Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

४ मे, दिवस १२४. वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी २५१ ते २७५ सार्थ तुकाराम गाथा अभंग १४७७ ते १४८८

4 MAY NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI 1

4 MAY NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI 1

“४ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ४ May
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक ४ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १४७७ ते १४८८ चे पारायण आपण करणार आहोत.
४ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी २५१ ते २७५,

251-10
तया वहिलिया गतिमंता- । आत पवनु तो मी पंडुसुता । शस्त्रधरा समस्ता- । माजी श्रीराम तो मी ॥251॥
त्यात वायू तो मी आहे आणि शस्र धारण करणार्‍यांमध्ये प्रभू रामचंद्र मी आहे.
252-10
जेणे सांकडलिया धर्माचेन कैवारे । आपणपया धनुष्य करूनि दुसरे । विजयलक्ष्मीये एक मोहरे । केले त्रेती ॥252॥
ज्यांनी संकटांत पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन व आपण आपल्याहून निराळे असे धनुष्य करून त्रेतायुगामध्ये एका विजयरूपी लक्ष्मीला आपल्याच समोर केले — म्हणजे संकटात सापडलेल्या धर्माला एकसारखा विजयच मिळवून दिला असा अर्थ.
253-10
पाठी उभे ठाकूनि सुवेळी । प्रतापलंकेश्वराची सिसाळी । गगनी उदो म्हणतया हस्तबळी । दिधली भूता ॥253॥
नंतर सुवेळ पर्वतावर उभे राहून, मूर्तिमंत प्रताप असा जो लंकेचा राजा रावण, त्याची मस्तके आकाशात उदोउदो करणारी भूतपिशाच्चे, यांच्या हातात त्यांना बळी म्हणून ज्याने अर्पण केली.
254-10
जेणे देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धारु केला । सूर्यवंशी उदेला । सूर्य जो का ॥254॥
ज्याने देवांचा मान पुनः त्यांना प्राप्त करून दिला व धर्माचा जीर्णोध्दार केला, जो सूर्यवंशामध्ये मूर्तिमंत उगवलेला सूर्यच होय.
255-10
तो हातियेरुपरजितया आंतु । रामचंद्र मी जानकीकांतु । मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजी ॥255॥
हत्यार धारण करणार्‍यांमध्ये तो सीतापती रामचंद्र मी आहे. जलामध्ये राहणार्‍या पुच्छवंत प्राण्यांमध्ये मगर मी आहे.


256-10
पै समस्तांही वोघा- । मध्ये जे भगीरथे आणिता गंगा । जन्हूने गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ॥256॥
आणखी संपुर्ण प्रवाहांमध्ये जी गंगा, भगीरथ राजा पृथ्वीतलावर आणीत असता जह्नुराजाने गिळली व मग आपली मांडी घालुन फाडून परत सोडली.
257-10
ते त्रिभूवनैकसरिता । जान्हवी मी पंडुसुता । जळप्रवाहा समस्ता- । माझारी जाणे ॥257॥
अशी त्रिभुवनात एकच वाहणारी, अर्जुना ! जाह्नवी नदी, ती सर्व जल प्रवाहांमध्ये माझे रूप होय, असे जाण.
258-10
ऐसेनि वेगळाला सृष्टीपैकी । विभूती नाम सूता एकेकी । सगळेन जन्मसहस्रे अवलोकी । अर्ध्या नव्हती ॥258॥
याप्रमाणे निरनिराळ्या भूतसृष्टीमधील एका एका विभूतीचे नाव सांगतांना हजारो जन्म खर्ची घातले, तरी अर्ध्यादेखील विभूती सांगणे होणार नाही, पहा !

सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥10. 32॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च ।
अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥10. 33॥

259-10
जैसी अवघीचि नक्षत्रे वेचावी । ऐसी चाड उपजेल जै जीवी । तै गगनाची बांधावी । लोथ जेवी ॥259॥
सर्व नक्षत्रे वेचून घ्यावी अशी जर आपल्याला मनात इच्छा झाली तर, ज्याप्रमाणे आकाशाची मोट बांधली पाहिजे.
260-10
का पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा । तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावे माते ॥260॥
किंवा पृथ्वीच्या संपूर्ण परमाणूंचा झाडा घ्यावा अशी इच्छा झाल्यास, ज्याप्रमाणे सबंध भूगोलच खाकेत उचलून घेतला पाहिजे, त्याप्रमाणे माझा संपूर्ण विस्तार पाहावयाचा असल्यास मलाच जाणले पाहिजे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


261-10
जैसे शाखांसी फूल फळ । एकिहेळा वेटाळू म्हणिजेसकळ । तरी उपडूनिया मूळ । जेवी हाती घेपे ॥261॥
फांद्या, फुले व फळे ही सर्व एकदम घ्यावी, असे वाटल्यास ज्याप्रमाणे झाड मुळासकट उपटून घ्यावे लागते.
262-10
तेवी माझे विभूतिविशेष । जरी जाणो पाहिजेती अशेष । तरी स्वरूप एक निर्दोष । जाणिजे माझे ॥262॥
त्याप्रमाणे माझ्या सर्व विभूती समजाव्यात, अशी इच्छा झाल्यास माझे निर्दोष उपाधिरहित असे स्वरूप जाणून घ्यावे.
263-10
एऱ्हवी वेगळालिया विभूती । कायिएक परिससी किती । म्हणोनि एकिहेळा महामती । सर्व मी जाण ॥263॥
एरव्ही, अर्जुना ! माझ्या वेगवेगळ्या विभूती किती ऐकशिल ? म्हणून सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे हे जाण,
264-10
मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्याती किरीटी । ओतप्रोत पटी । तंतु जेवी ॥264॥
हे किरीटी । मी सर्व सृष्टिचा आदि, मध्य आणि अंत आहे. ज्याप्रमाणे वस्ञांत तंतू उभे व आडवे भरलेले असतात.
265-10
ऐसिया व्यापका माते जै जाणावे । तै विभूतिभेदे काय करावे । परि हे तुझी योग्यता नव्हे । म्हणोनि असो ॥265॥
त्याचप्रमाणे मी सर्वव्यापक आहे असे जाणल्या नंतर माझ्या विभूती जाणून काय करावयाच्या आहेत. ? परंतु तसे करण्याची तुझी योग्यता नाही. म्हणून ते असू देत.


266-10
का जे तुवा पुसिलिया विभूती । म्हणोनि तिया आईक सुभद्रापती । तरी आता विद्यांमाजी प्रस्तुती । अध्यात्मविद्या ते मी ॥266॥
हे अर्जुना ! त्वां मला माझ्या विभूती सांग असे म्हटले, म्हणून त्याच ऐक. सर्व विद्येमध्ये अध्यात्मविद्या मी आहे.
267-10
अगा बोलतयांचिया ठायी । वादु तो मी पाही । जो सकलशास्त्रसंमते कही । सरेचिना ॥267॥
अर्जुना ! बोलणार्‍यांच्या ठिकाणी सर्व शास्रांचे आधारे होणारा व कधी न संपणारा जो वाद तो मी आहे.
268-10
जो निर्वचू जाता वाढे । आइकतया उत्प्रेक्षे सळु चढे । जयावरी बोलतयांची गोडे । बोलणी होती ॥268॥
जो प्रतिपादन करू जाता वाढतो, ऐकणार्‍यांच्या मनात कोट्या करण्याच्या उर्मी उठतात आणि ज्यात बोलणांर्‍यांनी गोड बोलणी होतात.
269-10
ऐसा प्रतिपादनामाजी वादु । तो मी म्हणे गोविंदु । अक्षरांमाजी विशदु । अकारु तो मी ॥269॥
असा जो वाद, तो सर्व प्रकारच्या प्रतिपादनामध्ये मी आहे असे भगवान म्हणतात. अक्षरांमध्ये स्पष्ट जो ‘अ’ कार तो माझे स्वरूप होय.
270-10
पै गा समासांमाझारी । द्वंद्व तो मी अवधारी । मशकालागोनि ब्रह्मावेरी । ग्रासिता तो मी ॥270॥
आणि सर्व समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे असे जाण. मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वाना ग्रासणारा (अक्षय जो काळ) तो मी आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


271-10
मेरुमंदरादिकी सर्वी । सहित पृथ्वीते विरवी । जो एकार्णवातेही जिरवी । जेथिचा तेथे ॥271॥
सातही समुद्रांचा एक समुद्र करून मेरूमंदार इत्यादि सर्व पर्वतांसहित संपूर्ण पृथ्वीला त्या झालेल्या समुद्रात नाहीसे करतो व त्या एकरूप झालेल्या समुद्रालाहि (प्रलय तेजाने) जेथल्या तिथे शोषून टाकतो.
272-10
जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनाते गिळी किरीटी । आकाश जयाचिया पोटी । सामावले ॥272॥
पुढे जो प्रलयकालच्या तेजालाही मिठी मारून सर्व वायुलाहि जो गिळतो आणि शेवटी आकाळहि ज्याच्या पोटात, अर्जुना ! सामावले जाते,
273-10
ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु । मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ॥273॥
असा अमर्याद जो काळ, तो मी होय, असे लक्ष्मीशी क्रिडा करणारा श्रीकृष्ण म्हणू लागला. मग पुनः सृष्टीचा समुदाय उत्पन्न करणारा तोही मीच आहे.
मृत्युः सर्वहरश्चाहमुद्‍भवश्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥10. 34॥

274-10
आणि सृजिलिया भूतांते मीचि धरी । सकळा जीवनही मीचि अवधारी । शेखी सर्वाते या संहारी । तेव्हा मृत्युही मीचि ॥274॥
उत्पन्न झालेल्या सृष्टीला मीच धारण करतो. सर्व सृष्टीला मीच जीवन आहे — म्हणजे माझ्यामुळे त्यांचे पोषण व वृध्दी होते. शेवटी सर्वाचा संहार मीच करतो, म्हणून मृत्यूही मीच आहे.
275-10
आता स्त्रीगणांचा पैकी । माझिया विभूती सात आणिकी । तिया ऐक कवतिकी । सांगिजतील ॥275॥
आता स्रीजातकांपैकी माझ्या आणखी सात विभूती आहेत. त्याहि कौतुकाने सांगतो ऐक.

दिवस १२४ वा, ४, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १४७७ ते १४८८
सार्थ तुकाराम गाथा


अभंग क्र. १४७७
साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥
मग कासयाने पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥धृपद॥
जिणे दिल्हे त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावे ॥२॥
तुका म्हणे निज भोगईल निजता । नाही होईल सत्ता दुजियाची ॥३॥
अर्थ

देवाला सर्वच अर्पण करावे त्यामुळे आपले सर्व संचित, प्रारब्ध, क्रियमाण नाहीसे होतात जर प्रारब्ध, संचित, क्रियामाणच नष्ट झाले तर पुन्हा जन्म मरण राहील कोठे कारण कर्मरुपी बीजाचे अंकुर ज्ञानाच्या अग्नीने जळून जातात. ज्या हरीने आपल्याला हा देह दिला शेवटी हा देह त्यालाच अर्पण करून त्याच्या ऋणातून मुक्त व्हावे. तुकाराम महाराज म्हणतात जर आपण नीजस्वरूपाच्या ठिकाणीच प्रवेश केला तर आपल्याला भोग ही नीचजस्वरूपाचाच घडेल मग तेथे कोणत्याही अनात्म वस्तूची सत्ता आपल्यावर चालणार नाही.
अभंग क्र. १४७८
जळो अगी पडो खान । नारायण भोगिता ॥१॥
ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणी ते पावे ॥धृपद॥
भोजनकाळी करिता धंदा । म्हणा गोविंदा पावले ॥२॥
तुका म्हणे न लगे मोल । देवा बोल आवडती ॥३॥
अर्थ

मी भोक्ता आहे असे म्हणणे आगीत पडून जळून जावो, दूर कोठेतरी घाणीत पडो कारण भोक्ता हा केवळ नारायणच आहे. अशी ज्याची वाणी वदत असते म्हणजे असे जो कोणी म्हणतो की नारायण सर्व भोक्ता आहे त्याचे सर्व भोग नारायणच भोगत असतो. जेवण करताना किंवा कोणताही धंदा करताना मी जे काही करतो ते सर्व गोविंदाला पावले असे म्हणा मग आपोआपच गोविंदाला ते सर्व काही प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात हरीची भक्ती करताना कोणत्याही प्रकारचे मोल द्यावे लागत नाही केवळ सर्व भोग हरीला अर्पण आहे असे म्हणा मग सर्व कर्म त्याला आपोआप अर्पण होते व तेच त्याला आवडते.
अभंग क्र. १४७९
संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारे । त्याचे नव्हे बरे उभयलोकी ॥१॥
देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥धृपद॥
संतांपाशी ज्याचा नुरेचि विश्वास । त्याचे जाले दोष बळीवंत ॥२॥
तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगे । किंवा धावे लागे विषमे मारू ॥३॥
अर्थ

जो संतांना कोणत्याही कारणावरून त्रास देतो त्यांचे उभय लोकात चांगले होणार नाही. असा मनुष्य देवाचाही दावेदार आहे व त्याला पृथ्वी देखील आश्रय देत नाही. ज्यांचा संतांच्या बोलण्यावर विश्वास नाही त्यांचे पाप बलाढ्य आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात जसे गाईचे दूध काढण्याकरिता तिचे वासरू पुढे आणावे लागते नाहीतर गाय मारण्याचा धावते, त्याप्रमाणे जर संतांचा आदर केला तर तेव्हाच देव, भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो नाहीतर जो संतांचा आदर करत नाही त्यांचे देव उभय लोकांमध्ये कल्याण होऊ देत नाही.
अभंग क्र. १४८०
उदकी कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयाने ॥१॥
उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना । विन्मुख चरणा संताचिया ॥धृपद॥
दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याई पापाचीच मूर्ती ॥२॥
तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥३॥
अर्थ

स्वच्छ पाण्यामध्ये शेण, मलमूत्र टाकून मनुष्य कसा पवित्र होईल ? त्याप्रमाणे जो मनुष्य संतचरण सेवेला विन्मुख होतो त्याचा उद्धाराला कोठेही जागा राहत नाही. जो मनुष्य जहाजाची सांगड तोडतो तो बुडल्या शिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे आताताई मनुष्य आहेत ते संतांना दुःख देतात, असे मनुष्य पापाचीच मूर्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात ज्यावेळी प्रारब्ध फिरते त्यावेळी संतांना त्रास देण्याची, त्यांना दुखावण्याची अशा मनुष्यांना आपोआप बुद्धी येते.
अभंग क्र. १४८१
शोकवावा म्या देहे । ऐसे नेणो पोटी आहे ॥१॥
तरीच नेदा जी उत्तर । दुःखी राखिले अंतर ॥धृपद॥
जावे वनांतरा । येणे उद्देशे दातारा ॥२॥
तुका म्हणे गिरी । मज सेववावी दरी ॥३॥
अर्थ

देवा मी माझ्या देहाला खूप त्रास द्यावे असे तुम्हाला वाटत आहे की काय हे मला काही कळत नाही. मी तुम्हाला इतक्या वेळा हाक मारतो तरीदेखील तुम्ही माझ्याकडे साधे पहात देखील नाही. पण तुम्ही एक लक्षात ठेवा देवा त्यामुळे माझ्या अंतःकरणाला खूप दुःख होते आहे, देवा मी कंटाळून वनात निघून जावे या उद्देशाने तर तुम्ही माझ्याशी बोलत नाही ना ? तुकाराम महाराज म्हणतात नाही तर ट मी एखाद्या पर्वताच्या दरी मध्ये जाऊन राहावे असे तुम्हाला वाटत आहे काय ?
अभंग क्र. १४८२
येईल तुझ्या नामा । लाज म्हणू पुरुषोत्तमा ॥१॥
धीर राहिलो धरूनि । त्रास उपजला मनी ॥धृपद॥
जगा कथा नांव । निराशेने नुपजे भाव ॥२॥
तुम्ही साक्षी की गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥
अर्थ

हे पुरुषोत्तमा केंव्हा तरी तुला तुझ्या नावाची लाज वाटेल आणि केंव्हा तरी तू माझा उद्धार करशीलच. मी धीर धरून राहिलो आहे नाहीतर माझे मन फार त्रासलेले आहे. सर्वत्र हरिकथा करतो आहे व सांगतो आहे की हरीकथा ही भवनदीतून तारणारी नौका आहे. पण माझ्यासारखी तू सर्वाची निराशा केलीस तर देवा लोकाचा भक्तीभाव तुझ्या विषयी कसा वाढणार ? तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा मी जे काही बोलत आहे हे खरे आहे की खोटे आहे याला तूच साक्षी आहेस.
अभंग क्र. १४८३
नेणे जप तप अनुष्ठान याग । काळे तव लाग घेतलासे ॥१॥
रिघालो या भेणे देवाचे पाठीसी । लागे त्याचे त्यासी सांभाळणे ॥धृपद॥
मापे माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥२॥
तुका म्हणे चोरा हाती जे वाचले । लाभावरी आले वारिलेशु ॥३॥
अर्थ

मी जप, तप, अनुष्ठान वगैरे काहीच जाणत नाही आणि काळाने तर माझा पाठलाग केला आहे. या भीतीनेच तर मी देवाच्या पाठीमागे लागलो आहे. आता त्याने माझा सांभाळ करून त्याच्या ब्रिदाचाही सांभाळ करावा व काळ आयुष्याचे माप मोजत आहे. एकदा की हा मनुष्य देह गेला, रात्र झाली मग तेथे कोणाचे काय चालणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात काळ रुपी चोराच्या हातून आत्तापर्यंत जे कोणी वाचले आहेत त्यांनी उरलेले आयुष्य हा मोठा लाभच आहे असे समजावे, मनुष्य देह आयुष्याचा लेष व अनेक दुःखाचे निवारण करू शकते.
अभंग क्र. १४८४
कळो आले ऐसे आता । नाही सत्ता तुम्हासी ॥१॥
तरी वीर्य नाही नामा । जातो प्रेमा खंडत ॥धृपद॥
आड ऐसे येते पाप । वाढे ताप आगळा ॥२॥
तुका म्हणे गुण झाला । हा विठ्ठल हीनशक्ती ॥३॥
अर्थ

देवा मला आता असे समजले आहे की तुमच्या हातांमध्ये काहीच सत्ता नाही. तुमच्या नावातही काहीच बळ नाही. त्यामुळे आमचे तुमच्या विषयीचे प्रेम होते ते खंडित होत चालले आहे. पण देवा तुमच्या विषय असे बोलणे म्हणजे एक प्रकारचे पापच आहे आणि असे बोलताना आम्हालाही त्रास होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तुझी शक्तिहीन झाली हे मात्र निश्चिंत.
अभंग क्र. १४८५
लागो दिले अंगा । ऐसे का गा सन्निध ॥१॥
कोण्या पापे उदय केला । तो देखिला प्रळय ॥धृपद॥
न देखवे पिडला सर्प । दया दर्प विषाचा ॥२॥
तुका म्हणे भले । मज तो न वजे साहिले ॥३॥
अर्थ

देवा माझ्या अंगी असे विकार का लागू दिले आहेत ? देवा माझे असे कोणते पाप उदयाला आले आहे की त्यामुळे मला प्रलय दिसत आहे. अरे देवा सापाला जर त्याच्या विषाने त्रास होत असेल तर त्याला होणारा त्रासही मला पाहवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात पापाचे फळ हे दुखच आहे हे मला माहीत आहे व दुष्ट लोकांनी पाप केले व त्यांना त्रास झाला तर ते देखील मला पहावत नाहीये.
अभंग क्र. १४८६
धावा शीघ्रवत । किंवा घ्यावे दंडवत ॥१॥
तुमचा जातो बडिवार । आह्मी होतो हीनवर ॥धृपद॥
न धरावा धीर । धावा नका चालो स्थिर ॥२॥
तुका म्हणे वाणी । माझी लाजली जी गुणी ॥३॥
अर्थ

देवा माझ्याकडे येण्यासाठी तुम्ही धाव घ्या, शीघ्रता करा आणि तसे जर तुम्हाला जमत नसेल तर येथून माझा दंडवत घ्या. देवा तुम्ही जर आमच्याकडे धावत आला नाही तर त्यामुळे आपल्या दोघाचाही यामध्ये कमीपणा सिद्ध होईल. देवा आता माझी भेट घेण्याविषयी तुम्ही अधिक धीर धरू नका संथ गतीने तर अजिबात चालू नका. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही माझी लवकर भेट घेत नाहीत त्यामुळे माझी वाणी तुमची गुणगान करण्यास लाजते आहे.
अभंग क्र. १४८७
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥
मनाचिये मुळी रहावे बैसोन । आकर्षावे गुण पायापाशी ॥धृपद॥
भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसे वाटे ॥४॥
तुका म्हणे माझे करावे कारण । आपुले जतन ब्रीद करा ॥३॥
अर्थ

मालकाने सेवकाला जो निरोप दिला तो मालकाने जसा सांगितला तसा सांगणे हे सेवकाचे कर्तव्य आहे मग तो निरोप बरोबर आहे की चुकीचा ते मालक ठरवून घेईल. मनाचे मूळ हरीचे रूप आहे त्या ठिकाणी ते स्थिर करावे आणि सर्व गुण हरीच्या पायाजवळ आहे असे समजावे. देवा तुमच्या भेटीविषयी मी तातडी करत आहे आणि तुमच्या वरून हा देह ओवाळून टाकावा असेच मला वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचे काम म्हणजे मला भेट देण्याचे आहे त्यामुळे मला भेट देऊन तुम्ही तुमचे ब्रीद सांभाळावे.
अभंग क्र. १४८८
उद्वेगासी बहु फांकती मारग । नव्हे ऐसे अंग माझे होते ॥१॥
आता कोण यासी करणे विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु॥
मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरि हो नाश जीवित्वाचा ॥२॥
तुका म्हणे आहे वचनाची उरी । करितो तोवरी विज्ञापना ॥३॥
अर्थ

उद्वेग केला तर अनेक मार्ग फुटतात म्हणजे, हे करू, का ते करू याच्या काळजीने माझे शरीर माझे राहिले नाही असे मला वाटते आहे देवा. आता याविषयी काय विचार करावा हे पांडुरंगा तुम्ही जाणता. देवा मला तुमच्या दर्शनाची फार इच्छा झाली आहे त्याकरिता माझ्या जिवाचा नाश जरी झाला तरी चालेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा जोपर्यंत माझ्या मुखातून शब्द बाहेर पडत आहेत तोपर्यंत मी तुमच्या भेटीची मागणी तुम्हाला करत राहणार आहे.

एप्रिल नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version