय मीच आहे.
219-10
ऐसे बहुवस आणि व्यापकपण । माझे विभूतियोगे जाण । तरी जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइक ॥219॥
असे माझे नानाविध व व्यापक होणे हे माझ्या विभूति व योगामुळे होत असते असे समज. तर आता आपल्या जीवाचे व श्रवणेंद्रियाचे ऐक्य करून श्रवणेंद्रियांच्या द्वारा ऐक- म्हणजे अत्यंत एकाग्र चित्ताने ऐक.
220-10
याहीवरी त्या विभूती । सांगणे ठेले तुजप्रति । सांगेन म्हणितले तुज प्रीती । त्या प्रधाना आइके ॥220॥
मी सर्वत्र निमरूपात व्यापून असल्यामूळें, विभूति सांगणे खरोखर संपले; पण अर्जुना ! तुला विभूति सांगतो असे म्हटले, म्हणून माझ्या मुख्य मुख्य विभूति ऐक.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान ।
मरीचिर्मरुतानामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥10. 21॥
221-10
हे बोलोनि तो कृपावंतु । म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु । रवी मी रश्मिवंतु । सुप्रभांमाजी ॥221॥
असे म्हणून तो कृपाळु भगवान म्हणाला, आदित्यात मी विष्णु आहे. चांगल्या प्रकाशवान् पदार्थामध्ये किरणयुक्त असणारा सूर्य मी आहे.
222-10
मरूद्‍गणांच्या वर्गी । मरीचि म्हणे मी शारङ्गी । चंद्र मी गगनरंगी । तारांमाजी ॥222॥
मरुद्गणांच्या समुदायात, भगवान म्हणाले मी मरीचि आहे. आकाशमंडळांतील नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे.

वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः ।
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥10. 22॥
223-10
वेदाआंतु सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु । देवांमाजी मरुद्‍बंधु । महेंद्र तो मी ॥223॥
भगवान म्हणतात, वेदांत सामवेद तो मी आहे. देवांमध्ये मरुतांचा भाऊ इंद्र तो मी आहे.
224-10
इंद्रियाआंतु अकरावे । मन ते मी हे जाणावे । भूतांमाजी स्वभावे । चेतना ते मी ॥224॥
इंद्रियांमध्ये अकरावे जे मन, ते मी आहे असे जाण. भूतमात्रामध्ये सर्वाच्या ठिकाणी स्वाभाविक असणारे चैतन्य, ते मी आहे.

रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥10. 23॥
225-10
अशेषांही रुद्रांमाझारी । शंकर जो मदनारी । तो मी येथ न धरी । भ्रांति काही ॥225॥
सर्व रुद्रांमध्ये मदनाचा नाश करणारा जो शंकर तो मी आहे, या विषयी शंका घेऊ नकोस.
226-10
यक्षरक्षोगणाआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु । तो कुबेरु मी हे अनंतु । म्हणता जाहला ॥226॥
यक्षराक्षस यांच्या समुदायात शंकराचा मित्र जो धनसंपन्न कुबेर, तो माझी विभूति होय, असे अनंत म्हणाला.
227-10
मग आठांही वसूंमाझारी । पावकु तो मी अवधारी । शिखराथिलिया सर्वोपरी । मेरु तो मी ॥227॥
मग अष्टवसूंमध्ये जो अग्नि, तो मी आहे, हे जाण आणि उंच शिखर असलेल्या पर्वतांत मेरु मी आहे.

पुरोधसा च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥10. 24॥
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥10. 25॥
228-10
जो स्वर्ग सिंहासना सावावो । सर्वज्ञते आदीचा ठावो । तो पुरोहितांमाजी रावो । बृहस्पती मी ॥228॥
स्वर्गाच्या सिंहासनाला सहायभूत, सर्वज्ञतादि गुणांचे राहते घर व पुरोहितांचा राजा असा जो बृहस्पति तो मी आहे.
229-10
त्रिभुवनींचिया सेनापती- । आत स्कंदु तो मी महामती । जो हरवीर्ये अग्निसंगती । कृत्तिकाआंतु जाहला ॥229॥
हे महामति अर्जुना ! त्रैलोक्यातील सेनापतिमध्ये श्रेष्ठ, शंकराच्या वीर्यापासून, अग्नीच्या संगतीने, कृत्तिकेच्या पोटी जन्मलेला, जो कार्तिकस्वामी, तो माझे स्वरूप होय.
230-10
सकळिका सरोवरांसी । माजी समुद्र तो मी जळराशी । महर्षींआंतु तपोराशी । भृगु तो मी ॥230॥
समस्त सरोवरांमध्ये अगाध जळराशी जो समुद्र तो मी आहे व महर्षींमध्ये तपोराशी जो भृगुऋषि तो मी आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-10
अशेषांही वाचा । आंतु नटनाच सत्याचा । ते अक्षर एक मी वैकुंठीचा । वेल्हाळु म्हणे ॥231॥
वाणीने उच्चारिले जाणार्‍या संपूर्ण शब्दांमध्ये अविनाशीपणाचे नृत्य करणारे जे ॐ काररूपी एक अक्षर ते मी होय, असे वैकुंठांत विलास करणारा भगवान श्रीकृष्ण म्हणतो.
232-10
समस्तांही यज्ञांचा पैकी । जपयज्ञु तो मी ये लोकी । जो कर्मत्यागे प्रणवादिकी । निफजविजे ॥232॥
जो जपयज्ञ, यज्ञादि कर्म न करता ॐ कारादिकांच्या योगाने प्रगट केला जातो, तो या लोकातील संपूर्ण यज्ञापेकी मी आहे.
233-10
नामजपयज्ञु तो परम । बाधू न शकेस्‍नानादि कर्म । नामे पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थे ॥233॥
नामजपयज्ञ हा सर्व यज्ञांत श्रेष्ठ आहे. त्याला स्नानादि कर्मांचे बंधन नाही. उलट त्या नामजपयज्ञानेच धर्माधर्म देखील पावन व पूर्ण होतात; कारण नाम हे परब्रह्म आहे असाच वेदार्थ आहे.
234-10
स्थावरा गिरीवरा आंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु । तो मी म्हणे कांतु । लक्ष्मियेचा ॥234॥
स्थावर जे पर्वतादिक पदार्थ त्यात पुण्याची राशी जो हिमालय तो मी आहे असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाले.

अश्वत्थः सर्ववृक्षाणा देवर्षीणा च नारदः ।
गन्धर्वाणा चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥10. 26॥
उच्चैःश्रवसमश्वाना विद्धि माममृतोद्‍भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणा नराणा च नराधिपम् ॥10. 27॥
235-10
कल्पद्रुम हन पारिजातु । गुणे चंदनुही वाड विख्यातु । तरि यया वृक्षजाता आंतु । अश्वत्थु तो मी ॥235॥
गुणाने, कल्पवृक्ष, पारिजात, चंदन हे वृक्ष श्रेष्ठ म्हणून प्रसिध्द आहेत; तरीपण या सर्व वृक्षामध्ये अश्वत्थवृक्ष मी आहे.
236-10
देवऋषीआंतु पांडवा । नारदु तो मी जाणावा । चित्ररथु मी गंधर्वा । सकळिकांमाजी ॥236॥
अर्जुना ! देवर्षींमध्ये नारदऋषि मी आहे असे जाण. सर्व गंधर्वामध्ये चित्ररथ गंधर्व हा मी होय.
237-10
यया अशेषांही सिद्धा- । माजी कपिलाचार्यु मी प्रबुद्धा । तुरंगजाता प्रसिद्धा- । आत उचैःश्रवा मी ॥237॥
या सर्व सिध्दांमध्ये, सूज्ञ अर्जुना ! कपिलाचार्य मी होय. अमृतासाठी देवांनी केलेल्या क्षीरसागराच्या मंथनांतून निघालेले उच्चैःश्रवा व
238-10
राजभूषण गजाआंतु । अर्जुना मी गा ऐरावतु । पयोराशी सुरमथितु । अमृतांशु तो मी ॥238॥
ऐरावत अनुक्रमे हे दोन, अश्वांच्या प्रसिध्द असलेल्या जातिमध्ये व राज्यभूषण जे गज त्यामध्ये, माझ्या विभूति आहेत.
239-10
यया नरांमाजी राजा । तो विभूतिविशेष माझा । जयाते सकळ लोक प्रजा । होऊनि सेविती ॥239॥
ज्याची सर्व लोक प्रजाजन होऊन सेवा करतात तो राजा, सर्व मनुष्यांमध्ये माझी विभूति होय.

आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥10. 28॥
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥10. 29॥
240-10
पै आघवेया हातियेरा । आत वज्र ते मी धनुर्धरा । जे शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे ॥240॥
संपूर्ण हत्यारांमध्ये जे शंभर यज्ञ करणार्‍या इंद्राच्या हातात असते ते वज्र मी आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-10
धेनूंमध्ये कामधेनु । ते मी म्हणेविष्वक्सेनु । जन्मवितयाआंत मदनु । तो मी जाणे ॥241॥
गायींमध्ये कामधेनु ती मी होय, असे भगवान म्हणतात. जन्मदेणार्‍यांमध्ये मदन हा माझे स्वरूप जाण.
242-10
सर्पकुळाआंत अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता । नागांमाजी समस्ता । अनंतु तो मी ॥242॥
अर्जुना ! संपूर्ण सर्पकुळांमध्ये त्या कुळाचा अधिपति जो वासुकी तो मी आहे व सर्व नागामध्ये अनंत मी आहे.
243-10
अगा यादसाआंतु । जो पश्चिमप्रमदेचा कांतु । तो वरुण मी हे अनंतु । सांगत असे ॥243॥
अर्जुना ! जलात राहणार्‍या प्राण्यांमध्ये पश्चिमदिशारूपी स्रियेचा पति जो वरूण तो मी आहे असे श्रीकृष्ण सांगू लागले.
244-10
आणि पितृगणा समस्ता- । माजी अर्यमा जो पितृदेवता । तो मी हे तत्त्वता । बोलत आहे ॥244॥
सर्व पितरांच्या समुदायात अर्यमा नावांची पितृदेवता मी आहे, हे मी खरे जे सुखदुःखाचे भोग देतात.
245-10
जगाची शुभाशुभे लिहिती । प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती । मग केलियानुरूप होती । भोगनियम जे ॥245॥
असे भोगांचे नियमन करणार्‍यामध्ये, कर्माचा साक्षी जो यमधर्मराज तो मी आहे, असे रमेचा पति आत्माराम भगवान श्रीकृष्ण म्हणाले.
246-10
तया नियमितयांमाजी यमु । जो कर्मसाक्षी धर्मु । तो मी म्हणे रामु । रमापती ॥246॥
असे भोगांचे नियमन करणार्‍यांमध्ये, कर्माचा साक्षी जो यमधर्मराज तो मी आहे, असे रमेचा पती आत्माराम भगवान श्रीकृष्ण म्हणाले.

प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥10. 30॥
247-10
अगा दैत्यांचिया कुळी । प्रल्हादु तो मी न्याहाळी । म्हणौनि दैत्यभावादिमेळी । लिंपेचिना ॥247॥
अर्जुना ! दैत्यांच्या कुळामध्ये प्रल्हाद मी आहे. पहा. म्हणूनच त्याच्या ठिकाणी दैत्यांच्या स्वभावाचा स्पर्श नव्हता.
248-10
पै कळितयांमाजी महाकाळु । तो मी म्हणे गोपाळु । श्वापदांमाजी शार्दूळु । तो मी जाण ॥248॥
श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ! गणना करणार्‍यांमध्ये महाकाळ मी आहे आणि वन्यपशूंमध्ये सिंह मी आहे असे जाण
249-10
पक्षिजातिमाझारी । गरुड तो मी अवधारी । यालागी जो पाठीवरी । वाहो शकेमाते ॥249॥
सर्व पक्षिजातींमध्ये गरुड मी आहे हे जाण, म्हणूनच तो मला पाठीवर वाहू शकतो.

पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणा मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जान्हवी ॥10. 31॥
250-10
पृथ्वीचिया पैसारा- । माजी घडी न लगता धनुर्धरा । एकेचि उड्डाणे साताहि सागरा । प्रदक्षिणा करी जो ॥250॥
एका उड्डाणासरसे साताही सागराला प्रदक्षिणा होईल अशा वेगाने वाहणारे जेवढे या संपूर्ण पृथ्वीवर पदार्थ आहेत,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
251-10
तया वहिलिया गतिमंता- । आत पवनु तो मी पंडुसुता । शस्त्रधरा समस्ता- । माजी श्रीराम तो मी ॥251॥
त्यात वायू तो मी आहे आणि शस्र धारण करणार्‍यांमध्ये प्रभू रामचंद्र मी आहे.
252-10
जेणे सांकडलिया धर्माचेन कैवारे । आपणपया धनुष्य करूनि दुसरे । विजयलक्ष्मीये एक मोहरे । केले त्रेती ॥252॥
ज्यांनी संकटांत पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन व आपण आपल्याहून निराळे असे धनुष्य करून त्रेतायुगामध्ये एका विजयरूपी लक्ष्मीला आपल्याच समोर केले — म्हणजे संकटात सापडलेल्या धर्माला एकसारखा विजयच मिळवून दिला असा अर्थ.
253-10
पाठी उभे ठाकूनि सुवेळी । प्रतापलंकेश्वराची सिसाळी । गगनी उदो म्हणतया हस्तबळी । दिधली भूता ॥253॥
नंतर सुवेळ पर्वतावर उभे राहून, मूर्तिमंत प्रताप असा जो लंकेचा राजा रावण, त्याची मस्तके आकाशात उदोउदो करणारी भूतपिशाच्चे, यांच्या हातात त्यांना बळी म्हणून ज्याने अर्पण केली.
254-10
जेणे देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धारु केला । सूर्यवंशी उदेला । सूर्य जो का ॥254॥
ज्याने देवांचा मान पुनः त्यांना प्राप्त करून दिला व धर्माचा जीर्णोध्दार केला, जो सूर्यवंशामध्ये मूर्तिमंत उगवलेला सूर्यच होय.
255-10
तो हातियेरुपरजितया आंतु । रामचंद्र मी जानकीकांतु । मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजी ॥255॥
हत्यार धारण करणार्‍यांमध्ये तो सीतापती रामचंद्र मी आहे. जलामध्ये राहणार्‍या पुच्छवंत प्राण्यांमध्ये मगर मी आहे.
256-10
पै समस्तांही वोघा- । मध्ये जे भगीरथे आणिता गंगा । जन्हूने गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ॥256॥
आणखी संपुर्ण प्रवाहांमध्ये जी गंगा, भगीरथ राजा पृथ्वीतलावर आणीत असता जह्नुराजाने गिळली व मग आपली मांडी घालुन फाडून परत सोडली.
257-10
ते त्रिभूवनैकसरिता । जान्हवी मी पंडुसुता । जळप्रवाहा समस्ता- । माझारी जाणे ॥257॥
अशी त्रिभुवनात एकच वाहणारी, अर्जुना ! जाह्नवी नदी, ती सर्व जल प्रवाहांमध्ये माझे रूप होय, असे जाण.
258-10
ऐसेनि वेगळाला सृष्टीपैकी । विभूती नाम सूता एकेकी । सगळेन जन्मसहस्रे अवलोकी । अर्ध्या नव्हती ॥258॥
याप्रमाणे निरनिराळ्या भूतसृष्टीमधील एका एका विभूतीचे नाव सांगतांना हजारो जन्म खर्ची घातले, तरी अर्ध्यादेखील विभूती सांगणे होणार नाही, पहा!

सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥10. 32॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥10. 33॥
259-10
जैसी अवघीचि नक्षत्रे वेचावी । ऐसी चाड उपजेल जै जीवी । तै गगनाची बांधावी । लोथ जेवी ॥259॥
सर्व नक्षत्रे वेचून घ्यावी अशी जर आपल्याला मनात इच्छा झाली तर, ज्याप्रमाणे आकाशाची मोट बांधली पाहिजे.
260-10
का पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा । तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावे माते ॥260॥
किंवा पृथ्वीच्या संपूर्ण परमाणूंचा झाडा घ्यावा अशी इच्छा झाल्यास, ज्याप्रमाणे सबंध भूगोलच खाकेत उचलून घेतला पाहिजे, त्याप्रमाणे माझा संपूर्ण विस्तार पाहावयाचा असल्यास मलाच जाणले पाहिजे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
261-10
जैसे शाखांसी फूल फळ । एकिहेळा वेटाळू म्हणिजेसकळ । तरी उपडूनिया मूळ । जेवी हाती घेपे ॥261॥
फांद्या, फुले व फळे ही सर्व एकदम घ्यावी, असे वाटल्यास ज्याप्रमाणे झाड मुळासकट उपटून घ्यावे लागते.
262-10
तेवी माझे विभूतिविशेष । जरी जाणो पाहिजेती अशेष । तरी स्वरूप एक निर्दोष । जाणिजे माझे ॥262॥
त्याप्रमाणे माझ्या सर्व विभूती समजाव्यात, अशी इच्छा झाल्यास माझे निर्दोष उपाधिरहित असे स्वरूप जाणून घ्यावे.
263-10
एऱ्हवी वेगळालिया विभूती । कायिएक परिससी किती । म्हणोनि एकिहेळा महामती । सर्व मी जाण ॥263॥
एरव्ही, अर्जुना! माझ्या वेगवेगळ्या विभूती किती ऐकशिल ? म्हणून सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे हे जाण,
264-10
मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्याती किरीटी । ओतप्रोत पटी । तंतु जेवी ॥264॥
हे किरीटी । मी सर्व सृष्टिचा आदि, मध्य आणि अंत आहे. ज्याप्रमाणे वस्ञांत तंतू उभे व आडवे भरलेले असतात.
265-10
ऐसिया व्यापका माते जै जाणावे । तै विभूतिभेदे काय करावे । परि हे तुझी योग्यता नव्हे । म्हणोनि असो ॥265॥
त्याचप्रमाणे मी सर्वव्यापक आहे असे जाणल्या नंतर माझ्या विभूती जाणून काय करावयाच्या आहेत. ? परंतु तसे करण्याची तुझी योग्यता नाही. म्हणून ते असू देत.
266-10
का जे तुवा पुसिलिया विभूती । म्हणोनि तिया आईक सुभद्रापती । तरी आता विद्यांमाजी प्रस्तुती । अध्यात्मविद्या ते मी ॥266॥
हे अर्जुना ! त्वा मला माझ्या विभूती सांग असे म्हटले, म्हणून त्याच ऐक. सर्व विद्येमध्ये अध्यात्मविद्या मी आहे.
267-10
अगा बोलतयांचिया ठायी । वादु तो मी पाही । जो सकलशास्त्रसंमते कही । सरेचिना ॥267॥
अर्जुना ! बोलणार्‍यांच्या ठिकाणी सर्व शास्रांचे आधारे होणारा व कधी न संपणारा जो वाद तो मी आहे.
268-10
जो निर्वचू जाता वाढे । आइकतया उत्प्रेक्षे सळु चढे । जयावरी बोलतयांची गोडे । बोलणी होती ॥268॥
जो प्रतिपादन करू जाता वाढतो, ऐकणार्‍यांच्या मनात कोट्या करण्याच्या उर्मी उठतात आणि ज्यात बोलणांर्‍यांनी गोड बोलणी होतात.
269-10
ऐसा प्रतिपादनामाजी वादु । तो मी म्हणे गोविंदु । अक्षरांमाजी विशदु । अकारु तो मी ॥269॥
असा जो वाद, तो सर्व प्रकारच्या प्रतिपादनामध्ये मी आहे असे भगवान म्हणतात. अक्षरांमध्ये स्पष्ट जो ‘अ’ कार तो माझे स्वरूप होय.
270-10
पै गा समासांमाझारी । द्वंद्व तो मी अवधारी । मशकालागोनि ब्रह्मावेरी । ग्रासिता तो मी ॥270॥
आणि सर्व समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे असे जाण. मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वाना ग्रासणारा (अक्षय जो काळ) तो मी आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
271-10
मेरुमंदरादिकी सर्वी । सहित पृथ्वीते विरवी । जो एकार्णवातेही जिरवी । जेथिचा तेथे ॥271॥
सातही समुद्रांचा एक समुद्र करून मेरूमंदार इत्यादि सर्व पर्वतांसहित संपूर्ण पृथ्वीला त्या झालेल्या समुद्रात नाहीसे करतो व त्या एकरूप झालेल्या समुद्रालाहि (प्रलय तेजाने) जेथल्या तिथे शोषून टाकतो.
272-10
जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनाते गिळी किरीटी । आकाश जयाचिया पोटी । सामावले ॥272॥
पुढे जो प्रलयकालच्या तेजालाही मिठी मारून सर्व वायुलाहि जो गिळतो आणि शेवटी आकाळहि ज्याच्या पोटात, अर्जुना ! सामावले जाते,
273-10
ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु । मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ॥273॥
असा अमर्याद जो काळ, तो मी होय, असे लक्ष्मीशी क्रिडा करणारा श्रीकृष्ण म्हणू लागला. मग पुनः सृष्टीचा समुदाय उत्पन्न करणारा तोही मीच आहे.
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्‍भवश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥10. 34॥
274-10
आणि सृजिलिया भूतांते मीचि धरी । सकळा जीवनही मीचि अवधारी । शेखी सर्वाते या संहारी । तेव्हा मृत्युही मीचि ॥274॥
उत्पन्न झालेल्या सृष्टीला मीच धारण करतो. सर्व सृष्टीला मीच जीवन आहे — म्हणजे माझ्यामुळे त्यांचे पोषण व वृध्दी होते. शेवटी सर्वाचा संहार मीच करतो, म्हणून मृत्यूही मीच आहे.
275-10
आता स्त्रीगणांचा पैकी । माझिया विभूती सात आणिकी । तिया ऐक कवतिकी । सांगिजतील ॥275॥
आता स्रीजातकांपैकी माझ्या आणखी सात विभूती आहेत. त्याहि कौतुकाने सांगतो ऐक.
276-10
तरी नीच नवी जे कीर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती । आणि औदार्येसी जे संपत्ती । तेही मीचि जाणे ॥276॥
तरी नित्य नवी जी कीर्ति आहे ती, अर्जुना ! माझी विभूति होय आणि औदार्यासह जी संपत्ति तीहहि माझी विभूति होय, असे जाण.
277-10
आणि ते गा मी वाचा । जे सुखासनी न्यायाचा । आरूढोनि विवेकाचा । मार्गी चाले 277॥
आणि जी वाणी न्यायाला व विवेकाला धरून असते ती माझी विभूति होय.
278-10
देखिलेनि पदार्थे । जे आठवूनि दे माते । ते स्मृतिही पै एथे । त्रिशुद्धी मी ॥278॥
पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करून देणारी स्तुति, माझी विभूति होय हे त्रिवार सत्य जाण.
279-10
पै स्वहिता अनुजायिनी । मेधा ते गा मी इये जनी । धृती मी त्रिभुवनी । क्षमा ते मी ॥279॥
आपल्या आत्महिताचा घात न करणारी धारणाशक्ति, ही माझी विभूति होय आणि आत्मप्राप्तिकरिता शमदमादिसाधनांचे दुःख, ज्या धैर्याने सहन केले जाते, ते धैर्य व कोणी उपकार केला असता, उलट त्याच्यावर अपकार करण्याची वृत्ति न उठणे, ही जी क्षमा, ती माझी विभूति होय.
280-10
एवं नारींमाझारी । या सातही शक्ति मीचि अवधारी । ऐसे संसारगजकेसरी । म्हणता जाहला ॥280॥
हे प्रियतम अर्जुना ! संपूर्ण वेदराशीत श्रेष्ठ असलेल्या सामवेदांत, बृहत्साम हे माझे स्वरूप आहे, असे रमेचे प्राणेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥10. 35॥
281-10
वेदराशीचिया सामा- । आत बृहत्साम जे प्रियोत्तमा । ते मी म्हणे रमा- । प्राणेश्वरु ॥281॥
हे प्रियतम अर्जुना ! संपूर्ण वेदराशीत श्रेष्ठ असलेल्या सामवेदांत, बृहत्साम हे माझे स्वरूप आहे, असे रमेचे प्राणेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
282-10
गायत्रीछंद जे म्हणिजे । ते सकळा छंदांमाजी माझे । स्वरूप हे जाणिजे । निभ्रांत तुवा ॥282॥
ज्याला गायत्री छंद म्हणतात, ते सर्व छंदामध्ये माझे स्वरूप आहे, हे निःसंशय जाण.
283-10
मासा आंत मार्गशीरु । तो मी म्हणे शारङ्गधरु । ऋतूंमाजी कुसुमाकरु । वसंतु तो मी ॥283॥
मासांमध्ये मार्गशीर्ष मास मी आहे व ऋतूंमध्ये वसंतऋतु मी आहे, असे श्रीकृष्ण म्हणाले.

द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥10. 36॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः ।
मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥10. 37॥
284-10
छळितया विंदाणा- । माजी जू ते मी विचक्षणा । म्हणोनि चोहटा चोरी परी कवणा । निवारू न ये ॥284॥
हे सुज्ञ अर्जुनि ! छळणार्‍या प्रकारात जुगार हे माझे स्वरूप होय. म्हणून द्यूत, उघड चव्हाट्यावर चोरी करणेच होय; पण कोणाला त्यापासून परावृत्त करू नये.
285-10
अगा अशेषांही तेजसा- । आत तेज ते मी भरवसा । विजयो मी कार्योद्देशा । सकळांमाजी ॥285॥
अर्जुना ! संपूर्ण तेजस्वी पदार्थात तेज माझे स्वरूप होय, हे निश्चयाने जाण. कार्य करण्याचे जे विजयाचे उद्देश असतात, त्या सर्वामध्ये माझी विभूति होय.
286-10
जेणे चोखाळत दिसे न्याय । तो व्यवसायात व्यवसाय । माझे स्वरूप हे राय । सुरांचा म्हणे ॥286॥
सर्व उद्योगांमध्ये ज्या उद्योगांत न्याय स्पष्ट दिसतो ते माझे स्वरूप होय; असे देवाधिदेव श्रीकृष्ण म्हणतात.
287-10
सत्त्वाथिलिया आंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । यादवांमाजी श्रीमंतु । तोचि तो मी ॥287॥
सात्विकांमध्ये राहणारे सत्व मी आहे. यादवांमध्ये जो श्रीमंत तोच मी आहे असे श्रीकृष्ण म्हणतात.
288-10
जो देवकी-वसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठी गोकुळी गेला । तो मी प्राणासकट पियाला । पूतनेते ॥288॥
जो देवकीवसुदेवाच्या तपामुळे प्रगट झाला, जो गोपकुमारीकरिता गोकुळात गेला व ज्याने प्राणासकट पूतनेचे प्राशन केले तोच मी होय.
289-10
नुघडता बाळपणाची फुली । जेणे मिया अदानवी सृष्टि केली । करी गिरि धरूनि उमाणिली । महेंद्रमहिमा ॥289॥
बाळपणाची अवस्था संपण्यापूर्वी दैत्यरहित पृथ्वी केली आणि हातावर पर्वत पर्वत धरून इंद्राचा पराक्रम अजमाविला.
290-10
कालिंदीचे हृदयशल्य फेडिले । जेणे मिया जळत गोकुळ राखिले । वासरुवांसाठी लाविले । विरंचीस पिसे ॥290॥
यमुनेच्या ह्रदयातील दुःख नाहीसे केले, गोकुळ जळण्याची भीति प्राप्त झाली असता, तेवढा अग्नी पिवून गोकुळाचे रक्षण केले. वासरे चोरून नेणार्‍या ब्रह्मदेवास वेड लाविले.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
291-10
प्रथमदशेचिये पहाटे- । माजी कंसा ऐशी अचाटे । महाधेंडी अवचटे । लीळाचि नासिली ॥291॥
कुमारदशेतच कंसासारख्या अचाट पराक्रमी वीरांचा सहज लीलेने नाश केला.
292-10
हे काय कितीएक सांगावे । तुवांही देखिले ऐकिले असे आघवे । तरि यादवांमाजी जाणावे । हेचि स्वरूप माझे ॥292॥
अर्जुना ! हे किती वर्णन करायचें ? तू देखील हे सर्व पाहिले ऐकिले आहेस, तर यादवांमध्ये हेच माझे स्वरूप होय.
293-10
आणि सोमवंशी तुम्हा पांडवा- । माजी अर्जुन तो मी जाणावा । म्हणोनि एकमेकांचिया प्रेमभावा । विघडु न पडे ॥293॥
आणि चंद्रवंशांत उत्पन्न झालेल्या तुम्हा पांडवांमध्ये मी अर्जुन आहे, म्हणूनच आपल्या परस्पराच्या प्रेमांत कशानेहि बिघाड होत नाही.
294-10
संन्यासी तुवा होऊनि जनी । चोरूनि नेली माझी भगिनी । तऱ्ही विकल्पु नुपजे मनी । मी तू दोन्ही स्वरूप एक ॥294॥
लोकात बाह्यतः संन्यासी होऊन तू माझी बहीण चोरून नेलीस; पण मी व तू एक स्वरूप असल्यामुळे माझ्या मनात काही विकल्प उठला नाही.
295-10
मुनीआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो । कवीश्वरांमाजी धैर्या ठावो । उशनाचार्य तो मी ॥295॥
सर्व मुनीमध्ये व्यासदेव तो मी आहे आणि कवीश्वरामध्ये, सर्व धैर्याचे वसते ठिकाण जो शुक्राचार्य तो मी आहे, असे यादवश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण म्हणतात.

दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥10. 38॥
296-10
अगा दमितयांमाझारी । अनिवार दंडु तो मी अवधारी । जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरी । नियमित पावे ॥296॥
निग्रह करणार्‍यांमध्ये, अर्जुना ! मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत त्यांच्या कर्मानुसार कधी न चुकता अवश्य दंड जो मिळतो, तो मी आहे.
297-10
पै सारासार निर्धारितया । धर्मज्ञानाचा पक्षु धरितया । सकळ शास्त्रांमाजी यया । नीतिशास्त्र ते मी ॥297॥
सर्व शास्रांमध्ये सार काय, असार काय, यांचा निर्णय करणारे व धर्मज्ञान यांचा पक्ष धरणारे जे नीतिशास्र ते मी आहे.
298-10
आघवियाचि गूढा- । माजी मौन ते मी सुहाडा । म्हणोनि न बोलतया पुढा । स्त्रष्टाही नेण होय ॥298॥
संपूर्ण गुप्त ठेवणार्‍यामध्ये, सख्या अर्जुना ! मौन ते मी आहे. म्हणूनच बोलणार्‍यांच्या मनातील, सृष्टि उत्पन्न करणारा ब्रह्मदेवहि जाणू शकत नाही.
299-10
अगा ज्ञानियांचिया ठायी । ज्ञान ते मी पाही । आता असो हे यया काही । पार न देखो ॥299॥
अगा अर्जुना ! ज्ञानियांचे ठिकाणी जे ज्ञान असते, ते मी आहे. आता पुरे माझ्या विभूतींना मर्यादाच नाही.

यच्चाऽपि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन ।
न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥10. 39॥
नान्तोऽस्ति मम दिव्यांनां विभूतीनां परंतप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥10. 40॥
300-10
पै पर्जन्याचिया धारा । वरी लेख करवेल धनुर्धरा । का पृथ्वीचिया तृणांकुरा । होईल ठी ॥300॥
अर्जुना ! एकदां पावसाच्या धारा मोजता येतील किंवा पृथ्वीवरील गवताच्या संपूर्ण अंकुराचे ठिकाणी देखील मर्यादेची दृष्टि होऊ शकेल.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
301-10
पै महोदधीचिया तरंगा । व्यवस्था धरू नये जेवी गा । तेवी माझिया विशेष लिंगा । नाही मिती ॥301॥
परंतु महासमुद्राचे तरंगांची गणती ज्यापमाणे करता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विशेषरूपचिन्ह असलेल्या विभूतींची संख्याच करता यावयाची नाही.
302-10
ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना । तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला ॥302॥
अशांतहि मुख्य मुख्य सातवर पांच म्हणजे पंच्याहत्तर विभूति, अर्जुना ! तुला सांगितल्या, तो हा विचारण्यापुरता जो मी थोडा विभूतिविस्तार केला, तो मनाला वरवर झाला असेच वाटते.
303-10
येरा विभूतिविस्तारांसि काही । एथ सर्वथा लेख नाही । म्हणौनि परिससी तू काई । आम्ही सांगो किती ॥303॥
बाकीच्या विभूतिविस्ताराची मर्यादा किंवा संख्याच करवत नाही; म्हणून तू ऐकणार किती व आम्ही सांगणार तरी कोठवर ?
304-10
यालागी एकिहेळा तुज । दाऊ आता वर्म निज । सर्वभूतांकुरे बीज । विरूढत असे ते मी ॥304॥
म्हणून एकदांचे तुला आपल्या विभूतीचे वर्म सांगून ठेवतो की जे बीज सर्व भूतरूप अंकुराने उगवत असते ते मी आहे — म्हणजे मीच सृष्टिरूप झालो आहे.
305-10
म्हणोनि साने थोर न म्हणावे । उंच नीच भाव सांडावे । एक मीचि ऐसे मानावे । वस्तुजाताते ॥305॥
म्हणून येथे लहानथोर, उंच- नीच असा भेदभाव करू नये. संपूर्ण एक परमेश्वरच सर्व स्वरूपाने नटला आहे असे मानावे.
306-10
तरी यावरी साधारण । आईक पा आणिकही खूण । तरी अर्जुना ते तू जाण । विभूति माझी ॥306॥
तर यावरहि मी विभूति ओळखण्याची आणखीहि साधारण खूण सांगतो, त्यावरून अर्जुना ! माझी विभूति जाणून घेत जा.

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥10. 41॥
307-10
जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया असती ठाया । ते ते जाण धनंजया । विभूति माझी ॥307॥
संपत्ति व दया ह्या दोन्ही ज्या वस्तुचे ठिकाणी एकत्र वसत असतील, ते ते अर्जुना ! माझे अंश होत असे जाण.

अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।
विरष्टभ्याहमिदं कृत्स्‍नमेकांशेन स्थितो जगत् ॥10. 42॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥10॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विभूतियोग नावाचा हा दहावा अध्याय समाप्त झाला. ॥10॥
308-10
अथवा एकले एक बिंब गगनी । तरी प्रभा फांके त्रिभुवनी । तेवी एकाकियाची सकळ जनी । आज्ञा पाळिजे ॥308॥
अथवा ज्याप्रमाणे आकाशांत एकच सूर्यबिंब असते आणि किरणांच्या द्वारे त्याचा प्रकाश त्रिभुवनांत पसरतो, त्याप्रमाणे सर्वत्र मी परिपूर्ण रूपानेच असल्यामुळे संपूर्ण जगात विभूतीच्या द्वारे देखील माझीच आज्ञा पाळली जाते.
309-10
तयाते एकले झणी म्हण । ते निर्धन या भाषा नेण । काय कामधेनूसवे सर्व साहान । चालत असे ॥309॥
म्हणून त्यांना ऐकले — म्हणजे मर्यादित ऐश्वर्याने युक्त — असे कदाचित् म्हणशील (पण असे त्यांना म्हणू नकोस) त्यांना दरिद्री हे शब्द लावू नकोस. कामधेनुबरोबर सर्व सामग्री चालत असते काय ?
310-10
तियेते जे जेधवा जो मागे । ते ते एकसरेचि प्रसवो लागे । तेवी विश्वविभव तया अंगे । होऊनि आहाति ॥310॥
त्या कामधेनूला जो जेव्हा जे काही मागतो तेव्हा ती सर्व एकदम आपल्यापासून प्रगट करतै, त्याप्रमाणे तेहि स्वतः अंगाने, विश्वच ज्यांचे ऐश्वर्य आहे, असे भगवत्स्वरूपच असतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
311-10
तयाते वोळखा वया हेचि संज्ञा । जे जगे नमस्कारिजे आज्ञा । ऐसे आथि ते जाण प्राज्ञा । अवतार माझे ॥311॥
त्यांना ओळखण्याची ही एक खूण आहे की सर्व जीव त्यांची आज्ञा शिरसा मान्य करतात. बुध्दिमान् अर्जुना ! हे असे जे असतील ते माझे अवतार होत हे जाण.
312-10
आता सामान्य विशेष । हे जाणणे एथ महादोष । का जे मीचि एक अशेष । विश्व आहे म्हणोनि ॥312॥
आणि मीच एक सर्व जगद्रूप झालो असून, मी सर्वत्र सारखा असल्यामुळें, सामान्य-विशेष पाहणे हा मोठा दोष आहे.
313-10
तरी आता साधारण आणि चांगु । ऐसा कैसेनि पा कल्पावा विभागु । वाया आपुलियेचि मती वंगु । भेदाचा लावावा ॥313॥
म्हणून निर्विशेष आत्मस्वरूपाचे ठिकाणी साधारण व चांगला असा विभाग का कल्पावा व व्यर्थच आपल्या बुध्दीला भेदाचा डाग का लावावा ?
314-10
एऱ्हवी तरी तूप कासया घुसळावे । अमृत का रांधूनि अर्धे करावे । हा गा वायूसि काय पा डावे । उजवे अंग आहे ॥314॥
नाही तरी तूप व्यर्थच का घुसळायचे, अमृताला शिजवून व्यर्थच का अर्धे करावे ? अर्जुना ! वायुला डावे उजवे अंग आहे काय ?
315-10
पै सूर्यबिंबासि पोट पाठी । पाहता नासेल आपुली दिठी । तेवी माझ्या स्वरूपी गोठी । सामान्यविशेषाची नाही ॥315॥
तसेंच सूर्यबिंबाचे ठिकाणी पोट पाठ पहायला गेलो तर आपली दृष्टी नष्ट होईल, त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाचे ठिकाणी सामान्य-विशेष अशा भागाची मुळी गोष्टच नाही.
316-10
आणि सिनाना इही विभूती । मज अपाराते मविसील किती । म्हणोनि किंबहुना सुभद्रापती । असो हे जाणणे ॥316॥
या निरनिराळ्या विभूतींच्या द्वारे माझ्या अपार स्वरूपाची काय मोजणी होणार आहे ? म्हणून सुभद्रापती अर्जुना ! हे विभूतीचे जाणणे पुरे !
317-10
आता पै माझेनि एके अंशें । हे जग व्यापिले असे । यालागी भेदू सांडूनि सरिसे । साम्ये भज ॥317॥
आता माझ्या एक अंशाने हे जग व्यापले आहे, म्हणून भेद सोडून व एक समदृष्टी ठेवूनच माझे भजन कर. (सर्वत्र एक पूर्ण सच्चिदानंद परब्रह्मच पाहा, असा अर्थ. )
318-10
ऐसे विबुधवनवसंते । तेणे विरक्तांचेनि एकांते । बोलिले जेथ श्रीमंते । श्रीकृष्णदेवे ॥318॥
याप्रमाणे ज्ञानरूपी वनाला वसंताप्रमाणे प्रसन्न करणारा, विरक्त पुरुषाचा जो एकान्त म्हणजे विरक्त पुरुष सर्वसंगपरित्याग करून ज्या एकाचाच आश्रय करतात, असे षड्गुणैश्वर्यसंपन्न भगवान श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले.
319-10
तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुले हे राभस्य बोलिलेती तुम्ही । जे भेदु एक आणि आम्ही । सांडावा एकी ॥319॥
तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रभो ! एक भेद आहे, असे पाहणारे जे आम्ही त्यांनी तो भेद टाकावा, असे जे तुम्ही म्हटले ते थोडा विचार न करता बोलले असे वाटते.
320-10
हा हो सूर्य म्हणे काय जगाते । अंधारे दवडा का परौते । तेवी धसाळ म्हणो देवा तूते । तरी अधिक हा बोलु ॥320॥
का हो देवा ! (जेथे सूर्य उगवल्यावर अंधार आपोआप नाहीसा होतो तेथे) आता अंधार दूर करा असे सूर्य सांगतो काय ? त्याप्रमाणे भेद टाकून दे, असे सांगणार्‍या तुम्हाला, देवा ! अविचारी म्हणावे, तर ते अमर्यादेचे बोलणे होते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
321-10
तुझे नांवचि एक कोण्ही वेळे । जयांचिये मुखासि का काना मिळे । तयांचिया हृदयाते सांडूनि पळे । भेदु जी साच ॥321॥
एक तुझे नामच जर एखादेवेळी ज्याच्या मुखात आले किंवा कानांत पडले, तर त्याच्या ह्रदयातून खरोखर भेद निघून जातो.
322-10
तो तू परब्रह्मचि असके । मज दैवे दिधलासि हस्तोदके । तरी आता भेदु कायसा के । देखावा कवणे ॥322॥
पूर्णब्रह्मच असलेला तो तूं, माझ्या सुदैवाने सर्वस्वी तू माझ्या स्वाधीन झाला आहेस तेव्हा आता कशाचा, कोठे व कोणी भेद पहावा ?
323-10
जी चंद्रबिंबाचा गाभारा । रिगालियावरीही उबारा । परी राणेपणे शारङ्गधरा । बोला हे तुम्ही ॥323॥
देवा ! चंद्रबिंबाच्या गाभार्‍यामध्ये-म्हणजे मध्यभागी शिरल्यानंतरहि उकडू लागेल काय ? पण देवा ! स्वामीपणाने नात्याने हे तुम्ही बोलत आहां.
324-10
तेथ सावियाचि परितोषोनि देवे । अर्जुनाते आलिंगिले जीवे । मग म्हणे तुवा न कोपावे । आमुचिया बोला ॥324॥
अर्जुनाचे भाषण ऐकून भगवंताला खरोखर आनंद झाला व त्यांनी अर्जुनाला प्रेमाने अलिंगन दिलें. नंतर भगवान म्हणतात, अर्जुना ! माझ्या बोलण्याचा राग मानू नकोस.
325-10
आम्ही तुज भेदाचिया वाहाणी । सांगितली जे विभूतींची कहाणी । ते अभेदे काय अंतःकरणी । मानिली की न मने ॥325॥
आम्ही भेदाला धरूनच तुला जो विभूतीचा विस्तार सांगितला, तो अभेदपूर्वक तुझ्या अंतःकरणात ठसला की नाही.
326-10
हेचि पाहावयालागी । नावेक बोलिलो बाहेरिसवडिया भंगी । तव विभूती तुज चांगी । आलिया बोधा ॥326॥
हे पाहण्याकरिताच असे मी थोडेसे बाह्यात्कारी बोललो; पण तुला विभूतीचा बोध उत्तम प्रकारे झाला हे समजून आले.
327-10
येथ अर्जुन म्हणे देवे । हे आपुले आपण जाणावे । परी देखतसे विश्व आघवे । तुवा भरले ॥327॥
हे ऐकून अर्जुन म्हणतो, देवा ! आपले आपण जाणां; पण सर्व जगात तूच एक व्यापून भरला आहेस, असे मात्र मी पाहत आहे.
328-10
पै राया तो पांडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरैतु । या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ॥328॥
संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा ! तो पंडुसुत अर्जुन असा अभेद आणि अद्वैताचा अनुभव घेऊ लागला; परंतु संजयचे भाषण ऐकून धृतराष्ट्र स्तब्धच राहिला.
329-10
की संजयो दुखवलेनि अंतःकरणे । म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणे । हा जीवे धाडसा आहे मी म्हणे । तव आंतुही आंधळा ॥329॥
हे पाहून, संजयला धृतराष्ट्राविषयी थोडे दुःख झाले व तो म्हणू लागला की भगवंताचे मुखाने असा अद्वैताचा उपदेश ऐकण्याचे सद्भाग्य प्राप्त होऊनहि, हा त्या भाग्याला दूर लोटतो हे आश्चर्य नव्हे काय ? हा धृतराष्ट्र आंधळा आहे; पण अंतःकरणातून आंधळा नसेल असे मला वाटत होते, परंतु तो आतहि आंधळाच आहे- म्हणजे त्याच्या अंतःकरणात ज्ञानसूर्याची किरणे शिरत नाहीत असे मला आता वाटू लागले.
330-10
परी असो हे तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवितसे मानु । की याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला ॥330॥
पण असो. याचे आपल्याला काय करायचे आहे. आर्जुन मात्र आपले वाढते आत्मकल्याण करून घेण्याची इच्छा करू लागला; कारण यानंतरहि त्याच्या अंतःकरणात दुसर्‍या गोष्टीविषयी भरवसा वाटू लागला.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-10
म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती । बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती । इये आर्तीचा पाउली मती । उठती जाहली ॥331॥
संजय म्हणतो हा ह्रदयातील अनुभव बाहेर डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा आशा इच्छेच्या पावलाने त्याची बुध्दि उसळू लागली.
332-10
मिया इहीच दोही डोळा । झोंबावे विश्वरूपा सकळा । एवढी हाव तो दैवाआगळा । म्हणऊनि करी ॥332॥
अर्जुन हा थोर भाग्यवान होता, म्हणूनच याच दोन्ही डोळ्यांनी भगवंताच्या विश्वरूपाला मिठी मारावी अशी थोर हाव करीत होता.
333-10
आजि तो कल्पतरूची शाखा । म्हणोनि वांझोळे न लगती देखा । जे जे येईल तयाचि मुखा । ते ते साचचि करितसे येरु ॥333॥
प्रस्तुत अर्जुन कल्पतरूंची फांदी होता, म्हणूनच तिला वांझ फूल लागत नव्हते. जी जी इच्छा त्याने बोलून दाखवावी ती ती भगवान पूर्ण करीत असे.
334-10
जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपणचि जाहला । तो सद्‍गुरु असे जोडला । किरीटीसी ॥334॥
जो प्रल्हादाच्या शब्दासाठी विषहि आपण झाला, तो श्रीकृष्ण भगवान, अर्जुनाला गुप्तरूपाने प्राप्त झाला होता.
335-10
म्हणोनि विश्वरूप पुसावयालागी । पार्थ रिगता होईल कवणे भंगी । ते सांगेन पुढिलिये प्रसंगी । ज्ञानदेव म्हणे नि वृत्तीचा ॥335॥
म्हणून अर्जुन आता विश्वरूपाच्या दर्शनाकरिता कोणत्या रीतीने प्रश्न करील हे निवृत्तिनाथांचे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुढील अध्यायात सांगणार आहे.
श्रीसद्गुरुकृपेने श्रीज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाचा मराठी अनुवाद संपन्न झाला तो श्रीसद्गुरुचरणी समर्पण असो.

मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगोनाम दशमोऽध्यायः ॥10॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :- 72 ॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 335 ॥



-: सार्थ ज्ञानेश्वरी :- संकलन :- व पुन:ई-प्रकाशन :-
धनंजय महाराज मोरे वाशिम

सार्थ ज्ञानेश्वरी, फ्री ज्ञानेश्वरी, मोफत ज्ञानेश्वरी, पद्फ ज्ञानेश्वरी, pdf ज्ञानेश्वरी, पिडीएफ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ, सार्थ ज्ञानेश्वरी पिडीएफ, पिडीएफ सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पिडीएफ सार्थ, आळंदी, पंढरपूर, राहुल गांधी, नंरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, सरळ ज्ञानेश्वरी, विस्तारित ज्ञानेश्वरी, योगी आदित्यनाथ, दिल्ली, पालखी सोहळा, वारी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, भजनी मालिका, वारकरी भजन मालिका, अभंग संग्रह, laptop, Free Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari, Sartha Free Dnyaneshwari, Dnyaneshwari, Bhavarthadipika, Free Bhavarthadipika Dnyaneshwari, Sartha Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Video.
ज्ञानेश्वरी मराठी – ज्ञानेश्वरी कोणी लिहिली – ज्ञानेश्वरी मराठी अर्थासहित – ज्ञानेश्वरी मराठी अर्थ सहित – ज्ञानेश्वरी ओवी अर्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी अर्थ – ज्ञानेश्वरी ओवी – ज्ञानेश्वरी पारायण – ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ – ज्ञानेश्वरी ग्रंथ – dnyaneshwari – dnyaneshwari in marathi – dnyaneshwari in marathi with meaning – dnyaneshwari marathi – dnyaneshwari marathi meaning – dnyaneshwari marathi arth – dnyaneshwari nirupan – dnyaneshwari book – dnyaneshwari granth – dnyaneshwar dnyaneshwar – dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari dnyaneshwari ज्ञानेश्वरी पुस्तक

सार्थ ज्ञानेश्वरी सर्व अध्याय

वारकरी ग्रंथ सूची

Exit mobile version