3 मार्च, दिवस ६२ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी २०१ ते २२५ + सार्थ तुकाराम गाथा अभंग ७३३ ते ७४४

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

“३ मार्च” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 3 March
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक 3 मार्च असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ७३३ ते ७४४ चे पारायण आपण करणार आहोत.


3 मार्च, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा, ओवी XXX ते XXX,

201-6
तव करसंपुट आपैसे । वाम चरणी बैसे । तव बाहुमुळी दिसे । थोरवी आली ॥201॥
नंतर सहजच डाव्या पायावर दोन्ही हात द्रोणाकर करून ठेवाव्यात. त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात.
202-6
माजी उभारलेनि दंडे । शिरकमळ होय गाढे । नेत्रद्वारीची कवाडे । लागू पहाती ॥202॥
उंचावलेल्या दंडाकार खांद्यामुळे शिरकमल दोन्ही खांद्यात घट्ट राहते. मग डोळ्यांच्या पापण्या हळूहळू मिटू लागतात.
203-6
वरचिले पाती ढळती । तळीची तळी पुंजाळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥203॥
वरची पापणी खाली येते व खालची पापणी खालीच विकसित होते. त्यावेळी डोळ्यांची अर्धी उघडलेली व अर्धी मिलेली अशी दृष्टी होते.
204-6
दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडे । ते ठायी ठावो पडे । नासाग्रपीठी ॥204॥
दृष्टी ही आतल्याआत अंतर्मुख होऊनही स्वतःच्या इच्छेने बाहेर पाऊल टाकते आणि नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते.
205-6
ऐसे आंतुच्या आंतुचि रचे । बाहेरी मागुते न वचे । म्हणौनि राहणे आधिये दिठीचे । तेथेचि होय ॥205॥
अर्धोन्मीलित स्थितीमध्ये दृष्टी आतच राहते, ती पुनः बाहेर येत नाही; म्हणून अर्धीच दृष्टी नाकाच्या शेंड्याच्या ठिकाणी स्थिर राहते.

206-6
आता दिशांचि भेटी घ्यावी । का रुपाची वाट पहावी । हे चाड सरे आघवी । आपैसया ॥206॥
आता दिशांची भेट घ्यावी म्हणजे चोहीकडे पाहावे अथवा रूपाची वाट पहावी, रूप या विषयाकडे धाव घ्यावी, ही इच्छा सहजच नाहीशी होते.
207-6
मग कंठनाळ आटे । हनुवटी हे हडौति दाटे । ते गाढी होऊनि नेहटे । वक्षःस्थळी ॥207॥
मग कंठ संकुचित होत जातो. हनुवटी कंठच्या हाडांवर घट्ट बसते. ती जादा बळकट होऊन छातीवर दाब येतो.
208-6
माजी घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥208॥
हे अर्जुना ! त्या हनुवाटीच्या खाली गळ्याची घाटी दिसेनाशी होते. अशा प्रकारे हानुवाटीचा गळ्यावर जो बंध निर्माण होतो, त्याला जालंधरबंध असे म्हणतात.
209-6
नाभीवरी पोखे । उदर हे थोके । अंतरी फाके । हृदयकोशु ॥209॥
वोढियाना बंध बेंबीवर पुष्ट होतो. पोट खपाटीला जाऊन छोटे होते आणि हृद्यकमल आतमध्ये विकसित होते.
210-6
स्वाधिष्ठानावरिचिले कांठी । नाभीस्थानातळवटी । बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो ॥210॥
यामुळे स्वाधिष्ठानचक्राच्या वरच्या बाजूला आणि बेंबीच्या खालच्या भागाला बंध पडतो, त्याला वोढीयानबंध असे म्हणतात.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः ।
मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥6. 14॥
भावार्थ :-

योगी पुरुषाने अंतःकरण प्रसन्न ठेऊन, निर्भय होऊन ब्रम्हचर्य व्रताचे पालन करावे आणि मनाचे संयमन करून माझे चिंतन करीत मत्परायन होऊन (आसनावर बसावे) राहावे.

211-6
ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पांखर पडे । तव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥211॥
अशा प्रकाराने शरीराच्या बाहेर योग- अभ्यासाची छाया पसरते, त्यावेळी आतील मनाच्या चंचलतेच्या संस्काराचा जोर नाहीसा होतो,
212-6
कल्पना निमे । प्रवृत्ती शमे । आंग मन विरमे । सावियाचि ॥212॥
कल्पना नाहीशी होऊन जाते, बाह्य विषयाकडे धावणाऱ्या मनाची हाव थांबते आणि शरीर आणि मन सहजच शांत होते.
213-6
क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली । हे आठवणही हारपली । न दिसे वेगा ॥213॥
भुकेचे काय झाले ? झोप कोठे निघून गेली ? याची आठ्वनदेखील नाहीशी होऊन जाते. त्याचा वेग दिसतदेखील नाही.
214-6
जो मुळबंधे कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेचि वरी सांकडला । फुगु धरी ॥214॥
मूळ बंधाने कोंडलेला अपान वायू ऊर्ध्व गतीने माघारी फिरतो आणि सहजच अवघडलेला होऊन वर फुगू लागतो.
215-6
क्षोभलेपणे माजे । उवाइला ठायी गाजे । मणिपुरेसी झुंजे । राहोनिया ॥215॥
तो अपानवायू क्षोभुन बलशाही होतो आणि अडकलेल्या ठिकाणी मोठ्याने आवाज करतो. तेथेच राहून तो मणिपूरचक्राला धक्के देतो.

216-6
मग थांवली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी । बाळपणीची कुहीटुळी । बाहेर घाली ॥216॥
अशा तऱ्हेने बळावलेली वावटळ पोटात चोहीकडे फिरून ढवळाढवळ करते आणि बालपणापासून शरीरात साचलेली कुजकी घाण बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते.
217-6
भीतरी वळी न धरे । कोठ्यामाजी संचरे । कफपित्ताचे थारे । उरो नेदी ॥217॥
त्या अपानवायूला आत वळण घेण्यास कोठे जागा नसल्यामुळे तो कोठ्यात शिरतो वात, पित्त यांचा थारा राहून देत नाही.
218-6
धांतुचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥218॥
तो वायू सप्त धातूंची स्थाने ओलांडतो, मेदाचे पर्वत फोडून टाकतो आणि देहमध्ये हाडांत असलेली मज्जा ओरपुन बाहेर काढतो.
219-6
नाडीते सोडवी । गात्रांते विघडवी । साधकांते भेडसावी । परि बिहावे ना ॥219॥
तो नाड्यांच्या गाठी सोडुवून टाकतो, अवयव शिथिल करतो आणि साधकाला भीती दाखवतो, परंतु साधकाने भिऊ नये.
220-6
व्याधीते दावी । सवेचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥220॥
तो वायू शरीरात अचानक रोग निर्माण करतो आणि ताबडतोब नाहीसा करतो, शरीरातील पृथ्वी व पाण्याचे अंश एकमेकांत कालवितो.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

221-6
तव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ती करी उजगरा । कुंडलिनीते ॥221॥
हे अर्जुना ! ! त्यावेळी दुसरीकडे वज्रसनामुळे निर्माण झालेली शरीरातील उष्णता ही कुंडलिनी नावाच्या प्राणशक्तीला जागृत करते.
222-6
नागाचे पिले । कुंकुमे नाहले । वळण घेऊनि आले । सेजे जैसे ॥222॥
नागिनीच्या पिलाला कुंकवाने स्नान घातल्यावर ते ज्याप्रमाणे वेटोळे घालून निजते,
223-6
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥223॥
त्याप्रमाणे ती कुंडलिनी लहानसे साडेतीन वेढे घालून खाली तोंड करून सर्पाप्रमाणे झोपी गेलेली असते.
224-6
विद्युलतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोटीव जैशी ॥224॥
ती कुंडलिनी म्हणजे जणू काय वाटोळी कडी, अग्नीच्या ज्वालांची घडी अथवा शुद्ध सोन्याची आटवून तयार केलेली चकचकित लगड होय.
225-6
तैसी सुबध्द आटली । पुटी होती दाटली । ते वज्रासने चिमुटली । सावधु होय ॥225॥
त्याप्रमाणे ती पद्धतशीर संकुचित झालेली, नाभिजवळच्या संकुचित जागेत दातून बसलेली असते, ती वज्रसनामुळे चिमटली जाते आणि जागृत होते.

दिवस ६२ वा, ३ मार्च
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ७३३ ते ७४४
सार्थ तुकाराम गाथा पारायण
अभंग गाथा, संत तुकाराम महाराज / सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. ७३३
मूळ करण सत्ता । नाही मिळत उचिता ॥१॥
घडे कासयाने सेवा । सांग ब्रम्हांडाच्या जीवा ॥धृपद॥
सागर सागरी । सामावेसी कैची थोरी ॥२॥
तुका म्हणे भावे । शरण म्हणविता बरवे ॥३॥
अर्थ

सर्व जगताचे मूळ स्वरूप म्हणजे निर्गुण स्थिती आहे तेथे देवा तुझी योग्य सेवा करण्यास मिळत नाही. तुझी सेवा कशी घडेल तेवढे हे ब्रम्हांडनायका तू मला सांग ? सागरामध्ये दुसरा सागर समावत नसतो तसे आपणही ब्रम्हरूप झाल्यावर कशी सेवा होईल तेवढे तू सांग ? हे हरी आम्ही द्वैत ठेऊन च तुला शरण आलो आहे हेच म्हणणे बरे वाटते.
अभंग क्र. ७३४
बरवी नामावळी । तुझी महादोषा होळी ॥१॥
जाले आम्हासी जीवन । धणीवरी हे सेवन ॥धृपद॥
सोपे आणि गोड । किती अमृताही वाढ ॥२॥
तुका म्हणे अच्युता । आमुचा कल्पतरु दाता ॥३॥
अर्थ

हे देवा तुझी नामवळी बरवी आहे म्हणजे बरी आहे कारण ती सर्व महादोषाची होळी करते. आम्ही जो पर्यंत आहोत तो पर्यंत आम्ही ती नामावळी सेवन कारणार आहोत कारण ते आमचे जीवनच झाले आहे. ती अतिशय सोपी व अमृता पेक्षाही गोड आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे केशवा हे, अच्चुता कल्पतरू प्रमाणे तू आमचा दाता आहे.
अभंग क्र. ७३५
तृषाकाळी उदक भेटी । पडे मिठी आवडीची ॥१॥
ऐसियाचा बरवा संग । जिवलग संतांचा ॥धृपद॥
मिष्टान्नाचा योग भुके । म्हणता चुके पुरेसे ॥२॥
तुका म्हणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥३॥
अर्थ

तृषा (तहान) लागल्यावर पाणी मिळाल्यावर जो तृप्तीचा आंनद आहे तोच आंनद मला संतांची भेट झाल्यावर घडो. ज्या प्रमाणे भुकेच्या वेळी पक्वान्नाचा लाभ होऊन बस म्हणे पर्यंत भोजन मिळते तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणेच आई आणि बळाच्या भेटीचा कळवळा असतो.
अभंग क्र. ७३६
कुचराचे श्रवण । गुणदोषावरी मन ॥१॥
असोनिया नसे कथे । मूर्ख अभागी ते तेथे ॥धृपद॥
निरर्थक कारणी । कान डोळे वेची वाणी ॥२॥
पापाचे सांगाती । तोंडी ओढाळाचे माती ॥३॥
हिताचिया नावे । वोस पडिले देहभावे ॥४॥
फजीत करूनि सोडी । तुका करी बोडाबोडी ॥५॥
अर्थ

कुच्चर श्रोते वक्त्यांच्या दोषा कडेच पाहतात. कथा चालू असतना देखील असे मूर्ख श्रोते तेथे असले तरी तेथे नसल्यासारखे समजावे. ते आपले कान, डोळे आणि वाणी निष्कारण दुसरीकडे खर्च करतात. अश्या मूर्ख व ओढाळ लोकांच्या पापामुळे त्यांच्या तोंडात मातीच पडते. हिताच्या नावाने त्यांचे देह हे ओस पडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात अश्या लोकांची आम्ही फजिती करून हजामत करतो.
अभंग क्र. ७३७
जग तरि आम्हा देव । परि हे निंदितो स्वभाव ॥१॥
येतो हिताचा कळवळा । पडती हाती म्हणूनी काळा ॥धृपद॥
नाही कोणी सखा । आम्हा निपराघ पारिखा ॥२॥
उपक्रमे वदे । तुका वर्मासी ते भेदे ॥३॥
अर्थ

जग हे सर्व देवा प्रमाणेच आहे परंतु जे वाईट स्वभावाचे लोक आहेत त्यांची आम्ही निंदाच करतो. पण ते काळाच्या तोंडात पडणार हे पाहून आम्हाला त्यांच्या हिताचा कळवळा येतो. आमचा कोणीही सखा मित्र नाही आणि कोणीही परका नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अगदी स्पष्ट बोलतो पण ज्यांच्या अंगी दोष आहेत त्यांना आमचे बोलणे वर्मी लागते.
अभंग क्र. ७३८
सोपे वर्म आम्हा सांगितले संती । टाळ दिंडी हाती घेउनि नाचा ॥१॥
समाधीचे सुख सांडा ओंवाळून । ऐसा या कीर्तनी ब्रम्हरस ॥धृपद॥
पुढती घडे चढते सेवन आगळे । भक्ती भाग्य बळे निर्भरता ॥२॥
उपजोचि नये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरीदासांच्या ॥३॥
तुका म्हणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणे ॥४॥
अर्थ

हरी प्राप्ती चे अगदी सोपे वर्म आम्हाला संतानी सांगिले आहे, हाती टाळ, मुखाने हरीचे नांव व विणा हेच ते साधन आहे. कीर्तनामध्ये असे ब्रम्हरस आहे कि त्या वरून समाधी सुख ओवाळून टाकावी. या भक्ती प्रेमाच्या सेवनाने पुढे तर अगदी आनंद व निर्भयता प्राप्त होते. या भक्तीच्या आनंदाने तर चित्तात कुठल्याही प्रकारचा संदेह राहत नाही. उलट चारी मुक्ती हे हरिदासांच्या होऊन जातात. तुकाराम महाराज म्हणतात मनाला शांती लाभून त्रिविध ताप क्षणात नाहीसे होतात.
अभंग क्र. ७३९
गंगा न देखे विटाळ । तेचि रांजणीही जळ ॥१॥
अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥धृपद॥
काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिका लोका ॥२॥
तुका म्हणे आगीविण । बीज वेगळे तो भिन्न ॥३॥
अर्थ

गंगेच्या प्रवाहातील पाण्याला विटाळ नसतो, परंतु तेच पाणी एखाद्या भांड्यात भरून ठेवले तर ओवळ्याच्या (अशुध्द) स्पर्शाने त्याला विटाळते. पदार्थ हा लहान असला किंवा मोठा असला तरी तो सारखा नसतो कारण त्याला थोडे बाजूला केले तर ते दुषित होऊ शकते. पृथ्वी वर अनेक प्रकारचे लोक राहतात पृथ्वीला पायरी मानून तिच्यावर चालतात, पण ती कधी भेद करत नाही पण त्याच पृथ्वीवर अनेक लोक एकत्र आले तर ते एकमेकांमध्ये जातीभेद करतात. तुकाराम महाराज म्हणतात बीज हे अग्नी पासून भिन्न असते त्यावेळी त्यामध्ये दोष पाहिला जातो, परंतु ते अग्नी रूप झाले कि त्याच दोष जातो.
अभंग क्र. ७४०
देवावरील भार । काढू नये काही पर ॥१॥
तहानभुके आठवण । घडे ते बरे चिंतन ॥धृपद॥
देखावी निश्चिंती । तोचि अंतर श्रीपती ॥२॥
वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥३॥
अर्थ

देवाच्या चरणांवर जो आपण भार टाकला आहे तो कधी काढू नये, ज्यावेळी तहान भूक लागते त्यावेळी त्याचे चिंतन होते हे चांगले आहे. त्याचे चिंतन केले नाही मग तर तो आपल्या पासून दुरावतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा समोर मी हे संसारीक वैभव त्याज्य मानतो.
अभंग क्र. ७४१
थुंकोनिया मान । दंभ करितो कीर्तन ॥१॥
जालो उदासीन देही । एकाविण चाड नाही ॥धृपद॥
अर्थ अनर्था सारिखा । करूनि ठेविला पारिखा ॥२॥
उपाधि वेगळा । तुका राहिला सोवळा ॥३॥
अर्थ

मान, सन्मान या गोष्टींचा त्याग करून मी कीर्तनात दंगून जात आहे. देहा विषयी मी उदासीन झालो आहे, एका देवावाचून मला दुसरी आवड नाही. अर्थ म्हणजे पैसा, धन तो अनर्थ आहे म्हणून मी त्याला वेगळा ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व प्रकाच्या उपाधी पासून वेगळा सोवळा (शुद्ध) अलिप्त राहिलो आहे.
अभंग क्र. ७४२
काय ह्याचे घ्यावे । नित्य नित्य कोणे गावे ॥१॥
केले हरीकथेने वांज । अंतरोनी जाते निज ॥धृपद॥
काम संसार । अंतरी हे करकर ॥२॥
तुका म्हणे हेंड । ऐसे मानिती ते लड ॥३॥
अर्थ

कितीतरी असे लोक आहेत कि ते म्हणतात की, या देवाचे रोज रोज काय नांव घ्यावे ? त्याचे गुणगान रोजच काय वर्णन करावे ? हि हरिकथा व्यर्थ आहे या हरी कथेने आमची झोप दुरावते. या हरी कथेची सवय झाली तर संसारातील काम धंदा सुचत नाही, सुखोप भोग घेता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हरी कथेला असे म्हणारे लोक केवळ दोषी पाखंडी नालायक आहेत.
अभंग क्र. ७४३
वदे साक्षत्वेसी वाणी । नारायणी मिश्रित ॥१॥
न लगे काही चाचपावे । जाता भावे पेरीत ॥धृपद॥
भांडार त्या दातियाचे । मी कैचे ये ठायी ॥२॥
सादावीत जातो तुका । येथे एकाएकी तो ॥३॥
अर्थ

माझी वाणी हि नारायण मिश्रित झाली आहे हे मी साक्षित्वाने बोलतो. आता मला इतर कुठेही काही चाचपडत बसण्याची गरज नाही, कारण मी भक्ती भावाने उपदेशाची पेरणी करत आहे. माझे जे काही उपदेश आहेत ते सर्व भांडार हे त्या दात्याचे आहे, मी कोण तो बोलणारा ? तुकाराम महाराज म्हणतात मी एकटा जरी असलो तरी सगळ्यांना परमार्थ रुपी उपदेश करत सावध करत आहे.
अभंग क्र. ७४४
ऐसी जिव्हा निकी । विठ्ठल विठ्ठल का न घोकी ॥१॥
जेणे पाविजे उद्धार । तेथे राखावे अंतर ॥धृपद॥
गुंफोनि चावटी । तेथे कोणा लाभे भेटी ॥२॥
तुका म्हणे काळ । देवाविण अमंगळ ॥३॥
अर्थ

अहो तुमची जीभ एवढी चांगले आहे तरी देखील त्या जिभेचे द्वारे तुम्ही विठ्ठल विठ्ठल असा नामोच्चार का करत नाही. ज्या विठ्ठल नाम द्वारे तुमचा उद्धार होणार आहे त्याच्यापासून तुम्ही अंतर ठेवू नका सारखे विठ्ठलाचे चिंतन तुम्ही चित्तामध्ये चालू ठेवा. अहो केवळ बोलण्यात चावट शब्द वापरल्याने काय लाभ होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात अहो तुम्ही सतत देवाचे नामस्मरण करत रहा असे जर तुम्ही केले नाही तर जो काळी तुम्ही देवाचे नामोच्चार करणार नाही तो काळ मंगळ असेल देवाच्या नामस्मरणा वाचुन वाया गेलेला वेळ म्हणजे अमंगळ आहे.

मार्च नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

👇हि पोस्ट ईतरांनाही पाठवा⬇️

धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे

9422938199

Articles: 895

Leave a Reply

Discover more from देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading