
२३ सप्टेंबर, दिवस २६६ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ३२६ ते ३५० + सार्थ तुकाराम गाथा अभंग ३१८१ ते ३१९२
“२३ सप्टेंबर ” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 23 September
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक २३ सप्टेंबर असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३१८१ ते ३१९२ चे पारायण आपण करणार आहोत.
२३ सप्टेंबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा, ओवी ३२६ ते ३५०,
326-16
आणि आग्रहा तोचि ठावो । वरी मौढ्या{ऐ}सा सावावो । मग काय वानू निर्वाहो । निश्चयाचा ॥326॥ ऐसा
मुळात आग्रही स्वभाव आणि त्यात मूर्खपणाची भर, मग अशा स्थितीत होणाऱ्या दुराग्रही निश्चयाचे कोठवर वर्णन करावे ? 26
327-16
जिही परोपतापु घडे । परावा जीवु रगडे । तिही कर्मी होऊनि गाढे । जन्मवृत्ती ॥327॥
ज्याने दुसऱ्याला पीडा होईल किंवा ज्यांच्या जीवाला धोका पोचेल अशा कर्माविषयी ज्यांची जन्मत:च प्रवृत्ति असते. 27
328-16
मग आपुले केले फोकारिती । आणि जगाते धिक्कारिती । दाही दिशी पसरिती । स्पृहाजाळ ॥328॥
मग आपल्या कृत्यांची चहूकडे बढाई मिरवितात आणि साऱ्या जगाला तुच्छ लेखतात आणि आपल्या इच्छा दाही दिशांकडे मोकळ्या सोडतात. 28
329-16
ऐसेनि गा आटोपे । थोरिये आणती पापे । धर्मधेनु खुरपे । सुटले जैसे ॥329॥
देवाप्रीत्यर्थ मोकळी सोडलेली गाय जशी निष्प्रतिबंध वाटेल तिकडे चरते, त्याप्रमाणे अशा अभिमानाच्या वृत्तीने आपली पापे वाढवीत जातात. 29
चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥16. 11॥
330-16
याचि एका आयती । तयाचिया कर्मप्रवृत्ती । आणि जिणियाही परौती । वाहती चिंता ॥330॥
अशाच प्रकारच्या पापसाधनांनी त्यांची सर्व कर्मप्रवृत्ति असते आणि ज्यांचे चित्त मरेपर्यंत (परौती-पर्यंत) असंख्य चिंतांनी व्याप्त असते. 330
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
331-16
पाताळाहूनि निम्न । जियेचिये उंचीये साने गगन । जे पाहाता त्रिभुवन । अणुही नोहे ॥331॥
या चिंतेचे स्वरूप पाहू जाता ते पाताळाहून खोल व गगनापेक्षाही उंच असून तिच्यापुढे विश्वाला अणूचीही उपमा शोभत नाही. (इतकी ती मोठी असते) 31
332-16
ते योगपटाची मवणी । जीवी अनियम चिंतवणी । जे सांडू नेणे मरणी । वल्लभा जैसी ॥332॥
संन्यासाच्या योगपट दीक्षेस नियम व माप आहे; पण ह्यांची ही भोगपट चिंता हिला नियम नाही व मापही नाही; पतिव्रता स्त्री पतीला जशी कधीही अंतर देत नाही, तशी ही चिंता ह्यांना मरणापर्यंत सोडीत नाही. 32
333-16
तैसी चिंता अपार । वाढविती निरंतर । जीवी सूनि असार । विषयादिक ॥333॥
तसेच, असार अशा विषयांदिकांची मनात लालसा धरून त्यांच्या प्राप्तीविषयींची अपार चिंता हे नित्य वाढवितात. 33
334-16
स्त्रिया गाइले आइकावे । स्त्रीरूप डोळा देखावे । सर्वेंद्रिये आलिंगावे । स्त्रियेतेचि ॥334॥
स्त्रीचे गाणे ऐकावे, तिचे सौंदर्य पाहावे. व सर्वागाने तिलाच आलिंगन द्यावे. 34
335-16
कुरवंडी कीजे अमृते । ऐसे सुख स्त्रियेपरौते । नाहीचि म्हणौनि चित्ते । निश्चयो केला ॥335॥
ज्यावरून अमृतही ओवाळून टाकावे अशा स्त्रीच्या भोगापरते दुसरे सुखच नाही असा त्यांच्या मनाचा निश्चय झालेला असतो. 35
336-16
मग तयाचि स्त्रीभोगा- । लागी पाताळ स्वर्गा । धावती दिग्विभागा । परौतेही ॥336॥
मग त्याच स्त्रीभोग प्राप्तीसाठी, स्वर्ग, पाताळ किंवा वाटेल त्या दिशेला धावण्याची त्यांची तयारी असते. 36
आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायाणाः ।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ॥16. 12॥
337-16
आमिषकवळु थोरी आशा । न विचारिता गिळी मासा । तैसे कीजे विषयाशा । तयासि गा ॥337॥
मोठया आशेने गळाला लावलेले आमिष काहीही विचार न करता मासा गिळतो व नाश पावतो, तशी विषयांची आशा ह्या जीवांची स्थिति करिते. 37
338-16
वांछित तव न पवती । मग कोरडियेचि आशेची संतती । वाढऊ वाढऊ होती । कोशकिडे ॥338॥
त्यांना इच्छित विषय तर कधी प्राप्त होत नाहीतच, पण नुसत्या कोरडया आशेचे मनोरे रचून कोशकीटकाप्रमाणे बंधन मात्र पावतात. 38
339-16
आणि पसरिला अभिलाषु । अपूर्णु होय तोचि द्वेषु । एवं कामक्रोधांहूनि अधिकु । पुरुषार्थु नाही ॥339॥
आणि केलेली अभिलाषा अपूर्ण राहिली की त्यामुळेच चित्तांत द्वेष उत्पन्न होतो; एवंच काम आणि क्रोध ह्यावाचून अधिक कोणताच पुरुषार्थ त्यांच्या पदरात पडत नाही. 39
340-16
दिहा खोलणे रात्री जागोवा । ठाणांतरीया जैसा पांडवा । अहोरात्रीही विसावा । भेटेचिना ॥340॥
अर्जुना, ठाणेदाराला ज्याप्रमाणे दिवसा कामगिरी व रात्री पहारा, मिळून अहोरात्र विसावा मिळतच नाही. 340
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
341-16
तैसे उंचौनि लोटिले कामे । नेहटती क्रोधाचिये ढेमे । तरी रागद्वेष प्रेमे । न माती केही ॥341॥
तसेच, मोठमोठया आशेच्या पर्वतांवरून खाली क्रोधाच्या टेकडयांवर आदळले (निराशेने क्रोधाविष्ट झाले) तरी, विषयांविषयींचे प्रेम इतके अनावर असते की त्या विषयीचे रागद्वेष कोठेही मावत नाहीत. 41
342-16
तेवीचि जीवीचिया हावा । विषयवासनांचा मेळावा । केला तरी भोगावा । अर्थे की ना ? ॥342॥
त्याचप्रमाणे मनात वाटेल तेवढे विषयभोगाचे बेत जुळविले तरी ते भोगणेकरिता तर द्रव्य पाहिजे की नको ? 42
343-16
म्हणौनि भोगावयाजोगा । पुरता अर्थु पै गा । आणावया जगा । झोंबती सैरा ॥343॥
म्हणून त्या वांच्छित भोगास लागणारे द्रव्य मिळविणेसाठी मग ते जगांतील लोकांना उपद्रव देण्यास सुरवात करतात. 43
344-16
एकाते साधूनि मारिती । एकाचि सर्वस्वे हरिती । एकालागी उभारिती । अपाययंत्रे ॥344॥
एखाद्याला खिंडीत गाठून मारतात, एखाद्याला फसवून त्याचे सर्वस्व लांबवितात, व एखाद्याच्या घातासाठी अघोरी मंत्रादि उपायही योजितात. 44
345-16
पाशिके पोती वागुरा । सुणी ससाणे चिकाटी खोंचारा । घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसे ॥345॥
पारधी रानात शिकारीसाठी जातांना ज्याप्रमाणे बरोबर पाश, पोती, जाळी, शिकारी कुत्रे, ससाणे, घोरपडी व भाले वगैरे घेतात. 45
346-16
ते पोसावया पोट । मारूनि प्राणियांचे संघाट । आणिती ऐसे निकृष्ट । तेही करिती ॥346॥
आणि आपले पोट भरण्यासाठी ते जसे अनेक प्राणी ठार मारितात, तसलेच दुष्ट कृत्य हे आसुरी संपत्तीचे लोकही (द्रव्यप्राप्तीसाठी) करितात. 46
347-16
परप्राणघाते । मेळविती वित्ते । मिळाल्या चित्ते । तोषणे कैसे ॥347॥
आणि ह्याप्रमाणे दुसऱ्यांचा प्राणघात करून मिळविलेल्या द्रव्याने चित्ताचे कसे समाधान करून घेतात म्हणशील तर असे. 47
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥16. 13॥
348-16
म्हणे आजि मिया । संपत्ति बहुतेकांचिया । आपुल्या हाती केलिया । धन्यु ना मी ? ॥348॥
तो म्हणतो, ” आज मी कित्येकांचे द्रव्य आपल्या हाती हस्तगत करून घेतले आहे, तेव्हा बरोबर मी धन्य नाही काय ? ” 48
349-16
ऐसा श्लाघो जव जाये । तव मन आणीकही वाहे । सवेचि म्हणे पाहे । आणिकांचेही आणू ॥349॥
अशी स्वतःपाशीच प्रौढीची भाषा चालू असतांना त्याच्या मनात दुसरे असे विचार येतात की, असेच इतरांचेही आणखी द्रव्य मिळवून आणावे. 49
350-16
हे जेतुले असे जोडिले । तयाचेनि भांडवले । लाभा घेईन उरले । चराचर हे ॥350॥
आजवर जेवढे मिळविले आहे, त्या भांडवलावर आणखी जेवढे स्थावरजंगम मिळविता येण्यासारखे उरले असेल तेवढे जोडीन. 350
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २६६ वा. २३, सप्टेंबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३१८१ ते ३१९२
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३१८१
नर नारी बाळे अवघा नारायण । ऐसे माझे मन करी देवा ॥१॥
न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥धृपद॥
असावे म्या सदा विषयी विरक्त । काया वाचा चित्त तुझे पायी ॥२॥
करोनिया साह्य पुरवी मनोरथ । व्हावे कृपावंत तुका म्हणे ॥३॥
अर्थ
देवा सर्व स्त्री पुरुष लहान बाळे ही नारायणाचीच रुप आहेत असे मला वाटावे असेच तू कर. काम, क्रोध, व्देष, निंदा याप्रकारचे व्दंव्द माझ्या मनामध्ये येऊ देऊ नका आणि सर्वत्र गोविंदच आहे अशी निसंदेह भावना माझ्या मनामध्ये यावी. देवा मी नेहमी विषयी विरक्त विषयापासून वेगळा असावा माझी काया, वाचा आणि मन नेहमी तुझ्या पायाच्याजवळच असावे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा तू कृपावंत हो आणि मला साहाय्य करुन माझे मनोरथ तू पूर्ण कर. ”
3:17
अभंग क्र. ३१८२
जगी कीर्ति व्हावी । म्हणोनी जालासी गोसावी ॥१॥
बहुत केले पाठांतर । वर्म राहिलेसे दूर ॥धृपद॥
चित्ती नाही अनुताप । लटिके भगवे स्वरूप ॥२॥
तुका म्हणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥३॥
अर्थ
जगामध्ये आपली किर्ती व्हावी यासाठीच तू गोसावी झालास. तू आतापर्यंत खूप वेदाचे अनेक ग्रंथांचे पाठांतर केलेस परंतू देवाला प्राप्त करुन घेण्याचे खरे वर्म तर तुझ्यापासून दूरच राहिले आहे. अरे तुझ्या चित्तामध्ये तू केलेल्या कर्माचा अजूनही पश्चात्ताप नाही परंतू वरवर तू भगवे वस्त्र नेसून साधूचा खोटा वेश घेतला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे शिंदळीच्या तू वेदाचे व अनेक ग्रंथांचे पाठांतर करुन आपल्या वाणीला व्यर्थ श्रम दिला आहे. ”
3:17
अभंग क्र. ३१८३
प्राक्तनाच्या योगे आळशावरी गंगा । स्नान काय जगा करू नये ॥१॥
उभी कामधेनु मांगाचे अंगणी । तिसी काय ब्राम्हणी वंदू नये ॥धृपद॥
कोढियाचे हाते परिसे होय सोने । अपवित्र म्हणोन घेऊ नये ॥२॥
यातिहीन झाला गावीचा मोकासी । त्याच्या वचनासी मानू नये ॥३॥
भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांची तोंडे काळी ॥४॥
अर्थ
चांगले योग आल्यानंतर आळशाच्या कल्याणाकरता गंगा आली तर इतर लोकांनी त्यामध्ये स्नान करु नये काय ? एखादया मांग व्यक्तीच्या दारामध्ये कामधेनू उभी राहिली तर तिला ब्राम्हणाने वंदन करु नये काय ? एखादयाला कृष्ठरोग असेल व त्याच्या हातामध्ये परीस असेल व त्या परीसाचा स्पर्श त्याने लोखंडाला केला व त्या लोखंडाचे सोने झाले तर ते सोने अपवित्र आहे असे म्हणून ते घेऊ नये काय ? गावचा अधिकारी जरी हीन जातीचा असला तरी त्याची आज्ञा मानू नये काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “त्याप्रमाणे मी नीच जातीतील म्हणजे कुणबीमध्ये जन्माला जरी आलो असलो तरी मी भक्तीभावावर आरुढ झालेलो आहे आणि माझ्याजवळ विठोबाची मुद्रा म्हणजे शिक्का आहे त्यामुळे माझा उपदेश सर्वानी मान्य करावा कारण तो जगाच्या हितासाठी आहे जे कोणी माझा उपदेश मानणार नाहीत त्यांचे तोंड काळे होतील. ”
3:17
अभंग क्र. ३१८४
बोलिलो उत्कर्षे । प्रेमरस दासत्वे ॥१॥
साच करिता नारायण । जया शरण गेलो तो ॥धृपद॥
समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥२॥
तुका म्हणे लडिवाळाचे । द्यावे साचे करूनिया ॥३॥
अर्थ
मी उत्कर्षाने परंतू प्रेमरसामध्ये दास्यत्वाच्या नात्याने जे काही बोललो आहे, तेच माझे बोलणे ज्या नारायणाला मी शरण गेलो आहे तोच खरे करील. तुकाराम महाराज म्हणतात, “त्या नारायणाला असे वाटते की, आपल्याला शरण आलेल्या लाडक्या भक्ताचे बोललेले वचन खरे करुन दाखवावे. ”
3:17
अभंग क्र. ३१८५
विचा केला ठोबा । म्हणोनि नांव तो विठोबा ॥१॥
का रे नेणा त्याचे नांव । काय वेदासि नाही ठाव ॥धृपद॥
शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग झाला ॥२॥
तुका म्हणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥३॥
अर्थ
“वि” म्हणजे भेद म्हणजेच जीव ब्रम्हातील भेद. “ठोबा” म्हणजे नाश म्हणजेच जीव ब्रम्हातील भेदाचा नाश किंवा “वि” म्हणजे गरुड आणि “ठोबा” म्हणजे आधार म्हणजेच गरुडाच्या आधाराने जो सर्वत्र फिरतो अशा भगवान विष्णूला देखील विठोबाच म्हणतात. अरे मग तुम्ही विठोबाचे नांव का घेत नाहीत त्याचे नांव का जाणून घेत नाहीत वेदाला विठोबाचे नांव माहित नाही काय तर आहे वेदाला विठोबाचे नांव माहित आहे. हजार मुख असणारा शेषनाग विठोबाची स्तुती करण्यासाठी पवृत्त झाला त्याने विठोबाची स्तुती केली परंतू विठोबाचे पूर्ण स्वरुप त्याला सांगता आले नाही सांगता सांगता त्याच्या जिव्हा फाटल्या मग तो विठोबाला शरण गेला व त्याचा पलंग झाला. तुकाराम महाराज म्हणतात, “अहो ज्याची सत्ता काळाच्या माथ्यावर आहे अशा देवाचे नांव विठोबा आहे व त्या विठोबाचे नांव तुम्ही आत्मस्वरुपाने जाणून घ्या व त्याचे स्मरण करत राहा. ”
3:17
अभंग क्र. ३१८६
चोरासी चांदणे वेश्येसी सेजार । परिसेंचि खापर काय होय ॥१॥
दुधाचे आधणी वैरिले पाषाण । कदा काळी जाण पाकनव्हे ॥२॥
तुका म्हणे जरि पूर्वपुण्ये सिद्धि । तरिच राहे बुद्धी संतसंगी ॥३॥
अर्थ
चोराला चांदणे, वेश्येला चांगला शेजारी जसा नको वाटतो अगदी त्याप्रमाणे खापराला जरी परीसाचा स्पर्श झाला तरी त्या खापराचे सोने काही होत नाही त्याप्रमाणे पापी मनुष्याला संतसज्जनांची संगती नको वाटते आणि समजा यदाकदाचित जरी झाली तरी त्याचा काय उपयोग होणार ? आदन आलेल्या दुधामध्ये जरी दगड टाकला तरी तो दगड कधीही शिजणार नाही हे जाणून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, “जर तुमचे पुर्वपुण्य सिध्द असेल तरच तुमची बुध्दी संतांच्या ठिकाणी स्थिर राहाते. ”
3:18
अभंग क्र. ३१८७
मथनासाठी धर्माधर्म । त्याचे वर्म नवनीत ॥१॥
तेचि ते घाटू नये । आले जाय नासूनि ॥धृपद॥
सांभाळावे वरावर । वर्म दूर नवजावे ॥२॥
तुका म्हणे धाले पोट । मग बोटचांटणी ॥३॥
अर्थ
दही मंथन करताना प्रयत्न केला जातो व त्या प्रयत्नाचे शेवटचे वर्म म्हणजे लोणी होय. एकदा की ताकावर लोणी आले की पुन्हा त्याला घोटू नये त्याचे पुन्हा मंथन करु नये जर मंथन केलेच तर आलेले लोणी देखील नासून जाते. एकदा की लोणी वर आले की ते अलगदपणे काढून घ्यावे अगदी त्याप्रमाणे हरीची प्राप्ती करुन घेण्यासाठी जे योग्य साधन आहे त्याचा अवलंब करावा त्या साधनेपासून आपण दूर जाऊ नये हे वर्म लक्षात ठेवावे. तुकाराम महाराज म्हणतात, “एकदा की जर पोट भरले तर मग बोटे चाटणे जसे व्यर्थ ठरते त्याप्रमाणे एकदा की जर हरीची प्राप्ती झाली की मग धर्माधर्माचे पालन करणे हे देखील व्यर्थच ठरते. ”
3:18
अभंग क्र. ३१८८
न घडे मायबापे बाळकाचा घात । आपणा देखत होऊ नेदी ॥१॥
का मी मनी चिंता वाहू भय धाक । काय नव्हे एक करिता तुज ॥धृपद॥
वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तहान भूक वाहे कडिये खांदी ॥२॥
तुका म्हणे तू गा कृपावंत भारी । ऐसे मज हरी कळो आले ॥३॥
अर्थ
आपल्या बालकाचा घात आईबाप कधीही करत नाहीत आणि आपल्या देखत देखील आपल्या बालकाचा घात होऊ देत नाहीत. त्यामुळे देवा मी माझ्या मनामध्ये उगाचच प्रपंचाची चिंता आणि काळाचे भय किंवा धाक व्यर्थ कशासाठी करत बसू अरे तू ठरवले तर काय करु शकत नाहीस ? आईबाप आपल्या मुलाचे हित कशात आहे, त्याच्या हिताचा उपाय नेमका कोणता, त्याच्या हिताचे वर्म कोणते हे सर्व जाणतात त्याची तहान भूक सर्व जाणतात चालताना आपले बालक थकले तर त्याला कडेवर खांदयावर घेऊन ते चालतात. तुकाराम महाराज म्हणतात, “हे हरी तू देखील असाच खूप कृपावंत आहेस हे मला कळले आहे. ”
3:18
अभंग क्र. ३१८९
करावे कीर्तन । मुखे गावे हरीचे गुण ॥१॥
मग काही नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ॥धृपद॥
शांति खड्ग हाती । काळासी ते नागविती ॥२॥
तुका म्हणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥३॥
अर्थ
हरीचे कीर्तन करावे व मुखाने हरीचे गुणगान गावे. मग त्याला दुर्जन अशा कामक्रोधाची बाधा होणे शक्य नाही. शांतीरुपी तलवार म्हणजे खडग ज्याच्या हातात आहे तो काळाला देखील नागवीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्याला अनंतासारखा दाता सखा म्हणून लाभला त्याला काय कमी पडणार आहे तर काहीच नाही. ”
3:19
अभंग क्र. ३१९०
साधनाच्या कोटी । केल्या आटी होत्या त्या ॥१॥
देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपी ॥धृपद॥
केले होती वृथा श्रम । उपरम न होता ॥२॥
तुका म्हणे कळो आले । सर्व जाले आपरूप ॥३॥
अर्थ
कोटयावधी साधने केले तरी व्यर्थच ठरत असतात. पण जर देवाने स्वत: कृपा केली तर त्याच्या स्वरुपाचे ज्ञान साधकाला होणे शक्य आहे. जर चित्तामध्ये वैराग्यच नसेल तर केलेले सर्व श्रम व्यर्थच होतात. तुकाराम महाराज म्हणतात, “पण माझ्यावर देवाची कृपा झाली व त्यामुळे मला देवाच्या स्वरुपाचे ज्ञान झाले आणि याच कारणामुळे मला सर्व जगच आत्मरुप झाले आहे. ”
3:19
अभंग क्र. ३१९१
तुज काय करू मज एक सार । अमृतसागर नाम तुझे ॥१॥
काय उणे आम्हा तयाचिये पोटी । गोविता हे कंठी कामधेनु ॥धृपद॥
नोळखे तानुले माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥२॥
जो नाही देखिला याचक नयनी । तो पावे घेउनि लज्जा दान ॥३॥
नामासाठी प्राण सांडियेला रणी । शूर ते भांडणी न फिरती ॥४॥
तुका म्हणे आम्ही गाता गीती भला । भेटूनी विठ्ठला काय चाड ॥५॥
अर्थ
अरे देवा तुझे मी काय करु ? माझ्यासाठी एकच सर्व काही आहे ते म्हणजे “अमृतापेक्षाही गोड असे तुझे नाम”. देवा तुझे नाम म्हणजे कामधेनू आहे त्या कामधेनूच्या पोटामध्ये काय कमी आहे आणि तीच नामरुपी कामधेनू आम्ही आमच्या कंठामध्ये बांधली आहे मग आम्हाला काय कमी पडणार आहे ? आपल्या तान्ह्या बालकाला ओळखणार नाही अशी कोणती माता आहे उलट तान्ह्या बालकाचे रडणे ऐकूनच ती माता त्याला प्रेमाने जवळ घेऊन स्तनपान देते. याचकाला पाहिले न पाहिले तोच त्याच्याकडे जाऊन जो दाता दान देतो तोच खरा दाता होय मग याचकाने कोणतेही दान मागितले तरी तो दान देण्यास लाजेल काय ? देवा जो आपले नाम राखण्यासाठी रणांगणामध्ये वेळप्रसंगी प्राणही देण्यास तयार होतो तो खरा शूर होय मग तो शूर व्यक्ती सामान्य भांडणामध्ये माघारी कधीही फिरत नाही त्याप्रमाणे देवा मी तुझे नाम नेहमी घेत राहीन मग कसाही प्रसंग असो. तुकाराम महाराज म्हणतात, “हे विठ्ठला अरे तुझे नाम गीतरुपाने गायिले तर आम्हाला ते अधिकच चांगले वाटतो मग तुला आम्ही भेटण्याची आवड तरी का धरावी ? ”
3:19
अभंग क्र. ३१९२
कृपेचे सागर हे साधुजन । तिही कृपादान केले मज ॥१॥
बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणे माझा स्थिर केला जीव ॥धृपद॥
तेणे सुखे मन स्थिर झाले ठायी । संती दिला पायी ठाव मज ॥२॥
नाभी नाभी ऐसे बोलिलो वचन । ते माझे कल्याण सर्वस्व ही ॥३॥
तुका म्हणे झालो आनंदेनिर्भर । नाम निरंतर घोष करू ॥४॥
अर्थ
हे साधूजण कृपेचे सागर आहेत त्यांनी मला कृपेचे दान दिले आहे. माझा अंगीकार करा असे मी बोबड्या शब्दात त्यांना विनंती केली तर त्यांनी माझा अंगीकार केला व माझा जीव स्थिर केला. संतांनी मला त्यांच्या पायाच्या ठिकाणी जागा दिली त्यामुळे माझे मन त्यांच्या पायाच्या ठिकाणी स्थिर झाले व त्यामुळे मला आत्मसुख प्राप्त झाले. संतांनी मला “भिऊ नको भिऊ नको” असे अभयवचन दिले त्यामुळे माझे सर्वस्व कल्याण झाले. तुकाराम महाराज म्हणतात, “मी आता आनंदाने पूर्णपणे भरुन गेलो आहे त्यामुळे मी निरंतर हरीच्या नामाचा घोष करीन. ”
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















