
१२ ऑगस्ट, दिवस २२४ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा, ओवी ३०१ ते ३२५ सार्थ तुकाराम गाथा अभंग २६७७ ते २६८८
“१२ ऑगस्ट” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan १२ August
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १२ ऑगस्ट असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २६७७ ते २६८८ चे पारायण आपण करणार आहोत.
१२ ऑगस्ट, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी ३०१ ते ३२५ ,
301-14
किंबहुना पंडुसुता । ऐसी तो माझी सत्ता । पावे जैसी सरिता । सिंधुत्व गा ॥301॥
फार काय सांगावे ? अर्जुना, ज्याप्रमाने नदी समुद्राला प्राप्त होत असते. त्याप्रमाणे असा तो द्रष्टा पुरुष माझ्या स्वरुपाला प्राप्त होतो.
302-14
नळिकेवरूनि उठिला । जैसा शुक शाखे बैसला । तैसा मूळ अहंते वेढिला । तो मी म्हणौनि ॥302॥
जसा राघू नळिकेवरून उठून (मोकळेपणे) झाडाच्या दुसर्या फांदीवर बसावा, तसा तो देहाहंता सोडून स्वरूप (ब्रह्म) हेच मी आहे. म्हणून तो स्वरूप-अहंतेने वेष्टिला गेला.
303-14
अगा अज्ञानाचिया निदा । जो घोरत होत बदबदा । तो स्वस्वरूपी प्रबुद्धा । चेइला की ॥303॥
हे ज्ञानसागर अर्जुना ! अज्ञानरूपी निद्रेने मीच देह आहे आणि स्ञी, पुञ, ही धन संपत्ती सर्व माझी आहे. असे म्हणत जो घोरत पडला होता. तो ब्रम्हस्वरुपाच्या अवस्थेत मी ब्रम्हच आहे; याच ज्ञानाने जागा झाला.
304-14
पै बुद्धिभेदाचा आरिसा । तया हातोनि पडिला वीरेशा । म्हणौनि प्रतिमुखाभासा । मुकला तो ॥304॥
अर्जुना भेदप्रतीती निर्माण करनारा हाच कोणी एक बुद्धिरुपी आरसा, तो त्याच्या हातून पडून फुटल्यामुळे तो ज्ञानाने बाधित होऊन तो जिवरुपी प्रतिबिंबाला मुकला आहे.
305-14
देहाभिमानाचा वारा । आता वाजो ठेला वीरा । तै ऐक्य वीचिसागरा । जीवेशा हे ॥305॥
हे वीरा अर्जुना ! देह तादात्म्याचा वारा वाहणे ज्या वेळस बंद होते. तेव्हा लाटांचे सागराशी ऐक्य असते. ह्या पुरुषाच्या ठिकाणी जीवाचे जसे ब्रम्हाशी ऐक्य होते.
306-14
म्हणौनि मद्भावेसी । प्राप्ति पाविजे तेणेसरिसी । वर्षांती आकाशी । घनजात जेवी ॥306॥
म्हणून त्या आत्मज्ञानी पुरुषाला लागलीच माझ्या स्वरुपाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे ढग हे पावसाळा संपल्यानंतर शेवटी ते आकाशरूप होऊन रहातात.
307-14
तेवी मी होऊनि निरुता । मग देहीचि इये असता । नागवे देहसंभूता । गुणासि तो ॥307॥
असा ज्ञानी असणारा भक्त मद्रुप झाल्यावर जरी देहात असले काही आणि नसले काय तरीसुद्धा त्याप्रमाणे वस्तुत: मद्रूप झाल्यावर मग जरी तो या देहात असला तरी तो देहाला उत्पन्न करणार्या गुणांच्या तावडीत सापडत नाही.
308-14
जैसा भिंगाचेनि घरे । दीपप्रकाशु नावरे । का न विझेचि सागरे । वडवानळु ॥14-308॥
ज्याप्रमाणे काचेचा कंदिल-दिवा भिंगाच्या घरात ठेवला म्हणजे त्या दिव्यातुन येणारा प्रकाश त्या घराकडुन ज्याप्रमाने कोंडुन ठेवला जाऊ शकत नाही, परंतु तो देहात असुनही. सागराकडुन विझला जात नाही. ,
309-14
तैसा आला गेला गुणांचा । बोधु न मैळे तयाचा । तो देही जैसा व्योमींचा । चंद्र जळी ॥309॥
त्याप्रमाणे गुणांच्या येण्या-जाण्याने त्या ज्ञानी असणार्या भक्ताचा आत्मबोध मलिन होत नाही. जसा आकाशातील चंद्राची सावली जरी पाण्यात पडली असता, तरी जसा तो ओला होत नाही, त्याप्रमाने तो देहात असुनसुद्धा गुणांनी बांधला जाऊ शकत नाही.
310-14
तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी । देही नाचविती बागडी । तो पाहोही न धाडी । अहंतेते ॥310॥
तिन्ही गुण आपापल्या सामर्थ्याने देहामधे विविध प्रकारचे प्रयत्न करतात, परंतु तो आपल्या अहंतेला ते प्रयत्न पहाण्यासही पाठवत नाही.
311-14
हा ठायवरी । नेहटोनि ठेला अंतरी । आता काय वर्ते शरीरी । हेही नेणे ॥311॥
अशा परिस्थितीत तो ज्ञानी मनुष्य अंतकरणामध्ये अत्यंत बळकट असा निश्चय करुन एका जागेवर स्थिर राहण्यातच आपले हीत जाणत असतो. वर्तमान काळात शरीराच्या ठिकानी काय काय घडते, याचा तो किंचितही विचार करत नाही.
312-14
सांडुनि आंगीची खोळी । सर्प रिगालिया पाताळी । ते त्वचा कोण सांभाळी । तैसे जाले ॥312॥
आपल्या अंगावरची कात टाकून सर्पाने बिळात प्रवेश केल्यानंतर त्या कातेचे काय होईल याची व्यर्थ काळजी करत बसत नाही. त्याप्रमाने तो ज्ञानी मनुष्य तो आपल्या देहाविषयी व्यर्थ चिंता करण्यात आपला बहुमुल्य वेळ घालवित बसत नाही.
313-14
का सौरभ्य जीर्णु जैसा । आमोदु मिळोनि जाय आकाशा । माघारा कमळकोशा । नयेचि तो ॥313॥
अथ ?थवा कमळातील सुगंध पुर्णपणे विकसित झाल्यावर जसा त्याचा सुवास आकाशात मिसळून जातो व तो पुन्हा कमळाच्या फुलाकडे माघारी येत नाही,
314-14
पै स्वरूपसमरसे । ऐक्य गा जाले तैसे । तेथ किं धर्म हे कैसे । नेणे देह ॥314॥
अर्जुना, ब्रह्मतत्वाशी ऐक्य पावल्यामुळे त्या ज्ञानी पुरुषाची स्थिती तशीच झालेली असते. अशा अवस्थेत ? देहाचे धर्म काय आहेत ? व देह कसा आहे, हे तो जाणत नाही.
315-14
म्हणौनि जन्मजरामरण । इत्यादि जे साही गुण । ते देहीचि ठेले कारण । नाही तया ॥315॥
म्हणून जन्म, अस्तित्व, वर्धन, विपरिणाम व मरण, म्हातारपणा व विनाश इत्यादि देहाचे जे सहा विकार आहेत, ते त्याच्या देहाच्या ठिकाणीच राहिलले असतात.
316-14
अशा त्या ज्ञानी मनुष्याचा या सहा विकाराशी काडीमाञ संबध नसतो.
घटाचिया खापरिया । घटभंगी फेडिलिया । महदाकाश आपैसया । जालेचि असे ॥316॥
घट फुटल्यावर व घटाच्या खापर्या दुर फेकून दिल्यावर ते घटातील आकाश जसे आपोआपच महाकाश झालेले असते.
317-14
तैसी देहबुद्धी जाये जे आपणपा आठवू होय । तै आन काही आहे । तेवाचुनी ? ॥317॥
त्याप्रमाणे देहबुद्धी गेल्यावर ज्यावेळी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचे अखंड अनुसंधान घडते. किंवा स्मरण होते, तेव्हा आत्मस्वरूपावाचून दुसर्या कशाची आठवण राहते काय ?
318-14
येणे थोर बोधलेपणे । तयासि गा देही असणे । म्हणूनि तो मी म्हणे । गुणातीत ॥318॥
ज्याच्या अंतकरणामध्ये झालेला असा हा महान बोध तो देहधारी असला तरी तो गुणातीत झाला आहे. असे भगवान सांगतात.
319-14
यया देवाचिया बोला । पार्थु अति सुखावला । मेघे संबोखिला । मोरु जैसा ॥319॥
जसा काही मेघांच्या गर्जनेने हाक दिलेला मोर जसा सुखावतो, त्याप्रमाणे या देवाच्या संवादाने, बोलण्याने अर्जुन अतिशय आनंदित झाला.
अर्जुन उवाच ।
कैर्लिंगैस्त्रीन्गुणात्नेतानतीतो भवति प्रभो ।
किमाचारः कथंचैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते ॥14. 21॥
*श्लोकार्थ -: अर्जुन म्हणाला, हे प्रभो, या तीन गुणांच्या पलीकडे जो जातो तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा ? त्याचे आचरण कसे असते ? तो कोणत्या उपायाच्या आधारे या तीनही गुणांना ओलांडुन पलीकडे तो कशाप्रकारे जातो. ?
त्याचे आचरण कोणत्या प्रकारचे असेल. ?
320-14
तेणे तोषे वीर पुसे । जी कोण्ही चिन्ही तो दिसे । जयामाजी वसे । ऐसा बोधु ॥320॥
त्या संतोषाने वीर अर्जुन विचारू लागला की महाराज, ज्याच्या अंतकरणामध्ये असा बोध झाला आहे, तो पुरुष कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो ? किंवा काय लक्षणे असु शकतील.
321-14
तो निर्गुण काय आचरे । कैसेनि गुण निस्तरे । हे सांगिजो माहेरे । कृपेचेनि ॥321॥
तो गुणातीत पुरुष कसा आचरण करतो ? व तो गुणांचे कसे उल्लघंन किंवा निवारण कसे करतो ? आपण तर कृपेचे माहेरघर आहात, आपण हे आम्हाला सांगावे.
322-14
यया अर्जुनाचिया प्रश्ना । तो षड्गुणांचा राणा । परिहारु आकर्णा । बोलतु असे ॥322॥
ह्या अर्जुनाच्या प्रश्नावर तो ऐश्वर्यादी सहा गुण ऐश्वर्यसंपन्न राजा (श्रीकृष्ण) काय उत्तर देत आहे त्याचे श्रवण करा.
श्रीभगवानुवाच ।
प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव ।
न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति ॥14. 22॥
*श्लोकार्थ -: श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, सत्वगुणाचे कार्यरुप प्रकाश, रजोगुणाचे कार्य प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरुप मोह ही प्राप्त झाली असता दुःख बुद्धिने झालेला मनुष्य त्यांचा तिरस्कार करत नाही व प्राप्त झाली नसताना तो सुखबुद्धिने त्याची आकांक्षा करत नाही.
(अर्जुनाच्या प्रश्न विचारण्यातील चूक)
323-14
म्हणे पार्था तुझी नवाई । हे येतुलेचि पुससी काई । ते नामचि तया पाही । सत्य लटिके ॥323॥
परमात्मा म्हणाले, हे पार्था ! तुझी प्रश्न करण्याची पद्धत अपूर्वच आहे. तो गुणातीत काय कर्मे करतो व गु्णातीत कसा तरून जातो हे एवढेच असंबंद्ध काय विचारतोस ? हे तुझे विचारणे ‘खरे हे कसे खोटे आहे ? ” असे विचारण्यासारखे विसगंत आहे.
324-14
गुणातीत जया नांवे । तो गुणाधीन तरी नव्हे । ना होय तरी नांगवे । गुणा यया ॥324॥
अर्जुनाचा प्रश्न विसंगत कसा आहे हे भगवान या ओवीत सांगतात). गुणातीत ज्याला म्हणतात, तो गुणांच्या स्वाधीन तर नसतोच अथवा तो जरी गुणात असला तरी तो त्या गुणांच्या स्वाधीन होत नाही.
325-14
परी अधीन का नांगवे । हेचि कैसेनि जाणावे । गुणांचिये रवरवे- । माजी असता ॥325॥
या ओवीत अर्जुनाच्या प्रश्नंची दुरुस्ती करतात) पण तो गुणातीत पुरुष गुणांच्या गुंताड्यात असताना तो गुणांच्या आधीन आहे किंवा तो गुणांच्या आधीन नाही हे कसे ओळखावे ?
दिवस २२४ वा. १२, ऑगस्ट
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २६७७ ते २६८८
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. २६७७
पाठीलागे काळ येतसे या लागे । मी माझे वाउगे मध्ये ऐसे ॥१॥
आता अगी लागो ऐसिया वेव्हारा । तू माझा सोइरा पांडुरंगा ॥धृपद॥
वागविला माथा नसताचि भार । नव्हे ते साचार देखिले तो ॥२॥
तुका म्हणे केले जवळील दुरी । मृगजळ वरी आड आले ॥३॥
अर्थ
माझ्या पाठीमागे काळ लागलेला आहे कारण” मी व माझे” या भ्रमामध्ये मी गुंतलेलो आहे. हे पाडूरंगा आता अशा व्यवहाराला आग लागो येथे केवळ तूच एक माझा सोयरा आहेस. देवा मी माझ्या माथ्यावर नसत्या भ्रमाचा भार वागवित बसलो ते केवळ मला जोपर्यंत सत्य समजले नाही तोपर्यंतच. तुकाराम महाराज म्हणतात, “माझ्याजवळ नित्य आनंदाचे खरे स्वरुप आहे परंतू संसाररुपी मृगजळ आडवे आले त्यामुळे माझ्याजवळचे आनंदस्वरुप दूर गेले. ”
अभंग क्र. २६७८
आपुलिये ठाकी । करीन काही तरी एकी ॥१॥
करीन पायासी वोळखी । करिसी ते करी सुखी ॥धृपद॥
कायाक्लेशगंगाजळ । समर्पीन तुळसीदळ ॥२॥
तुका म्हणे देवा । कर जोडीन ते सेवा ॥३॥
अर्थ
देवा मला जमेल तसे माझ्या बळाप्रमाणे मी काहीतरी करीन. मी तुझ्या पायाशी ओळख करुन घेईन मग तुला सुखाने काय करायचे असेल ते कर. देवा मी माझ्या शरीराला कष्ट देऊन तुझी सेवा करीन आणि तुला गंगाजळ तसेच तुळशीपत्र सर्मपण करीन. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा जर मला हे काहीही जमले नाही तर मी माझे दोन्हीही कर जोडून तुझी सेवा करीन. ”
अभंग क्र. २६७९
माझे तो स्वभाव मज अनावर । तुज ही देता भार काही नव्हे ॥१॥
ऐसे कळो आले मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाही ॥धृपद॥
संपादितो तो अवघा बाह्य रंग । तुझा नाही संग अभ्यंतरी ॥२॥
तुका म्हणे सत्या नाही पाठी पोट । असते निघोट एकी जाती ॥३॥
अर्थ
देवा माझा स्वभाव मला अनावर झाला आहे आणि त्यामुळेच मी माझा भार तुझ्यावर घातला तर तुही काही मदत करीत नाहीस. हे नारायणा माझ्या जागृतीत आणि स्वप्नात ताळमेळच नाही हे मला कळून आले आहे. हे नारायणा मी बाहयरंगाने तुझा भक्त आहे असे सोंग केवळ संपादन करीत आहे परंतू माझ्या अंत:करणात पाहिले तर तुझी सोबतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “सत्याला दोन बाजू नसतात पाठ नसते आणि पोट नसते सत्य हे परिपूर्ण असते. ”
अभंग क्र. २६८०
नव्हावा तो बरा मुळीच संबंध । विश्वासिका वध बोलिलासे ॥१॥
आता माझे हित काय ते विचारा । सत्यत्वे दातारा पांडुरंगा ॥ध्रु ॥
नाही भाव परी म्हणवितो दास । नको देऊ यास उणे येऊ ॥२॥
तुका म्हणे का हो उद्धरिता दीन । मानीतसा सीण मायबापा ॥३॥
अर्थ
देवा तुमचा व माझा पूर्वी संबंधच झाला नसता तर हे फार बरे झाले असते आम्ही तर तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला परंतू तुम्ही आमचा विश्वासघात केला आणि शास्त्र असे सांगते की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू त्याने विश्वासघात केला म्हणजे तो एक प्रकारचा वधच ठरत असतो. त्यामुळे हे दातारा पाडूरंगा मी तुम्हाला खरोखर विनंती करुन सांगतो की माझे हित कशात आहे याविषयीचा तुम्हीच विचार करा. देवा मी तुम्हाला सत्य सांगत आहे माझा तुमच्या ठिकाणी भक्तीभाव नाही परंतू स्वत:ला निष्ठेने तुमचा दास म्हणून घेतो मग तुमचा दास म्हणून घेणार्याला तुम्ही काही उणेपणा येऊ देऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, “हे मायबापा तुम्ही माझ्यासारख्या दीन दुबळयाचा उध्दार करण्याकरता एवढा त्रास का मानून घेत आहात ? ”
अभंग क्र. २६८१
काय तुमचिया सेवे न वेचते गांठोळी । माझी टाळाटाळी करीतसा ॥१॥
चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसे तरी सांगा निवडूनि ॥धृपद॥
कोण तुम्हा सुख असे या कौतुके । भोगिता अनेक दुःखे आह्मी ॥२॥
तुका म्हणे काय झालासी निर्गुण । आम्हा येथे कोण सोडवील ॥३॥
अर्थ
देवा तुम्ही माझी टाळाटाळ करता आणि माझा जर उध्दार तुम्ही केला तर तुमच्या पदरचे काही खर्च होणार आहे काय ? अहो चतुरांच्या राया पाडूरंगा मला यातील खरा भेद तरी निवडून सांगा. अहो देवा आम्ही अनेक प्रकारचे दु:खे भोगीत आहेत आणि हे कौतुक पाहून तुम्हाला तरी कोणत्या प्रकारचे सुख वाटते आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो देवा तुम्ही असे निर्गुण का झालात आम्हाला तुमच्यावाचून या भवसागरातून कोण सोडवील. ”
अभंग क्र. २६८२
निष्ठुर यासाठी करितो भाषण । आहेसी सर्वज्ञ जाणता तू ॥१॥
ऐसे कोण दुःख आहे निवारिता । तो मी जाऊ आता शरण त्यासी ॥धृपद॥
बैसलासी केणे करुनिया धीर । नाही येथे उरी दुसऱ्याची ॥२॥
तुका म्हणे आले अवघेच पायापे । आता मायबापे नुपेक्षावे ॥३॥
अर्थ
देवा मी तुझ्याशी इतका निष्ठूरतेने का बोलतो आहे कारण तू सर्वज्ञ आहेस. देवा तुला माझे सर्व दु:ख माहित आहे अरे मग तुझ्यावाचून येथे दुसरे कोण माझे दु:ख निवारण करीन आणि मी कोणाला शरण जाऊ तेही तूच सांग ? देवा अरे तू माझा उध्दार करण्यासाठी एवढा धीर धरुन का बसला आहेस हे काम तुझ्यावाचून इतर कोणालाही जमणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “हे मायबापा आता सर्वकाही तुझ्या पायाजवळच आले आहे आता तू माझी उपेक्षा करु नकोस. ”
अभंग क्र. २६८३
पायापासी चित्त । तेणे भेटी अखंडित ॥१॥
असे खेळे भलते ठायी । प्रेमसूत्रदोरी पायी ॥धृपद॥
केलेसे जतन । मुळी काय ते वचन ॥२॥
तुका म्हणे सर्वजाणा । ठायी विचारावे मना ॥३॥
अर्थ
देवाच्या पायाशी माझे चित्त अखंडीत आहे त्यामुळे माझी देवाशी सारखी भेट होत आहे. मी कोठेही खेळत असलो तरी प्रेमसूत्र दोरी तुझ्या पायाशीच आहे. देवा तू अर्जुनाशी जो काही संवाद केला आहे ते सर्व तुझे शब्द मी जतन केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे सर्वज्ञ पाडूरंगा आपल्या दोघामध्ये जो काही करार झाला आहे याचा विचार तू आपल्या मनाशीच कर. ”
अभंग क्र. २६८४
तुम्हा आम्हा सरी । येथे कइच्याचा परी ॥१॥
स्वामिसेवा अळंकार । नाही आवडिये थार ॥धृपद॥
खुंटलिया वाचा । मग हा आनंद कइचा ॥२॥
तुका म्हणे कोडे । आम्ही नाचो तुज पुढे ॥३॥
अर्थ
देवा तू आणि मी जर एकरुप झालो तर तेथे आपल्या दोघामधील स्वामी आणि सेवक हा भेद कसा राहील ? देवा आपल्यामधील जर व्दैत संपले तर कसे होईल कारण परमार्थामध्ये खरा अलंकार म्हणजे स्वामीची सेवा करणे होय आणि अव्दैत स्थितीत या आवडीला तर थाराच नाही. देवा आपल्यातील व्दैत जर संपला तर तेथे वाचा कुंठीत होईल म्हणजे दोघाचेही स्वरुप एक झाल्यावर वाचेव्दारे काहीच बोलता येणार नाही मग तेथे भक्तीचा आनंद कसा राहील ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आपल्यातील भेद नाहीसा होऊच नये मग आम्ही तुझ्यापुढे कोड कौतुकाने आनंदाने नाचू. ”
अभंग क्र. २६८५
कैचे भांडवल खरा हाती भाव । कळवळ्याने भाव दावीतसे ॥१॥
आता माझा अंत नको सर्वजाणा । पाहो नारायणा निवडूनि ॥धृपद॥
संतांचे उच्छिष्ट मागितले पंगती । करावे संगती लागे ऐसे ॥२॥
तुका म्हणे आलो दावूनि विश्वास । संचित ते नास पावे ऐसे ॥३॥
अर्थ
देवा माझ्या हातात कसले श्रध्देचे आणि तुझ्याविषयी खर्या भक्तीभाव भांडवल आहे मी केवळ कळवळयाने तुझी भक्ती करण्याचे आव जगाला दाखवित आहे. हे नारायणा सर्व जाणत्या तुला सर्वच माहित आहे मी हे ढोंग करतो आहे हे तुझ्या जरी लक्षात आले तरी तू माझा अव्हेर करु नकोस आणि माझा अंत पाहू नकोस. हे नारायणा संतांचे उच्चिष्ट राहिलेले भोजन मी मागच्या पंगतीत बसून सेवन करीन आणि त्यांची संगती मला लाभेल असेच काहीतरी तू कर. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मी लोकांमध्ये असा विश्वास दाखवून आलो आहे की तुझी भक्ती केल्याने सर्व संचित कर्मे नाश पावतात. ”
अभंग क्र. २६८६
थोडे तुम्ही मागे होते उद्धरिले । मज ऐसे गेले वाया जीव ॥१॥
आता याचा काही न मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तू ॥धृपद॥
तुज आळविता पापाची वसति । राहे अंगी किती बळ त्याचे ॥२॥
तुका म्हणे जैसे तारिले दगड । तैसा मी ही जड एक देवा ॥३॥
अर्थ
देवा मागे तुम्ही माझ्यासारखे वाया गेलेले कितीतरी भक्तांचा उध्दार केला ते थोडे आहेत काय ? तू आता याचा काहीही भार मानून घेऊ नयेस तू कृपेचा सागर आहेस. देवा तुला आळवल्यानंतर माझ्या अंत:करणात पाप तरी राहील काय कारण तुझ्या बाळापुढे त्याचे बळ तरी कितीसे आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तुम्ही राम अवतारामधे कितीतरी जड दगड तारले आहेत त्या दगडांपैकीच मी ही एक आहे असे समजा व माझा उध्दार करा. ”
अभंग क्र. २६८७
आम्ही म्हणो कोणी नाही तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥
हागे माझ्या भोगे केलासी परता । विश्वंभरी सत्ता नाही ऐसी ॥धृपद॥
आम्ही तुज असो देऊनि आधार । नाम वारंवार उच्चारितो ॥२॥
तुका म्हणे मज धरियेले काळे । पंचभूती खळे करूनिया ॥३॥
अर्थ
हे पाडूरंगा तुझे कोणतेही काम असले ते तू करताना तुला कुणी आडवे येऊ शकत नाही कारण तू सर्व समर्थ आहे असेच आम्ही आतापर्यंत म्हणत आलो आहे परंतू तू तर भित्रा दिसतो आहेस. हे पाडूरंगा तुला माझ्या प्रारब्धानेच मागे सारले आहे तुझे नांव जरी विश्वंभर असले तरी ती सत्ता आता तुझ्या हातात राहीली नाही असेच दिसते. देवा अरे आम्हीच तुला आधार देत आहोत आणि तुझे नाम वारंवार उच्चारीत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला पंचभूतांनी वेढा घातला असून त्यांनी मला काळाच्या हवाली केले आहे तरी तू तुझे शौर्य दाखवून मला यातून कृपा करुन सोडव. ”
अभंग क्र. २६८८
आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती । यावे काकुलती यासी आता ॥१॥
ऐसा माझ्या मने सांगितला भाव । तोंवरीच देव दुजा नाही ॥धृपद॥
अवघियांची जेव्हा सारावी करकर । भावबळे थार धरू येसी ॥२॥
तुका म्हणे तुज ठेवावे पुजून । आणीक तो गुण नाही येथे ॥३॥
अर्थ
सर्व काही प्रारब्धाच्या हातात आहे म्हणूनच या देवाने आता काकूळतीला यावे. असा उपाय माझ्या मनाने मला सांगितला आहे व असे केले तरच देव आपल्यापेक्षा वेगळा होणार नाही. देवा ज्यावेळी आम्ही सर्व प्रपंचाची कटकट बाजूला सारु त्यावेळीच तुझ्याजवळ आम्ही भक्तीभावाने आश्रय धरु. तुकाराम महाराज म्हणतात, “तुझी प्राप्ती करुन घेण्यासाठी तुला पूजावे लागेल तुझी भक्ती करावी लागेल येथे यावाचून दुसरा कोणताही उपाय चालणार नाही. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















