
३० नोव्हेंबर, दिवस ३३४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ११२६ ते ११५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ३९९७ ते ४००८
“३० नोव्हेंबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 30 November
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३० नोव्हेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग XX ते XX चे पारायण आपण करणार आहोत.
३० नोव्हेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी ११२६ ते ११५०,
1126-18
पै जेव्हाही असे किडाळ । तेव्हांही सोनेचि अढळ । परी ते कीड गेलिया केवळ । उरे जैसे ॥1126॥
मिश्रित सोने देखील केव्हांही स्वरूपतः सोनेपणात कमी नसतेच, पण त्यातील कीट गेले म्हणजे जसे त्याचे शुद्ध स्वरूपदर्शन होते. 26
1127-18
हा गा पूर्णिमे आधी कायी । चंद्रु सावयवु नाही ? । परी तिये दिवशी भेटे पाही । पूर्णता तया ॥1127॥
अरे, पौणिमेच्यापूर्वी कोणत्याही तिथीस चंद्र काय संपूर्ण नसतो ? परंतु त्याच्या पूर्णत्वचा व्यवहार मात्र पौणिमेच्याच दिवशी होतो. 27
1128-18
तैसा मीचि ज्ञानद्वारे । दिसे परी हस्तांतरे । मग दृष्टृत्व ते सरे । मियाचि मी लाभे ॥1128॥
त्याप्रमाणे, ज्ञानाचा व्यवहार करणाऱ्या अंतःकरणाला होणारे सर्व दर्शन हे माझेच दर्शन होय; पण ते अप्रत्यक्ष किंवा परोक्ष होय, खरे नव्हे; पण जेव्हा माझी मला यथार्थदर्शन होते, त्यावेळी द्रष्टा दृश्यत्वादि सर्व व्यवहार लोपतो. 28
1129-18
म्हणौनि दृश्यपथा- । अतीतु माझा पार्था । भक्तियोगु चवथा । म्हणितला गा ॥1129॥
म्हणून अर्जुना, हा जो माझा चौथा ज्ञानरूप भक्तियोग, तो कोणत्याही दृष्टीच्या टप्यात न येणारा (पलीकडील) आहे असे आम्ही सांगितले. 29
भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥18. 55॥
1130-18
या ज्ञान भक्ति सहज । भक्तु एकवटला मज । मीचि केवळ हे तुज । श्रुतही आहे ॥1130॥
ह्या सहज ज्ञानभक्तीने माझा भक्त मजपाशी ऐक्य पावतो-नव्हे-तो केवळ मद्रूपच होतो. हे तूही ऐकिले आहेसच. 1130
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1131-18
जे उभऊनिया भुजा । ज्ञानिया आत्मा माझा । हे बोलिलो कपिध्वजा । सप्तमाध्यायी ॥1131॥
कारण, अर्जुना, (सातव्या अध्यायात) + “ ज्ञानी हा माझा आत्माच होय ” असे आम्ही बाहु उभारून प्रतिपादिले आहे. 31
1132-18
ते कल्पादी भक्ति मिया । श्रीभागवतमिषे ब्रह्मया । उत्तम म्हणौनि धनंजया । उपदेशिली ॥1132॥
म्हणूनच, त्या उत्तम भक्तीचा कल्पारंभीं मी भागवतरूपाने ब्रह्मदेवास उपदेश केला. 32
1133-18
ज्ञानी इयेते स्वसंवित्ती । शैव म्हणती शक्ती । आम्ही परम भक्ती । आपुली म्हणो ॥1133॥
हिलाच ज्ञानी ” स्वसंविति ” असे म्हणतात, तर शैव “ शक्ति ” असे म्हणतात; व आम्ही ही आमची ‘ परमभक्ति ” होय असे म्हणतो. 33
1134-18
हे मज मिळतिये वेळे । तया क्रमयोगिया फळे । मग समस्तही निखिळे । मियाचि भरे ॥1134॥
त्या क्रमयोग्यांना, माझ्याशी ऐक्य पावते वेळी, ही भक्ति फलद्रूप होते व मग सर्व जग मद्रूपच आहे असे त्यांच्या प्रत्ययास येते. 34
1135-18
तेथ वैराग्य विवेकेसी । आटे बंध मोक्षेसी । वृत्ती तिये आवृत्तीसी । बुडोनि जाय ॥1135॥
अशा स्थितीत वैराग्य विवेकासह व बंध हा मोक्षाच्या कल्पनेसह नाहीसा होतो; आणि वृत्ति ब्रह्माचिंतनादि अभ्यासासह लोप पावते. 35
1136-18
घेऊनि ऐलपणाते । परत्व हारपे जेथे । गिळूनि चाऱ्ही भूते । आकाश जैसे ॥1136॥
पण आकाशस्वरूपात जसे एकही भूत नाही अथवा यातील एकाहो भूताशी त्याचा जसा संबंध नाही, त्या-प्रमाणे श्रेष्ठ (परत्व), कनिष्ठ (ऐलपण) भावांचा संबंध जेथे पोंचू शकत नाही, म्हणजे हारपतो. 36
1137-18
तया परी थडथाद । साध्यसाधनातीत शुद्ध । ते मी होऊनि एकवद । भोगितो माते ॥1137॥
त्याप्रमाणे, अलीकडील अगर पलीकडील साधनांनी प्राप्त न होणारे असे जे माझे शुद्ध साध्यस्वरूप, हे आपण होऊन, हा चौथ्या भक्तीचा अधिकारी माझा भोग घेतो. (मद्रूप असतो) 37
1138-18
घडोनि सिंधूचिया आंगा । सिंधूवरी तळपे गंगा । तैसा पाडु तया भोगा । अवधारी जो ॥1138॥
समुद्राला मिळेपर्यंत गंगापणाने असणारी गंगा, जशी समुद्राला मिळाल्यावर भिन्न न राहता प्रकारचा सागरपणा भोगते, तशाच प्रकारचा त्याचा हा भोग होय असे समज. 38
1139-18
का आरिसयासि आरिसा । उटूनि दाविलिया जैसा । देखणा अतिशयो तैसा । भोगणा तिये ॥1139॥
किंवा एका आरशासमोर दुसरा आरसा स्वच्छ करून ठेविला, तर, त्याने दृश्याःपेक्षां द्रष्टेपणाच्याच भोगांत भर पडल्यासारखे होते. (कारण दोघेही प्रतिबिंबग्राहक द्रष्टेच आहेत ) (तसा नित्यात्मदर्शी दोन व्यक्तींच्या भेटीचा भोग समजावा) 39
1140-18
हे असो दर्पणु नेलिया । तो मुख बोधुही गेलिया । देखलेपण एकलेया । आस्वादिजे जेवी ॥1140॥
हा दृष्टान्त असो; समोरील आरस नेल्याने त्यातील मुखप्रतिबिंबही जरी गेले, तरी, त्याच्या द्वारे झालेल्या आपल्याच मुखाच्या दर्शनाचा भोग जसा एक आपल्याच ठिकाणी भोगीत असतो. 1140
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
1141-18
चेइलिया स्वप्न नाशे । आपले ऐक्यचि दिसे । ते दुजेनवीण जैसे । भोगिजे का ॥1141॥
जागे झाल्यावर स्वप्नातील द्वैतव्यवहार नाहीसा होऊन आपल्या एकपणाचा भोग जसा द्वैतप्रतीतीवाचून आपणच भोगतो. 41
1142-18
तोचि जालिया भोगु तयाचा । न घडे हा भावो जयांचा । तिही बोले केवी बोलाचा । उच्चारु कीजे ॥1142॥
भोक्ताच जर भोग्य झाला तर भोग कसा घडणार, अशी ज्यांना शंका असेल त्यांना आम्ही असे विचारतो की, तुम्ही ” शब्द ” ह्या शब्दाचा शब्दानेच कसा बोध अगर उच्चार करितां ? 42
1143-18
तयाच्या नेणो गावी । रवी प्रकाशी हन दिवी । की व्योमालागी मांडवी । उभिली तिही ॥1143॥
त्यांच्या गावी सूर्योदय झाल्याचे दिव्याच्या सहाय्याने ठरवितात की काय न कळे; अथवा आकाश कोसळू नये म्हणून ते कदाचित् मांडवही घालीत असतील. 43
1144-18
हा गा राजन्यत्व नव्हता आंगी । रावो रायपण काय भोगी ? । का आंधारु हन आलिंगी । दिनकराते ? ॥1144॥
अहो, ज्याला राजेपणाचे कधी स्वप्नही पडत नाही, त्याला राजेपणाच्या भोगाची काय कल्पना येणार ? अंधकाराला कधी सूर्यदर्शन घडत असते का ? 44
1145-18
आणि आकाश जे नव्हे । तया आकाश काय जाणवे ? । रत्नाच्या रूपी मिरवे । गुंजांचे लेणे ? ॥1145॥
आकाश नसलेला पदार्थ आकाशाची सर्वव्यापकता कशी जाणणार ? गुंजांच्या दागिन्यांना कधी रत्नांच्या दागिन्यांची सर येईल काय ? 45
1146-18
म्हणौनि मी होणे नाही । तया मीचि आहे केही । मग भजेल हे कायी । बोलो कीर ॥1146॥
म्हणून मद्रूप नसणाराला जर माझाच ठावठिकाणा नसतो, तर तो माझे भजन करील ही भाषाच कशी बोलता यावी ? 46
1147-18
यालागी तो क्रमयोगी । मी जालाचि माते भोगी । तारुण्य का तरुणांगी । जियापरी ॥1147॥
अरे ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या आंगच्या तारुण्याचा तिलाच भोग घडत असतो, तसा, ह्या क्रमयोग्याला मद्रूप होऊनच माझा भोग घडत असतो. 47
1148-18
तरंग सर्वांगी तोय चुंबी । प्रभा सर्वत्र विलसे बिंबी । नाना अवकाश नभी । लुंठतु जैसा ॥1148॥
(औपाधिक भेदांतील भोग असा असतो) तरंगाला जशी सर्वागानं अगर सर्व पाण्यांची भेट असते, प्रभा सर्वत्र बिंबरूपानेच मिरवत असते, अथवा आकाशाने लोळण घेणे झाल्यास आकाशांतच जसे ते घेतले पाहिजे. 48
1149-18
तैसा रूप होऊनि माझे । माते क्रियावीण तो भजे । अलंकारु का सहजे । सोनयाते जेवी ॥1149॥
त्याप्रमाणे तो मद्रुप होऊन कोणतीही क्रिया न करिता, त्याला माझ भजन घडतें; अरे, अलंकार ही जसा नित्यच सुवर्णाचे भजन करीत असतो म्हणजे त्याच्याशी अनन्य असतो. 49
1150-18
का चंदनाची द्रुती जैसी । चंदनी भजे अपैसी । का अकृत्रिम शशी । चंद्रिका ते ॥1150॥
किवा चंदनाच्या सुगंधाला जसे आपोआप चंदनाचे भजन घडत असते, किंवा चंद्रप्रभा सहजच चंद्ररूप असते. 1150
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस ३३४ वा. ३०, नोव्हेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३९९७ ते ४००८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३९९७
भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥१॥
न करी त्वरा ऐके मात । क्षण एक निवांत बैसावे ॥धृपद॥
करूनी मर्दन सारिले पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥२॥
नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिले आता ठायी चलावे जी ॥३॥
करुनिया भोजन घेतले आंचवण । आनंदे नारायण पहुडले ॥४॥
तुका मात जाणवी आता । सकळा बहुता होती चित्ती ॥५॥
अर्थ
हरी शय्यागृहामध्ये क्षणभरासाठी गेले आहेत त्यामुळे भक्तजणहो तुम्ही थोडे स्थिर राहावे तुम्हाला त्यांचा प्रसादाचा लाभ होईलच परंतु तुम्ही थोडा धीर धरावा तुम्ही एक क्षणभर निवांत बसावे अजिबात घाई करु नका ही गोष्ट माझी तुम्ही ऐका. देवाच्या अंगाला उटणे लावून पाण्याने स्नान घालण्यात आले आहे आता भवानीमाता देवाचे अंग पुशीत आहे. देवाने सोनसळा नेसला आहे आणि जेवणास ताट वाढून ठेवले आहे आता त्या ठिकाणी जी महाराज तुम्ही चलावे अशी विनंती रखुमाई देवाला करीत आहे. नारायणाने भोजन केले व ते आचवले व आनंदाने पलंगावर पहुडले म्हणजे निजले. तुकाराम महाराज म्हणतात, “आता जी गोष्ट सर्वाच्या चित्तामध्ये होती तीच गोष्ट मी सर्वाना माहिती करुन देत आहे. ”
1:23
अभंग क्र. ३९९८
द्या जी आम्हा काही सांगा जी रखुमाई । शेष उरले ते ठायी सनकादिका ॥१॥
टोकत बाहेरी बैसलो आशा । पुराया ग्रासा एकमेका ॥धृपद॥
येथवरी आलो तुझिया नावे । आस करुनी आम्ही दातारा ॥२॥
प्रेम देउनिया बहुडा आता दिला । तुका म्हणे आता विठ्ठला बोला ॥३॥
अर्थ
हे रुखुमाबाई माते देवाच्या ताटामध्ये जे काही उच्चिष्ट उरले आहे त्यातील आम्हाला काहीतरी थोडेसे दया असे तुम्ही सनकादिकांना सांगा. अहो आम्हाला देवाचे काहीतरी उच्चिष्ट मिळेल याची अपेक्षा धरून आम्ही बाहेर काहीतरी टोकत बसलो आहोत एकमेकांना पुरेल असा घास तुम्ही आम्हाला दया एवढी आमच्यावर कृपा करा. हे दातारा आम्ही तुमच्यावर मोठी अपेक्षा करुन येथपर्यंत आलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवाने आम्हाला त्यांच्या ताटातील उच्चिष्ट प्रेमपूर्वक दिले व आम्हाला घरी जाण्यास निरोप दिला त्यामुळे आता तुम्ही विठ्ठल नामाचा गजर करा व वेळोवेळी विठ्ठल विठ्ठल बोला. ”
1:24
अभंग क्र. ३९९९
बहुडविले जन मन झाले निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥१॥
पर्यंकी निद्रा करावे शयन । रखुमाई आपण समवेत ॥धृपद॥
घेउनिया आलो हाती टाळ वीणा । सेवेसि चरणा स्वामीचिया ॥२॥
तुका म्हणे आता परिसावी सादरे । बोबडी उत्तरे पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवाने सर्वाना उच्चिष्ट देऊन ज्याला त्याला आपआपल्या घरी जाण्यास सांगितले आणि सर्वाचे मन निश्चिंत झाले व सर्व लोकाचा कोल्हाळ चुकून हा तुकाराम देवाजवळ आला. आणि देवाला विनंती करीत आहे की, देवा तुम्ही रुक्मिणी मातेबरोबर शय्यागृहामध्ये पलंगावर शयन करावे, निद्रा घ्यावी. मी हातामध्ये टाळ, वीणा घेऊन माझ्या स्वामीची चरणसेवा करण्यासाठी आलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “पाडूरंगा आता तुम्ही सादरपणाने माझी बोबडी उत्तरे ऐकावा. ”
1:24
अभंग क्र. ४०००
नाचे गाणे माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होईल तो ॥१॥
तुम्हा निद्रा मज आज्ञा ते स्वभावे । उतरूनि जीवे जाईन लोण ॥धृपद॥
एकाएकी बहु करीन सुस्वरे । मधुर उत्तरे आवडीने ॥२॥
तुका म्हणे तू जगदानी उदार । फेडशील भार एकावेळे ॥३॥
अर्थ
देवा तुमच्या भजनामध्ये नाचणे व तुमचे पूर्ण वर्णन गाणे हाच माझा खरा भक्तिभाव आहे आणि तोच अगदी माझ्या जवळचा आहे आणि माझ्या अंत:करणामध्ये जो माझा भक्तिभाव निर्माण होईल तो मी तुम्हाला सांगत राहीन. देवा तुम्ही झोपी गेलात तर ती माझ्यासाठीही झोपी जाण्याची सहजच आज्ञा होते आणि जाताना मी तुमच्यावरुन जीवाचे निंबलोण उतरुन जाईन. देवा मी एकातामध्ये तुमच्या गुणाचे गायन अतिशय व फार मधुर शब्दात व सुस्वरात करीन. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही जगाला दान देण्याविषयी फार उदार आहात त्यामुळे केव्हा तरी माझ्यावर उदार होताल आणि माझ्या माथ्यावरचा प्रपंचाचा भार एकवेळेला तुम्ही नक्की उतरवाल. ”
अभंग क्र. ४००१
अभंग क्र. ४००१
शिणलेती सेविका देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥
अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुम्हासि शोभती ब्रीदे ऐसी ॥धृपद॥
बहुतांनी विनविले बहुता प्रकारी । सकळा ठायी हरी पुरलेती ॥२॥
तुका म्हणे अगा कुटुंबवत्सला । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही भक्तांचा अंगीकार करुन त्यांना त्यांच्या इच्छेचे दान देऊन फार श्रमीत झाला आहात. अहो देवा तुम्हाला आनंदमूर्ती, दीनानाथ अशी ब्रीदे शोभत आहेत. हे हरी तुम्हाला अनेक भक्तांनी अनेक प्रकारे विनविले आहे त्यामुळे तुम्ही परमार्थिकदृष्टया एकजरी असला तरी सर्वाच्या ठिकाणी जाण्यास पुरता आहात. तुकाराम महाराज म्हणतात, “अगा कुटुंबवत्सला तुझी लीला कोण जाणवणार आहे ? ”
26/12/22, 10:05 Sdm:
अभंग क्र. ४००२
उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥१॥
वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारुणी ॥धृपद॥
केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥२॥
लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥३॥
अर्थ
स्वामी तुम्ही बाहेरील येरझार्या घालून फारच थकले आहात चला आता तुम्ही निद्रा करा. सर्व सेज पलंग आवरुन रुक्मिणी देवी तुमची वाट पाहात आहेत. हे पुरुषोत्तमा मी जी काही बडबड केली आहे त्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात, “हे नारायणा मी तुमच्या चरणी लीन होत आहे. ”
26/12/22, 10:06 Sdm:
अभंग क्र. ४००३
पावला प्रसाद आता उठोनि जावे । आपुलाले श्रम कळो येताती भावे ॥१॥
आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातो आपुलिया स्थळा ॥धृपद॥
तुम्हासि जागवू आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्मे दोष हारावया पीडा ॥२॥
तुका म्हणे दिले उच्छिष्टाचे भोजन । नाही निवडिले आम्हा आपणा भिन्न ॥३॥
अर्थ
देवा आम्हाला आता तुमच्या कृपेचा प्रसाद मिळाला आहे त्यामुळे आम्ही आता उठून जावे हेच चांगले आपण आमच्यासाठी जे श्रम घेतले त्यावरुनच आमच्याविषयी तुमचा असलेला भाव आम्हाला कळून आलेला आहे त्यामुळे तुम्ही आता निद्रा करावी. आता आमचे मनोरथ सर्व पुर्ण झाले आहे त्यामुळे आम्ही आमच्या स्थळाला जातो म्हणूनच हे स्वामी गोपाळा तुम्ही आता सुखाने निद्रा करा. देवा शुभ, अशुभ कर्मे, दोष आणि आमच्या जन्ममरणाच्या पीडा तुम्ही निवारण कराव्यात याच कारणासाठी आम्ही तुम्हाला जागवत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही भोजन केले आणि त्यातील उच्चिष्ट राहिलेले प्रसाद आम्हाला सेवन करण्यास दिला व तुमच्यात व आमच्यात भिन्नत्व राहू दिले नाही आम्हाला तुम्ही तुमच्यापासून वेगळे मानले नाही. ”
26/12/22, 10:07 Sdm:
अभंग क्र. ४००४
शब्दांचीया रत्ने करूनी अलंकार । तेणे विश्वंभर पूजियेला ॥१॥
भावाच्या उपचारे करूनि भोजन । तेणे नारायण जेवविला ॥धृपद॥
संसारा हाती दिले आंचवण । मुखशुद्धी मन समर्पिले ॥२॥
रंगली इंद्रिये सुरंग तांबूले । माथा तुळसीदळ समर्पिले ॥३॥
एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचे या ॥४॥
न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविले देवा माजघरी ॥५॥
अर्थ
भक्ति, ज्ञान, वैराग्यरुपी, शब्दरुपी रत्नांचे अलंकार करुन त्यानेच मी विश्वंभराला पूजले आहे. नवविधा भक्तिभावाच्या उपचाराने मी भोजन तयार केले आणि नारायणाला ते भोजन मी जेवु घातले. माझे सर्व इंद्रिय हरीच्या रंगात रंगून गेले आणि त्याच इंद्रियांचे मी सुगंधीत तांबूल म्हणजे विडा तयार करुन हरीला अर्पण केला आणि माथ्यावर तुळशीदळ समर्पण केले. एका भक्तिभावाची निरांजनी करुन त्यामध्ये ज्ञानरूपी दिवा लावून देवाला ओवाळले आणि देवाला बसण्यासाठी देहाचे आसन मी दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “मी काहीही न बोलता आता देवाची चरणसेवा करीत आहे आणि देवाला मी माझ्या हृदयरुपी माजघरात निजविले आहे. ”
26/12/22, 10:07 Sdm:
अभंग क्र. ४००५
उठोनिया तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥१॥
नेउल झाले सेवका स्वामींचे । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥धृपद॥
पहुडलिया हरी अनंतशैनावरी । तेथे नाही उरी काही काम ॥२॥
अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सांगितले लोका निजले देव ॥३॥
अर्थ
आता मी तुकाराम उठून आपल्या निजस्थळाला म्हणजे घरी गेलो त्यामुळे देवळामध्ये देव एकटेच राहिले आहेत. स्वामींनी माझ्यासारख्या सेवकाला घरी जाण्याची आज्ञा केली त्यामुळे माझे चित्त समाधानी झाले आणि या गोष्टीचे मला नवल वाटते. अनंत शय्यावर हरी निजले असून तेथे काही कामाची ऊरीच राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “सर्व लोकांना मी बाहेर काढले आणि देव निजले आहेत असे सर्वाना सांगितले. ”
26/12/22, 10:08 Sdm:
अभंग क्र. ४००६
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सापडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।
गर्जा जयजयकार हरी हृदयी धरा । आळस नका करू लाहाना सांगतो थोरा ॥१॥
या हो या हो बाइयांनो निघाले हरी । सिलंगणा वेगी घेउनि आरत्या करी ।
ओवाळू श्रीमुख वंदू पाउले शिरी । आम्हा दैव आले येथे घरिच्या घरी ॥धृपद॥
अक्षय मुहूर्त औटामध्ये साधे ते । मग येरी गर्जे जैसे तैसे होत जाते ।
म्हणोनि मागे पुढे कोणी न पाहावे येथे । सांडा परते काम जाऊ हरी सांगाते ॥२॥
बहुता बहुता रीती चित्ती धरा हे मनी । नका गै करू आइकाल ज्या कानी ।
मग हे मुख कधी न देखाल स्वप्नी । उरेल हायहाय मागे होईल काहाणी ॥३॥
ऐसियास वंचता त्यांच्या अभाग्या पार । नाही नाही नाही सत्य जाणा निर्धार ।
मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळले असो द्या मग पडतील विचार ॥४॥
जयासाठी ब्रम्हादिक जालेति पिसे । उच्छिष्टा कारणे देव जळी जाले मासे ।
अर्धांगी विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु म्हणे आले अनायासे ॥५॥
अर्थ
आजचा दिवस अगदी पवित्र चांगला व उत्तम आहे कारण आज “दशइंद्रियांचा दसरा” हा चांगला मुहूर्त सापडला आहे. त्यामुळे तुम्ही हरीनामाचा जयजयकार करावा व हरीला हृदयात धारण करा. हरीनाम घेण्यास आळस करु नका असे मी सर्व लहान व मोठया लोकांना सांगतो आहे. अहो सर्व प्रकृतीच्या स्वाधीन असलेल्या बायांनो तुम्ही या, तुम्ही लवकर या कारण हरी सीमोल्लंघन करण्यासाठी निघाले आहेत त्यामुळे हरीची आरती करण्यासाठी तुम्ही त्वरेने या. आता हरीच्या श्रीमुखाला ओवाळून त्याच्या पावलावर मस्तक ठेवून त्याला वंदन करु आमचे दैव आयते ये�
26/12/22, 10:08 Sdm:
अभंग क्र. ४००७
करूनि आरती । आता ओवाळू श्रीपती ॥१॥
आजि पुरले नवस । धन्य काळ हा दिवस ॥धृपद॥
पाहा वो सकळा । पुण्यवंता तुम्ही बाळा ॥२॥
तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥३॥
अर्थ
आता आरती करुन श्रीपतीला ओवाळू. आज नवस पूर्ण झाला असून आजचा काळ व दिवस धन्य आहे अहो सर्व पुण्यवंतांनी बाळरुप हरीला पाहा. तुकाराम महाराज म्हणतात, “मी तेथेच अगदी देवाच्या जवळ उभा राहून टाळी वाजवीत होतो. ”
26/12/22, 10:09 Sdm:
अभंग क्र. ४००८
द्याल माळ तरी पडेन मी पाया । दंडवत वाया कोण वेची ॥१॥
आले ते हिशोबे अवघिया प्रमाण । द्याल तरी दान मान होतो ॥धृपद॥
मोकळिया मने घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही जालिया कृपण । नामाचे जतन मग कैचे ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही प्रसाद म्हणून तुमच्या गळयातील माळ मला दयाल तरच मी तुमच्या पाया पडेल नाहीतर फुकट दंडवत तुम्हाला कोण घालील ? देवा जे हिशोबाने आहे ते सर्वानाच प्रमाण आहे म्हणजे सर्वानाच मान्य असते त्यामुळे तुम्ही मला दान दिले तरच तुम्हाला मान मिळेल. देवा जसे मोकळेपणाने तुम्ही आमच्या कडुन तुमची सेवा करुन घेता अगदी त्याप्रमाणे मोकळया मनाने प्रसादही तुम्ही पाठवा. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही जर दान देण्यास कृपण म्हणजे कंजूष झालात तर तुमच्या दीनवत्सल, दीनदयाल, पतितपावन, भक्तवत्सल या नामाचे जतन कसे होईल ? ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















