८ मे, दिवस १२८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग १५२५ ते १५३६

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“८ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ८ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ८ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १५२५ ते १५३६ चे पारायण आपण करणार आहोत.
८ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओवी २५ ते ५०,

26-11
बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदी प्रतिपाद्य देवता । तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथी ॥26
धन्य धन्य हा गीता ग्रंथ ! कारण संपूर्ण वेदांनी ज्यांचे वर्णन केले; तोच भगवान श्रीकृष्ण साक्षात् हा ग्रंथ सांगत आहे.
27-11
तेथिचे गौरव कैसे वानावे । जे श्रीशंभूचिये मती नागवे । ते आता नमस्कारिजे जीवेभावे । हेचि भले ॥27॥
ज्या गीताग्रंथाची थोरवी, साक्षात् श्रीशंकरालाहि कळलि नाही, त्याची थोरवी मी कशी वर्णन करणार ? तेव्हा मनोभावे तिला नमस्कार करावा, हेच उत्तम.
28-11
मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपी दिठी । पहिली कैसी गोठी । करिता जाहला ॥28॥
मग विश्वरूपदर्शनाचे ठिकाणी लक्ष ठेऊन, त्या अर्जुनाने भगवंताशी बोलण्याला सुरुवात केली, ते ऐका.
29-11
हे सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु । तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनासी ॥29॥
हे सर्व चराचर जग, भगवानच नटला आहे असा बुध्दिंत अनुभवाचा जो अविष्कार झाला, तो बाहेर डोळ्याला प्रत्यक्ष दिसावा
30-11
हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगता सांकड । का जे विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावे ? ॥30॥
अशी त्याच्या अंतःकरणात इच्छा उत्पन्न झाली; पण ही इच्छा देवाला सांगणे कठीन वाटले कारण जे विश्वरूप, भगवान अत्यंत गुप्त ठेवतात, कोणाला दाखवत नाहीत, ते दाखवा म्हणून आपण कसे म्हणावे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


31-11
म्हणे मागा कवणी कही । जे पढियंतेने पुसिले नाही । ते सहसा कैसे काई । सांगा म्हणो ? ॥31॥
अर्जुन मनात म्हणतो, पूर्वी कधी कोणी अत्यंत आवडत्या भक्तांनीहि जे विचारले नाही, ते मला सांगा, असे एकदम कसे म्हणूं
32-11
मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहूनी अंतरंगु । परी तेही हा प्रसंगु । बिहाली पुसो ॥32॥
मी जरी अत्यंत प्रेमांतील असलो, तरी आई लक्ष्मीपेक्षा जवळचा कसा होईन ? पण तीहि विश्वरूपदर्शनाची गोष्ट काढण्यास भ्याली.
33-11
माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली ? । परी तोही हे बोली । करीचिना ॥33॥
मी वाटेल तशी भगवंताची सेवा केली असली, तरी ती गरूडाच्या सेवेची बरोबरी करील काय ? पण त्यानेहि ही गोष्ट काढली नाही.
34-11
मी काय सनकादिकांहूनि जवळा । परी तयांही नागवेचि हा चाळा । मी आवडेन काय प्रेमळा । गोकुळींचिया ऐसा ? ॥34॥
मी काय सनकादिकांपेक्षाहि जवळचा निकटवर्ती आहे ? पण त्यांनाही ही इच्छा धरता आली नाही. प्रेमळ गोकुळवासी जनांसारखा मी भगवंताला आवडतो काय ?
35-11
तयातेही लेकुरपणे झकविले । एकाचे गर्भवासही साहिले । परी विश्वरूप हे राहविले । न दावीच कवणा ॥35॥
पण त्यांनाहि बाळपणाने, आपले सामर्थ्य झांकून टाकून फसविले. आपल्या अंबरीष भक्ताचे गर्भवास आपण सोसले, पण आपले विश्वरूप गुप्तच ठेवले, कोणासच दाखिवले नाही.


36-11
हा ठायवरी गुज । याचिये अंतरीचे हे निज । केवी उराउरी मज । पुसो ये पा ? ॥36॥
इतके हे अत्यंत गुप्त ठेवलेले व भगवंतांनी अंतःकरणात माझे मूळरूप होय असे ज्याला मानले, ते हे विश्वरूप एकदम मला कसे विचारता येईल ?
37-11
आणि न पुसेचि जरी म्हणे । तरी विश्वरूप देखिलियाविणे । सुख नोहेचि परी जिणे । तेही विपाये ॥37॥
आणि जाऊ द्या, विचारूच नये ! असे म्हणून सोडून द्यावे, तर विश्वरूप पाहिल्यावाचून मनाची तळमळ जाऊन सुख होणार नाही. एवढेच नाही, तर तळमळीमुळे वाचणेहि कठीण आहे.
38-11
म्हणौनि आता पुसो अळुमाळसे । मग करू देवा आवडे तैसे । येणे प्रवर्तला साध्वसे । पार्थु बोलो ॥38॥
म्हणून सहजगत्या थोडेसे विचारून पाहावे; मग देव वाटेल ते करोत, असा विचार करून भीत भीत अर्जुनाने बोलायला सुरुवात केली.
39-11
परी तेचि ऐसेनि भावे । जे एका दो उत्तरांसवे । दावी विश्वरूप आघवे । झाडा देउनी ॥39॥
पण तेच विचारणे अशा प्रेमभावाने केले, की अर्जुनाचे मुखातून एक दोन शब्द निघतात न निघतात, तोच भगवंतांनी आपले झाडून संपूर्ण विश्वरूप दाखविले.
40-11
अहो वासरू देखिलियाचिसाठी । धेनु खडबडोनि मोहे उठी । मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा धरे ? ॥40॥
अहो ! वासरू पाहिल्या बरोबर गाय, प्रेमाने एकदम खडबडून उठते मग वांसराचे तोंड तिच्या स्तनाला लागल्यावर पान्हा धरवेल काय ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


41-11
पाहा पा तया पांडवाचेनि नांवे । जो कृष्ण रानीही प्रतिपाळू धावे । तयाते अर्जुने जव पुसावे । तव साहील काई 41॥
असे पहा की, ज्या पांडवाचे संरक्षण करण्यासाठी श्री कृष्ण भगवान रानावनांतही धावले, त्यांना अर्जुन जे विचारील ते सांगताना राहवेल का.
42-11
तो सहजेचि स्नेहाचे अवतरण आणि येरु स्नेहा घातले आहे माजवण । ऐसिये मिळवणी वेगळेपण । उरे हेचि बहु ॥42॥
श्रीकृष्ण भगवान हे मूर्तीमंत स्नेहच होय त्यांना अर्जुन रुपी भक्ष्य मिळाल्याने या दोघांच्या ऐक्यभावात यांच्या दोन वेगळ्या मूर्ती दिसतात हाच चमत्कार होय.
43-11
म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरूप होईल आपैसा । तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजे तरी ॥43॥
म्हणून अर्जुनाने विचारल्यावर देव आपोआप विश्वरूप धारण करतील. तरी आता आरंभीचा तो प्रसंग ऐकावा
अर्जुन उवाच:
मदनुग्रहायपरमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम्
यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयंविगतो मम ॥11. 1॥

44-11
मग पार्थु देवाते म्हणे । जी तुम्ही मजकारणे । वाच्य केले जे न बोलणे । कृपानिधे ॥44॥
मग पार्थ देवाला म्हणाला, ” हे कृपानिधी, तुम्ही माझ्या करीता शब्दातील जे गुह्य ते बोलून दाखवले.
45-11
जै महाभूते ब्रह्मी आटती । जीव महदादींचे ठाव फिटती । तै जे देव होऊनि ठाकती । ते विसवणे शेषींचे ॥45॥
जेंव्हा पंचमहाभूते ब्रम्हामध्ये लीन होतात आणि जीव व माया लय पावतात, त्यावेळेस परमात्मा जे रूप धारण करून राहतात, ते शेवटचे स्वरूप.


46-11
होते हृदयाचिये परिवरी । रोविले कृपणाचिये परी । शब्दब्रह्मासही चोरी । जयाची केली ॥46॥
कृपन मनुष्याप्रमाणे जे ह्रदयमंदिरांत लपवून ठेवले होते आणि शब्दब्रह्मापासून म्हणजे वेदापासून जे चोरून ठेवले होते – म्हणजे वेद देखील या स्वरूपाला जाणू शकला नाही. (या स्वरूपाचा अनुभव नुसत्या ज्ञान्याला येत नाही. हा अनुभव भक्तांनाच येतो. )
47-11
ते तुम्ही आजि आपुले । मजपुढा हिये फोडिले । जया अध्यात्मा वोवाळिले । ऐश्वर्य हरे ॥47॥
ते तुम्ही आज माझ्यापुढे आपले ह्रदय उघडे केले, या अध्लात्मस्वरूपावरून शंकराने कैसासाचे राज्य ओवाळून टाकले व स्मशानांत वास केला. (शुध्द आत्मस्वरूपाला धरून जेंवढे असते, त्याला अध्यात्म म्हणतात, भगवंताचे निर्गुणस्वरूप स्वाभाविक असल्यामुळे जसे ते अध्यात्म म्हटले जाते, तसेच विश्वरूपहि स्वाभाविक असल्यामूळे, येथे त्यालाही अध्यात्म म्हटले आहे. )
48-11
ते वस्तु मज स्वामी । एकिहेळा दिधली तुम्ही । हे बोलो तरी आम्ही । तुज पावोनि कैचे ॥48॥
ती अध्यात्मवस्तु, प्रभो ! मला एकदम तुम्ही दिली असे म्हणावे, तर आम्ही तुझ्यापासून निराळे आहो कोठे ?
49-11
परी साचचि महामोहाचिये पुरी । बुडालेया देखोनि सीसवरी । तुवा आपणपे घालोनि श्रीहरी । मग काढिले माते ॥49॥
पण खरोखरीच मी या संसाररूपी महामोहाच्या पुरांत डोक्यापर्यंत बुडालो आहे, हे पाहून देवा ! आपण स्वतः त्यात उडी टाकून मला बाहेर काढलें.
50-11
एक तू वाचूनि काही । विश्वी दुजियाची भाष नाही । की आमुचे कर्म पाही । जे आम्ही आथी म्हणो ॥50
अद्वैतदृष्टिने पाहता, तिन्ही काळी एका तुझ्यावाचून या संपूर्ण विश्वांत दुसर्‍या वस्तुची गोष्ट देखील नाही; पण ‘आम्ही आहो’ असे म्हणतो, हे आमचे दुर्दैव पहा कसे आहे ?
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १२८ वा, ८, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १५२५ ते १५३६
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १५२५
आपुले आपण जाणावे स्वहित । जेणे राहे चित्त समाधान ॥१॥
बहुरंगे माया असे विखुरली । कुंठिंतचि जाली होता बरी ॥धृपद॥
पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी । भाव विश्वंभरी समर्पावा ॥२॥
तुका म्हणे गेला फिटोनिया भेद । मग होतो देव मनाचाचि ॥३॥
अर्थ

आपले स्वहित कशात आहे व आपले चित्त समाधान कशाने होईल ते जाणून घ्यावे देवाची माया जगात पसरलेली आहे आणि ती आपण वेळेतच कुंठित केली तर बरे होईल. मौन धारण करून आपले चित्त विश्वंभरा चरणी अर्पण करावे करणे यालाच खरी पूजा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या मनातील भेद नाहीसा होतो तो स्वतः आणि त्याचे मन भगवंत स्वरूप होत असते.
अभंग क्र. १५२६
असोनि न कीजे अलिप्त अहंकारे । उगीच या भारे कुंथा कुंथी ॥१॥
धावा सोडवणे वेगी लवकरी । मी तो जालो हरी शक्तिहीन ॥धृपद॥
भ्रमल्याने दिसे बांधल्याचे परी । माझे मजवरी वाहोनिया ॥२॥
तुका म्हणे धाव घेतलीसे सोई । आता पुढे येई लवकरी ॥३॥
अर्थ

आपल्या देहामध्ये आत्मा भिन्न आहे परंतु देहा भिमानामुळे तो वेगळा होत नाही. आणि देहाचे पालन-पोषण करण्यात तो निष्कारण अडकून बसतो त्यामुळे हे हरी तू मला बंधनातून सोडवण्याकरता लवकर धाव घे कारण मी शक्तिहीन झालो आहे. मी देहासक्ती धरली आहे, त्याच्या मोहात गुंतलो त्यामुळे मला बांधल्यासारखे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला बंधनातून तुमच्या वाचून कोणीही सोडवणार नाही असे वाटते त्यामुळे तुम्ही लवकर इकडे या आणि मला बंधनातून सोडवा.
अभंग क्र. १५२७
आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटी पारिख्या ॥१॥
ऐसे जन भुलले देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥धृपद॥
गळ गिळी आमिशे मासा । प्राण आशा घेतला ॥२॥
तुका म्हणे बोकड मोहो । धरी पहा हो खाटिकाचा ॥३॥
अर्थ

गाईचे मेलेले वासरु असते मग त्याच्यात भुसा भरला जातो आणि त्याचे भोत तयार केले जाते व तेच भोत गाई पुढे उभे केले जाते व ती गाय त्या भोताला चाटते व पान्हा सोडते परंतु जर त्याच गाई जवळ दुसऱ्या गाईचे वासरू आणले तर ती काय त्या वासराला मारत असते त्याप्रमाणे हे देवा हे सर्व लोक मीथ्या विषयांचा हेवा वाढवून त्यालाच भुलले आहेत. गळाला आळी लावतात व त्याच्या आमिषा पोटी मासा गळाला लागतो व प्राणाला मुकतो. तुकाराम महाराज म्हणतात लोकहो पहा बोकडाच्यापुढे खाटकाने चारा टाकला की त्या बोकडाला त्या खाटका विषय प्रेम वाटते परंतु तोच खाटीक त्या बोकडाला नंतर मारतो.
अभंग क्र. १५२८
विषय तो मरणसंगी । नेणे सुटिका अभागी ॥१॥
शास्त्राचा केला लुंडा । तोंडी पाडियेला धोंडा ॥धृपद॥
अगदी मोक्ष नाही ठावा । काय सांगावे गाढवा ॥२॥
तुका म्हणे ग्यानगंड । देवा सुख पावो नाड ॥३॥
अर्थ

विषयाच्या संगतीने मरण येते परंतु हे सर्व जाणत असून देखील अभागी माणूस विषयांमध्ये गुंततो. अभागी मनुष्य शास्त्राला किंमत न देता विषयांमध्ये गुंतून राहतो आणि त्याच्या स्वतःच्या तोंडावर धोंडा पाडुन घेतो. ज्याला मोक्षच माहित नाहीये त्या गाढवाला काय सांगावे ? तुकाराम महाराज म्हणतात जगामध्ये ज्ञानाने अभिमानी झालेले अनेक माणसे आहेत ते विषयांमध्ये फसत असतील तर खुशाल फसोत.
अभंग क्र. १५२९
मीच विखळ मीच विखळ । येर सकळ बहु बरे ॥१॥
पाहिजे हे क्षमा केले । येणे बोले विनवणी ॥धृपद॥
मीच माझे मीच माझे । जाले ओझे अन्याय ॥२॥
आधी आंचवला आधी आंचवला । तुका जाला निर्मनुष्य ॥३॥
अर्थ

जगामध्ये मलाच माझ्या मीपणाचा अभिमान आहे बाकी सर्व चांगले आहेत. देवा या दोषाबद्दल तुम्ही मला क्षमा केले पाहिजे हे मी तुम्हाला विनंतीपूर्वक बोलत आहे. देवा ” मी आणि माझे ” असे म्हणणे यातच मी अपराध करत आहे. परंतु या अज्ञानामुळेच मला ओझे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी संसाराविषयी आचवल आहे, आसक्त झालो आहे त्यामुळे पशुवत निर्मनुष्य झालो आहे.
अभंग क्र. १५३०
येणे जाणे तरी । राहे देव कृपा करी ॥१॥
ऐसे तव पुण्य नाही । पाहाता माझे गाठी काही ॥धृपद॥
भय निवारिता । कोण वेगळा अनंता ॥२॥
तुका म्हणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥३॥
अर्थ

देवाच्या दर्शनाच्या निमित्ताने मी देवाकडे येणे-जाणे केले तर देव माझ्यावर निश्चिंतच कृपा करेल. परंतु माझ्या पदरी जर पाहिले तर तेवढे पुण्य देखील दिसत नाही की मी देवाच्या दर्शनाला जावे. अनंता वाचून माझे कोण दुःख निवारण करील ? तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्व भोग दुःख पांडुरंगाने कृपा केली तरच नाहीसे होतील.
अभंग क्र. १५३१
भल्याचे कारण सांगावे स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥१॥
परी आम्ही असो एकाचिये हाती । नाचवितो चित्ती त्याचे तैसे ॥धृपद॥
वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार । होती उपकार अगणित ॥२॥
तुका म्हणे तुम्ही बहु कृपावंत । आपुले उचित केले संती ॥३॥
अर्थ

संतांनी अज्ञानी लोकांना जगामध्ये आपण कसे वागावे हे सांगावे व हीच धर्मनीती आहे आणि संतांनी त्यांचे हे कर्म केले आहे परंतु आम्ही इतके मूर्ख आहोत की देहा विषय अहंकार धरतो स्वहित न पाहता चित्तामध्ये अहंभाव धरतो व तो अहंभाव आम्हाला जसे नाचवेल तसे आम्ही नाचतो. ज्या कारणाने आपल्याला पुण्य होईल अशी वाट जो दाखवतो त्याच्या पुण्याला पारावर नाही आणि त्याचे अगणित उपकार आपल्यावर असतात. तुकाराम महाराज म्हणतात हे संतजन हो तुम्ही फार उदार आहात आणि जे उचित आहे तेच तुम्ही आज पर्यंत केले आहे.
अभंग क्र. १५३२
लावूनिया पुष्टी पोरे । आणि करकर कथेमाजी ॥१॥
पडा पाया करा विनंती । दवडा हाती धरोनिया ॥धृपद॥
कुर्वाळूनि बैसे मोहे । प्रेम का हे नासीतसे ॥२॥
तुका म्हणे वाटे चित्त । करा फजित म्हणऊनि ॥३॥
अर्थ

काही स्त्रिया कथेमध्ये लहान मुलांना घेऊन येतात व ते मूल कथा चालू असताना खेळतात, ओरडतात त्यामुळे कथेमध्ये विनाकारण कट निर्माण होते. त्यामुळे तुम्ही त्या स्त्रीला लहान मुलांची किरकिर बंद करण्याविषयी पाया पडून विनंती करा व तरीही तिने ऐकले नाही तर मग तिची कोणत्याही प्रकारची भीड भाड न ठेवता तिला हाताला धरून बाहेर काढून द्या. सुंदर अशा हरी कथेमध्ये ती स्त्री त्या मुलाला कुरवाळते पण त्या स्त्रीला हे का लक्षात येत नाही की मुलाच्या किरकिरिणे हरी कथेतील प्रेमभंग होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्या स्त्रीच्या अशा वागण्यामुळे हरकथे मध्ये अंतर पडते, ती स्त्री पुन्हा असे करू नये म्हणून तिची चांगलीच फजिती करून त्या स्त्रीला तेथून हाकलून द्यावे.
अभंग क्र. १५३३
पुण्य उभे राहो आता । संताचे या कारणे ॥१॥
पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥धृपद॥
संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥२॥
तुका म्हणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥३॥
अर्थ

आता संतांच्या पुण्याईने तूम्हाला पंढरीला जाण्याची इच्छा निर्माण होवो. त्यामुळे हे लोकांना तुम्ही पंढरीच्या वाटेला लागा म्हणजे तुम्हाला सर्वाचा सखा विठ्ठल भेटेल. तुम्हाला पंढरी क्षेत्राला जाण्याची इच्छा होलो याकरता बहुत जनांचा संकल्प कळवळा फळाला येवो. तुकाराम महाराज म्हणतात हे पुरुषोत्तमा बहुत लोक असे आहेत की ते पंढरीला येत नाहीत त्यांचेही तू अपराध क्षमा कर व त्यांचाहि तू उद्धार कर.
अभंग क्र. १५३४
आइकिली मात । पुरविले मनोरथ ॥१॥
प्रेम वाढविले देवा । बरवी घेऊनिया सेवा ॥धृपद॥
केली विनवणी । तैसी पुरविली धणी ॥२॥
तुका म्हणे काया । रसा कुरोंडी वरोनिया ॥३॥
अर्थ

देवा तुझ्या पराक्रमाची कीर्ती मी संतांच्या मुखातून ऐकली आहे आणि ती खरी देखील आहे त्यामुळे आता माझे मनोरथ पूर्ण झाले आहे. देवा माझ्याकडून तुम्ही चांगल्या प्रकारची सेवा करवुन घेतली त्यामुळे माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम अधिकच वाढले आहे. देवा मी तुम्हाला आतापर्यंत ज्या काही विनवण्या केल्या आहेत त्या सर्व तुम्ही पूर्ण केल्या व माझ्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण केल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझा हे प्रेमरस इतके चांगले आहे की त्यावरून माझे शरीर देखील मी ओवाळून टाकीन.
अभंग क्र. १५३५
संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगे । पडिल्या प्रसंगे ऐसी कीजे ॥१॥
संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्ती । फाको नये वृत्ति अखंडित ॥धृपद॥
दास्यत्व ते असे एकविध नावे । उरो नये जीवे भिन्नत्वेसी ॥२॥
निज बीजा येथे तुका अधिकारी । पाहिजे ते पेरी तये वेळी ॥३॥
अर्थ

संतांच्या दर्शनाचा योग आला की त्यांची स्तुती करावी. संत हे स्वामी आहेत आणि संतांच्या ठिकाणी चित्त असावे. व त्यांच्या ठिकाणी वृत्ती अखंड असावी इतर कोणत्याही विषयांकडे वृत्ती फांको देऊ नये. दास्यत्व म्हणजे काय आहे तर संतांच्या ठिकाणी एकनिष्ठपणे काया, वाचा, मनाने राहणे याचे नांव दास्यत्व आणि आपण आपल्या जीव दशेने संताहुन भिन्न राहू नये. तुकाराम महाराज म्हणतात मी निजबीजाचा अधिकारी आहे त्यामुळे मला जे पाहिजे ते मी त्यावेळी पेरू शकतो.

अभंग क्र. १५३६
सेजेचा एकांत आगीपाशी कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥
राहो अथवा मग जळो आगीमधी । निवाड तो आधी होऊनि गेला ॥धृपद॥
भेणे झडपणी नाही येथे दुजे । पादरधिटा ओझे हतियारे ॥२॥
तुका म्हणे मज नाही जो भरवसा । तोवरी सहसा निवाड तो ॥३॥
अर्थ

पतिव्रतेने पती असताना एक शय्येवर झोपले आणि पती मेल्यानंतर त्याच्या चितेवर जाताना डोळे झाकले तर असे लक्षात येते की तिचे पतीवर प्रेम कमी होते व तिचा अधःपातही होतो, मग त्या स्त्रीने पतीच्या चीतेत उडी टाकू अथवा न टाकू तिचे पती विषय किती प्रेम आहे याचा निवाडा झालेला असतो. शत्रू रणांगणावर येण्याआधीच ज्याला भय वाटते अशा फादरधिटाला आपल्या हातातील शस्त्रे देखील ओझे वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात संकटाच्या वेळी त्याचे धैर्य टिकते त्याची खात्री झाल्याशिवाय त्यांच्यावर मला भरोवसा ठेवता येत नाही.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 888

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading