भगिनी निवेदिता बद्दल संपूर्णपणे जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या जीवनावर व कार्यावर आजवर लिहिलेल्या पुस्तकांपैकी सर्वोत्तम पुस्तक म्हणजे, श्री शंकर प्रसाद बसूनी बंगाली भाषेत लिहिलेले………………………
==================== भाग – १ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – १
भगिनी निवेदिता बद्दल संपूर्णपणे जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या जीवनावर व कार्यावर आजवर लिहिलेल्या पुस्तकांपैकी सर्वोत्तम पुस्तक म्हणजे, श्री शंकर प्रसाद बसूनी बंगाली भाषेत लिहिलेले “लोकमाता निवेदिता ” हे होय! हे पुस्तक एकूण चार खंडात आहे. हे पुस्तक वाचल्याशिवाय निवेदितांच्या जीवनातील वैविध्यता, उपक्रमशीलता, आणि त्यांचे योगदान कोणीही पूर्णपणे जाणू शकणार नाही.
” लोकमाता निवेदिता ” या पुस्तकाच्या पहिल्या खंडात आलेले विषय आहेत…
स्वामी विवेकानंदाशी भेट होण्यापूर्वीचे निवेदिताचे जीवन. मार्गारेटचे “निवेदितात” झालेले रूपांतर. निवेदिता म्हणून स्वामी विवेकानंद व सारदामाता यांच्या सहवासातील जीवन. मठातील स्वामीजींचा शिष्य परिवार व इतर भक्तगण, भारत व विदेशातील त्यांच्या सहवासातील जीवन, इतर देशातील रामकृष्ण परमहंस व विवेकानंदाचे प्रशंसकांच्या सहजीवनातील जीवन, तसेच जगदीशचंद्र बसूंचे शास्त्रीय शोध आणि त्यांनी “बसू विज्ञान मंदिराची ” उभारणी केली त्यात त्यांनी केलेल्या विविध स्वरूपाचे योगदानाचे विवेचन आलेले आहे.
” लोकमाता निवेदिताच्या ” दुसऱ्या व तिसऱ्या खंडात भारतातील राजकीय, सामाजिक व्यवस्थेचा सखोल अभ्यास व त्यासंबंधी निवेदितांचे भावनिक व बौद्धिक गुंतवणूक समाविष्ट केली आहे. या खंडात निवेदिताची भूमिका, राष्ट्रीयतेच्या संकल्पने संदर्भात तत्व विचार, साम्राज्यवादी लॉर्ड कर्झनचा डाव उघडकीस आणल्याबद्दलचे कार्य, स्वदेशी चळवळ, त्यांचे क्रांतिकारक चळवळीशी असलेले नाते व कार्य, निवेदिता- योगी अरविंद नाते आणि आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजवाद, साम्राज्यवाद, स्वातंत्र चळवळ यासंबंधीचे निवेदितांचे विचार आलेले आहेत.
चौथ्या खंडात भारतीय कलाप्रवाह आणि निवेदिता यासंबंधीचा आहे. यात निवेदितांनी स्वामींजी कडून प्राप्त केलेले कलेचे शिक्षण, निवेदितांनी कालीमातेवरील मांडलेला सिद्धांत, कलाविषयक चळवळीतील निवेदिता व आकाकुरांचा सहभाग आणि निवेदिता विवेकानंदांची प्रेरणा, निवेदिता व हॅवेल, निवेदिता व अवनिंद्रनाथ, निवेदिता व कुमार स्वामी, निवेदिता व नंदलाल आणि निवेदिता व कला विषयक चळवळीचे प्रमुख प्रचारक रामानंद चट्टोपध्याय.
याशिवाय निवेदिता जन्मशताब्दीच्या प्रसंगाच्या निमित्ताने शंकरी प्रसाद बसू व सुनील बिहारी घोष या दोघांनी मिळून संपादित केलेला द्विखंडात्मक “स्मृतीग्रंथ” प्रकाशित झालेला आहे. हा स्मृतिग्रंथ म्हणजे इंग्रजी व बंगाली भाषेत लिहिलेल्या शोधलेख, कविता, आठवणी यांचे मौलिक संकलन होय!
यावरुन निवेदितांच्या कार्याची महती स्पष्ट होते.
सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल ) या भारतात येण्याआधी विवेकानंदांनी त्यांना अनेक पत्र लिहिली होती. त्या पत्रांमध्ये आपले ध्येय काय आहेत? निवेदितांनी भारतात कशाप्रकारे कार्य करायची आहे? त्यासाठी स्वतःची जडणघडण कशी करावी? या संबंधीचा मजकूर होता.
पत्रामध्ये विवेकानंद म्हणतात, मला पूर्ण खात्री आहे की, तुमच्याकडून भारतात फार मोठी कामगिरी होणार आहे. भारतीय स्त्रियांसाठी कार्य करण्याकरता तुमच्यासारखी सिंहिणच हवी आहे. या कार्यासाठी कर्तृत्ववान, कामाची आस्था, कळकळ असणाऱ्या स्त्रीचीच आवश्यकता आहे. पुरुषाची नाही. आणि मला तुमच्यामध्ये सर्व गुण एकवटलेले दिसत आहे.
एवढ्यात तरी भारतामध्ये महान स्री निर्माण होण्याची शक्यता नाही. तुमचे शिक्षण, तळमळ, पावित्र्य, निर्धार, अमाप प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या अंगात असलेले सेल्टिक वंशाचे रक्त हे सर्व गुण एकवटले असल्यामुळे या कार्यासाठी जशी स्त्री हवी तशीच तुमच्या रूपाने प्राप्त झाली आहे.
हे सर्व जरी खरे असले, तरी इथे येण्याआधी तुम्ही पूर्ण विचार करावा. इथे अडचणीचे साम्राज्यच आहे. इथे भारतात दैन्य, अंधविश्वास, दास्यवृत्तीच बहुदा सर्व समाजाच्या अंगात भिनली आहे. इथे येऊन कार्य करायचे, तर जातीभेद, स्पृश्यास्पृश्या संबंधी विचित्र कल्पना बाळगणाऱ्या, गोरे लोकांचे असलेले वर्चस्व, त्यांच्याकडून इथल्या लोकांना मिळणारी तिरस्कृत वागणूक, शिवाय तुमच्याकडे हे गोरे लोक संशय वृत्तीने पाहतील. तुमच्या प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर राहील. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतातील हवामान भयंकर उष्ण आहे. इथली शहरे सोडली, तर दुसरीकडे युरोप सारख्या सुख-सुविधा केवळ अशक्य आहे. या सर्व परिस्थितीचा विचार केल्यावरही जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल, धाडस करणार असाल, तर तुमचे स्वागत आहे. शतशः स्वागत आहे.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
==================== भाग – २ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – २.
स्वामी विवेकानंदांनी निवेदितांना २९-७-१८९७ ला पाठवलेल्या पत्रात पुढे म्हणतात, या सर्व अडचणी जाणूनही तुम्ही इथे आलात, तर स्वागतच आहे. आणि माझे बद्दल सांगायचे म्हणजे, जसा इतरत्र मी कोणी नाही. तसाच इथे भारतातही कोणी नाही. तरीसुद्धा जे काही माझे वजन आहे ते तुमच्या सहाय्यासाठी नक्की खर्च करेन. तुम्ही या कार्यात उडी घेण्याआधी सर्व दृष्टीने विचार करावा. जर तुम्ही या कार्यात भाग घेतला व त्यात अपयश आले किंवा उबग आला तरीसुद्धा मी तुमच्या पाठीशी सदैव असेन हे निश्चित लक्षात ठेवा. मग तुम्ही भारतासाठी कार्य करीत असा वा नसा. वेदांत माना किंवा नका मानू. जसे हत्तीची सोंड एकदा बाहेर आल्यावर पुन्हा आत जात नाही, त्याचप्रमाणे खऱ्या पुरुषाच्या मुखातून एकदा बाहेर पडलेले शब्दासाठी तो कधी माघार घेत नाही. त्यानुसार माझे तुम्हाला अभिवचन आहे.
याबरोबरच तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे. तुम्हाला कुमारी मुलर किंवा आणखी कोणाच्या पंखाखाली किंवा आश्रयाने वावरणे योग्य होणार नाही. मुलर तशी एक चांगली स्त्री आहे. परंतु तिच्या डोक्यात आपण जन्मजात पुढारी असल्याचे वारे शिरल्यामुळे, मुलरला वाटते की, इतर गुणांपेक्षा फक्त पैशाचेच महत्त्व आहे.
या भारत देशातील लोकांचा तिरस्कार न करणारे इंग्रज म्हणजे फक्त सेव्हियर पती-पत्नी होय! श्रीमती सेव्हीयर तर एक स्त्रीरत्नच आहे. त्या अतिशय चांगल्या व दयाळू, सहिष्णू वृत्तीच्या आहेत. तुम्ही इथे आल्यावर त्यांना तुमच्याबरोबर कामाला घेऊ शकाल. तसे झाले तर तुम्हा दोघी मिळून कार्याला चांगली गती येऊ उत्तम कार्य घडू शकेल.
वरील सर्व विवेचन निवेदिता भारतात येण्यापूर्वीचे होते. त्यांची भारतात येण्याची पूर्वतयारी झाली होती.
आता त्यांच्या संबंधी बघूया…
आयर्लंड मधल्या एका दुरच्या खेड्यातील एका धर्मगुरूची पत्नी गरोदर होती. आपल्या या प्रथम आपत्याचा जन्म सुरळीत व सुखरुप होईल की नाही याबद्दल ती शासंक होती. तिने नवस केला की, जर हे मूल सुरक्षितपणे जन्माला आले, तर देवाच्या सेवाकार्यासाठी वाहून टाकेन. आणि हे मूल आईच्या गर्भात असताना ईश्वराला समर्पित केले होते. तेच हे मूल पुढे भगिनी निवेदिता विश्वव्याख्यात संन्याशी स्वामी विवेकानंदांची धर्मकन्या निवेदिता म्हणून प्रसिद्धी पावली.
निवेदितांचा जन्म २८ ऑक्टोबर १८६७ ला उत्तर आयलँड मधील डुंगॅनन या छोट्या गावी झाला. त्यांचे नाव ठेवले ” मार्गारेट एलिझाबेथ नोबेल.” त्यांचे वडील रेव्हरंड सॅम्युएल रिचर्ड नोबेल धर्मगुरू होते. आईचे नाव होते मिसेस मेरी इझाबेल नोबेल.
निवेदिता अवघी दहा वर्षाच्या असतानाच वडिलांचा १८७७ मध्ये मृत्यू झाला. त्यांचे पालन पोषण त्यांचे आजोबा (आईचे वडिल) हॅमिल्टनांनी केले. हॅमिल्टन आयलँड मधील स्वतंत्र चळवळीतील मुख्य नेत्यांपैकी एक होते.
निवेदितांवर आपल्या वाडवडिलांचे संस्कार आणि आजोबा हॅमिल्टनांचे जीवन आदर्शाचा प्रभाव पडला होता. परिणामी त्यांच्यात सत्यनिष्ठता, धर्मशीलता, राष्ट्रीय भक्ती आणि राजकारणाचा ओढा इत्यादी गुण विकसित झाले.
मार्गारिटचे प्राथमिक शिक्षण लंडनमध्ये धर्मशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या चर्चगेट बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. मार्गरेट अतिशय तीव्र बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी शालेय अभ्यासाबरोबरच संगीत, ललितकला, पदार्थ विज्ञान, वनस्पती विज्ञान याचाही अभ्यास केला. १८८४ मध्ये विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. आणि केसविक येथे अध्यापण कार्याला सुरुवात केली.
त्यांनी आपले शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर काहीच काळानंतर बिल्डनला शाळा काढून स्वतःच्या पद्धतीने वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. थोड्याच दिवसात एक आदर्श, निष्णात शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती दूरवर पसरली.
एकीकडे त्या शाळा चालवित होत्या, तर दुसरीकडे निरनिराळ्या नियतकालिका व वृत्तपत्रांमधून लेख लिहून पाठवणे सुरू होते. अल्पावधीतच त्या लंडनमधील विद्वान मंडळीच्या वर्तुळात एक प्रतिभावंत लेखिका म्हणून स्थान निर्माण केले. शिवाय चर्चच्या सेवाकार्यात देखील सहभागी होत होत्या. अगदी बालपणापासूनच त्यांच्या कल धर्माकडे होता. परंतु त्यांना धार्मिक जीवनातून अपेक्षित आत्मिक, आंतरिक शांती मिळत नव्हती. त्यामुळे त्या अस्वस्थ राहत होत्या. धर्मग्रंथाचे वाचन करून धर्माविषयीचे सत्य जाणण्याचा प्रयत्न केला. तरी त्यांना मन शांती मिळेना. त्यामुळे त्या उदासीनतेच्या भावनेने ग्रासल्या गेल्या.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
==================== भाग – ३ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – ३.
निवेदितांच्या मनातील उदासीनता, हृदयातील अशांतता स्वामी विवेकानंदाची भेट होईपर्यंत दूर झाली नव्हती.
एक दिवस संध्याकाळच्या वेळी नोव्हेंबर १८९५ मध्ये लंडनमधील एका सनातनी कुटुंबाच्या घरी दिवाणखान्यात स्वामी विवेकानंदाचे तत्वज्ञानावर प्रवचन चालू होते. त्याचवेळी मार्गारेट तिथे आल्या. हीच त्यांची व स्वामीजींची प्रथम भेट! या संन्यासाच्या तत्त्वज्ञान विश्लेषणाने आणि उमद्या व्यक्तीमत्वाने त्या प्रभावित झाल्या. त्यानंतर लंडनमध्ये होणाऱ्या स्वामीजींच्या प्रत्येक व्याख्यानांना आणि प्रश्नोत्तर वर्गाला आवर्जून उपस्थित राहू लागल्या. त्यांनी स्वामीजींचे प्रत्येक प्रवचन अगदी एकाग्रतेने ऐकली. त्याबद्दल मनात आलेल्या शंकावर प्रश्न विचारून आपली जिज्ञासा शमवून घेतली. आणि स्वामीजींनी व्यक्त केलेल्या विचारांवर चिंतन मननही केले.
शेवटी त्यांना कळून आले की, आपण ज्या सत्याच्या शोधात आहोत त्या सत्याच्या मार्गाकडे केवळ आणि केवळ हा भारतीय संन्याशीच आपल्याला नेऊ शकतो. मार्गारेटने आपला परमगुरु म्हणून स्वामी विवेकानंदांचा स्वीकार केला. स्वामीजींना देखील मार्गरेटमध्ये असलेल्या सत्यनिष्ठा, दृढनिश्चय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या हृदयात असलेली करुणाद्रता इत्यादी गुणांची जाणीव होऊन खात्री पटली.
भारतातील जनता दास्यत्वात जीवन कंठत असलेल्या दैन्य दारिद्र्यामुळे स्वामींना अतिशय वाईट वाटत होते. त्यांच्या मनाला यातना होत असे. भारताला एक राष्ट्र म्हणून उभे करण्यासाठी सामान्य जनता आणि स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा करणे गरजेचे आहे असे त्यांना वाटत असे. त्यासाठी स्त्रियांची स्थिती सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना शिक्षित करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे. ज्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यास त्या सक्षम होतील असे स्वामीजींचे मत होते, या कार्या साठी मार्गारेट हीच व्यक्ती योग्य आहे असा विचार करून स्वामींनी त्यांच्यासमोर भारतातील स्त्रियांची शोचनिय परिस्थिती, दैन्य दारिद्र, ब्रिटिशांचे वर्चस्व व त्यांचे जुलून इत्यादी सर्व गोष्टींची जाणीव देऊन भारतात स्त्रियांच्या उध्दारासाठी येण्याचे आवाहन दिले.
मार्गारेटनेही स्वामीजींचे आव्हान स्वीकारून आपली मातृभूमी, आपला परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी, आपले स्थिरस्थावर असलेले जीवन सगळं सोडून त्या स्वामीजींच्या राष्ट्रबांधणीच्या कार्यात सहाय्यभूत होण्यासाठी २८ जानेवारी १८९८ रोजी भारतात आल्या.
भारतात आल्यावर सर्वप्रथम भारताची ओळख करून घेणे गरजेचे होते. त्यादृष्टीने स्वामींनी त्यांना भारताचा इतिहास, भारताचे तत्त्वज्ञान, साहित्य, जनसामान्याचे जीवन, सामाजिक परंपरा याचबरोबर भारताच्या प्राचीन व आधुनिक अशा दोन्ही कालखंडातील महान व्यक्तींची जीवनचरित्रे इत्यादी बाबतची माहिती समजावून दिली.
स्वामींनी मार्गारेट समोर अध्यात्मिक परंपरेत ऐश्वर्यसंपन्न असणाऱ्या त्यागी आणि तपसेत महनीय असणाऱ्या शाश्वत भारताची प्रतिमा उभी केली. त्याचबरोबर स्वामींनी त्याच भारताची दारिद्र्याने गांजलेली, अंधश्रद्धांच्या जाळ्यात गुरफटलेली पराधीन लोकांची साक्षात प्रतिमाही मार्गारेट समोर उभी केली. हे सर्व एकूण मार्गारेट भारतीय जनतेवर प्रेम करू लागल्या. आणि भारतीय जीवन प्रणाली अवलंबण्यातची अदम्य इच्छाशक्ती जोर धरू लागली.
मार्गारेट भारतात आल्यावर स्वामिनी त्यांना १७ मार्च १८९८ रोजी सारदामाते समोर उपस्थित केले. सारदादेवीचे प्रेममधुर बोलणे ऐकून मार्गारिटला आपल्याला आईच मिळाल्याचा आनंद झाला. आणि सारदादेवींनीही आपली कन्या म्हणून तिचा स्वीकार केला.
माताजी म्हणजे एक वात्सल्यमय प्रेममूर्ती, शुद्धता, बोलण्यातील मधुरता, गोडवा स्वभावातील सरलता, अतुल ज्ञान हे सर्व विधात्याची त्यांना दिलेली देणगीच होय! हे सर्व पाहून मार्गारिट माताजींची लाडकी “खुकी” ( लहान मुलगी) झाल्याची भावना मार्गारेटच्या ह्रदयात निर्माण झाली.
काही दिवसांनी स्वामी विवेकानंदांनी २५ मार्च १८९८ ला मार्गारेटला ब्रह्मचर्य दीक्षा दिली. “निवेदिता” असे नामकरण केले. आणि ब्रह्मचर्य व्रताचे कठोर पालन करून भगवान बुद्धाप्रमाणे आपले जीवन बहुजन हिताय वाहून देण्याचा उपदेश केला.
यानंतर निविदितांनी संपूर्ण जीवन भारतमातेच्या कल्याणार्थ वाहून देण्याचे जीवित ध्येय ठरले. भारताची सेवा हीच संपूर्ण मानवतेची सेवा होय असे मानले.
स्वामीजींच्या इच्छेनुसार निवेदितांनी कोलकात्याच्या बोसपाडा लेनमध्ये १३ नोव्हेंबर १८९८ मध्ये शाळा काढली. या शाळेचे उद्घाटन सारदा मातेच्या हस्ते झाले. स्वामीजींच्या ध्येयानुसार व भारताच्या राष्ट्रीय आदर्शाच्या दृष्टिकोनातून मार्गारेटने स्त्री शिक्षणाचे कार्य करण्यात सुरुवात केली.
४ जुलै १९०२ मध्ये स्वामी विवेकानंदांनी या मर्त्य जगाचा निरोप घेतला. परंतु निवेदिताला शोक करण्यास, दुःख करण्यासही सवड मिळाली नाही.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
==================== भाग – ४ ====================
हा भाग क्रमांक ४ या उपलब्ध WhatsApp संग्रहात उपलब्ध नाही.
==================== भाग – ५ ====================
!!! भगिनी निवेदिता !!!
भाग – ५.
भारतातील प्रमुख आघाडीच्या नेत्यांशीही निवेदिता सबंध ठेवून होत्या. भारतीय जनतेने आपसातील मतभेद विसरून विदेशी सत्तेशी एकजुटीने लढा द्यावा हा कसोशीने प्रयत्न त्या करत होत्या. एवढे सर्व करताना आपण स्वतः चळवळी नेत्याची भूमिका स्वीकारण्याची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती. उलट विवेकानंद प्रमाणे निवेदितांनाही वाटायची की, जे जन्माने, वंश परंपरेने भारतीय आहेत त्यांनीच हे पद सांभाळावे. निवेदितांच्या राजकारणातील सहभागामुळे ब्रिटिशांच्या मनात त्यांच्याविषयी संशय येऊ लागला .त्यामुळे त्यांना कित्येक वेळा ब्रिटिशांची नजर चुकवण्यासाठी गुप्तपणे वावरावे लागत असे.
निवेदिताने मनापासून भारत देशाचा स्वीकार केला होता. त्यामुळे भारतीय जनतेच्या सुखदुःखात, आपत्तीच्या काळात स्वतःच्या प्राण्याची पर्वा न करता त्या कार्य, सेवा करीत असत.
१८९९ मध्ये कोलकात्त्यात प्लेगच्या साथीचा उद्रेक झाला. त्यावेळी स्वामी विवेकानंदांच्या आदेशानुसार, निवेदतांनी रामकृष्ण मिशनच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. स्वामींच्या नेतृत्वाखाली प्लेग झालेल्या रुग्णांची सेवा करू लागल्या. प्लेगचीसाथ पसरलेल्या गलिच्छ वस्त्यांमध्ये जाऊन स्वच्छता मोहीम सुरू केली. त्या स्वतः हातात झाडू, टोपली घेऊन स्वच्छता करीत असत. घाणीने बरबटलेल्या प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करील. वास्तविक प्लेगचा संसर्ग म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूलाच कवटाळण्यासारखे होते. तरीसुद्धा त्या प्राणाची पर्वा न करता प्रत्यक्ष सहभाग घेऊ लागल्या. ते पाहून अनेक तरुणांनी प्लेग निवारण कार्यात भाग घेऊ लागले.
त्या कोलकत्यातील बोसापाडा मोहल्यात राहत होत्या. तेथील शेजारीपाजारी व आजूबाजूच्या लोकांच्या सुखदुःखात, अडीअडचणीत त्या कायम सहभागी होत असत. त्यामुळे त्या लोकांना निवेदिता ह्या आपल्यापैकीच एक आहेत असे वाटायचे.
रामकृष्ण परमहंसांच्या स्त्रीभक्तामध्ये गोपालेर मांचे एक विशेष स्थान होते. त्या ब्राह्मण कुटुंबातील होत्या. त्या कडव्या सनातनी चालीरीती सांभाळणाऱ्या विधवा होत्या. त्या श्रीकृष्णाची पूजा मनोभावे करीत. रामकृष्ण परमहंसामध्ये त्यांना श्रीकृष्णाचे दर्शन झाले होते. त्यामुळे त्या त्यांना “गोपाल” म्हणूनच संबोधित असत. असे असले तरी रामकृष्ण आणि सारदादेवी हे दोघे पती-पत्नी मात्र गोपालेर यांना आपली माताच मानत. त्यांच्या वृध्दकाळी आजारी होऊन असहाय्य झाल्या, तेव्हा निवेदिताने त्यांना आपल्या जवळ नेऊन त्यांची शुश्रूषा केली. आणि गोपालेर मां एवढ्या कडव्या सनातनी असून निवेदितांची सेवा स्वीकारली.
भारतीय जनतेवरील निवेदितांचे प्रेम आजोड होते. पूर्व बंगालमध्ये मोठा पूर आला. पाठोपाठ दुष्काळाने थैमान मांडले. त्यावेळी निवेदिता आपल्या काही साथीदारांसह तेथील संकटात सापडलेल्या लोकांच्या सहाय्यार्थ तातडीने मदतीस धावल्या. चिखल पावसा पाण्याची पर्वा न करता त्या थेट सामान्य माणसांच्या घरापर्यंत पोहोचल्या. आणि आपत्तीग्रस्तांची मदत करून त्यांना दिलासा दिला. आपत्तीग्रस्तांनी सुद्धा निवेदितांना आपले म्हणून त्यांच्या सेवेचा स्वीकार केला.
स्वामी विवेकानंदांची इच्छा होती की, भारतामध्ये विज्ञानाचे बीजारोपण होणे फार महत्त्वाचे आहे. वेदांत आणि विज्ञान याच्या एकत्रिकरणाने भारत एक आदर्श राष्ट्र म्हणून विकसित होईल. वेदांत विचाराने मनुष्याची आंतरिक शुध्दी आणि विज्ञान विचाराने त्यांचे बाह्य जीवन सौंदर्यपूर्ण बनावे, स्वामीजींच्या जीवन काळातच जगदीशचंद्र बसू या वैज्ञानिकाने आपल्या वैज्ञानिक संशोधनाने जगात खळबळ माजवली होती. स्वामीजींना जगदीशचंद्र बसूबद्दल अत्यंत आदर, अभिमान होता. बसूंना या पराधीन भारत राष्ट्रात आपले शोध कार्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत करावे लागत होते. ज्या सन्मानास बसू पात्र होते, तो सन्मान त्यांना जगातले वैज्ञानिक द्यायला तयार नव्हते. त्यांना आपले संशोधन अत्यंत वाईट परिस्थितीत, आर्थिक चणचणीमध्ये करावे लागत होते. विदेशी सरकार त्यांना मदत करण्यास तयार नव्हती.
निवेदिता बसूंच्या कार्याची महती जाणून होत्या. त्या बसुंना मदत करण्यास पुढे सरसावल्या. आपले वजन वापरून त्यांनी बसूंना सरकारकडून अनेक सुविधा, सवलती व सहाय्य मिळवून दिले. तसेच नियतकालिकांमध्ये लेख लिहून त्यांच्या शोध कार्याचा प्रचार करू लागल्या. बसूंचे हे शोध कार्य बरेच खर्चिक असल्यामुळे निवेदिता त्यांना आर्थिक मदतही उपलब्ध करून देत होत्या. ज्यावेळी जगदीशचंद्र बसू आजारी पडले, तेव्हा निवेदितांनी पुत्रवत त्यांची सुश्रूशाही केली. जगदीशचंद्र बसूंना त्या एक राष्ट्रीय ठेवा समजत. त्या बसूंवर पुत्रवत प्रेम करीत होत्या. त्या त्यांना “खोका” ( लहान मुल) म्हणत. जर निवेदितांची प्रेरणा, मदत मिळाली नसती तर जगदीशचंद्र बसू आपले वैज्ञानिक शोध कार्य बहुतेक पूर्ण करू शकले नसते. त्या बसू कुटुंबाचाच एक घटक झाल्या होत्या.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
