
३० ऑगस्ट, दिवस २४२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ३२६ ते ३५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २८९३ ते २९०४
“३० ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३० August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३० ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १५ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २८९३ ते २९०४ चे पारायण आपण करणार आहोत.
३० ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा, ओवी ३२६ ते ३५०
326-15
म्हणौनि तुजसी अभिन्ना जीवा । तुझा संयोगवियोगु देवा । नये बोलो अवयवा । शरीरेसी ॥326॥
देवा, अवयवांचा शरीराशी संयोग किंवा वियोग म्हणणे जसे अप्रस्तुत, तसे, तुझ्याशी अभिन्न असलेले जीव ह्यांचा तुझ्याशी संयोग किंवा वियोग होतो ही भाषा बोलण्याची सोय नाही. 26
327-15
आणि जे सदा वेगळे तुजसी । तया मिळणी नाही कोणे दिवशी । मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ? ॥327॥
आणि जे तुमच्याहून नित्य वेगळे आहेत त्यांचे तुमच्याशी कधींही ऐक्य होणार नाही. मग, ते परत येतात आणि येत नाहीत व्यर्थ उठाठेव कसली ? 27
328-15
तरी कोण गा ते तूते । पावोनि न येती माघौते । हे विश्वतोमुखा माते । बुझावी जी ॥328॥
असा दुहेरी पेंच असल्याने तुझी प्राप्ति झाल्यावर जे परत येत नाहीत असे ते आहेत तरी कोण, ह्याविषयीं, हे विश्वतोमुखा, माझी समजूत करावी. 28
329-15
इये आक्षेपी अर्जुनाच्या । तो शिरोमणि सर्वज्ञांचा । तोषला बोध शिष्याचा । देखोनिया ॥329॥
अर्जुनाच्या ह्या शंकेने, सर्वज्ञशिरोमणि भगवान् श्रीकृष्ण, शिष्याची धारणाबुद्धि पाहून मनात संतुष्ट झाला. 29
330-15
मग म्हणे गा महामती । माते पावोनि न येती पुढती । ते भिन्नाभिन्न रिती । आहाती दोनी ॥330॥
मग भगवान् म्हणाले, अर्जुना, मोठा बुद्धिमान् आहेसरे ! अरे, माझी प्राप्ति झाल्यावर जे परत येत नाहीत असे सांगितले ते दृष्टि भेदाने माझ्याहून भिन्नही आहेत व अभिन्नही आहेत 330
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-15
जै विवेके खोले पाहिजे । तरी मी तेचि ते सहजे । ना आहाचवाहाच तरी दुजे । ऐसेही गमती ॥331॥
खोल विचार करून पाहिला, तर, त्यांचे व माझे स्वभावसिद्ध ऐक्य आहे; आणि वरवरच्या (उथळ) दृष्टीने पाहिले तर ते भिन्न आहेत असेही म्हणावे लागले. 31
332-15
जैसे पाणियावरी वेगळ । तळपता दिसती कल्लोळ । एऱ्हवी तरी निखिळ । पाणीचि ते ॥332॥
जशा पाण्यावरील लाटा ह्या पाण्याहून वेगळया आहेतशा दिसतात, पण वस्तुतः या जलरूपच असतात 32
333-15
का सुवर्णाहुनि आने । लेणी गमती भिन्ने । मग पाहिजे तव सोने । आघवेचि ते ॥333॥
अलंकार हे सोन्याहून भिन्न आहेत असे वाटते; पण विचार केला म्हणजे ते सर्व सोनेच आहे असे ठरतें; 33
334-15
तैसे ज्ञानाचिये दिठी । मजसी अभिन्नचि ते किरीटी । येर भिन्नपण ते उठी । अज्ञानास्तव ॥334॥
त्याचप्रमाणे अर्जुना, शुद्ध ज्ञानदृष्टया, त्यांच्यात व माझ्यात भेद नाहीच; पण भिन्न आहेत अशी जी बुद्धि होते, तो सर्व अज्ञानाचा प्रभाव होय. 34
335-15
आणि साचोकारेनि वस्तुविचारे । कैचे मज एकासि दुसरे । भिन्नाभिन्नव्यवहारे । उमसिजेल ॥335॥
सम्यकवस्तुविचारदृष्टीने, अद्वितीय एक जो मी, त्या माझ्यापुढे दुसरे येणार कोठून कीं. ते भिन्न आहे की अभिन्न आहे हे तुला सांगावे ? 35
336-15
आघवेचि आकाश सूनि पोटी । बिंबचि जै आते खोटी । तै प्रतिबिंब के उठी । के रश्मि शिरे ? ॥336॥
सूर्यबिंबानेच सर्व आकाश व्यापून पोटात घातले तर, प्रतिबिंब होण्याला स्थलच कोठलें ? किंवा किरण तरी कोठे पडणार ? 36
337-15
का कल्पांतीचिया पाणिया । काय वोत भरिती धनंजया ? । म्हणौनि कैचे अंश अविक्रिया । एका मज ॥337॥
अर्जुना, प्रलयकाळचे उदक, हे काय नदीनाले ह्यांच्या पाण्याने भरले जातें ? त्याचप्रमाणे सर्वव्यापक, अविक्रिय, अपरिच्छिन्न जो मी एक, त्या मला अंश कोठेच ? 37
338-15
परी ओघाचेनि मेळे । पाणी उजू परी वाकुडे जाले । रवी दुजेपण आले । तोयबगे ॥338॥
परंतु, उजू असलेले पाणीही ओघाच्या योगाने जसे वाकडे वाटू लागते, किंवा सूर्यबिंबालाच जलामुळे प्रतिबिंबरूप दुजेपणा येतो. 38
339-15
व्योम चौफळे की वाटोळे । हे ऐसे कायिसयाही मिळे । परी घटमठी वेटाळे । तैसेही आथी ॥339॥
आकाश चौकोनी की वाटोळे ? ह्याचे उत्तर ते कसल्याही आकाराचे आहे हे होय; पण, घटमठादि उपाधीमध्ये ते बाटोळे व चतुष्कोण असेही असते. 39
340-15
हा गा निद्रेचेनि आधारे । काय एकलेनि जग न भरे ? । स्वप्नीचेनि जै अवतरे । रायपणे ॥340॥
अरे, निद्रेच्या आधारावर पडणाच्या स्वप्नात, जेव्हा हा ‘राजा ” होतो तेंव्हा त्या अवस्थेतील राज्यादि सर्व प्रपंचरूपाने हा एकटाच नटलेला नसतो काय ? 340
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-15
का मिनलेनि किडाळे । वानिभेदासि ये सोळे । तैसा स्वमाये वेटाळे । शुद्ध जै मी ॥341॥
किंवा, उत्तम सोने हिणकस धातूच्या मिश्रणाने जसे कसाला कमी भरते त्याप्रमाणे, शुद्धस्वरूप जो मी, त्या माझ्याशी स्वमायेचा जेव्हा योग किंवा संबंध घडतो (उपाधियुक्त होतो) 41
342-15
तै अज्ञान एक रूढे । तेणे कोऽहंविकल्पाचे मांडे । मग विवरूनि कीजे फुडे । देहो मी ऐसे ॥342॥
तेव्हा एका अज्ञानाचाच प्रादुर्भाव होऊन ‘मी कोण ?’ असा विकल्प उत्पन्न होतो व मग खऱ्या स्वरूपाचा विसर पडून ‘ देहच मी ” असा निश्चय ठरतो. 42
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः ।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥15. 7॥
343-15
ऐसे शरीराचि येवढे । जै आत्मज्ञान वेगळे पडे । तै माझा अंशु आवडे । थोडेपणे ॥343॥
ह्याप्रमाणे सर्वव्यापक आत्म्याचे शरीर तोच मी, असे वेगळे किंवा मर्यादित ज्ञान होते, त्यावेळी परिच्छिन्नत्वामुळे जीव हा माझा अंश आहे असे भासतें. 43
344-15
समुद्र का वायुवशे । तरंगाकार उल्लसे । तो समुद्रांशु ऐसा दिसे । सानिवा जेवी ॥344॥
वायूच्या योगाने समुद्रावर लाटा उठतात तेव्हा त्या समुद्राचाच लहानसा अंश आहे असे जसे दिसतें. 44
345-15
तेवी जडाते जीवविता । देहाहंता उपजविता । मी जीव गमे पंडुसुता । जीवलोकी ॥345॥
त्याप्रमाणे, जडदेहाला चेतना देणारा व तद्विषयक अहंभाव उत्पन्न करणारा असा जो चैतन्यस्वरूप मी, तोच ह्या मृत्युलोकी जीवभावाने नांदतो. 45
346-15
पै जीवाचिया बोधा । गोचरु जो हा धांदा । तो जीवलोकशब्दा । अभिप्रावो ॥346॥
जीवाच्या ज्ञानाचा विषय असणारी जी ही जगतांतील घडामोड, तो ” जीवलोक ” शब्दाचा अभिप्राय होय. 46
347-15
अगा उपजणे निमणे । हे साचचि जे का मानणे । तो जीवलोकु मी म्हणे । संसारु हन ॥347॥
आपण देहाबरोबर जन्माला आलो व देहाबरोबर मरणार हा व्यवहार जो सत्य मानतो तोच जीवलोक (जन्ममृत्यु सत्य मानणे ही जीवसृष्टि) व संसारही तोच. 47
348-15
एवंविध जीवलोकी । तू माते ऐसा अवलोकी । जैसा चंद्रु का उदकी । उदकातीत ॥348॥
उदकांत प्रतिबिबित झालेल्या चंद्राचा जसा उदकाला स्पर्शही नसतो, तसा ह्या जीवलोकाच्या ठिकाणी मी असंगत्वाने आहे असे तू समज. 48
349-15
पै काश्मीराचा रवा । कुंकुमावरी पांडवा । आणिका गमे लोहिवा । तो तरी नव्हे ॥349॥
किंवा कुंकुमावर ठेवलेला स्फटिकमणि, पहाणाराला जरी तांबडा वाटला तरी, तो खरोखर तांबडा नसतो. 49
350-15
तैसे अनादिपण न मोडे । माझे अक्रियत्व न खंडे । परी कर्ता भोक्ता ऐसे आवडे । ते जाण गा भ्रांती ॥350॥
त्याप्रमाणे माझे अनादिसिद्धत्व न मोडता, व अक्रियत्वाला बाध न येता, मी कर्ता भोक्ता आहे असे जे वाटते, ती, अर्जुना, भ्रांति आहे असे समज. 350
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २४२ वा. ३०, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २८९३ ते २९०४
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २८९३
करी ऐसी धावाधावी । चित्त लावी चरणापे ॥१॥
मग तो माझा मायबाप । घेईल ताप हिरूनी ॥धृपद॥
बहुतांच्या मते गोवा । होऊ जीवा नेदावा ॥२॥
तुका म्हणे करुणाबोले । धीर विठ्ठले निघेना ॥३॥
अर्थ
देवाची प्राप्ती करुन घेण्यासाठी काहीतरी धावाधावी करावी आणि देवाच्या चरणाजवळच आपले चित्त लावावे. मग तो माझा मायबाप तुझे त्रिविधताप हरण करुन घेईन. अनेकजणांचे मते ऐकून आपला जीव अडचणीत येईल असे काही तू होऊ देऊ नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, “तू जर करुणेने विठ्ठलाशी संवाद साधला त्याच्याशी बोलला तर विठ्ठलाला धीरच निघेनाशा होईल. ”
अभंग क्र. २८९४
काय तुज कैसे जाणवेगा देवा । आणावे अनुभवा कैशा परी ॥१॥
सगुण निर्गुण थोर की लहान । न कळे अनुमान मज तुझे ॥धृपद॥
कोण तो निर्धार करू हा विचार । भवसिंधु पार तरावया ॥२॥
तुका म्हणे कैसे पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावे ॥३॥
अर्थ
देवा मला एक कळत नाही तुला कशा प्रकारे जाणून घ्यावे आणि तुझा अनुभव तरी कसा घ्यावा ? देवा तू सगुण आहेस की निर्गुण आहेस स्थुल आहेस की लहान आहेस याचा अनुबंध मला काही कळतच नाही. हा भवसागर पार तरुन जाण्यासाठी कोणता निर्धार करावा आणि कोणता विचार करावा हे देखील समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे श्रीपती तुझ्या पायाची प्राप्ती कशी करुन घ्यावी याचे वर्म मला माहित नाही. ”
अभंग क्र. २८९५
एकविध नारायण । तेथे विषमाचा सीण । पालटोंचि भिन्न । नये अणुप्रमाण ॥१॥
अवघे सारावे गाबाळ । चुकवूनिया कोल्हाळ । आनंदाचे स्थळ । एकाएकी एकांत ॥धृपद॥
कायावाचामन । स्वरूपेचि अनुसंधान । लक्ष भेदी बाण । ये पाडे लवलाहो ॥२॥
तुका म्हणे आळस निद्रा । येथे देउनिया चिरा । देउनिया धीरा । मिठी जाणा जागृती ॥३॥
अर्थ
सर्वत्र एक नारायणच पाहावे जर विषमता पाहीली तर तेथे व्यर्थ क्षीणच उत्पन्न होतो. सर्वत्र नारायण आहेच याविषयी थोडा देखील बदल आपल्या मनामध्ये येऊ देऊ नये. या प्रपंचातील सर्व प्रकारचे गबाळ सर्व उपाधीचा कोल्हाळ चुकवून, एकांत स्थळामध्ये जाऊन जेथे आपल्याला आनंद वाटेल तेथे नारायणाचे चिंतन करत राहावे. कायावाचामनाने नारायणाच्या स्वरुपाच्या ठिकाणी अनुसंधान करावे. लक्षवेधी बाण ज्याप्रमाणे आपला लक्ष्य साध्य करतो त्याप्रमाणे त्वरेने आपण आपले नारायण हे लक्ष्य साध्य करुन घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, “आळस आणि निद्रा यांच्यावर दगड टाकावा. आणि जागृतीमध्येच धैर्य धरुन नारायणाच्या स्वरुपाला मिठी मारावी व त्याला जाणून तुम्ही घ्यावे. ”
अभंग क्र. २८९६
हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखो ॥१॥
नारायणी वसले घर । निरंतर आनंद ॥धृपद॥
अवघा रुधविला ठाव । नेला वाव मी माझे ॥२॥
तुका म्हणे एके ठावी । असू नाही क्षणभिन्न ॥३॥
अर्थ
हरीच्या छंदामध्ये माझी रात्र सुध्दा हरवून गेली आहे आणि झोप कशी असते ते देखील मला दिसत नाही. नारायणाच्या ठिकाणीच आमचे घर वसले आहे तेथे निरंतर आनंदच आहे. नारायणाने सर्व जागा व्याप्त करुन टाकले आहे सर्वत्र नारायणच आहे असेच मला दिसत आहे आणि नारायणाने माझ्या ठिकाणाहून मी आणि माझे हा भेदभावच नेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “आम्ही आता एका नारायणाच्याच ठिकाणी वास्तव्य करु त्यापासून एक क्षणभर देखील वेगळे आम्ही राहणार नाही. ”
अभंग क्र. २८९७
देवे केले कैसे कैसे । उद्धरिले अनायसे ॥१॥
ऐका नवलायाची ठेव । नेणताही भक्तिभाव ॥धृपद॥
कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बसैला ॥२॥
पंखांच्या फडत्कारी । उद्धरुनी नेली घारी ॥३॥
चोरे पिंडी दिला पाव । त्या पूजने धाय देव ॥४॥
तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हा कोवळा ॥५॥
अर्थ
देवाने कसे कसे महापराक्रम केले ते लक्षात घ्या त्याने महापापी लोकांचे देखील अनायासे सहजच उध्दार केला आहे. ज्यांच्या ठिकाणी भक्तिभाव आणि भक्तिभाव काय आहे हे देखील माहित नाही अशांचा देखील या देवाने उध्दार केला ही किती नवलाची गोष्ट आहे तेच तुम्हाला सांगायची आहे ते तुम्ही ऐका. अहो एक दिवस एक भिल्ल शिकारी व्याघ्राची शिकार करण्यासाठी बेलाच्या झाडावर बसला त्या दिवशी शिवरात्र होती आणि शिकार लवकर दिसेना म्हणून तो बेलाचे पान तोडायचा व खाली टाकायचा परंतू खाली शिवलिंग होते व अनायासे ते बेलपत्र शिवलिंगावर पडायचे कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसतांना केवळ अनायासे बेलपत्र शिवलिंगावर पडल्यावर देखील त्या भिल्लाचा उध्दार झाला व देवाने त्याला कैलासावर नेले. एक घार एक दिवस शिवलिंगावर बसली आणि सहजच तिने तिचे पंख फडकवले तर तो वारा भगवान शंकराला इतका सुखकारक वाटला की त्यामुळे भगवान शंकराने तिलाही उध्दरुन टाकले. एक दिवस एक चोर चोरी करुन पळत होता तर रात्री त्याला शिवलिंग दिसले नाही त्याने चुकून शिवलिंगावर पाय दिला तर भगवान शंकराला तो अभिषेकच वाटला व त्यामुळेच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याच्या मदतीला धावले. तुकाराम महाराज म्हणतात, “माझा स्वामी फारच भोळा आहे आणि भक्तांविषयी फारच संवेदनशील म्हणजे कोवळा आहे. ”
अभंग क्र. २८९८
अनुभव ऐसा । मज लागला सरिसा ॥१॥
पाठी बैसली शेजारी । नव्हे शांत कोणे परी ॥धृपद॥
कोठे न लगे जावे । काही घालावया ठावे ॥२॥
तुका म्हणे कोटि । दुःखाच्याच तये पोटी ॥३॥
अर्थ
या संसारामध्ये माझ्या पाठीमागे दु:ख लागले आहे असा अनुभव मला येत आहे. काम क्रोध हे विकार तर माझ्या पाठीवर नव्हे अगदी माझ्या शेजारीच बसले आहेत ते कोणत्याही पध्दतीने शांत होत नाहीत. काही माहिती करुन घ्यायची असेल तर कोठे जावे लागत नाही कारण मन फारच चंचल आहे ते सर्वत्र फिरतच असते. तुकाराम महाराज म्हणतात, “संसाराच्या पोटामध्ये कोटयावधी दु:खेच आहेत. ”
अभंग क्र. २८९९
पाठीवरी भार । जातो वाहूनिया खर ॥१॥
संत नेतील त्या ठाया । माझी आधीन त्या काया ॥धृपद॥
मोटचौफळ । अंती उच्छिष्टाचे बळ ॥२॥
न संडी मारग । येथे न चोरूनि अंग ॥३॥
आपुलिया सत्ता । चालविले नाही चिंता ॥४॥
कळवळिला तुका । जनाचार येथे नका ॥५॥
अर्थ
मी गाढव आहे आणि संतांचे ओझे मी माझ्या पाठीवर घेऊन जात आहे. संत मला ज्या ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी मी जाईन कारण माझे शरीरच त्यांच्या आधीन आहे. संतांच्या कृपा आर्शिवादामुळे मला चारही पुरुषार्थ प्राप्त झाले असून त्यांच्या उच्चिष्टाने माझ्या अंगी बळ येत आहे. संतांनी सांगितलेला मार्ग मी तर कधीच सोडणार नाही आणि येथे त्यांची सेवा करण्यासाठी मी अंगचोरपणा तर मुळीच करणार नाही. संतांनी आपल्या सत्तेने माझे शरीर चालवण्याचे ठरवले आहे व ते चालवतही आहेत माझ्या सर्व योगक्षेमाचा भार तेच वाहात आहे त्यामुळे मला आता कसलीही चिंता करण्याची गरज राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “मला संतांनी कवटाळले आहे त्यांनी माझा स्वीकार केला आहे त्यामुळे मला येथे कोणत्याही प्रकारचा लोकाचार नको वाटतो आहे. ”
अभंग क्र. २९००
मागे पुढे झालो लाटा । अवघा मोटा सरळ ॥१॥
नाही कोठे रिते अंग । नित्य रंग नवाचि ॥धृपद॥
पोसिंद्याचे पडिलो हाती । वोझे माती चुकली ॥२॥
जोगावलो पोटी खर । पाठी भार वरी नाही ॥३॥
अवघिया मोकळ्या दिशा । नाही वोळसा कामाचा ॥४॥
संताचिये लोळे द्वारी । पळती दुरी गोमाशा ॥५॥
पातोगे महाद्वारी । वरी झुली वाकळा ॥६॥
काही न साहेसा झाला । तुका नेला समर्थे ॥७॥
अर्थ
मी मागेपुढे मोठा बलाढय झालो असून सर्वांगाने सरळ झालो आहे. माझे अंग पूर्ण ब्रम्हानंदाने भरले आहे त्यामुळे ते कोठेही रिते राहिले नाही त्यामुळे ब्रम्हानंदाचा अनुभव व त्याचा रंग नित्य नव्याने माझ्या अंगी चढतच आहे. काळजीपूर्वक माझे पालनपोषण करणाऱ्यांच्या म्हणजे संतांच्या हाती मी पडलो आहे आणि संसाराचे ओझे वाहून माझी जी माती होणार होती ती माती होण्याची आता चुकली आहे. मी तर गाढवच आहे तरी या गाढवाला त्यांनी पोट भरुन खाऊ घातले माझे पालनपोषण केले आणि पाठीवर कोणत्याही प्रकारचा भार यांनी ठेवला नाही. माझ्यासाठी सर्व दिशा मोकळया झाल्या असून कोणत्याही कामाला वळसा घालण्याचे यांनी ठेवलेच नाही. मी संतांच्या व्दारामध्ये लोळतच पडलो आहे आणि त्यामुळे विकाररुपी गोमाश्या आपोआपच दूर पळत आहेत. मी संतांच्या महाव्दारामध्ये गेलो तर मला एक आश्चर्य दिसले ते म्हणजे असे पूर्वी माझ्या पाठीवर विकाररुपी वाकाळा होत्या परंतू त्या नाहीसा झाल्या असून भक्तीज्ञान वैराग्याच्या झोळी चढल्या गेल्या होत्या. तुकाराम महाराज म्हणतात, “संसारातील कोणतेही दु:ख आता मला सहन होईनासे झाले आहे समर्थ संतांनी माझ्या सर्व योगक्षेमाचा भारच नेला आहे. ”
अभंग क्र. २९०१
सुनियाचा हाचि भाव । आपुला ठाव राखावा ॥१॥
दुजियाचा येऊ वारा । नेदू घरावरी देऊ ॥धृपद॥
केली याची फाडाफाडी । तडामोडी क्षेत्राची ॥२॥
पातेजत नाही लोका । देव तुका वाचूनि ॥३॥
अर्थ
कुत्र्याचे हेच काम आहे की घरमालकाच्या घराचे रक्षण करावे त्याप्रमाणे भक्ती करताना भक्तरुपी कुत्र्याने आपल्या नीजस्वरुपरुपी घराचे रक्षण करावे. त्या कुत्र्याने दुसऱ्या कोणाचा वारा देखील आपल्या घरावर येऊ देऊ नये त्याप्रमाणे भक्तरुपी कुत्र्याने व्दैतरुपी वारा आपल्या अव्दैतरुपी घरावर येऊ देऊ नये. जर आपल्या अव्दैत स्थितीवर काम क्रोध विकारांनी चाल केली तर त्याचे क्षेत्र म्हणजे मन व बुध्दी याची तोडामोड करुन विकारांची फाडाफाडी करावी. तुकाराम महाराज म्हणतात, “मी वरती जे तुम्हाला लक्षण सांगितले आहे त्या लक्षणाचाच मी देवाचा एक दक्ष कुत्रा आहे त्यामुळे देवाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझ्यावाचून इतर कोणत्याही लोकांवर देवाचा विश्वास नाही. ”
अभंग क्र. २९०२
धन्य तो ग्राम जेथे हरीचेदास । धन्य तोचि वंश भक्ति भाग्य ॥१॥
ब्रम्हज्ञान तेथे असे घरोघरी । धन्य त्या नरनारी चतुर्भुज ॥धृपद॥
नाही पापा रिघ काळाचे खंडन । हरीनामकीर्त्तन घरोघरी ॥२॥
तुका म्हणे तिही तारिले सकळा । आपुल्या कोटिकुळासहित पै ॥३॥
अर्थ
ज्या गावामध्ये हरीचे दास आहेत ते गाव धन्य आहे आणि ज्या वंशामध्ये हरीचे भक्त जन्माला आले आहेत ते वंश भाग्यवान आहेत. ज्या गावामध्ये हरीभक्त आणि ज्या वंशामध्ये हरीदास आहेत तेथे घरोघरी ब्रम्हज्ञान असते तेथील नरनारी भगवान विष्णूप्रमाणे चतुर्भूज असतात त्यामुळे ते देखील धन्य असतात. जेथे घरोघरी हरीनाम संकीर्तन चालू असते तेथे पापाला थाराच नसतो आणि काळाचे खंडन तेथे होत असते काळाला देखील तेथे प्रवेश मिळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा हरीभक्तांनी आपल्या कोटीकुळासहीत सर्वाना तारलेले असते. ”
अभंग क्र. २९०३
भय होते आम्हीपणे । पाठी येणे घातले ॥१॥
अवघा आपुलाचि देश । काळा लेश उरेचि ना ॥धृपद॥
समर्थाचे नाम घेता । मग चिंता काशाची ॥२॥
तुका म्हणे नारायणे । केले जिणे सुखाचे ॥३॥
अर्थ
आम्हाला देहाभिमानामुळे जन्ममरणाचे खूप भय होते परंतू देवानेच आम्हाला पाठीशी घातले व आमचे भय नाहीसे केले. आता सर्व देश आपलाच आहे काळाला कोठे जागाच उरली नाही. समर्थाचे नाम घेतले की मग कशाची चिंता आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “माझे जीणे म्हणजेच जगणे नारायणाने सुखाचे केले आहे. ”
अभंग क्र. २९०४
मारू नये सर्प संताचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणे ॥१॥
एक सूत्र जीवशिवी आइक्यता । रोम उपडिता अंग कापे ॥धृपद॥
नाही साहो येत दुखाची ते जाती । परपीडा भूती साम्य झाली ॥२॥
तुका म्हणे दिला नीतीचा संकेत । पुजा नावे चित्त सुखी तेणे ॥३॥
अर्थ
संतांच्या समोर सर्पाला देखील मारु नये कारण सर्वत्र हरी व्यापक आहे अशी त्यांची भावना आहे व सर्पाला मारले तर ते कष्टी होतात दु:खी होतात. जसे एका माळेत अनेक मणी ओवलेले असतात त्याप्रमाणे संतांच्या दृष्टीने जीव आणि शिव हे दोन्हीही एकरुप आहेत त्यामुळे ते सर्वत्र ब्रम्ह पाहत असतात आणि जर कोणाच्या अंगावरील एक केस जरी त्यांच्यासमोर (संतांच्या) उपटला तरी त्यांचे अंग कापते. संतांची जातच इतकी दयाळू आहे की त्यांना कुणाचेही दु:ख सहन होत नाही परपीडा झालेली तर त्यांना मुळीच सहन होत नाही कारण त्यांच्या दृष्टीने सर्व भूतमात्रांमध्ये साम्यताच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “वेदाने एक नीतीचा संकेत सांगितला आहे तो म्हणजे सर्व भूती एक ईश्वर आहे व कोणत्याही भूतमात्राचा मत्सर मनुष्याने करु नये याचेच नांव म्हणजे ईश्वराची पूजा आहे व असे केल्याने आपले चित्त सुखी होत असते. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















