भगिनी निवेदिता बद्दल संपूर्णपणे जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या जीवनावर व कार्यावर आजवर लिहिलेल्या पुस्तकांपैकी सर्वोत्तम पुस्तक म्हणजे, श्री शंकर प्रसाद बसूनी बंगाली भाषेत लिहिलेले………………………
==================== भाग – ६ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – ६.
निवेदितांचे योगदान केवळ वैज्ञानिक शोधकार्यातच होते असे नाही, तर राष्ट्रपातळीवर ललित कला चळवळ सुरू होण्यासाठी त्यांनी आपले असाधारण योगदान दिले होते. हॅवल आणि अवनींद्रनाथ यांनी सुरू केलेले ललित कलेच्याच्या चळवळीचे बरेचसे श्रेय निवेदितांकडे जाते. याचप्रमाणे रमेशचंद्र दत्त आणि जदुनाथ सरकार सारख्या सुप्रसिद्ध व्यक्तींनाही इतिहास लेखन कार्यात प्रोत्साहित केले होते.
निवेदिता ह्या एक असामान्य व्यक्ती आणि प्रभावशाली लेखिकाही होत्या. त्या भारतात येण्यापूर्वी तीस वर्षाच्या निवेदितांनी इंग्लिश विद्वानांच्या वर्तुळात एक प्रतिष्ठित लेखिका म्हणून स्थान प्राप्त केले होते.
त्या भारतात आल्या आणि भारतीय चेतना जागृतीच्या कार्याला वाहून घेतले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपली लेखणी हाच आपला मोठा शक्ती स्तोत्र आहे. त्यांनी साहित्य, धर्म , समाजशास्त्र, ललित कला इत्यादी विषयांवर भारतातील व विदेशातील नियतकालिकांमधून लेख लिहिण्यास सुरुवात केली. त्यांचे लेख मुख्यतः दी स्टेट्समन, अमृत बाझार पत्रिका, डॉन, प्रबुद्ध, भारत, बालभारती या वृत्तपत्रातून आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत होते. त्यांनी पुस्तके सुद्धा बरीच लिहिली. त्यातील उल्लेखनीय पुस्तके होती…” काली द मदर”, दी वेब ऑफ इंडियन लाईफ”, “क्रॅडल टेल्स ऑफ हिंदुईझम” आणि “दि मास्टर ॲज साॅ”! त्यांचे अष्टपैलू प्रज्ञा आणि विविध विषयांवरील ज्ञान पाहून, स्तिमीत व्हायला होते.
विवेकानंदाचे आदर्शाप्रमाणे आणि सारदा माताजींनी उद्घाटन केलेल्या निवेदितांचे एक छोटेसे विद्यालय होते. या दोघांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असल्यामुळे, या विद्यालयातून भविष्यात मैत्रेयी आणि गार्गी निर्माण होतील अशी त्यांची दृढ कल्पना होती.
त्याकाळी पालक मुलींना शिक्षण देण्यास उत्सुक नव्हते. लोक अतिशय पुरातण मतवादी होते. त्यामुळे निवेदितांना विद्यार्थिनींना जमा करायला अतिशय कष्ट घ्यावे लागले. त्यांना घराघराचा उंबरठा झिजवावा लागला. त्या मुलींना सगळ्याच प्रकारचे शिक्षण देऊ लागल्या. इतिहास, भूगोल, विज्ञान थोडे इंग्रजी याशिवाय शिवणकाम भरतकाम, चित्रकला, हस्त कौशल्यही शिकवित होत्या. मुलींना शारीरिक शिक्षणालाही प्रोत्साहन देत होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धर्मभावनेची आंतरिक ओळख करून देऊन भारतीय संस्कृतीचीही जोपाना करित होत्या.
प्रौढ विवाहित स्त्रियां व विधवानाही अक्षर ओळख करून देऊन, त्यांना शिवणकाम, हस्त व्यवसाय शिकवण्याची व्यवस्था केली. काही सुशिक्षित स्त्रियांना विशेष शिक्षण देऊ लागल्या. हेतू हा की, त्यांच्यामधून काही उत्तम शिक्षिका निर्माण व्हाव्यात.
निवेदिता मधून मधून मोकळ्या मैदानावर आपल्या परिसरातील बायांची सभा भरवीत. स्वामी सारदानंद त्यांना चंदीपाठ, देवीमहात्म्य आणि पुराणातील कथा गायन करून त्यांचे ज्ञान वाढवीत व मनोरंजनही करीत.
कित्येक वेळा निवेदिता मुलींना प्राणी संग्रहालय, पुराणवस्तू संग्रहालय दाखवण्यास घेऊन जात. तसेच दक्षिणेश्वरला बेलूर मठात आणि सारदा देवीच्या उद्बोध मधील निवासस्थानी घेऊन जात असे. मुलींना बाहेर नेल्यानंतर त्यांना शालवृक्षाच्या पानांचे द्रोण करून, फळफळावळे देत. आणि त्यांची उष्टे द्रोण स्वतः गोळा करून उकिरड्यावर नेऊन टाकत.
विद्यालयाचा खर्च भागवण्यासाठी निवेदिता लेखन, व्याख्यानाद्वारे पैसा मिळवित असत. आलेला सर्व पैसा विद्यार्थींनींच्या उन्नतीसाठी खर्च करीत. स्वतःवर एक पैसाही खर्च करीत नसत. कित्येक वेळा त्यांना पैसे अभावी उपवासही घडत असे. ह्या सर्व दगदगीने, कठोर परिश्रमाने व भारतातील तीव्र उन्हाळ्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली. पण त्यांनी लक्ष दिले नाही.
स्वामी विवेकानंदांनी निवेदितांना दीक्षा दिल्याच्या दुसऱ्या दिवशी विचारले की, तू कोणत्या राष्ट्राची आहेस? निवेदितांनी मोठ्या अभिमानाने आपली इंग्लंडशी असलेली निष्ठा प्रकट केली. कारण त्यांचे इंग्लंडमध्ये वास्तव्य असतांना त्यांनाही इतर इंग्रज लोकांप्रमाणे ब्रिटिश राजवट भारताच्या हिताची आहे असे वाटे. त्यांना वाटे की, भारत व इंग्लंड राष्ट्र एकमेकांच्या हिताचा विचार करतात. त्या भारतात आल्यावर सुद्धा सुरुवातीला त्यांचे मत तसेच होते. त्या अनुषंगाने स्वामीजींनी विचारल्यावर त्यांनी आपली निष्ठा इंग्लंडशी असल्याचे सांगितले. ऐकून स्वामींनी जाणले की, निवेदितांच्या मनात पाश्चात्य प्रवृत्ती खोलवर रुजलेली आहे. म्हणून त्यांनी भारताच्या सेवेसाठी त्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले. त्यांनी निवेदितांच्या मनावर भारताची शाश्वत प्रतिमा बिंबवली. निवेदितांच्या मनात सुप्तपणे ठाण मांडून असलेल्या व सहजी नष्ट न होणाऱ्या पाश्चात्य प्रवृत्ती उखडून टाकल्या. याचबरोबर भारत कसा व कोणत्या बाबतीत दुर्बल आहे? भारताने पश्चिमेकडून कोणत्या गोष्टी शिकणे आवश्यक आहे? याबाबतीत निवेदितांना जाणीव देण्यास, जागृती करण्यासही स्वामीजी विसरले नाही.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
==================== भाग – ७ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – ७.
स्वामीजी निवेदितांना प्रशिक्षित करीत असतानाच एके दिवशी त्या स्वामीजींना म्हणाल्या, “लंडन शहर सुशोभित करणे गरजेचे आहे.” स्वामीजी तात्काळ तिखट स्वरात म्हणाले, त्यासाठी तुम्ही इतर शहरांकडे दुर्लक्ष करून स्मशानभूमी करणार का? स्वामीजींच्या बोलण्यातील वर्म निविदितेंच्या लक्षात आले नाही. त्या दुखावल्या गेल्या. हे शब्द त्यांच्या कानात कितीतरी दिवस घुमत राहिले. परंतु नंतर पुढे जेव्हा ब्रिटिशांकडून भारतीय जनतेची पिळवणूक पाहिली, तेव्हा स्वामीजींचे शब्दांचा नेमका अर्थ उमगला. सत्य जाणवले. आणि त्यांच्या मनात ब्रिटिशांबद्दल कमालीचा कडवटपणा निर्माण झाला. आणि भारताबद्दल आदर व प्रेमभाव उत्पन्न झाला.
भारतामध्ये स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने भारतात कार्य करण्यास स्वामीजींनी निवेदितांना आमंत्रित केले आणि निवेदिताही त्यांच्या कसोटीला खऱ्या उतरल्या. निवेदितांनी कोलकाताला बोसपाडा मोहल्यात मुलींची शाळा काढण्याच्या प्रस्ताव स्वामींस समोर ठेवल्यावर, स्वामीजींच्या आनंदाला, उत्साहाला परावरच राहिला नाही. शाळेसंबंधी चर्चा करण्यासाठी स्वामीजींनी बलराम बसूच्या निवासस्थानी बैठक घेण्याचे ठरविले. या बैठकीत रामकृष्ण वचनामृताचे रचनाकार, मास्तर महाशय, सुरेंद्रचंद्र दत्त, हरमोहन व स्वतः यजमान उपस्थित होते.
निवेदितांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यालयासंबंधी आपली योजना विशद करून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना आपल्याला मुलींना शिक्षणासाठी या शाळेत पाठवायचे आवाहन केले. त्यांचे भाषण चालू असताना स्वामी विवेकानंद सर्वांच्या मागे येऊन बसल्याचे त्यांना माहीत नव्हते. परंतु स्वामीजी जेव्हा तिथल्या लोकांना म्हणू लागले की, निवेदितांच्या आव्हानाला प्रतिसाद द्या. त्यांना प्रोत्साहित करा. म्हणा की, आमच्या मुली तुमच्या शाळेत पाठवू. पण कोणाचाच प्रतिसाद न दिसल्या मुळे स्वामींनी सक्तीने हरमोहन बाबूच्यावतीने म्हणाले, कुमारी नोबल! हे हरमोहन बाबू आपली मुलगी तुमच्या शाळेत पाठवतील. स्वामीजींचे शब्द ऐकून त्यांना प्रत्यक्ष तिथे पाहून निवेदितांना अतिशय आनंद झाला.
१३ नोव्हेबर १८९८ रोजी निवेदितांच्या शाळेचे उद्घाटन सारदादेवीच्या हस्ते झाले. श्रीराम श्रीकृष्णाची पूजा केल्यानंतर सारदा देवींनी विद्यालयाचे लोकार्पण केले. आणि आपल्या आशीर्वाद भाषणात म्हणाल्या, देवी कालीमातेचा आशीर्वाद या शाळेवर, विद्यार्थिनींवर सदैव राहील. या विद्यालयात शिकलेल्या विद्यार्थीनी आदर्श कन्या होतील. असा माझा आशीर्वाद आहे. निवेदिता अत्यंत आनंदित झाल्या.
सारदादेवींनी निवेदितांना आपली कन्या ‘खुकी’ मानली होती. आणि निवेदितासुद्धा अगदी लहान होऊन त्यांच्याकडून आपले लाड करून घेत होत्या. एके दिवशी निवेदिता सारदामातांकडे आल्या असता त्यांनी स्वतः हाताने बनवलेला एक छोटा हातपंखा भेट दिला. निवेदितांना इतका आनंद झाला की, त्या लहान मुलीसारख्या ज्याला त्याला पंखा दाखवत म्हणू लागल्या, पहा.. पहा… माझ्यासाठी माताजींनी स्वतः पंखा तयार केला.
माताजी शाळेला भेट देण्यास येणार असल्याचा निरोप आल्यावर, निवेदितांना अतिशय आनंद झाला. त्यांनी संपूर्ण विद्यालयाची स्वच्छता करून, पानाफुलांनी खोल्या सुशोभित केल्या. माताजींचे स्वागत कसे करावे? त्यांना कुठे बसवावे? मुलींकडून त्यांना भेट काय द्यावी? मुलींनी संभाषण कसे करावे? वगैरे तपशील ठरवत होत्या. माताजींच्या आगमनाचा दिवस उजाडला. त्या दिवशी निवेदिता आपला रुतबा, करारीपणा विसरून अगदी अल्लड मुलीसारख्या आनंदाने बेभान होऊन वावरत होत्या.
एके दिवशी निवेदिता टागोर कुटुंबातील सरला घोष व इतर उच्चविभूषित स्त्रियांसोबत स्वामी विवेकानंदांना भेटायला बेलूर मठात गेल्या होत्या. या सर्व स्त्रियांसमोरच निवेदितांना स्वतःसाठी हुक्का आणण्यास स्वामीजींनी सांगितले. निवेदितांच्या मनात किंचितही किंतु आला नाही की, स्वामीजींनी इतक्या उच्च विभूषित स्त्रियांसमोर आपल्याला एवढे हलके काम सांगितले. उलट आपल्या गुरूंची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून त्या कृतकृत्य झाल्या. धन्यता वाटली.
त्यांनी आपल्या गुरुंच्या आज्ञेनुसार हुक्का तयार करून आणलेला बघून, त्यांच्याबरोबर आलेल्या त्या स्त्रियांना अतिशय आश्चर्य वाटले. स्वामीजींच्या आदर्शांना पूर्णपणे समर्पित होऊन निवेदिता खरोखर अंतर्बाह्य भारतीय झाल्याचे बायकांना दिसून आले. जाणीव झाली.
एके दिवशी त्या बेलूर मठात जाऊन स्वामींकडे जाऊन संन्यास दीक्षा देण्याची विनंती करून म्हणाल्या, संन्यास ग्रहण करण्यायोग्य होण्यासाठी मला काय करावे लागेल? स्वामींजी म्हणाले, तू सध्या जशी आहे तशीच राहा. त्यानंतर निवेदितांनी संन्याससंबंधी पुन्हा कधीच विचारणा केली नाही. ब्रह्मचर्य व्रताचे सदैव पालन करत आयुष्यभर “ब्रह्मचारिणी ” म्हणूनच जगल्या.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
==================== भाग – ८ ====================
!!! भगिनी नावेदिता !!!
भाग – ८.
निवेदिता भारतात आल्यावर काही दिवसांनी रवींद्रनाथ टागोरांनी आपल्या धाकट्या कन्येला शिकवण्यास त्यांना सांगितले. रवींद्रनाथांचा समज होता की, एक उच्चशिक्षित इंग्लिश महिला आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमातून व्यवस्थित शिक्षण देऊ शकेल. निवेदिता त्यांना सविनय म्हणाल्या, विदेशी आदर्श आणि रीती लादल्याने तिचा विकास कसा होऊ शकेल? उलट ज्या व्यक्तीत जे सूप्त गुण दडलेले असतील, विशेष म्हणजे राष्ट्रीय गुण अभिव्यक्त होण्यास वाव दिल्या जाणे हेच खरे शिक्षण होईल. त्यांनी रवीनाथांची विनंती नम्रपणे अस्वीकार केली. कारण त्या भारतात इंग्रजी आणि पाश्चात्य संस्कृती शिकवायला आल्या नव्हत्या. त्यांचे ध्येय, कार्यक्षेत्र वेगळे होते. याचा परिणाम म्हणून नंतर नवींद्रनाथ टागोरांनी शांती शांतीनिकेतनला एक आश्रम स्थापून तिथे त्यांनी पुरातन भारतीय अध्ययन, अध्यापन व्यवस्था सुरू केली.
निवेदिता बोसपाडा मोहोल्ल्यात राहत होत्या. तिथे त्यांचे आपल्या शेजाऱ्यांशी अतिशय प्रेमाचे संबंध होते. शेजाऱ्यांच्या अडीअडचणी सुखदुःखात त्यांना मदत करीत. धावून जात असत. त्यामुळे शेजारी त्या विदेशी असूनही आपले म्हणून स्वीकारले होते. निवेदितांनी सुद्धा सर्व समाजिक रीती भाती आत्मसात केल्या होत्या.
एक दिवस रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत असताना शेजारच्या घरातून करूण स्वरात रडण्याचा आवाज ऐकला. अर्धवट स्वयंपाक टाकून त्या तशाच त्या घरी धावत गेल्या. तिथे गेल्या तर त्या घरचा एक बालक मृत्युमुखी पडलेले दिसले. त्याच्या आईचा आक्रोश पाहवला जात नव्हता. त्यांना वाटले, जणू आपलेच बाळ गेले. बाळाची आई व्याकुळपणे विचारत होती, कुठे गेला माझा बाळ? कसा गेला मला सोडून? निवेदिताने पुस्तळ प्रकारे तिचे सांत्वन केले. म्हणाल्या, आई बाळ कालीमाता जवळ आहे. ऐकून त्या पुन्हा रडल्या नाहीत. अशा प्रकारे निवेदिता शेजारच्या लोकात अगदी एकरूप होऊन गेल्या होत्या. परकेपणाची भावना बिलकुल नाहीशी झाली होती.
१८९९ साली कोलकत्यात पुन्हा दुसऱ्यांदा प्लेगची साथ उद्भवली. स्वामी विवेकानंदांनी या साथीशी सामना करण्याची संपूर्ण जबाबदारी निवेदितांवर सोपवली. रामकृष्ण मिशनने मदत कार्यासाठी समिती स्थापन केली. त्या समितीच्या निवेदिता सचिव आणि स्वामी सदानंद मुख्य कार्यवाहक होते. निवेदिता आणि स्वामी सदानंदांनी प्लेगचा मुकाबला करताना जे सेवा कार्य केले ते कोलकात्त्याच्या इतिहासात संस्मरणीय आहे.
झाडू मारण्याच्या मुलांच्या पथकासह स्वामी सदानंद सर्वत्र फिरत होते. शामबाजार मधील झोपडपट्ट्यांसह सर्व व्यवस्था व भागबाजारची स्वच्छता राखण्याची जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडली. निवेदिता सर्व प्रकारच्या सेवा कार्यावर नियंत्रण आणि देखरेख अगदी न थकता करीत होत्या.
इंग्रजी वृत्तपत्रातून त्यांनी मदतीसाठी आव्हान पत्रिके प्रसिद्ध केली. “क्लासिक थिएटरच्या ” सभागृहामध्ये त्यांनी स्वामीं बरोबर प्लेग आणि विद्यार्थ्यांचे कर्तव्य या विषयावर व्याख्यान दिले. त्यांच्या व्याख्यानाने प्रभावित होऊन दहा विद्यार्थी ताबडतोब कार्यात सामील झाले. प्रत्येक रविवारच्या संध्याकाळी ते निवेदितांना केलेला कामाचा वृत्तांत देत व पुढील सूचना घेऊन जात.
त्या दिवसात निवेदितांचे नेतृत्व, कार्य व्यवस्था पाहून लोक आश्चरचकीत झाले. त्या स्वतः प्रत्येक कामात लक्ष घालून जातीने स्वतः वस्तीत जाऊन पाहणी करीत. प्लेगशी कसा सामना करावा? कोणती प्रतिबंधक उपाययोजना करायची? याच्या त्या सूचना देत. शिवाय पत्रकांचा वापर करून त्या वस्त्यांतून फिरत असताना एके दिवशी त्यांना बागबाजार मधील एका वस्तीत घाणीचे ढीग साचलेले दिसले. त्याबद्दल कोणी काहीच करत नसल्याचे पाहून, निवेदितांनी स्वतः हाती झाडू व घमेले घेतले आणि स्वतःच घाण उचलून टाकू लागल्या. हे पाहून वस्तीतल्या तरुणांना लाज वाटली. त्यांनी निवेदितांच्या हातातले झाडू घमेले घेतले आणि घाण व रस्ते स्वच्छ करू लागले. यावरून निवेदिता स्वतः किती कृतिशील होत्या हे दिसून येते.
त्या काळी नामवंत असलेले डॉक्टर आर.जी. कार यांनी त्यांचे सेवा कार्याबद्दल अंतःकरण द्रवित करणारे उद्गार काढले. त्यांच्याच शब्दात देत आहे….
” एके दिवशी मी चैत्र महिन्यात रुग्णांची तपासणी करून दुपारच्या वेळी घरी आलो, तर आमच्या दाराशीच एक युरोपियन महिला धुळीने माखलेल्या खुर्चीवर बसलेली दिसली. त्या होत्या निवेदिता! त्यांना काही माहिती हवी होती म्हणून त्या बऱ्याच वेळापासून माझी वाट पाहत थांबल्या होत्या.
त्या दिवशी सकाळी मी प्लेगने पछाडलेल्या मुलाला तपासण्यासाठी भागबाजारच्या एका वस्तीत गेलो होतो. निवेदितांनी त्या मुलाच्या संबंधी केल्या गेलेल्या व्यवस्था संबंधी चौकशी केली. त्या बालकाची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे डॉक्टर कार ने सांगितले. आणि त्याच्यापासून होणाऱ्या संसर्गाचा धोका सांगून निवेदितांना योग्य ती दक्षता घेण्यास सांगितले होते. परंतु ….
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
==================== भाग – ९ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – ९.
डॉक्टर कार दुपारी जेव्हा पुन्हा वस्तीतल्या रुग्णांना तपासण्यासाठी गेले तेव्हा त्यांना दिसते की, त्यांनी केलेल्या सर्व सूचनांकडे दुर्लक्ष करून निवेदिता अनारोग्य वस्तीतील घाण साचलेल्या कोंदट घरात त्या बालकाला मांडीवर घेऊन बसलेल्या होत्या. ते पाहून डॉक्टर कार आश्चर्याने थक्क झाले. निवेदिताने त्या मुलाची काळजी घेण्यासाठी त्या झोपडीत राहायला आल्या होत्या. संसर्गाची विचार न करता रात्रंदिवस त्या मुलाची सेवाशुश्रूषा करीत होत्या. ती झोपडी निर्जंतुक करण्यासाठी स्वतः शिडीवर चढून त्या झोपडीची रंगसफेदी केली. एवढे सर्व करूनही दोन दिवसानंतर त्या मुलाने निवेदिताच्या मांडीवरच आपल्या शेवटचा श्वास घेतला. मरण्यापूर्वी त्या बालकाने निवेदिताला आपली आईच समजून माॅऽ, माॅ म्हणत प्राण सोडला.
बागबाजारातील वस्तीतील लोकांची निवेदिता सर्वांची खूप काळजी घेत होत्या, तिथल्या रुग्णांचे कोणताही भेद न बघता अथक प्रयत्न करीत होत्या. स्वामी सदानंद आणि भगिनी निवेदितांनी प्लेगचा सामना करण्यासाठी त्यांनी कामाचे नियोजन इतके सुव्यस्थित केले होते की, तेव्हाचे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि चेअरमन आश्चर्याने थक्क झाले. त्यांनी या दोघांना खूप खूप धन्यवाद दिले.
४ जुलै १९०२ ला सकाळी बेलूर मठातील एक शिष्य स्वामी सारदानंदाचे पत्र घेऊन आला. पत्रात लिहिले होते की, गेल्या रात्री स्वामी विवेकानंदांचे प्राण पंचतत्वात विलिन झाले. क्षणभर निवेदितांना अर्थबोधच झाला नाही. त्या निश्चल झाल्यात. डोळ्यापुढे अंधार दाटला. पण भानावर आल्या व लगेच बेलूर मठात गेल्या. स्वामीजींच्या उशाशी बसून त्यांना शांतपणे पंख्याने वारा घालू लागल्या. त्या कितीतरी वेळ त्या स्थितीत बसून होत्या.
५ जुलैला दुपारी स्वामीजींचा अचेतन देह खोलीतून बाहेर आणण्यात आला. थोड्याच अंतरावर दहनासाठी नेण्यात आले. ( याच बेलूर मठात स्वामी विवेकानंदाचे मंदिर उभारलेले आहे) स्वामीजींचा देह भगव्या वस्रात गुंडाळलेला होता. निवेदितांना वाटले, स्वामीजींच्या अंगावरचे हे भगवे वस्र आपल्याला घेता आले तर, स्वामीजींच्या सर्वाधिक स्नेही, प्रिय जोसेफ फाईन मॅक्लाउडला स्मरणचिन्ह म्हणून पाठवता येईल. त्यांनी स्वामी सारदानंदांना विचारले, स्वामींच्या अंगावरचे हे वस्त्र देखील अग्निसात होईल का? सारदानंदांनी त्यांची मनःस्थिती जाणली. ते म्हणाले, तुमची इच्छा असेल ते वस्त्र घेऊ शकता. परंतु निवेदितांना स्वामींच्या अंगावरचे वस्त्र घेणे योग्य न वाटल्याने त्यांनी नकार दिला.
त्या एकटक ज्वालांनी वेढलेल्या दहनवेदीकडे पाहत होत्या. त्यांच्या नजरेसमोर स्वामीजींबरोबर घालवलेल्या क्षणांचा, त्यांनी केलेले उपदेश, दीक्षा, शिक्षण इत्यादी गोष्टी तरळत होत्या. संध्याकाळचे सहा वाजत आले होते. ज्वाळा निमत आल्या होत्या. एकाएकी निवेदितांना जाणवले की, कोणीतरी आपला दंड धरुन ओढत आहे. त्यांनी वळून बघितलं, तर स्वामीजींच्या अंगावरच्या भगव्या वस्राचा एक तुकडा त्यांच्या पायाशी येऊन पडलेले दिसला. त्यांनी तो मोठ्या भक्तिभावाने हळुवारपणे उचलून घेतला.
निवेदितांना जाणीव होती की, आपले कार्य हे राष्ट्रबांधणीचे आहे. स्वामी विवेकानंदांच्या निधनानंतर त्यांना जाणवले की, स्वामीजींच्या विचारसरणीनुसार देशभक्तीची भावना भारतीयांच्या अंतःकरणात जागृत करण्याचे कार्य हाती घ्यायला हवे. आपल्यासाठी स्वामीजी हेच कार्य मागे ठेवून गेले आहेत. या भावनेने उद्युक्त होऊन त्यांनी देशभर व्याख्यान दौरे करण्यास आरंभ केला.
ऑक्टोबर १९०२ मध्ये नागपूरच्या मॅरिस महाविद्यालयात निवेदितांना एका सभेचे अध्यक्ष स्थान स्वीकारण्यासाठी निमंत्रण आले होते. त्यानुसार त्या नागपूरला गेल्या. क्रिकेट सामन्यात विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसे दिल्या गेले. परितोषिक वितरणानंतर निवेदितांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ते दिवस दसऱ्याच्या सणाचे होते. निवेदिता आपल्या भाषणात म्हणाल्या, या दसऱ्याच्या सणाच्या काळात युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्राची पूजा करण्याचे सोडून, दुर्गा मातेची शक्ती संपन्नतेसाठी प्रार्थना करायची सोडून, तुम्ही विद्यार्थी एका परदेशी खेळाचा आनंद लुटत आहात ही अतिशय लाजिरवाणी ची गोष्ट आहे. मला जर आधी हे कळलं असते तर मी अध्यक्षस्थान मुळी स्वीकारले नसते. मला वाटले होते, महावीर भोसले राजेच्या राजधानीत मराठ्यांच्या युद्ध कौशल्याची काही शौर्यपूर्ण प्रात्यक्षिके पाहायला मिळतील. पण तुम्ही माझी निराशा केली. त्या अतिशय दुःखी झाल्या होत्या.
त्या म्हणाल्या, विद्यापीठातून नुसते पदवी घेऊन, आवश्यकतेपेशा जास्त पदवीधर बाहेर पडतात. ते आपल्या नाजूक प्रकृत्तीमुळे स्वतःचे रक्षण करू शकत नाही तर आया बहिणींची अब्रु काय वाचवतील? राष्ट्राला आज कणखर व्यक्तिमत्त्वाची, शरीराने व मनाने सशक्त देशभक्तांची गरज आहे. जे लोक विदेशी लोकांची सेवा करतात, पाय चाटतात अशांची या राष्ट्राला मुळीच गरज नाही. राष्ट्राची मान उंचावण्यासाठी शक्तिशाली देशभक्तांची गरज आहे.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
==================== भाग – १० ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – १०.
दोन वर्षानंतर निवेदिता जानेवारी १९०४ मध्ये पाटण्याला गेल्या. तिथे विद्यार्थ्यांसमोर बोलताना म्हणाल्या, तुम्ही असे शांतचित्त निष्क्रिय असलेले पाहून मला अतिशय वाईट वाटत आहे. आज आपल्या राष्ट्रासाठी बलदंड माणसांची अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कुस्ती, मुष्ठीयुद्ध करीत असलेले पाहण्यात मला जास्त आनंद वाटेल.
जो लढत राहतो, ज्याला लढायला आवडते, तोच खरा वीर पुरुष! लढत रहा… लढत रहा… पुन्हा पुन्हा लढत रहा… पण त्या लढण्यात नीचपणा व दुष्टपणा असता कामा नये. तुम्ही स्फूर्तीने जोशाने रणांगणात उतरायला हवे. कोणत्याही परिस्थितीत निष्क्रिय असता कामा नये.
१९०३ च्या उन्हाळ्यात त्या मेदिनपुरला आल्या. त्यांचे स्वागत करण्यास रेल्वे स्टेशनवर खूप मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्या गाडीतून खाली उतरताच या जमावाने मोठ्या आवाजात “हिप् हिप् हुर्ये” अशा घोषणा दिल्या. जमावाला वाटले की, एका गोऱ्या इंग्रज महिलेचे स्वागत अशाच पद्धतीने करायला हवे.
परंतु या प्रकाराने निवेदितांना अतिशय धक्का बसला. त्यांनी आपला हात उंचावून लोकांना गप्प केले. आणि त्यांना समजावून सांगितले की,” हिप् हिप् हुर्ये” हा इंग्रजी लोकांचा जयघोष आहे. भारतीयांनी तो कोणत्याही कारणाने वापरू नये. आणि त्यांनी तार स्वरात ओरडून तीन वेळा जयघोष केला …
“वाहगुरूची फतेह!” बोलो! बाबाजी की खालसा!” सर्व जमावाने त्यांचे अनुकरण केले.
त्यानंतर त्यांची व्यवस्था केली त्या खोलीत आल्या. काटवरची गादी त्यांनी गुंडाळून ठेवली आणि आपली चटई पसरवून त्यावर गोधडी पसरवली. हे सर्व पाहून तिथे असलेली लोक विस्मयचक्कीत झाले. त्या म्हणाल्या, मी तपस्या करीत आहे. आणि मला वाटते की, तुम्ही ज्याप्रमाणे कार्य हात घेतले त्यासाठी तुम्हीही अशीच तपश्चर्या आचरणात आणावी. ज्यांना आपला देश स्वतंत्र करायचा आहे त्यांना चैन करणे शोभत नाही.
पहिल्या दिवशीच्या निवेदितांच्या व्याख्यानाला प्रचंड गर्दी झाली होती. परंतु त्यांचे राजकीय विचार एकूण भीतीपोटी अनेक लोक सभा संपण्यापूर्वीच निघून गेले. ही गोष्ट एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने त्यांच्या निदर्शनास आणून दिली. म्हणाले, पुढच्या सभांना लोक जास्त संख्येने येण्याची शक्यता फार कमी आहे. निवेदिता म्हणाल्या, मला भीती घालण्याचा प्रयत्न करू नका. जी लोक माझ्या व्याख्यानाला घाबरतील त्यांच्यासाठी माझी व्याख्याने नाहीच. आणि खरोखरच नंतरच्या सभांना लोकांची संख्या कमी झाली. परंतु निवेदितांनी सलग पाच दिवस आपली व्याख्याने त्याच जोशाने, त्वेषाने दिलीत.
स्थानिक तरुणांना युद्ध कलेचा सराव करण्यात यावा म्हणून स्थापन केलेल्या एक लष्करी व्यायाम शाळेचे निवेदितांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या प्रसंगी त्यांनी स्वतः दांडपट्टा, लाठी व मोगरी फिरवून तसेच इतर काही व्यायाम प्रकाराचे प्रात्यक्षिक दाखवून तरुणांना प्रोत्साहित केले. एका मुलीला बंदूक चालवायलाही शिकवले.
११ फेब्रुवारी १९०५ रोजी कलकत्ता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचे वेळी कर्झनने भाषण देतांना म्हटले की, पूर्वेकडे राष्ट्रांनी सत्याला बहुमान देण्याआधी पश्चिम राष्ट्रांनी निती नियमांमध्ये सत्याला सर्वोच्च स्थान दिले होते. हे एकूण तिथे उपस्थित असलेल्या भारतीय सुशिक्षितांच्या भावना दुखावल्या गेल्या. मात्र कोणी निषेधात्मक एकही शब्द उच्चारला नाही. त्या सभेला उपस्थित असलेल्या निवेदिता मात्र अपमानाने पेटवून उठल्या. भारत राष्ट्राचा अपमान त्यांना सहन झाला नाही.
सभा संपल्यावर सर गुरुदास बॅनर्जींना जबरदस्तीने इमरियल लायब्ररीत घेऊन गेल्या. “दी प्रॉब्लेम ऑफ दी फाॅर इस्ट ” हे लाॅर्ड कर्झनचे पुस्तक काढून त्यातील १५५-१५६ नंबरच्या पानावरील मजकूर दाखविला. कोरियन फॉरेन ऑफिसरच्या अध्यक्षांची मर्जी संपादन करण्याकरिता कशी खोटी माहिती लिहिली हे त्यांनी सर बॅनर्जींना दाखवली.
१३ फेब्रुवारीच्या अमृतबझार पत्रिकेत कर्झनने दीक्षांत समारंभाच्या वेळी केलेल्या भाषणाचा आणि लिहिलेल्या पुस्तकात खोटा मजकुर प्रकाशित केला. दुसऱ्या दिवशी तीच बातमी दी स्टेट्समन या वृत्तपत्राने स्वतःच्या टिप्पणीसह छापली. त्यामुळे लाॅर्ड कर्झनने केलेली असत्य विधाने, भारतीयांवर केलेला अन्यायकारक आरोप याविरुद्ध संपूर्ण देशभर गंभीर चळवळ सुरू झाली.
१४ फेब्रुवारीला निवेदितांनी दी स्टेट्समनच्या संपादकांना आणखी एक पत्र लिहिले. ते पत्र सत्याच्या सर्वोच्च आदर्श या शीर्षकासह प्रसिद्ध केले त्या पत्रात त्यांनी रामायण, महाभारत, पुराणे यामध्ये भारतात सत्याला केवढे मोठे स्थान होते यासंबंधी अवतरणे दिलीत. त्याच पत्रात कर्झनच्या विरुद्ध दीक्षांत समारंभात आपल्या वाडवडिलांना, आपल्या संस्कृतीला दुषणे दिली तरी विद्यार्थ्यांनी एकही शब्द उच्चारला नाही म्हणून आपला निषेधही व्यक्त केला.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
