
१६ मार्च, दिवस ७५ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ७ वा, ओवी २६ ते ५० सार्थ तुकाराम गाथा अभंग ८८९ ते ९००
“१६ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 16 March
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १६ मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ८८९ ते ९०० चे पारायण आपण करणार आहोत.
१६ मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी २६ ते ५०,
26-7
जे आंखूनि नाणे विस्तारी । पाठी तयांची आटणी करी । माजी कर्माकर्माचिया व्यवहारी । प्रवर्तु दावी ॥26॥
ती नाण्यांवर खुणा करून त्यांचा विस्तार करिते, व मागाहून त्यांची आटणी करिते; अशा प्रकारे कर्माकर्माप्रमाणे घडामोड करण्याची मायेची प्रवृत्ती आहे.
27-7
हे रूपक परी असो । सांगो उघड जैसे परियेसो । तरी नामरूपाचा अतिसो । प्रकृतीच कीजे ॥27॥
हे रुपक असो; तुला समजेल अशा उघड रीतीने सांगावयाचे म्हटले, तर ही प्रकृतीच प्राण्यांच्या नामरुपांचा विस्तार करते.
28-7
आणि प्रकृति तव माझा ठायी । बिंबे येथ आन नाही । म्हणोनि आदि मध्य अवसान पाही । जगासि मी ॥28॥
आणि प्रकृती तर निःसंशय माझ्याच ठायी बिंबते; अर्थात् जगाची उत्पत्ति, स्थिती व लय यास मीच कारण आहे.
मत्त: परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनंजय ।
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥7. 7॥
29-7
हे रोहिणीचे जळ । तयाचे पाहाता येइजे मूळ । तै रश्मि नव्हती केवळ । होय तो भानु ॥29॥
हे दृश्य विश्व मृगजळासारखे आहे ! मृगजळाचे मूळ पांहू गेले असता ते केवळ सूर्यकिरण नसून सूर्यच होय.
30-7
तयाचिपरी किरीटी । इया प्रकृती जालिये सृष्टी । जै उपसंहरूनि कीजेल ठी । तै मीचि आहे ॥30॥
त्याचप्रमाणे, अर्जुना जिच्यापासून ही सृष्टी झाली आहे, ती प्रकृति आणि सृष्टी यांचा उपसंहार करुन (यांना वजा करून) पाहिले तर अवशिष्ट तत्त्व मीच आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
31-7
ऐसे होय दिसे न दिसे । हे मजचि माजीवडे असे । मिया विश्व धरिजे जैसे । सूत्रे मणि ॥31॥
अशा प्रकारे, जे उत्पन्न होते, दिसते व नाहीसे होते, ते माझ्याच ठिकाणी होते. ज्याप्रमाणे दोऱ्याने मणि धरलेले असतात, त्याप्रमाणे मी हे विश्व धरले आहे.
32-7
सुवर्णाचे मणी केले । ते सोनियाचा सुती वोविले । तैसे म्या जग धरिले । सबाह्याभ्यंतरी ॥32॥
त्याप्रमाणे मी हे विश्व धरले आहे. सोन्याचे मणि करून ते सोन्याच्याच तारेत ओवावे, त्याप्रमाणे हे सर्व जग अंतर्बाह्य मीच व्यापले आहे.
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: ।
प्रणव: सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ॥7. 8॥
पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥7. 9॥
33-7
म्हणोनि उदकी रसु । का पवनी जो स्पर्शु । शशिसूर्यी जो प्रकाशु । तो मीचि जाण ॥33॥
म्हणून, पाण्यात जो रस आहे, किंवा वाऱ्यात जो स्पर्श आहे, आणि चंद्र व सुर्य यांच्यात जो प्रकाश आहे, तो मीच आहे असे समज
34-7
तैसाचि नैसर्गिकु शुद्धु । मी पृथ्वीचा ठायी गंधु । गगनी मी शब्दु । वेदी प्रणवु ॥34॥
त्याचप्रमाणे, पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतः असणारा जो सुवास, तो मी; आकाशात शब्द म्हणून जो आहे, तो मी; तसेच वेदात ॐकार म्हणून जो आहे, तो मी.
35-7
नराचा ठायी नरत्व । जे अहंभाविये सत्त्व । ते पौरुष मी हे तत्त्व । बोलिजत असे ॥35॥
मनुष्याच्या ठिकाणी असणारा मनुष्यपणा – जो अहंभावाचे सत्त्व आहे – ते पौरुष मी, हे तत्त्व तुला सांगून ठेवतो
36-7
अग्नी ऐसे आहाच । तेजा नामाचे आहे कवच । ते परौते केलिया साच । निजतेज ते मी ॥36॥
तेजाला अग्नि या नांवाचे जे उगीच पांघरूण आहे, ते दूर केले असता त्यांचे खरे स्वरुप ते मी;
37-7
आणि नानाविध योनि । जन्मोनि भूते त्रिभुवनी । वर्तते आहाति जीवनी । आपुलाला ॥37॥
आणि या त्रिभुवनात प्राणी पुष्कळ प्रकारच्या जातीत जन्म घेऊन आपआपल्या जातीच्या अनुरोधाने अन्नादि जीवनाने जीवन पावतात.
38-7
एके पवनेचि पीती । एके तृणास्तव जीती । एके अन्नाधारे राहती । जळे एके ॥38॥
कोणी वारा पिऊन असतात, कोणी गवतावर उपजीवीका करतात; कोणी अन्नावर राहतात, आणि कोणी पाण्यावर आपले उपजीवन करता
39-7
ऐसे भूताप्रति आनान । जे प्रकृतिवशे दिसे जीवन । ते आघवा ठायी अभिन्न । मीचि एक ॥39॥
असे प्रत्येक प्राण्याचे त्याच्या प्रकृतीच्या मानाने जे निरनिराळे जीवन दिसते, ते सर्व मीच आहे.
बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥7. 10॥
बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।
धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥7. 11॥
40-7
पै आदिचेनि अवसरे । विरूढे गगनाचेनि अंकुरे । जे अंती गिळी अक्षरे । प्रणवपटींची ॥40॥
खरोखर, उत्पत्तीचे वेळी जे आकाशाच्या अंकुराने विस्तार पावते आणि जे अंतकाली ॐकाराची अक्षरे गिळून टाकते;
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
41-7
जव हा विश्वाकार असे । तव जे विश्वाचिसारखे दिसे । मगमहाप्रळयदशे । कैसेही नव्हे ॥41॥
जोपर्यत या जगाला आकार आहे, तोपर्यंत जे त्याच्यासारखेच दिसते. परंतु महाप्रलयाचे वेळेस ते कोणत्याही आकाराचे नसते;
42-7
ऐसे अनादि जे सहज । ते मी गा विश्वबीज । हे हातातळी तुज । देइजत असे ॥42॥
असे जे ह्या जगाचे अनादि व स्वतःसिद्ध बीज, ते मी आहे; ते आज अगदी तुझ्या हातात देत आहे.
43-7
मग उघड करूनि पांडवा । जै हे आणिसील सांख्याचिया गावा । तै ययाचा उपेगु बरवा । देखसील ॥43॥
मग अर्जुना, ते समजून घेऊन जर तू त्याचा विचार करशील, तर त्याचा उपयोग कसा चांगला होईल तो पहाशील.
44-7
परी हे अप्रासंगिक आलाप । आता असतु न बोलो संक्षेप । जाण तपियांचा ठायी तप । ते स्वरूप माझे ॥44॥
परंतु आता हे अप्रासंगिक बोलणे बाजुला राहू दे; तुला मी आपला संक्षेपाने सांगतो :- हे पहा की, तपस्व्यांचे ठायी तप म्हणून जे आहे, ते माझे रुप होय.
45-7
बळियांमाजी बळ । ते मी जाणे अढळ । बुद्धिमंती केवळ । बुद्धि ते मी ॥45॥
बलवानांत बल म्हणून जे आहे ते मी असे निःसंशय समज, आणि बुद्धिमंताना बुद्धि म्हणून जी आहे ती मी.
46-7
भूतांचा ठायी कामु । तो मी म्हणे आत्मारामु । जेणे अर्थास्तव धर्मु । थोरू होय ॥46॥
श्रीकृष्ण म्हणतात :- ज्याच्या आचरणापासून धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात, तो प्राणिमात्राचे ठिकाणी असणारा काम मी.
47-7
येऱ्हवी विकाराचेनि पैसे । करी कीर इंद्रियांचेयाचि ऐसे । परी धर्मासि वेखासे । जावो नेदी ॥47॥
येरवी, विकार उत्पन्न होऊन इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे जरी आचरण केले, तरी तो काम धर्माविरूद्ध जाऊ देत नाही.
48-7
जे अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा । तेवीचि नियमाचा दिवटा । सवे चाले ॥48॥
तो काम निषेधाची आडवाट सोडुन विधीच्या वाटेने नीट जातो; आणि त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर नियमरूप मशाल पेटलेली असते.
49-7
कामु ऐशिया वोजा प्रवर्ते । म्हणोनि धर्मासि होय पुरते । मोक्षतीर्थींचे मुक्ते । संसारु भोगी ॥49॥
अशा रीतीने हा काम चालतो, म्हणून धर्माचे आचरण पूर्ण होते; व त्यामुळे संसारात राहणाराला मोक्षरूपी तीर्थात मुक्ति प्राप्त होते.
50-7
जो श्रुतिगौरवाचा मांडवी । कामसृष्टीचा वेलु वाढवी । जव कर्मफळेसी पालवी । अपवर्गी टेके ॥50॥
तो काम वेदाच्या महत्वरूपी मांडवावर कर्मफलांची पाने मोक्षाला लागत तोपर्यंत सृष्टीचा वेल वाढवितो.
दिवस ७५ वा, १६, मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ८८९ ते ९००
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. ८८९
कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगे पतन ॥१॥
भलत्या काळे नामावळी । सुलभ भोळी भाविका ॥धृपद॥
प्रायिश्चत्ते पडती पाया । गाती तया वैष्णवा ॥२॥
तुका म्हणे नुपजे दोष । करा घोष आनंदे ॥३॥
अर्थ
वेदोक्त कर्म जर निट आपल्या हातून झाले नाही काही उणीव राहिल्यास कर्ता पतित होत असतो. परंतु जर आपण हरी नाम केंव्हाही घेतले कधीही घेतले व कसे हि घेतले तरी त्याचा दोष लागत नाही. कायम स्वरूपी हरीनाम घेणाऱ्याच्या प्रायश्चीत्ये सुद्धा पाया पडतात. तुकाराम महाराज म्हणतात हरीनाम घोष करताना आनंदाने करावे तेथे कुठल्याही प्रकारचा दोष उत्पन्न होणार नाही.
अभंग क्र. ८९०
पाहा रे हे दैवत कैसे । भक्तीपिसे भाविका ॥१॥
पाचारिल्या सरिसे पावे । ऐसे सेवे बराडी ॥धृपद॥
शुष्क काष्ठी गुरुगुरी । लाज हरी न धरीता ॥२॥
तुका म्हणे अर्धनारी । ऐसी धरी रूपडी हा ॥३॥
अर्थ
अहो पहा ओ पहा हे आमचे दैवत कसे आहे ? ते भक्ती वश झालेले आहे. कोणीही त्याला हाक मारली त्याला बोलावले कि तो लगेच धावत येतो. अहो प्रल्हादासाठी या हरीने शुष्क खांबातून नरसिंह रुपात गुरगुर करून प्रकट होण्यास लाज धरली नाही. तुकाराम महाराज म्हणतात की, हा देव भक्तांच्य सहाय्यास कधी नर तर कधी नारीचे रूप घेतो व तत्परतेने धावत येतो.
अभंग क्र. ८९१
बहुत सोसिले मागे न कळता । पुढती काय आता अंध व्हावे ॥१॥
एकाचिये अंगी हे ठेवावे लावून । नये भिन्ना भिन्न चांचपडो ॥धृपद॥
कोण होईल तो ब्रम्हांडचाळक । आपणेचि हाक देईल हाके ॥२॥
तुका म्हणे दिली चेतवूनि सुणी । कौतुकावाचूनि नाही छळ ॥३॥
अर्थ
आम्ही अज्ञानामुळे अनेक दुखे भोगली पण आता पुढे आंधळे पणाने का राहावे ? जे काही सुख दुख असतील ते या हरीला अर्पण करून इतर काही खट पट करू नये. या विश्वाचा ब्रम्हांडाचा चालक जो कोणी असेल त्याला हाक मारली असता तोच ओ देईल. तुकाराम महाराज म्हणतात काम क्रोध रुपी कुत्री या देवाने आपल्या मागे चेतवून दिले आहेत आणि हे देवाचेच कवतुक आहे.
अभंग क्र. ८९२
आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचे । कैचे दिले साचे करोनिया ॥१॥
दुजियासी तव अकळ हा भाव । कराया तो जीव साक्षी येथ ॥धृपद॥
एकी अनेकत्व अनेकी एकत्व । प्रकृतिस्वभावत्व प्रमाणेचि ॥२॥
तुका म्हणे करू उगवू जाणसी । कुशळ येविशी तुम्ही देवा ॥३॥
अर्थ
या देवाचे खरोखर कौतुक वाटते कारण त्याने नसत्या छंदात या जीवाला टाकले आहे जीव हा मिथ्या असून सर्वाना तो खरा वाटतो या भ्रमात देवाने टाकले आहे. हा भ्रम कसा होतो ते दुसऱ्याला कळत नाही हा मोह न धरता जीवाने साक्षित्वाने राहावे. या हरीच्या ठिकाणी नामात्मक रूपाचा भास होतो व तो आपल्याला एकत्वाने भासतो याचे कारण म्हणजे प्रकृती स्वभाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारचा गुंता करण्या विषयी आणि सोडविण्या विषयी तुम्ही मोठे कुशल आहात देवा.
अभंग क्र. ८९३
अस्त नाही आता एकचि मोहोरा । पासूनि अंधारा दुरि जालो ॥१॥
साक्षत्वे या जालो गुणाचा देखणा । करी नारायणा तरी खरे ॥धृपद॥
आठवू विसरु पडियेला मागे । आले तेचि भागे यत्न केले ॥२॥
तुका म्हणे माझा विनोद देवासी । आम्ही तुम्हा ऐसी दोन्ही नव्हो ॥३॥
अर्थ
आत्म ठिकाणी जो मी ब्रम्ह आहे या प्रकाशाचा उदय झाला आहे त्याला आता अस्त नाही. त्यामुळे आम्ही अज्ञानाच्या अंधःकारा पासुण वेगळे झालो आहोत. आत्म स्थितीने आम्ही साक्षी झालो आहोत त्यामुळे हे त्रिगुण आम्हाला दिसू लागले आहेत आणि हाच बोध आमच्या ठिकाणी दृढ कर. तुझेच स्मरण केल्यामुळे या प्रपंचाचा विसर पडला आहे आम्हाला जे काही ज्ञान झाले याचे आम्ही यत्न्य पूर्वक सांभाळ केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात आता या हरीशी माझे विनोदाने संभाषण चालते की, आता जीव व शिव या दोन्ही पासून आम्ही वेगळे झालो आहोत अगदी तुझ्याच सारखे.
अभंग क्र. ८९४
क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयाने जग दुरी धरा ॥१॥
तैसे आम्ही नेणो पालटोचि काही । त्यागिल्याची नाही मागे चाड ॥धृपद॥
प्रतिपादिता तू समविषमाचा । प्रसाद तो याचा पापपुण्य ॥२॥
तुका म्हणे तुम्हा नाना अवगुणी । लागे संपादणी लटिक्याची ॥३॥
अर्थ
हे देवा क्षर आणि अक्षर म्हणजे जीव आणि माया हे तुमचेच विभाग आहेत मग तुम्ही जगाला आपल्या पासून भिन्न का ठेवता ? असे जरी असले तरी आमचा जीव भाव तुम्ही स्वीकारा व आमच्या वस्तुस्थित आम्ही बदल होऊ देणार नाही पाप आणि पुण्य हे प्रतिपादन तुमचेच आहे आणि हा तुझाच खेळ आहे. असे असून जीवाला जन्म मरणाच्या फेर्यात का ठेवले हे ? तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही नाना प्रकारचे सोंग घेऊन तुम्ही खोट्याचे खरे भास्विता म्हणजे मिथ्या असलेले खरे भासवीता
अभंग क्र. ८९५
सर्वरसी मीनले चित्त । अखंडित आनंदु ॥१॥
गोत पति विश्वंभरी । जाला हरी सोयरा ॥धृपद॥
वोळखी ते एका नावे । इतरवाव खंडणा ॥२॥
तुका म्हणे नावे रूपे । दुसरी पापे हरपली ॥३॥
अर्थ
हरी रसात माझे मन रमले आहे त्यामुळे मला अखंड आंनद प्राप्त होतो. आमचे सर्व गोत्रज सर्व संबंधी हे हरिरूप झाले आहे. एक विथोबाचीच आम्हाला ओळख झाली आहे इतर विषयी आमची भावना नाहीशी झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात नांव व रूप हे एक प्रकारचे भ्रम आहे व त्यापासून पापच होते व आता ती पापे हरपली.
अभंग क्र. ८९६
मी हे ऐसे काय जाती । अवघड किती पाहाता ॥१॥
नाही होत उल्लंघन । नसता भिन्न दुसरे ॥धृपद॥
अंधाराने तेज नेले । दृष्टीखाले अंतर ॥२॥
तुका म्हणे सवे देव । घेता ठाव दावील ॥३॥
अर्थ
खरे म्हणजे देहाला मी म्हणणे किती अवघड आहे ? खरे पहिले तर आपल्या वाचून म्हणजे आपल्या मूळस्वरूपा वाचून काहीच नाही पण उगाचच देहाच्या ठिकाणी मी पणा येतो. असे भासल्यामुळे काय होते तर देहाच्या ठिकाणी अहंकाराच अंधार वाढतो व त्यामुळे मूळ स्थितीचा प्रकाश नाहीसा होतो व आपली आत्म दृष्टी आंधळी होते. तुकाराम महाराज म्हणतात जर देवाने आपल्याला जवळ घेतले तर तो आपल्याला आपल्या आत्म्स्थितीचे स्थान तो नक्की दाखवील.
अभंग क्र. ८९७
कवीश्वरांचा तो आम्हासी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥१॥
दंभाचे आवडी बहिरट अंधळे । सेवटासि काळे होईल तोंड ॥धृपद॥
सोन्यासेजारी तो लाखेची जतन । सतत ते गुण जैसे तैसे ॥२॥
सेव्य सेवकता न पडता ठावी । तुका म्हणे गोवी पावती ही ॥३॥
अर्थ
स्वार्था साठी किविता करणाऱ्यांचा तुकाराम महाराजांना राग येतो ते म्हणतात आम्हाला त्यांचा विटाळ आहे कारण असे जे कवी आहे ते दुसऱ्याचे काव्य चोरून काव्य करतात व ते काव्य त्यांनी केले असे भासवितात. दंभाची आवड असणाऱ्या बाहीरट मूर्ख व आंधळ्यांचे शेवटी तोंड काळेच होते. सोन्याच्या वस्तूंना लाखेच बंध असतो परंतु लाखेमुळे जरी सोन्याचे रक्षण होत असले तरी लाखेची मूळ जी स्तिती आहे ती तशीच राहते. तुकाराम महाराज म्हणतात जो पर्यंत आपल्याला स्वामी आणि सेवक या मधील फरक जो पर्यंत कळणार नाही तो पर्यंत आपल्याला बंधनातच राहावा लागेल.
अभंग क्र. ८९८
वाढलिया मान न मनावी निश्चिंती । भूताचिये प्रीती भूतपण ॥१॥
म्हणऊनि मना लावावी कांचणी । इंद्रियांचे झणी ओढी भरे ॥धृपद॥
एका एकपणे एकाचिया अंगी । लागे रंग रंगी मिळलिया ॥२॥
तुका म्हणे देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणांचा ॥३॥
अर्थ
लोकांमध्ये आपला मान वाढला असेल तर त्यात समाधान माणू नये कारण भौतिक मान्यतेने भौतीकच जन्म मिळेल म्हणून मनाला हरी भजनाची आवड लावावी नाहीतर मन हे इंद्रिया मागोमाग बहिर्मुख होईल. मनाला हरी स्वरूपा कडे तल्लीन करावे नाहीतर मन हे असे इंद्रिय आहे की, ते ज्या रंगा कडे ते लागले तो रंग ते धरण करतो. तुकाराम महाराज म्हणतात हा देव निष्काम आहे निराळा आहे पण मात्र आपला जीव कर्मा मागे धावण्यास प्रयत्न करत असतो.
अभंग क्र. ८९९
माया साक्षी आम्ही नेणो भीड भार । आप आणि पर नाही दोन्ही ॥१॥
सत्याचिये साठी अवघाचि भरे । नावडे व्यापार तुटीचा तो ॥धृपद॥
पोंभाळिता चरे अंतरीचे दुःख । लांसे फांसे मुख उघडावे ॥२॥
तुका म्हणे नव्हे स्फीतीचा हा ठाव । निवाड्यासी देव साक्षी केला ॥३॥
अर्थ
आम्ही ब्रम्ह दृष्टीने पाहतो कि हा संसार माया ने भरलेला आहे त्यामुळे आम्हाला त्याची भिड नाही हा आपला आणि हा परका असा भेद नाही. आमचा सत्य कर्मा साठी आमचा भर असतो व अन्य कोणत्याही नुसकानीचे व्यापार आम्ही करत नाही व ते आम्हाला चालतही नाही. जसे गळू झाले तर त्याला गोंजारून चालत नाही ते बाहेरू वाढले कि ते आतून हि वाढते त्यामुळे त्याला कापवेच लागते तसेच लोकांनाही जास्त गोंजारून चालत नाही त्यांच्या हिताकर्ता आम्हाला स्पष्ट बोलावेच लागते. तुकाराम महाराज म्हणतात हिगोष्ट फक्त आम्ही वरवर नाही बोलत तर याचा साक्षी प्रत्येक्ष परमात्मा आहे देवाने जो निवडा केला आहे त्याचीच साक्ष घेऊन आम्ही बोलत आहोत.
अभंग क्र. ९००
संता आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचे बाळ जेवी समर्थ ॥१॥
परिसत्ता तेथे नाही एकविणे । मोहे न पवे सीण ऐसे राखे ॥धृपद॥
केले अन्याय ते सांडवी उपचारे । न देखे दुसरे नाशा मूळ ॥२॥
तुका म्हणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाही दया तये ठायी ॥३॥
अर्थ
जो संतांना आवडतो तो काळाचाही काळ असतो राजा ज्या प्रमाणे समर्थ असतो त्याप्रमाणे त्याचे बाळ हि समर्थ असते त्या बालकावर राजाचीच सता असते व त्या बालकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या साठी राजा कायम प्रयत्न करत असतो. जर त्या बालकाने काही अन्याय केले तर राजा त्या बालकाला समजून सांगतो व पुन्हा असा कुठल्याहि प्रकारचा अन्याय त्याच्या हातून होणार नाही याची काळजी तो घेत असतो त्याचा कुठल्याही प्रकारच घात होणार नाही असे राजा करत नाहि. तुकाराम महाराज म्हणतात कल्पतरूची छाया अत्यंत शीतल असते त्या प्रमाणे संतही निर्मळ व दया वंत असतात.
सार्थ तुकाराम गाथा ८०१ ते ९०० समाप्त
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















