
१५ ऑक्टोबर, दिवस २८८ वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ४०१ ते ४३३ सार्थ तुकाराम गाथा अभंग ३४४५ ते ३४५६
“१५ ऑक्टोबर” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 15 October
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक १५ ऑक्टोबरअसून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १७ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग ३४४५ ते ३४५६ चे पारायण आपण करणार आहोत.
१५ ऑक्टोबर, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा, ओवी ४०१ ते ४३३,
401-17
पाहे पा ॐतत्सत् ऐसे । हे बोलणे तेथ नेतसे । जेथूनि का हे प्रकाशे । दृश्यजात ॥401॥
अरे, असे पहा, ‘ॐ तत्सत ” हा उच्चार तो करणाराला त्या स्थलाप्रत नेतो की जेथून किंवा ज्यायोगे ह्या दृश्यजाताला प्रकाश अथवा सत्ता प्राप्त होते. 1
402-17
ते तव निर्विशिष्ट । परब्रह्म चोखट । तयाचे हे आंतुवट । व्यंजक नाम ॥402॥
सर्व विशेषभावरहित जे केवल शुद्ध परब्रह्म त्यांचे ‘ॐ तत्सत्’ हे अखेरच्या खुणेचे वाचक नांव आहे. 2
403-17
परी आश्रयो आकाशा । आकाशचि का जैसा । या नामानामी आश्रयो तैसा । अभेदु असे ॥403॥
परंतु, आकाश अन्य कोणाच्या आधारावर नसून जसे स्वतःच्याच आधारावर स्थित आहे तसे ॐ तत्सत् नाम व नामी परब्रह्म ही अभेदत्वाने स्वरूपतः स्वाश्रयावरच किंवा आश्रयरहित स्थित आहेत. 3
404-17
उदयिला आकाशी । रवीचि रवीते प्रकाशी । हे नामव्यक्ती तैसी । ब्रह्मचि करी ॥404॥
आकाशात सूर्योदय झाला हे सूर्यप्रकाशानेच जाणले जाते; तसे हे नाम व नामी परब्रह्म हे स्वप्रकाशत्वाने अभेदरूपाने प्रकाशित आहे. 4
405-17
म्हणौनि त्र्यक्षर हे नाम । नव्हे जाण केवळ ब्रह्म । ययालागी कर्म । जे जे कीजे ॥405॥
म्हणून ॐ तत्सत् हे तीन अक्षरी नाम नांव नसून शुद्ध ब्रह्मच होय, म्हणून जे जे कर्म करिशील, 5
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥17. 27॥
406-17
ते याग अथवा दाने । तपादिकेंही गहने । तिये निफजतु का न्यूने । होऊनि ठातु ॥406॥
ते यज्ञकर्म असो, दान असो, अथवा तपादिकासारखे गहन कर्म असो; व ही सर्व कर्मे यथाविधि पार पडोत किंवा विकल होवोत. 6
407-17
परी परीसाचा वरकली । नाही चोखाकिडाची बोली । तैसी ब्रह्मी अर्पिता केली । ब्रह्मचि होती ॥407॥
परंतु परिसाच्या स्पर्शाने जे लोह सुवर्णत्व पावते त्या सोन्यात चांगलावाईटपणा कसून पाहाण्याचे कारण नसते, त्याप्रमाणे ॐ तत्सत् मंत्राणे ब्रह्मार्पण केलेली कर्मे ब्रह्मरूपच होतात. 7
408-17
उणिया पुरियाची परी । नुरेचि तेथ अवधारी । निवडू न येती सागरी । जैसिया नदी ॥408॥
लक्ष्यात असावे की, त्या कर्मात उणे पुरे असे काही राहातच नाही. उदा. नद्या एकदां समुद्रास मिळाल्यावर जसा त्यांचा चांगलेवाईटपणा अथवा पवित्र अपवित्रपणा वेगळा नसतो. 8
409-17
एवं पार्था तुजप्रती । ब्रह्मनामाची हे शक्ती । सांगितली उपपत्ती । डोळसा गा ॥409॥
त्याप्रमाणे हे बुद्धिमंत पार्था, ब्रह्मनामाच्या अंगी असलेली शक्ति तुला दृष्टांतपूर्वक सांगितली. 9
410-17
आणि येकेकाही अक्षरा । वेगळवेगळा वीरा । विनियोगु नागरा । बोलिलो रीती ॥410॥
आणि त्र्यक्षरी मंत्रांतील प्रत्येक अक्षराचा वेगवेगळयास्थली कसा विनियोग करावा ती रीतही सांगितली. 410
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
411-17
एवं ऐसे सुमहिम । म्हणौनि हे ब्रह्मनाम । आता जाणितले की सुवर्म । राया तुवा ? ॥411॥
अर्जुना, तुझ्या आता वर्म ध्यानात आले असेल की, अशी सर्वश्रेष्ठ व सुप्रसिद्ध जी वस्तु, त्याला बृहत् (मोठे) ह्या धातूच्या अर्थानुसार “ ब्रह्म ” हे नांव प्राप्त झाले. 11
412-17
तरी येथूनि याचि श्रद्धा । उपलविली हो सर्वदा । जयाचे जाले बंधा । उरो नेदी ॥412॥
तरी अर्जुना, इतःपर ह्या नामावर नित्य श्रद्धा ठेवून तू कर्म केली असता ती जन्मबंधास कारणीभूत होणार नाहीत. (तू मुक्त होशील) 12
413-17
जिये कर्मी हा प्रयोगु । अनुष्ठिजे सद्विनियोगु । तेथ अनुष्ठिला सांगु । वेदुचि तो ॥413॥
ज्या कर्मामध्ये ह्या मंत्राचा (प्रयोगाचा) यथाविधि विनियोग केला जातो तेथे सर्व वेदाचेच अनुष्ठान घडल्याचे श्रेय जोडले. 13
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् ।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥17. 28॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥17॥
अर्थ : ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील श्रद्धात्रयविभागयोग नावाचा हा सतरावा अध्याय समाप्त झाला. ॥17॥
414-17
ना सांडूनि हे सोये । मोडूनि श्रद्धेची बाहे । दुराग्रहाची त्राये । वाढऊनिया ॥414॥
नाहीतर, हा मार्ग सोडून, श्रद्धेचा त्याग करून, दुराग्रहाच्या भरी भरून 14
415-17
मग अश्वमेध कोडी कीजे । रत्ने भरोनि पृथ्वी दीजे । एकांगुष्ठीही तपिजे । तपसाहस्री ॥415॥
मग जरी करोडो अश्वमेध केले, रत्नपूर्ण पृथ्वी दान केले, किंवा एका अंगठयावर उभे राहून हजारो वर्षे कैक तपे केली. 15
416-17
जळाशयाचेनि नांवे । समुद्रही कीजती नवे । परी किंबहुना आघवे । वृथाचि ते ॥416॥
किंवा परोपकारार्थं समुद्रासारखे महान तलावादि (जलाशय) बांधिले तरी ते जणू सर्व व्यर्थ होय. 16
417-17
खडकावरी वर्षले । जैसे भस्मी हवन केले । का खेंव दिधले । साउलिये ॥417॥
खडकावर वृष्टि व्हाव, भस्मांत हवन करावे अथवा सावलीला आलिंगन देण्यास जावे, 17
418-17
नातरी जैसे चडकणा । गगना हाणितले अर्जुना । तैसा समारंभु सुना । गेलाचि तो ॥418॥
किंवा, अर्जुना, आकाशाला ठोसे मारावे त्याप्रमाणे ही सर्व कमे वृथा होतात. 18
419-17
घाणा गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे । तैसे दरिद्र तेवढे । ठेलेचि आंगी ॥419॥
घाण्यात पाषाणगोटे घालून गाळू गेले असता जसे तेल किंवा पेड (पेंड) काहीच मिळत नाही; त्याप्रमाणे ह्या कर्माची स्थिति होऊन व्यर्थ श्रम द्रव्यादि हानि मात्र होऊन दरिद्र जोडले जाते 19
420-17
गाठी बांधली खापरी । येथ अथवा पैलतीरी । न सरोनि जैसी मारी । उपवासी गा ॥420॥
पदरात खापऱ्या बांधून ह्या किंवा अन्य देशात गेले तरी त्यांचा द्रव्य म्हणून कोठेही स्वीकार न होऊन जशी उपाशी मरण्याची पाळी येते. 420
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
421-17
तैसे कर्मजाते तेणे । नाही ऐहिकीचे भोगणे । तेथ परत्र ते कवणे । अपेक्षावे ॥421॥
त्याप्रमाणे त्या सर्वही कर्मापासून ऐहिक भोगप्राप्तीही होणार नाहीं, तर तेथे पारलौकिक भोगांची कोणी आशा करावी ? 21
422-17
म्हणौनि ब्रह्मनामश्रद्धा । सांडूनि कीजे जो धांदा । हे असो सिणु नुसधा । दृष्टादृष्टी तो ॥422॥
म्हणून ब्रह्मनामवर श्रद्धा न ठेविता जे जे कर्म करावे ते दुष्टफलाला किंवा अदृष्टफलालाही कारण न होता केवळ शीणमात्र होय. 22
423-17
ऐसे कलुषकरिकेसरी । त्रितापतिमिरतमारी । श्रीवर वीर नरहरी । बोलिले तेणे ॥423॥
ह्याप्रमाणे, पातकरूप हत्तीचा अंतक सिंहरूप, त्रिविध तापरूपी अंधकारनाशक सूर्य, लक्ष्मीचा पति, वीर नरहरी जे भगवान् श्रीकृष्ण त्यांनी कथन केले. 23
424-17
तेथ निजानंदा बहुवसा- । माजी अर्जुन तो सहसा । हरपला चंद्रु जैसा । चांदिणेनि ॥424॥
पौणिमेला शुद्ध चांदण्यात चंद्रापेक्षां चांदणेच आकर्षक होऊन, चंद्र जसा काही हरपतो त्याप्रमाणे आत्मानंदाच्या भरतींत अर्जुन हरपल्याप्रमाणे म्हणजे देहभानविवर्जित झाला. 24
425-17
अहो संग्रामु हा वाणिया । मापे नाराचांचिया आणिया । सूनि माप घे मवणिया । जीवितेसी ॥425॥
अहो ! युद्धप्रसंग ही एक हिशेब घेणारी वाण्याची पेढी आहे. तेथे बाणांच्या अग्रांनी प्राणांतापर्यंत माप घेतेले जाते. 25
426-17
ऐसिया समयी कर्कशे । भोगीजत स्वानंदराज्य कैसे । आजि भाग्योदयो हा नसे । आनी ठाई ॥426॥
अहो, अशा घोर प्रसगी हा स्वानंदसाम्राज्य कसे भोगीत आहे पहा ! आज ह्याच्यासारखा भाग्याचा पुतळा दुसरा कोणीही दिसत नाही ! 26
427-17
संजयो म्हणे कौरवराया । गुणा रिझो ये रिपूचिया । आणि गुरुही हा आमुचिया । सुखाचा येथ ॥427॥
संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, शत्रुपक्षाचा खरा, पण ह्या अर्जुनाच्या गुणाचे कौतुक वाटते, इतकेच नव्हे तर हा आम्हासही सुख देणारा गुरूच जणु भेटला आहे. 27
428-17
हा न पुसता हे गोठी । तरी देवो का सोडिते गाठी । तरी कैसेनि आम्हा भेटी । परमार्थेसी ॥428॥
ह्याने देवांना ह्या गोष्टी विचारल्या नसत्या तर देवांना हे रहस्य सांगण्याचे काय कारण पडले होते ? व मग आमच्यासारख्यांना तरी परमार्थाच्या भेटीचा योग कसा येता ? 28
429-17
होतो अज्ञानाच्या आंधारा । वोसंतीत जन्मवाहरा । तो आत्मप्रकाशमंदिरा- । आंतु आणिले ॥429॥
अज्ञानांधकारांत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात होतो, त्या मला ह्याने आत्मप्रकाशमंदिरामध्ये आणून सोडले. 29
430-17
एवढा आम्हा तुम्हा थोरु । केला येणे उपकारु । म्हणौनि हा व्याससहोदरु । गुरुत्वे होय ॥430॥
तुमच्या आमच्यावर इतका मोठा उपकार अर्जुनाने केला आहे, म्हणून हा जणु श्रीव्यासांचा सहोदरच (बंधु) गुरुरूपाने अवतरलासा वाटतो. 430
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
431-17
तेवीचि संजयो म्हणे चित्ती । हा अतिशयो या नृपती । खुपेल म्हणौनि किती । बोलत असो ॥431॥
त्याचप्रमाणे संजयाला मनात असेही वाटले की, राजाला ही अर्जुनाची स्तुति खूपेल म्हणून किती बोलावी ? आता पुरे. 31
432-17
ऐसी हे बोली सांडिली । मग येरीचि गोठी आदरिली । जे पार्थे का पुसिली । श्रीकृष्णाते ॥432॥
म्हणून हा स्तुतिवाद सोडून, पार्थाने देवांना विचारलेल्या अन्य प्रश्नाकडे संजय वळला. 32
433-17
याचे जैसे का करणे । तैसे मीही करीन बोलणे । ऐकिजो ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥433॥
श्रीनिवृत्तिदास ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, अर्जुनाच्या गोड प्रश्नाचे मीही गोड व्याख्यान करितों. श्रवण करावे. 433
॥ इति श्रीज्ञानदेवविरचिताया भावार्थदीपिकायां श्रद्धात्रयविभागयोग योगोनाम सप्तदशोऽध्यायः ॥17॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ भग्वद्गीतगीता श्लोक :-28॥ ॥ ज्ञानेश्वरी ओव्या :- 433॥
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस २८८ वा. १५, ऑक्टोबर
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग ३४४५ ते ३४५६
सार्थ तुकाराम गाथा
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
अभंग क्र. ३४४५ (व्यभिचारिणी स्त्रीचें रूपक)
न राहे रसना बोलता आवडी । पायी दिली बुडी माझ्या मने ॥१॥
मानेल त्या तुम्ही अइका स्वभावे । मी तो माझ्याभावे अनुसरले ॥२॥
तुका म्हणे तुम्ही फिरावे बहुती । माझी तो हे गती झाली आता ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) परपुरुष जो श्रीहरी त्याच्याविषयी बोलताना माझ्या जीभेला राहावतच नाही सारखे त्याचे गुण वर्णन करतच राहाते आणि माझ्या मनाने देखील त्याच्या पायाच्या ठिकाणी बुडी दिली आहे. अहो तुम्हाला जर माझी गोष्ट सत्य वाटत असेल तरच तुम्ही खरी माना मी तर पूर्ण भावनेने त्याला अनुसरलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “ज्यांना परपरुष श्रीहरीकडे यायचे नसेल त्यांनी पुन्हा संसाररुपी नवऱ्याकडे परत मागे फिरावे तुम्ही खूप जणी आहात त्यामुळे मागे गेलात तरी चालेल परंतू मी माझ्या परपुरुषरुपी श्रीहरीला अनुसरले आहे ही अशी अवस्था आता माझी झालेली आहे. ”
अभंग क्र. ३४४६ (व्यभिचारिणी स्त्रीचें रूपक)
न बोलता तुम्हा कळो न ये गुज । म्हणउनी लाज साडियेली ॥१॥
आता तुम्हा पुढे जोडीतसे हात । नका कोणी अंत पाहो माझा ॥२॥
तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी । करील ते हरी पाहो आता ॥३॥
अर्थ
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात) मी परपुरुषाबरोबर श्रीहरीबरोबर रममाण झाले हे गुज तुम्हाला मी सांगितले नसते तर कळले देखील नसते परंतू आता मी लाज सोडून दिली आणि तुम्हाला सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे मी आता तुमच्यापुढे हात जोडते त्यामुळे माझा अंत आता कोणीही पाहू नका. तुकाराम महाराज म्हणतात, “आता आम्ही हरीच्या शेजारी बसलो आहोत तो जे काही करील ते आम्ही पाहू. ”
अभंग क्र. ३४४७ (मंबाजी गोसव्याने मारले त्यासमयीचे अभंग)
न सोडी न सोडी । विठोबा चरण न सोडी ॥१॥
भलते जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥धृपद॥
शतखंड देह शस्त्रधारी । करिता परी न भीये ॥२॥
तुका म्हणे केली आधी । दृढ बुद्धी सावध ॥३॥
अर्थ
विठ्ठोबा, मी तुझे चरण नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. माझ्यावर कितीही मोठे संकट आले, जीवावर बेतले तरी मी तुझे चरण कदापि नाही सोडणार. शस्त्राच्या आधाराणे माझ्या शरीराचे शंभर टुकड़े केले तरीही मी घाबरणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आधिपासूनच मी बुद्धीला येणाऱ्या संकटांन विषयीची जाणीव देऊन सावध केले आहे.
अभंग क्र. ३४४८ (मंबाजीगोसव्यानेमारलेत्यासमयीचेअभंग)
बरवे बरवे । केले विठोबा बरवे ॥१॥
पाहोनि आत क्षमा । अंगी कांटीवरी मारविले ॥धृपद॥
शिव्या गाळी नीत नाही । बहु फार विटंबिले ॥२॥
तुका म्हणे क्रोधा हाती । सोडवूनि घेतले रे ॥३॥
अर्थ
विठोबा, तू खुप चांगले केलेस. माझ्या सहनशक्तिचा अंत पाहिलास. मंबाजिकडून काठ्या-लाठ्यांनी मला मार दिलास. त्याने अनितीने माल शिविगाळ केली, माझी फार विटंबणा केली. तुकाराम महाराज म्हणतात परंतु तू मात्र मला क्रोधाच्या हातातुन सोडवून घेतलस रे ! (मला राग येवु दिला नाहीस) .
अभंग क्र. ३४४९ (मंबाजीगोसव्यानेमारलेत्यासमयीचेअभंग)
पावलो पावलो । देवा पावलो रे ॥१॥
बरवे संचित होते तैसे झाले रे । आता काय बोलो रे ॥२॥
सोज्ज्वळ कंटकवाटा भावे करू गेलो रे । तुका म्हणे करूनि वेगळा केलो रे ॥३॥
अर्थ
देवा, मला सारे काही भरून पावले आहे रे. जसे माझ्या नशिबात होते, त्या प्रमाणे मला त्याचा योग्य तो अनुभव आला आहे. आता अधिक काय बोलू रे ?. तुकाराम महाराज म्हणतात, वाटेतले काटे दूर करून चांगली वाट करण्यासाठी चांगल्या वृत्तिने प्रयन्त केला, तर मंबाजीने दूर नेउन मला मारले रे ! .
अभंग क्र. ३४५० (मंबाजीगोसव्यानेमारलेत्यासमयीचेअभंग)
का होती का होती । देवा एवढी फजीती ॥१॥
मुळी वर्म नसतो चुकलो । तो मी ऐसे चित्ती ॥धृपद॥
होणार होऊनि गेले । मिथ्या आता खंती रे ॥२॥
तुका म्हणे पुरे आता । दुर्जनाची संगती रे ॥३॥
अर्थ
देवा, माझी एवढी फजीती का होत आहे ?. मूळ वर्म मी चुकालो नसतो, ते चित्तात धरून ठेवले असते तर माझी अशी फजीती झाली नसती. जे व्हायचे ते होते, ते होऊन गेले. त्याबद्दल खंत कशाला करत बसु ?. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, दुर्जनांचा सहवास पुरे झाला आता.
अभंग क्र. ३४५१ (मंबाजीगोसव्यानेमारलेत्यासमयीचेअभंग)
सोडवा सोडवा सोडवा अनंता । तुजविण ऐसा कोण दुजा प्राणदाता ॥१॥
कोणा लाज नेणा ऐसे । आणिका शरण आम्ही जाता ॥२॥
तुका म्हणे सखया । माझ्या रखुमाईच्या कांता ॥३॥
अर्थ
अनंता, मला दुःखातुन, यातनांमधुन सोडवा हो, सोंडवा. तुमच्या शिवाय दूसरा प्राणदाता कोण आहे ?. तुम्हाला टाकून आम्ही इतरांना शरण गेलो, तर कोणाला लाज वाटणार बरे ?. (यासाठी) तुकाराम महाराज म्हणतात, हे सख्या, रुक्मिनिकांता, मला या जाचातुन सोडव.
अभंग क्र. ३४५२ (मंबाजीगोसव्यानेमारलेत्यासमयीचेअभंग)
पत्राची वार्ता । शुभ ऐके जेवी माता ॥१॥
तैसे राहो माझे मन । गाता ऐकता हरीगुण ॥धृपद॥
नादे लुब्ध झाला मृग । देह विसरला अंग ॥२॥
तुका म्हणे पाहे । कासवीचे पिले माय ॥३॥
अर्थ
परगावि असलेल्या आपल्या पुत्राच्या खुशालीचि वार्ता एकन्यास ज्याप्रमाणे आई उत्सुक असते. त्याप्रमाणे हरिचे गुणगान वर्णन करण्यासाठी आणि गुण एकन्यासाठी माझे मन अधीर झाले आहे. मधुर आवाजामुळे हरिण लुब्ध होते आणि आपले अस्तित्व विसरते. तुकाराम महाराज म्हणतात, कसविचे पिल्लू जसे कासविकडे (आपले पोट भरण्यासाठी) नजर लाऊंन बसलेले असते, ताशी माझी स्तिति व्हावी.
अभंग क्र. ३४५३ (देवानेबाबाजीचैतन्यांचेरूपानेस्वप्नातउपदेशकेलात्यासमयीचेअभंग)
सत्य गुरूराये कृपा मज केली । परी नाही घडली सेवा काही ॥१॥
सांपडविले वाटे जाता गंगास्नाना । मस्तकी तो जाणा ठेविला कर ॥धृपद॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥२॥
कांय कळे उपजला अंतराय । म्हणोनिया काय त्वरा झाली ॥३॥
राघवचैतन्य कैशवचैतन्य । सांगितली खुण माळिकेची ॥४॥
बाबाजी आपुले सांगितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरी ॥५॥
माघ शुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥
अर्थ
सद्गुरुरायांनी माझ्यावर कृपा केली ; परंतु माझ्याकडून काही त्यांची सेवा घडली नाही. गंगास्नानाला मी जात आहे, असे मला स्वप्न पडले, त्या स्वप्नात गंगेच्या वाटेत सदगुरु माझा शोध घेत आहे. त्यांनी माझ्या मस्तकावर आपला कृपाकर ठेवला. (कदाचित माझी परीक्षा पाहान्यासाठी) माझ्याकडे भोजनासाठी त्यांनी पावशेर तूप मागीतले. स्वप्नात मला त्यांचा विचार पडला. असा अंतराय मध्येच कसा काय निर्माण झाला, काही कळत नाही. त्यांनी निघण्याची घाई केली. राघवचैतन्य, केशवचैतन्य अशी गुरुपरंपरेचि खून सांगीतलि. स्वता:चे नांव ‘बाबाजी’ असे सांगितले. ‘रामकृष्ण हरी’ हा मंत्र दिला. तुकाराम महाराज म्हणतात, सदगुरुनी माझा स्वीकार केला, तो दिवस माघ शुद्ध दशमीचा व वार गुरुवार होता.
अभंग क्र. ३४५४ देवाने बाबाजी चैतन्यांचे रूपाने स्वप्नात उपदेश केला त्यासमयीचे अभंग)
माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥१॥
आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें गुंपा कांहीं कोठें ॥2॥
जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥3॥
जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटीं ॥4॥
तुका म्हणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥5॥
भावार्थ
माझ्या मनीचा भाव जाणून गुरु महाराजांनी असा उपाय केला. माझ्या आवडीचा साधा सोपा मंत्र मला सांगितला. यात कोठेही गुंता नाही. हा अतिशय साधा- सोपा असा मंत्र आहे. अनेक साधुसंत या नाम मंत्राच्या आधारे भवसिंधु तरुण पुढे गेले. जाणत्या व नेणत्या अशा दोघांच्या आवडीनुसार त्यांना भवसागर तरून जाण्यासाठी सांगडी, ताफे, पेटे अशी साधने दिली. तुकाराम महाराज म्हणतात, कृपा सागर असा पांडुरंग सर्वांना तारून नेण्यास समर्थ आहे. गुरु महाराजांनी हा तारू मला दाखविला.
अभंग क्र. ३४५५ (देवाने बाबाजी चैतन्यांचे रूपाने स्वप्नात उपदेश केला त्यासमयीचे अभंग)
घालुनिया भार राहिलो निश्चिंती । निरविले संती विठोबासि ॥१॥
लावूनिया हात कुरवाळिला माथा । सांगितले चिंता न करावी ॥धृपद॥
कटी कर सम चरण साजिरे । राहिला भीवरे तीरी उभा ॥२॥
खुंटले सायास अणिक या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥३॥
तुज वाटे आता ते करी अनंता । तुका म्हणे संता लाज माझी ॥४॥
अर्थ
कृपाळू संतांवर आपला सर्व भार घालून मी निश्चिंत राहिलो. त्यांनी मला विठोबाच्या स्वाधीन केले. माझ्या मस्तकावर हात ठेवला. माझा माथा कुरवाळला आणि ‘चिंता करू नकोस’ असे सांगितले. दोन्ही हात कमरेवर ठेऊन साजिर्या अश्या समचरणरुपात तो चंद्रभागेच्या तिरावरति उभा आहे. हे केशवा, माझे सारे प्रयत्न कुंठित झाले असल्यामुळे मी तुझे पाय धरले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात अनंता, आता तुला जसे वाटेल तसे कर. संतानाच माझी लाज आहे.
अभंग क्र. ३४५६
माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासी उदार झालो आता ॥१॥
तुजवीण दुजे नाही आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥२॥
ठायीचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संती ॥३॥
जीवपणा तुझ्या ठेवियला पायी । हेची आता नाही लाज तुम्हा ॥४॥
तुका म्हणे संती घातला हवाला । न सोडी विठ्ठल पाय तुझे ॥५॥
भावार्थ –
देवा , आता माझ्या मनाचा खालील प्रकारचा निश्चय झाला आहे ; व मी पूर्णपणे जिवावर उदार झालो आहे , हे लक्षात घे .||१||देवा , तुझ्यावाचून दुसऱ्या कोणाचेही पाय धरणार नाही .आणि मी तुझ्या प्राप्तीला प्रतिबंध करणाऱ्या भय – लज्जा , शंका इत्यादि विकारांचा त्याग केला आहे .||२||अनंता , तुझा व माझा उपास्य उपासक संबंध पूर्वीपासूनच होता ; पण आता संतांनी तुझ्या स्वाधीन करून तो संबंध विशेष म्हणजे संप्रदायशुध्द उपासनेला योग्य केला आहे किंवा तुझा व माझा अनादिकालापासून ब्रह्मरूपाने अभेदरूप तात्विकसंबंध होता ; पण तो अज्ञात होता , परंतु संतांनी महावाक्याचा उपदेश करून त्यापूर्वीच्या संबंधात ” मी ब्रह्म आहे ” या अपरोक्षानुभवाचा विशेष निर्माण केला आहे .||३||देवा , मी तुझ्या पायावर जीवभाव अर्पण केला आहे .आता माझी लाज तुला कशी बरे असणार नाही ? ||४||तुकाराम महाराज म्हणतात , संतांनी मला तुझ्या स्वाधीन करून माझ्या उध्दाराची जबाबदारी तुझ्यावर सोपविली आहे ; त्यामुळे हे विठ्ठला , मी तुझे पाय सोडणार नाही .||५||
येथे सार्थ अभंग गाथ्यातील ७० अभंग टाकावे.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.



















