Site icon देवक गोत्र कुळदेवता, Devak Gotra Kuldevi

१९ जून, दिवस १७० वा, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १२६ ते १५० सार्थ तुकाराम गाथा अभंग २०२९ ते २०४०

19 june NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

19 june NITYA PARAYAN SARTHA TUKARAM ABHANG GATHA DNYANESHWARI

“19 जून” सार्थ ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा पारायण

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢

Sartha Gatha + Dnyaneshwari Nitya Parayan 19 June
” राम कृष्ण हरी “

आज दिनांक 19 जून असून
आजच्या पारायणात “सार्थ ज्ञानेश्वरीच्या १३ व्या अध्यायातील 25 ओव्या आणि
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथातील १२ अभंग, आज अभंग २०२९ ते २०४० चे पारायण आपण करणार आहोत.
19 जून, नित्य पारायण, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी १२६ ते १५०,

126-13
आणी इच्छिलिया सांगडे । इंद्रिया आमिष न जोडे । तेथ जोडे ऐसा जो डावो पडे । तोचि द्वेषु ॥126॥(द्वेष = 126)
आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ती, तिला द्वेष असे म्हणतात.
127-13
आता यावरी सुख । ते एवंविध देख जेणे एकेचि अशेख । विसरे जीवु ॥127॥(सुख व दु:ख = 127)
आता यानंतर सुख ते या प्रकारचे आहे, ते असे समज की ज्या एकाच्या योगानेच जीव सर्व विसरून जातो,
128-13
मना वाचे काये । जे आपुली आण वाये । देहस्मृतीची त्राये । मोडितजे ये ॥128॥
जे मनाला, वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते, (व्यापार बंद करते) आणि जे देहस्मृतीचे बळ मोडीत येते,
129-13
जयाचेनि जालेपणे । पांगुळा होईजे प्राणे । सात्त्विकासी दुणे । वरीही लाभु ॥129॥
जे उत्पन्न झाले असता प्राण पांगळा (शांत) होतो व सात्विकवृत्ती पूर्वीपेक्षा दुपटीचे वर चढत जाते,
130-13
का आघवियाचि इंद्रियवृत्ती । हृदयाचिया एकांती व । थापटूनि सुषुप्ती । आणी जे गा ॥130॥
आणि अर्जुना, जे सर्व इंद्रियवृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून व त्यास तेथे थापटून निद्रा आणते
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


131-13
किंबहुना सोये । जीवआत्म्याचीलागे । तेथ जे होये । तया नाम सुख ॥131॥
फार काय सांगावे ?जीवाला आत्म्याचा लाभ(ऐक्य)जेथे प्राप्त होतो, तेथे जी स्थिती होते, त्या स्थितीला सुख हेनाव आहे.
132-13
आणि ऐसी हे अवस्था । न जोडता पार्था । जे जीजे तेचि सर्वथा । दुःख जाणे ॥132॥
आणि अर्जुना अशी ही स्थिती प्राप्त न होता जे जगणे तेच सर्वथा दु:ख आहे असे समज.
133-13
ते मनोरथसंगे नव्हे । एऱ्हवी सिद्धी गेलेचि आहे । हे दोनीचि उपाये । सुखदुःखासी ॥133॥
ते सुख मनोरथांच्या संगतीने प्राप्त होत नाही. एरवी (मनाने मनोरथ करण्याचे सोडून दिले की) ते स्वत: सिद्ध आहेच. हे दोनच उपाय (मनाची स्थिरता व मनाची चंचलता) सुखदुखाला कारणीभूत आहेत.
134-13
आता असंगा साक्षिभूता । देही चैतन्याची जे सत्ता । तिये नाम पंडुसुता । चेतना येथे ॥134॥
(चेतना = 134)अर्जुना, आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामधे जी सत्ता आहे, तिला येथे चेतना हे नाव आहे.
135-13
जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरी । जे तिही अवस्थांतरी । पालटेना ॥135॥
जी पायांच्या नखापासून तो मस्तकाच्या केसापर्यंत नेहेमी खडखडीत जागी असते आणि जी तिन्ही अवस्थांमधे बदलत नाही,


136-13
मनबुद्ध्यादि आघवी । जियेचेनि टवटवी । प्रकृतिवनमाधवी । सदाचि जे ॥136॥
मन व बुद्धी जिच्या योगाने प्रसन्न असतात. व जी नेहेमी प्रकृती(शरीर) रूपी वनाचा वसंतऋतू आहे,
137-13
जडाजडी अंशी । राहाटे जे सरिसी । ते चेतना गा तुजसी । लटिके नाही ॥137॥
बद️ जी जड व चेतन पदार्थात सारखी वागते, ती अर्जुना चेतना होय, हे मी तुला खोटे सांगत नाही.
138-13
पै रावो परिवारु नेणे । आज्ञाचि परचक्र जिणे । का चंद्राचेनि पूर्णपणे । सिंधू भरती ॥138॥
आपला लवाजमा वगैरे किती आहे, जे राजास ठाऊक नसताही त्याचीआज्ञाच जशी परचक्राचे निवारण करते, अथवा पूर्ण चंद्राच्या योगाने समुद्रास जशी भरती येते (पण आपल्या योगाने समुद्रास भरती आली हे जसे चंद्रास माहीत नसते)
139-13
नाना भ्रामकाचे सन्निधान । लोहो करी सचेतन । का सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥139॥
अथवा लोहचुंबकाची जवळीक लोखंडास सचेतन करते (हालचाल करावयास लावते) अथवा सूर्याची संगती जशी लोकांना व्यापार करायला लावते,
140-13
अगा मुख मेळेविण । पिलियाचे पोषण । करी निरीक्षण । कूर्मी जेवी ॥140॥
अरे अर्जुना, कासवी ज्याप्रमाणे आपल्या पिलांचे पोषण मुख लावल्याशिवाय नुसत्या पहाण्याने करते.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत


141-13
पार्था तियापरी । आत्मसंगती इये शरीरी । सजीवत्वाचा करी । उपेगु जडा ॥141॥
अर्जुना, त्याप्रमाणे या शरीरात आत्मसंगती, ही जडाला सजीवत्वाचा उपयोग करते, (म्हणजे जडाला चेतनदशेला आणते).
142-13
मग तियेते चेतना । म्हणिपे पै अर्जुना । आता धृतिविवंचना । भेदू आइक ॥142॥
याप्रमाणे अर्जुना, जडाला चेतनदशेला आणल्याकारणाने त्या आत्मसत्तेला ‘चेतना ” असे म्हटले जाते.
(धैर्य = 142) आता धैर्याच्या विचाराचा प्रकार ऐक.
143-13
तरी भूता परस्परे । उघड जातिस्वभाववैरे । नव्हे पृथ्वीते नीरे । न नाशिजे ॥143॥
तर पंचमहाभूतांमधे एकमेकांशी त्यांच्या त्यांच्या जातीच्या स्वभावाने उघड वैर आहे. पाणी पृथ्वीचा नाश करत नाही काय ?
144-13
नीराते आटी तेज । तेजा वायूसि झुंज । आणि गगन तव सहज । वायू भक्षी ॥144॥
पाण्याला तेज आटवून टाकते, तेजाचे व वायूचे वैर आहे आणि आकाश तर सहज (स्वभावत:च) वायूला नाहीसा करते.
145-13
तेवीचि कोणेही वेळे । आपण कायिसयाही न मिळे । आंतु रिगोनि वेगळे । आकाश हे ॥145॥
त्याप्रमाणे कोणत्याही वेळी आपण कशानेही न मळता जे सर्व वस्तूंमधे शिरून पुन्हा सर्वाहून स्वरूपत: अलग असते ते आकाश होय.


146-13
ऐसी पांचही भूते । न साहती एकमेकांते । की तियेही ऐक्याते । देहासी येती ॥146॥
अशी पाचही महाभूते एकमेकाला सहन करीत नाहीत, असे त्यांचे स्वभावत: वैर असूनही ती पंचमहाभूते एक होऊन देहाच्या रूपाने प्रगट होतात.
147-13
द्वंद्वाची उखिविखी । सोडूनि वसती एकी । एकेकाते पोखी । निजगुणे गा ॥147॥
म्हणजे द्वंद्वाची उखीविखी (वैराविषयी वादविवाद) सोडून एकोप्याने रहातात. इतकेच नाही तर अर्जुना, आपल्या गुणाने एक दुसर्‍याला पोषित असतो.
148-13
ऐसे न मिळे तया साजणे । चळे धैर्ये जेणे । तया नांव म्हणे । धृती मी गा ॥148॥
याप्रमाणे ज्यांचे स्वभावत: एकमेकांशी पटत नाही, त्यांची मैत्री असणे हे ज्या धैर्याच्या योगाने चालते, त्याचे नाव धृति असे मी म्हणतो.
149-13
आणि जीवेसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा । तो हा एथ जाणावा । संघातु पै गा ॥149॥
आणि अर्जुना, वर सांगितलेल्या या पस्तीस तत्वांचा जीवभावाने असणारा समुदाय हा समुदाय येथे छत्तिसावे संघात नावाचे तत्व जाणावे.
150-13
एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद । यया येतुलियाते प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे ॥150॥
या छत्तीस तत्वांनी युक्त ते क्षेत्र = याप्रमाणे छत्तीसही प्रकार तुला स्पष्ट सांगितले. या एवढ्यांना क्षेत्र असे म्हणतात हे प्रसिद्ध आहे.
मुख्यसूची ओव्या श्लोक शब्दकोश व्यक्ती मदत PDF&अॅप दृष्टांत

दिवस १७० वा, १९, जून
वार्षिक नित्य पारायण दररोज सार्थ १२ अभंग पारायण
🕉️ संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा प्रारंभ 🕉️
SANT TUKARAM MAHARAJ SARTHA ABHANG GATHA 4092 ABHANG
अभंग २०२९ ते २०४०
सार्थ तुकाराम गाथा

हे पारायण पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी🎧
वारकरी रोजनिशी चॅनल पाहा” 🔊📢


अभंग क्र. २०२९
संवसारसांते आले हो आइका । तुटीचे ते नका केणे भरू ॥१॥
लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथे ॥धृपद॥
शृंगारिले दिसे न कळे अंतर । गोविला पदर उगवेना ॥२॥
तुका म्हणे खोटे गुंपता विसारे । हातिंचिया खरे हाती घ्यावे ॥३॥
अर्थ

अहो तुम्ही संसाराच्या बाजारात आलेले आहात आणि ज्यामुळे तुमचा तोटा होईल असा माल तुम्ही भरू नका. तुम्हाला खरा लाभ होण्याचा काळ हाच योग्य आहे तो म्हणजे तुम्हाला मनुष्यदेह लाभला आहे आणि त्याविषयी तुम्ही विचार करा आणि जे खरे लाभाचे पारखी आहेत ते म्हणजे संत यांचे तुम्ही साह्य येथे घ्या. या बाजारांमध्ये स्वर्गासारखा वर वर चांगला दिसणार माल देखील आहे आणि तुमच्या वासनेचा की पदर एकदा त्यामध्ये अडकला तर तो पुन्हा निघत नाही. तुकाराम महाराज म्हणतात काही लोक या बाजारपेठेमध्ये माल घेण्याच्या वायद्याने अगोदरच ईसार देऊन त्यात गुंतून पडले पण हे खोटे त्यापेक्षा चांगला माल, हाती रोख सेवा रुपी मोल देऊन घेणे हेच चांगले आहे.

अभंग क्र. २०३०
सारावी लिगाडे धरावा सुपंथ । जावे उसंतीत हळूहळू ॥१॥
पुढे जातियाचे उमटले माग । भांबावले जग आडराने ॥धृपद॥
वेचल्याचा पाहे वरावरी झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥२॥
तुका म्हणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तो ॥३॥
अर्थ

संसारातील सर्व भानगडी दूर सारून भक्तीसाठी चांगला मार्ग धरावा व त्याच मार्गाने हळूहळू चालत राहावे. या भक्तिमार्गा मध्ये पुढे अनेक संत गेले आहेत त्यांच्या उमटलेल्या पावलावर पाऊले देऊन त्यांच्या मागे मागे चालत राहावे नाहीतर या जगातील अनेक लोक आड रानानेच फिरत आहेत. भक्तीमार्गावर आपण चालत असताना आपल्या अंगी किती गुण आहेत किती दोष आहेत याविषयी विचार करावा त्याचा वेळोवेळी हिशोब करावा आणि या मार्गावर जो स्वतःच्या भक्तीच्या बळावर निधड्या छातीने पुढे गेला तोच खरा बलवंत आहे असे समजावा. तुकाराम महाराज म्हणतात जो जसे बोलतो तसे वागुनही दाखवतो तोच शेवटी आपले बोलणे खरे करून दाखवतो आणि तोच खरा साधक आहे.

अभंग क्र. २०३१
बुद्धीमंदा शिरी । भार फजिती पदरी ॥१॥
जाय तेथे अपमान । पावे हाणी थुंके जन ॥धृपद॥
खरियाचा पाड । मागे लावावे लिगाड ॥२॥
तुका म्हणे करी । वर्म नेणे भरोवरी ॥३॥
अर्थ

बुध्दीमंद जे लोक असतात जे मतिमंद असतात त्यांच्या माथ्यावर कामाचा खूप भार असतो आणि काही चुकल्यास त्यांच्या पदरी फजितीही पडते. तो जेथे जातो तेथे त्याचा अपमान होतो आणि त्याच्याकडून काही चूक झाली तर त्याचे नुसकान होते व त्या कारणामुळे लोक त्याच्या तोंडावर थुंकतात. अश्या त्या माणसाला खरा माल दाखवला जातो परंतु त्याला फसवून दुसरा खोटा माल दिला जातो आणि मग त्याच्या मुळे त्याच्यामागे भानगड तो स्वतःहून पाठीमागे लावून घेतो. तुकाराम महाराज म्हणतात असा मनुष्य प्रयत्न तर खुप करतो परंतु त्याला कोणत्याही गोष्टीतील खरे वर्म कळत नाही त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नाही.

अभंग क्र. २०३२
पूर्वजांसी नरका । जाणे ते आइका ॥१॥
निंदा करावी चाहाडी । मनी धरूनि आवडी ॥धृपद॥
मात्रागमना ऐसी । जोडी पातकांची रासी ॥२॥
तुका म्हणे वाट । कुंभपाकाची ते नीट ॥३॥
अर्थ

पूर्वजांना जर नरकाला पाठवायचे असेल तर मी एक सोपा उपाय सांगतो तो तुम्ही ऐका. तो उपाय म्हणजे संतांची निंदा चहाडी करावी आणि निंदा व चहाडी विषयी मनामध्ये एक विशेष आवड ठेवूनच अशी निंदा व चाहाडी करण्याचे कर्म करावे. मातृगमन्या सारख्या भयानक अश्या पापाची राशी जोडून ठेवावी. तुकाराम महाराज म्हणतात कुंभ पाक नरकाकडे जाण्याची ही साधी व सरळ सोपी वाट आहे.

अभंग क्र. २०३३
वेडी ते वेडी बहुत चि वेडी । चाखता गोडी चवी नेणे ॥धृपद॥
देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥१॥
कडिये मूल भोवते भोंये । मोकलुनि रडे धाये ॥२॥
लेकरे वित पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥३॥
आपुली शुद्धी जया नाही । आणिकाची ते जाणे काई ॥४॥
तुका म्हणे ऐसे जन । नरका जाता राखे कोण ॥५॥
अर्थ

एकतर पहिलेच मतिमंद त्याच्यात थोडे वेड लागले तर एखादी स्त्री आणखीच वेडी होते मग तिला कितीही गोड पदार्थ खाण्यास दिला तर तिला त्याची चव कळत नाही. अशी मूर्ख स्त्री दिवसा दिवा लावते आणि रात्र झाली की पदराने दिवा विझवून टाकते. स्वतःचे मुल कडेवर घेते आणि मुल हरवले म्हणून अशी वेडसर स्त्री धायमोकलून रडते. एकामागून एक मुलांना जन्म देते आणि जगाला विचारते माझा नवरा कोण आहे ते सांगा ? मग ज्याला आपली स्वतःची शुद्ध नाही तो इतरा विषयी काय जाणत असेल ? तुकाराम महाराज म्हणतात असे या जगामध्ये अनेक लोक आहेत की ज्याना स्वतःचे स्वरूप समजत नाही असे लोक आपल्या कर्मानुसार नरकाला जातात मग त्यांचे रक्षण कोण करेल ?

अभंग क्र. २०३४
आवडीचे दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे ॥१॥
जे जया रुचे ते करी समोर । सर्वज्ञ उदार मायबाप ॥धृपद॥
ठायी पडिलिया ते चि लागे खावे । ठायीचे चि घ्यावे विचारूनि ॥२॥
बीज पेरूनिया ते चि घ्यावे फळ । डोरलीस केळ कैचे लागे ॥३॥
तुका म्हणे देवा काही बोल नाही । तुझा तू चि पाही शत्रु सखा ॥४॥
अर्थ

भक्तांच्या आवडीचे दान नारायण भक्तांना देत असतो त्याकरता तर तो आपले दोन्ही हात उभारून विटेवर उभा राहिला आहे. ज्या भक्ताला ज्याची आवड असेल त्याच्या समोर ते तो सादर करत असतो असा हा सर्वज्ञ उदार आमचा माय बाप आहे. आपल्या ताटात आपण जे मागू तेच देतो व ते आपल्याला खावे लागते त्याकरता काहीही मागतांना विचार करून मागावे म्हणजेच देवाला कोणतेही दान मागताना विचार करून मागावे नंतर पश्चाताप करत बसू नये. जसे बीज आपण पेरतो तसेच फळ आपल्याला घ्यावे लागते जर रान वांग्याचे झाड लावले तर त्याला चांगले फळ कसे येतील ते सांगा ? तुकाराम महाराज म्हणतात अहो तुम्ही देवाला दोष का बर देता बारीक विचार करून पाहिले तर असे लक्षात येते की चांगला विचार आपण केला तर आपण आपले मित्र आहोत आणि वाईट विचार केला तर आपणच आपले शत्रु आहोत.

अभंग क्र. २०३५
अडचणीचे दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥
काय करावे ते मौन । दाही दिशा हिंडे मन ॥धृपद॥
बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥२॥
नाही इंद्रिया दमन । काय मांडिला दुकान ॥३॥
अर्थ

एका व्यक्तीने खूप मोठे घर बांधले आत मधे खुप जागा बाहेरही खूप मोठे पटांगण आहे परंतु घरात जाण्यासाठी जे दार आहे ते खूप अडचणीचे केले की ज्यातून आतही जाता येत नाही मग त्या घराचा काय उपयोग आहे काय ? त्याप्रमाणे ज्याचे मन दाही दिशा फिरत असते त्याने कितीही मौन धरले तरी त्याचा काही उपयोग आसतो ? बाहेर साधुसंत असल्याचा वेश धारण करून सोंग आणतो आणि आतमध्ये मात्र वासनेचा जर लेश असेल तर त्या वेश्याचा काही उपयोग आहे काय ? इंद्रियांचे दमन तु करू शकत नाही इंद्रियांना तु आपल्या संयमात ठेऊ शकत नाही तर मग ते परमार्थाचे दुकान काय मांडले आहेस ? आहो बाहेरून भिंतीला चांगले वरवर सारवले परंतु आत मध्ये घरात घाणच असेल तर काही उपयोग आहे का त्‍याप्रमाणे तुम्ही साधूचे वरवर वेश धारण करून सोंग घेतले खरे परंतु आत मध्ये जर तुमचे मन अपवित्र असेल तर त्याचा काही उपयोग होतो काय ? तुकाराम महाराज म्हणतात अशा सोंगी मनुष्याच्या शेवटी हाताला काहीच लागत नाही.

अभंग क्र. २०३६
लय लक्षूनिया जालो म्हणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥१॥
जालो बहुश्रुत न लगे आता काही । नको राहू ते ही निश्चिंतीने ॥धृपद॥
तपे दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढे ॥२॥
कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथे ॥३॥
तुका म्हणे जरी होईल निष्काम । तरि च होय राम देखे डोळा ॥४॥
अर्थ

काही योगी लोक समाधिस्त अवस्थेमध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाचा त्यांना भास होतो आणि ते त्यामुळे आम्ही देव झालो असे म्हणू लागतात परंतु तो त्यांचा भाव खरा नाही हे तुम्ही जाणा. आम्ही शुद्ध झालो आता आम्हाला काहीही करायची गरज नाही या समजुतीने तु निश्चिंत राहू नकोस. मी खूप तप केले मी खूप दान केले आता मला मोक्ष निश्चिंत मिळणार या विश्वासाने तु राहू नकोस कारण तप आणि दानाचे फळ तुला पुढे भोगायचे आहे. तु म्हणतोस मी नित्य नैमित्तिक कर्म केले व त्याचे आचरण करतो मग यात विशेष असा गुण काय आहे ते तर तुझे कर्म आहे तु केवळ वर्णआश्रमाला अनुसरून तुझे कर्म केले आहे नित्य नैमित्तिक कर्म केल्याने फळ तर काही प्राप्त होत नाही परंतु नित्य नैमित्तिक कर्म जर केले नाही तर मात्र पाप लागते. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर निष्काम कर्म करत राहाल तर तुम्ही नक्कीच राम रूपव्हाल आणि सर्व जग हे राम रूपच आहे असे तुम्हाला नक्की दिसेल.

अभंग क्र. २०३७
पुरली धाव कडिये घेई । पुढे पायी न चलवी ॥१॥
कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥धृपद॥
अवघी निवारावी भूक । अवघ्या दुःख जन्माचे ॥२॥
तुका म्हणे बोलवेना । लावी स्तना ईश्वरे ॥३॥
अर्थ

हे आई पांडुरंगा मी आता धावून धावून दमलो आहे त्यामुळे तु मला कडावर घे यापुढे मला चालवत नाही. हे कृपाळू पांडुरंगा तु माझ्या जीवाचा जिवलग आहेस तु नित्य माझ्या अंग संगतीतच असते. तु माझी सर्व भुक नाहीशी कर आणि माझ्या सर्व जन्माचे दुख तु नष्ट कर. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा आता मला जास्त बोलवत नाही तु मला आता उचल आणि तुझ्या स्तनाला लाव व तुझा प्रेम रुपी पान्हा मला पाज.

अभंग क्र. २०३८
जे जे मना वाटे गोड । ते ते कोड पुरविसी ॥१॥
आता तू चि बाह्यात्कारी । अवघ्यापरी जालासी ॥धृपद॥
नाही सायासाचे काम । घेता नाम आवडी ॥२॥
तुका म्हणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥३॥
अर्थ

देवा माझ्या मनाला जे गोड वाटते जे माझे लाड आहेत ते ते सर्व तु आवडीने पूर्ण करतोस. आता तूच मला सर्व माझ्या अंतःकरणात व बाह्यरंगात येऊन राहिला आहेस. तुझे नाम जर प्रेमाने घेतले आवडीने घेतले तर काही कष्टच उरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगे दयाळे तु मला तुझे सर्व गुह्य ज्ञान सांग.

अभंग क्र. २०३९
जेथे माझी दृष्टी जाय । तेथे पाय भावीन ॥१॥
असेन या समाधाने । पूजा मने करीन ॥धृपद॥
अवघा च अवघे देसी । सुख घेवविसी संपन्न ॥२॥
तुका म्हणे बंधन नाही । ऐसे काही ते करू ॥३॥
अर्थ

देवा माझी दृष्टी जेथे जेथे जाईन तेथे तेथे तुझे पाय आहेत अशीच भावना माझी आहे. तुझी पूजा मी मनामध्येच नेहमी करेन व त्याच समाधानाने राहील. देवा तु सर्व सुखाची राशी आहेस सर्व सुखसंपन्न आहेस सर्व देशांमध्ये तूच व्यापलेला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात आता आपल्या काणतेच बंधनच राहणार नाही असाच काही तरी आपण उपयोग करू.

अभंग क्र. २०४०
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोका ॥१॥
कोण्या काळे सुखा । ऐशा कोण पावत ॥२॥
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥धृपद॥
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३॥
तुका म्हणे धन्य जाले । भूमी वैकुंठ आणिले ॥४॥
अर्थ

हे पुंडलिका तु भला आहेस खूप चांगला आहेस सर्व संतसज्जनांनी लोकांनी तुला मान्यता दिली आहे सर्वाना तु मान्य झाला आहेस. अरे तु जर नसता तर कोणाला आणि कोणत्या काळी या हरीचे सुख असे प्राप्त झाले असते. ज्याला कोणीही आज पर्यंत जिंकू शकले नाही कोणालाही जो प्राप्त झाला नाही असा पांडुरंग तु विटेवर उभा केला आहेस. एवढेच नाही तर तु पांडुरंग रुक्माई सत्यभामा गरुड हनुमंत गोपी गोपाळ हा सर्व परिवारास पंढरीस आणला आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे पुंडलिका वैकुंठच तु भूमीवर आणले आहे त्यामुळे सर्व भूमी धन्य झाली आहे.

जून नित्य पारायण सूची

१२ महिने पारायण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी वाचन, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचे पारायण, संत ज्ञानेश्वर, Sartha Dnyaneshwari, Dnyaneshwari Parayan, Dnyaneshwari Wachan, Dnyaneshwari vachan, wachavi Dnyaneshwari, Dnyaneshwariche Parayan, Sant Dnyaneshwar,
Sant Tukaram Abhang Gatha, Tukaram Abhang Gatha, Tukaram Gatha, Tukaram Sartha Abhang Gatha, Sant Tukaram Abhang Gatha Parayan, Sant Tukaram Gatha Parayan, Tukaram Gatha Parayan, Sant Tukaram Sartha Gatha Parayan, Tukaram Sartha Gatha Parayan, Sartha Gatha Parayan,
संत तुकाराम अभंग गाथा, तुकाराम अभंग गाथा, तुकाराम गाथा, तुकाराम सार्थ अभंग गाथा, संत तुकाराम अभंग गाथा पारायण, संत तुकाराम गाथा पारायण, तुकाराम गाथा पारायण, संत तुकाराम सार्थ गाथा पारायण, तुकाराम सार्थ गाथा पारायण, सार्थ गाथा पारायण.

Exit mobile version