“३ मे” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण
हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
“वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢
Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan ३ May
” राम कृष्ण हरी “
आज दिनांक ३ मे असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग १४६५ ते १४७६ चे पारायण आपण करणार आहोत.
३ मे, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा, ओवी २२६ ते २५०,
226-10
यक्षरक्षोगणाआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु । तो कुबेरु मी हे अनंतु । म्हणता जाहला ॥226॥
यक्षराक्षस यांच्या समुदायात शंकराचा मित्र जो धनसंपन्न कुबेर, तो माझी विभूति होय, असे अनंत म्हणाला.
227-10
मग आठांही वसूंमाझारी । पावकु तो मी अवधारी । शिखराथिलिया सर्वोपरी । मेरु तो मी ॥227॥
मग अष्टवसूंमध्ये जो अग्नि, तो मी आहे, हे जाण आणि उंच शिखर असलेल्या पर्वतांत मेरु मी आहे.
पुरोधसा च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥10. 24॥
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥10. 25॥
228-10
जो स्वर्ग सिंहासना सावावो । सर्वज्ञते आदीचा ठावो । तो पुरोहितांमाजी रावो । बृहस्पती मी ॥228॥
स्वर्गाच्या सिंहासनाला सहायभूत, सर्वज्ञतादि गुणांचे राहते घर व पुरोहितांचा राजा असा जो बृहस्पति तो मी आहे.
229-10
त्रिभुवनींचिया सेनापती- । आत स्कंदु तो मी महामती । जो हरवीर्ये अग्निसंगती । कृत्तिकाआंतु जाहला ॥229॥
हे महामति अर्जुना ! त्रैलोक्यातील सेनापतिमध्ये श्रेष्ठ, शंकराच्या वीर्यापासून, अग्नीच्या संगतीने, कृत्तिकेच्या पोटी जन्मलेला, जो कार्तिकस्वामी, तो माझे स्वरूप होय.
230-10
सकळिका सरोवरांसी । माजी समुद्र तो मी जळराशी । महर्षींआंतु तपोराशी । भृगु तो मी ॥230॥
समस्त सरोवरांमध्ये अगाध जळराशी जो समुद्र तो मी आहे व महर्षींमध्ये तपोराशी जो भृगुऋषि तो मी आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
231-10
अशेषांही वाचा । आंतु नटनाच सत्याचा । ते अक्षर एक मी वैकुंठीचा । वेल्हाळु म्हणे ॥231॥
वाणीने उच्चारिले जाणार्या संपूर्ण शब्दांमध्ये अविनाशीपणाचे नृत्य करणारे जे ॐ काररूपी एक अक्षर ते मी होय, असे वैकुंठांत विलास करणारा भगवान श्रीकृष्ण म्हणतो.
232-10
समस्तांही यज्ञांचा पैकी । जपयज्ञु तो मी ये लोकी । जो कर्मत्यागे प्रणवादिकी । निफजविजे ॥232॥
जो जपयज्ञ, यज्ञादि कर्म न करता ॐ कारादिकांच्या योगाने प्रगट केला जातो, तो या लोकातील संपूर्ण यज्ञापेकी मी आहे.
233-10
नामजपयज्ञु तो परम । बाधू न शकेस्नानादि कर्म । नामे पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थे ॥233॥
नामजपयज्ञ हा सर्व यज्ञांत श्रेष्ठ आहे. त्याला स्नानादि कर्मांचे बंधन नाही. उलट त्या नामजपयज्ञानेच धर्माधर्म देखील पावन व पूर्ण होतात; कारण नाम हे परब्रह्म आहे असाच वेदार्थ आहे.
234-10
स्थावरा गिरीवरा आंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु । तो मी म्हणे कांतु । लक्ष्मियेचा ॥234॥
स्थावर जे पर्वतादिक पदार्थ त्यात पुण्याची राशी जो हिमालय तो मी आहे असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाले.
अश्वत्थः सर्ववृक्षाणा देवर्षीणा च नारदः ।
गन्धर्वाणा चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥10. 26॥
उच्चैःश्रवसमश्वाना विद्धि माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणा नराणा च नराधिपम् ॥10. 27॥
235-10
कल्पद्रुम हन पारिजातु । गुणे चंदनुही वाड विख्यातु । तरि यया वृक्षजाता आंतु । अश्वत्थु तो मी ॥235॥
गुणाने, कल्पवृक्ष, पारिजात, चंदन हे वृक्ष श्रेष्ठ म्हणून प्रसिध्द आहेत; तरीपण या सर्व वृक्षामध्ये अश्वत्थवृक्ष मी आहे.
236-10
देवऋषीआंतु पांडवा । नारदु तो मी जाणावा । चित्ररथु मी गंधर्वा । सकळिकांमाजी ॥236॥
अर्जुना ! देवर्षींमध्ये नारदऋषि मी आहे असे जाण. सर्व गंधर्वामध्ये चित्ररथ गंधर्व हा मी होय.
237-10
यया अशेषांही सिद्धा- । माजी कपिलाचार्यु मी प्रबुद्धा । तुरंगजाता प्रसिद्धा- । आत उचैःश्रवा मी ॥237॥
या सर्व सिध्दांमध्ये, सूज्ञ अर्जुना ! कपिलाचार्य मी होय. अमृतासाठी देवांनी केलेल्या क्षीरसागराच्या मंथनांतून निघालेले उच्चैःश्रवा व
238-10
राजभूषण गजाआंतु । अर्जुना मी गा ऐरावतु । पयोराशी सुरमथितु । अमृतांशु तो मी ॥238॥
ऐरावत अनुक्रमे हे दोन, अश्वांच्या प्रसिध्द असलेल्या जातिमध्ये व राज्यभूषण जे गज त्यामध्ये, माझ्या विभूति आहेत.
239-10
यया नरांमाजी राजा । तो विभूतिविशेष माझा । जयाते सकळ लोक प्रजा । होऊनि सेविती ॥239॥
ज्याची सर्व लोक प्रजाजन होऊन सेवा करतात तो राजा, सर्व मनुष्यांमध्ये माझी विभूति होय.
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥10. 28॥
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥10. 29॥
240-10
पै आघवेया हातियेरा । आत वज्र ते मी धनुर्धरा । जे शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे ॥240॥
संपूर्ण हत्यारांमध्ये जे शंभर यज्ञ करणार्या इंद्राच्या हातात असते ते वज्र मी आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
241-10
धेनूंमध्ये कामधेनु । ते मी म्हणेविष्वक्सेनु । जन्मवितयाआंत मदनु । तो मी जाणे ॥241॥
गायींमध्ये कामधेनु ती मी होय, असे भगवान म्हणतात. जन्मदेणार्यांमध्ये मदन हा माझे स्वरूप जाण.
242-10
सर्पकुळाआंत अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता । नागांमाजी समस्ता । अनंतु तो मी ॥242॥
अर्जुना ! संपूर्ण सर्पकुळांमध्ये त्या कुळाचा अधिपति जो वासुकी तो मी आहे व सर्व नागामध्ये अनंत मी आहे.
243-10
अगा यादसाआंतु । जो पश्चिमप्रमदेचा कांतु । तो वरुण मी हे अनंतु । सांगत असे ॥243॥
अर्जुना ! जलात राहणार्या प्राण्यांमध्ये पश्चिमदिशारूपी स्रियेचा पति जो वरूण तो मी आहे असे श्रीकृष्ण सांगू लागले.
244-10
आणि पितृगणा समस्ता- । माजी अर्यमा जो पितृदेवता । तो मी हे तत्त्वता । बोलत आहे ॥244॥
सर्व पितरांच्या समुदायात अर्यमा नावांची पितृदेवता मी आहे, हे मी खरे जे सुखदुःखाचे भोग देतात.
245-10
जगाची शुभाशुभे लिहिती । प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती । मग केलियानुरूप होती । भोगनियम जे ॥245॥
असे भोगांचे नियमन करणार्यामध्ये, कर्माचा साक्षी जो यमधर्मराज तो मी आहे, असे रमेचा पति आत्माराम भगवान श्रीकृष्ण म्हणाले.
246-10
तया नियमितयांमाजी यमु । जो कर्मसाक्षी धर्मु । तो मी म्हणे रामु । रमापती ॥246॥
असे भोगांचे नियमन करणार्यांमध्ये, कर्माचा साक्षी जो यमधर्मराज तो मी आहे, असे रमेचा पती आत्माराम भगवान श्रीकृष्ण म्हणाले.
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥10. 30॥
247-10
अगा दैत्यांचिया कुळी । प्रल्हादु तो मी न्याहाळी । म्हणौनि दैत्यभावादिमेळी । लिंपेचिना ॥247॥
अर्जुना ! दैत्यांच्या कुळामध्ये प्रल्हाद मी आहे. पहा. म्हणूनच त्याच्या ठिकाणी दैत्यांच्या स्वभावाचा स्पर्श नव्हता.
248-10
पै कळितयांमाजी महाकाळु । तो मी म्हणे गोपाळु । श्वापदांमाजी शार्दूळु । तो मी जाण ॥248॥
श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ! गणना करणार्यांमध्ये महाकाळ मी आहे आणि वन्यपशूंमध्ये सिंह मी आहे असे जाण
249-10
पक्षिजातिमाझारी । गरुड तो मी अवधारी । यालागी जो पाठीवरी । वाहो शकेमाते ॥249॥
सर्व पक्षिजातींमध्ये गरुड मी आहे हे जाण, म्हणूनच तो मला पाठीवर वाहू शकतो.
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणा मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जान्हवी ॥10. 31॥
250-10
पृथ्वीचिया पैसारा- । माजी घडी न लगता धनुर्धरा । एकेचि उड्डाणे साताहि सागरा । प्रदक्षिणा करी जो ॥250॥
एका उड्डाणासरसे साताही सागराला प्रदक्षिणा होईल अशा वेगाने वाहणारे जेवढे या संपूर्ण पृथ्वीवर पदार्थ आहेत,
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत
दिवस १२३ वा, ३, मे
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग १४६५ ते १४७६
सार्थ तुकाराम गाथा
अभंग क्र. १४६५
वैष्णव चोरटी । आली घरासी करंटी ॥१॥
आजि आपुले जतन । करा भांडे पाघुरण ॥धृपद॥
ज्याचे घरी खावे । त्याचे सर्वस्वे ही न्यावे ॥२॥
तुका म्हणे माग । नाही लागो देत लाग ॥३॥
अर्थ
वैष्णव देहातील काम, क्रोध चोरणारे चोर आहेत व त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ममत्व नसणारे ते करंटे आहेत व आज आपल्या घरी चोरी करण्यासाठी वैष्णव आले आहेत. त्यामुळे वैष्णवाचा पासून आपले भांडेकुंडे अंथरूण-पाघरूण सर्व जतन करा. चोरटे, करंटे वैष्णव ज्यावेळी देहरूपी घरात घुसतात व देहरूपी घरातील काम, क्रोध अशा प्रकारचे सर्व विकार चोरून नेतात. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव सर्वकाही चोरून नेतात व त्याचा मागमूसही लागू देत नाही याप्रमाणे वैष्णव भक्तांचे सर्व दुख चोरून नेतात.
अभंग क्र. १४६६
ऐकतो दाट । आले एकाचे बोभाट ॥१॥
नका विश्वासो यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥धृपद॥
हेचि यांची जोडी । सदा बोडकी उघडी ॥२॥
तुका म्हणे न्यावे । ज्याचे त्यासी नाही ठावे ॥३॥
अर्थ
वैष्णव हे चोरटे आहेत याबद्दल मी पुष्कळ लोकांची गाऱ्हाणी ऐकली आहे. त्यामुळे वैष्णवांवर विश्वास ठेवून नका कारण वैष्णव देहाचा देहभाव नष्ट करणारे चोर आहेत. चोरी करणे हा वैष्णवाचा धंदा असून ते नेहमी असंग असतात. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवांनी काही चोरून नेले तर ज्याचा माल चोरून नेला त्याला देखील ते त्याचा पत्ता लागू देत नाहीत.
अभंग क्र. १४६७
आणिकाची सेवा करावी शरीरे । ती येथे उत्तरे कोरडींच ॥१॥
ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा याचकाच्या ॥धृपद॥
आणिकाचे देणे काळी पोट भरे । येथील न सरे कल्पांती ही ॥२॥
आणिकाचे भेटी आडकाठी पडे । येथे ते न घडे वचन ही ॥३॥
आणिके दंडिती चुकलिया सेवा । येथे सोस हेवा दोन्ही नाही ॥४॥
तुका म्हणे करी आपणासारिखे । उद्धरी पारिखे उंच निच ॥५॥
अर्थ
इतर कोणाचीही सेवा करण्याचे ठरवले तर शरीराला कष्ट होते परंतु पांडुरंगाची सेवा केवळ शब्द स्तुतीने सेवा घडते असा हा पांडुरंग सहज व सुलभ आहे. तो आपल्या सेवकाला हेलपाटे घालायला लावत नाही हे. इतर कोणाची भेट घेण्यास गेलो तर अनेक काठ्या मध्ये येतात पण, पांडुरंगाची भेट घेण्यास गेलोच तर त्याला एक शब्दाची आडकाठी मध्ये येत नाही. इतर कोणीही वर (आशीर्वाद) दिला तर तो शाश्वत नसतो त्याने काही काळ पोट भरते पण तो टिकत नाही, परंतु पांडुरंगाने जर काही दिले तर ते कल्पांत झाला तरी संपत नाही. इतर कोणाचीही सेवा करताना काही चूक झाली तर ते दंड करतात परंतु पांडुरंगाची सेवा करताना भक्तांकडून काही चूक झाली झाली तरी त्याला तो कष्ट देत नाही आणि मुळात पांडुरंग सेवा घेण्याची इच्छाही करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जो भक्त पांडुरंगाची भक्ती भावाने सेवा करतो मग तो उच्च असो की निच असो पांडुरंग त्याला आपल्यासारखा करतो.
अभंग क्र. १४६८
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडी पडे माती ॥१॥
त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥धृपद॥
पाहे संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥२॥
उंच निच नाही । तुका म्हणे खळा काही ॥३॥
अर्थ
वाईट वागणे ही दुर्जनाची जातच असते व वाईट वागण्यामुळे त्याच्या तोंडात माती पडत असते. त्या दुर्जनाची बुद्धीच त्याच्या हिताला आड येते कारण तो त्याच्या वाचेने काहीही अनुचित बडबड करतो. दुष्ट लोक हे संतांकडे दोष दृष्टीने पाहतात व त्यांची भीडभाड ते ठेवत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात मूर्खांना उंच नीच काहीच समजत नाही.
अभंग क्र. १४६९
न करी उदास । माझी पुरवावी आस ॥१॥
ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥धृपद॥
मायबाप बंधुजन । तू चि सोयरा सज्जन ॥२॥
तुका म्हणे तुजविरहित । माझे कोण करील हित ॥३॥
अर्थ
अर्थ:–हे देवा हे पांडुरंगा आता तरी कृपा करून तुम्ही माझ्या मनाची आस पुरवावी व मला उदास करू नये, माझी इच्छा अव्हेरू नये. हे नारायणा तुम्ही कृपा करून माझी घोषणा ऐका, माझे काय म्हणणे आहे ते ऐकून घ्या. कारण तूच काय तो मला आता सर्व काही आहेस, तूच माझा मायबाप, तूच माझे बंधुजन, तूच काय तो मला सखा आणि सोयरा आहेस, तुझ्या शिवाय मला इतर कोणीही नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला कारण माझे जे खरे हित आहे, माझा जो काही उद्धार करायचा आहे तो तुझ्याशिवाय इतर कोणीही करू शकत नाही.
अभंग क्र. १४७०
जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय ॥१॥
ते मी नाठवी घडिघडी । म्हणोनिया चरफडी ॥धृपद॥
तुटे भवरोग । जेथे सर्व सुख भोग ॥२॥
तुका म्हणे विटे । धरियेले जे गोमटे ॥३॥
अर्थ
गांजलेल्या आणि नाडलेल्या लोकांना तसेच पीडित आणि रोग्यांनादेखील जीवन सुलभ करण्याचा उपाय म्हणजेच तुझे पाय, तुझ्या पायाचे चिंतन आणि त्यांची सेवा. माझ्याकडून देखील तुझ्या पायाचे सतत चिंतन न झाल्याने माझ्याजीवाची देखील चरफड होते आणि जगणे नकोसे होते. तुकाराम महाराज म्हणतात भवरोगातून तारून जाण्याचा उत्तम मार्ग तसेच खऱ्या सुखाला पदरात पाडून घेण्याचा सर्वोत्तम उपाय आणि विटेने देखील आजवर जे धरून ठेवले आहेत ते गोमटे असे तुझे पाय हे सर्व सुखांची खाण आहेत.
अभंग क्र. १४७१
ऐका हे वचन माझे संतजन । विनवितो जोडुन कर तुम्हा ॥१॥
तर्क करूनिया आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥धृपद॥
आमुच्या जीवींचा तोचि जाणे भावो । रखुमाईचा नाहो पांडुरंग ॥२॥
चित्त माझे त्याचे गुंतलेंसे पायी । म्हणऊनि काही नावडे त्या ॥३॥
तुका म्हणे मज न साहे मीनती । खेद होय चित्ती भंग मना ॥४॥
अर्थ
हे संत जन हो माझे बोलणे तुम्ही कृपया करून ऐका हे मी तुम्हाला हात जोडून मी विनवीत आहे. काही लोक आपल्याला जे वाटेल ते तर्ककुतर्क करतात, ते काहीही बडबडतात त्यांना कोणी थांबवावे ? आमच्या जिवाच्या अंतर्भाव तो रुक्मिणीचा पती पांडुरंग जाणतो आहे. माझे चित्त पांडुरंगाच्या पायी गुंतलेले आहे त्यामुळेच मला त्याच्यावाचून दुसरे काहीच आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात काही भाविक माझ्या मताला मिळतात तर काही तर्किक माझे मत मानत नाही त्यामुळे माझ्या चित्ताला खेद होतो व त्यामुळे माझा मनोभंग होत आहे.
अभंग क्र. १४७२
ऐसा कोणी नाही हे जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥१॥
निंब घेते रोगी कवणिया सुखे । हरावया दुःखे व्याधि पीडा ॥धृपद॥
काय पळे सुखे चोर लागे पाठी । न घालावी काठी आड तया ॥२॥
जयाचे कारण तोचि जाणे करू । नये कोणा वारू आणिकासी ॥३॥
तुका म्हणे तरी सापडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥४॥
अर्थ
जगामध्ये असे कोणीही नाही की ज्याला घर-दार, कन्या, पुत्र, घोडे वगैरे आवडत नाही. कडू लिंबाचा रस कोणी घेईल काय, परंतु दुःख, व्याधी, पीडा नष्ट होण्या करिता रोगी मनुष्य मोठ्या आवडीने कडुलिंबाचा रस घेतो. व्यर्थ कोणताही मनुष्य पळत सुटेल काय, परंतु त्याच्या मागे चोर लागले तर तो पडणारच व पळणाऱ्याला कोणीही आडकाठी घालू नये. ज्याचे काम त्यालाच योग्यप्रकारे जमते त्यामुळे ज्याचे त्याचे काम करताना त्याला कोणीही आडवे येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात निजठेवा तेव्हाच सापडतो जेव्हा आपण आपला जीव ओवाळून बळी देतो.
अभंग क्र. १४७३
काय मी अन्यायी ते घाला पालवी । आणीक वाट दावी चालावया ॥१॥
माग पाहोनिया जातो तोच सोयी । न वजावे कायी कोणी सांगा ॥धृपद॥
धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुम्ही ॥२॥
वारिता ही भय कोण धरी धाक । परी तुम्हा एक सांगतो मी ॥३॥
तुका म्हणे शूर दोही पक्षी भला । मरता मुक्त जाला मान पावे ॥४॥
अर्थ
देवा माझ्याकडून काही अन्याय झाला असेल तर तो अन्याय पदरात घ्या व मला क्षमा करा. आणि मला चालण्यासाठी योग्य मार्ग दाखवा मग तो मार्ग मी इतरांना दाखवेल. मागे संत ज्या मार्गाने चालत होते त्याच मार्गाने मी चालत आहे, त्या मार्गाने कोणी जाऊ नये काय ? देवा आता मला चांगला सरळ सोपा मार्ग सापडला आहे त्या मार्गाने मी जात आहे मग तुम्ही मला त्रास पीडा का देता ? आणि देवा तुम्ही हे लक्षात ठेवा की, मी ज्या मार्गाने जात आहे त्या मार्गाने मला कोणी जरी दिसले तरीही मी भिणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात देवा जर एखादा शूर योद्धा युद्ध करता करता मेला तर त्याला वीरगती प्राप्त होते किंवा तोच योद्धा युद्ध करता करता युद्धात त्याने चांगले पराक्रम करून युद्ध जिंकले तर त्याला सर्व लोकांमध्ये मान प्राप्त होतो.
अभंग क्र. १४७४
नव्हती माझे बोल जाणा हा निर्धार । मी आहे मजूर विठोबाचा ॥१॥
निर्धारा वचन सोडविले माझ्या । कृपाळुवे लज्जा राखियेली ॥धृपद॥
निर्भर मानसी जालो आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषे ॥२॥
आता भय माझे नासले संसारी । जालोसे यावरी गगनाचा ॥३॥
तुका म्हणे हा तो संतांचा प्रसाद । लाधलो आनंद प्रेमसुख ॥४॥
अर्थ
मी जे काही बोललो आहे ते सर्व शब्द माझे नाही तर प्रत्यक्ष विठोबाचेच आहे. विठोबाच माझ्या मुखातून बोलत आहे मी त्या विठोबाचा मजूर आहे. भक्ती करण्याचा मी निश्चय केला आहे आणि भक्ती करून घेण्यास विठोबाने मला सहाय्य केले व यानेच माझी लाज राखली. आता मला संसारांमध्ये कसलेही भय राहिले नाही. सर्व भय नष्ट झाले आहे त्यामुळे मी आकाश यापेक्षाही मोठा झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा तर सर्व संतांचाच प्रसाद आहे व संतांमुळे मला भक्ती ब्रम्हज्ञानाचा लाभ झाला आहे.
अभंग क्र. १४७५
जरा कर्णमूळी सांगो आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥१॥
आता माझ्या मना होई सावधान । ॐपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥धृपद॥
शेवटील घडी बुडता न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥२॥
तुका म्हणे चिंती कुळीची देवता । वारावा भोवता शब्द मिथ्या ॥३॥
अर्थ
अरे मना तुझ्यात कानाजवळ पाढरे केस मृत्यूची भेट जवळ आले आहे हेच उतारवयात तुला सांगत आहेत. आता हे मना तू सावध हो आणि ओमकार स्वरूप हरिचिंतन करून प्रत्येक दिवस पुण्याचा आहे असे समजून कार्याची सिद्धी होईपर्यंत हरीचे चिंतन कर. तुझ्या आयुष्यातील शेवटची घटका, बुडण्याची वेळ लागायचा नाही त्यामुळे सावध हो व याकरिता मृत्यू जवळ आला आहे असे समजूनच आयुष्याचा प्रत्येक क्षण हरिचिंतन करण्यात घाल. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या हरीचे, कुळदैवतेचे चिंतन कर व हरी वाचून सर्व मिथ्या आहे हे समजून प्रत्येक वेळी हरिचिंतन कर.
अभंग क्र. १४७६
मागील ते आटी येणे घडे सांग । सुतविल अंग एका सूत्रे ॥१॥
पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥धृपद॥
आवश्यक तेथे आगळा आदर । चाली थोडे फार संपादते ॥२॥
तुका म्हणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हाता आल्या ॥३॥
अर्थ
ज्या वेळी हरी व मी एकच सूत्रात ओवले जाऊ त्यावेळी मी मागे केलेले अध्यात्मिक प्रयत्न यशस्वी झाले असे समजेन. पाहुणे हे केवळ सुखसोहळा पुरतेच असतात. परंतु हरीच्या सुखापुढे सर्वकाही कमीच आहे. या कारणामुळे हरीच्या ठिकाणी आदर ठेवावा त्यामुळे अध्यात्मिक मार्ग थोडा सोपा होईल. तुकाराम महाराज म्हणतात हरी सारखा अलभ्य लाभ हातात आल्यानंतर सर्व लाभ आपोआप नाहीसे होतात.
सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

